सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

मी लक्षाधीश

महिनाअखेरीस मी ब्लॉगचा मेन्टेनन्स करत असतो. आधीच प्रसिद्ध केलेल्या लेखांना अनुरूप चित्रे वा व्हिडिओ सापडले असतील तर ते जोडणे, कुठे फॉरमॅटिंगचा घोळ झाला असेल तर (विशेषत: मोबाईल थीममध्ये) तो निस्तरणे, काही अप्रकाशित लेखांवर नजर टाकून ते पुरे करण्यास अधिक माहिती सापडली आहे का, त्यातील काहींना एकत्र करता येईल का? याचा धांडोळा मी घेत असतो.

IConquered

हे करत असताना एकुण ब्लॉगच्या वाटचालीचा अंदाज घेण्यासाठी मी ब्लॉग-स्टॅटिस्टिक्सही पाहतो. यावेळी असे लक्षात आले की जुलै महिन्यात कधीतरी ’रमताराम’ या ब्लॉगची एकुण वाचनसंख्या एक लाखांचा टप्पा पार करुन गेली आहे. सुरुवातीच्या काळात अर्थातच संथ असलेली प्रगती एकट्या जुलैमध्ये चार हजारहून अधिक वाचनांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षभरातच १४ हजार वाचने झालेली दिसली.

महिन्यापूर्वी पसारा-आवर योजनेअंतर्गत माझ्या एका स्तंभाचा जो स्वतंत्र ब्लॉग होता तो मी रमताराममध्ये विलीन केला. त्याची अर्थातच वेगळी पब्लिसिटी करण्याचा प्रश्न नव्हता. जुन्या, मूळ तारखांनाच ते लेख इथेही प्रकाशित झाले होते. परंतु महिन्याभरातच त्याच्या पहिल्या भागाने २०० वाचनांचा टप्पा ओलांडला! पुढचे लेखही टप्प्याटप्प्याने वाचले जाताना दिसत आहेत.

बारा वर्षे लिहित असलेला ब्लॉग जरी सुरुवातीच्या काळात केवळ हौस म्हणून अधूनमधून लिहित होतो, तिथे फारसा सक्रीय नव्हतो. पण गेल्या सात-आठ वर्षांत त्याकडे लेखनाचे प्रमुख माध्यम म्हणून गांभीर्याने पाहिले आहे. त्यासाठी केलेला सारा प्रवास ’माझी ब्लॉगयात्रा’ या मालिकेमध्ये नोंदवून ठेवला आहे.

लेखनाची प्रसिद्धी ही बव्हंशी स्वावलंबी स्वरूपाची (क्रॉस-सेलिंग, इन-पोस्ट रेकेमेंडेशन्स) होती. फेसबुकवरही पुरा लेख न टाकता फक्त लिंकच देण्याची माझी पद्धत आहे. यात भर म्हणजे एक मित्र मागे म्हणाला तसे, ’तुम्ही पाच मैल लिहिता. एवढं कोण वाचणार’ हा ही एक मुद्दा असतोच. त्यामुळे अनेक मंडळी फेसबुकवर लाईक करुन मोकळे होतात. क्लिक करुन लिंक उघडण्याचा प्रयत्न करत नसावेत. त्यामुळे लाईक्स चाळीस (स्वगत: काळे, खरं सांगा दहा-पंधराच्या वर कधी गेली होती का?) आणि त्यावेळी वाचने चार-पाच असा प्रकार दिसतो. परंतु ब्लॉग-अग्रेगेटर्सवर लेखाची लिंक पडली की वाचनांचा वेग वाढत जातो असे दिसते. एकुणात फेसबुकपेक्षा ब्लॉग अग्रेगेटर्स अधिक उपयुक्त आहेत असा निष्कर्ष निघतो आहे. एकुण चारशेच्या आत-बाहेर पोस्ट/लेख पाहता सरासरी वाचने अडीचशेच्या आसपास होतात. माझ्या लेखनाच्या जातकुळीचा विचार करता मी त्यावर नक्कीच समाधानी आहे.

पण एरवी बारा वर्षांत एक लाख ही फार वाचनसंख्या नव्हे. परंतु ब्लॉगचे विषय पाहू गेले तर यात चलनी नाणी असणारे कविता, हिंदी चित्रपट, भटकंती, कौटुंबिक गोष्टी, फोटो, हे हुकमी विषय नाहीत. टीआरपीवाला म्हणता येतील असा राजकारण हा एकच विषय माझ्याकडे आहे आणि तो ही विश्लेषणाकडे अधिक झुकलेला. पण एकुण ब्लॉगलेखनात त्याचा सहभाग १०% देखील नाही. थोडीफार थट्टा, भंकस करत असलो तरी त्याचेही प्रमाण १-२% हून अधिक नसेल.

मला विषय घेऊन लेख लिहिण्यापेक्षा माझ्या आकलनाला लेखनाचे स्वरूप द्यायला आवडत असल्याने शब्दसंख्येची मर्यादा जाचक वाटते. सारे आनुषंगिक मुद्दे घेतल्याखेरीज मला लेखन अपुरे वाटते. यातून तयार झालेले मैलभर लेख छापणे वृत्तपत्रांना परवडत नसते. त्यामुळे अनेकदा मी ते ’द वायर-मराठी’ साठी सुजय शास्त्रीकडे किंवा ’अक्षरनामा’साठी राम जगतापकडे धाडून मोकळा होतो. त्यामुळे अजून मी वृत्तपत्री लेखक नसल्याने त्या प्रसिद्धीबरोबर जमा होणारी चाहती मंडळीही नाहीत.

याखेरीज मी लेख शेअर करताना कुणालाही टॅग करत नाही, की कुणाला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवतही नाही. अपवाद मधली दोन वर्षे फेसबुकवर नसतानाचा. तेव्हा निवडक आठ-दहा मित्रांना मी लिंक्स पाठवत असे. आताही आनंद मोरे, सौरभ महाडिक या दोघा मित्रांना आणि फेसबुकवर नसलेल्या एका चिकित्सक मैत्रिणीला पाठवतो. पण तो प्रसिद्ध करण्यापूर्वी, पूर्वावलोकनासाठी, दुरुस्त्या सुचवाव्यात म्हणून.

या सार्‍याचा विचार करता एक लाख वाचनांचा टप्पा माझ्या दृष्टीने मोलाचा आहे. ब्लॉगला रीच नसतो, पुरे लेखन फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपला पाठवले नाही तर फार पोचत नाही म्हणणार्‍यांना हे सडेतोड उत्तर आहे असे मला वाटते.

- oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा