समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - १ : प्रस्तावना व भूमिका << मागील भाग
पहिले कारण तसे तात्कालिक म्हणता येईल परंतु लेखाची प्रेरणा मुख्यतः इथेच आहे. मे महिन्यात श्रावण मोडक आणि संजय संगवई या दोन मित्रांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुण्यातील पत्रकार भवनात "राजकारणाचे नवे संदर्भ - नवी आव्हाने" या विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. वक्ते होते मेधाताई पाटकर आणि प्रा. जयदेव डोळे. दोन्ही आदरणीय व्यक्ती! एक पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ती, इतर अनेक कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान बनून राहिलेली व्यक्ती आणि एक समाजवादी विचारवंत यांच्या दोन दृष्टीकोनातून नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचे, त्यांतील अनेक संदर्भांचे विश्लेषण ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती. त्यात मेधाताई स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या असल्याने, त्यांनी ती सारी धामधूम प्रत्यक्ष अनुभवली असल्याने तो ही एक पैलू त्यांच्या विश्लेषणाला असेल अशी आशा होती.
पण दुर्दैवाने दोन्ही व्याख्यानांत शीर्षकांतील मूळ विषयाचा गंधही नव्हता. पूर्णवेळ मोदींच्या विजयाची तथाकथित काळी बाजू नि आपण तसेच आपले केजरीवाल कसे प्रामाणिकपणे लढलो वगैरे आत्मसमर्थन चालू होते. वृत्तपत्रांतून, टीवी चॅनेल्सवरून, सोशल मीडियामधून होणार्या सर्वसामान्यांच्या चर्चेतून मोदींचे गुणदोष उगाळले जातच होते, त्यापलिकडचे काही या दोघांकडून मिळणे अपेक्षित होते. पण दोन्ही वक्त्यांनी याबाबत पूर्ण भ्रमनिरास केला असे म्हणावे लागेल. मेधाताईंनी चवीपुरता अधेमधे आत्मपरिक्षणाचा सूर लावला पण जयदेव डोळे मात्र फक्त नि फक्त मोदींना बडवण्यात मश्गुल दिसले.
वाया गेलेल्या पोराचे आईबाप त्याच्या तथाकथित कुसंगतीला दोष देतात पण आपण अपत्यसंगोपनात कुठे कमी पडलो का हे तपासत नाहीत, भारतात बलात्काराच्या वाढत्या प्रमाणाबद्दल सरसंघचालक पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणाला दोषी ठरवतात पण आपल्या संस्कारात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन भोगवस्तू म्हणून आहे हे मान्य करणे सोडाच तपासून पाहण्याचेही नाकारतात. त्याच रांगेत या देशाचा अर्वाचीन बौद्धिक वारसा निर्माण करणारे समाजवादीही आता सामील झाले आहेत हे दृश्य वेदनादायी आहे. आपण सारे धुतल्या तांदुळासारखे, चुका करणारे फक्त समोरचे ही आत्मसंतुष्ट, आत्मविघातक विकृती सार्या देशाच्या अधोगतीच्या मुळाशी आहेच. ती उखडून फेकण्यासाठी पुढाकार घेणे ही वैचारिक नेतृत्व करू इच्छिणार्या पुरोगामी विचाराच्या व्यक्तींची जबाबदारी नव्हे का?
दुसरे कारण म्हणजे दीर्घकालानंतर समाजवादी कार्यकर्त्यांनी प्रथमच निवडणुकीच्या राजकारणात केलेला प्रवेश. आज समाजवादी विचारसरणी असलेल्या कार्यकर्त्यांना 'आम आदमी पार्टी (आप)'च्या रूपाने एक पर्याय उपलब्ध झाला. राजकीयदृष्ट्या अस्तित्वहीन झालेल्या कार्यकर्त्यांना अचानक मुख्य धारेबाहेरचा पर्याय मिळाला जो त्यांना दीर्घकाळ कार्यकर्ता म्हणून राजकारणात नसूनही थेट राजकारणाच्या मुख्य धारेत नेऊन सोडत होता. (समाजवाद्यांना अशा 'शॉर्टकट'ची भूल पडली हे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. कदाचित बुडत्याला काडीचा आधार वाटावा तसे काहीसे झाले असावे.)
अनेक समाजसेवी संघटनांनी आपले वजन 'आप'च्या पारड्यात टाकले, इतकेच नव्हे तर मेधाताईंसारखे काही थेट त्यात सामील झाले. पुण्यातून सुभाष वारेंसारखे चळवळीतले नेते उभे होते, समाजवादी चळवळीतले (सगळे नाही तरी निदान माझ्या माहितीतले काही) कार्यकर्ते त्यांच्यासाठी काम करत होते. तेव्हा हा जो निर्णय अनेक कार्यकर्त्यांनी घेतला त्याच्या मागे नक्की काय विचार होता आणि त्यातून त्यांनी काय बोध घेतला, या राजकीय डावातून, त्यातून हाती लागलेल्या पराभवातून त्यांना नक्की काय गवसलं याचीही उत्सुकता होती नि त्याच दृष्टीकोनातून या व्याख्यानातून काही विवेचन ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती ती पूर्णपणे फोल ठरली.
भाजपसाठी सारे उद्योजक पैसे घेऊन उभे होते, त्यांना एकवीस हजार कोटी पुरवले, ईवीएम मधे फेरफार केले हे जुने रडगाणे आपण किती दिवस गाणार? २००४ च्या 'इंडिया शायनिंग' च्या पराभवानंतर भाजपनेही ’ईवीएम'बाबत हेच रडगाणे आळवले होते. जिंकणार्याने व्यवस्थेवरचा विश्वास प्रगट करावा नि हरलेल्याने त्यातील तथाकथित कमकुवत बाजूंना आपल्या पराभवाबद्दल जबाबदार धरावे हा ही शेवटी त्या व्यवस्थेचाच भाग आहे. आधी त्याच्यासकट त्या व्यवस्थेत उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग निर्माण करायला हवेत. ते कुठले? पैसा ही एक शक्ती (power) असेल नि (आणि मीडिया ही दुसरी) तिच्या आधारे सत्तेचा सोपान चढता येत असेल आणि ती शक्ती - कदाचित आपल्या अंगीकृत तत्त्वज्ञानाच्या मर्यादेमुळे - आपल्याला पुरेशी उपलब्ध होणे अवघड असेल तर तिला समर्थ पर्याय म्हणून अन्य कुठली शक्ती आपण उभी करू शकतो का असा मूलभूत वेगळा विचार का करता येऊ नये?
सतत धनदांडग्यांच्या नावे नि माध्यमांच्या नावे बोटे मोडण्याने चार सहानुभूतीदार मिळतील, राजकीय सत्ता मिळणार नाही याचे भान कधी येणार? इथे समाजवादी कार्यकर्तेच नव्हे तर एक राजकीय शक्ती म्हणून त्यांनी निवडलेला पर्याय 'आप'ही फसला का?’ असा प्रश्न विचारून त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न का केला गेला नाही. केजरीवाल यांनी आधी अण्णांच्या आंदोलनाच्या माध्यमातून जी जनक्षोभाची लाट निर्माण केली त्याचे राजकीय फलित आपल्या पदरी पाडून घेण्यात त्यांना आलेले अपयश, त्यांनी निर्माण केलेला प्रचंड काँग्रेसविरोध, पण स्वतः किंवा ’आप’ हा काँग्रेसला योग्य पर्याय आहोत याबाबत लोकांना आश्वस्त करण्यात त्यांना आलेले अपयश, यातून अपरिहार्यपणे जनता तिसरा पर्याय म्हणून भाजपकडे गेली, ही संगती तपासून पाहण्याची यांना अजून गरज वाटत नाही. तेव्हा मोदी सरकार येणे हे जर ते पाप वा दुश्चिन्ह समजत असतील तर 'आप' आणि त्याच्या दावणीला आपापल्या संघटना बांधणारे हे स्वतः त्याच पापाची वाटेकरी आहेत हे स्वच्छ डोळ्याने ते कधी पाहणार आहेत?
(क्रमशः)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा