शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०१४

नॉस्ट्याल्जिआ ऊर्फ आमचाही गणेशोत्सव

पुण्यात शुक्रवार पेठेत मंडईजवळ एका रहात असताना आम्हा पोराटोरांनीही आमचे स्वतःचे एक मंडळ स्थापन केले होते. सार्‍या गल्लीत तेवढे एकच मुलांचे गणेशोत्सव मंडळ होते. (पाच-सहा वर्षांनंतर आणखी एका वाड्यात तसा प्रयत्न झाला पण तो फसला. 'फाटाफूट नि आम्ही लै भारी' हे तेव्हाही अनुभवत होतो. :) ) सार्‍या गल्लीभर फिरून वर्गणी जमा केली जाई.

त्या परिसरात 'अखिल मंडई मंडळा'सह एकुण 'आठ' मंडळे होती/आहेत. मंडईचे मंडळ जरी वर्गणी गोळा करत नसले तरी उरलेल्या मंडळांना वर्गणी द्यावीच लागे. आजच्या प्रमाणे मंडळे थेट राजकारणी गुंडांच्या ताब्यात गेली नसली, तरी स्थानिक पुंडांच्या ताब्यात होतीच. तेव्हा तिथल्या लोकांना गणेशोत्सव म्हटले की पोटात गोळाच येत असणार. (अर्थातच आम्हा चिल्ल्यापिल्ल्यांना ते समजावं हे वय नव्हतं.). तरीही एखाद-दुसरा खवट म्हातारा वगळला, तर बहुतेक ठिकाणी पोरांच्या गणेशोत्सवाला वर्गणी देण्यास खळखळ केली जात नसे.

छे: पण मी फारच पुढे गेलो. वर्गणी गोळा करणे हे फार पुढचे झाले.

त्या आधी श्रावणात गणेशोत्सवाचे वेध लागत. मग एक दिवस पहिली 'मीटिंग' बोलावण्यात येई. त्यावेळी मंडळाचे सारे पदाधिकारी वय वर्षे सहा पासून वय वर्षे पंधराचे असत. याहुन मोठ्यांना आमच्या 'बाल मित्र मंडळा'त प्रवेश नव्हता. अर्थात कालेजात जाऊ लागलेल्या एक दोघा मोठ्यांचे 'मार्गदर्शक मंडळ' आमच्या वेळीही होतेच. त्यांच्या 'अनुभव' वगैरे उपयोगात यावा अशी वेळोवेळी गरज पडे, विशेषतः वर्गणी जमा करताना.

पहिल्या मीटिंगचा अजेंडा अर्थातच या वर्षीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष वगैरे निवडणे. आणि मंडळी सांगायला अतिशय अभिमान वाटतो एकदाही निवडणूक न होता आमचे पदाधिकारी निवडले गेले आहेत. (म.सा.प. वाल्यांनी आमच्या अनुभवातून शिकायला हवे.)

मग या 'पदाधिकार्‍यां'समोर पहिला प्रश्न असे तो डेकोरेशन काय करायचे. त्यावर थोडा खल झाल्यावर अखेर एखाद्या थोड्या अधिक 'प्रोफेशनल' कार्यकर्त्याला लक्षात येई की आपण अजून बजेट ठरवलेलेच नाही. मग वर्गणी किती जमेल, जमायला हवी याचा अंदाज घेण्यासाठी मागच्या वर्षीचं 'रेकॉर्ड' काढून पाहिले जाई. तेव्हा इन्फ्लेशन वगैरे भानगड ठाऊक नव्हती, तरीही 'या वर्षी याहून जास्त जमायला हवी.' यावर लगेचच एकमत होई.

मग वर्गणी जमा करायला कोणी जावे याची निवड करण्याचा प्रसंग येई. इथे मात्र दीर्घकाळ वाटाघाटी होऊनही काही निर्णय होत नसे. कारण हे लचांड कोणालाच गळ्यात नको असे. अखेर दादा पुता करत एक दोघांना घोड्यावर बसवण्यात येई. पण हे वीर काँग्रेसी कार्यकर्ते बनण्याच्या मार्गावर असल्याने निवांत रहात नि चार दिवसांवर उत्सव आला तरी चार दमड्या जमलेल्या नसत. मग युद्धपातळीवर सारे पदाधिकारीच झडझडून कामाला लागत नि दारोदार जाऊन वर्गणी जमा करू लागत.

माझे लक्ष आरास करण्याचे काम पदरी पाडून घेण्याकडे असे. राजू नावाचा आणखी एक प्राणी नि मी आम्हाला हे काम बहुधा मिळे. याचे एक कारण म्हणजे सुरुवातीला जरी हे खूप मानाचे वा भारी वाटले तरी ते किचकट नि दीर्घकाळ चालणारे आहे असे ध्यानात आले की एक एक करून बाकीचे पळ काढत.

हे असे घडावे म्हणून आम्ही दोघे मुद्दामच थर्माकोलचे काही बनवण्याचा बूट काढायचो. कारण साध्या ब्लेडने सरळ रेषेत थर्माकोल कापणे आम्हा दोघांनाच त्यातल्या त्यात बरे जमत असे. कधी इंजेक्शनच्या बाटल्या जमा करून त्याचे मंदिर बनवण्याचा बूट निघे. मग समोर राहणार्‍या डॉ. लेल्यांच्या वशिल्याने अनेक डॉक्टरांकडे जाऊन त्या बाटल्या जमा केल्या जात. (याच वेळी चौकातले मंडळ बीअरच्या बाटल्यांचे मंदिर बनवे, पण तेव्हा 'संस्कृतीरक्षकां'ना त्याचे काही वाटत नसे.)

मग त्यांना धुण्यासाठी कार्यकर्ते पकडून आणावे लागत. अशा वेळी बहुतेक कार्यकर्त्यांना 'मला अमूक काम हवे होते ते दिले नाही, मग मी यावर्षी मंडळात नाही.', 'अरे चाचणी परीक्षेचा अभ्यास आहे.' 'घरच्या गणपतीची आरास करायची आहे.' वगैरे एकाहुन एक सरस कारणे सुचत. मग बहुधा आम्ही एकदोघेच हे काम उरकत असू. आरास करताना कधी क्रेपच्या गुंडाळ्या आणून त्यापासून फुले बनवणे, जिलेटिन पेपर नि फर्निचरसाठी वापरल्या जाणार्‍या लिपिंग पट्ट्या वापरून एखादे लहानसे मंदिर बनवणे, त्याचा कळस बनवण्यासाठी तुळशीबागेतून जडावाच्या काचा आणून त्या एका चेंडूवर चिकाटीने चिकटवत बसणे असे उद्योग चालत.

बाप्पांसाठी करायचे पहिले काम म्हणजे मंडप उभारणे. मंडईतील बुरुड आळी जवळच असल्याने हवे तसे बांबू मिळणे खरे तर सहज शक्य असायचे. पण वेळीच हालचाल न केल्याने आणि अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवासाठी बुरुडांची जागाच ताब्यात घेतली जात असल्याने ऐनवेळी त्यांची टंचाई निर्माण होई.

मग वाड्यात असलेल्या एकदोन माळ्यांवर शोधाशोध सुरू होई. हे माळे वर्षांतून एकदाच उघडले जात. तिथे पाय ठेवला की काही सेंटिमीटर आत जातील इतकी धूळ साठलेली असे. आमचा वाडा पेशव्यांचे सरदार पानसे यांच्या वंशजांचा. तेव्हा आम्ही गमतीने पानपतावरची धूळ तिथे आणून ठेवली आहे असे म्हणायचो. तिथल्या धुळीत शिंकत खोकत शोधाशोध सुरू होई. लहान मोठ्या आकाराचे, अधेमधे खिळे असलेले, काही पोचट काही बळकट बांबू तपासून पाहिले जात. एका मापाचे चार बांबू कधीच मिळत नसत. मग त्यातल्या त्यात जुळणारे बांबू घेऊन मंडळी खाली उतरत.

बांबूची धसकटे, अधेमधे असणारे खिळे लागून झालेल्या जखमांची पर्वा न करता हे मावळे मंडपाच्या कामाला लागत. एखादा 'परफेक्शनिस्ट' गडी म्हणे 'आपण करवत आणून आधी हे सारे एका मापाचे करून घेऊ.' पण मालकीणबाईंना विचारल्याखेरीज हे कसे करायचे. हजारो वर्षे वापरात नसले तरी ते त्यांच्या मालकीचे. क्वचित याची भीती न बाळगता थेट करवत काणून कापाकापी चालू होई. पण चारही बांबूंवर करवत चालवून देखील ते एका मापाचे होत नसत. कधी कापण्याच्या फंदात न पडता तसेच वापरले जात. आमच्या मंडपाचा एखादा बांबू इतरांपेक्षा मीच मोठा म्हणून मिरवताना दिसे.

प्रत्यक्ष गणेश चतुर्थीच्या दिवशी मात्र झाडून सारे कार्यकर्ते हजर असत. सकाळपासून नुसती धांदल चालू असे. काम फार नसले, तरी आव मात्र सार्‍या जगाचा गाडा आमच्याचमुळे चालतो आहे असा असायचा.

सकाळी सकाळी मंडईत जाऊन फुले, हार नि पत्री आणली जाई. तेव्हा निवडलेल्या दुर्वांच्या तयार जुड्या मिळण्यातकी 'प्रगती' झालेली नसल्याने 'दुर्वा' नावाने आणलेली गवताची पेंडी निवडत बसणे हे काम असे. इथे महिला मंडळाला सामील करून घेतले जाई. प्रत्येकी एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होई. तीन तीन पत्रे असलेल्या दुर्वा निवडून त्यांच्या जुड्या बांधल्या जात. कितीही मोठी पेंडी आणली तरी एकवीस जुड्या बनवायला ती कमीच पडे. मग कुण्या एखाद्या कार्यकर्त्याला आणखी एक आणायला धाडले जाई. तो बेटा धावत पळत जाऊन दुसर्‍या मिनिटाला पेंडी घेऊन हजर होई. काम पुढे सुरु होई.

ही पेंडी संपूनही पुरेशा जुड्या बनतच नसत. 'मी आता पुन्हा जाणार नाही.' असा दम आधीचा कार्यकर्ता देई. इतर सारे आधीच कुठल्या ना कुठल्या कारणाने पसार झालेले असत. इतक्यात एकवीस जुड्या नसल्या तरी विषम संख्येच्या चालतात, त्यांचा हार पुरेसा असतो याला 'शास्त्राधार' आहे कुणीतरी 'दुर्वानिवडक' कार्यकर्ता करून देई नि हा प्रश्न एकदाचा निकालात निघायचा.

हे सारे गोंधळ निस्तरेतो बारा वाजत. आता 'उत्सव मूर्ती' आणायला जायची वेळ होई. इतक्यात 'अध्यक्ष' कुठे दिसत नाहीत असे ध्यानात येई. थोडी शोधा शोध करता ते महाराज कोण्या नातेवाईकाच्या घरी गणपती बसवायला गेले आहेत असे ध्यानात येई. मग अध्यक्षांवर तात्पुरता अविश्वास ठराव संमत करून उपाध्यक्ष व खजिनदार उपस्थित कार्यकर्त्यांना घेऊन उत्सव मूर्ती आणायला निघत.

KidsAtGaneshotsav
छायाचित्र प्रातिनिधिक (HindustanTimes.com येथून साभार)

बारा वाजले तरी अजून गणपती का बसला नाही याची पृच्छा करायला वाड्याच्या मालकीणबाईंसह (गल्लीत फक्त आपल्याच वाड्यात गणेशोत्सव साजरा होतो याचा यांना फार मोठ्ठा अभिमान असे.) 'माडीवरची मंडळी' खाली अंगणात येत. उत्सव मूर्ती आणल्यावर प्रतिष्ठापनेची (हा शब्द तेव्हा उच्चारणे फारच थोड्यांना नेमके जमत असल्याने सरळ 'गणपती बसवणे' असा प्राकृत वाक्प्रचार वापरला जाई) तयारी सुरु होई. पूजा सुरू होणार इतक्यात 'पंचफळांचा प्रसाद' आणलेलाच नाही हे मालकीणबाई निदर्शनास आणून देत. मग याचे खापर सर्वानुमते गायब असलेल्या अध्यक्षावर फोडून एखादा कार्यकर्ता त्या कामासाठी पिटाळला जाई. मग जमतील त्या भाडेकरू नि वर्गणीदारांच्या उपस्थितीत बाप्पा एकदाचे स्थानापन्न होऊन जात.

पुढचे दहा दिवस सकाळी एकदा नि संध्याकाळी एकदा अशी दोनदा आरती केली जाई. आरतीसाठी प्रसाद बनवण्याचे काम वर्गणीदारांना आलटून पालटून देण्यात येई. इथे आश्चर्यकारक चढाओढ असे. दहातला पहिला नि शेवटचा दिवस वगळून आठ वा नऊ दिवसाचे सोळा व अठरा स्लॉट वाटून देणे हे आणखी मोठे दिव्य असे. अनेकदा एकाच स्लॉटवर एकाहुन अधिक जणांचा दावा येई. त्यामुळे कधी कधी एकाच आरतीला दोन दोन प्रसाद अशी गंमतही घडत असे.

पण पहिले दोन तीन दिवस उलटले, बाहेर सार्वजनिक मंडळांचे देखावे पुरे होऊ लागले की आरतीला येणार्‍या कार्यकर्त्यांच्या संख्येला ओहोटी लागे. संध्याकाळी तर अनेकदा मालकीणबाई मला (गर्दीचा नि प्रदूषणाचा मला त्रास होत असल्याने मी घरातच सापडायचो) नि आणखी एखाद्याला पकडून आरती उरकून घेत. किंवा त्या दिवशी प्रसाद पाठवण्याची ज्यांची पाळी असे ते कुणीच न आल्याने शेवटी स्वतःच येऊन आठवण करत नि आरती उरकून घ्यायची विनंती करत.

गणेशोत्सवाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम नि स्पर्धा. सांस्कृतिक कार्यक्रमात सार्‍या गल्लीतली पोरेसोरे 'विविधगुणदर्शन' सादर करत. हौशे-नवशे काहीही सादर करत असले तरी त्यांची कधी टर उडवली गेलेली स्मरणात नाही. हा कार्यक्रम बहुधा आमच्या वाड्याच्या अंगणात होई. गणपतीबाप्पासमोर एक सतरंजी टाकून 'स्टेज' तयार होई. बैठक प्रत्येकाने आपापली आणायची. मग खुर्च्यांपासून, चटया, सतरंज्या एवढेच काय अगदी आयत्यावेळेला आलेला एखादा महाभाग चक्क पेपर पसरून त्यावर बैठक मारायचा. एवढ्याशा अंगणात फार लोकांना बसता येत नसेच. मग काही मंडळी पहिल्या मजल्यावरच्या घरांतील खिडक्यांचा आधार घेत. कुठे सज्जा वा गच्ची नसल्याने खिडक्यांतच दाटीवाटीने बसून कार्यक्रम बघत असत.

स्पर्धा म्हटल्या तर एकदम जोरदार असत. बुद्धिबळ, कॅरम, चमचा लिंबू, पत्ते वगैरे स्पर्धा तर घेतल्या जातच पण त्याच बरोबर निबंध स्पर्धाही घेतली जाई. त्यासाठी शेजारच्या दुकानाचा बोर्ड चार पाच दिवस ताब्यात घेऊन त्यावर स्पर्धेचा तपशील लिहून तो वाड्याच्या दारावर लावून स्पर्धा 'खुली' असल्याचे जाहीर केले जाई.

बुद्धिबळात नि निबंधलेखन स्पर्धेला तर चक्क मोठा गट नि छोटा गट असे स्वतंत्र गट असायचे. बक्षीसे म्हणून पुस्तकांपासून ते मंडईतून बनवून आणलेल्या पदकांपर्यंत काय वाटेल ते दिले जाई. 'एकदा हात लावलेले प्यादे सोडून वजीर हलवला. हे चीटिंग आहे. नाहीतर मी जिंकलो असतो.', 'अमक्याने पार्शालिटी केली, ढमक्याला सगळी कामाची पानं दिली.', 'माझाच निबंध ग्रेट होता. नंबर लावणार्‍या काकांनी आपल्या वाडयातल्या मुलाला बक्षीस देऊन पार्शालिटी केली.' वगैरे कवित्व पुढचे वर्षभर चालायचे.

एक दिवस अल्पोपहाराचा कार्यक्रम ठेवला जाई. हा बहुधा स्पर्धांच्या बक्षीस समारंभाला जोडून घेतला जाई. यात जे पदार्थ द्यायचे ते 'कार्यकर्ते' स्वतः बनवत. भेळ, पाव सँपल वगैरे बनवण्याचा घाट घातला जाई. आसपासच्या आयाबाया अर्थातच नजर ठेवून असत. ज्या घरात हा सगळा घाट घातला जाई, त्या घरच्या बाईला अधेमध्ये हस्तक्षेप करत ते खाण्यालायक राहिल याची दक्षता घ्यावी लागे. जी मंडळी उपस्थित राहू शकत नसत त्यांच्या घरी त्यांचा वाटा पोहोचता करण्यात येई.

अखेर बाप्पांच्या जाण्याचा दिवस उजाडे. हा पहिल्या दिवसाइतकाच धांदलीचा असणे अपेक्षित असे. पण याच्या उलट परिस्थिती असे. एकतर सुरुवातीचा उत्साह दहा दिवस टिकत नसे. दुसरे म्हणजे आदल्या रात्री उत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने मंडळी रात्रभर जास्तीत जास्त मंडळांचे गणपती बघण्याचा प्रयत्न करत हिंडल्याने सकाळी दहापर्यंत कुणी अंथरुण सोडतच नसे.

त्यातच आणखी एक समस्या अशी असे की त्या काळी गणेशविसर्जनाची मिरवणूक फक्त आमच्या दारावरूनच जात असे. (काही काळानंतर मग टिळक रोडला दुसरी स्वतंत्र मिरवणूक सुरु झाली.) तिथे आदल्या रात्रीपासूनच अनेक बाप्पा 'नंबर' लावायला सुरुवात करत. तेव्हा सकाळी उठल्यावर आमची कार्यकर्ते मंडळी जेमतेम आन्हिके उरकून कुठले कुठले गणपती रांगेला लागलेत ते पहायला पसार होत.

दहा दिवसांची रोषणाई वा आरास या पलिकडे जाऊन खास मिरवणुकीसाठी वेगळी आरास केली जाई. कोणत्या मंडळाने मिरवणुकीसाठी काय आरास केली आहे ते आपण प्रथम पाहून येऊन इतरांना सांगण्याचे क्रेडिट घेण्याची चढाओढ चाले. आता आपल्या बाप्पाच्या विसर्जनाकडे कोणाचे लक्षच नसे. पुन्हा एकदा पहिल्या दिवसाप्रमाणेच सारी धावपळ करून बाप्पांना निरोप द्यायची सोय करावी लागे. या दिवशी तर अधिकच घाई करावी लागे. कारण दुपारी एकदा का रस्त्यावरची मिरवणूक सुरू झाली, की वाड्यातून बाहेर पडणे मुश्कील होई. आणि एकदा ती सुरु झाली की आमचे कार्यकर्ते विविध मोक्याच्या ठिकाणी जे ठिय्या देऊन बसत ते दिवसभर तिथून हलत नसत.

सर्वात दुर्लक्षिलेले काम म्हणजे मंडप उतरवणे. एकतर आता सारा उत्साह ओसरलेला, त्यातच मंडळींना सहामाही परीक्षेचे वेध लागलेले असत. तेव्हा तो बिचारा मंडप किमान महिनाभर तरी तसाच केविलवाणा उभा राही. दिवाळीची सुटी सुरु झाली म्हणजे कधीतरी फटाके उडवायला अंगण मोकळे हवे हे ध्यानात आले की तो हटवला जाई.

या सार्‍या धामधुमीत कधी पैसे देऊन ऑर्केस्ट्रा आणलाय, चित्रपट दाखवला आहे, कुणी 'बाहेरचा' येऊन काही सादर करतो आहे असे घडत नसे. अगदी अल्पोपहारासाठी द्यायच्या पदार्थापासून ते मंडप उभा करणे वा उतरवणे हे सारे करायचे ते आपले आपणच. उत्सव शेवटी आपला आहे. 

उत्सव संपल्यावरही अध्यक्षाने अध्यक्षाचे म्हणावे असे नक्की कोणते काम केले वा खजिनदाराने दुर्वा का निवडायच्या असा प्रश्न कधी पडत नव्हता. अधूनमधून रुसवे फुगवे वगैरे झाले, तरी पुढच्या वर्षीच्या पहिल्या मीटिंगला नव्या उत्साहाने सारे हजर व्हायचे.

- oOo -


हे वाचले का?

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०१४

एक बिम्म नि दोन बब्बी

सुटणारे पोट नि वाढणारा रक्तदाब या नव्या सुखवस्तू जगाच्या देणग्यांपासून सुरक्षित अंतरावर राहण्यासाठी हल्ली दिवसाचा एक तास फिरण्यासाठी राखून ठेवला आहे. सामान्यपणे वर्दळ कमी असते अशा वेळी ही एक तासाची फेरी घडते.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. निम्मी फेरी संपवून परतीच्या वाटेवर होतो. रस्त्यात एके ठिकाणी कचराकुंडी आहे. त्याच्या आसपास बर्‍याच अंतरापर्यंत कचरा लोकशाही पद्धतीने ऐसपैस पसरलेला असतो. त्यामुळे श्वानपंथीय देखील वहिवाटीच्या हक्काने तिथे वावरत असतात. यातच एका कुत्रीची दोन पिले - एक पांढरे नि एक कबरे - तिथे लुडबुडत असतात. पिले तशी धीट नि चटपटीत.

आज तिथे दहा-बारा वर्षांच्या दोन शाळकरी मुली थांबल्या होत्या. शाळेच्या वेशात नसल्या तरी पाठीवर सॅक ऊर्फ दप्तर असल्याने बहुधा क्लासच्या वाटेवर असाव्यात. त्या दोन पिलांना पाहून त्या थांबल्या. सायकलला सरळ कुलूप घातले. नि बाहेरपर्यंत लुडबुडत आलेल्या पिलाला यू यू करून बोलावू लागल्या. पिलाची पहिली प्रतिक्रिया अर्थातच आतल्या दिशेने धूम ठोकण्याचीच झाली. पण त्या मुलींनी चिकाटी सोडली नाही. यू यू करत अजूनही त्या तिथेच थांबल्या होत्या. मी काही पावले चालून त्यांच्यापर्यंत पोहोचलो तोवर त्यांच्या चिकाटीला फळ आलेले दिसले. आत गेलेले पिलू तर बाहेर आलेच, पण पाठोपाठ दुसरेही आले. काही क्षणातच त्यांच्या शेपट्या हलू लागल्या नि दबकत दबकत ते या नव्या मैत्रिणींकडे सरकू लागले.

GirlPlayingWithStreetPuppies

त्यांना ओलांडून मी काही पावले पुढे गेलो नि मागे वळून पाहिले तेव्हा त्या चार प्राण्यांची मस्त दोस्ती झाली होती. त्यातले एक दोघींपैकी एकीच्या हातात विसावले होते तर दुसरे तिच्या मैत्रिणीशी हुलकावणीचा खेळ खेळू लागले होते. या दोघींच्या 'ममी'ज नी हे पाहिलं तर परिणाम काय होईल याचा तर्क करण्याजोगा होता. असल्या 'अनहायजनिक प्लेस' वरच्या 'डर्टी डॉग्ज'ना 'लिफ्ट' करून आपले 'क्लोथ्स' 'डर्टी' केल्याबद्दल त्यांना 'पनिशमेंट' मिळून त्या 'ग्राउंडेड' झाल्या असत्या.

घरी येईतो सहज विचार आला, असे जिवंत खेळण्याशी सलगी करून किती दिवस झाले. वय वाढले हे खरे, पण ती सलगी, तो उमाळा असा कसा गायब झाला? आपले सोडा, पण आज त्या मुलींच्या वयाची किती मुले खरंच अशा सजीव जगाशी सलगी राखून असतात? रांगत्या-लोळत्या बाळाच्या पाळण्याला आता चिऊ काऊचे भिरभिरे नसते, किणकिणते नाजूक विंड-चाईम असते. चालते-बोलते होईतो त्याच्या हाती मेड-इन-चायना बंदूक किंवा मेड-इन-चायना असूनही अमेरिकन कंपनीचे सौभाग्य मिरवणारी बार्बी डॉल असते.

मुख्य दरवाज्यावर पहारेकरी बसवलेल्या 'हौसिंग' सोसायटीमधे घोडा, हत्ती, गाढव कुत्रेच काय परिचित-अपरिचित माणसांनादेखील 'प्रवेश बंद'ची अदृश्य पाटी वाचावी लागते. कुत्र्यांची जागा आता 'डॉग्ज्स' नि घेतली आहे. पतंगासारखे 'कंट्री' गेम (की स्पोर्ट्स, की आणखी काहीतरी?) आजच्या इंग्लिश मीडियमच्या जगात किती मुले खेळतात. कुठे आंतर-वाडा किंवा आंतर-आळी गोट्या च्याम्पियनशिप भरते नि काचेच्या चार तुकड्यांसाठी भान हरपून स्पर्धा खेळली जाते, त्यावरून झालेली भांडणे महिनोन महिने लढवली जातात?

पैसा महामूर झाला नि बाजारात पैसा टाकून कचकड्याची खेळणी वा विडियो गेम्स (ते ही जुने झाले म्हणे, आता तर एक्स-बॉक्सही ओल्ड फ्याशन्ड झालाय असे एक चिरंजीव परवाच सांगत होते.) जिथे आईबापच वर्षा-वर्षाला मोबाईलचे मॉडेल बदलतात नि व्यक्तिस्वातंत्र्याच्या स्वार्थी, अतिरेकी कल्पनांना कवटाळून आपल्या आई-बापांपासूनही फटकून राहतात तिथे या चिल्ल्यापिल्ल्यांना प्राण्यांप्रती प्रेम, जिव्हाळा, बांधिलकी वगैरे कुठून शिकायला मिळणार. असे असूनही त्या दोन मुलींमधे अजून हिरवा असलेला तो जिवंतपणा मला लक्षणीय वाटला, दुर्मिळ वाटला.

योगयोग असा की त्याच दिवशी भाचीसाठी जीएंचे 'बखर बिम्म'ची आणलेले. फार पूर्वी वाचलेले नि सोडून दिलेले. भाचीकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा वाचून पाहून म्हणून हाती घेतले आणि त्यात पुरा गुरफटलो.

लहान मुलांसाठी म्हणून निर्माण होणार्‍या साहित्याचा साधारण पॅटर्न ठरलेला आहे. यात स्वतः वयाने मोठ्या असलेल्या नि आपल्याला लहान मुलांचे भावविश्व समजते असा ’समज असणार्‍या’ लेखकांचा कल्पनाविस्तार असतो. यात अगदी लहान मुलांसाठी बडबडगीतांपासून जी सुरुवात होते ती परीकथा, काल्पनिक जग, अद्भुत कथा वगैरे प्रवास करत किशोरवयीन मुलांसाठी ऐतिहासिक-काल्पनिक हिरोंपर्यंत गाडी पोहोचते. काही मंडळी त्यापुढे जाऊन संस्कार वगैरेचा वारसा घेऊन मुलांना अगदी सुसंस्कारित करण्याचे कंकण वगैरे बांधून बोधकथा, नीतीकथा लिहितात. याची मोठ्यांसाठीची थोडी सुधारित आवृत्ती म्हणजे पंचतंत्र, इसापनीती वगैरे प्रकारच्या तात्पर्यकथा.

कालानुरुप यात थोडे बदल होऊन आता यात लवकर 'वयात' येऊ पाहणार्‍या नव्या पिढीला आवडते म्हणून (हे कोणी ठरवले देव जाणे, पण एकदा रुढी पाडली की पुढचे काम न्यूटनचा पहिला नियम करतो.) यात मारधाड, हिरो, विलन, परग्रहावरचे वा याच ग्रहावरचे आक्रमक मग त्यांना विरोध करण्यास उभा ठाकणारा आपला हिरो, त्याला मिळालेली अलौकिकाची अथवा जादूच्या एखाद्या साधनाची साथ हे अनेक धर्मग्रंथातून वा ऐतिहासिक दस्त ऐवजातून सापडणारे तपशीलच वेगळ्या संदर्भात मांडून आता मुलांचे मनोरंजन केले जाते.

मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांमधून परी, राक्षस, राजकन्या, राजपुत्र, वर देणारे देव अथवा जिन यांची हकालपट्टी होऊन तिथे थेट समोरासमोर युद्ध करावे लागणारे चित्रविचित्र रंगांचे, आकाराचे, नावाचे विलन आणि दीडवीत उंचीचा आपला हिरो यांच्यात हास्यास्पद पातळीवर होणारी लढाई वगैरे मालमसाला असतो. तुलनेने नवे माध्यम असलेले चलत्-चित्राचे (Animation ऊर्फ कार्टूनचे) क्षेत्रही याला अपवाद ठरलेले नाही. सिंडरेला, हकलबेरी फिन, टॉम सॉयर वगैरे हिरो/हिरविणींची जागा आता ही-मॅन, स्पायडरमॅन, सुपरमॅन यांनी घेऊनही जमाना झाला. आता बेन-१०, जस्टीस-लीग, सुपरहिरो-लीग वगैरे करत आपल्या या तथाकथित सुपरहिरोंनी हिरोंनी आपले कार्यक्षेत्र पृथ्वीबाहेर विस्तारत नेले आहे.

सतत कुठल्या ना कुठल्या धोक्याशी, आक्रमणाशी, शत्रूशी लढणे त्याला नेस्तनाबूद करणे हाच या महाभागांचा एकमेव कार्यक्रम वर्षानुवर्षे चालू राहतो. जगण्याचे, संघर्षाचे, कुतूहलाचे, माहितीचे, विकासाचे, नात्या गोत्यांचे इतर कोणतेही आयाम या कथानकांना नसतात, असलेच तर ते या तथाकथित हिरोगिरीसमोर किती दुय्यम ठरतात/ठरवावे लागतात हे दाखवण्यापुरतेच.

या सार्‍या तथाकथित प्रगतीच्या वाटेवर त्या मुलांच्या प्रत्यक्ष भावविश्वातील गोष्टींना कोणतेही स्थान नाही. एखादे मूल आयुष्यात चक्रनेमिक्रमाने वाढत जाते तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर अंगभूत गुणांबरोबरच त्याच्या आजूबाजूच्या परिसर घटकांचा परिणामही मोठा असतो. त्याच्यावर होणारे विविध प्रकारचे संस्कार, त्याच्या अंगभूत गुणांच्या आधारे त्यातून त्याने अंगीकृत केलेले कौशल्य, जमा केलेली माहिती नि सिद्ध केलेले ज्ञान या मार्गाने त्या व्यक्तीची जडणघडण होत असते. यातील या परिसर घटकांचे त्या मुलाच्या जडणघडणीत स्थान, त्याचा विचार मुलांसाठी अथवा मुलांबद्दल लिहिल्या गेलेल्या बहुतेक पुस्तकांमधे, तयार केल्या गेलेल्या करमणूकप्रधान दृक्-श्राव्य कार्यक्रमात बहुधा नसतोच.

बखर बिम्मची हे पुस्तक त्या अर्थाने आगळे वेगळे म्हणावे लागेल. लहान मूल ज्या विशिष्ट परिसरात, कौटुंबिक-सामाजिक पार्श्वभूमीवर जगत असते त्याचा परिणाम, प्रभाव त्याचा भावविश्वावर पडत असतो. त्याचबरोबर त्या लहान मुलाची कल्पनारम्यता हा एक मोठा घटक असतोच. त्या लहान मुलाचे जग हे अशा वास्तव-कल्पनेच्या तीरावर उभे असते. जसजसे वय वाढते तसतसे माणूस वास्तवाशी अधिकाधिक जुळवून घेण्याचा प्रयत्न करत जातो त्याच्या भावविश्वातील कल्पनारम्यतेचा भाग कमी होत जातो. जी.एं. नी त्या वयातील ही वास्तव-कल्पनेची सरमिसळ नेमकी हेरून एका बिम्मचे आयुष्य चितारले आहे.

मला भेटलेल्या त्या मुली बिम्मच्या वयाच्या नसल्या तरी प्रवृत्तीच्या म्हणाव्या लागतील. बिम्मच्या बहिणीने- बब्बीने त्याला पहिल्याने पाहताक्षणीच ’हा बिम्म आहे’ असे जाहीर केले होते. तसेच या दोघी भेटल्या तेव्हा मलाही ’अरे या तर दोन बब्बी आहेत’ असे म्हणावेसे वाटले.

- oOo - 

 

संबंधित लेखन: बिम्मच्या पतंगावरून - १ : पहिले पाऊल  


हे वाचले का?

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४

आरसा दाखवणारा 'रेगे'

पौगंडावस्था आणि तारुण्य या सीमारेषेवर उभा असलेला कुणी एक रेगे. त्या वयात संभ्रम कमी होत त्याची जागा प्रचंड ऊर्जा आणि ऊर्मीने घेतलेली असते. याच वयात माणसे अधिक प्रयोगशील असतात, धाडसी असतात. बेदरकारपणा, धोका पत्करण्याची तयारी याच काळात सर्वात अधिक असते. अगदी रेगे सारखा पापभीरू मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगाही त्याला अपवाद नसतो.

RegePoster

दहीहंडी पाहायला गेलेला रेगे. योगायोगानेच तिथल्या हाणामारीत सहभागी असल्याच्या संशयाने त्याची वरात पोलिस स्टेशनात आणली जाते. त्याच्यासारख्या पार्श्वभूमीच्या तरुणाला पोलिस स्टेशनचे आतून दर्शन घडावे अशी वेळ आलेली नसतेच. त्यामुळे एकीकडे भलत्याच लफडयात अडकल्याची, परीक्षा बुडण्याची आणि मुख्य म्हणजे आई-वडील काय म्हणतील ही अगदी खास मध्यमवर्गीय भीती आहेच, पण त्याच वेळी 'आयला, आपण पहिल्यांदाच पोलिस स्टेशन मध्ये आलो ते ही अरेस्ट होऊन' या विचाराने त्याला सॉलिड थ्रिल वगैरे वाटते.

इथेच त्याला 'एम भाय' चे पहिले दर्शन घडते. भाय'ला सलाम करणारे, त्याच्या शब्दाखातर रेगेला सरळ सोडून देणारे पोलीस बघून हा एम भाय एकदम भारी माणूस आहे असे त्याला वाटून जाते. पुढे वेगवेगळ्या वळणावर येणार्‍या लहान सहान अडचणी, धोके यातून भाय चुटकीसरशी मार्ग काढतो हे पाहून तो एम भाय चा भक्त होऊन जातो. इतका की ज्या मित्रामुळे एम भाय ची ओळख झाली त्या मित्राने दिलेला धोक्याचा इशाराही त्याला मनावर घ्यावासा वाटत नाही.

कथेचा दुसरा पदर आहे तो काही सत्य घटनांवर आधारित किंवा त्यांच्याशी नाते सांगणारा. इन्स्पेक्टर प्रदीप शर्मा, सचिन वाझे या एन्काऊंटर स्पेशालिस्ट मंडळींची कथा. ही कथा तशी बरीच गुंतागुंतीची. अंडरवर्ल्डशी असणारे पोलिसांचे संबंध, त्यातूनच उभे केलेले खबरे आणि वैयक्तिक प्रॉपर्टी. पोलिसांनी भाई लोकांचा, त्यांच्या माणसांचा आणि भाई लोकांनी पोलिसांचा करून घेतलेला वापर. एकाच वेळी पोलीस आणि गुन्हेगारांच्या अशा 'परस्पर-सहकार्याची' आणि संघर्षाचीही कथा. कथेतील गुंतागुंत लक्षात घेऊन त्यातील पात्रे फार तपशीलाने उभी केलेली नाहीत. पटकथेचा गाभा नेमका ठरवून अन्य घरगुती वा तपशीलाच्या बाबींना सरळ फाटा दिल्याने (अपवाद प्रदीप शर्मा या पात्राचा पहिला प्रवेश. पण इथे त्यांचे ते प्रसिद्ध वाक्य 'त्याला वापरलेल्या गोळ्यांचा हिशेब द्यावा लागत नाही' हे वापरण्याच्या हेतूने - वा अट्टाहासाने - आले असावे.) हा भाग अतिशय उत्तम उभा राहिलेला दिसतो. पटकथेने व्यवस्थित हाताळलेली ही गुंतागुंत संकलनाने मात्र थोडी घसरलेली दिसते. कालक्रमाबाबत अधेमधे संभ्रम निर्माण होऊ शकतो.

या कथानकाबाबत एक आश्चर्यजनक बाब अशी की ही वास्तवातली नावे नि प्रसंग वापरून उभी केलेली कथा कोणत्याही वादाच्या भोवर्‍यात सापडलेली दिसत नाही. निर्माता-दिग्दर्शक मनसेचा असल्याचा फायदा म्हणायचा की युती सरकारच्या काळात म्हणत तसे 'गोंधळ घालणारेच निर्माते असल्याने गोंधळ घालणार कोण?' असा प्रश्न आहे.

तर रेगेसारखा पापभीरू मध्यमवर्गीय तरुण जेव्हा पोलिस नि गुन्हेगार यांच्या या जगात अचानक दाखल होतो तेव्हा त्याचे भावविश्व पुरे ढवळून निघाले नाही तरच नवल. प्रथम सॉलिड हीरो वगैरे वाटणारे भाई लोक जेव्हा त्याने अति उत्साहाने देऊ केलेल्या मदतीचा फायदा घेऊन आपले खरे रंग दाखवू लागतात तेव्हा त्यांच्याबरोबर फरफटत जाण्यापलीकडे त्याच्या हाती काही उरत नाही. त्याच वेळी दुसरीकडे 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीदवाक्य मिरवणारे पोलिसांचे जगही धक्कादायकरित्या वेगळे असते याचे भान होऊन तो अधिकच कोसळत जातो.

गुन्हेगारांचे, भ्रष्ट पोलिसांचे जग हे काही चित्रपटसृष्टीला नि तुम्हा आम्हा प्रेक्षकांना नवीन नाहीच. आपली हिन्दी चित्रपटसृष्टी वर्षानुवर्षे या पार्श्वभूमीवरील चित्रपटांच्या आवृत्या मागून आवृत्या काढत खोर्‍याने पैसे ओढते आहे. प्रेक्षकही चमचाभर हिंसाचार चाटवणासारखा घेऊन त्या नशेत 'आपल्या जगात हे नाही' याबद्दल स्वत:ला सुदैवी समजत जगत असतात. पण असा तुमच्या आमच्यातलाच एखादा रेगे जेव्हा या जगात फेकला जातो, किंवा ते जगच त्याला ओढून आपल्यात नेते तेव्हा हे आपल्या दारी येऊन पोचले असल्याचे भान ते आपल्याला देते. 'रेगे' तुमच्या समोर ही शक्यता मांडतो आहे, तुम्ही त्याबाबत गाफील राहू नये म्हणून.

चित्रपटाच्या अखेरीस मनात असा विचार आला की "तुमच्या आमच्या मनातही असाच एखादा रेगे असतो का? आसपास असे रेगे दिसतात का? एखादा 'एम'(!) भाय बरेच काही चुटकीसरशी करून दाखवतो - किंवा करून दाखवण्याचा दावा करतो - म्हणून त्याच्या कह्यात जाणारे आणि याची परिणती नक्की कशात होते याबाबत बेफिकीर असणारे!" चित्रपटाला शेवट असतो तो आपण पाहतो पण वास्तवात आपणही रेगेच्या वाटेनेच जाणार की शहाणे होणार आहोत?

- oOo -


हे वाचले का?