शुक्रवार, ३० मार्च, २०१८

’माझा’ धर्म आणि मी

MyReligion

धर्म ही स्वीकारण्याची, अनुसरण्याची गोष्ट आहे, लादण्याची नव्हे.

माझा धर्म कोणता हे मीच ठरवणार, अन्य कुणी ठरवून कसे चालेल? जर मी ’पास्ताफारियन’ आहे आणि मी ’फ्लाईंग स्पागेती मॉन्स्टर’ या देवाची पूजा करणार आहे तर इतर कुणी त्यावर कसे काय आक्षेप घेऊ शकतील? जन्मजात मिळालेला धर्म हाच तुमचा धर्म असला पाहिजे असे बंधन जगाच्या पाठीवर कुठेही नाही.

पण बहुतेक माणसे आळशी असतात. वारशाने, अनायासे जे मिळाले तेच श्रेष्ठ मानून चालतात. इथवर ठीक असते. पण इथेच न थांबता पुढे इतरांनीही ते मानावे म्हणून आग्रह धरतात, इतरांचा धर्म मोडून काढायचा प्रयत्न करतात. हा मूर्खपणा तर आहेच, पण इतरांच्या अधिकारांचे उल्लंघनही आहे.

आम्ही बहुसंख्य आहोत म्हणजे आम्ही म्हणू तसे नियम हे बहुमताच्या राजकीय व्यवस्थेबाबत खरे आहे. पण तोच नियम धार्मिक बाबतीत लावता येणार नाही. राजकीय व्यवस्था ही केवळ तेवढ्याच धार्मिक गोष्टींत हस्तक्षेप करु शकेल जिच्या द्वारे तिच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी, सामाजिक परस्परसंबंध, हक्क नि आचारसंहिता, संपत्तीचा विनियोग इत्यादि बाबतीत संघर्ष होऊ शकतो. वैयक्तिक आचारधर्म कुणी कुठला निवडावा आणि अन्य कुणाही व्यक्तीच्या वा व्यवस्थेच्या हक्कांवर गदा येत नसेल तर त्या आचारधर्माने कसे वर्तन करावे याबाबत बोलण्याचा राजकीय व्यवस्थेला अधिकार नसतो/नसावा.

आता लिंगायत समूहाने आमचा एक धर्म आहे असे त्यांच्यापुरते ठरवले, तर त्याला आक्षेप घेण्याचे गैर-लिंगायताला काहीच कारण नसावे... जर त्या नव्या धर्मासोबत येणारे आचारविचार त्याच्या/तिच्या हक्कांवर नव्याने काही ’प्रत्यक्ष*’ गदा येत नसेल तर! वर म्हटले तसे सांपत्तिक बाजू, वारसा हक्क आदि गोष्टी ज्यांच्याबाबत राजकीय शासन उत्तरदायी असते, त्यांनी हस्तक्षेप करणे अपेक्षित असते. राजकीय व्यवस्थेला बदल करावा लागणार नसेल, तर त्याबाबत राजकीय व्यवस्थेने त्याबाबत मंजुरी देणे वा न देणे हे गैरलागूच आहे.

हिंदू, बौद्ध आणि जैन हे तीन स्वतंत्र धर्म आहेत. हिंदूंमधले काही हे मानत नाही. पण त्यांना विचारतो कोण. जोवर बौद्ध नि जैन स्वत:ला स्वतंत्र मानतात तोवर त्या हिंदूंच्या मानण्याला काही अर्थ नाही. (पहिला परिच्छेद पहा.) पण त्यांना एकच कौटुंबिक कायदा राजकीय व्यवस्थेने दिला आहे. तेव्हा राजकीय व्यवस्थेत(!) त्या विशिष्ट संदर्भात वेगळेपण नाही.

थोडक्यात आचारी धर्म नि राजकीय धर्म हे वेगळ्या दृष्टीने पहावे लागतात. लिंगायत/वीरशैव जर राजकीय व्यवस्थेकडे वेगळ्या धर्माची मागणी करत असतील, तर त्यांना राजकीय व्यवस्थेमध्ये नक्की कोणते वेगळे स्थान अपेक्षित आहे हे सांगायला हवे. तसे काही नसेल तर वैयक्तिक पातळीवर ते स्वत:ला वेगळा धर्म म्हणून घोषित करु शकतातच की. त्यासाठी सरकारी अनुमतीची गरजच काय. मला एखादा धर्म स्थापन करायचा झाला तर मी काय प्रत्येक देशाच्या राजकीय नेतृत्वाकडून परवानग्या मागत हिंडणार आहे की काय?

राहता राहिला मुद्दा काँग्रेस शासनाने स्वतंत्र धर्म म्हणून त्यांना अनुमोदन देण्याचा. त्यात आश्चर्य काहीच नाही. राजकीय पातळीवर माणसे स्वच्छपणे जातीय आणि धर्मीय गणिते जमवत असतात. 'तुम्हाला स्मशान हवे की कब्रस्तान?', 'तुम्हाला मंदिर हवे की मस्जिद?' हे प्रश्न ’धर्माधारित मते मागितली” या आरोपातून तांत्रिकदृष्ट्या पळवाट देत असतील तरी ते स्वच्छपणे धार्मिक आधारावर मते मागणेच असते.  

तिथे कायदेशीर असल्याचा दाखला द्यायचा नि कर्नाटकात मात्र नैतिकतेचा आधार घेण्याचा आग्रह धरायचा, याला दुटप्पीपणाच म्हटले पाहिजे. त्याच कर्नाटकातील एक भाजप आमदार पुढची विधानसभा निवडणूक ही ’राम विरुद्ध अल्ला अशी असणार आहे’ हे विधान करतात, तेव्हा आज काँग्रेस ध्रुवीकरण करत आहे म्हणणारे चूप होतेच की. ’आपला तो बाब्या...’ हेच सर्वत्र घडत असते. याचे कारण मुळात तुम्ही-आम्ही सामान्यांनी लाज सोडली आहे. प्रश्न मुद्द्याधारित न सोडवता, व्यक्तीसंदर्भात वा आपल्या-परक्या गटाच्या संदर्भात सोडवत राहिले की असे घडत असते.

आपल्या बाजूच्याने बेताल विधान वा वर्तन केले, तर आपण पार खाली डोके वर पाय करुन, रामदेवासन करुन, एक डोळा मिटून, डावा हात पाठीमागे नि उजवा हात क्षितीज समांतर धरुन वा अशीच अतर्क्य आसने करुन ते बरोबरच दिसावे अशी खटपट करत असतो. दुर्दैव असे, की हा आटापिटा न करता सरळ पाहणार्‍याला तुमचा हा ’दृष्टिकोन’ नसल्याने त्याला ते चूकच दिसत राहते. ’आपल्या’ बाब्याचे' (माझा कुणी बाब्या नसला तरी आपला विरोधक हाच तुमचा बाब्या असा कांगावा करणारे बरेच आजूबाजूला आहेत.) वाटेल ते करुन समर्थन करणे मला जमणार नाही.

तेव्हा काँग्रेसने अमुक केले तर ते कसे बरोबर किंवा ’तेव्हा का नाही’ हा प्रश्न मला विचारु नका. कम्युनिस्टांपासून काँग्रेसपर्यंत, व्हाया समाजवादी, भाजप सारेच चुका करतात आणि त्या चुकाच असतात असे मी म्हणतो.

अमक्याला फाशी योग्य, बरोबरच आहे आणि तमक्याला मात्र गोवले आहे असा दावा - तो ही पुराव्यांशी दूरदूरचा संबंध न येता - करणार्‍या मूर्खांच्या पंगतीत मी बसू इच्छित नाही. 'फाशी देणेच अयोग्य, मग गुन्हेगार कुणीही असो' असे सर्वसाधारण मत मी मांडत असतो. तुम्हाला हे विधान सर्वसाधारण विधान म्हणून अमान्य असेल तर 'ते तसे असावे की केस-टु-केस बेसिसवर विचार करावा' हा तात्त्विक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. पण तुमच्या सोयीचा म्हणून 'याकूबच्या फाशीबद्दल तुमचे काय मत आहे?' हा विशिष्ट प्रश्न विचारण्यात अर्थ नसतो. कारण मूळ सर्वसाधारण विधानातच त्याचे उत्तर अनुस्यूत असते. त्यावरच्या तुमच्या कांगाव्याला मी भीक घालणार नाही.

त्याचप्रमाणे जातीय वा धार्मिक आधारावर राजकारण करणे एकदा गैर आहे असे मी सांगितले की पुन्हा, ’काँग्रेसच्या धार्मिक राजकारणाचे काय?’ किंवा ’ट्रम्प यांच्या धार्मिक राजकारणाबद्दल तुमचे मत काय?’ हे प्रश्न गैरलागू असतात. मी गणिती आहे. मी उत्तराचे सूत्र तुम्हाला दिले आहे. त्यात x ची काय व्हॅल्यू घालून तुम्ही उत्तर काढता याच्याशी मला कर्तव्य नाही. तुम्हाला गणित नीट सोडवता येते हे गृहित धरले, तर तुमच्या प्रत्येक x व्हॅल्यू साठी माझ्या सूत्रातून येणार्‍या उत्तरापाठीमागे मी ठाम उभा असणार आहे.

तुम्हाला मी काँग्रेसवाला, कम्युनिस्ट वा समाजवादी वाटत असलो तर ती तुमच्या समजुतीची मर्यादा आहे. तुम्हाला एका गटाच्या संदर्भातच माणसाचा विचार करता येतो, तुमची मानसिकता कळपाची आहे आणि एखाद्या खुंटीला लटकल्याखेरीज तुम्हाला जगता येत नाही. पण तो तुमचा दुबळेपणा आहे. त्याला मी जबाबदार नाही. आणि सुधारणा करायची असेल, व्यक्तीला व्यक्ती म्हणून पाहायचे असेल तर सुधारण्याची गरज तुम्हाला आहे, मला नाही.

कोणत्याही गटाचे वा नेत्याचे समर्थन करण्यास मी बांधील नाही. माझी मते ही माझीच असतात. तेव्हा कुठल्या तरी कळपाच्या माणसाने केलेली कृती वा विधान याचा जाब मला विचारण्यात अर्थ नाही.

तरीही इच्छा असेल प्रश्न जरुर विचारा, पण मी काँग्रेसविरोधी, कम्युनिस्टविरोधी वा समाजवादी विरोधी मत दिले तर आश्चर्य वाटू देऊ नका. आपण काय छान वार करतोय या तुमच्या भ्रमाला याने टाचणी लागली तर मला दोष देऊन आगपाखड करु नका.

मी - आणि फक्त मीच - माझ्या मतांना जबाबदार असतो, आणि इतरांच्या कृती वा मतांना मी जबाबदार नसतो.

-oOo-

*जे अप्रत्यक्ष परिणाम होतात त्याला कृती करणारा जबाबदार मानता येत नसतो. उदा. शेजारचा बंड्या शाळॆत पहिला आला, म्हणून दहावा आलेला खंड्या नाराज झाला. कारण बंड्याशी तुलना करुन त्याचे आईवडील त्याच्या शैक्षणिक प्रगतीबाबत नावे ठेवतात. आता हा खंड्या आणि त्याचे आईबाप यांच्यातील प्रश्न आहे. खंड्याला आनंदी राहण्याचा हक्क आहे नि तो बंड्या पहिला आल्याने हिरावला जातो म्हणून बंड्याने खंड्या पेक्षा जास्त मार्क मिळवू नयेत हा मूर्खपणाचा तर्क आहे. कारण त्यातून बंड्याच्या मूलभूत हक्कावर गदा येते. त्याच्या हक्काचाही विचार निर्णयात असायलाच हवा.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा