सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८

Punchतंत्र: बेडकांचा राजा

एकदा बेडकांना आपल्याला राजा हवा असे वाटू लागले...

ते देवबाप्पाकडे गेले. ते म्हणाले, 'आम्हाला राजा हवा.' देवबाप्पाने त्यांना एक लाकडाचा ओंडका दिला. त्याला मिरवणुकीने आणून त्यांनी राजा बनवले. हा राजा काही न करता एका जागी पडून असे. थोडक्यात, बेडकांना आपले आहार-भय-निद्रा-मैथुन लिप्त आयुष्य जगण्याची मोकळीक त्याने दिली होती.

पण मग बेडकांना वाटू लागले की ’ह्यॅ: हा कसला राजा. याच्या राज्यात काहीच ’हॅपनिंग’ नाही.’ मग त्यांनी ठरवले की पुन्हा देवबाप्पाकडे जाऊन नवा राजा मागायचा. ते म्हणाले, ’आता आम्हाला असा बाहेरुन आणलेला राजा नको. आमच्या तळ्यातला किंवा निदान आमच्यासारखाच जलजीवी असा एखादा राजा द्या.’ देवबाप्पाने त्यांचे म्हणणे ऐकले. त्याने एका बगळ्याला त्यांचा राजा म्हणून पाठवले.

हिरवट-मळकट रंगांच्या बेडकांना त्याचा पांढराशुभ्र रंग पाहून ’आपला राजा होण्यास याहून लायक कोण असणार?’ असे वाटू लागले. एकमेकाला तसे सांगून ते ’हा राजा भारी आहे.’ म्हणू लागले. हा राजा अधून मधून आकाशातून एखादी लहानशी चक्कर मारुन येई. त्या त्याच्या ’भरारीला’ पाहून बेडूक खूश होत. ’बघा आमचा राजा’, ते म्हणत.

TheKingAndTheSubject
छायाचित्र: Mike Corey

बरेचदा हा राजा एक पाय मुडपून तळ्यात ध्यानस्थ उभा असे. जेव्हा तो तसा उभा असतो तेव्हा तळ्यातील माशांची, बेडकांची संख्या घटते, असे काही चाणाक्ष बेडकांच्या लक्षात आले. त्यांनी इतर बेडकांना सावध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ’तुम्हाला आपल्या समाजाचं नि तळ्याचं काही भलं झालेलं बघवत नाही. जेव्हा पाहावं तेव्हा खोड काढत असता. 'खुद्द देवबाप्पाने दिलेला हा राजा असे कसे करेल?’ म्हणून त्यांनी धुडकावून लावले. काहींनी त्याहीपुढे जाऊन तळ्यातले काही मासेच ’दुर्दरभक्षी’ झाले असल्याचा संशय व्यक्त केला. असल्या परप्रांतीयांना ताबडतोब तळ्यातून हाकलून देण्याची मागणी त्यांनी राजाकडे केली. राजाने नेहमीप्रमाणे त्यावर मौन धारण करुन एक लहानशी फ्लाईट पकडून तो शेजारच्या झाडावर जाऊन बसला. राजाची ही भरारी गरुडापेक्षाही भारी होती, असे काही बेडकांनी एकमेकांना पटवून दिले.

आणखी काही महिने गेले आणि बेडकांची, माशांची संख्या आणखी घटू लागली. दरम्यान नवा राजा आपल्या आणखी काही भाईबंदांना घेऊन आला. त्यातला एक त्याचा विशेष लाडका होता. आल्याआल्या त्याने प्रत्येक बेडकाने आपले खाणे प्रथम राजासमोर आणून ठेवले पाहिजे, मग राजेसाहेब त्यातून सर्वांना न्याय्य वाटप करतील असे सांगितले. त्यातून अनेक बेडकांनी चिखलात दडवून ठेवलेले अतिरिक्त खाणे बाहेर येईल नि प्रत्येकाला पोटभर मिळेल असा त्याचा दावा होता.

रोजचे अन्न त्या त्या दिवशीच मिळवून खाणार्‍या बेडकांना ’हां. म्हणजे कुणीतरी जास्त खाते म्हणून आम्हाला हल्ली पोटभर मिळत नाही.’ असा साक्षात्कार झाला. ’बरे झाले राजाने बरोबर कारण शोधून त्यावर उपाय केला ते. खरे तर यामुळे होणार्‍या उपासमारीतून काही बेडकांचे निधन होत आहे. पण याचा फायदा घेऊन काही दुर्दरद्रोही बेडूक 'राजाच त्यांना गट्ट करतो' असा अपप्रचार करत आहेत.’ असे ते म्हणू लागले.

त्या दिवसापासून सर्व बेडूक आपापले अन्न प्रथम राजाकडे आणून देत. त्यानंतर तो देईल तो वाटा घेऊन तो भक्तिभावाने भक्षण करीत आणि म्हणत, ’साठवणखोर आणि दुर्दरद्रोही बेडकांची कशी जिरवली राजाने’. राजाकडून परत मिळणारा वाटा जसजसा कमी होत गेला तसतसे पुरेसे अन्न न मिळाल्याने काही बेडूक दुर्बळ होऊ लागले, काही मेले.

’दीर्घकालीन फायद्यासाठी मेलेल्या बेडकांचे बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही,’ अशी गर्जना राजाने केली. अर्धपोटी बेडूक खूश झाले. हे दुबळे बेडूक वेगाने नाहीसे होऊ लागले. ’दुबळ्यांची शिकार अधिक सोपी असते. शिकारी नेहमी अशाच दुबळ्यांवर नजर ठेवून असतात.’ असे चाणाक्ष बेडकांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण राजनिष्ठ बेडकांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. 'दुर्दरराष्ट्राच्या व्यापक हितासाठी कुणीतरी बलिदान करायला हवे' हे त्यांना पुरेपूर पटले होते. एवढे होऊनही ते साठवणीखोर बेडूक नक्की कोण होते/आहेत हे बेडकांना कधीच समजले नाही.

यानंतर ’तळेच श्रेष्ठ आहे, जमिनीचा मोह धरु नका, तो तुमच्या अध:पाताला कारणीभूत ठरला आहे नि भविष्यातही ठरेल’ असे राजाने बजावल्याने सारे राजनिष्ठ बेडूक जमिनीवर पाऊल ठेवेनासे झाले. पण त्यामुळे जमिनीवरच्या अन्नाचा पुरवठा थांबल्याने, त्यांच्या अन्न संग्रहाला ओहोटी लागली होती. पण या कामचुकारपणाबद्दल राजाने त्यांची कान उघाडणी केली, आणि स्वत:चा राखीव हिस्सा दुप्पट करुन ’व्यापक हितासाठी हे आवश्यक आहे असे बजावले. अन्नाचा हिस्सा कमी झाल्याने राजनिष्ठ बेडूक शारीरिकदृष्ट्या आणि म्हणून मानसिकदृष्ट्या आणखीनच दुबळे होत गेले.

पण काही बंडखोर मात्र ’आपण उभयचर आहोत. पाण्यासोबतच जमिनीवर राहण्यासाठीच आपल्या शरीराची जडणघडण आहे.' असे म्हणत राजाचा सल्ला धुडकावून लावू लागले. हे बेडूक आपण उभयचर असल्याचा फायदा घेऊन जमिनीवरील अन्नही मिळवत असत. दिवसेंदिवस घटत चाललेल्या तळ्यावर अवलंबून राहून जगणे हा मूर्खपणा आहे हे त्यांना पटले होते. आणि नेमक्या अशाच परिस्थितीत 'केवळ तळ्यातच राहा’ म्हणणारा राजा बेडकांच्या विनाशाला कारणीभूत होणार आहे, अशी त्यांची खात्रीच झाली होती. याबद्दल स्वत:ला खरे दुर्दरनिष्ठ म्हणणारे, वास्तवात राजनिष्ठ असणारे त्या बंडखोरांना तुच्छपणे ’अर्बन दुर्दर’ म्हणू लागले. जमिनीवरही जात असलेल्या या बंडखोर बेडकांना असा शोध लागला की साठवणीखोर बेडूक नावाचे कुणी नव्हतेच. उलट जे अन्न बेडूक आणून देत ते राजाचे भाईबंद गट्ट करीत किंवा तळ्याबाहेरील त्यांच्या स्वतंत्र जागेवर कुठेतरी नेऊन साठवण करत असतात.

दिवसेंदिवस खालावत चाललेली परिस्थिती राजनिष्ठ बेडकांना दिसत होती. पण यातून काहीच मार्ग दिसत नव्हता. त्यातून ते चिरडीला येत होते. राजा यातून काही मार्ग काढेल अशी त्यांना आशा होती. पण तसे काही घडताना दिसत नव्हते. तरीही आपल्या निष्ठेला जागून आपल्या या विपन्नावस्थेचे हुकमी कारण त्यांनी शोधून काढले होते. "खुद्द देवानेच पाठवलेल्या राजाच्या आदेशाची पायमल्ली करून हे 'अर्बन दुर्दर' जमिनीवर जातात म्हणून देवाचा कोप होतो. आणि म्हणून त्याने आपले अन्न-पाणी कमी करण्याची शिक्षा आपल्याला दिली आहे." असे ते म्हणू लागले. राजाच्या नि राजाच्या भाईबंदांच्या अन्न -साठवणुकीबद्दल बंडखोर बेडूक जेव्हा त्यांना सावध करु लागले, तेव्हा हे दुबळे बेडूक आपली उरलीसुरली ताकद एकवटून ओरडत, "मग काय तुम्हाला पुन्हा लाकडाचा ठोकळा आणायचाय का?"

बंडखोर मात्र चिकाटीचे आहेत. त्यांनी आजची नाही तर निदान पुढची पिढी शहाणी व्हावी म्हणून "राजा भिकारी, आमचे अन्न घेतले" अशी घोषणा देत ’राजा चोर आहे’ अशी मोहीम सुरु केली आहे. राजा नि त्याचे भाईबंद पोटभर खातात, आपल्या पुढच्या पिढीसाठी साठवूनही ठेवतात. दुबळे होत जाणारे राजनिष्ठ बेडूक आपले अन्न राजा नि त्याच्या भाईबंदांच्या चरणी अर्पून ’राजाने साठवणीखोर बेडकांची कशी वाट लावली.’ याच्या गोष्टी उपाशीपोटी एकमेकाला सांगत असतात.

दरम्यान ’आपला राजा स्वत: निवडता येतो. किंबहुना राजा असण्याची आवश्यकताही नाही.’ याची अक्कल बेडकांना अजूनही न आलेली पाहून देवबाप्पा गालातल्या गालात हसत असतो.

-oOo-


संबंधित लेखन

1 टिप्पणी: