मंगळवार, ६ मार्च, २०१८

नक्षलवादी उजवे आणि सनातनी डावे

लेनिनच्या रशियाने भारताला केलेली मदत उल्लेखून ’लेनिनचा’ पुतळा पाडला म्हणून निषेध करणारे आणि लेनिनने कित्ती लोक मारले, त्याचा पुतळा फोडला म्हणून काय झालं? हा प्रश्न विचारणारे दोघेही चकले आहेत. कदाचित हेतुत: तसे करत असतील तर संकुचित आहेत, स्वार्थी आहेत असे म्हणावे लागेल.

पुतळा फोडणे ही कृती फोडणार्‍याच्या मनातील हिंसेची अभिव्यक्ती आहे. 'आम्हाला न पटणारे सगळे आम्ही हिंसेने उखडून टाकू, हा आमचा अधिकार आहे', असे ते मानतात, असा याचा अर्थ असतो. इथे नक्षलवाद्यांची आठवण होते. आम्हाला मान्य नसलेली व्यवस्था आम्ही हिंसक मार्गानेही उलथून टाकू, त्यात त्या व्यवस्थेशी निगडित असलेल्या कुणाचीही हत्या करणे समर्थनीय आहे, तो आमच्या दृष्टिने स्वीकारार्ह मार्ग आहे असे ते मानतात. लेनिनचा पुतळा उखडणारे वैचारिकतेच्या दुसर्‍या टोकाला असूनही तोच डीएनए शेअर करतात हे वारंवार सिद्ध झाले आहे.

SaffronIsNewRed

भारताला मदत केलेल्या रशियाचा नेता ’म्हणून’ त्याचा पुतळा फोडणे अनिष्ट नाही हो; कुणाचाही पुतळा फोडणे हे अनिष्टच समजायला हवे. ती हिंसक कृती म्हणजे कायदा हातात घेणे आहे, आपणच निर्माण केलेल्या व्यवस्थेला आव्हान देणे आहे. लेनिनला मानणार्‍यांच्या वैचारिक व्यत्यासाचे प्रतिनिधी असलेल्या गोळवलकरांचा पुतळा असता, आणि तो व्यवस्थेअंतर्गत नियम पाळून बसवलेला असला, तर लेनिन समर्थकांनी तो फोडल्याच्या घटनेचाही निषेध करायला हवा.

तिथे मग ’त्यांनी नाही का लेनिनचा फोडला’ म्हणून समर्थन करणे अयोग्य आहे. हातातील पहारीचा रंग बदलला म्हणून त्या कृत्याची नृशंसता नाहीशी होत नाहीच. 'आमच्या रंगाच्या पहारी तरी कमी आहेत, त्यांच्या बघा किती जास्त आहेत’ हा तर्क हिंसेला विरोध असल्याचा निदर्शक मानतच नाही मी. आपल्या हिंसेचे समर्थन करणाराच असतो तो.

आमचे तत्वज्ञान, आमची व्यवस्था शंभर टक्के बरोबर, आमचे नेते सर्वज्ञ, आमच्या पोथीत सारे ज्ञान आहे असे समजणारे डावे, उजवे सारेच सनातनी असतात. बहुपर्यायी आयुष्याला नाकारुन दुराग्रहाने एकसाचीकरणाचा आग्रह धरतात. आपला सोडून अन्य पर्याय शंभर टक्के चुकीचे आहेत, ते उखडून टाकण्यास सर्व उपलब्ध मार्ग वैध आहेत असे मानणारे अतिरेकीच असतात. भले व्यवस्था त्यांना धार्जिणी असेल, त्यांच्या क्रांतींचा रंग लाल, भगवा, हिरवा, निळा कुठलाही असेल.

निषेध ’कायदा हातात घेण्याबद्दल, व्यवस्थेशी द्रोह करण्याबद्दल’ असायला हवा. पुतळा कुणाचा यावरुन निषेध करायचा की समर्थन करणॆ हे संकुचित दृष्टिकोनाचे मानले पाहिजे.

’आम्हाला सोयीची असेल तेव्हाच व्यवस्था चांगली, गैरसोयीची असेल तेव्हा धाब्यावर बसवली तरी ते न्याय्य’ असे समजणार्‍या डाव्या, उजव्या, मध्यममार्गी, अस्मितावादी, पुरोगामी अशा सर्वांचा ठणठणीत निषेध करायला हवा.

’त्यांनी’, ’तेव्हा’ केले ते कसे चालते असे म्हणत एकमेकांच्या पाठीमागे लपत एकमेकांची सोय पाहणार्‍या, वरकरणी विरोधी मतांच्या मंडळींचा तर डब्बल निषेध करायला हवा.

-oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा