बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२

अर्थ-साक्षरता - १: अर्थ-साक्षरता आणि मी

मागील आठवड्यात माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्यावर ओढवलेल्या आर्थिक संकटाची बातमी आली होती. त्यापूर्वीही अशा अनेक प्रसिद्ध, यशस्वी व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर अथवा उतारवयामध्ये सहन कराव्या लागणार्‍या आर्थिक चणचणीच्या बातम्या आलेल्या होत्या. यात अगदी भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान, जुन्या जमान्यातील यशस्वी अभिनेत्री स्मृती बिस्वास यांचाही यांचाही समावेश होता. त्यानिमित्ताने उतारवयातील खर्चाची तरतूद म्हणून बचत आणि आर्थिक-नियोजन याबाबत बालक-पालक नावाचा एक लेख इथेच लिहिला होता.

मुद्दा असा होता की कारकीर्दीच्या शिखरावर असताना अमाप- निदान सामान्यांपेक्षा कैकपट- पैसा मिळवणारी ही मंडळी आर्थिक विपन्नावस्थेत जातात याचे कारण न केलेले, अथवा करुन फसलेले आर्थिक नियोजन असते. चार गाड्या बाळगणार्‍या, एकाहुन अधिक घरे मालकीची असणार्‍या सेलेब्रिटीला आपली शिल्लक घसरते आहे हे दिसत नसेल, त्याला थेट दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आल्यावरच भान येत असेल, तो दोष त्याचाच असतो. (अपवाद गंभीर आजारामुळे वेगाने घसरलेल्या परिस्थितीचा. पण त्यालाही आरोग्य-विम्यासारखे उपाय असतात.) आपली आर्थिक स्थिती नियमितपणे तपासत राहिले तर येऊ घातलेल्या आर्थिक संकटाची चाहूल बरीच अलिकडे ऐकू येते नि त्यावरच्या उपायांना लवकर चालना देता येते. त्यासाठी आपल्या आर्थिक ताकदीकडे कायमच बारकाईने लक्ष द्यावे लागते.

AllThisIsMyMoney

दुसरीकडे, हे घडू नये म्हणून घायकुतीला आल्यासारखे मिळतात तोवर, मिळतील तितके, पैसे मिळवत जाणे हा मार्ग बहुसंख्य लोक स्वीकारतात. आठ वर्षांपूर्वी मी रोजगार सोडला, तेव्हा अनेक मित्रांनी मला ’अरे पण तुला इतके पैसे मिळतात तर मिळवत का नाहीस?’ असा प्रश्न विचारला होता. 'मिळवणे' या क्रियापदाची पैशाशी घट्ट सांगड बसली आहे हे या प्रश्नामागचे कारण आहे. मिळवण्याजोगे इतर काही असते, हे बहुतेकांच्या गावीच नाही. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे एक उघडपणे बोलले गेले नाही तरी, 'पैसे असले की काहीही मिळवता येते' हा बहुसंख्येच्या मनात दृढ झालेला एक अत्यंत चुकीचा समज.

आमचे आयटीमधले मित्र रात्री दहा-बारा वाजेपर्यंत काम करुन, क्वचित नाईट मारून सकाळी परत कस्टमर कॉलवर बसतात, तेव्हा मी विचारतो, ’हवा तेव्हा वेळ मिळू शकतो का रे तुला? आज जरा पोराशी दंगामस्ती करायचा तुझा किंवा पोराचा मूड आहे... मिळेल वेळ?' आपल्या आनंदाचे क्षणही ऑफिसच्या सोयीनेच निवडावे लागत असतील, तर त्या पैशाचे काय लोणचे घालायचे आहे? आपले आनंद नि सुख यांचेही नियोजन करावे लागत असेल तर तो आनंद, ते सुख हे सेल्फीसारखे किंवा इन्स्टाग्रामच्या रीलसारखेच ’एक पॉईंट सर झाल्याइतकेच महत्त्व असणारे’ नसेल का?

’मॉडर्न टाईम्स’मधल्या चार्ली चॅप्लिनसारखे अमुक वेळेला नट पिळायला सुरुवात करायचा, नि घंटी वाजली की ते काम सोडून टिफिन उघडायचा. दुसरी घंटी होताच पुन्हा स्क्रू पिळण्याच्या कामावर रुजू व्हायचे... तुमचे यंत्र झाले आहे असे कधी वाटते का तुम्हाला? चार्ली एक दिग्गज म्हणून प्रसिद्ध झाल्यामुळे हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. पण ऐंशी साली रिलीज झालेला ’गॉड्स मस्ट बी क्रेझी’ म्हणून एक सुरेख चित्रपट आजच्या पिढीने तर सोडाच, माझ्याही पिढीने पाहिला असण्याची शक्यता नाही. हा चित्रपट यू-ट्यूबवर आहे. जमल्यास त्यातील पहिली वीस मिनिटे तरी पाहा.

आपले आयुष्य ही खरेच प्रगती आहे का? असा प्रश्न एकदा विचारून पाहा. त्यातील प्रत्येक गोष्टीसाठी आपण जी किंमत मोजतो, ती केवळ पैशातच पाहात असतो. तो पैसा निर्माण करण्यासाठी आपण कशा-कशा स्वरूपात किंमत मोजतो, याचे गणितही ध्यानात घ्यायला हवे. त्यानंतर एकुण ताळेबंद शिलकीचा राहतो की तोट्याचा याचा विचार करायला हवा.

मिळवताना गरजा काय हे ठरवून त्या प्रमाणात मिळवण्याचे नियोजन करण्याऐवजी, हपापल्याप्रमाणे मिळेल तितके मिळवत जायचे नि वेळ व ऊर्जा शिल्लक राहिली तर ती भोगण्याचा विचार करायचा; नाहीतर आपल्या नावावरची संपत्ती वाढत चाललेली पाहून, त्या वाढीबरोबर आपले सुख वाढते आहे अशा भ्रमात राहायचे... असा मार्ग आपण निवडला आहे. किंवा मग अधिक पैसे आहेत म्हणून अधिक मोठे घर घ्यायचे, अधिक किंमतीची गाडी घ्यायची, केरळ ऐवजी कॅलिफोर्नियाला फिरायला जायचे असा उलटा प्रकार सुरू होतो. हे सारे ’मला हवे’ असे आधीच निश्चित केले असले तर गोष्ट वेगळी. पण पैसे वाढले म्हणून गरजा वाढवायच्या, त्यातून खर्च वाढवायचा आणि मग गरज वाढली म्हणून आणखी पैशाच्या मागे ऊर फुटेतो धावत सुटायचे, हा न संपणारा प्रवास आहे.

रोजगाराच्या सोयीने आनंदाचे नियोजन करण्यापेक्षा, नियोजन बचत नि गुंतवणुकीचे करुन आनंदाला मुक्त केलेले अधिक चांगले असे माझे मत आहे. पैसे मिळवत राहून मग 'त्यांचे काय करायचे?' या प्रश्नाला सामोरे जाण्याऐवजी, उलट आधी आपल्या गरजा कोणत्या अधिक आपल्याला काय हवे हे निश्चित करुन, मग त्याला अनुसरून पैसे मिळवण्याचे नियोजन करणे, हे अधिक सयुक्तिक आहे असे मला वाटते.

मी गेली आठ वर्षे रोजगाराविनाही मध्यमवर्गीय सुखवस्तू आयुष्य जगू शकतो आहे. मला हे जमते म्हणजे गुपचूप आणि वेगाने पैसे मिळवण्याची काहीतरी युक्ती मला सापडली आहे, असा माझ्या परिचितांपैकी अनेकांचा समज आहे. ’आम्हाला पण नियोजन करायचे आहे, तुझा अनुभव सांग.’ म्हणत आडूनआडून ही ’जादू’ कोणती, किंवा मला मोहरांचा हंडा नक्की कुठे सापडला, हे माझ्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न ही मंडळी करत असतात.

अर्थ-साक्षर व्हायचे आहे ही केवळ बतावणी असते. कारण मला सापडलेली युक्तीच नव्हे, तर आठ-दहा वर्षांच्या मेहनतीने तयार केलेला गुंतवणूक-ट्रॅकरही (tracker) मी लोकांना फुकट दिला आहे. अद्याप एकानेही तो गांभीर्याने वापरला असल्याचा पुरावा माझ्याकडे नाही. त्यावर वेळ घालवण्याची त्यांची तयारी नाही. त्यांना जादूचा दिवा हवा आहे, जो घासला की त्यातून आलेला जिन त्यांचे आर्थिक नियोजन चोख करुन देईल. दुर्दैवाने मला असा कुठला दिवा सापडला नाही, त्यामुळे त्यांना देऊ करणे मला शक्य नाही. पण माझा मार्ग मी त्यांना सांगू शकतो. त्यात त्यांचा मेंदू, वेळ, ऊर्जा यांची आधी गुंतवणूक करण्याचे त्यांनी मनावर घ्यायला हवे.

आर्थिक नियोजन हीच मला सापडलेली युक्ती आहे, आणि यात बचतीबरोबरच खर्चाचे नियोजनही समाविष्ट आहे. आपल्या गरजा कोणत्या ते प्रथम निश्चित करणे महत्त्वाचे. त्यासाठी आपण पुढील आयुष्याचा मार्ग कसा आखत आहोत याचे एक ढोबळ का होईना चित्र डोळ्यासमोर असायला हवे. वारा फिरेल त्या दिशेने पाठ फिरवणार्‍यांचे हे काम नव्हे. त्यानंतर त्या आयुष्यातील आपल्या गरजा कोणत्या, त्याच्याशी निगडित खर्च कोणते नि केव्हा येणार आहेत, आपले संभाव्य उत्पन्न काय असेल, त्यातील किती पैसा आपण नियमितपणे बचत म्हणून बाजूला काढू शकतो, खर्चासाठी तसंच बचतीसाठी आपले प्राधान्यक्रम कोणते या गोष्टींचा विचार सुरुवातीपासूनच करायला हवा.

उत्पन्नाचा स्रोत हा अत्यंत सापेक्ष मुद्दा आहे. परंतु तरीही बचत त्यातूनच होत असल्याने आर्थिक नियोजनाची सुरुवात ही सरासरी उत्पन्नाच्या आधारेच करावी लागते. ज्यांचे उत्पन्न किमान गरजांनाही पुरे पडत नाही अशा दुर्दैवी व्यक्तींच्या आयुष्यात बचत, गुंतवणूक वा अर्थ-साक्षरता या संकल्पनाही गैरलागू ठरतात. त्यामुळे हे सारे लेखन त्यांच्यासाठी नाही. पण जे बचत करू शकतात, त्यांनी आपल्या वर्तमान गरजा किती याचा अदमास घेऊन, त्यानुसार उत्पन्नाचा कितवा हिस्सा आपण बचतीकडे वळवू शकतो, हा पहिला विचार करायला हवा. पण उलट दिशेने असेही होऊ शकते, की वर्तमान गरजा भागवण्यामध्येच बरेचसे उत्पन्न खर्ची पडते आणि बचतीला वावच राहात नाही. अशा वेळी आपल्या गरजांच्या यादीकडे पाहून त्यातील काही वगळता येतील का याचा अदमास घ्यावा लागतो.

यात काही नवीन नाही. ’नियोजन’ हा शब्दही न वापरता बहुतेक लोक हे करतच असतात. पण बहुसंख्या काय करत नाही, तर या निर्णयांना वस्तुनिष्ठ निकषांच्या चौकटीत बसवत नाही. त्यामुळे पुढचा प्रवास अनमानधपक्याने वा तात्कालिक निर्णयांच्या आधारे होत राहातो. आपल्या गुंतवणुकीची एकुण स्थिती आणि भविष्यकालीन गरजांशी तिची सांगड घालणे शक्य होत नाही, आणि बहुतेकांना त्याचे भानही नसते. बचत आवश्यक असते, तसेच गरजांवरचे खर्चही. मग प्रश्न असा पडतो, की उत्पन्नातील किती वाटा या दोहोंना द्यावा? आर्थिक नियोजनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये याचा निर्णय करायला हवा. एक ढोबळ नियम असा, की निम्मे उत्पन्न हे कायमच भविष्यकालीन गरजांसाठीची तरतूद म्हणून बचतीमध्ये टाकावे. तुमच्या एकुण उत्पन्नानुसार, आणि भविष्यातील तुमच्या योजनांनुसार हे थोडे कमी-जास्त होऊ शकते. आता बचतीचा प्रश्न निकालात निघाला की बचत केलेले धन नुसते ठेवून उपयोग नाही, तर वाढवायचे कसे याचा विचार सुरू करायला हवा.

बचत किती करणार वा होणार हे निश्चित झाले, की ते पैसे गुंतवण्याचा टप्पा येतो. आणि गुंतवण्यासाठी कोणते गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत नि त्यातील कोणता पर्याय निवडावा, याचा विचार करावा लागतो. इथेही बहुसंख्य लोक मुदत-ठेवीपासून सुरुवात करत, विमा पॉलिसी आणि अधूनमधून सोने अशा अनमानधपक्याने घेतलेल्या निर्णयांच्या आधारे गुंतवणूक करत जातात. यात कुठेही गरजा नि गुंतवणूक यांची सांगड घातलेली नसते. तसेच गुंतवणुकीचा अमुक पर्याय का निवडावा याच विचार केलेला नसतो. अर्थ-साक्षरतेमध्ये तो ही करावा लागतो.

माझे आयटीमधले, दिवसाचे आठ-दहा तास संगणकासमोर आणि आणखी अधिकचा वेळ मोबाईलसमोर असणारे मित्रही जेव्हा ’सोने ही सुरक्षित गुंतवणूक’ म्हणतात तेव्हा कपाळावर हात मारून घेऊ, की आत्महत्या करु असा मला प्रश्न पडतो. क्रेडिट/डेबिट कार्ड, चोवीस तास चालू असणार्‍या एटीएम्सच्या जमान्यात सोने ’अडी-अडचणीला कामात येते’ हे समर्थन देतात तेव्हा त्या अडाणीपणाचे मला वैषम्य वाटते. ’बाळा, अरे नको रे असे करूस. दिवसाला पाच-सहा तास जे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर वाया घालवतोस ना, त्यातला एखादा तास वापरुन त्याच इंटरनेटवर ज्यांची भरपूर माहिती आहे असे गुंतवणुकीचे पर्याय, त्यांचे मूल्यमापन कसे करावे, आपली गुंतवणूक ट्रॅक कशी करावी, वगैरे बाबींवर वाचन कर रे.’ असे त्यांना सांगावेसे वाटते.

पण हे लोक फक्त सोयीच्या वेळी जागे होऊन ’तुमचा निर्णय कसा चुकला’ हे सांगण्याचा आटापिटा करण्यापलिकडे वाचन करत नाहीत. आमचे एक फेसबुक-मित्र आहेत. मी म्युच्वल फंडात गुंतवणूक करण्याबद्दल काही पोस्ट केली होती. उच्चशिक्षित असलेल्या त्या काकांच्या गुंतवणूक शहाणपणावर बहुधा त्या पोस्टमुळे मी नकळत प्रश्नचिन्ह निर्माण केले असावे. कोरोना उद्रेकाच्या आदल्या वर्षी शेअर-मार्केट घसरले, तेव्हा त्यांनी मला कुत्सितपणे, ’हं, मग क्काऽय? आता काय म्हणतात तुमचे फंडं?’ अशा थाटात प्रश्न विचारला होता. ’घसरत्या मार्केट्मध्ये अदमास घेऊन आणखी पैसे गुंतवेन.’ असे ठामपणे त्यांना सांगितले होते. तसे केलेही. पुढची दोन वर्षे मिळून सरासरी पन्नास ते सत्तर टक्के रिटर्न्स माझ्या फंडांनी दिले. त्यानंत्र सहा-आठ महिने घसरण झाली. ऑगस्टपासून बाजाराने पुन्हा वरची वाट पकडली आहे.

’चढ-उतार हा कोणत्याही गुंतवणुकीचा अविभाज्य भाग आहे’ हे त्या काकांना आणि त्यांच्यासारख्या मंडळींना माहित नसते. त्यांच्या मुदत-ठेवीचे मूल्यही महागाई-निर्देशांकानुसार, बाजार-मागणीनुसार कमी-जास्त होतच असते. फक्त ते यांना दिसत नसते इतकेच. प्रत्येक गुंतवणूक - अगदी तुमची सोने किंवा विमा पॉलिसीसुद्धा! - काहीएक धोका घेऊनच येते. इतरांवर विश्वास ठेवायला नको म्हणून घरात हंडा पुरून ठेवला, तरी पावसात पाणी तुंबून त्यातील पैशाचा चिखल होऊ शकतो. (किंवा नोटाबंदी होऊ शकते. :) ) सोने चोरीला जाऊ शकते, त्याची किंमत बाजाराच्या नियमाने कोसळू शकते- नव्हे कोसळतेच. सुरक्षित गुंतवणूक ही फक्त डोळ्यावर पट्टी बांधून गुंतवणूक करणार्‍यांनाच सापडते. कारण त्यांनी त्यातील धोके न पाहण्याचा मार्ग स्वीकारलेला असतो. हीच मंडळी अमुक पदार्थ वा औषध ’केमिकल फ्री’ आहे या तद्दन खोट्या दाव्यावरही तसाच विश्वास ठेवत असतात.

गुंतवणूक कशासाठी करत आहोत हे विचारात घेऊन गुंतवणुकीचा पर्याय निवडणे, त्याच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन वाटचालीवर नजर ठेवणे, ठराविक काळानंतर प्रत्येक गुंतवणुकीचे मूल्यमापन करण्याची शिकवणी प्रत्येक कमावत्या व्यक्तीला असायला हवी. त्यासाठी आपले काही पूर्वग्रह प्रथम दूर करायला हवेत.

१. संपूर्ण सुरक्षित गुंतवणूक हे मृगजळ आहे हे मान्य करणे हा आर्थिक-नियोजनाच्या पथावरचा पहिला टप्पा आहे. गुंतवणूक जितकी सुरक्षित तितका परतावाही कमी मिळत असतो.

२. ’अधिक परतावा म्हणजे तो गुंतवणूक पर्याय अधिक चांगला’ हा दुसरा भ्रम दूर व्हायला हवा.

३. निश्चित परतावा देणार्‍या योजना अधिक फलदायी, निदान पैसे कमी होत नाहीत हा तिसरा भ्रम दूर करायला हवा.

४. निव्वळ परतावा (आणि तथाकथित सुरक्षितता) हा एकच निकष गुंतवणूक-पर्याय निवडीसाठी पुरेसा आहे हा ग्रहदेखील सोडून द्यायला हवा.

५. करबचतीसाठी गुंतवणूक करायची नसते, गुंतवणुकीवर करबचत करण्याचा प्रयत्न करायचा असतो.

६. याखेरीज बचतीतले अनेक ’गोल्डन रूल्स’देखील गणित करुन, तपासून पाहिल्याखेरीज अंमलात न आणण्याची शिस्त अंगी बाणायला हवी. किंबहुना असे ’गोल्डन रुल्स’ नावाचे काही नसतेच. तो आळशांचा मार्ग आहे, अर्थ-साक्षर होण्याचा उद्देशच ती अंधश्रद्धा दूर करण्याचा असतो.

ROI_HouseInvestment

उदाहरणार्थ, सरकारने गृहकर्जाच्या व्याजावर कर वजावट दिली म्हणून घरे घेऊन ’कराचे तीस टक्के वाचवण्यासाठी गृहकर्जाचे व्याज (गृह-किंमतीच्या अंदाजे पन्नास टक्के जास्त खर्च) दान करण्यापूर्वी यात नक्त फायदा किती याचे - निदान संभाव्य - गणित केल्याखेरीज त्यात उडी मारणे चूक आहे. त्यातून मिळालेला परतावा मोजताना त्यावर खर्च केलेला मेन्टेनन्स, भरलेले किमान वीज बिल, दोन्ही वेळा केलेला नोंदणी खर्च, गृहकर्जावरचे व्याज, त्या वेळी तारणासाठी वगैरेसाठी केलेला खर्च, प्रोसेसिंग फी या आर्थिक बाजू लक्षात घ्यायला हव्यात. पण त्याचबरोबर घर निवडण्यावर, नोंदणी वगैरे प्रशासकीय बाजूंवर, तसेच संभाव्य खरेदीदारांसोबत खर्ची पडलेला वेळ नि ऊर्जा हे सगळे खर्च गणितामध्ये समाविष्ट करायला हवेत. याखेरीज त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यादरम्यान वाढलेल्या महागाईचा विचार करुन, आपल्याला सरासरीने किती परतावा मिळाला याचे गणित करायचे असते. याचप्रमाणे ’सोने ही अडीनडीला उपयोगी पडणारी आणि सुरक्षित गुंतवणूक आहे.’ हे गृहितक आजच्या काळातही लागू आहे की कालबाह्य झाले आहे?’ या प्रश्नालाही सामोरे जायला हवे.

गणित हा आयुष्यात अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन 'मंगोलांच्या काळात तर मुद्दलही नाहीसे होत असे, तेव्हा नाही बोललात तुम्ही' किंवा ’त्यापेक्षा तर मुदत-ठेव बरी ना?’ म्हणणार्‍या, आणि हा वाजवी प्रतिवाद आहे असे समजणार्‍या भूतकालभोगी समाजाकडून अर्थ-साक्षरतेची अपेक्षाच गाढवपणाची आहे हे मला मान्य आहे, परंतु एकाचा निर्णय बहुसंख्येचा होऊन त्याची ’सोने ही सुरक्षित, अडी-नडीला कामात येणारी गुंतवणूक आहे’ सारखी परंपरा निर्माण होऊ नये यासाठी हे सांगत राहावे लागते.

महाराजांच्या टायंबाला मोरे सरकारांच्या सैन्यात असलेल्या कुण्या शिलेदाराच्या तिसर्‍या पत्नीच्या दुसर्‍या मुलाच्या जीवनावरचा बायोपिक पाहण्यासाठी लोक पैसा नि वेळ खर्च करतील, त्यावर फेसबुक वा ट्विटरवर युद्धे लढवतील. पण आपल्या उत्पन्नाकडे लक्ष देण्यासाठी त्यातील दहावा हिस्साही खर्च करणार नाही.

माणसे विचार करत नाहीत, गणित करत नाहीत आणि माहिती करुन घेत नाहीत. सर्वात वाईट म्हणजे माहिती आणि अनुभवाऐवजी पूर्वग्रहांवर किंवा आपल्यासारख्याच अज्ञानी मंडळींच्या सल्ल्यावर विसंबून आयुष्य जगतात. सगळं काही सुरक्षित हवं या मृगजळाचा पाठलाग करता करता थकतात, पण थांबत नाहीत, कारण थांबलो तर कायमचे बसू ही ’असुरक्षिततेची’ भावना त्यांच्या मनातच असते. त्यापासून त्यांची अखेरपर्यंत सुटकाच होत नाही.

(क्रमश:)

- oOo -

    पुढील भाग >> अर्थ-साक्षरता - २ : गरजा, खर्च आणि बचतीचे नियोजन


हे वाचले का?

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

श्रावण सजणी श्रावण गं

HeyThatsBoccoli
( गीतकार पी. सावळाराम यांची क्षमा मागून)
          
श्रावण सजणी श्रावण गं, पाळिन कधीतरी श्रावण गं ॥धृ.॥

रटरटणारी चिकन-सागुती, फसफसणारे रंगीत पाणी
नित्य घालते मला मोहिनी... श्रावऽण*! 

पातेल्यातील गंधित वारे, पिसाट फिरता जठर उफाळे 
झरझर वाढीत फिरते रमणी... श्रावऽण! 

रंगीत पाणी, मादक धुंदी, गात्रीं भरुनी मनात शिरली
मोहाचा क्षण, झापड नयनी... श्रावऽण! 

- गीतकार: पी. रमताराम

- oOo -

(* हा शब्द टाहो फोडल्यासारखा दु:खार्त उच्चारणे आवश्यक) 

हे वाचले का?

रविवार, १४ ऑगस्ट, २०२२

तीन भूमिका (उत्तरार्ध) : वस्तुनिष्ठता - तीन उदाहरणे

तीन भूमिका - १ : बाजूबद्धता, तटस्थता आणि वस्तुनिष्ठता << मागील भाग
---

एखादा प्रश्न किती लोकांच्या मनात निर्माण झाला याला तसे फारसे महत्त्व नाही. उलट एकाच वेळी अनेकांच्या मनात जर एखादा प्रश्न निर्माण झाला, तर तो तितकासा महत्त्वाचा नसण्याची शक्यता अधिक. कारण मोलाचा प्रश्न एखाद्याच्याच मनात निर्माण होऊ शकतो. आता तू म्हणतोस त्याप्रमाणे हा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण होऊनही त्यांनी त्याचा उच्चार केला नाही, याचा अर्थ असा की त्या प्रश्नाचं उत्तर जन्माला घालण्याचं स्वातंत्र्यही त्यांनी स्वतःजवळ सुरक्षित ठेवलं आहे.

(गौतमीपुत्र कांबळे यांच्या 'परिव्राजक' या कथेमधून)

तटस्थता म्हणजे काय हे बहुसंख्येला समजते. बाजूबद्धता वा गट-बांधिलकी तर इतकी महामूर आहे की त्याबाबत अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. परंतु 'वस्तुनिष्ठता म्हणजे काय?' याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ असतो. त्याची भाषिक वा तार्किक व्याख्या नक्कीच करता येईल, पण त्याने आकलनात फार भर पडेल याची शक्यता कमीच आहे. त्याऐवजी, ढोबळमानाने म्हटले तर गट-विचार न करता, पूर्वग्रहांना दूर ठेवून केवळ समोरच्या प्रश्नाच्या अंगे, उपांगे, अनुषंगे आणि संदर्भ यांच्या आधारे केलेला निर्णय हा वस्तुनिष्ठपणे घेतलेला असू शकतो. यातून अस्तित्वात असलेल्या गट अथवा बाजूंपैकी एकाच बाजूला सतत धार्जिणे राहण्याची शक्यता कमी होते.

Checklist

सोप्या शब्दांत सांगायचे तर प्रत्येक बाजूचे, प्रत्येक संभाव्य निवडीचे बरे नि वाईट अशा सार्‍या परिणामांची जंत्री मांडून त्यांच्या आधारे एकप्रकारे गणिती ताळा मांडावा लागतो. त्यातून ज्या बाजूचा ताळेबंद अधिक शिलकीचा अथवा कमी तोट्याचा दिसतो, त्याची निवड करावी लागते. त्यासाठी प्रत्येक बाजूची अनुषंगे नीट समजून घ्यावी लागतात. आणि यात वैय्यक्तिक आवडीलाच निवडीचे रूप मिळणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते.

आपल्याला हवा तोच निर्णय यावा, आपल्याला हवी तीच बाजू जिंकावी म्हणून केलेली मांडणी वस्तुनिष्ठ नसते. समोरच्या ग्राहकाला फसवण्यासाठी दुकानदाराने तागडी एका बाजूला बळाने झुकवावी तशी असते. तिला अभ्यासपूर्ण निवडीचा दर्जा देता येत नसतो. त्यातून अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगी एकाच बाजू वा गटाच्या बाजूने, विरोधात वा तटस्थ अशी प्रासंगिक निवड होऊ शकते. यातील एकच निवड सातत्याने होत राहिली तर तुमचा निर्णय, निवाडा वा मुद्दा हा biased म्हणजे पक्षपाती आहे हे गृहित धरायला हरकत नाही.

तीन उदाहरणांच्या साहाय्याने थोडे विवेचन करुन हा मुद्दा स्पष्ट करण्याच्या प्रयत्न करतो.

मध्यंतरी ’कन्यादान’ विधीवरून समाजमाध्यमांत थोडा गदारोळ झाला होता. त्यानंतर त्या विधिबाबत एक पान शेअर करण्यात आले होते. ज्यात एक विधान असे होते, ’मुलीचे वडील आता वराला म्हणतात की या माझ्या मुलीवर आजपासून माझी काहीही सत्ता नाही.’ ते विधान मला अर्थातच आक्षेपार्ह वाटले.

जन्मदात्या बापाची मुलीवर सत्ता असते? टोळीव्यवस्थेकडून स्थिर अशा समाजाकडे संक्रमण होताना माणसांमध्ये निर्माण झालेल्या खासगी मालमत्तेची कल्पना वस्तुमात्रांना लागू झाली, तशीच स्त्री-दासांनाही. वास्तविक आता स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रिसूत्री आधुनिक जगात रुजल्यावर, त्या व्यवस्थेचा शोषक अवशेष असलेला हा विधी रद्दबातल व्हायला हवा. परंतु आपल्याहून अज्ञानी अशा पूर्वजांच्या परंपरा सोडताना परंपराप्रेमी माणसाची घालमेल होत असते. त्यामुळे होता होईतो त्या न सोडता, उलट त्या अर्वाचीन विचाराशी सुसंगत कशा आहेत हे सांगण्याचा त्याचा आटापिटा चालू असतो.

एक-दोघांनी असा युक्तिवाद केला होता की ’माझ्या मुलीला हवे असेल तरच मी तो विधी करेन.’ त्यांच्या मताचा आदर राखून मी त्याच्याशी संपूर्ण असहमती नोंदवतो आहे. एखाद्याला 'स्वत:हून गुलाम होऊन राहायचे असेल तर मी त्याचा मालक म्हणून वागायला तयार आहे’ या विधानासारखे आहे हे. एकदा ते मान्य झाले की ’संस्कारातून’ (संस्कार आणि ब्रेन-वॉशिंग यात फारच पुसट फरक असतो) त्या व्यक्तीला गुलाम होण्याकडे, किमान ’मी स्वत: माझ्या इच्छेने याचा गुलाम झालो’ हे जाहीरपणे कबूल करायला लावण्याची सोय करता येतेच. एका व्यक्तीचे वस्तुकरण करणारा हा विधी माझ्या बुद्धीला साफ अमान्य आहे. त्यामुळे या प्रसंगी ’कन्यादान’ हा विधी सर्वस्वी त्याज्य असावा असा माझा निर्णय झाला.

दुसरे उदाहरण आहे एका पुरोगामी विचारवंतांनी आपल्या मुलाची मुंज केल्याचे. एका पुरोगामी गटाने त्यांच्यासोबत असलेल्या उरलेल्या सार्‍या सहमतीला बुडवून, त्या एकाच ’पापा’बद्दल त्यांना थेट प्रतिगामी ठरवून टाकले आहे.

मुंज हा मुद्दा असेल, तर गृहकार्य या दृष्टीने इथे ते विचारवंत आणि त्यांची पत्नी असे माझ्या मते दोन पक्षधर आहेत. एकाचे मत मुंज व्हावी असे आहे, तर दुसर्‍याचे नको असे आहे. आणि निर्णय कोणताही घेतला, तरी एका व्यक्तीवर अन्याय होणारच असतो. आयुष्यात बहुतेक निर्णय असेच असतात. निर्विवाद निर्णय फक्त आणि फक्त वैय्यक्तिकच असू शकतात किंवा मालक-गुलाम संबंधातच असू शकतात. हा तिढा त्यांच्या पत्नीला सोयीचा निर्णय घेऊन सुटला. यात त्या मुद्द्यापुरता त्यांच्या विचाराचा पराभव झाला असला, तरी त्याने त्यांचे उरलेले सर्व विचार थेट बुडित जाऊन शून्य होतात हा बाष्कळपणा आहे असे माझे मत आहे. शिवाय त्याचवेळी व्यक्तिस्वातंत्र्य हे पुरोगामी मूल्य त्यात जोपासले गेले आहे असे माझे मत आहे.

आपल्याला श्रेष्ठ असे काहीतरी समजले आहे, नि ते इतरांवर- सर्वात आधी कुटुंबियांवर - लादणे, हे पुरोगामित्व असूच शकत नाही असे माझे ठाम मत आहे. पुरोगामित्व हे वैचारिक असते, कृती व्यावहारिक बंधनांनी जखडलेली असते. ती विचारांना नेहमीच अनुसरते असे नाही. शिवाय अंमलबजावणीचा प्रश्न येतो, तेव्हा एकाहुन अधिक सहभागी व्यक्तींच्या विचारांचा, कलाचा, हिताऽहिताचा विचार करावाच लागतो. कायम एकाच बाजूला प्राधान्य देणारी व्यवस्था शोषकच असते.

यात आणखी एक मुद्दा महत्वाचा. मुंज या विधीमध्ये कोणत्याही शोषणाचा, वर्चस्ववादी वारशाचा अंतर्भाव नाही. आपले मूल हे स्नातक म्हणून गुरुहाती सोपवणे, त्याला एकप्रकारे निरोप देणे, इतपतच त्याचा अर्थ आहे. इथे त्याच विचारवंतांच्या मुलीच्या लग्नातील कन्यादान विधीचा मुद्दा असता, आणि त्यांनी तिथे माघार घेतली असती, तर मी व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा नावाजूनही तो विधी केल्याबद्दल त्यांची निंदा केलीच असती. मुंजीबाबत ती करण्याची माझी तयारी नाही.

'मुंज ही फक्त त्रैवर्णिकांतच होते, स्त्रियांची होत नाही सबब ती विभाजनवादी आहे' हा दावा चुकीचा आहे. विभाजनवादी आहे तो नियम, विधी नव्हे! त्यामुळे उद्या एखादा बाप म्हणाला, ’माझ्या मुलीची इच्छा असेल तर मी तिची मुंज करेन.’ तर मी त्याचे स्वागतच करेन. सनातनी व्यवस्थेने तो हक्क नाकारलेल्या पूर्वास्पृश्यांमध्येच कुणाला आपल्या मुलाची मुंज करावीशी वाटली, आणि त्यासाठी तो लढा देणार असेल, तर मी त्याच्या सोबत असेन.

पण मुळात त्याने तसे त्याने करावे का? या प्रश्नाला माझे उत्तर नकारार्थी आहे. कारण ’ही कर्मकांडे अनावश्यक मानून सोडून द्यावीत’ असे माझे वैय्यक्तिक मत आहे. परंतु नास्तिकता लादणे आणि धर्मांतर्गत समतेचा आग्रह या दोनपैकी दुसर्‍या पर्यायामध्ये पुरोगामित्वाचा अंश अधिक आहे असे मी मानतो. अर्थात तो अंतिम थांबा असू शकत नाही.

आणि मुंजीबद्दल माझी समज चुकीची असेल आणि त्यात काही अन्यायकारक, विषमतामूलक आढळले, तर मी त्याचाही विरोध नक्कीच नोंदवेन. अधिक माहिती, अधिक ज्ञान झाल्यावर निर्णय पुन्हा तपासून पहावा, आवश्यक वाटल्यास बदलावा, हा ही ज्ञानमार्गाचा आणि पर्यायाने पुरोगामित्वाचा अविभाज्य भाग असायला हवा.

तिसरे उदाहरण माझे वैय्यक्तिक आहे. वर्षभरापूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे दिवस घालावेत का याचा निर्णय मी आईवर सोपवला होता. ते करावेत असा तिचा निर्णय होता. दिवस घालणे हे आत्मा नि पारलौकिकाच्या आधारे उभे राहिलेले कर्मकांड आहे. हे दोन्हीही माणसाच्या मनातून तयार झालेले काल्पनिक व्यूह आहेत असे माझे मत आहे. यात कुठे थेट शोषण मला दिसत नाही. (जमाव-दबाव हा मुद्दा अंमलबजावणीशी संबंधित आहे, विधीशी नव्हे.) काल्पनिक गोष्टींसाठी चार भातांचे पिंड करुन ते नदीत वाहवल्याने कोणताही अन्याय वा शोषण होते, असे मला वाटत नाही. त्यामुळे ते करण्यास माझी हरकत नव्हती. माझ्या सुदैवाने मला भाऊ असल्याने ते विधी त्याने केले. पण मी एकटा असतो तरीही गमावलेल्या माणसासाठी नव्हे, पण जिवंत व्यक्तीच्या इच्छेखातर मी केले असतेच.

परंतु आईच्याबाबत मात्र तिने जिवंतपणी ती इच्छा बोलून दाखवली असेल, तरीही तिच्या माघारी मी ते करणार नाही. कारण मी जडवादी असल्याने, तिच्या जड देहाबरोबरच तिचे अस्तित्व माझ्या दृष्टीने संपुष्टात येते. तिच्या माघारी ती कर्मकांडे करण्याने कुणाही जिवंत माणसाचे समाधान मी करणार नसतो. आणि जिचे आयुष्य संपले, माती झाली तिला माझ्या कृतीने खेद वा संतोष होण्याचा प्रश्नच उद्भवत नसतो.

तीनही उदाहरणांबाबत थोडक्यात सांगायचे तर:

 • माझ्या मुलीने कन्यादानाचा आग्रह धरला तर तो मी साफ नकार देईन.
 • मुलाने मुंजीचा आग्रह धरला तर त्यात आनंदाने सहभागी होईन.
 • आणि श्राद्धाचा आग्रह केवळ जिवंत माणसाच्या इच्छेखातर नाईलाजाने मान्य करेन.

हे तीनही निर्णय माझ्या आजच्या आकलनानुसार आणि प्राप्त परिस्थितीनुसार घेतलेले असतील. परिस्थिती बदलली, माझे आकलन बदलले, अधिक माहिती हाती आली, तर ते बदलू शकतात हे मान्य करुनच अंमलात आणायचे असतात हे मी विसरणार नाही. कालचा निर्णय आज सकारण चुकीचा वाटतो हे लाजत नव्हे तर अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे. कारण कालच्यापेक्षा आज आपले ज्ञान अधिक आहे याचे ते निदर्शक असते.

या तीनहीमध्ये ’अख्खी ब्राह्मणी व्यवस्थाच शोषक आहे. नि तुम्ही थोडे असे नि थोडे तसे करत अप्रत्यक्षरित्या तिचे समर्थन करता.’ हा तर्क मी हास्यास्पद मानून उडवून लावतो. प्रत्येक व्यवस्था- अगदी मार्क्सच्या समतावादी तत्त्वज्ञानावर आधारित व्यवस्थादेखील, शोषणाचे उपांग घेऊनच उभी असते. त्यातील केवळ न्यूने दाखवून संपूर्ण व्यवस्था शोषक म्हणणे अगोचरपणाचे आहे. बहुसंख्य मंडळी स्वीकारलेली व्यवस्था वा गट यांच्या संदर्भात नेमके असेच करत असतात.

आपल्या गटाचे गुण तेवढे प्रातिनिधिक मानावेत नि विरोधी गटाचे अवगुण प्रातिनिधिक मानावेत हा दुराग्रह या भूतली प्रत्येक बाजूबद्ध असलेल्या व्यक्तिचा असतो असे म्हटले तर ते फार टोकाचे होईल असे मला वाटत नाही. अमक्या व्यवस्थेत अधिक वाईट गोष्टी आहेत, तमकीमध्ये कमी आहेत हे विधान पूर्वग्रहनिदर्शकच असते. जगातील सर्व स्पर्धक व्यवस्थांचा संख्याशास्त्रीय अभ्यास करुन चांगल्या वाईटाची गणना कोणीही केलेली नाही, करता येणारही नाही. आपल्या पूर्वग्रहाला अनुकूल असणार्‍या गोष्टी आपल्याला अधिक ठळक दिसतात नि त्यांची जंत्री जमा करत आपण त्यांना अधिकाधिक बळकट करत नेतो इतकेच.

प्रत्येक व्यवस्थेमध्ये काही त्याज्य, काही चालवून घेण्याजोगे, काही निरर्थक असूनही साजरे करण्याजोगे असते. तारतम्याने, डोळसपणे, अधिकाधिक माहिती घेऊन त्याच्याआधारे निवड करायची असते. त्यामुळॆ त्यातील एक निवडले म्हणजे मी त्या पुर्‍या व्यवस्थेचे समर्थन करतो, नि एक नाकारले म्हणजे तिचा विरोध करतो हे दोनही तर्क हास्यास्पद आहेत. एका हातात झेंडा नि दुसर्‍या हाती धोंडा घेतलेल्या विचार-आळशी लोकांचे आहेत..

याच्याविरोधात एक अंतिम तर्क येतो तो सामान्यतेचा. ’तुम्हाला हे जमेल हो, सामान्यांना जमेल का? एकदा एक स्वीकारले की त्यासोबत उरलेले अन्यायकारक, शोषक अनुषंगही ते स्वीकारत जातील ना?’

ही तर्कसंगती योग्य आहे! पण माझे त्यावर उत्तर असे आहे, की ही माझी निवड आहे. इतरांची तीच असावी असे नाही. सर्वांनी माझ्याच पद्धतीने जावे असा माझा आग्रह नाही, असूही नये. मी काही ’जगाच्या कल्याणा आदर्श व्यवस्था’ निर्माण करण्याचा चंग बांधलेला प्रेषित नाही. माझ्या साधकबाधक बुद्धीने मी निवड करत जाईन, तुमच्या साधकबाधक बुद्धीने तुम्ही निवड करा. तुमची निवड माझ्यापेक्षा वेगळी असली म्हणून तुम्ही माझे शत्रूच काय विरोधकही ठरत नाही. ’माझी निवड वा आकलन हे निर्विवाद योग्य, नि तुमचे ते निर्विवाद अयोग्य आहे.’ हा दुराग्रह धरुन एकमेकांवर लादण्याचा प्रयत्न केला नाही तरी पुरेसे आहे.

जर सामान्यांचे सामान्यत्व मान्य करत असू, तर त्यांच्या सोयीचे म्हणून, मी माझी - माझ्या मते सामान्यांहून अधिक विकसित - साधकबाधक बुद्धी फेकून देऊन त्यांच्या सोबत नेणारे प्रवाहपतितत्व स्वीकारावे; किंवा त्याचा सर्वंकष विरोध करणारे दुसरे टोक स्वीकारावे, हे ही मला मान्य नाही.

एकारलेपण हे नेहमीच समाजाला घातक असते. सामाजिक बंध खिळखिळे करणारे असते. माझ्या पुरोगामित्वाच्या नि प्रबोधनाच्या व्याख्येत विचारस्वातंत्र्य, निवडस्वातंत्र्य हे मूल्य महत्वाचे आहे. एरवी जगण्याची एक चौकट पूर्णपणे, तंतोतंत स्वीकारणे जसे अगोचरपणाचे, तसेच ती पूर्णपणे नाकारणेही. धर्मामध्ये एका समुदायाला संपूर्णपणे वाळीत टाकणे, दुय्यम ठरवणे जितके घातक नि निषेधार्ह, तितकेच इतर सामाजिक विचार स्वीकारार्ह असणार्‍याला एका कृतीमुळे वा एखाद्या मुद्द्यासंदर्भातील मतभिन्नतेमुळे पुरोगामी वर्तुळातून बहिष्कृत करणेही. या दोनही कृती टोळी मानसिकतेच्या आणि पुस्तकप्रामाण्य मानसिकतेच्याच दिसतात. पुस्तके वेगळी असतात इतकेच.

हे सारे ऐकून आमचा एक मित्र म्हणाला होता, “म्हणजे एक प्रकारे तुझी ही वस्तुनिष्ठता परस्परविरोधी भूमिका घेण्यास उपयुक्त ठरते तर.” इतक्या विवेचनानंतरही हे सार काढणार्‍यांना इतकेच सांगेन की, ’नवजात अर्भकाची नाळ कापणार्‍या सुरीने माणसांना भोसकताही येते; नेट लावला तर ठारही मारता येते. तिचा उपयोग कसा करायचा हे ती धरलेल्या हातामागच्या मेंदूवर अवलंबून असते. त्या कृतीची जबाबदारी घ्यावी लागते हे मात्र विसरायचे नाही.’

- oOo -


हे वाचले का?

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

तीन भूमिका (पूर्वार्ध) : बाजूबद्धता, तटस्थता आणि वस्तुनिष्ठता

(वस्तुनिष्ठता हा खरंतर objective इंग्रजी शब्दाचा अपुरा अनुवाद आहे. पण आता प्रचलित झाला आहे, मराठी नि हिंदीतही. त्यामुळे इथे मी तोच वापरला आहे. )

आदिम काळात माणूस टोळ्यांच्या वा कळपांच्या स्वरूपात राहात होता. त्या काळातील मानसिकतेचा पगडा माणसाच्या मनावर अजून शिल्लक राहिलेला आहे. त्या काळी ’टोळी नसलेला माणूस’ ही संकल्पनाच माणसाला मानवत नव्हती. तसेच आजही बाजू नसलेली, तटस्थ वा वस्तुनिष्ठ विचाराची, स्वतंत्र भूमिकेची व्यक्ती अस्तित्वात असते यावर बहुसंख्येचा विश्वास नसतो. ’ती कोण आहे?’ यापेक्षा ’ती कोणत्या गटाची आहे?’ या प्रश्नाच्या उत्तराचा मागोवा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ’त्या व्यक्तीची वैय्यक्तिक ओळख काय?’ हा प्रश्नच त्यांच्यासमोर नसतो. ती कोणत्या गावाची, घराण्याची, जातीची, धर्माची आहे या प्रश्नांच्या उत्तरांतूनच समोरच्या व्यक्तीची ओळख करुन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हे सारे गट जन्मदत्त असल्याने प्रत्येक व्यक्तीला आपातत: मिळालेले असतातच. त्यामुळे त्यातून त्या व्यक्तीची ती एक ओळख गृहित धरणे नेहमीच शक्य होते.

PenguinsBeLike

एखादा प्राणी नीलगाय म्हणून वा हरिण म्हणून जन्माला येतो तेव्हा ’कळपातील एक’ एवढीच त्याची ओळख असते. त्या पलिकडे, त्या कळपात वा बाहेर, त्याची वेगळी ओळख नसते. त्याचे कारण म्हणजे त्याचे म्हणावे असे वैशिष्ट्य वा वेगळेपण त्याच्याकडे नसते. पेंग्विन्सचा कळप पाहिला तर एका पेंग्विनहून दुसरा वेगळा ओळखणे जवळजवळ अशक्यच असते, इतके ते एकसारखे दिसत असतात. बहुसंख्य मनुष्यप्राण्यांचा विचारही तसाच असतो.

विकसित समाजामध्ये मात्र जन्मदत्त कळपाखेरीज ती व्यक्ती कोणत्या राजकीय पक्षाची, कोणत्या सामाजिक विचाराची, कोणत्या बुवा-बाबाची भक्त आहे यावरुनही तिचा गट निश्चित होत जातो. तसा तो तुम्हाला करावाच लागतो. अन्यथा तुम्हाला लोक एकतर आपल्या गटात गृहित धरून टाकतात किंवा त्यांच्या गैरसोयीच्या अशा तुमच्या एखाद्या भूमिकेच्या प्रतिवादाच्या सोयीसाठी तुम्हाला त्यांच्या समोरच्या, विरोधी गटाचे ठरवून टाकतात. त्यानंतर त्या गटाच्या - त्यांच्या मते असलेल्या - चुकांची, दोषांची, पापांची जबाबदारी तुमची समजून तुम्हाला जाब विचारत राहतात. यांच्याशी होणार्‍या चर्चेमध्ये, संवादामध्ये, वादामध्ये तुमची स्वत:ची अशी स्वतंत्र असलेली भूमिका कधी येतच नाही. याचे कारण वाद-विवाद वा संवाद हा एका गटाच्या भूमिकेला अनुसरूनच करायचा असतो असा यांपैकी बहुतेकांचा समज असतो. आणि त्यामुळे बहुतेक वेळा त्या संवादाचा निवाडा होतच नसतो.

या अशा बाजूबद्ध समाजामध्ये तटस्थता नि वस्तुनिष्ठता या दोन भूमिकांची बहुसंख्येला समजही नसते. ’तटस्थ म्हणवणारी व्यक्ती ही प्रत्यक्षात कुठल्या तरी बाजूची आहे, फक्त ती तसे जाहीर मान्य करत नाही’ असा त्यांचा ठाम समज असतो. त्याचबरोबर वस्तुनिष्ठ विचार करणार्‍या व्यक्तीने एकदा केलेली निवड ज्या बाजूला वा गटाला धार्जिणी दिसते, तीच त्याची कायमची बाजू, तोच तिचा कायमस्वरूपी गट आहे, असा ग्रह करुन घ्यायलाही त्यांना आवडते. त्यामुळे अन्य संदर्भात त्या व्यक्तीने केलेली निवड, कुठल्या अन्य गटाला वा बाजूला धार्जिणी दिसली, की त्यांना त्यात दुटप्पीपणा दिसू लागतो. वैचारिकदृष्ट्या आळशी असलेल्या या गटनिष्ठ व्यक्ती मग अशा सारासारविवेकाला प्राधान्य देऊन जगणार्‍या, कोणत्याही गटाची ताबेदारी न स्वीकारलेल्यांना वैचारिकदृष्ट्या भोंगळ समजू लागतात... कारण त्यांच्या स्वत:च्या वैचारिक आळसाला ते सोयीचे असते!

अशा समाजामध्ये एखादा मुद्दा, प्रसंग, प्रश्न यांच्यसंदर्भात प्रत्येकाच्या आकलन वा निवाड्याच्या आधारे बाजू तयार होऊन गट पडत नाहीत. कोणत्याही प्रश्नावर, मुद्द्यांवर, निवाडा-निष्कर्षावर आपले मत हे आधीच निश्चित केलेल्या आपल्या गटाला अनुसरूनच असावे लागते. अशा प्रश्नांची उत्तरे, मुद्द्यांचे निराकरण आणि त्यासंबंधी निष्कर्ष-निवाडे हे त्या-त्या गटाचे मुखंड अथवा नेते करत असतात, आणि उरलेला गट त्यांच्या हाताला हात लावून मम म्हणत असतो.

आता हे मुखंड काही विशेष गुणवत्ता वा लायकी दाखवून तिथे पोहोचलेले असतात असेही नाही. माणसाच्या अंगी असलेली विविध कौशल्ये, गुणवत्तेचे आयाम सुतरामसुद्धा नसलेल्या प्राण्यांमध्ये नेतृत्वाचा प्रश्न केवळ बळाने सोडवला जातो. माणसांच्या कळपातही परिस्थिती फार वेगळी नसते. फरक इतकाच की निव्वळ शारीरबलापलिकडे माणसांच्या दिमतीला संपत्ती, बुद्धी, तंत्रज्ञान, गवगवा आणि सर्वात प्रभावी म्हणजे बहुसंख्या यांसारखी अन्य बलेही असतात.

या अन्य बलांच्या साहाय्याने धुरिणत्व प्राप्त केलेले हे नेते, हे मुखंड, त्या त्या प्रश्नाशी, मुद्द्याशी निगडित साधकबाधक विचार करतील याची शाश्वती नसते. त्यांचे नेतृत्व हे गुणवत्तेऐवजी बलाने प्रस्थापित झालेले असल्याने, कदाचित त्यांच्याकडे ते कौशल्य वा ज्ञान नसतेच. आणखी एक शक्यता म्हणजे त्यांना तिथे प्रस्थापित करणार्‍यांच्या अथवा स्वत:च्या सोयीसाठी त्यांना योग्यायोग्यतेऐवजी स्वार्थानुकूल भूमिका घ्यावी लागते. आणि त्यानंतर त्यांच्या गटातील इतर तीच भूमिका अनुसरत जातात.

आता या अनुचरांनाही गटातील धुरिणांनी घेतलेली ती भूमिका कदाचित न पटणारी असू शकते. परंतु तरीही तीच योग्य हा दुराग्रह ते इतरांसमोर- विशेषत: विरोधी गटांतील व्यक्तींसमोर- धरत असतात. कारण बहुतेकांच्या आयुष्यात सारासारविवेकबुद्धीऐवजी गट-बांधिलकीला अधिक प्राधान्य असते. अभ्यास-अनुभव-आकलन यांच्या आधारे योग्यायोग्यतेचा निवाडा करण्याऐवजी माणसे गटाच्या धुरिणांनी दिलेला पर्याय, निवाडा वा निर्णय स्वीकारून मोकळे होत असतात. त्यानंतर त्यांचे डोके फक्त तो योग्य कसा हे सिद्ध करण्यापुरतेच चालत असते. इथे वस्तुनिष्ठतेचा अभाव प्रकर्षाने दिसतो.

तटस्थता आणि वस्तुनिष्ठता या दोन वेगळ्या बाबी आहेत. तटस्थता ही प्राय: निष्क्रिय असते, तर वस्तुनिष्ठता ही सारासार विवेकबुद्धीचा वापर करुन क्रियाशील निर्णय घेणारी असते. तटस्थता ही बाजू घेत नाही. तटस्थता ही कायमस्वरूपी भूमिका म्हणून स्वीकारणे शक्य आहे. माणूस सदासर्वकाळ बाजूबद्धही राहू शकतो- बहुतेक माणसे तशीच असतात. परंतु एका समाजाचा भाग असलेला माणूस सदोदित वस्तुनिष्ठ राहू शकत नाही. संस्कार, जमाव-दबाव आणि सत्ता-दबाव यापुढे झुकून त्याला प्रसंगी बाजूबद्धता किंवा तटस्थता हीच भूमिका म्हणून स्वीकारावी लागते.

इतर दोन गटांतील व्यक्तींच्या तुलनेत वस्तुनिष्ठ व्यक्तीचे वेगळेपण असे की अधिक माहिती, अधिक ज्ञान, अधिक आकलन आणि बदलती परिस्थिती यामुळे एकाच प्रकारच्या प्रश्नाबाबत, निवडीबाबत, मुद्द्याबाबत वेगवेगळ्या प्रसंगी ती व्यक्ती वेगवेगळी भूमिका घेऊ शकते. त्यामुळे ती वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या मुद्द्यांवर परस्परविरोधी बाजूंना दिसू शकते. परंतु ज्यांना त्यामागची कारणमीमांसा ज्यांना उलगडत नाही, अशा विचारविन्मुख लोकांना तो दुटप्पीपणा वाटू शकतो. त्यातून त्या व्यक्तीला चंचलतेचा, धरसोड वृत्तीचा, सर्व बाजूंना खुष करण्याचा म्हणजे कणाहीनतेचा आरोप सहन करावा लागतो. किंवा अशी व्यक्ती ’गावाचं एक नि या गावंढ्याचं दुसरंच असतंय’ म्हणून झटकून टाकली जाते.

IamNotWithThem

तटस्थतेचा प्रत्यक्ष(!) फायदा नसतो तसा प्रत्यक्ष तोटाही. कारण ती कुठलीच जबाबदारी घेत नाही. तिच्यात नेमकेपणाचा अभाव असतो. अपवादात्मक प्रसंगी तटस्थता निवडीमध्ये सहभागी नसूनही ठोस भूमिका असते. क्वचित तसे जाहीर करणे हाच विशिष्ट भूमिकेला वा मुद्द्याला नोंदवलेला विरोध असू शकतो. सोबत जोडलेला फोटो पाहा. पण हा अपवादच म्हणायचा.

वस्तुनिष्ठतेमध्ये नेमकेपणाला साधण्यासाठी अभ्यास, अनुभव नि आकलन यांना महत्त्व असते. त्यांच्या आधारे घेतलेला केलेली निवड वा घेतलेला निर्णय हा विचारांती घेतलेला असल्याने त्याची जबाबदारीही स्वीकारावी लागते. पण नेमकी हीच गोष्ट बहुसंख्येला नकोशी वाटत असते. त्यामुळे जिथे हा निर्णय आयता मिळतो, अशा एखाद्या गटाशी बांधिलकी स्वीकारून ते विचारांचे इंद्रिय बंद करून टाकतात.

ही बाजूबद्ध मंडळी विचारहीन असतील तर सुखी असतात. पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्यात निर्णयक्षमता जिवंत असेल, तर आपली भूमिका नि आपल्या बाजूची भूमिका यातील अंतर्विरोधांचा सामना त्यांना करावा लागतो. त्यातून निर्माण होणारा संभ्रम त्यांना घेरून राहातो. तटस्थतेने मुद्द्यावर बाजूच न निवडल्याने, निर्णयाची कोणतीच जबाबदारी नसते. तर वस्तुनिष्ठतेला निर्णय घेतल्यावरही 'एखादे अनुषंग तपासायचे राहिले का, त्यामुळे आपला निर्णय वेगळा असू शकला असता का?’ हा संभ्रम शिल्लक राहातो.

तटस्थता केवळ प्रासंगिक भूमिकाच असू शकते. त्यात सातत्य असले, की ती घेणार्‍याची विश्वासार्हता संपुष्टात येते किंवा ती अदखलपात्र होऊन राहते. त्याचप्रमाणे केवळ बाजूंचा विचार करणार्‍या गटांमध्ये वस्तुनिष्ठ भूमिका घेणार्‍याची विश्वासार्हताही संपुष्टात येते. कारण त्यांना 'हा/ही आपल्या गटाची की दुसर्‍या?’ याचे ठोस उत्तर न मिळाल्याने ते त्याच्यापासून दूर राहू लागतात. तेव्हा वेगवेगळ्या कारणाने का होईना, पण तटस्थता आणि वस्तुनिष्ठता ही दोन्हीही बाजूबद्ध समाजात उपरीच ठरतात.

वस्तुनिष्ठ राहू इच्छिणार्‍याला कायमच एकीकडे भूस्खलनप्रवण डोंगर नि दुसरीकडे खोल दरी यांच्या दरम्यान असलेल्या अरुंद रस्त्यावर चालावे लागते. अभ्यास-अनुभव-आकलन यांच्या आधारे केलेली कारणमीमांसा आणि त्याआधारे घेतलेली भूमिका समजून घेण्यासाठी कष्ट करण्याची बहुसंख्येची मानसिकता नसते. त्यामुळे त्याची ती भूमिका कुठेच वाखाणली जात नसते. ज्याला इंग्रजीत thankless job म्हणतात तशी ही भूमिका असते. सदोदित true-to-the-cause राहण्यासाठी संघर्षप्रवण राहायचे की बाजूबद्धतेमधील सुरक्षितता निवडायची हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.

- oOo -

पुढील भाग >> तीन भूमिका - २ : वस्तुनिष्ठता - तीन उदाहरणे


हे वाचले का?

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

आमच्याच नळाचं पाणी जगभर गेलंय

सामान्यपणे दक्षिण भारताचा इतिहासही धड ठाऊक नसलेले लोक टारझनसारखे छात्या पिटून राष्ट्रभक्ती वगैरेच्या बर्‍याच बाता मारत असतात. इतिहासामधून आपल्या जातीच्या, धर्माच्या सोयीच्या घटना नि नेते शोधून त्यांच्या जयंत्या, मयंत्या, पुतळे नि देवळे उभी करुन आपल्या संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाच्या ढेकरा- आय मिन डरकाळ्या फोडत असतात. प्रामुख्याने यांच्यातच ’आमच्याच नळाचं पाणी जगभर गेलंय’ या गैरसमजाला देवघरात ठेवून रोज दोन फुलं वाहण्याची पद्धत आहे.

वास्तविक संस्कृती नि इतिहास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण इतिहास म्हणतो तेव्हा केवळ राजकीय इतिहास- आणि त्याला जोडून येणारा सामाजिक इतिहासच आपल्याला अभिप्रेत असतो. सांस्कृतिक नि भौतिक इतिहासाचे आपल्याला वावडे असते. शेजार्‍याच्या घराला, शेजारच्या इमारतींमधील घराला वापरलेल्या विटांची माती कशी आमच्याच परसातली होती इतपतच आपले संशोधन पसरलेले असते.

सांस्कृतिक देवाणघेवाण ही निरंतर चालत आलेली प्रक्रिया आहे. विविध संस्कृतींमधून उगम पावलेल्या भाषा, संगीत वा अन्य कला, रूढी, चालीरीती या अन्य संस्कृतींमध्ये पोचल्या, पोसल्या नि रुजल्या आहेत. अनेकदा राजकीय पराभवानंतर नव्या शासकांनी त्यांचे निर्दालन करुन आपल्या लादल्यामुळे मूळच्या हळूहळू अस्तंगत होत जातात नि जेत्यांच्या तिथे रुजून राहतात.

उलट सांस्कृतिक आदानप्रदानात ज्या इकडून अन्य भूभागात गेल्या, रुजल्या त्या तिथेच अधिक प्रकर्षाने दिसतात. म्हणजे जिथे उगम तिथे त्या नाहीत, तर जिथे आहेत तिथे त्या उपर्‍या आहेत, असा प्रकार होतो. मग जिथे त्या आहेत त्या मूळच्या तिथल्याच आहेत हे सांगणारा ’खरा इतिहास’ लिहिला जाऊ लागतो. तर मूळ स्थानी त्या गमावलेपणाची खंत वाढीस लागून त्यावर हक्क प्रस्थापित करण्याचा आटापिटा सुरू होतो.

गंमत म्हणजे हे असेच घडते असेही म्हणता येत नाही. ही केवळ एक शक्यता असते. दुसरी शक्यता ही की मुळात त्या त्या स्थानी असलेला सांस्कृतिक ठेवा अनेकदा बाहेरचेच लोक आपल्याकडून गेल्याचा दावा करु लागतात. तर जेते आपल्या संस्कृतीला लादतानाच जितांच्या संस्कृतीमधील काही वारसा बेमालूमपणे आत्मसात करुन त्याला आपला रंग फासून टाकतात (ख्रिसमस आणि एकुणच ख्रिसमस-काळ याच्या संदर्भात या मुद्द्यांचे मी भरपूर सोदाहरण विश्लेषण केले आहे.)

आता इतक्या सुदूर भूतकाळात यातील नक्की कोणती शक्यता वास्तवात आली होती हे आज सांगणे जवळजवळ अशक्यच असते. कारण आपण यासाठी त्याचे दस्तऐवजीकरण करणार्‍यांच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असतो. आणि त्याला जागोजागी छिद्रे असतात. जेत्यांना धार्जिणे लेखक, समाजातील सर्वात प्रभावशाली गटाला धार्जिणे असणारे लेखक, आपापल्या पूर्वग्रहाला अनुसरून नोंदींमध्ये फेरफार करणारे लेखकच बहुसंख्येने असतात. आणि तणकटांमध्ये नक्की दूर्वा कोणती याचा निर्णय इतक्या दशकांनंतर-शतकांनंतर आपण घेणे अशक्यच असते.

यावर उपाय काय? सोपा आहे तसा. वर जशा तीन शक्यता सांगितल्या तसेच अनेक शक्यतांनी हे जग बनलेले आहे याचे भान राखणे. त्यातून अनुभव, वस्तुनिष्ठ निरीक्षण, अभ्यास आणि निष्कर्ष या मार्गाने प्रथम त्यातील संभाव्य कोणत्या याचा पडताळा घेणे. त्यातील सर्वाधिक संभाव्य ही तत्कालीन वास्तवाच्या सर्वात जवळची (संपूर्ण वास्तव नव्हे!) म्हणून निवडणे; आणि हे करताना अधिक माहिती, निरीक्षण, अधिक विश्वासार्ह अभ्यास पद्धती समोर येताच ही निवड बदलू शकते हे ही मान्य करणे.

पण खरा इतिहास-खोटा इतिहास, देव-सैतान, बरोबर-चूक या बायनरी समजांच्या जगात शेणकिड्यासारखे राहू इच्छिणारे विचारहीन लोक या वाटेला कधी जातील या शक्यतेची (possibility) संभाव्यता (probability) नगण्य आहे.

CarlosSantana

याची आठवण झाली ती वेगळ्याच कारणाने. Real African Books या नावाचे एक पेज मी फॉलो करतो. फक्त पाश्चात्त्य (आणि उत्तर भारताचा) इतिहास शिकलेल्या मंडळींना ’त्या काळ्या लोकांचा इतिहास कशाला शिकायचा?' असे वाटण्याचा संभव बराच आहे. पण मानवाच्या संस्कृतीचे उगमस्थान असलेल्या आफ्रिकेबद्दल आपल्याला शून्य माहिती असते. 'दरिद्री आणि गुलाम लोकांचा प्रदेश' एवढ्या गृहितकावर आपला माहितीकोष संपतो. थोडेफार निसर्गप्रेमी (आणि जे फक्त सफारीला जाऊन फोटो काढून मिरवतात ते छद्मनिसर्गप्रेमी) लोकांना सेरेंगिटीमुळे ’समृद्ध प्राणिजीवन असलेला प्रदेश’ असा - चुकीचा - समज असतो. या पलिकडे आफ्रिका आपल्याला ठाऊकच नसते.

अर्वाचीन भारताच्या संदर्भात पाहिले तर अर्ध्या-एक राज्याचे ’साम्राज्य’ असलेल्यांचा इतिहास आपण शिकलेलो असतो. पण आफ्रिकेतील एखाद्या ऐतिहासिक साम्राज्याबद्दल आपल्या शून्य माहिती असते. तेथील संगीत, नृत्य याबाबत ते 'बार्बारिक' म्हणाजे मागासलेल्यांचे, प्राथमिक पातळीवरचे हा आपला ठाम समज असतो. या पेजवर आफ्रिकेबद्दल थोडक्यात माहिती दिली जात असली तरी बरीच उद्बोधक असते. एका अर्थी आफ्रिका चमच्या-चमच्याने आपल्याला पाजली जाते.

आज गंमत अशी झाली की या पानावर कार्लोस सान्ताना या मेक्सिकन-अमेरिकन रॉक कलाकाराचे म्हणून हे वाक्य क्वोट केले आहे. ते वाचताना मला आपल्याकडील ’आमच्याच नळाचं पाणी जगभर गेलंय’ जमातीची प्रकर्षाने आठवण झाली. स्वत: कार्लोस जरी आफ्रिकन नसला, तरी हे शेअर करणारे आफ्रिकन असल्याने ’मानवी जीवनाच्या उगमा’पाशीच हा ’आमच्याच नळाचं पाणी जगभर गेलंय’ तर्क उगम पावला असावा का? असा प्रश्न मला पडला. निदान 'हा ही विचार किंवा शोध आमच्याचकडून गेला'असं इकडचे छातीपिटू टारझन म्हणणार नाहीत अशी आशा आहे. उलट शक्यता म्हणजे कदाचित तेवढे श्रेयही ते इतर कुणाला, ते ही ज्यांना दुय्यम समजतो त्या आफ्रिकनांना देण्याची तयारी नसेल.

आमचाच प्रदेश, संस्कृती, धर्म, परंपरा जगात भारी आणि जगात ’जे जे उत्तम उदात्त उन्नत’ ते ते सारे आमच्याच बापदाद्यांनी निर्माण केले हा अनाठायी दंभ सार्वत्रिकच दिसतो. अरबांनी गणितामध्ये, मोजणीमध्ये बरीच प्रगती केली होती. वाळवंटी प्रदेशात राहणार्‍या अरब टोळीवाल्यांनी दिशा राखण्यासाठी नक्षत्रांचा अभ्यास केला, खगोलशास्त्र विकसित केले. आज ज्यांना हिंदू-अरब अंक म्हटले जाते त्यांचा वापर सुरू केला आणि मोजणीही. पण जगात ते एकटेच हे करत होते असे नाही. भारतासह चीन द. अमेरिका येथील संस्कृतीमध्येही यांचा उल्लेख झालेला दिसतो. आता हे इथून तिथे गेले की तिथून इथे, हे ठरवणे केवळ मूल्यमापनाचा भाग आहे. त्यात अर्वाचीनांचा स्वार्थ मिसळतो आणि माहिती बाधित होत जाते. त्यामुळे शहाण्याने फक्त निरीक्षणेच तेवढी घ्यावीत (ती ही बाधित असू शकतातच) आणि सांस्कृतिक रस्सीखेचीचे तपशील नाईलमध्ये, गंगेमध्ये, तैग्रिसमध्ये, डन्यूबमध्ये सोडून द्यावेत.

- oOo -


हे वाचले का?

मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

इतिहास, चित्रपट नि मी

'काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षागृहात असताना, त्यांच्याबद्दल भवती न भवती चालू असताना एका मित्राने त्याच्या फेसबुक-पोस्टबाबत मी व्यक्त व्हावे यासाठी मला टॅग केले होते. त्याला दिलेला हा प्रतिसाद.

माझ्या स्वयंभू परंपरेला अनुसरून सर्वच गटांना नाराज करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. एरवी माझ्या दृष्टिने प्रासंगिकता हा आता टाकाऊ विषय आहे हे सुरुवातीलाच नोंदवून ठेवतो. एखाद्या लेझर विजेरीच्या भिरभिरत्या लाईटच्या मागे नाचणार्‍या मांजरासारखे नाचायला मला आवडत नाही.
---

मुळात इतिहास हा विषय मला त्याज्य आहे. ’इतिहासातून प्रेरणा मिळते’ हे भंपक विधान आहे. इतिहासातून फक्त झेंडे आणि शस्त्रे मिळतात.'माणसे त्यातून शिकतात’ हे शेंडाबुडखा नसलेले विधान आहे. ’शालेय जीवनात इतिहास हा विषय शिकवूच नये. ज्याला खरोखर रस असेल त्याला पुरेशी समज आल्यावर, महाविद्यालयातच तो शिकवला जावा’ असे माझे मत आहे. दरम्यान शालेय अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र या विषयाने त्याची जागा घ्यावी, असे माझे मत आहे. वर्तमानाचे भान आणि ज्ञान येण्यासाठी तो आवश्यक आहे.

त्याचसोबत काही ’बरोबर’ आणि काही ’चूक’ असेच असते आणि त्यातही कुणाला तरी बरोबर काय ते करेक्टं माहिती आहे, त्याला विचारले की काम झाले’ या चुकीच्या समजातून विद्यार्थ्यांना नि पालकांनाही बाहेर काढण्यासाठी, पुरेशी अंकओळख झाल्यावर इयत्ता पाचवीपासून शक्यताविज्ञान (स्टॅटिस्टिक्स) शिकवावे हे त्यालाच जोडून येणारे दुसरे मत आहे. त्यातून गृहितक, शक्यता, संभाव्यता आणि अखेर निष्कर्ष (निर्णय नव्हे!) या टप्प्यांशी त्यांची ओळख होईल. यातून काळे विरुद्ध पांढरे प्रकारच्या मूर्ख लढाया कमी होऊ शकतील

चित्रपट हे अभ्यासकाचे माध्यम नाही हे माझे ठाम मत आहे. ते करण्यासाठी पुरेसे आंतरराष्ट्रीय - इंग्रजी आणि अन्य भाषिक सुद्धा- मी पाहिले आहेत. जिथे घटना, प्रसंग मुद्द्यांवर स्वार होतात, तिथे अभ्यासकाची भूमिका दुर्लक्षितच राहते. याचे कारण त्याचा ग्राहक हा ’प्रेक्षक’ आहे, वाचक/अभ्यासक नाही. हे काहीसे ग्राफ आणि आकडेवारी यांच्या तुलनेसारखे आहे. केवळ स्केलशी खेळ करुन एखादा मंद-प्रगतीचा ग्राफ घोडदौड-प्रगतीचा म्हणून दाखवता येतो. चित्रपटाचेही तसेच आहे

राशोमोन या प्रसिद्ध चित्रपटाने स्पष्ट दाखवलेली सापेक्षता तर सोडूनच द्या, पण अलिकडे ब्रॉडचर्च या एका मालिकेत तपासाचे नरेटिव म्हणून दाखवलेला, आरोपीने केलेला खून ’पाहून’ तो खुनी आहे असे आमचा एक मित्र समजला होता. राशोमोनमध्ये चारही संबंधितांच्या ’साक्षी’ चित्रित केल्या आहेत. त्यातील समान भागांमुळे ते वास्तव नाही, याचे भान प्रेक्षकाला येते. पण एरवी कथन (narrative) एकच असेल, तर तेच वास्तव समजून प्रेक्षक पुढे जातो. परस्परांना पूर्ण छेद देणारी एकाहुन अधिक असतील, तर आपल्या धारणांना सोयीचे ते बरोबर आणि बाकीची चूक असे समजून प्रेक्षक पुढे जातो. कारण तो ’प्रेक्षक’ असतो. तो मूल्यमापन, विचार, पडताळा घेणे या फंदात पडत नसतो.

HistoricalFilms
mediaindia.eu येथून साभार.

अक्षयकुमार, विवेक अग्निहोत्रीसारखे लोक इतिहास उपसून उपसून विकत आहेत. ते विकत न घेणे हे माझ्या हाती आहे. त्यांनी ते विकूच नये असे मी म्हणू शकत नाही. कंगना राणावत सारखी अभिनेत्री क्वीनसारखा उत्तम चित्रपट देते, ज्यात परस्परांना न ओळखणारे स्त्री-पुरुष एकत्र राहतात- ते ही तात्पुरते. त्या दरम्यान त्यांच्यात लिंगभावविरहित असे छान नाते तयार होते. इतका प्रागतिक दृष्टिकोनाचा चित्रपट दिल्यानंतर, राजकीय हवाबदल होताच ती लक्ष्मीबाईंच्या घोड्यावर स्वार झाली आणि तिने पद्मश्री पदरी पाडून घेतली. ज्याचा त्याचा चॉईस असतो.

आज 'इतिहास समजून घ्या, काश्मीर फाईल्स पाहा’ म्हणणारे वैदिक/वैष्णवांच्या लबाडीचा इतिहास तेवढ्याच खुल्या मनाने समजून घेणार आहेत काय? राम-कृष्णादि त्या त्या कालातील प्रभावशाली व्यक्तींवर आपल्या पंथाची मोहोर उमटवण्यासाठी दशावतार नावाची अफलातून कल्पना सुपीक डोक्यातून निघाली. (हा खरा मास्टरस्ट्रोक) नेत्याला/श्रेष्ठीला आपल्या कळपात ओढले की अनुयायी पण ’मागुते येतात’ या न्यायाने ते पंथ वैष्णव पंथात विलीन झाले हे पाहायची यांची तयारी आहे का? या तर्काला महाराष्ट्राचे दैवत असलेला विठोबा हा भक्कम अर्वाचीन पुरावा आहे. त्याचा प्रथम पांडुरंग झाला, मग तो विष्णूचा अवतार ठरवून विठोबा-रखुमाईचा घोष चालू झाला. (अजूनही पंढरपुरात विठोबाशेजारी रुक्मिणी नाही. तेव्हा हे संक्रमण अजून पुरे झालेले नाही.) पदुबाई, तुळसा यांच्या मृत्यूभोवती भयानक कथा रचून त्यांना विठोबाच्या कथेतून बाहेर काढले गेले आहे. भरीला दरवर्षी तुलसीविवाह साजरा करुन खुंटा हलवून बळकट केला जातो आहे. गंमत म्हणजे दिंडीमध्ये ’विठोबा-रखुमाई’चा गजर करत जाणारे बहुजन समाजातील लोकही आंधळेपणे हा ’नवा इतिहास’ स्वीकारु लागले आहेत. या पलिकडे हिंदू म्हणवल्या जाणार्‍यांचा इतिहास दलित, अस्पृश्यांवरील अत्याचारांनी बरबटलेला आहे. त्यावरचे चित्रपट ’इतिहास समजून घ्या’ म्हणून या मुखंडांना दाखवले तर ते पाहणार आहेत का? त्यांना ’सरकारी जावई’ म्हणून हिणवणॆ हे थांबवणार आहेत का?

आता हे लिहिले की खुश होणारे आंबेडकरवादी, बौद्ध हे आदि शंकराचार्य पूर्व इतिहासच्या अभ्यासावर एखाद्या वैदिकाने काढलेला चित्रपट पाहतील, की आज हिंदुत्ववाद्यांचे विरोधक जसा विरोध करत आहेत तसा विरोध करतील? मुळात शंकराचार्यांना वैदिक धर्माच्या उत्थानासाठी ध्वजा हातात घ्यावी लागली त्याची कारणमीमांसा असलेले लेखन/चित्रपट अभ्यासायची त्यांची तयारी आहे का? अगदी इस्लाम वा तथाकथित सनातन धर्माइतकी व्यापक नसतील कदाचित- तरी बौद्धांनीही धर्मप्रसारार्थ केलेली कृत्ये 'निदान वाचू/पाहू तरी' म्हणून ते ऐकून घेणार आहेत का? आमचा झुंड नि तुमचा काश्मीर फाईल्स करत बसणारे हे लोक कुठल्या अर्थाने इतिहासातून प्रेरणा घेत आहेत?

आणखी एक मुद्दा म्हणजे इतरांनी चर्चेचे वर्तुळ ठरवावे नि मी फक्त प्रतिक्रिया द्यावी हे मला मान्य नाही. हे राजकारण, समाजकारणाबाबत जितके खरे आहे तितकेच कलेबाबतही. ’मन की बात’ करणे हा आपल्या देशात आता राजमान्य झालेला प्रकार आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत सर्वोच्च नेते कोणत्याही प्रश्नांना सामोर जात नाहीत, स्वत:ला जनतेप्रती उत्तरदायी मानत नाहीत. इतरांच्या पत्रकार-परिषदा याही खुर्चीवर बसून दिलेले भाषण स्वरूपाच्या आहेत. त्यामुळॆ ’यथा राजा तथा प्रजा’ या न्यायाने मी ही त्याच भूमिकेत गेलो आहे.

जोवर ते माझ्या दृष्टिकोनाची दखल घेत नाहीत तोवर मी इतरांच्या मुद्द्यांवर, दृष्टिकोनाबद्दल बोलणार नाही. तेव्हा भारतकुमार २.० अक्षयकुमार असो, विवेक अग्निहोत्री असो की कंगना राणावत, यांच्या भूमिकेचा (मी वैचारिक हे विशेषण वापरलेले नाही!) प्रतिवाद करण्याचा वा त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्नही करणार नाही. ही मंडळी वा त्यांच्या कलाकृती तितपत महत्वाच्या आहेत असे मला वाटत नाही.

- oOo -


हे वाचले का?

सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

मी लक्षाधीश

महिनाअखेरीस मी ब्लॉगचा मेन्टेनन्स करत असतो. आधीच प्रसिद्ध केलेल्या लेखांना अनुरूप चित्रे वा व्हिडिओ सापडले असतील तर ते जोडणे, कुठे फॉरमॅटिंगचा घोळ झाला असेल तर (विशेषत: मोबाईल थीममध्ये) तो निस्तरणे, काही अप्रकाशित लेखांवर नजर टाकून ते पुरे करण्यास अधिक माहिती सापडली आहे का, त्यातील काहींना एकत्र करता येईल का? याचा धांडोळा मी घेत असतो.

IConquered

हे करत असताना एकुण ब्लॉगच्या वाटचालीचा अंदाज घेण्यासाठी मी ब्लॉग-स्टॅटिस्टिक्सही पाहतो. यावेळी असे लक्षात आले की जुलै महिन्यात कधीतरी ’रमताराम’ या ब्लॉगची एकुण वाचनसंख्या एक लाखांचा टप्पा पार करुन गेली आहे. सुरुवातीच्या काळात अर्थातच संथ असलेली प्रगती एकट्या जुलैमध्ये चार हजारहून अधिक वाचनांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षभरातच १४ हजार वाचने झालेली दिसली.

महिन्यापूर्वी पसारा-आवर योजनेअंतर्गत माझ्या एका स्तंभाचा जो स्वतंत्र ब्लॉग होता तो मी रमताराममध्ये विलीन केला. त्याची अर्थातच वेगळी पब्लिसिटी करण्याचा प्रश्न नव्हता. जुन्या, मूळ तारखांनाच ते लेख इथेही प्रकाशित झाले होते. परंतु महिन्याभरातच त्याच्या पहिल्या भागाने २०० वाचनांचा टप्पा ओलांडला! पुढचे लेखही टप्प्याटप्प्याने वाचले जाताना दिसत आहेत.

बारा वर्षे लिहित असलेला ब्लॉग जरी सुरुवातीच्या काळात केवळ हौस म्हणून अधूनमधून लिहित होतो, तिथे फारसा सक्रीय नव्हतो. पण गेल्या सात-आठ वर्षांत त्याकडे लेखनाचे प्रमुख माध्यम म्हणून गांभीर्याने पाहिले आहे. त्यासाठी केलेला सारा प्रवास ’माझी ब्लॉगयात्रा’ या मालिकेमध्ये नोंदवून ठेवला आहे.

लेखनाची प्रसिद्धी ही बव्हंशी स्वावलंबी स्वरूपाची (क्रॉस-सेलिंग, इन-पोस्ट रेकेमेंडेशन्स) होती. फेसबुकवरही पुरा लेख न टाकता फक्त लिंकच देण्याची माझी पद्धत आहे. यात भर म्हणजे एक मित्र मागे म्हणाला तसे, ’तुम्ही पाच मैल लिहिता. एवढं कोण वाचणार’ हा ही एक मुद्दा असतोच. त्यामुळे अनेक मंडळी फेसबुकवर लाईक करुन मोकळे होतात. क्लिक करुन लिंक उघडण्याचा प्रयत्न करत नसावेत. त्यामुळे लाईक्स चाळीस (स्वगत: काळे, खरं सांगा दहा-पंधराच्या वर कधी गेली होती का?) आणि त्यावेळी वाचने चार-पाच असा प्रकार दिसतो. परंतु ब्लॉग-अग्रेगेटर्सवर लेखाची लिंक पडली की वाचनांचा वेग वाढत जातो असे दिसते. एकुणात फेसबुकपेक्षा ब्लॉग अग्रेगेटर्स अधिक उपयुक्त आहेत असा निष्कर्ष निघतो आहे. एकुण चारशेच्या आत-बाहेर पोस्ट/लेख पाहता सरासरी वाचने अडीचशेच्या आसपास होतात. माझ्या लेखनाच्या जातकुळीचा विचार करता मी त्यावर नक्कीच समाधानी आहे.

पण एरवी बारा वर्षांत एक लाख ही फार वाचनसंख्या नव्हे. परंतु ब्लॉगचे विषय पाहू गेले तर यात चलनी नाणी असणारे कविता, हिंदी चित्रपट, भटकंती, कौटुंबिक गोष्टी, फोटो, हे हुकमी विषय नाहीत. टीआरपीवाला म्हणता येतील असा राजकारण हा एकच विषय माझ्याकडे आहे आणि तो ही विश्लेषणाकडे अधिक झुकलेला. पण एकुण ब्लॉगलेखनात त्याचा सहभाग १०% देखील नाही. थोडीफार थट्टा, भंकस करत असलो तरी त्याचेही प्रमाण १-२% हून अधिक नसेल.

मला विषय घेऊन लेख लिहिण्यापेक्षा माझ्या आकलनाला लेखनाचे स्वरूप द्यायला आवडत असल्याने शब्दसंख्येची मर्यादा जाचक वाटते. सारे आनुषंगिक मुद्दे घेतल्याखेरीज मला लेखन अपुरे वाटते. यातून तयार झालेले मैलभर लेख छापणे वृत्तपत्रांना परवडत नसते. त्यामुळे अनेकदा मी ते ’द वायर-मराठी’ साठी सुजय शास्त्रीकडे किंवा ’अक्षरनामा’साठी राम जगतापकडे धाडून मोकळा होतो. त्यामुळे अजून मी वृत्तपत्री लेखक नसल्याने त्या प्रसिद्धीबरोबर जमा होणारी चाहती मंडळीही नाहीत.

याखेरीज मी लेख शेअर करताना कुणालाही टॅग करत नाही, की कुणाला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवतही नाही. अपवाद मधली दोन वर्षे फेसबुकवर नसतानाचा. तेव्हा निवडक आठ-दहा मित्रांना मी लिंक्स पाठवत असे. आताही आनंद मोरे, सौरभ महाडिक या दोघा मित्रांना आणि फेसबुकवर नसलेल्या एका चिकित्सक मैत्रिणीला पाठवतो. पण तो प्रसिद्ध करण्यापूर्वी, पूर्वावलोकनासाठी, दुरुस्त्या सुचवाव्यात म्हणून.

या सार्‍याचा विचार करता एक लाख वाचनांचा टप्पा माझ्या दृष्टीने मोलाचा आहे. ब्लॉगला रीच नसतो, पुरे लेखन फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपला पाठवले नाही तर फार पोचत नाही म्हणणार्‍यांना हे सडेतोड उत्तर आहे असे मला वाटते.

- oOo -


हे वाचले का?