मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

इतिहास, चित्रपट नि मी

'काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षागृहात असताना, त्यांच्याबद्दल भवती न भवती चालू असताना एका मित्राने त्याच्या फेसबुक-पोस्टबाबत मी व्यक्त व्हावे यासाठी मला टॅग केले होते. त्याला दिलेला हा प्रतिसाद.

माझ्या स्वयंभू परंपरेला अनुसरून सर्वच गटांना नाराज करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. एरवी माझ्या दृष्टिने प्रासंगिकता हा आता टाकाऊ विषय आहे हे सुरुवातीलाच नोंदवून ठेवतो. एखाद्या लेझर विजेरीच्या भिरभिरत्या लाईटच्या मागे नाचणार्‍या मांजरासारखे नाचायला मला आवडत नाही.
---

मुळात इतिहास हा विषय मला त्याज्य आहे. ’इतिहासातून प्रेरणा मिळते’ हे भंपक विधान आहे. इतिहासातून फक्त झेंडे आणि शस्त्रे मिळतात.'माणसे त्यातून शिकतात’ हे शेंडाबुडखा नसलेले विधान आहे. ’शालेय जीवनात इतिहास हा विषय शिकवूच नये. ज्याला खरोखर रस असेल त्याला पुरेशी समज आल्यावर, महाविद्यालयातच तो शिकवला जावा’ असे माझे मत आहे. दरम्यान शालेय अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र या विषयाने त्याची जागा घ्यावी, असे माझे मत आहे. वर्तमानाचे भान आणि ज्ञान येण्यासाठी तो आवश्यक आहे.

त्याचसोबत काही ’बरोबर’ आणि काही ’चूक’ असेच असते आणि त्यातही कुणाला तरी बरोबर काय ते करेक्टं माहिती आहे, त्याला विचारले की काम झाले’ या चुकीच्या समजातून विद्यार्थ्यांना नि पालकांनाही बाहेर काढण्यासाठी, पुरेशी अंकओळख झाल्यावर इयत्ता पाचवीपासून शक्यताविज्ञान (स्टॅटिस्टिक्स) शिकवावे हे त्यालाच जोडून येणारे दुसरे मत आहे. त्यातून गृहितक, शक्यता, संभाव्यता आणि अखेर निष्कर्ष (निर्णय नव्हे!) या टप्प्यांशी त्यांची ओळख होईल. यातून काळे विरुद्ध पांढरे प्रकारच्या मूर्ख लढाया कमी होऊ शकतील

चित्रपट हे अभ्यासकाचे माध्यम नाही हे माझे ठाम मत आहे. ते करण्यासाठी पुरेसे आंतरराष्ट्रीय - इंग्रजी आणि अन्य भाषिक सुद्धा- मी पाहिले आहेत. जिथे घटना, प्रसंग मुद्द्यांवर स्वार होतात, तिथे अभ्यासकाची भूमिका दुर्लक्षितच राहते. याचे कारण त्याचा ग्राहक हा ’प्रेक्षक’ आहे, वाचक/अभ्यासक नाही. हे काहीसे ग्राफ आणि आकडेवारी यांच्या तुलनेसारखे आहे. केवळ स्केलशी खेळ करुन एखादा मंद-प्रगतीचा ग्राफ घोडदौड-प्रगतीचा म्हणून दाखवता येतो. चित्रपटाचेही तसेच आहे

राशोमोन या प्रसिद्ध चित्रपटाने स्पष्ट दाखवलेली सापेक्षता तर सोडूनच द्या, पण अलिकडे ब्रॉडचर्च या एका मालिकेत तपासाचे नरेटिव म्हणून दाखवलेला, आरोपीने केलेला खून ’पाहून’ तो खुनी आहे असे आमचा एक मित्र समजला होता. राशोमोनमध्ये चारही संबंधितांच्या ’साक्षी’ चित्रित केल्या आहेत. त्यातील समान भागांमुळे ते वास्तव नाही, याचे भान प्रेक्षकाला येते. पण एरवी कथन (narrative) एकच असेल, तर तेच वास्तव समजून प्रेक्षक पुढे जातो. परस्परांना पूर्ण छेद देणारी एकाहुन अधिक असतील, तर आपल्या धारणांना सोयीचे ते बरोबर आणि बाकीची चूक असे समजून प्रेक्षक पुढे जातो. कारण तो ’प्रेक्षक’ असतो. तो मूल्यमापन, विचार, पडताळा घेणे या फंदात पडत नसतो.

HistoricalFilms
mediaindia.eu येथून साभार.

अक्षयकुमार, विवेक अग्निहोत्रीसारखे लोक इतिहास उपसून उपसून विकत आहेत. ते विकत न घेणे हे माझ्या हाती आहे. त्यांनी ते विकूच नये असे मी म्हणू शकत नाही. कंगना राणावत सारखी अभिनेत्री क्वीनसारखा उत्तम चित्रपट देते, ज्यात परस्परांना न ओळखणारे स्त्री-पुरुष एकत्र राहतात- ते ही तात्पुरते. त्या दरम्यान त्यांच्यात लिंगभावविरहित असे छान नाते तयार होते. इतका प्रागतिक दृष्टिकोनाचा चित्रपट दिल्यानंतर, राजकीय हवाबदल होताच ती लक्ष्मीबाईंच्या घोड्यावर स्वार झाली आणि तिने पद्मश्री पदरी पाडून घेतली. ज्याचा त्याचा चॉईस असतो.

आज 'इतिहास समजून घ्या, काश्मीर फाईल्स पाहा’ म्हणणारे वैदिक/वैष्णवांच्या लबाडीचा इतिहास तेवढ्याच खुल्या मनाने समजून घेणार आहेत काय? राम-कृष्णादि त्या त्या कालातील प्रभावशाली व्यक्तींवर आपल्या पंथाची मोहोर उमटवण्यासाठी दशावतार नावाची अफलातून कल्पना सुपीक डोक्यातून निघाली. (हा खरा मास्टरस्ट्रोक) नेत्याला/श्रेष्ठीला आपल्या कळपात ओढले की अनुयायी पण ’मागुते येतात’ या न्यायाने ते पंथ वैष्णव पंथात विलीन झाले हे पाहायची यांची तयारी आहे का? या तर्काला महाराष्ट्राचे दैवत असलेला विठोबा हा भक्कम अर्वाचीन पुरावा आहे. त्याचा प्रथम पांडुरंग झाला, मग तो विष्णूचा अवतार ठरवून विठोबा-रखुमाईचा घोष चालू झाला. (अजूनही पंढरपुरात विठोबाशेजारी रुक्मिणी नाही. तेव्हा हे संक्रमण अजून पुरे झालेले नाही.) पदुबाई, तुळसा यांच्या मृत्यूभोवती भयानक कथा रचून त्यांना विठोबाच्या कथेतून बाहेर काढले गेले आहे. भरीला दरवर्षी तुलसीविवाह साजरा करुन खुंटा हलवून बळकट केला जातो आहे. गंमत म्हणजे दिंडीमध्ये ’विठोबा-रखुमाई’चा गजर करत जाणारे बहुजन समाजातील लोकही आंधळेपणे हा ’नवा इतिहास’ स्वीकारु लागले आहेत. या पलिकडे हिंदू म्हणवल्या जाणार्‍यांचा इतिहास दलित, अस्पृश्यांवरील अत्याचारांनी बरबटलेला आहे. त्यावरचे चित्रपट ’इतिहास समजून घ्या’ म्हणून या मुखंडांना दाखवले तर ते पाहणार आहेत का? त्यांना ’सरकारी जावई’ म्हणून हिणवणॆ हे थांबवणार आहेत का?

आता हे लिहिले की खुश होणारे आंबेडकरवादी, बौद्ध हे आदि शंकराचार्य पूर्व इतिहासच्या अभ्यासावर एखाद्या वैदिकाने काढलेला चित्रपट पाहतील, की आज हिंदुत्ववाद्यांचे विरोधक जसा विरोध करत आहेत तसा विरोध करतील? मुळात शंकराचार्यांना वैदिक धर्माच्या उत्थानासाठी ध्वजा हातात घ्यावी लागली त्याची कारणमीमांसा असलेले लेखन/चित्रपट अभ्यासायची त्यांची तयारी आहे का? अगदी इस्लाम वा तथाकथित सनातन धर्माइतकी व्यापक नसतील कदाचित- तरी बौद्धांनीही धर्मप्रसारार्थ केलेली कृत्ये 'निदान वाचू/पाहू तरी' म्हणून ते ऐकून घेणार आहेत का? आमचा झुंड नि तुमचा काश्मीर फाईल्स करत बसणारे हे लोक कुठल्या अर्थाने इतिहासातून प्रेरणा घेत आहेत?

आणखी एक मुद्दा म्हणजे इतरांनी चर्चेचे वर्तुळ ठरवावे नि मी फक्त प्रतिक्रिया द्यावी हे मला मान्य नाही. हे राजकारण, समाजकारणाबाबत जितके खरे आहे तितकेच कलेबाबतही. ’मन की बात’ करणे हा आपल्या देशात आता राजमान्य झालेला प्रकार आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत सर्वोच्च नेते कोणत्याही प्रश्नांना सामोर जात नाहीत, स्वत:ला जनतेप्रती उत्तरदायी मानत नाहीत. इतरांच्या पत्रकार-परिषदा याही खुर्चीवर बसून दिलेले भाषण स्वरूपाच्या आहेत. त्यामुळॆ ’यथा राजा तथा प्रजा’ या न्यायाने मी ही त्याच भूमिकेत गेलो आहे.

जोवर ते माझ्या दृष्टिकोनाची दखल घेत नाहीत तोवर मी इतरांच्या मुद्द्यांवर, दृष्टिकोनाबद्दल बोलणार नाही. तेव्हा भारतकुमार २.० अक्षयकुमार असो, विवेक अग्निहोत्री असो की कंगना राणावत, यांच्या भूमिकेचा (मी वैचारिक हे विशेषण वापरलेले नाही!) प्रतिवाद करण्याचा वा त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्नही करणार नाही. ही मंडळी वा त्यांच्या कलाकृती तितपत महत्वाच्या आहेत असे मला वाटत नाही.

- oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा