गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

’गोमा गणेश, पितळी दरवाजा’

’गोमा गणेश, पितळी दरवाजा’ हा किस्सा कोणाकोणाला माहित आहे?

कुणी म्हणतात पेशवाईत सवाई माधवरावांच्या काळातील (अल्पवयीन राजा आणि केवळ आढाव असलेला त्याचा सल्लागार यामुळे प्रशासनात आलेल्या ढिलाईचा फायदा घेऊन कदाचित), तर कुणी राष्ट्रकूट, कुणी कृष्णदेवरायाच्या काळातला. ’पराया माल अपना’ ही काही केवळ अर्वाचीन हिंदुत्ववाद्यांचीच मक्तेदारी आहे असे नाही. पंचतंत्र, इसापनीती, मुल्ला नसरुद्दिन, तेनाली राम, बीरबल आदिंच्या कथांमध्ये देवाणघेवाण होतच असते. त्यात एखादी कथा, एखादा किस्सा नक्की कुठून कुठे गेला हे अस्मितेचा दंश झालेल्याखेरीज इतर कुणीच ठामपणॆ सांगू शकत नाही. 

तो किस्सा असा होता. एका चतुर व्यक्तीने पितळी दरवाजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या वेशीवर ठाण मांडले. जणू राजानेच जकात वसुली वा मालाच्या वाहतुकीचा परवाना देण्यास आपली नेमणूक केली आहे अशा आविर्भावात तो तिथे मालाच्या गोण्यांवर शिक्के मारुन त्याबदली व्यापार्‍यांकडून पैसे घेई. अर्थात त्याबाबत त्याने स्वत: कधी काहीच सांगितले नव्हते. पण एकाने शिक्का मारून घेतला म्हणून दुसर्‍याने... असे करत (’मंकीज सी मंकीज डू’ या न्यायाने) हळूहळू साराच माल हा गोमा गणेशच्या शिक्क्याने वेशीतून आत जाऊ लागला. यातून त्याने भरपूर पैसा कमावला. पुढे राजाला याची कुणकुण लागल्यावर त्याने गोमा गणेशला पकडून आणवले. पण गोमाने आपली बाजू मांडताना असे म्हटले की, ’हा शिक्का मारुन घ्यायलाच हवा अशी मी कुणाला सक्ती केलेली नव्हती. राजाने असा आदेश दिला आहे असेही मी कधी कुणाला सांगितले नव्हते. ज्याला शिक्का मारुन हवा त्याने एक होन द्यावा नि मी शिक्का मारुन घ्यावा इतकेच मी म्हटले होते. मी फक्त ’इथे मालावर शिक्के मारुन मिळतील’ इतकेच लिहिले होते. हे त्याविना माल आत नेता येणार नाही असेही मी कुठले म्हटलेले नाही. ज्या व्यापार्‍यांनी खुशीने शिक्के मारुन द्या म्हटले त्यांना मी ते उमटवून दिले इतकेच.’ गोमा गणेश ने तसा कोणताच गुन्हा केलेला नसल्याने राजाला त्याला मुक्त करावे लागले.

त्याच्या शिक्क्याचा मजकूर होता ’गोमा गणेश, पितळी दरवाजा.’

आज याची आठवण झाली ती ’५९ मिनिटात कर्ज’ योजनेमुळे. यात म्हणे ’कॅपिटा वर्ल्ड’ नावाची एक कंपनी सध्या ’गोमा गणेश’चा कित्ता गिरवते आहे. फरक इतकाच आहे की हा शिक्का ’गोलमाल गणेश’ राजानेच त्यांना बनवून दिला आहे. प्रत्येक अर्जदाराकडून हजार रुपये घेऊन ही कंपनी म्हणे ५९ मिनिटात कर्ज मंजूर करते... म्हणजे ’गोमा गणेश, पितळी दरवाजा’ असा शिक्का असलेली इमेल तुम्हाला पाठवते. तिथून पुढे तुमचे भवितव्य सरकारी बॅंकेच्या अधीन. एक मिनिट... पण सरकारी बँकेकडे मी थेटही कर्ज मागू शकतोच की. आणि त्या अर्जाची सारी प्रोसेस आताही करायची आहेच. मग कॅपिटा वर्ल्ड’ने नक्की काय केले? तर केले हे की हजार रुपये घेऊन तुमच्या अर्जावर ’गोमा गणेश, पितळी दरवाजा’ हा शिक्का उमटवून दिला आहे. त्याची सक्ती नाही हे खरे, नि त्याचा उपयोग नाही हे ही खरे. पण मधल्या मधे गोमा गणेश मालामाल होऊन जातो आहे.

सरकारी पैसा थेट धाकल्या अंबानींच्या खात्यात टाकण्यासाठी ’शेती कर्जाची पाईपलाईन’ या गोलमाल गणेश राजाने यापूर्वीच तयार केली आहे. तसाच हा ’५९ मिनिटात कर्जा’चा शिक्का आपल्या अहमदाबादच्या भाईबंदांसाठी तयार करुन दिला आहे.

#प्रधानप्रचारमंत्री ’न खाऊंगा, न खाने दूंगा’ म्हणत सत्तेवर आले. पण ’... अपने हाथोंसे खिलाऊंगा’ हा उत्तरार्ध त्यांनी तेव्हा आपल्याला सांगितला नव्हता.

#गोलमालगणेश
#उल्लूबनाविंग
#म्हणे५९मिनिटातकर्ज
#अपनेहाथोंसेखिलाऊंगा

बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८

भूतकाल-पूजकांचा वांझोटेपणा

भविष्यातच शक्यता शिल्लक असतात, भूतकाळात फक्त नोंदी!

शक्यतांतून निवडीचे स्वातंत्र्य घेऊ इच्छिणारे, निवडलेल्या शक्यतेसाठी झगडण्याची जिद्द असलेले, कष्ट घेऊन तिला मूर्त स्वरुपात आणू पाहणारे, भविष्याकडे बघत वाटचाल करतात. त्यातून नवनिर्मितीचा, यशाचा आनंद आणि परिपूर्तीचे समाधान ते उपभोगू शकतात.

उलट भूतकाळाबाबत शक्यता अस्तित्वात नसतात, तिथे फक्त वास्तवात उतरलेल्या शक्यतेची नोंद असते. त्याबाबत वर्तमानात काहीच बदल करता येत नसतो, करावा लागत नाही. तिला आहे तसे स्वीकारावे लागते. त्यासाठी कोणतेही कष्ट वा संघर्ष करावा लागत नाही. म्हणून कर्तृत्वशून्य नि आळशी जमात भूतकाळात रमते! इतरांनी कढवलेले तूप आयते वाढून घेते.

तिला सर्जनशीलतेचा वाराही लागत नाही, नवनिर्मितीची नि तिची तोंडओळखही नसते. आणि निर्मिती-क्षमतेबाबत वांझ असल्याने तिला स्वत:ची रेघ मोठी करता येत नाही. म्हणून मग इतरांच्या रेघा खोडून लहान करण्याचा आटापिटा करत राहते.

- बाबा रमताराम

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

फितूर सेनापतीचे सैनिक

(’लोकसत्ता’चा ’कडकलक्ष्मीच्या गुदगुल्या’ हा अग्रलेख वाचून झाल्यावर...)

काल नि परवा दोन प्रतिसादांत हाच मुद्दा मांडला होता. सेनेचे रामंदिर राजकारण हे भाजपच्याच पथ्यावर पडणारे, कदाचित त्यांच्याच संगनमताने चालले आहे.

भाजपने गेली तीसेक वर्षे राममंदिराचा मुद्दा हा हर मर्ज की दवा’ म्हणून वापरला. ते अडचणीत असले, निवडणुका जड जाणार असे दिसले की हटकून संघ परिवारातील कुणीतरी- बहुधा सरसंघचालक, राममंदिरावर भाष्य करतो. एखादा खूप प्रभावी विरोधी मुद्दा असला की विहिंप गुरगुर करू लागते. पण आता त्यांच्या तोंडून तो मुद्दा ऐकला की ’हां, आले हे तोच मुद्दा दळायला घेऊन. करायला काही नको. नुस्ते भकत बसतात.’ अशी तीव्र प्रतिक्रिया हिंदुत्ववादी असलेल्या नि नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मंडळींकडून ऐकू येऊ लागली आहे. तिचा आवाज फार वाढण्याच्या आत माघार घेऊन आता सेनेचा मोहरा पुढे करुन तोच मुद्दा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे.

धार्मिक मानसिकतेचा हाच प्रॉब्लेम असतो. एखादा मुद्दा, विचार, परंपरा कालबाह्य झाला आहे याची समजच त्यांना नसते, किंवा ते मान्य करण्याची त्यांची तयारी नसते. एकदा यश देणारे चिरंतन तेच नि तितकेच यश देत राहील अशी त्यांना ठाम खात्री असते. तसे होईनासे झाले की मुळातूनच बदल करण्याऐवजी ते फक्त कर्मकांडांच्या वा मांडणीत बदल करुन आधी मिळाला तितकाच फायदा मिळेल अशी आशा करत राहातात. हे म्हणजे वाचून झालेल्या पुस्तकाचे कवर बदलून नवे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केल्यासारखे आहे, किंवा डिजिटल वीडिओचे नाव बदलून नवा वीडिओ पाहतो आहे अशी बतावणी करण्यासारखे आहे.

हा सारा खटाटोप मनाने हिंदुत्ववादी, पण केवळ केंद्राच्या अपयशी नि भोंगळ कारभारामुळे आता भाजपविरोधी झालेल्या नागरिकांची मते, विरोधकांकडे न जाता संभाव्य जोडीदार पक्षाकडेच जातील, याची खातरजमा करण्याचा प्रकार आहे. गोव्यात वेलिंगकरांची जी भूमिका होती तीच इथे उद्धव ठाकरेंची आहे. भाजपविरोधी मते आपल्या पारड्यात जमा करुन, निवडणुकीनंतर युती करुन ती पुन्हा भाजपच्या दावणीला बांधण्याचा हा प्रकार आहे. पूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीबाबत जे घडत असे तोच प्रकार आता भाजप-सेनेबाबत व्हावा अशी सोय केली गेली आहे. पूर्वी कॉंग्रेसवर नाराज असलेला, पण अनेक वर्षे त्याच मुशीत वाढलेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत देई, आणि उलटही. त्यामुळॆ कॉंग्रेस नि राष्ट्रवादी आघाडी करण्यापेक्षा विरोधी लढले तर अधिक फायदा होई. आणि जिथे कुण्या एकाला बहुमत मिळत नसे, तिथे पुन्हा आघाडी करुन सत्ता वाटून घेता येई. फरक इतकाच की, तेव्हा कॉंग्रेस हा डिफॉल्ट चॉईस होता आता भाजप आहे, आणि राष्ट्रवादीची भूमिका सेनेने करावी असा त्यांचा प्रयत्न आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरील भेटीत सेनेला ही नवी भूमिका घेण्याचे ठरले असावे.

यात सेनेचाही फायदाच आहे. चार वर्षे भाजपच्या नावे दुगाण्या झाडल्यानंतर युती करणे हा मुखभंग ठरला असता. त्यामुळे राममंदिर नि हिंदुत्वाची महाआरती सुरु केल्याने निवडणूकपूर्व वा निवडणुकोत्तर युतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ’व्यापक हिंदुत्वासाठी’, ’राम मंदिराच्या निर्मितीसाठी’ आम्ही आमचे मतभेद दूर ठेवले अशी बतावणी करत सेना परत भाजपशी पाट लावायला मोकळी असेल. आणि हा खेळ महाराष्ट्रात यशस्वी झाला तर त्याचेच प्रयोग उत्तरेत गायपट्ट्यातही लावता येतील. अयोध्येची निवड उद्धव यांनी केली ती नेमकी यासाठीच.

अडचण होईल ती लोकसभेच्या वेळी इंगळासारखे लाल लाल डोळे करुन कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर तुटून पडणार्‍या आणि विधानसभेच्या वेळी सेनापतीच्या आदेशावरुन तोच तोफखाना तोंड फिरवून आपल्याच आधी ज्याला राजा मानून त्याच्या चरणी निष्ठा रुजू करणार्‍या, त्याच्यावर आग ओकणार्‍या तथाकथित सैनिकांची. ’साहेबां’नी पुन्हा मांडवली केली नि निमूटपणे तोफांची तोंडे पुन्हा कॉंग्रेसकडे वळवून मारा सुरु करावा लागेल; गेले अडीच-तीन वर्षे राजाला विरोध या मुद्द्यावर ज्यांच्याशी सलगी केली, त्यांना पुन्हा एकवार शत्रू मानावे लागेल.

हे सारे पाहताना मला पुन्हा पुन्हा ’झेंडा’ हा चित्रपट आठवत राहतो. या सार्‍या म्होतूर-काडीमोडाच्या खेळात भरडले जातात ते सामान्य कार्यकर्ते. कालपर्यंत आपला साहेब ज्या पक्षाच्या आणि नेत्याच्या नावे डरकाळ्या फोडत होता, आपल्याला ज्यांच्या विरोधात रान पेटवायला सांगत होता, ज्याच्याखातर आपण मित्र, गावकी, भावकी मध्ये अनेक शत्रू निर्माण करुन ठेवले, तोच आता त्याच पक्षाच्या, नेत्याच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर त्यांची काय अवस्था होत असेल? फेसबुकवरच्या सुखवस्तू, पांढरपेशा नि बोलबच्चन ’कार्यकर्त्यां’बद्दल म्हणत नाही मी (फेसबुकवरचे ’सैनिक’ ही संज्ञा मोठी रोचक आहे. :) ) , नेत्याच्या शब्दाखातर दगडापासून तलवारी पर्यंत वाटेल त्याचा वापर करायला नि ते झेलायला तयार असलेल्या आणि त्यानंतर पदरमोड करुन कोर्टकज्जे करणार्‍या, करियर उध्वस्त करुन घेतलेल्या कार्यकर्त्यांबद्दल बोलतो आहे. वाचाळवीर शाब्दिक खेळ करण्यात वा गैरसोयीच्या मुद्द्यावर सरळ मौन पाळण्यात तरबेज असतात. पण जमिनीवरील कार्यकर्त्याला येईल त्या परिस्थितीला प्रत्यक्ष तोंड द्यावेच लागते.

कार्यकर्ता तत्त्वनिष्ठ असावा, पक्षनिष्ठ असावा की व्यक्तिनिष्ठ हा मोठा कळीचा मुद्दा आहे. कम्युनिस्टांचा अपवाद वगळता तत्त्वनिष्ठ कार्यकर्ते कोणत्याच पक्षाला नाहीत. याचे एक कारण असे की कोणत्याही पक्षाला निश्चित अशी तत्त्वेच नाहीत. इथे मी कम्युनिस्टाबरोबर भाजपचा अपवाद करत नाही. कारण आता तिथे परस्परविरोधी विचारांची कोणतीही निश्चित चव नसलेली भेळ झाली आहे. कदाचित दहा वर्षांपूर्वी मी भाजपचा ही केला असता. त्यांची विचारसरणी मला मान्य नसूनही त्यांच्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या विचारावरील निष्ठा हेच त्यांचे ’प्रमुख’ बाईंडर रसायन होते हे अमान्य करता येणार नाही. कॉंग्रेससारख्या व्यापक छत्रासारख्या पक्षाला बरेच पक्षनिष्ठ कार्यकर्ते आहेत. पण त्यापलिकडे बहुतेक सारे पक्ष हे नेत्यांची खासगी मालमत्ता असल्याने पक्षनिष्ठा नि नेतानिष्ठा यात काहीच फरक उरलेला नाही. नेत्याने हा पक्ष सोडून त्या पक्षात प्रवेश केल्यावर त्याच्यापाठोपाठ जाणार्‍यांची निष्ठा अर्थातच नेत्याशी असते, पक्षाशी नव्हे; तत्त्व म्हणजे काय, ते कशाशी खातात हे तर त्यांना ठाऊकही नसते.

सेनेची वाटचाल युतीला पोषक वातावरण निर्मितीकडेच होते आहे. इतके दिवस ज्या भाजपला शिंगाला शिंगे भिडवली त्यांचाच राममंदिराचा मुद्दा उचलून त्याआधारे युतीचे समर्थन करण्याची सोय करुन ठेवली जात आहे. गेली दोन तीन वर्षे साहेबांच्या आदेशावरुन भाजपवर वार करणार्‍या सैनिकांनी आता शमीच्या झाडावर ठेवलेली कॉंग्रेस-विरोधी शस्त्रे काढून परजायला सुरुवात करावी, म्हणजे आयत्यावेळी स्टार्टिंग-ट्रबल होणार नाही. एकदम यू-टर्न घेण्याचा धोका पत्करण्याऐवजी गाडीची दिशा आतापासून हलके हलके बदलत नेता येईल.

-oOo-

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१८

वर्ड-क्लाऊड सिंड्रोम

WordCloud

’वर्ड-क्लाऊड सिंड्रोम’ नावाचा एक नवा आजार सोशल मीडिया मुळे उद्भवला आहे. लेखकाचा सूर, मुद्दा, भर कशावर आहे, त्याला काय सांगायचे आहे याकडे साफ दुर्लक्ष करुन लोक पोस्टमधील आपल्याला बोलता येईल असे शब्द फक्त उचलतात (हे पाहून मला ’ब्युटिफुल माईंड’ मधला डॉ. नॅश आठवतो!) नि त्यावर चर्चा वा प्रतिसाद करतात.

कालच मी स्टार ट्रेक’ या मालिकेतील एक - माझ्या मते- मननीय संवाद शेअर केला. हा संवाद अवगुण मानल्या गेलेल्या वा नकारात्मक गुण मानल्या गेलेल्या व्यक्तिवैशिष्ट्यांच्या संभाव्य उपयुक्ततेबद्दल होता. १९६६ ची मालिका कदाचित अनेकांना ठाऊक नसेल म्हणून ’ही कुठली? तर सध्या चालू असलेल्या यंग शेल्डन’मध्ये उल्लेख झालेली.’ असा संदर्भ दिला. झाले तेवढेच वाचून शाळेत निबंधात जसे ’... आणि म्हणून मला माझी आई फार्फार आवडते.’ म्हणून शेवट करावा तसे ’मला यंग शेल्डन आवडते/मी पाहतो/पाहते.’ चे प्रतिसाद पडले. एका मित्रवर्यांनी त्यातून नेमके ’आम्ही स्वत:ला तरुण असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतो’ हा निष्कर्षही काढून दाखवला (अर्थात थट्टेने, पण लिहिणार्‍याचा हेतू, लेखनाचा रोख वा सूर बिलकुल ध्यानात न घेता कुठल्याही पोस्टवर आपल्याला अशी भंकस करण्याची परवानगी आहे हा आत्मविश्वास आवडला आपल्याला.)

आज आनंद मोरेने ’लायन किंग’ च्या निमित्ताने वडील/मुलगा संबंधाबद्दल एक सुरेख पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यानेही प्रस्तावनेखातर एका लेखकाच्या वडिलांप्रती न्यूनगंडाचा उल्लेख केला आहे. तिथे खाली तो लेखक कोण, मग त्या लेखकाचा मी फॅन होतो/ते की नाही आणि ’लायन किंग’ मला कसा फार्फार आवडतो, वगैरे चर्चा सुरु झाली आहे. 

हे मूळ पोस्टच्या मुद्द्याशी सुसंगत नाही असे सांगितले, तर बहुतेकांचा ’ते कसे काय बुवा? ’लायन किंग’ असे मूळ पोस्टमध्ये लिहिले आहे की. त्याला अनुसरुनच लिहितोय की?’ असा ग्रह होईल याची खात्री आहे. ’इतिहासाच्या अभ्यासाचे सामाजिक बांधिलकीवर परिणाम’ या विषयावर पोस्ट लिहिली असेल तर, खाली इतिहास या शब्दाच्या व्युत्पत्तीवर चर्चा करणारे महाभाग सापडतील. मुद्दा समजून घेणे हा अस्तंगत झालेला प्रकार आहे. सोशल माध्यमांमुळे ’मला हवे तेच मी अर्थ काढणार, मला हवे तेच लिहिणार’ हा एक प्रकारचा सुप्त उद्दामपणा वा बेफिकिरी रुजली आहे.

मला अनेक लोक मी राजकीय मुद्द्यांवर फार बोलतो, किंवा लोकानुनय करणार्‍या/भंकस करणार्‍या पोस्टच लिहितो असा आक्षेप घेतात. मी विस्ताराने लिहावे असा त्यांचा आग्रह असतो. गंमत म्हणजे जेव्हा जेव्हा मी तसे लिहितो तेव्हा ते - बहुधा ’एवढं मैलभर लिहिलेलं कोण वाचणार?’ म्हणून - त्या पोस्टवर फिरकत नाहीत. बहुधा जे तुमच्याकडे नाही त्याचा आग्रह धरणे हा ही एक सिंड्रोमच असावा. गंभीर वा मुद्द्याधारित लिहिले तरी त्याचे काय होते याचा माझी कालची पोस्ट आणि आनंदची आजची पोस्ट हा उत्तम वस्तुपाठ ठरावा. 

’वार्‍यावरची वरात’ (चला या पोस्टवर आता यावर चर्चा करु) मधला तपकिरीचा फिरता विक्रेता (तपकिरीची उपयुक्तता किंवा आमचे आजोबा कसे तपकीर ओढत यावर एक प्रतिसाद होऊन जाऊ दे.) म्हणतो तसे ’सीरियस माल खपत नाही आमच्या गावात.’ किंवा ’आम्हाला आपले सस्त्यात मजा पाहिजे’ असेच फेसबुक आणि फेसबुकींचे धोरण असते. राजकीय पोस्ट यासाठीच लिहिल्या जातात. मी ही भंकस करत बसतो ते त्यासाठीच. इथे तोच माल खपतो. उरलेला आमचा माल आम्ही खपवायच्या फंदात पडत नाही.

आता यावर ’म्हणजे तुम्हाला हवे तेच प्रतिसाद आम्ही लिहायचे वाटतं’ असा दोष तुमच्या माथी मारणारा प्रतिवाद येणारच आहे. भंकस करण्यासाठी लिहिलेली पोस्ट कुठली आणि गांभीर्याने घेण्याची कुठली याचे तारतम्य विकसित करणे आवश्यक; लेखनातील मुद्दा कोणता हे समजून घेणे, त्याशिवाय त्यातील शब्दांवर, उल्लेखांवर भौगोलिक, वैय्याकरणीय, ऐतिहासिक, अनुवंशशास्त्रीय, रासायनिक अशा आपल्या मनाला वाटेल त्या दृष्टिकोनातून न लिहिणे इतके करणे जमले तर पहा असे म्हणण्याखेरीज फारसे काही करता येण्यासारखे नाही.

-oOo-

सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८

Punchतंत्र: बेडकांचा राजा

एकदा बेडकांना आपल्याला राजा हवा असे वाटू लागले...

ते देवबाप्पाकडे गेले. ते म्हणाले, 'आम्हाला राजा हवा.' देवबाप्पाने त्यांना एक लाकडाचा ओंडका दिला.
त्याला मिरवणुकीने आणून त्यांनी राजा बनवले. हा राजा काही न करता एका जागी पडून असे. थोडक्यात, बेडकांना आपले आहार-भय-निद्रा-मैथुन लिप्त आयुष्य जगण्याची मोकळीक त्याने दिली होती.

पण मग बेडकांना वाटू लागले की ’ह्यॅ: हा कसला राजा. याच्या राज्यात काहीच ’हॅपनिंग’ नाही.’ मग त्यांनी ठरवले की पुन्हा देवबाप्पाकडे जाऊन नवा राजा मागायचा. ते म्हणाले, ’आता आम्हाला असा बाहेरुन आणलेला राजा नको. आमच्या तळ्यातला किंवा निदान आमच्यासारखाच जलजीवी असा एखादा राजा द्या.’ देवबाप्पाने त्यांचे म्हणणे ऐकले. त्याने एका बगळ्याला त्यांचा राजा म्हणून पाठवले.

हिरवट-मळकट रंगांच्या बेडकांना त्याचा पांढराशुभ्र रंग पाहून ’आपला राजा होण्यास याहून लायक कोण असणार?’ असे वाटू लागले. एकमेकाला तसे सांगून ते ’हा राजा भारी आहे.’ म्हणू लागले. हा राजा अधून मधून आकाशातून एखादी लहानशी चक्कर मारुन येई. त्या त्याच्या ’भरारीला’ पाहून बेडूक खूश होत. ’बघा आमचा राजा’, ते म्हणत.

TheKingAndTheSubject
छायाचित्र: Mike Corey
बरेचदा हा राजा एक पाय मुडपून तळ्यात ध्यानस्थ उभा असे. जेव्हा तो तसा उभा असतो तेव्हा तळ्यातील माशांची, बेडकांची संख्या घटते, असे काही चाणाक्ष बेडकांच्या लक्षात आले. त्यांनी इतर बेडकांना सावध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ’तुम्हाला आपल्या समाजाचं नि तळ्याचं काही भलं झालेलं बघवत नाही. जेव्हा पाहावं तेव्हा खोड काढत असता. 'खुद्द देवबाप्पाने दिलेला हा राजा असे कसे करेल?’ म्हणून त्यांनी धुडकावून लावले. काहींनी त्याहीपुढे जाऊन तळ्यातले काही मासेच ’दुर्दरभक्षी’ झाले असल्याचा संशय व्यक्त केला. असल्या परप्रांतीयांना ताबडतोब तळ्यातून हाकलून देण्याची मागणी त्यांनी राजाकडे केली. राजाने नेहमीप्रमाणे त्यावर मौन धारण करुन एक लहानशी फ्लाईट पकडून तो शेजारच्या झाडावर जाऊन बसला. राजाची ही भरारी गरुडापेक्षाही भारी होती, असे काही बेडकांनी एकमेकांना पटवून दिले.

आणखी काही महिने गेले आणि बेडकांची, माशांची संख्या आणखी घटू लागली. दरम्यान नवा राजा आपल्या आणखी काही भाईबंदांना घेऊन आला. त्यातला एक त्याचा विशेष लाडका होता. आल्याआल्या त्याने प्रत्येक बेडकाने आपले खाणे प्रथम राजासमोर आणून ठेवले पाहिजे, मग राजेसाहेब त्यातून सर्वांना न्याय्य वाटप करतील असे सांगितले. त्यातून अनेक बेडकांनी चिखलात दडवून ठेवलेले अतिरिक्त खाणे बाहेर येईल नि प्रत्येकाला पोटभर मिळेल असा त्याचा दावा होता.

रोजचे अन्न त्या त्या दिवशीच मिळवून खाणार्‍या बेडकांना ’हां. म्हणजे कुणीतरी जास्त खाते म्हणून आम्हाला हल्ली पोटभर मिळत नाही.’ असा साक्षात्कार झाला. ’बरे झाले राजाने बरोबर कारण शोधून त्यावर उपाय केला ते. खरे तर यामुळे होणार्‍या उपासमारीतून काही बेडकांचे निधन होत आहे. पण याचा फायदा घेऊन काही दुर्दरद्रोही बेडूक 'राजाच त्यांना गट्ट करतो' असा अपप्रचार करत आहेत.’ असे ते म्हणू लागले.

त्या दिवसापासून सर्व बेडूक आपापले अन्न प्रथम राजाकडे आणून देत. त्यानंतर तो देईल तो वाटा घेऊन तो भक्तिभावाने भक्षण करीत आणि म्हणत, ’साठवणखोर आणि दुर्दरद्रोही बेडकांची कशी जिरवली राजाने’. राजाकडून परत मिळणारा वाटा जसजसा कमी होत गेला तसतसे पुरेसे अन्न न मिळाल्याने काही बेडूक दुर्बळ होऊ लागले, काही मेले.

’दीर्घकालीन फायद्यासाठी मेलेल्या बेडकांचे बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही,’ अशी गर्जना राजाने केली. अर्धपोटी बेडूक खूश झाले. हे दुबळे बेडूक वेगाने नाहीसे होऊ लागले. ’दुबळ्यांची शिकार अधिक सोपी असते. शिकारी नेहमी अशाच दुबळ्यांवर नजर ठेवून असतात.’ असे चाणाक्ष बेडकांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण राजनिष्ठ बेडकांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. 'दुर्दरराष्ट्राच्या व्यापक हितासाठी कुणीतरी बलिदान करायला हवे' हे त्यांना पुरेपूर पटले होते. एवढे होऊनही ते साठवणीखोर बेडूक नक्की कोण होते/आहेत हे बेडकांना कधीच समजले नाही.

यानंतर ’तळेच श्रेष्ठ आहे, जमिनीचा मोह धरु नका, तो तुमच्या अध:पाताला कारणीभूत ठरला आहे नि भविष्यातही ठरेल’ असे राजाने बजावल्याने सारे राजनिष्ठ बेडूक जमिनीवर पाऊल ठेवेनासे झाले. पण त्यामुळे जमिनीवरच्या अन्नाचा पुरवठा थांबल्याने, त्यांच्या अन्न संग्रहाला ओहोटी लागली होती. पण या कामचुकारपणाबद्दल राजाने त्यांची कान उघाडणी केली, आणि स्वत:चा राखीव हिस्सा दुप्पट करुन ’व्यापक हितासाठी हे आवश्यक आहे असे बजावले. अन्नाचा हिस्सा कमी झाल्याने राजनिष्ठ बेडूक शारीरिकदृष्ट्या आणि म्हणून मानसिकदृष्ट्या आणखीनच दुबळे होत गेले.

पण काही बंडखोर मात्र ’आपण उभयचर आहोत. पाण्यासोबतच जमिनीवर राहण्यासाठीच आपल्या शरीराची जडणघडण आहे.' असे म्हणत राजाचा सल्ला धुडकावून लावू लागले. हे बेडूक आपण उभयचर असल्याचा फायदा घेऊन जमिनीवरील अन्नही मिळवत असत. दिवसेंदिवस घटत चाललेल्या तळ्यावर अवलंबून राहून जगणे हा मूर्खपणा आहे हे त्यांना पटले होते. आणि नेमक्या अशाच परिस्थितीत 'केवळ तळ्यातच राहा’ म्हणणारा राजा बेडकांच्या विनाशाला कारणीभूत होणार आहे, अशी त्यांची खात्रीच झाली होती. याबद्दल स्वत:ला खरे दुर्दरनिष्ठ म्हणणारे, वास्तवात राजनिष्ठ असणारे त्या बंडखोरांना तुच्छपणे ’अर्बन दुर्दर’ म्हणू लागले. जमिनीवरही जात असलेल्या या बंडखोर बेडकांना असा शोध लागला की साठवणीखोर बेडूक नावाचे कुणी नव्हतेच. उलट जे अन्न बेडूक आणून देत ते राजाचे भाईबंद गट्ट करीत किंवा तळ्याबाहेरील त्यांच्या स्वतंत्र जागेवर कुठेतरी नेऊन साठवण करत असतात.

दिवसेंदिवस खालावत चाललेली परिस्थिती राजनिष्ठ बेडकांना दिसत होती. पण यातून काहीच मार्ग दिसत नव्हता. त्यातून ते चिरडीला येत होते. राजा यातून काही मार्ग काढेल अशी त्यांना आशा होती. पण तसे काही घडताना दिसत नव्हते. तरीही आपल्या निष्ठेला जागून आपल्या या विपन्नावस्थेचे हुकमी कारण त्यांनी शोधून काढले होते. "खुद्द देवानेच पाठवलेल्या राजाच्या आदेशाची पायमल्ली करून हे 'अर्बन दुर्दर' जमिनीवर जातात म्हणून देवाचा कोप होतो. आणि म्हणून त्याने आपले अन्न-पाणी कमी करण्याची शिक्षा आपल्याला दिली आहे." असे ते म्हणू लागले. राजाच्या नि राजाच्या भाईबंदांच्या अन्न -साठवणुकीबद्दल बंडखोर बेडूक जेव्हा त्यांना सावध करु लागले, तेव्हा हे दुबळे बेडूक आपली उरलीसुरली ताकद एकवटून ओरडत, "मग काय तुम्हाला पुन्हा लाकडाचा ठोकळा आणायचाय का?"

बंडखोर मात्र चिकाटीचे आहेत. त्यांनी आजची नाही तर निदान पुढची पिढी शहाणी व्हावी म्हणून "राजा भिकारी, आमचे अन्न घेतले" अशी घोषणा देत ’राजा चोर आहे’ अशी मोहीम सुरु केली आहे. राजा नि त्याचे भाईबंद पोटभर खातात, आपल्या पुढच्या पिढीसाठी साठवूनही ठेवतात. दुबळे होत जाणारे राजनिष्ठ बेडूक आपले अन्न राजा नि त्याच्या भाईबंदांच्या चरणी अर्पून ’राजाने साठवणीखोर बेडकांची कशी वाट लावली.’ याच्या गोष्टी उपाशीपोटी एकमेकाला सांगत असतात.

दरम्यान ’आपला राजा स्वत: निवडता येतो. किंबहुना राजा असण्याची आवश्यकताही नाही.’ याची अक्कल बेडकांना अजूनही न आलेली पाहून देवबाप्पा गालातल्या गालात हसत असतो.


-oOo-

शनिवार, १० नोव्हेंबर, २०१८

दोन तत्त्वांचा संघर्ष

मागेही एक दोन पुरोगामी मंडळींनी हा उल्लेख केला होता. अर्थात तो नवा नाही. मी कुरुंदकर वाचले तेव्हाही तो माझ्या कानावर आला होताच. स्वत:ला नास्तिक, अगदी मार्क्सवादी म्हणवणार्‍या कुरुंदकरांनी आपल्या मुलाची मुंज केली. हे कसले पुरोगामी? असा आक्षेप घेतला जातो. अनेकदा यावर बोलावे असे वाटले, पण आपला तर्क रुजणे सोडा, समजून घेण्याची इच्छा व्हावी अशी भूमी अजूनही तयार नाही असे तेव्हाही वाटले होते, आजही वाटते. पण तरीही लिहूनच टाकतो.

ज्या निर्णयात आपण एकटेच भागधारक नसतो तिथे आपले मत लादणे हे हुकूमशाहीचेच लक्षण आहे. ’मोठा नास्तिकपणाचा/पुरोगामित्वाचा बडिवार माजवतो आणि स्वत:च्या मुलाची मुंज केली.’ हे म्हणणाराच उलट दिशेने ती ’करायची नाही’ अशी भूमिका त्याने घेतली असती तर, ’पण त्यांच्या पत्नीचे मत करावी असे असेल तर असे हुकूमशाही पद्धतीने आपले मत लादणे हे कुठले पुरोगामित्व आहे?’ असा प्रश्न विचारणारच होता.
भारतीय स्त्रियांच्या बाबत असे म्हटले जाते की त्यांचा नवरा धार्मिक असेल तर त्यांना कर्मकांडाची सक्ती असते आणि नवरा नास्तिक असला की तिला कोणतेही कर्मकांड न करण्याची सक्ती असते. तिचा निर्णय तिने घेण्याचा पर्यायच उपलब्ध नसतो. पण जर पत्नीवर अशी सक्ती नसेल (नसेल म्हणजे काय, नसावीच! ती करण्याचा अधिकारच कुणाला नसावा.) तर तिचेही स्वत:चे एक मत असेल जे कदाचित पतीच्या मताशी मिळतेजुळते नसेल ही शक्यताही असते. (ती स्त्री खर्‍या अर्थाने स्वतंत्र विचार करणारी असेल तर ही शक्यता आयुष्यात अनेकदा येऊ शकतेच.) आता निर्णय घेताना या दोनपैकी एका मताला अनुसरुन घ्यायची वेळ आली तर दोघांपैकी एकाचे मत बाद होणे अपरिहार्य असते. मग ज्याचे मत बाद झाले त्याने त्या मताशी प्रतारणा केली असे म्हणावे का?

मुलाची मुंज करावी की नाही याबाबत पती नि पत्नी यांची दोन मते असली तरी अंमलबजावणी एकाचीच होऊ शकते. आणि जर पत्नीच्या मताला अनुसरुन मुंज करावी असा निर्णय झाला तर पुरोगामी पतीच्या पुरोगामित्वाला बाध येतो का? नक्कीच येतो! हे नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु त्याचवेळी पत्नीला स्वतंत्र मत आहे हे मान्य करताना त्याने त्याचे विचारस्वातंत्र्याचे मूल्य जपले आहे हे ही विसरता कामा नये. ज्याप्रमाणे घातक किंवा मूठभरांचा अधिकार मानल्या गेलेल्या कर्मकांडांना विरोध हे पुरोगामी मूल्य आहे त्याच प्रमाणे व्यक्तीस्वातंत्र्य, आचारस्वातंत्र्य ही पुरोगामी विचारांनी मान्य केलेली मूल्ये आहेत.

मुद्दा आपण आपली स्वीकृत मूल्ये आचरणात आणली की नाही एवढाच असावा. आणि आयुष्यात असे प्रसंग येतातच, जिथे आपलीच दोन मूल्ये परस्परांविरोधात उभी राहतात. निर्णय घ्यायची वेळ आली की तेवढ्यापुरते त्यातले एक दूर ठेवावे लागते. त्यातून तुमच्या व्यक्तिमत्त्वात अंतर्विरोध दिसतो (तो नाकारण्याचा प्रयत्नही करु नये). जगात कुणालाच तो टाळता आलेला नाही. फक्त अशी तत्त्वच्युती ही दुसर्‍या, त्याहून अधिक महत्वाच्या किंवा तुल्य अशा स्वीकृत तत्त्वासमोर दिलेली शरणागती असावी, कमअस्सलासमोरची नसावी, इतके साधले तरी खूप झाले.

इथे थोडा टॅन्जन्ट मारून मी पुन्हा माझ्या ’कट्यार काळजात घुसली’ वरील दोन दीर्घ (आणि म्हणून बहुतेकांनी लाईक करुन सोडून दिलेल्या) लेखांची आठवण करुन देतो.(त्यातील पहिला भाग वाचला तरी पुरेसे आहे.) मूळ नाटक हे सुष्टांच्या संघर्षाचे आहे. त्यातील पात्रांचे परस्पर-सौहार्द वादातीत आहे. तरीही त्यांच्यात परिस्थितीजन्य, व्यवस्थेने लादलेला संघर्ष आहे. त्यातून त्यांच्या स्वभावाशी विपरीत असे घेतलेले निर्णय आहेत, त्या निर्णयांतून येणारी वेदनाही आहे. (त्याउलट त्यावरील चित्रपट काळा-पांढरा, धार्मिक अहंगंडाचे हत्यार म्हणून वापरुन त्याचा पार चिखल केलेला.)

तसाच काहीसा प्रकार तत्वनिष्ठाच्या आयुष्यातही येत असतो. ज्या प्रकारचे वर्तन करावे असे मनापासून वाटते, त्याचे स्वातंत्र्य त्याला असेलच असे मुळीच नाही. कारण एका एका कृतीवर, निर्णयावर त्याच्या एकट्याच्या पलीकडे इतर अनेक घटकांचा परिणाम होत असतो, त्याचा विचार करुनच त्याचा निर्णय होत असतो. तो अनेकदा अनपेक्षित अशा अन्यायालाही जन्म देतो (कट्यार... - अर्थात नाटक- मधील खॉंसाहेबांचा सदाशिवला गाणे न शिकवण्याचा निर्णय) जो निर्णय घेणार्‍याला टाळता येत नाही, कारण तो अन्य घटकांनाही बाध्य असतो.

सूत्ररूपाने सांगायचे झाले तर मुद्दा समर्थन वा विरोधाचा नव्हे तर समजून घेण्याचा आहे.

शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८

कप के बिछडे हम आज...

एखादा सुरेखसा चित्रपट नुकताच मिळालेला असतो. रात्री जेवणानंतर किचनची कामे पटापट उरकून तुम्ही चित्रपट पाहायला जाऊ असे मनचे मांडे खात असता. सफाई करत असताना नुकत्याच आणलेल्या सहा कपांच्या सेट मधला एक कप तुमच्या हातून निसटतो, सुमारे तीन-साडेतीन फुटावरुन सरळ जमिनीवर आदळतो. आणि दोन तीन भक्कम टप्पे खात पाचेक फुटावर जाऊन विसावतो. इतका मार खाऊन त्या कपाचा कानच फक्त तुटतो.

आता तुमच्यासमोर ’याचे काय करावे?’ हा यक्षप्रश्न उभा राहतो.

BrokenHandleCup
alittlechange.com.au येथून साभार
हा कप आता बाद झाला म्हणून टाकून द्यावा तर त्याची एक बाजू पाहता ते अवघड दिसते. एकतर नवा आहे, त्यात कानाचा गेलेला बळी वगळता त्यात इतका मार खाऊनही टवकाही न उडालेली बॉडी भक्कम असल्याचा पुरावा देत असते. त्याचबरोबर किचनचे अन्य भागधारक तो बहिरा कप चहा खेरीज अन्य काही द्रवपदार्थ साठवता येत असल्याचा फायदा समोर ठेवून त्याला फेकून देण्यास विरोध करणार याची तुम्हाला पक्की खात्री असते...
पण दुसरीकडे साधा कागद कापतानाही ९० म्हणजे नव्वदच अंशात कापला गेला पाहिजे इतके दुराग्रही असलेले तुम्ही; त्याचा तो तुटका कान तुम्हाला कायमच ’अपुरेपणही लगे’ ची आठवण करुन देत समोर ठाण मांडून बसणार नि कायमचा त्रास देणार हे ही लक्षात येते...

तिसरा पर्याय म्हणजे हातून निसटून पडला त्यावेळीच कानासोबत त्याचे काही तुकडे झाले अशी बतावणी करता यावी म्हणून त्या कपावर बत्ता, हातोडी वा तत्सम वस्तूने प्रहार करुन एक-दोन तुकडे पाडावेत. पण सशाहूनही कोमल हृदयाचे असल्याने तुमच्या हातून असा विध्वंस होणे शक्यच नसते...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
वैर्‍यासमोरही असे अवघड प्रश्न उभे राहू नयेत हो कधी.

- oOo -

शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

सर्वेंचा सुळसुळाट आणि कावळ्यांचा कलकलाट

न्यूज चॅनेल्सनी घेतलेले मासिक ’मोदीच हीरो’ हे सर्वे त्यांच्या करमणूक पॅकेजचा भाग आहेत असे समजूनच पाहावे वा न पाहावे. ते सर्वे बरोबर अंदाज बांधतात की चूक हा मुद्दा नाही, मुद्दा त्यांचा रतीब घालण्याचा आहे (आणि त्याचा देशाच्या मतावर परिणाम घडवण्यासाठी हत्यार म्हणून वापरले जाण्याचा.)

गेली साडेचार वर्षे या चॅनेल्सनी सर्वसामान्यांना पुन्हा पुन्हा ’कोण जिंकणार, कोण हरणार?’, ’का जिंकले, का हरले?’ या प्रश्नांभोवती फिरत ठेवून भरपूर करमणूक केली नि करवून घेतली आहे. निवडणुका हा सर्वसामान्यांचा पैजा लावणे नि त्यावर वाद घालणॆ याचा मुख्य आधार झाला आहे. परवाच एका राष्ट्रीय वृत्तपत्रांत कर्नाटकांत तीन नगरपालिकांत भाजप मागे पडला (#मटा च्या भाषेत ’पछाडला’) याची बातमी वाचली. सीरीयसली? नाही म्हणजे भाजप मागे पडला याने आम्ही खुश झालो हे खरं आहे (पहा, आम्हीही प्रवाहपतितच) पण ही काय राष्ट्रीय महत्वाची बातमी आहे? महाराष्ट्रात (आणि अन्य राज्यांतही) पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांमध्ये हा अंदाज बांधणे, ’चर्चा’ (म्हणजे तुझी पार्टी कशी चूक, माझीच कशी बरोबर हे दोन्ही बाजूंच्या सर्वाधिक निर्बुद्धांनी एकमेकांना सांगायचे.) करणे हे सारे ’सिंहासन का सेमीफायनल’ या शीर्षकाखाली चालू असते. साडेचार वर्षांत इतक्या सेमीफायनल झाल्यात की फायनल कधी होणारच नाही की काय असे वाटू लागले आहे.

मला एक सांगा हो. इतके बारकाईने नि नियमित लक्ष कधी आपल्या स्वत:च्या आर्थिक स्थितीवर ठेवले होते का कधी? आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणावर ठेवले होते का कधी? मोदींचा ग्राफ वर गेला अथवा खाली गेला म्हणून अस्वस्थ होणारे लातूरला गेले वर्षभर दर आठवड्याला एकदा पाणी मिळते, (या वर्षी हे दहा दिवसांत एकदा इतके भयावह पातळीवर उतरले आहे.) यात ते लोक कसे जगत असतील याचा विचार डोक्यात होऊन त्याच्या दशांशाने तरी अस्वस्थ झाले असतील का? (या बिनडोकांनो, पुण्याच्या नावे शंख करायला या.) एखाद्या मोदी भक्ताच्या मनाला मोदींचे आमंत्रण ट्रम्प यांनी नाकारले म्हणून झाला त्याहून शतांश तरी त्रास एखाद्या माणसाला जमावाने घेरुन मारले याचा झाला का? कर्नाटकात अखेर मोदींचा वारु रोखला याचा आनंद झालेल्या मोदीविरोधकाला दोन्ही पायांना सहा बोटे असल्याने आरामदायक शूजच नसलेल्या, त्यामुळे होणार्‍या वेदना सहन करत ऑलिम्पिक पदक मिळवलेल्या स्वप्ना बर्मनच्या यशाने झाला होता का?

कसली डोंबलाची युनिटी इन डिवर्सिटी नि कसली देशभावना. राजकारणाकडे आपण एखाद्या वीडिओ गेमसारखे पाहतो. त्या चढ-उताराचा कैफ एन्जॉय करतो. ’मग त्याचा आमच्या आयुष्यावर परिणाम होत नाही का?’ असा तर्कापुरता दावा करताना केंद्राच्या अमुक निर्णयाचा आपल्यापर्यंत येईतो परिणाम नक्की कसा होइल याबाबत फिकीर करत नाही. मग इतरांवर काय होईल हे तर आमच्या खिजगणतीतही नसते. (यातूनच ’विकास हवा तर त्याग करायलाच हवा.’ हे ’कुणाचा?’ आणि कुणी या दोन प्रश्नांना सफाईने बगल देणारे बेशरम वक्तव्य करण्याइतका निलाजरेपणा अंगी मुरतो.) इतर करमणुकीकडे वळताना गेम बंद करुन टाकावा तसे हा गेम बंद करुन टाकतो.

गावात शिक्षण, कौशल्य वा इच्छा नसल्याने हाताला काम नसलेले तरुण आणि बाद झालेले म्हातारे जसे पारावर बसून सदोदित अमेरिकेच्या (लोकांची लफडी चघळायला मनापासून आवडणार्‍या भारतीयांचा लेविन्स्की प्रकरणापासून फेवरिट झालेल्या) बिल क्लिंटन पासून ते चीन सारखी एकाधिकारशाही पायजे’ वगैरे वाट्टेल त्या विषयावर एखाद दोन बिडीच्या आधारे चर्चांचा फड रंगवतात, मध्येच एखादी गावची पोरगी वा स्त्री जाताना दिसली की चर्चा थांबवून तिला निरखूऽन पाहातात, ती निघून गेली की पुन्हा चकाट्या पिटू लागतात तसे आपले झाले आहे. दोन ते अडीच जीबी डेटा आणि चघळायला मोदींचं पारडं अजून जड झालं की हलकं यावर पुन्हा पुन्हा चर्चा करणार्‍यांना महत्वाच्या विषयांवर चर्चा, खल वा कृती करण्यासाठी कुवत वा इच्छा नसल्याने देश या दोन गोष्टींच्या अफूच्या धुंदीत राहतो.

-oOo-

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

पर्याय कोण?

भारतातील बहुसंख्य माणसे देवबाप्पा मेंटॅलिटीतून बाहेर येत नाहीत हीच समस्या आहे . त्यांना ’एलआयशीची कंची पॉलिशी घ्यावी?’ यासाठी एक देवबाप्पा, मानसिक स्वास्थ्यासाठी एक बुवा/बाबा नावाचा देवबाप्पा, ज्यांची ’मी काय पाप केलं म्हणून असं घडलं?’ या प्रश्नाच्या उत्तरासाठी आणखी एक अध्याहृत देवबाप्पा, मुलाच्या/मुलीच्या करियरसाठी परिचितांपैकी एखादा देवबाप्पा... असे प्रत्येक क्षेत्रात देवबाप्पा लागतात. अडचण, प्रश्न कार्य समोर ठाकले की ’कसे सिद्धीस न्यावे?’ या ऐवजी ’कोण सिद्धीस नेईल?’ हाच प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो. मीच नेईन, आम्ही नेऊ, आपण नेऊ ही शक्यताच डोक्यात येत नाही. 

असा कुणी देवबाप्पा दिसला नाही, की एखाद्या दगडाला शेंदूर फासून ते स्वत:च तो तयार करतात. आणि त्याच्या शिरावर आपले ओझे टाकून निश्चिंत होतात. त्याने त्यांचा प्रश्न सुटेल न सुटेल, जबाबदारी नक्की टळते. मग तो प्रश्न सोडवण्यावर खल करण्याऐवजी, कृती करण्याऐवजी तो शेंदूर लावलेला दगडच माझी समस्या कशी सोडवू शकतो यावर त्या प्रश्न/ समस्या/ अडचण सोडवण्यास लागली असती त्याच्या पाचपट ऊर्जा, वेळ नि सौहार्द खर्च करत बसतात.

संसदीय लोकशाहीत प्रातिनिधिक लोकशाही आहे. तिथे पहिल्या टप्प्यात लोक आपले प्रतिनिधी निवडतात नि नंतर दुसर्‍या टप्प्यात ते आपला नेता. शिवाय मंत्रिमंडळ, ब्यूरोक्रसी, दंडव्यवस्था, न्यायव्यवस्था. संरक्षण व्यवस्था अशी लोकशाहीची उपांगे आपापले काम करत असतात. कुणी एखादा बाहुला बसवला तरीही या व्यवस्थांच्या आधारे देश व्यवस्थित चालू शकतो... एखाद्या अति-स्वार्थी, अति-महत्वाकांक्षी नेत्याने एकाधिकारशाहीच्या लालसेने त्यांना बुडवण्याचे धंदे केले नाहीत तर.

तेव्हा 'पर्याय कोण?' हा प्रश्न देवबाप्पा मेंटॅलिटीचे किंवा आपल्या नेणीवेत अजूनही राजेशाहीच आहे, लोकशाहीला आपण पुरेसे परिपक्व झालेलो नसल्याचेच लक्षण आहे.

#मंकाम्हणेआता