शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

तीन भूमिका (पूर्वार्ध) : बाजूबद्धता, तटस्थता आणि वस्तुनिष्ठता

(वस्तुनिष्ठता हा खरंतर objective इंग्रजी शब्दाचा अपुरा अनुवाद आहे. पण आता प्रचलित झाला आहे, मराठी नि हिंदीतही. त्यामुळे इथे मी तोच वापरला आहे. )

आदिम काळात माणूस टोळ्यांच्या वा कळपांच्या स्वरूपात राहात होता. त्या काळातील मानसिकतेचा पगडा माणसाच्या मनावर अजून शिल्लक राहिलेला आहे. त्या काळी ’टोळी नसलेला माणूस’ ही संकल्पनाच माणसाला मानवत नव्हती. तसेच आजही बाजू नसलेली, तटस्थ वा वस्तुनिष्ठ विचाराची, स्वतंत्र भूमिकेची व्यक्ती अस्तित्वात असते यावर बहुसंख्येचा विश्वास नसतो. ’ती कोण आहे?’ यापेक्षा ’ती कोणत्या गटाची आहे?’ या प्रश्नाच्या उत्तराचा मागोवा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ’त्या व्यक्तीची वैय्यक्तिक ओळख काय?’ हा प्रश्नच त्यांच्यासमोर नसतो. ती कोणत्या गावाची, घराण्याची, जातीची, धर्माची आहे या प्रश्नांच्या उत्तरांतूनच समोरच्या व्यक्तीची ओळख करुन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हे सारे गट जन्मदत्त असल्याने प्रत्येक व्यक्तीला आपातत: मिळालेले असतातच. त्यामुळे त्यातून त्या व्यक्तीची ती एक ओळख गृहित धरणे नेहमीच शक्य होते.

PenguinsBeLike

एखादा प्राणी नीलगाय म्हणून वा हरिण म्हणून जन्माला येतो तेव्हा ’कळपातील एक’ एवढीच त्याची ओळख असते. त्या पलिकडे, त्या कळपात वा बाहेर, त्याची वेगळी ओळख नसते. त्याचे कारण म्हणजे त्याचे म्हणावे असे वैशिष्ट्य वा वेगळेपण त्याच्याकडे नसते. पेंग्विन्सचा कळप पाहिला तर एका पेंग्विनहून दुसरा वेगळा ओळखणे जवळजवळ अशक्यच असते, इतके ते एकसारखे दिसत असतात. बहुसंख्य मनुष्यप्राण्यांचा विचारही तसाच असतो.

विकसित समाजामध्ये मात्र जन्मदत्त कळपाखेरीज ती व्यक्ती कोणत्या राजकीय पक्षाची, कोणत्या सामाजिक विचाराची, कोणत्या बुवा-बाबाची भक्त आहे यावरुनही तिचा गट निश्चित होत जातो. तसा तो तुम्हाला करावाच लागतो. अन्यथा तुम्हाला लोक एकतर आपल्या गटात गृहित धरून टाकतात किंवा त्यांच्या गैरसोयीच्या अशा तुमच्या एखाद्या भूमिकेच्या प्रतिवादाच्या सोयीसाठी तुम्हाला त्यांच्या समोरच्या, विरोधी गटाचे ठरवून टाकतात. त्यानंतर त्या गटाच्या - त्यांच्या मते असलेल्या - चुकांची, दोषांची, पापांची जबाबदारी तुमची समजून तुम्हाला जाब विचारत राहतात. यांच्याशी होणार्‍या चर्चेमध्ये, संवादामध्ये, वादामध्ये तुमची स्वत:ची अशी स्वतंत्र असलेली भूमिका कधी येतच नाही. याचे कारण वाद-विवाद वा संवाद हा एका गटाच्या भूमिकेला अनुसरूनच करायचा असतो असा यांपैकी बहुतेकांचा समज असतो. आणि त्यामुळे बहुतेक वेळा त्या संवादाचा निवाडा होतच नसतो.

या अशा बाजूबद्ध समाजामध्ये तटस्थता नि वस्तुनिष्ठता या दोन भूमिकांची बहुसंख्येला समजही नसते. ’तटस्थ म्हणवणारी व्यक्ती ही प्रत्यक्षात कुठल्या तरी बाजूची आहे, फक्त ती तसे जाहीर मान्य करत नाही’ असा त्यांचा ठाम समज असतो. त्याचबरोबर वस्तुनिष्ठ विचार करणार्‍या व्यक्तीने एकदा केलेली निवड ज्या बाजूला वा गटाला धार्जिणी दिसते, तीच त्याची कायमची बाजू, तोच तिचा कायमस्वरूपी गट आहे, असा ग्रह करुन घ्यायलाही त्यांना आवडते. त्यामुळे अन्य संदर्भात त्या व्यक्तीने केलेली निवड, कुठल्या अन्य गटाला वा बाजूला धार्जिणी दिसली, की त्यांना त्यात दुटप्पीपणा दिसू लागतो. वैचारिकदृष्ट्या आळशी असलेल्या या गटनिष्ठ व्यक्ती मग अशा सारासारविवेकाला प्राधान्य देऊन जगणार्‍या, कोणत्याही गटाची ताबेदारी न स्वीकारलेल्यांना वैचारिकदृष्ट्या भोंगळ समजू लागतात... कारण त्यांच्या स्वत:च्या वैचारिक आळसाला ते सोयीचे असते!

अशा समाजामध्ये एखादा मुद्दा, प्रसंग, प्रश्न यांच्यसंदर्भात प्रत्येकाच्या आकलन वा निवाड्याच्या आधारे बाजू तयार होऊन गट पडत नाहीत. कोणत्याही प्रश्नावर, मुद्द्यांवर, निवाडा-निष्कर्षावर आपले मत हे आधीच निश्चित केलेल्या आपल्या गटाला अनुसरूनच असावे लागते. अशा प्रश्नांची उत्तरे, मुद्द्यांचे निराकरण आणि त्यासंबंधी निष्कर्ष-निवाडे हे त्या-त्या गटाचे मुखंड अथवा नेते करत असतात, आणि उरलेला गट त्यांच्या हाताला हात लावून मम म्हणत असतो.

आता हे मुखंड काही विशेष गुणवत्ता वा लायकी दाखवून तिथे पोहोचलेले असतात असेही नाही. माणसाच्या अंगी असलेली विविध कौशल्ये, गुणवत्तेचे आयाम सुतरामसुद्धा नसलेल्या प्राण्यांमध्ये नेतृत्वाचा प्रश्न केवळ बळाने सोडवला जातो. माणसांच्या कळपातही परिस्थिती फार वेगळी नसते. फरक इतकाच की निव्वळ शारीरबलापलिकडे माणसांच्या दिमतीला संपत्ती, बुद्धी, तंत्रज्ञान, गवगवा आणि सर्वात प्रभावी म्हणजे बहुसंख्या यांसारखी अन्य बलेही असतात.

या अन्य बलांच्या साहाय्याने धुरिणत्व प्राप्त केलेले हे नेते, हे मुखंड, त्या त्या प्रश्नाशी, मुद्द्याशी निगडित साधकबाधक विचार करतील याची शाश्वती नसते. त्यांचे नेतृत्व हे गुणवत्तेऐवजी बलाने प्रस्थापित झालेले असल्याने, कदाचित त्यांच्याकडे ते कौशल्य वा ज्ञान नसतेच. आणखी एक शक्यता म्हणजे त्यांना तिथे प्रस्थापित करणार्‍यांच्या अथवा स्वत:च्या सोयीसाठी त्यांना योग्यायोग्यतेऐवजी स्वार्थानुकूल भूमिका घ्यावी लागते. आणि त्यानंतर त्यांच्या गटातील इतर तीच भूमिका अनुसरत जातात.

आता या अनुचरांनाही गटातील धुरिणांनी घेतलेली ती भूमिका कदाचित न पटणारी असू शकते. परंतु तरीही तीच योग्य हा दुराग्रह ते इतरांसमोर- विशेषत: विरोधी गटांतील व्यक्तींसमोर- धरत असतात. कारण बहुतेकांच्या आयुष्यात सारासारविवेकबुद्धीऐवजी गट-बांधिलकीला अधिक प्राधान्य असते. अभ्यास-अनुभव-आकलन यांच्या आधारे योग्यायोग्यतेचा निवाडा करण्याऐवजी माणसे गटाच्या धुरिणांनी दिलेला पर्याय, निवाडा वा निर्णय स्वीकारून मोकळे होत असतात. त्यानंतर त्यांचे डोके फक्त तो योग्य कसा हे सिद्ध करण्यापुरतेच चालत असते. इथे वस्तुनिष्ठतेचा अभाव प्रकर्षाने दिसतो.

तटस्थता आणि वस्तुनिष्ठता या दोन वेगळ्या बाबी आहेत. तटस्थता ही प्राय: निष्क्रिय असते, तर वस्तुनिष्ठता ही सारासार विवेकबुद्धीचा वापर करुन क्रियाशील निर्णय घेणारी असते. तटस्थता ही बाजू घेत नाही. तटस्थता ही कायमस्वरूपी भूमिका म्हणून स्वीकारणे शक्य आहे. माणूस सदासर्वकाळ बाजूबद्धही राहू शकतो- बहुतेक माणसे तशीच असतात. परंतु एका समाजाचा भाग असलेला माणूस सदोदित वस्तुनिष्ठ राहू शकत नाही. संस्कार, जमाव-दबाव आणि सत्ता-दबाव यापुढे झुकून त्याला प्रसंगी बाजूबद्धता किंवा तटस्थता हीच भूमिका म्हणून स्वीकारावी लागते.

इतर दोन गटांतील व्यक्तींच्या तुलनेत वस्तुनिष्ठ व्यक्तीचे वेगळेपण असे की अधिक माहिती, अधिक ज्ञान, अधिक आकलन आणि बदलती परिस्थिती यामुळे एकाच प्रकारच्या प्रश्नाबाबत, निवडीबाबत, मुद्द्याबाबत वेगवेगळ्या प्रसंगी ती व्यक्ती वेगवेगळी भूमिका घेऊ शकते. त्यामुळे ती वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या मुद्द्यांवर परस्परविरोधी बाजूंना दिसू शकते. परंतु ज्यांना त्यामागची कारणमीमांसा ज्यांना उलगडत नाही, अशा विचारविन्मुख लोकांना तो दुटप्पीपणा वाटू शकतो. त्यातून त्या व्यक्तीला चंचलतेचा, धरसोड वृत्तीचा, सर्व बाजूंना खुष करण्याचा म्हणजे कणाहीनतेचा आरोप सहन करावा लागतो. किंवा अशी व्यक्ती ’गावाचं एक नि या गावंढ्याचं दुसरंच असतंय’ म्हणून झटकून टाकली जाते.

IamNotWithThem

तटस्थतेचा प्रत्यक्ष(!) फायदा नसतो तसा प्रत्यक्ष तोटाही. कारण ती कुठलीच जबाबदारी घेत नाही. तिच्यात नेमकेपणाचा अभाव असतो. अपवादात्मक प्रसंगी तटस्थता निवडीमध्ये सहभागी नसूनही ठोस भूमिका असते. क्वचित तसे जाहीर करणे हाच विशिष्ट भूमिकेला वा मुद्द्याला नोंदवलेला विरोध असू शकतो. सोबत जोडलेला फोटो पाहा. पण हा अपवादच म्हणायचा.

वस्तुनिष्ठतेमध्ये नेमकेपणाला साधण्यासाठी अभ्यास, अनुभव नि आकलन यांना महत्त्व असते. त्यांच्या आधारे घेतलेला केलेली निवड वा घेतलेला निर्णय हा विचारांती घेतलेला असल्याने त्याची जबाबदारीही स्वीकारावी लागते. पण नेमकी हीच गोष्ट बहुसंख्येला नकोशी वाटत असते. त्यामुळे जिथे हा निर्णय आयता मिळतो, अशा एखाद्या गटाशी बांधिलकी स्वीकारून ते विचारांचे इंद्रिय बंद करून टाकतात.

ही बाजूबद्ध मंडळी विचारहीन असतील तर सुखी असतात. पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्यात निर्णयक्षमता जिवंत असेल, तर आपली भूमिका नि आपल्या बाजूची भूमिका यातील अंतर्विरोधांचा सामना त्यांना करावा लागतो. त्यातून निर्माण होणारा संभ्रम त्यांना घेरून राहातो. तटस्थतेने मुद्द्यावर बाजूच न निवडल्याने, निर्णयाची कोणतीच जबाबदारी नसते. तर वस्तुनिष्ठतेला निर्णय घेतल्यावरही 'एखादे अनुषंग तपासायचे राहिले का, त्यामुळे आपला निर्णय वेगळा असू शकला असता का?’ हा संभ्रम शिल्लक राहातो.

तटस्थता केवळ प्रासंगिक भूमिकाच असू शकते. त्यात सातत्य असले, की ती घेणार्‍याची विश्वासार्हता संपुष्टात येते किंवा ती अदखलपात्र होऊन राहते. त्याचप्रमाणे केवळ बाजूंचा विचार करणार्‍या गटांमध्ये वस्तुनिष्ठ भूमिका घेणार्‍याची विश्वासार्हताही संपुष्टात येते. कारण त्यांना 'हा/ही आपल्या गटाची की दुसर्‍या?’ याचे ठोस उत्तर न मिळाल्याने ते त्याच्यापासून दूर राहू लागतात. तेव्हा वेगवेगळ्या कारणाने का होईना, पण तटस्थता आणि वस्तुनिष्ठता ही दोन्हीही बाजूबद्ध समाजात उपरीच ठरतात.

वस्तुनिष्ठ राहू इच्छिणार्‍याला कायमच एकीकडे भूस्खलनप्रवण डोंगर नि दुसरीकडे खोल दरी यांच्या दरम्यान असलेल्या अरुंद रस्त्यावर चालावे लागते. अभ्यास-अनुभव-आकलन यांच्या आधारे केलेली कारणमीमांसा आणि त्याआधारे घेतलेली भूमिका समजून घेण्यासाठी कष्ट करण्याची बहुसंख्येची मानसिकता नसते. त्यामुळे त्याची ती भूमिका कुठेच वाखाणली जात नसते. ज्याला इंग्रजीत thankless job म्हणतात तशी ही भूमिका असते. सदोदित true-to-the-cause राहण्यासाठी संघर्षप्रवण राहायचे की बाजूबद्धतेमधील सुरक्षितता निवडायची हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.

- oOo -

पुढील भाग >> तीन भूमिका - २ : वस्तुनिष्ठता - तीन उदाहरणे


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा