जंगलवाटांवरचे कवडसे - ७ : लाकूडतोड्याची साक्ष << मागील भाग
---
"या तिघांपैकी कोणाची साक्ष अधिक विश्वासार्ह वाटते तुला?" हा तिसर्या माणसाने विचारलेला प्रश्न हा चित्रपटाचा गाभा आहे. मुद्दा आहे तो प्रत्येक साक्ष देणार्याची विश्वासार्हता निश्चित करण्याचा नि त्या आधारे प्रत्येकाच्या साक्षीतील सत्यांश शोधून त्याच्या आधारे निवाडा करण्याचा. निवाड्यासाठी आधी कळीचे प्रश्न निश्चित करावे लागतील नि साक्षींच्या, अन्वेषणाच्या आधारे त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. ताजोमारूने स्त्रीवर केलेला अत्याचार वादातीत आहे. जंगलात त्यावेळी उपस्थित असलेल्या तीनही व्यक्तींनी त्या घटनेला दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे त्या गुन्ह्याबाबत कायदेशीरदृष्ट्या ताजोमारू दोषी आहेच. नैतिकदृष्ट्या किती दोषी आहे हे मात्र सापेक्ष आहे. ताजोमारू तसेच सामुराईच्या साक्षीनुसार ती स्त्री ताजोमारूला वश झालेली आहे तर खुद्द स्त्रीने त्याबाबत मौन बाळगले आहे. परंतु कळीचा मुद्दा आहे तो सामुराईच्या मृत्यूचा किंवा हत्येचा. इथे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहिला म्हणजे ’त्याचा मृत्यू कोणत्या हत्याराने झाला” नि दुसरा प्रश्न ’ते हत्यार चालवून त्याचा बळी घेणारा कोण?’
पहिलाच प्रश्न आपल्याला लेखमालेच्या पहिल्या भागात उल्लेख केलेल्या अन्वेषण-निकषांपाशी नेतो. कथेतील नि चित्रपटातील न्यायासनासमोर तीन साक्षी झाल्या त्यातील दोघांनी - सामुराई नि त्याची स्त्री- यांनी सामुराईचा मृत्यू खंजिराने झाल्याचा उल्लेख केलेला आहे, तर ताजोमारू त्याची हत्या आपण तलवारीने केल्याचे सांगतो. आता दोन विरुद्ध एक असा निव्वळ बहुमताच्या न्यायाने हत्या खंजिराने झाल्याचा निष्कर्ष काढू शकतो काय? या तीन साक्षींच्या आधारे जरी निर्णय केला तरी तो खंजीर त्या घटनास्थळी कुठेही सापडलेला नाही हे सत्य नाकारता येत नाही. (पोलिस नि लाकूडतोड्याची न्यायासनासमोरची साक्ष याला दुजोरा देते.) शिवाय बहुमताच्या बाजूचे दोघे पती-पत्नी आहेत हे विसरता कामा नये. या नात्यामुळे त्यांच्यात सामायिक असा स्वार्थ असण्याची नि त्याला अनुसरून त्यांनी एक बाजू घेतल्याची शक्यताही ध्यानात घ्यायला हवी. आणखी गोंधळ तेव्हा वाढतो जेव्हा लाकूडतोड्या आपली दुसरी जबानी -राशोमोन द्वारावर देतो- ज्यात तो ताजोमारूने ती हत्या केल्याचा नि तलवारीने केल्याचा उल्लेख करतो. आता हा नवा पुरावा ध्यानात घ्यायचा तर दोन-दोन अशी बरोबरी होऊन गुन्ह्याचे हत्यार नक्की कुठले हा प्रश्न अनिर्णित राहतो.
पण बहुमत हाच अन्वेषणाचा एकमेव निकष नव्हे. एक पर्याय असा असू शकतो की सरळ सामुराईच्या देहावरील जखम पहावी नि ती तलवारीने झाली की खंजिराने याचा तज्ञांच्या सहाय्याने निर्णय घ्यावा. पण इथेही एक मेख आहे. ताजोमारूने सामुराईची हत्या केली असे सांगणार्या दोन्ही साक्षी - ताजोमारू आणि लाकूड्तोड्याची दुसरी जबानी - जेव्हा हा हत्येचा प्रसंग आपल्याला दाखवतात तेव्हा - आधीच नोंदवून ठेवल्याप्रमाणे - ताजोमारूने तलवारीने पारंपारिक पद्धतीने भोसकून त्याची हत्या न करता तलवार ’फेकून मारण्याच्या’ पद्धतीने केली आहे. अशा प्रकाराने झालेला जखम नि एखाद्या खंजिरासारख्या हत्याराने झालेली जखम एकाच प्रकारची असण्याचा संभव आहे. तेव्हा हा ही पर्याय निर्णायक ठरला नसल्याची शक्यता - जरी चित्रपटात याचा उल्लेख नसला तरी - आहे.
तिसरा पर्याय राहतो तो साक्ष देणार्याची विश्वासार्हता नि घटनेतील त्याचा सहभाग अथवा भूमिका. या निकषानुसार लाकूडतोड्या हा पूर्णपणे त्रयस्थ असल्याने त्याची साक्ष अधिक विश्वासार्ह मानता येईल. त्याचा कोणताही स्वार्थ गुन्ह्याच्या घटनेत गुंतलेला नाही त्यामुळे तो मूळ घटना यथातथ्य सांगत असावा असे गृहित धरले तर ताजोमारूच गुन्हेगार ठरतो नि हत्या तलवारीने झाल्याचाच निष्कर्ष काढला जाऊ शकतो नि सारा गुंता सुटतो. पण घटनेचा साक्षीदार असलेली व्यक्ती खरंच त्रयस्थ राहू शकते? की हे ही एक गृहितकच? समजा तसे मानलेच तर मृतात्मे खोटे बोलत नाही हे गृहितक - भिक्षू तर नक्कीच हे गृहित धरणारा आहे - नाकारले जाते. याच्या उलट भिक्षूच्या या गृहितकाधारे निर्णय घेतला तर कोणताही स्वार्थ न गुंतलेला लाकूडतोड्या खोटं का बोलेल याचा उलगडा व्हायला हवा. एवढेच नव्हे तर या दोनही दृष्टिकोनातून पाहताना सामुराई नि त्याची स्त्री यांनी दिलेल्या साक्षींमधील विसंगत तपशील निर्णायकरित्या खोटा ठरवायला हवा, पण तो कसा ठरवणार? थोडक्यात या नव्या माहितीनेही हा सारा गुंता सहजासहजी निस्तरला जात नाहीच.
राशोमोन द्वारावरील तिघांचे बोलणे आता संपले आहे. त्या तिसर्या माणसाचे कपडेही वाळलेत. एक एक करून शेकोटीची लाकडे विझवण्यासाठी पावसात फेकू लागतो. भिक्षू आणि लाकूडतोड्या अजूनही दिङ्मूढ अवस्थेत उभे आहेत. त्या माणसाच्या मनात मात्र कोणताही संभ्रम नाही, कारण त्याला काही समजावून घेण्याची इच्छाही नाही.
अचानक दाराच्या वरच्या बाजूने एका अर्भकाचे रडणे ऐकू येते. तिघेही चपापतात. सर्वप्रथम तो माणूस उठतो नि आतल्या बाजूला जातो. काही क्षण जातात. अचानक लाकूडतोड्या नि भिक्षू चमकून एकमेकाकडे पाहतात नि आत धाव घेतात. अपेक्षेप्रमाणे तो माणूस त्या अर्भकाला बाजूला काढून त्याला लपेटणारा किमोनो काढून घेत असतो. लाकूडतोड्या त्या माणसाला दूर ढकलतो नि भिक्षू त्या मुलाला उचलून घेतो.
किमोनो हाताभोवती नीट गुंडाळून तो माणूस लाकूडतोड्याला विचारतो
"यात तुझा काय संबंध?"
"हे भयंकर आहे." लाकूडतोड्या ओरडतो.
"कुणीतरी हा किमोनो नेलाच असता, मी घेतला तर काय बिघडलं?" माणूस प्रतिवाद करतो.
"पण हे पाप आहे." लाकूडतोड्या वाद घालू पाहतो.
"पाप? आणि या पोराच्या आईबापांचे काय? ते पापी नाहीत? स्वतःच्या वासनेसाठी त्यांनी याला जन्म दिला नि उकिरड्यावर असे फेकून दिले. ते पापी आहेत."
"नाही तू चुकीचे बोलतो आहेस. त्या मुलाच्या गळ्यातील ताईत पहा. त्याच्या आईबापांनी जगातीला सार्या दुष्टाव्यापासून त्याचे रक्षण करण्यासाठीच तो त्याच्या गळ्यात बांधलेला आहे. तो किमोनोदेखील वार्यापावसापासून त्याचे रक्षण व्हावे म्हणून त्याच्याभोवती गुंडाळला होता. आपले मूल असे सोडून देताना त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा विचार कर जरा."
"इतरांच्या भावनांचा विचार करायला मला वेळ नाही." तो माणूस गुरकावतो.
"तू स्वार्थी आहेस." लाकूडतोड्या चिडून म्हणतो.
"मग त्यात वाईट काय आहे?' माणूस ताडकन उत्तर देतो. "या जगात माणसापेक्षा कुत्र्याचे जिणे अधिक सुसह्य आहे. तुम्ही स्वार्थी नसाल तर तुम्ही जगू शकत नाही."
लाकूडतोड्याचा तर्क आता संपला आहे. क्षुब्ध होऊन तो म्हणतो "या जगात सगळेच स्वार्थी नि अप्रामाणिक आहेत, तो डाकू, ती स्त्री, तो तिचा पती आणि तू सुद्धा" "आणि तू? तुझे काय? तू स्वार्थी नि अप्रामाणिक नाहीस?' तो माणूस उलट प्रश्न करतो. "तू कोर्टाला फसवू शकतोस, मला नाही."
या शाब्दिक वाराने त्याच्याशी झटापट करत किमोनो काढून घेऊ पाहणारा लाकूडतोड्या स्तब्ध होतो. त्याची नजर खाली झुकते. तो दोन पावले मागे सरकतो. आपला वार वर्मी लागला आहे हे माणूस ओळखतो. लाकूडतोड्याजवळ जातो नि विचारतो "मला सांग त्या खंजीराचं तू काय केलंस? तो अतिशय मूल्यवान होता ना, त्यावर मोती जडवलेले होते म्हणे." लाकूडतोड्याच्या तोंडून शब्द फुटत नाही. माणूस पुन्हा पुन्हा त्याच्यावर त्या प्रश्नाचा भडिमार करीत राहतो. अखेर खदाखदा हसत म्हणतो "एक चोर दुसर्याला चोर म्हणतो आहे. हे स्वार्थी वागणे झाले, नाही का?" असे म्हणत तो त्याला एक जोरदार थप्पड मारतो नि चालता होतो.
लाकूडतोड्याने सामुराईचा मृत्यू खंजिराने नव्हे तर तलवारीने झाला हे सांगण्याची उबळ दाबली असती तर त्याचे त्या घटनेशी असलेला संबंध उघडकीस आला नसता. पण ही अस्थानी सत्यनिष्ठ वृत्तीच त्याचा घात करते. त्या अर्थी तो लाकूडतोड्या अगदी सामान्य माणूस आहे. सामुराईच्या मृत्यूनंतर तिथे पडलेल्या तलवारी नि खंजीर फुकटात पळवण्याची वृत्ती त्याच्यात आहे तसेच आपल्या योग्य साक्षीने सत्य उघड झाले असते ते आपण टाळले हा अपराधगंडही त्याचा पिच्छा सोडत नाही. ’मला काय त्याचे?’ किंवा ’माझ्या सत्य सांगण्याने तो जिवंत थोडीच होणार आहे?’ असे म्हणण्याइतके निर्ढावलेपण त्याच्यात निर्माण झालेले नाही. लाकूडतोड्याची ही दुसरी साक्ष - जी कोर्टात नव्हे तर राशोमोन गेटवर भिक्षू नि त्या तिसर्या माणसासमोर दिली जाते - त्रयस्थाची म्हणून अधिक विश्वासार्ह असे म्हणता येईल का? तर हे गृहितकदेखील चुकीचे असू शकते हे कुरोसावा दाखवून देतो. प्रत्यक्ष घटनेशी संबंध नसलेला असा एखादा दुय्यम असा स्वार्थ त्या त्रयस्थाची भूमिका प्रदूषित करू शकतो नि म्हणून साक्षीदाराची विश्वासार्हता हा स्वतंत्रपणे प्रस्थापित करण्याचा मुद्दा आहे अधोरेखित करतो.
या सार्या संवादाला साक्षी असणारा तो भिक्षू हतबुद्ध झाला आहे. इतकावेळ ज्याच्याशी संवाद साधला, ज्याला समानधर्मा समजलो त्याचेही पाय अखेर मातीचेच निघाले हे पाहून तो सुन्न झालाय. बराच वेळ दोघे एकमेकाशी न बोलता स्तब्ध उभे आहेत. पाऊस आता थांबलाय. भिक्षूच्या हातातील ते मूल रडू लागतं. या अशा जगात त्याच्यावर आलेल्या या अनाहुत जबाबदारीचे काय कराचे हे त्याला समजत नाही. एवढ्यात लाकूडतोड्या पुढे होतो नि त्याच्याकडून ते मूल घेऊ पाहतो. इतका वेळ माणसाच्या चांगुलपणावर विश्वास आहे असे निक्षून सांगणार्या भिक्षूचा आता माणुसकीवरील विश्वास उडाला असावा. त्याला लाकूडतोड्याचा हेतू लक्षात येत नाही. त्याला वाटते आता जे काही लहानसे धडुते त्या पोराला गुंडाळले आहे ते ही तो हिरावून घेऊ पाहतो आहे. आपल्यावर त्याने दाखवलेल्या अविश्वासाने लाकूडतोड्या विकल होतो. करूण आवाजात तो सांगतो "मला सहा मुले आहेत हो. अजून एक जड नाही मला."
भिक्षूला आपल्या बोलण्याचा पश्चात्ताप होतो. लाकूडतोड्याची क्षमा मागून तो ते मूल त्याच्याकडे सुपूर्द करतो आणि म्हणतो "मला वाटतं, आता मी माणसावर श्रद्धा ठेवू शकेन." लाकूडतोड्या ते मूल घेतो, भिक्षूला अभिवादन करतो (इतका वेळ कळवळून रडणारं ते मूल लाकूडतोड्याचा हाती येताच शांत होतं) नि द्वाराच्या पलिकडे निघून जातो. इथे तो माणूस प्रेक्षकांच्या दिशेने अर्थात द्वाराच्या अलिकडच्या बाजूने निघून गेला होता हा एक तपशील जाताजात नोंदवून ठेवायला हवा. दोघे परस्परविरुद्ध दिशेने गेले आहेत हे महत्त्वाचे. कॅमेरा फिरवून आता द्वाराच्या मागच्या बाजूला गेलाय. लाकूडतोड्या पायरी उतरून खाली येतो नि चालू लागतो. आता त्याच्या चेहर्यावर समाधान आहे ते हाती काही निर्मळ, अनघड असे काही असल्याचे. ज्याचे रक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. आपण ती नक्कीच पार पाडू असा विश्वासही त्याच्या चेहर्यावर पसरलेला दिसतो.
राशोमोनचा मुख्य सूत्र हे की एखाद्या व्यक्तीचा अनुभव हे त्याच्यापुरते सत्य असते, जे अर्थातच त्याच्या जाणीवांच्या मर्यादेनुसार, दृष्टिकोनानुसार वेगवेगळे असू शकते. आता हा अनुभव जेव्हा निवेदनस्वरूपात इतरांसमोर येतो तेव्हा तो यथातथ्य येईलच असेही नाही. कारण इथे अपरिहार्यपणे आत्मसमर्थनाचा, स्वत:ला झुकते माप देण्याचा प्रयत्न होतो. अगदी ज्याचा प्रत्यक्ष स्वार्थ ज्यात गुंतलेला नाही अशा व्यक्तीकडूनही प्रामाणिक सत्यकथन - त्याच्या जाणीवेतले का होईना - होईलच याची खात्री देता येत नाही.
अन्वय नि उहापोह याच्या पलिकडे प्रश्न उरतो तो त्यातून निर्माण झालेल्या भविष्याचा, त्या बालकाच्या भवितव्याचा. मुलाचे रक्षण/पोषण हे एकप्रकारे ढासळत्या नीतीमूल्यांच्या जगात निर्मळतेचे, पूर्वग्रहरहित विचारांचे संगोपन करणे आहे. भविष्याचे संरक्षण करणे आहे. आयुष्यभर कृतिशून्य चांगुलपणा जपत आलेल्या भिक्षूपेक्षा स्खलनशील पण चांगुलपणावरचा, मूल्यांवरचा विश्वास टिकवून धरणार्या लाकूडतोड्याच्या हातीच माणसाचे भविष्य सुरक्षित राहू शकते.
चित्रपटाची सुरुवात भिक्षूच्या माणसावर विश्वास ठेवण्याबाबत साशंकता व्यक्त करून होते तर शेवट या सामान्य लाकूडतोड्याने भविष्याबद्दल भिक्षूला आश्वस्त करण्याने होते. जीएंच्या ’माणसे: आरभाट नि चिल्लर’ या पुस्तकाचा शेवट " 'समजत नाही, समजत नाही’ हेच सार्या बाबतचे अखेरचे शब्द असतील? ते देखील समजत नाही." या वाक्याने होतो. कुरोसावाचा राशोमोन पाहिल्यावर असेच काहीसे मनात येते. फारसे समजले नाही पण थोडीफार उमज पडली तरी खूप झाले असे म्हणावे लागेल.
उपसंहार१:
राशोमोनला परदेशात बरेच नावाजले गेल्यानंतर बर्याच काळानंतर तो तेथील दूरचित्रवाणीवर दाखवण्यात आला. चित्रपटापूर्वी त्या चित्रपटाच्या निर्मात्या 'डेई' कंपनीच्या अध्यक्षांची एक मुलाखत दाखवण्यात आली. याच माणसाने राशोमोन प्रथम प्रकाशित झाल्यावर त्यावर 'अर्थशून्य' असल्याची कडक टीका केली होती, कंपनीतील ज्या अधिकार्यांनी त्या चित्रपटाला मदत केली त्यांची पदावनती केली होती. त्या मुलाखतीत मात्र चित्रपटाच्या यशाचे सारे श्रेय त्याने स्वतःकडे घेतले. चित्रपटाच्या इतिहासात प्रथमच कॅमेरा सूर्याकडे रोखण्यात आला याचा प्रौढीने उल्लेख केला. फक्त तो कॅमेरा लावणारा नि त्याला त्यासाठी प्रोत्साहित करणारा दिग्दर्शक यांची नावे मात्र सांगण्यास सोयीस्करपणे विसरला.
राशोमोनने जे सांगण्याचा प्रयत्न केला त्या अंशत: सत्याचा पडताळा खुद्द त्याच्या दिग्दर्शकाच्या संदर्भातच सामोरा यावा हे चित्रपटाचे आत्मप्रतारक सामर्थ्य म्हणावे का?
(समाप्त)
१. ही माहिती "गर्द रानात भर दुपारी (ले. विजय पाडळकर)" या पुस्तकातून साभार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा