रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

जग जागल्यांचे ११ - ग्रीनहाऊस माफियांचा कर्दनकाळ: गाय पीअर्स

पर्यावरणाचा पहारेकरी: विल्यम सँजुअर << मागील भाग
---

मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये भडकलेल्या वणव्याने प्रचंड वनसंपत्ती, लक्षावधी वन्यजीवांचा संहार केला. मानवी संपत्तीलाही उध्वस्त करत हा वणवा तब्बल तीन महिने धुमसत होता. त्याहीपूर्वी अमेझॉनच्या जंगलात दहा महिने थैमान घातलेल्या वणव्याने नऊ हजार स्क्वेअर कि.मी. चे क्षेत्र जाळून भस्म केले होते. ब्राझीलच्या अध्यक्षाने हा वणवा आटोक्यात आणण्यात हेळसांड तर केलीच, पण अन्य देशांची मदत नाकारुन एक प्रकारे हा वणवा पसरण्यास मदतही केली. याची झळ बोलिव्हिया, पेरु, पॅराग्वे या देशांतही पसरली. त्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा प्रतिसाद अधिक नेमका होता... याचे कारण त्यांनी अनुभवलेला हा पहिलाच वणवा नव्हता.

एकोणीसाव्या शतकापासून अशा व्यापक वणव्यांचा सामना त्यांना करावा लागलेला आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात यांची वारंवारता वेगाने वाढली. १९७५ मधील वणव्यांनी जवळजवळ १५% वनसंपत्ती स्वाहा केली. १९८३, २००९ मध्ये या वणव्यांनी प्रत्येकी जवळजवळ दोन हजार घरे उध्वस्त केली नि सव्वाशेहून अधिक बळी घेतले होते. अधिक तपमान आणि कमी आर्द्रता असलेले पर्यावरण वणव्यांना अनुकूल ठरते. विसाव्या शतकात ऑस्ट्रेलियाचे सरासरी तपमान एक डिग्रीने वाढले आहे. तपमानवाढीचा वेग शतकाच्या उत्तरार्धात दुप्पट झालेला आहे. पावसाचे प्रमाण १०-२०% घटले आणि दुष्काळांची तीव्रता वाढली आहे. एका बाजूने थोड्या काळात अतिवृष्टी, पण एकुण प्रमाण घटत अवर्षण, अशी स्थिती दिसून येऊ लागली.

GuyPearse

त्यातून जागतिक तपमान वाढ, त्याचे कारण असलेला ’हरितगृह स्थिती’ (Greenhouse effect) यांना गंभीरपणे घेणारा आणि त्यासाठी ठोस उपाय करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिलाच देश ठरला. १९९८ साली ’ऑस्ट्रेलियन ग्रीनहाऊस ऑफिस’ स्थापन करुन त्या मार्फत मुख्यत: ग्रीनहाऊस इफेक्ट आणि एकुणच पर्यावरण रक्षणाबाबत ठोस धोरण आणि धोरणात्मक चौकट तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले. गाय पीअर्स या पर्यावरण-तज्ज्ञाची या कार्यालयाचा प्रमुख सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली.

पीअर्स हा अमेरिकेतील प्रथितयश हार्वर्ड विद्यापीठातून राजकीय धोरण विषयातून पदवीधर होता. त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन उपाध्यक्ष आणि पर्यावतरणतज्ज्ञ अल् गोर यांच्यासोबत त्याने काही काळ काम केले होते. पुढे त्याने मायदेशी परतून आपले काम पुढे सुरु ठेवले होते. आपल्या पीएच.डी. साठी त्याने ’(तत्कालीन) हॉवर्ड सरकारच्या पर्यावरणविषयक धोरणांवर कार्बन लॉबीचा परिणाम.’ असा विषय निवडला.

बहुतेक देशांत उद्योगांच्या हितासाठी काम करणारे व्यावसायिक ’प्रचारक’ (लॉबिस्ट) सरकारदरबारी कार्यरत असतात. अनेक भल्याबुर्‍या मार्गांचा वापर करुन सरकारी धोरणे आपल्या मालक मंडळींना सोयीची करुन घेण्याचा तेप्रयत्न करत असतात. ग्रीनहाऊस इफेक्टचा मुख्य गुन्हेगार असलेला कर्बवायू (कार्बन डाय ऑक्साईड) मोठ्या प्रमाणावर उत्सर्जित करणारे उद्योगांसाठी कार्यरत असणार्‍या या मंडळींना ’कार्बन लॉबी’ असे संबोधले जाते. या दरम्यान स्वत: पीअर्सनेही काही उद्योगांसाठी हे काम केले.

स्वानुभव आणि आपल्या पीएच.डी.च्या अभ्यासादरम्यान त्याने अशा अनेक प्रचारक मंडळींच्या मुलाखती घेतल्या. त्यातून मिळालेली माहिती आणि स्वानुभव या आधारे त्याने आपला अभ्यास पुरा केला. यातून त्याला दिसलेले चित्र धक्कादायक होते. कार्बन उत्सर्जितांवर नियंत्रण ठेवण्यासाठी धोरणे आखली जात होती. पण ती ज्यांच्यावर बंधने घालण्यासाठी लिहिली जात होती त्याच उद्योगांचे त्यावर संपूर्ण नियंत्रण होते. त्यातील काही जणांनी तर धोरण मसुद्यातील काही भाग आपणच लिहिले असल्याचे फुशारकीने पीअर्सला सांगितले. पर्यावरण नियंत्रणाचे नियम पर्यावरण-शत्रूंच्याच हाती होते. यातीलच एकाने स्वत: आणि त्याच्यासारख्या इतरांना ’ग्रीनहाऊस माफिया’ असे संबोधले होते. त्यातील कोडगेपणा, निर्ढावलेपण पीअर्सला बोचू लागले. आणि त्याने हे उघड करण्याचा निर्णय घेतला.

२००६ मध्ये एबीसी चॅनेलवरील ’फोर कॉर्नर्स’ या साप्ताहिक कार्यक्रमासाठी जेनिन कोहन हिने त्याच्या पीएच.डी.च्या अभ्यासविषयावर पीअर्सची मुलाखत घेतली. यात मुलाखती दरम्यान पीअर्सने सरकारच्या ग्रीनहाऊस संबंधी धोरणांवर कोळसा, वाहने, तेल आणि अ‍ॅल्युमिनिअम उत्पादकांच संयुक्त लॉबी नियंत्रण ठेवते हे त्याने विशद केले. नव्वदीच्या दशकात जगात सर्वाधिक कार्बन प्रदूषण करणारा देश असलेल्या ऑस्ट्रेलियामध्ये त्यावर नियंत्रण आणण्याचे सारे प्रयत्न हे उद्योजक, त्यांचे प्रचारक कशाप्रकारे हाणून पाडत होते याचा लेखाजोखा त्याने उघड केला. हे सारे ’ऑस्ट्रेलियन इंडस्ट्री ग्रीनहाऊस नेटवर्क’ या जाळ्यामार्फत अतिशय सूत्रबद्धपणे हे उद्योग करतात हे त्याने निदर्शनास आणून दिले.

HighAndDry

हा एपिसोड प्रदर्शित झाल्यावर राजकीय आणि उद्योग क्षेत्रात भूकंप झाला. उद्योगांनी अर्थातच हे अतिरंजित असल्याचा कांगावा केला. परंतु त्यांच्या दुर्दैवाने ऑस्ट्रेलिया इन्स्टिट्यूट या धोरणविषयक अभ्यासकेंद्राचा डिरेक्टर असलेल्या क्लाईव हॅमिल्टन याने पीअर्सच्या माहितीला दुजोराच दिला असे नव्हे तर त्यात स्वत: भरही घातली. यातून ह्यू मॉर्गन, रॉन नॅप यांच्यासारखे उद्योगपती, अ‍ॅलन ऑस्क्ली यांच्यासारखे सनदी अधिकारी, बॅरी जोन्स यांच्यासारखे तेल-उत्पादक आणि काही राजकारण्यांसह खुद्द अध्यक्ष जॉन हॉवर्ड यांची नावे घेतली जाऊ लागली. हे बारा लोक पुढे ’डर्टी डझन’ म्हणून कुख्यात झाले.

या मुद्द्यांबाब्त पुढे त्याने ’हाय अँड ड्राय’ या पुस्तकात अधिक विस्ताराने लिहिले. ज्याच्या उपशीर्षक ’सेलिंग ऑस्ट्रेलियाज् फ्युचर’ असे देण्यात आले होते. या मुलाखतीनंतर आणि पुस्तकानंतर पीअर्स सरकारच्या आणि उद्योगांच्या दृष्टीने खलनायक ठरला आणि त्या क्षेत्रातून त्याची हकालपट्टी झाली. ’रेडिओ अ‍ॅडलेड’ने घेतलेल्या मुलाखतीत त्याने सुरुवातीलाच आपल्या कार्यक्षेत्राला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

यानंतर त्याने पर्यावरण-धोरणविषयक अभ्यासाला वाहून घेतले आहे. पहिल्या पुस्तकानंतर त्याने ’क्वारी व्हिजन: कोल क्लायमेट चेंज अ‍ॅंड द एन्ड ऑफ रिसोर्सेस बूम’ या शीर्षकाचा एक दीर्घलेख प्रकाशित केला. यानंतर तिथे कोळसा उत्पादनांअर अनेक बंधने आली. (भारतातून तिथे गेलेल्या अदानींना उग्र निदर्शनांनंतर तेथील कोळसा उत्पादनाचा आपला प्लॅन गुंडाळावा लागला.) त्यानंतर त्याने "ग्रीनवॉश" (व्हाईटवॉशशी साधर्म्य सांगणारे शीर्षक), बिग कोल आणि ’द ग्रीनवॉश इफेक्ट’ या पुस्तकांमार्फत उद्योजकांच्या पर्यावरणशत्रू धोरणांचे वाभाडे काढणे सुरुच ठेवले आहे.

अतिवृष्टी आणि दुष्काळ हातात घालून येताना भारतानेही गेल्या चार-पाच वर्षांत अनुभवले आहे. तरी अजूनही पर्यावरणद्रोही विकासाच्या पट्ट्या डोळ्यावर बांधून बसलेले राजकारणी आणि त्यांचे भाट अजूनही त्याबाबत फारसे गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत. तूर्त देवळे, पुतळे आणि ऐतिहासिक स्थळे या ’सुफला १५-१५-१५’ प्रकारच्या संमिश्र खतावर जनमताचे पीक जोमाने वाढते आहे. ’ऑस्ट्रेलियाच्या भविष्याची विक्री’ म्हणणार्‍या पीअर्ससारखा कुणी या देशात दिसत नाही. असला तरी स्वार्थी आणि गरजू अशा दोन टोकांच्या समुदायांच्या युतीपुढे तो कितपत टिकावर धरेल याची शंकाच आहे.

-oOo-

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक दिव्य मराठी, ९ ऑगस्ट २०२०)

पुढील भाग >> कम्युनिस्टांच्या देशात व्लादिमिरचा अनोखा लढा


संबंधित लेखन

२ टिप्पण्या:

  1. Informative article, Sir! Indeed, it has to be on the top of every govt's agenda to plan, and execute, for concrete strategies to repair the damage caused to the environment, and promote initiatives for preservation of environmental balance.
    Recently, I've bought a good book on similar topic by Naomi Klein, a Canadian social activist, named 'This changes everything: Capatilism vs the Climate'; but have to read it yet.

    उत्तर द्याहटवा