रविवार, ११ मार्च, २०१८

स्ट्रँड, पॉप्युलर आणि पुस्तक-व्यवहार

मुंबईच्या प्रसिद्ध ’स्ट्रँड’ पाठोपाठ पुण्यातील ’पॉप्युलर बुक हाऊस’ बंद होत असल्याची बातमी वाचायला मिळाली*.

मी मुंबईकर नसल्याने स्ट्रँडचा अनुभव नाही, पण जे वाचायला मिळते आहे त्यावरुन पारंपरिक पुस्तकविक्रीचे मॉडेल कालबाह्य झाल्याने अव्यवहार्य होऊन ते बंद करावे लागले असे दिसते. पॉप्युलरच्या सुनील गाडगीळांनीही हाच सूर आळवला आहे. स्ट्रॅण्ड बंद होण्याची दिलेली कारणे कितपत खरी हे तपासून पाहण्यासाठी माझ्याकडे पुरेसा डेटा नाही. पण पॉप्युलर बाबत मी थोडेफार बोलू शकतो.

PopularBookHouse

दोन वेळचे अन्न मिळवण्याची भ्रांत होती तोवर पुस्तक विकत घेणे हा प्रकार संभवत नव्हता. खासगी क्लासेसमधून काही वर्ग घेणे सुरु केले, त्यांचे पेपर तपासून देण्यातून काही प्राप्ती होऊ लागली, तेव्हा दोन-तीन महिन्यांतून एखादे पुस्तक विकत घेणे परवडू लागले. तेव्हा पुस्तके विकत घेण्याचे ठिकाण होते ’पॉप्युलर बुक हाऊस’. त्याच्या शिवाय पुण्यात रसिक साहित्य आणि डेक्कनवरचे दीक्षितांचे ’इंटरनॅशनल बुक हाऊस’. बाकीची दुकाने प्रामुख्याने शालेय पुस्तकेच विकत असत. ’इंटरनॅशनल’ मध्ये पुस्तकांवर हवी तेवढी धूळ फ्री मिळत असल्याने तिथे मी फारसा पाऊल ठेवत नव्हतो.

विद्यापीठातून परत येताना डेक्कन जिमखान्यावरुन बस बदलावी लागत असल्याने थेट अप्पा बळवंत चौकात 'रसिक’ला जाण्यापेक्षा तिथल्या तिथे पॉप्युलरमधे जाणे सोयीचे होता. इंटरनॅशनलच्या गलथान कारभाराच्या तुलनेत भरपूर लाईट्स आणि स्वच्छता असल्याने पावले तिकडेच वळत. (अर्थात उपलब्ध पुस्तकांची तुलना केली तर इंटरनॅशनल अधिक सोयीचे. पण तेव्हा मी प्रामुख्याने समकालीन पुस्तकेच अधिक वाचत असल्याने फार फरक पडत नव्हता.)

पुस्तकांच्या जाहिरातीसाठी ईमेल बुलेटिन वापरणारे गाडगील पहिलेच असावेत. ’या आठवड्यात आलेली पुस्तके’ अशा सब्जेक्ट लाईनची ईमेल दर आठवड्याला येई. इतकेच काय पण अमुक एक सीडी वा पुस्तक हवे आहे नि ते उपलब्ध नसेल तर ते मागवून घेऊन फोन करणारे दुकान असल्याने सोयीचेही ठरले.

काळ पुढे गेला तसे गाडगीळांनी बिजनेस मॉडेल हळूहळू बदलत नेले. दुकानाची मागची बाजू प्रथम इंग्रजी पुस्तकांनी भरली. मग काही रॅक्स केवळ महाविद्यालयीन उपयोगाची तांत्रिक पुस्तके आली. यथावकाश संगणकासंबंधी पुस्तके अवतीर्ण झाली. त्यांनी तर काही काळ इतका धुमाकूळ घातला की इंग्रजी साहित्याच्या पुस्तकांनाही एक रॅक रिकामी करुन देऊन माघार घ्यावी लागली. या सार्‍या प्रकारात मराठी पुस्तकांसाठी एका कोपर्‍यातील दोन रॅक्स तेवढ्या उरल्या होत्या. मग सीडीज आल्या. दुकानाच्या डोक्यावर खेळण्यांचे दुकान सुरु झाले. एकुणात पुस्तकांच्या दुकानाचा पुस्तके आणि इतर अनेक गोष्टींचा मॉल झाला.

यातून दुकानाचा फोकस पुरा नाहीसा झाला. दुकानात सगळ्या प्रकारची पुस्तके आहेत, पण एखाद्या प्रकारचे नेमके हवे असलेले पुस्तक नाही हा प्रकार वारंवार घडायला लागला. आजच्या गुगलच्या नि व्हॉट्स अ‍ॅपच्या जमान्यात माणसांच्या माहितीचा विस्तार वाढला पण खोली कमी झाली आहे, अगदी तसेच ’पॉप्युलर’चे घडले. सर्व प्रकारची पुस्तके मिळतात म्हणून कोणत्याही पुस्तकाची गरज असलेल्या लोकांची पावले तिकडे वळू लागली, पण हवे ते पुस्तक मिळण्याची शक्यता कमी आहे हे ध्यानात आल्यावर पर्यायांच्या शोधात निघाली. महाविद्यालयीन गरजेची नि संगणकाची पुस्तके घेण्यासाठी लोक कॅम्प गाठू लागले. एकदा एक मराठी पुस्तक हवे होते म्हणून तिथे गेलो असताना, एरवी आवर्जून पुस्तके मागवून देणार्‍या गाडगीळांनी ’आम्ही मराठी पुस्तके फारशी ठेवत नाही’ असे किंचित आढ्यतेखोर स्वरात उत्तर दिल्यावर मी तिकडे जाणे बंद केले. माझी खात्री आहे मराठी पुस्तके नेण्यासाठी जाणारे अशाच कारणांसाठी दूर गेले असावेत.

पुढे अनेक प्रकाशकांनी आपापल्या बुक गॅलरीज काढल्या, अर्धा किलोमीटरवरील इंटरनॅशनलचे ’बुकगंगा इंटरनॅशनल’ होऊन त्याने कात टाकली, इंग्रजी पुस्तके डिस्काउंटसह ऑनलाईन खरेदी करुन घरपोच मिळू लागली, सीडी या प्रकाराला जवळजवळ घरघर लागली, प्रचंड इंटरनेट डेटाबेस मुळे संगणक शिकण्यासाठी कुणीही पुस्तक वाचेनासे झाले... एक एक करुन पॉप्युलरचा ग्राहक नाहीसा होत गेला.

थोडक्यात सांगायचे तर ’If you try to please everyone, you end up displeasing everyone.’ हे पॉप्युलरला तंतोतंत लागू पडणारे आहे. न बदलणे हे स्ट्रँडच्या पतनाचे कारण असेल तर फार बदलणे, वारंवार बदलणे आणि आपली ओळखच निर्माण न करणे हे पॉप्युलरच्या पतनाचे कारण आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.

तेव्हा गाडगीळांनी दिलेल्या कारणाशी मी सहमत नाही. एखाद्या नवशिक्या कवीने जसे आपल्या कवितेत ’फेसबुक, ट्विटर, जागतिकीकरण’ वगैरे शब्द घुसवून आपली कविता नव्या जगाची, नव्या जाणीवेची वगैरे असल्याचा दावा करावा तसे काहीसे करण्याचा प्रयत्न ’पॉप्युलर’ने केला नि तो अपरिहार्यपणे फसला असे म्हणावे लागेल. स्ट्रॅण्ड आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून लयाला गेले, पॉप्युलरचे मात्र ’गाढवही गेले नि ब्रह्मचर्यही’ अशी स्थिती झाली आहे.

असे असले तरी पुस्तक खरेदीच्या सुरुवातीच्या काळात हवी असलेली पुस्तके, सीडीज आवर्जून आणून देणारे गाडगीळ आणि पॉप्युलरबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहेच. तेव्हा ते बंद होणार म्हणून वाईट हे वाटणारच. पण बदल हवा म्हणताना बदलांचा अतिरेकी हव्यासही तुमच्या पतनास कारणीभूत होतो हे सांगण्यासाठी ही पोस्ट.

-oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा