बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - ११ (अंतिम भाग) : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - ३

समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - १० : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - २  << मागील भाग
---

फ. तत्त्वांची सर्वसमावेशकता किंवा व्यापकता:

बदलत्या काळाचे भान नसणे आणि आपल्या तत्त्वज्ञानाला कालातीत समजणे हा खरं तर धार्मिक कट्टरपंथीयांचा सर्वात मोठा दोष. काळाचे चक्र फिरवून मागे नेऊन पुन्हा एकवार आपल्या प्रभावाच्या काळात जगाला नेता येईल असा भाबडा नि अव्यवहार्य विचार हा फक्त यांचा दोष आहे असे नव्हे असे आता म्हणावे लागेल. आज समाजवादी मंडळीही नव्या काळाच्या संदर्भात आपले तत्त्वज्ञान तपासून पाहतात का, त्यात काय बदल करावे लागतील याचा उहापोह करतात का नि काही मते, तत्त्वे ही कालबाह्य झाली असे प्रामाणिकपणे मान्य करून त्यांना सोडून देऊन पुढे जाण्यासाठी काही संघटित प्रयत्न वा यंत्रणा उभी करतात का वा त्या दृष्टीने काय करता येईल याचा विचार करतात का?

लोहियांचा समाजवाद भारतीय समाजव्यवस्थेच्या संदर्भात स्वतंत्रपणे उभा राहतो. कॉम्रेड शरद् पाटील यांनी भारताच्या संदर्भात कम्युनिजमची मांडणी नव्याने करावी लागेल असे आग्रहाचे प्रतिपादन केले. निव्वळ आहे रे आणि नाही रे असा विचार करतानाच जातव्यवस्थेचा एक सुप्त घटक (confounded factor) ध्यानात घ्यावाच लागेल असे त्यांचे म्हणणे होते. थोडक्यात संदर्भ बदलले, परिस्थिती बदलली की समाजवादाची मांडणी नव्याने करण्यास हरकत नसावी. आज स्वातंत्र्यानंतर पासष्ट वर्षांनंतर भारतीय समाजव्यवस्थेमधे, राजकीय व्यवस्थेमधे अनेक आमूलाग्र बदल झाले, जगण्याच्या चौकटी बदलल्या. परंतु या नव्या संदर्भात मूलभूत अशी फेरमांडणी झालेली दिसत नाही. वैयक्तिक पातळीवर विचारवंतांनी आपल्या परीने याचा वेध घेतला असेल पण त्यातून एका नव्या इजमची चौकट निर्माण करण्याचे प्रयत्न झाले आहे का, निदान माझ्या माहितीत तरी नाहीत.

तत्त्वे स्वतंत्रपणे उभी राहू शकतात पण राजकीय सत्तेसाठी बहुमताचे पाठबळ लागते. आणि ते उभे करायचे तर राजकीय पक्षाचे तत्त्वज्ञान हे सर्वसमावेशक नसले तरी किमान समाजाच्या मोठ्या भागाचे हितसंबंध, आकांक्षा यांची दखल घेणारे असावे लागते. असे असतानाच अल्पसंख्य पण प्रभावशाली समाजगटाच्या अस्तित्वाचे भानही असायला हवे. शेतकरी आणि कामगार हे समाजवादी तत्त्वज्ञानाचे मूळ आधार आहेत हे खरेच पण आज जागतिकीकरणाच्या रेट्याला दार उघडून आत घेतल्यावर उदयाला आलेला मध्यमवर्ग नि उच्च-मध्यमवर्ग समाजात मोठा प्रभाव राखून असतो. या वर्गाला सर्वस्वी दुर्लक्षित ठेवून कोणालाही राजकीयदृष्ट्या यशस्वी होता येणार नाही हे उघड आहे.

काँग्रेसने वर्षानुवर्षे वापरून गुळगुळीत झालेल्या 'गरिबी हटाव' या जुन्यापुराण्या घोषणेचेच रुपांतर मोदी/भाजपने 'विकासाची वाटचाल' या नव्या घोषणेत केले. हा बदल अतिशय धूर्तपणे केलेला नि अचूकही. गरिबी हटाव या घोषणेत फक्त गरिबांचा विचार दिसतो, या उलट विकासाच्या गाडीत समाजाच्या कोणत्याही थरातील लोक बसू शकतात. ही सर्वसमावेशकता समाजवाद्यांना अंगीकारली पाहिजे.

आज राजकीय पराभवानंतरही आपण हे विचारमंथन करू इच्छित आहोत का? की काँग्रेस किंवा अन्य राजकीय पक्ष करताहेत तसे विरोधासाठी विरोध करत पुढची पाच वर्षे मोदी सरकारच्या खर्‍याखोट्या चुकांची जंत्री जमा करत त्याआधारे पुढची निवडणूक लढवू इच्छित आहोत. की आप'च्या अनुभवातून पोळले गेल्यानंतर पुन्हा एकदा 'टू युअर टेन्ट्स' म्हणत राजकारणातून माघार घेणार आहोत? की हा नकारात्मक दृष्टिकोन सोडून उलट 'आम्ही काय करू इच्छितो' याचा आराखडा सादर करून त्याआधारे निवडणुकांना सामोरे जाउ शकतो हे पाहणार आहोत.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत, त्यापूर्वीच्या 'प्रायमरीज'मधे (ज्यात दोन मुख्य प्रतिस्पर्धी पक्षांच्या अंतर्गत उमेदवाराचीच निवडणूक घेतली जाते.) उमेदवारांना विविध मुद्द्यांवर, विविध क्षेत्रांबद्दल आपल्या भविष्यकालीन योजनांचा आराखडा सादर करावा लागतो, प्रतिस्पर्ध्यांशी त्यावर वादविवाद करावा लागतो, नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. देशातील एका वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या समाजवादी पक्षांनी हा नवा पायंडा पाडून आपल्या वैचारिक विरोधक असलेल्या भाजप नि काँग्रेसला त्या आखाड्यात खेचण्याचा प्रयत्न केला तर एकाच वेळी आपल्या सोयीच्या भूमीवर उभे राहिल्याचा फायदा मिळेल नि भारतीय निवडणुक प्रक्रियेला एक सकारात्मक वळण दिल्याचे श्रेयही.

ही सारी मांडणी कुण्या कार्यकर्त्याने, अभ्यासकाने, विचारवंताने केलेली नाही. तसेच इथे प्रश्न निर्माण करताना त्यांचे फक्त संदर्भ वा उदाहरणेच नोंदवली आहेत, कोणतीही दीर्घ वा साधकबाधक चर्चा केलेली नाही. तेवढा माझा अभ्यास, कुवत वा माहिती आहे असा माझा दावा नाही. एक मात्र नक्की. राजकीय, सामाजिक, वैचारिक कोणतीही पार्श्वभूमी नसलेला एखादा जर अशा प्रश्नांना सामोरे जाऊ शकत असेल तर निव्वळ परनिंदेपलिकडे जाऊन अभ्यासकांना, कार्यकर्त्यांना आपल्या स्वीकृत तत्त्वज्ञानाकडे, विचारसरणीकडे डोळसपणे पाहता येऊ शकते इतका विश्वास वाटला तरी या लेखाचे सार्थक झाले असे समजू शकेन.

-oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा