मी गणिताचा मास्तर होतो. राजकारण्याला जशा निवडणुका चुकत नाहीत तशा मास्तरला परीक्षांचे पेपर सेट करणे नि तपासणे हे भोग टळत नाहीत.
अशाच एका पेपरमध्ये एका टॉपरच्या पेपरमध्ये एका प्रश्नाच्या उत्तराला - जे पूर्ण चूक होते - मी शून्य मार्क दिले. ती माझ्याकडे विचारणा करायला आली. मी ते गणित कसे सोडवायचे ते दाखवून रीत आणि उत्तर दोन्ही समजावून दिले आणि तुमचे दोनही चुकले हे पटवून दिले. ते मान्य करुनही तिचा तर्क होता, ’पण इतके लिहूनही शून्य मार्क कसे काय देऊ शकता तुम्ही?’ मी म्हटलं, ’अहो तुम्हाला गीतेतले श्लोक लिहायला सांगितले, तुम्ही मनाचे श्लोक लिहून ठेवले... कसे मार्क देणार?’
आपल्या परीक्षा व्यवस्थेत विद्यार्थ्यांनी मास्तरांना चांगलेच जोखून ठेवले आहे. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर माहीत नसले तरी पानभर काहीतरी लिहून ठेवायचे असा त्यांचा बाणा असतो. (काही मंडळी तर सरळ प्रश्नच पुन्हा उतरवून काढत) फूटपट्टी घेऊन बसलेले मास्तर लांबीनुसार मार्क देतात.
'मार्क देणार्या’ अशी ख्याती असलेल्या एका मॅडमच्या क्लासमध्ये असावे म्हणून लोक चक्क एक सेमिस्टर ड्रॉप घेत असत. पहिल्या सेमिस्टरला इमाने इतबारे अभ्यास करून विषय सोडवणारे आमच्यासारखे ६०-७० मध्ये रेंगाळत. तर आमच्याबरोबर असताना फेल झालेला प्राणी या मॅडमच्या कृपेने ७० ते ९० मार्क मिळवून पास होई. या बाईंची ख्याती म्हणजे त्याही लांबी पाहून मार्क देत. आम्ही दोघे मिळून एक पेपर शिकवत असताना, ’इतकं लिहिलं मुलांनी तर शून्य मार्क कसे द्यायचे हो.’ असं त्यांनी मला म्हटलंही होतं.
पुढे आयटी इंडस्ट्रीत आल्यावरही काहीसा हाच अनुभव आला. अजिबात टंगळमंगळ न करता दिवसभरात आपले काम व्यवस्थित संपवून वेळच्या वेळी घरी जाणार्यांचा भाव बॉस लोकांसमोर कमी असे. तर अमुक एक ’रात्री उशीरापर्यंत बसून काम करतो’ हे त्यांच्या दृष्टिने फार डेडिकेशन वगैरेचे लक्षण असे. त्यामुळे अनेक चलाख लोक दिवस इंटरनेटवर टाईमपास कर, मधे बाहेर जाऊन कामे करुन ये किंवा हॉटेलमध्ये जाऊन टाईमपास कर, टेबल टेनिस खेळ असे उद्योग करुन संध्याकाळी उशीरा बसून काम करत. त्यांचे appraisal अर्थातच चांगले होई.
गुणवत्तेपेक्षा व्हॉल्यूम किंवा आकाराला महत्त्व देणारा दृष्टिकोन किंवा एकुणच योग्यायोग्यतेची पारख करण्याची कुवत कमी असणे हे दोन आपल्या समाजाचे दोष आहेत. आमच्या आयुष्यातील पहिला डेक/टेप विकत घेताना आमच्या वडिलांना मोठ्या आकाराचा डेक हवा होता. त्याच्या आवाजाची क्वालिटी खराब आहे त्या मानाने लहान डेकचा आवाज उत्तम आहे हे पटवताना माझ्या नाकी नऊ आले होते.
... आता हेच पहाना, एका मागून एक चुकीची उत्तरे देणारा माणूस, ’अहो दिवसाला अठरा तास काम करतो’ या दाव्यावर काही जणांकडून पूर्ण मार्क घेऊन जातो. मग भले त्यातील बारा तास स्वस्तुतीपाठाची आवर्तने का असेनात. :)
आणि आम्ही उत्तराच्या लांबीपेक्षा खोलीला अधिक महत्त्व देणारे... मास्तर म्हणून नालायक ठरलो (स्वगत: शिकवणेही अत्यंत वाईट होते हे का सांगू तुम्हाला?) यात काय आश्चर्य.
- oOo -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा