तीन भूमिका - १ : बाजूबद्धता, तटस्थता आणि वस्तुनिष्ठता << मागील भाग
---
एखादा प्रश्न किती लोकांच्या मनात निर्माण झाला याला तसे फारसे महत्त्व नाही. उलट एकाच वेळी अनेकांच्या मनात जर एखादा प्रश्न निर्माण झाला, तर तो तितकासा महत्त्वाचा नसण्याची शक्यता अधिक. कारण मोलाचा प्रश्न एखाद्याच्याच मनात निर्माण होऊ शकतो. आता तू म्हणतोस त्याप्रमाणे हा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण होऊनही त्यांनी त्याचा उच्चार केला नाही, याचा अर्थ असा की त्या प्रश्नाचं उत्तर जन्माला घालण्याचं स्वातंत्र्यही त्यांनी स्वतःजवळ सुरक्षित ठेवलं आहे.
(गौतमीपुत्र कांबळे यांच्या 'परिव्राजक' या कथेमधून)
तटस्थता म्हणजे काय हे बहुसंख्येला समजते. बाजूबद्धता वा गट-बांधिलकी तर इतकी महामूर आहे की त्याबाबत अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. परंतु 'वस्तुनिष्ठता म्हणजे काय?' याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ असतो. त्याची भाषिक वा तार्किक व्याख्या नक्कीच करता येईल, पण त्याने आकलनात फार भर पडेल याची शक्यता कमीच आहे. त्याऐवजी, ढोबळमानाने म्हटले तर गट-विचार न करता, पूर्वग्रहांना दूर ठेवून केवळ समोरच्या प्रश्नाच्या अंगे, उपांगे, अनुषंगे आणि संदर्भ यांच्या आधारे केलेला निर्णय हा वस्तुनिष्ठपणे घेतलेला असू शकतो. यातून अस्तित्वात असलेल्या गट अथवा बाजूंपैकी एकाच बाजूला सतत धार्जिणे राहण्याची शक्यता कमी होते.
सोप्या शब्दांत सांगायचे तर प्रत्येक बाजूचे, प्रत्येक संभाव्य निवडीचे बरे नि वाईट अशा सार्या परिणामांची जंत्री मांडून त्यांच्या आधारे एकप्रकारे गणिती ताळा मांडावा लागतो. त्यातून ज्या बाजूचा ताळेबंद अधिक शिलकीचा अथवा कमी तोट्याचा दिसतो, त्याची निवड करावी लागते. त्यासाठी प्रत्येक बाजूची अनुषंगे नीट समजून घ्यावी लागतात. आणि यात वैय्यक्तिक आवडीलाच निवडीचे रूप मिळणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते.
आपल्याला हवा तोच निर्णय यावा, आपल्याला हवी तीच बाजू जिंकावी म्हणून केलेली मांडणी वस्तुनिष्ठ नसते. समोरच्या ग्राहकाला फसवण्यासाठी दुकानदाराने तागडी एका बाजूला बळाने झुकवावी तशी असते. तिला अभ्यासपूर्ण निवडीचा दर्जा देता येत नसतो. त्यातून अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगी एकाच बाजू वा गटाच्या बाजूने, विरोधात वा तटस्थ अशी प्रासंगिक निवड होऊ शकते. यातील एकच निवड सातत्याने होत राहिली तर तुमचा निर्णय, निवाडा वा मुद्दा हा biased म्हणजे पक्षपाती आहे हे गृहित धरायला हरकत नाही.
तीन उदाहरणांच्या साहाय्याने थोडे विवेचन करुन हा मुद्दा स्पष्ट करण्याच्या प्रयत्न करतो.
मध्यंतरी ’कन्यादान’ विधीवरून समाजमाध्यमांत थोडा गदारोळ झाला होता. त्यानंतर त्या विधिबाबत एक पान शेअर करण्यात आले होते. ज्यात एक विधान असे होते, ’मुलीचे वडील आता वराला म्हणतात की या माझ्या मुलीवर आजपासून माझी काहीही सत्ता नाही.’ ते विधान मला अर्थातच आक्षेपार्ह वाटले.
जन्मदात्या बापाची मुलीवर सत्ता असते? टोळीव्यवस्थेकडून स्थिर अशा समाजाकडे संक्रमण होताना माणसांमध्ये निर्माण झालेल्या खासगी मालमत्तेची कल्पना वस्तुमात्रांना लागू झाली, तशीच स्त्री-दासांनाही. वास्तविक आता स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रिसूत्री आधुनिक जगात रुजल्यावर, त्या व्यवस्थेचा शोषक अवशेष असलेला हा विधी रद्दबातल व्हायला हवा. परंतु आपल्याहून अज्ञानी अशा पूर्वजांच्या परंपरा सोडताना परंपराप्रेमी माणसाची घालमेल होत असते. त्यामुळे होता होईतो त्या न सोडता, उलट त्या अर्वाचीन विचाराशी सुसंगत कशा आहेत हे सांगण्याचा त्याचा आटापिटा चालू असतो.
एक-दोघांनी असा युक्तिवाद केला होता की ’माझ्या मुलीला हवे असेल तरच मी तो विधी करेन.’ त्यांच्या मताचा आदर राखून मी त्याच्याशी संपूर्ण असहमती नोंदवतो आहे. एखाद्याला 'स्वत:हून गुलाम होऊन राहायचे असेल तर मी त्याचा मालक म्हणून वागायला तयार आहे’ या विधानासारखे आहे हे. एकदा ते मान्य झाले की ’संस्कारातून’ (संस्कार आणि ब्रेन-वॉशिंग यात फारच पुसट फरक असतो) त्या व्यक्तीला गुलाम होण्याकडे, किमान ’मी स्वत: माझ्या इच्छेने याचा गुलाम झालो’ हे जाहीरपणे कबूल करायला लावण्याची सोय करता येतेच. एका व्यक्तीचे वस्तुकरण करणारा हा विधी माझ्या बुद्धीला साफ अमान्य आहे. त्यामुळे या प्रसंगी ’कन्यादान’ हा विधी सर्वस्वी त्याज्य असावा असा माझा निर्णय झाला.
दुसरे उदाहरण आहे एका पुरोगामी विचारवंतांनी आपल्या मुलाची मुंज केल्याचे. एका पुरोगामी गटाने त्यांच्यासोबत असलेल्या उरलेल्या सार्या सहमतीला बुडवून, त्या एकाच ’पापा’बद्दल त्यांना थेट प्रतिगामी ठरवून टाकले आहे.
मुंज हा मुद्दा असेल, तर गृहकार्य या दृष्टीने इथे ते विचारवंत आणि त्यांची पत्नी असे माझ्या मते दोन पक्षधर आहेत. एकाचे मत मुंज व्हावी असे आहे, तर दुसर्याचे नको असे आहे. आणि निर्णय कोणताही घेतला, तरी एका व्यक्तीवर अन्याय होणारच असतो. आयुष्यात बहुतेक निर्णय असेच असतात. निर्विवाद निर्णय फक्त आणि फक्त वैय्यक्तिकच असू शकतात किंवा मालक-गुलाम संबंधातच असू शकतात. हा तिढा त्यांच्या पत्नीला सोयीचा निर्णय घेऊन सुटला. यात त्या मुद्द्यापुरता त्यांच्या विचाराचा पराभव झाला असला, तरी त्याने त्यांचे उरलेले सर्व विचार थेट बुडित जाऊन शून्य होतात हा बाष्कळपणा आहे असे माझे मत आहे. शिवाय त्याचवेळी व्यक्तिस्वातंत्र्य हे पुरोगामी मूल्य त्यात जोपासले गेले आहे असे माझे मत आहे.
आपल्याला श्रेष्ठ असे काहीतरी समजले आहे, नि ते इतरांवर- सर्वात आधी कुटुंबियांवर - लादणे, हे पुरोगामित्व असूच शकत नाही असे माझे ठाम मत आहे. पुरोगामित्व हे वैचारिक असते, कृती व्यावहारिक बंधनांनी जखडलेली असते. ती विचारांना नेहमीच अनुसरते असे नाही. शिवाय अंमलबजावणीचा प्रश्न येतो, तेव्हा एकाहुन अधिक सहभागी व्यक्तींच्या विचारांचा, कलाचा, हिताऽहिताचा विचार करावाच लागतो. कायम एकाच बाजूला प्राधान्य देणारी व्यवस्था शोषकच असते.
यात आणखी एक मुद्दा महत्वाचा. मुंज या विधीमध्ये कोणत्याही शोषणाचा, वर्चस्ववादी वारशाचा अंतर्भाव नाही. आपले मूल हे स्नातक म्हणून गुरुहाती सोपवणे, त्याला एकप्रकारे निरोप देणे, इतपतच त्याचा अर्थ आहे. इथे त्याच विचारवंतांच्या मुलीच्या लग्नातील कन्यादान विधीचा मुद्दा असता, आणि त्यांनी तिथे माघार घेतली असती, तर मी व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा नावाजूनही तो विधी केल्याबद्दल त्यांची निंदा केलीच असती. मुंजीबाबत ती करण्याची माझी तयारी नाही.
'मुंज ही फक्त त्रैवर्णिकांतच होते, स्त्रियांची होत नाही सबब ती विभाजनवादी आहे' हा दावा चुकीचा आहे. विभाजनवादी आहे तो नियम, विधी नव्हे! त्यामुळे उद्या एखादा बाप म्हणाला, ’माझ्या मुलीची इच्छा असेल तर मी तिची मुंज करेन.’ तर मी त्याचे स्वागतच करेन. सनातनी व्यवस्थेने तो हक्क नाकारलेल्या पूर्वास्पृश्यांमध्येच कुणाला आपल्या मुलाची मुंज करावीशी वाटली, आणि त्यासाठी तो लढा देणार असेल, तर मी त्याच्या सोबत असेन.
पण मुळात त्याने तसे त्याने करावे का? या प्रश्नाला माझे उत्तर नकारार्थी आहे. कारण ’ही कर्मकांडे अनावश्यक मानून सोडून द्यावीत’ असे माझे वैय्यक्तिक मत आहे. परंतु नास्तिकता लादणे आणि धर्मांतर्गत समतेचा आग्रह या दोनपैकी दुसर्या पर्यायामध्ये पुरोगामित्वाचा अंश अधिक आहे असे मी मानतो. अर्थात तो अंतिम थांबा असू शकत नाही.
आणि मुंजीबद्दल माझी समज चुकीची असेल आणि त्यात काही अन्यायकारक, विषमतामूलक आढळले, तर मी त्याचाही विरोध नक्कीच नोंदवेन. अधिक माहिती, अधिक ज्ञान झाल्यावर निर्णय पुन्हा तपासून पहावा, आवश्यक वाटल्यास बदलावा, हा ही ज्ञानमार्गाचा आणि पर्यायाने पुरोगामित्वाचा अविभाज्य भाग असायला हवा.
तिसरे उदाहरण माझे वैय्यक्तिक आहे. वर्षभरापूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे दिवस घालावेत का याचा निर्णय मी आईवर सोपवला होता. ते करावेत असा तिचा निर्णय होता. दिवस घालणे हे आत्मा नि पारलौकिकाच्या आधारे उभे राहिलेले कर्मकांड आहे. हे दोन्हीही माणसाच्या मनातून तयार झालेले काल्पनिक व्यूह आहेत असे माझे मत आहे. यात कुठे थेट शोषण मला दिसत नाही. (जमाव-दबाव हा मुद्दा अंमलबजावणीशी संबंधित आहे, विधीशी नव्हे.) काल्पनिक गोष्टींसाठी चार भातांचे पिंड करुन ते नदीत वाहवल्याने कोणताही अन्याय वा शोषण होते, असे मला वाटत नाही. त्यामुळे ते करण्यास माझी हरकत नव्हती. माझ्या सुदैवाने मला भाऊ असल्याने ते विधी त्याने केले. पण मी एकटा असतो तरीही गमावलेल्या माणसासाठी नव्हे, पण जिवंत व्यक्तीच्या इच्छेखातर मी केले असतेच.
परंतु आईच्याबाबत मात्र तिने जिवंतपणी ती इच्छा बोलून दाखवली असेल, तरीही तिच्या माघारी मी ते करणार नाही. कारण मी जडवादी असल्याने, तिच्या जड देहाबरोबरच तिचे अस्तित्व माझ्या दृष्टीने संपुष्टात येते. तिच्या माघारी ती कर्मकांडे करण्याने कुणाही जिवंत माणसाचे समाधान मी करणार नसतो. आणि जिचे आयुष्य संपले, माती झाली तिला माझ्या कृतीने खेद वा संतोष होण्याचा प्रश्नच उद्भवत नसतो.
तीनही उदाहरणांबाबत थोडक्यात सांगायचे तर:
- माझ्या मुलीने कन्यादानाचा आग्रह धरला तर तो मी साफ नकार देईन.
- मुलाने मुंजीचा आग्रह धरला तर त्यात आनंदाने सहभागी होईन.
- आणि श्राद्धाचा आग्रह केवळ जिवंत माणसाच्या इच्छेखातर नाईलाजाने मान्य करेन.
हे तीनही निर्णय माझ्या आजच्या आकलनानुसार आणि प्राप्त परिस्थितीनुसार घेतलेले असतील. परिस्थिती बदलली, माझे आकलन बदलले, अधिक माहिती हाती आली, तर ते बदलू शकतात हे मान्य करुनच अंमलात आणायचे असतात हे मी विसरणार नाही. कालचा निर्णय आज सकारण चुकीचा वाटतो हे लाजत नव्हे तर अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे. कारण कालच्यापेक्षा आज आपले ज्ञान अधिक आहे याचे ते निदर्शक असते.
या तीनहीमध्ये ’अख्खी ब्राह्मणी व्यवस्थाच शोषक आहे. नि तुम्ही थोडे असे नि थोडे तसे करत अप्रत्यक्षरित्या तिचे समर्थन करता.’ हा तर्क मी हास्यास्पद मानून उडवून लावतो. प्रत्येक व्यवस्था- अगदी मार्क्सच्या समतावादी तत्त्वज्ञानावर आधारित व्यवस्थादेखील, शोषणाचे उपांग घेऊनच उभी असते. त्यातील केवळ न्यूने दाखवून संपूर्ण व्यवस्था शोषक म्हणणे अगोचरपणाचे आहे. बहुसंख्य मंडळी स्वीकारलेली व्यवस्था वा गट यांच्या संदर्भात नेमके असेच करत असतात.
आपल्या गटाचे गुण तेवढे प्रातिनिधिक मानावेत नि विरोधी गटाचे अवगुण प्रातिनिधिक मानावेत हा दुराग्रह या भूतली प्रत्येक बाजूबद्ध असलेल्या व्यक्तिचा असतो असे म्हटले तर ते फार टोकाचे होईल असे मला वाटत नाही. अमक्या व्यवस्थेत अधिक वाईट गोष्टी आहेत, तमकीमध्ये कमी आहेत हे विधान पूर्वग्रहनिदर्शकच असते. जगातील सर्व स्पर्धक व्यवस्थांचा संख्याशास्त्रीय अभ्यास करुन चांगल्या वाईटाची गणना कोणीही केलेली नाही, करता येणारही नाही. आपल्या पूर्वग्रहाला अनुकूल असणार्या गोष्टी आपल्याला अधिक ठळक दिसतात नि त्यांची जंत्री जमा करत आपण त्यांना अधिकाधिक बळकट करत नेतो इतकेच.
प्रत्येक व्यवस्थेमध्ये काही त्याज्य, काही चालवून घेण्याजोगे, काही निरर्थक असूनही साजरे करण्याजोगे असते. तारतम्याने, डोळसपणे, अधिकाधिक माहिती घेऊन त्याच्याआधारे निवड करायची असते. त्यामुळॆ त्यातील एक निवडले म्हणजे मी त्या पुर्या व्यवस्थेचे समर्थन करतो, नि एक नाकारले म्हणजे तिचा विरोध करतो हे दोनही तर्क हास्यास्पद आहेत. एका हातात झेंडा नि दुसर्या हाती धोंडा घेतलेल्या विचार-आळशी लोकांचे आहेत..
याच्याविरोधात एक अंतिम तर्क येतो तो सामान्यतेचा. ’तुम्हाला हे जमेल हो, सामान्यांना जमेल का? एकदा एक स्वीकारले की त्यासोबत उरलेले अन्यायकारक, शोषक अनुषंगही ते स्वीकारत जातील ना?’
ही तर्कसंगती योग्य आहे! पण माझे त्यावर उत्तर असे आहे, की ही माझी निवड आहे. इतरांची तीच असावी असे नाही. सर्वांनी माझ्याच पद्धतीने जावे असा माझा आग्रह नाही, असूही नये. मी काही ’जगाच्या कल्याणा आदर्श व्यवस्था’ निर्माण करण्याचा चंग बांधलेला प्रेषित नाही. माझ्या साधकबाधक बुद्धीने मी निवड करत जाईन, तुमच्या साधकबाधक बुद्धीने तुम्ही निवड करा. तुमची निवड माझ्यापेक्षा वेगळी असली म्हणून तुम्ही माझे शत्रूच काय विरोधकही ठरत नाही. ’माझी निवड वा आकलन हे निर्विवाद योग्य, नि तुमचे ते निर्विवाद अयोग्य आहे.’ हा दुराग्रह धरुन एकमेकांवर लादण्याचा प्रयत्न केला नाही तरी पुरेसे आहे.
जर सामान्यांचे सामान्यत्व मान्य करत असू, तर त्यांच्या सोयीचे म्हणून, मी माझी - माझ्या मते सामान्यांहून अधिक विकसित - साधकबाधक बुद्धी फेकून देऊन त्यांच्या सोबत नेणारे प्रवाहपतितत्व स्वीकारावे; किंवा त्याचा सर्वंकष विरोध करणारे दुसरे टोक स्वीकारावे, हे ही मला मान्य नाही.
एकारलेपण हे नेहमीच समाजाला घातक असते. सामाजिक बंध खिळखिळे करणारे असते. माझ्या पुरोगामित्वाच्या नि प्रबोधनाच्या व्याख्येत विचारस्वातंत्र्य, निवडस्वातंत्र्य हे मूल्य महत्वाचे आहे. एरवी जगण्याची एक चौकट पूर्णपणे, तंतोतंत स्वीकारणे जसे अगोचरपणाचे, तसेच ती पूर्णपणे नाकारणेही. धर्मामध्ये एका समुदायाला संपूर्णपणे वाळीत टाकणे, दुय्यम ठरवणे जितके घातक नि निषेधार्ह, तितकेच इतर सामाजिक विचार स्वीकारार्ह असणार्याला एका कृतीमुळे वा एखाद्या मुद्द्यासंदर्भातील मतभिन्नतेमुळे पुरोगामी वर्तुळातून बहिष्कृत करणेही. या दोनही कृती टोळी मानसिकतेच्या आणि पुस्तकप्रामाण्य मानसिकतेच्याच दिसतात. पुस्तके वेगळी असतात इतकेच.
हे सारे ऐकून आमचा एक मित्र म्हणाला होता, “म्हणजे एक प्रकारे तुझी ही वस्तुनिष्ठता परस्परविरोधी भूमिका घेण्यास उपयुक्त ठरते तर.” इतक्या विवेचनानंतरही हे सार काढणार्यांना इतकेच सांगेन की, ’नवजात अर्भकाची नाळ कापणार्या सुरीने माणसांना भोसकताही येते; नेट लावला तर ठारही मारता येते. तिचा उपयोग कसा करायचा हे ती धरलेल्या हातामागच्या मेंदूवर अवलंबून असते. त्या कृतीची जबाबदारी घ्यावी लागते हे मात्र विसरायचे नाही.’
- oOo -
सर, खूप विचारगर्भ लेख, बौद्धिक .
उत्तर द्याहटवाडॉ. अस्मिता फडके.
Thanks Dr. Phadke. _/\_
हटवा