बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२

अर्थ-साक्षरता - १: अर्थ-साक्षरता आणि मी

मागील आठवड्यात माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्यावर ओढवलेल्या आर्थिक संकटाची बातमी आली होती. त्यापूर्वीही अशा अनेक प्रसिद्ध, यशस्वी व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर अथवा उतारवयामध्ये सहन कराव्या लागणार्‍या आर्थिक चणचणीच्या बातम्या आलेल्या होत्या. यात अगदी भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान, जुन्या जमान्यातील यशस्वी अभिनेत्री स्मृती बिस्वास यांचाही यांचाही समावेश होता. त्यानिमित्ताने उतारवयातील खर्चाची तरतूद म्हणून बचत आणि आर्थिक-नियोजन याबाबत बालक-पालक नावाचा एक लेख इथेच लिहिला होता.

मुद्दा असा होता की कारकीर्दीच्या शिखरावर असताना अमाप- निदान सामान्यांपेक्षा कैकपट- पैसा मिळवणारी ही मंडळी आर्थिक विपन्नावस्थेत जातात याचे कारण न केलेले, अथवा करुन फसलेले आर्थिक नियोजन असते. चार गाड्या बाळगणार्‍या, एकाहुन अधिक घरे मालकीची असणार्‍या सेलेब्रिटीला आपली शिल्लक घसरते आहे हे दिसत नसेल, त्याला थेट दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आल्यावरच भान येत असेल, तो दोष त्याचाच असतो. (अपवाद गंभीर आजारामुळे वेगाने घसरलेल्या परिस्थितीचा. पण त्यालाही आरोग्य-विम्यासारखे उपाय असतात.) आपली आर्थिक स्थिती नियमितपणे तपासत राहिले तर येऊ घातलेल्या आर्थिक संकटाची चाहूल बरीच अलिकडे ऐकू येते नि त्यावरच्या उपायांना लवकर चालना देता येते. त्यासाठी आपल्या आर्थिक ताकदीकडे कायमच बारकाईने लक्ष द्यावे लागते.

AllThisIsMyMoney

दुसरीकडे, हे घडू नये म्हणून घायकुतीला आल्यासारखे मिळतात तोवर, मिळतील तितके, पैसे मिळवत जाणे हा मार्ग बहुसंख्य लोक स्वीकारतात. आठ वर्षांपूर्वी मी रोजगार सोडला, तेव्हा अनेक मित्रांनी मला ’अरे पण तुला इतके पैसे मिळतात तर मिळवत का नाहीस?’ असा प्रश्न विचारला होता. 'मिळवणे' या क्रियापदाची पैशाशी घट्ट सांगड बसली आहे हे या प्रश्नामागचे कारण आहे. मिळवण्याजोगे इतर काही असते, हे बहुतेकांच्या गावीच नाही. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे एक उघडपणे बोलले गेले नाही तरी, 'पैसे असले की काहीही मिळवता येते' हा बहुसंख्येच्या मनात दृढ झालेला एक अत्यंत चुकीचा समज.

आमचे आयटीमधले मित्र रात्री दहा-बारा वाजेपर्यंत काम करुन, क्वचित नाईट मारून सकाळी परत कस्टमर कॉलवर बसतात, तेव्हा मी विचारतो, ’हवा तेव्हा वेळ मिळू शकतो का रे तुला? आज जरा पोराशी दंगामस्ती करायचा तुझा किंवा पोराचा मूड आहे... मिळेल वेळ?' आपल्या आनंदाचे क्षणही ऑफिसच्या सोयीनेच निवडावे लागत असतील, तर त्या पैशाचे काय लोणचे घालायचे आहे? आपले आनंद नि सुख यांचेही नियोजन करावे लागत असेल तर तो आनंद, ते सुख हे सेल्फीसारखे किंवा इन्स्टाग्रामच्या रीलसारखेच ’एक पॉईंट सर झाल्याइतकेच महत्त्व असणारे’ नसेल का?

’मॉडर्न टाईम्स’मधल्या चार्ली चॅप्लिनसारखे अमुक वेळेला नट पिळायला सुरुवात करायचा, नि घंटी वाजली की ते काम सोडून टिफिन उघडायचा. दुसरी घंटी होताच पुन्हा स्क्रू पिळण्याच्या कामावर रुजू व्हायचे... तुमचे यंत्र झाले आहे असे कधी वाटते का तुम्हाला? चार्ली एक दिग्गज म्हणून प्रसिद्ध झाल्यामुळे हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. पण ऐंशी साली रिलीज झालेला ’गॉड्स मस्ट बी क्रेझी’ म्हणून एक सुरेख चित्रपट आजच्या पिढीने तर सोडाच, माझ्याही पिढीने पाहिला असण्याची शक्यता नाही. हा चित्रपट यू-ट्यूबवर आहे. जमल्यास त्यातील पहिली वीस मिनिटे तरी पाहा.

आपले आयुष्य ही खरेच प्रगती आहे का? असा प्रश्न एकदा विचारून पाहा. त्यातील प्रत्येक गोष्टीसाठी आपण जी किंमत मोजतो, ती केवळ पैशातच पाहात असतो. तो पैसा निर्माण करण्यासाठी आपण कशा-कशा स्वरूपात किंमत मोजतो, याचे गणितही ध्यानात घ्यायला हवे. त्यानंतर एकुण ताळेबंद शिलकीचा राहतो की तोट्याचा याचा विचार करायला हवा.

मिळवताना गरजा काय हे ठरवून त्या प्रमाणात मिळवण्याचे नियोजन करण्याऐवजी, हपापल्याप्रमाणे मिळेल तितके मिळवत जायचे नि वेळ व ऊर्जा शिल्लक राहिली तर ती भोगण्याचा विचार करायचा; नाहीतर आपल्या नावावरची संपत्ती वाढत चाललेली पाहून, त्या वाढीबरोबर आपले सुख वाढते आहे अशा भ्रमात राहायचे... असा मार्ग आपण निवडला आहे. किंवा मग अधिक पैसे आहेत म्हणून अधिक मोठे घर घ्यायचे, अधिक किंमतीची गाडी घ्यायची, केरळ ऐवजी कॅलिफोर्नियाला फिरायला जायचे असा उलटा प्रकार सुरू होतो. हे सारे ’मला हवे’ असे आधीच निश्चित केले असले तर गोष्ट वेगळी. पण पैसे वाढले म्हणून गरजा वाढवायच्या, त्यातून खर्च वाढवायचा आणि मग गरज वाढली म्हणून आणखी पैशाच्या मागे ऊर फुटेतो धावत सुटायचे, हा न संपणारा प्रवास आहे.

रोजगाराच्या सोयीने आनंदाचे नियोजन करण्यापेक्षा, नियोजन बचत नि गुंतवणुकीचे करुन आनंदाला मुक्त केलेले अधिक चांगले असे माझे मत आहे. पैसे मिळवत राहून मग 'त्यांचे काय करायचे?' या प्रश्नाला सामोरे जाण्याऐवजी, उलट आधी आपल्या गरजा कोणत्या अधिक आपल्याला काय हवे हे निश्चित करुन, मग त्याला अनुसरून पैसे मिळवण्याचे नियोजन करणे, हे अधिक सयुक्तिक आहे असे मला वाटते.

मी गेली आठ वर्षे रोजगाराविनाही मध्यमवर्गीय सुखवस्तू आयुष्य जगू शकतो आहे. मला हे जमते म्हणजे गुपचूप आणि वेगाने पैसे मिळवण्याची काहीतरी युक्ती मला सापडली आहे, असा माझ्या परिचितांपैकी अनेकांचा समज आहे. ’आम्हाला पण नियोजन करायचे आहे, तुझा अनुभव सांग.’ म्हणत आडूनआडून ही ’जादू’ कोणती, किंवा मला मोहरांचा हंडा नक्की कुठे सापडला, हे माझ्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न ही मंडळी करत असतात.

अर्थ-साक्षर व्हायचे आहे ही केवळ बतावणी असते. कारण मला सापडलेली युक्तीच नव्हे, तर आठ-दहा वर्षांच्या मेहनतीने तयार केलेला गुंतवणूक-ट्रॅकरही (tracker) मी लोकांना फुकट दिला आहे. अद्याप एकानेही तो गांभीर्याने वापरला असल्याचा पुरावा माझ्याकडे नाही. त्यावर वेळ घालवण्याची त्यांची तयारी नाही. त्यांना जादूचा दिवा हवा आहे, जो घासला की त्यातून आलेला जिन त्यांचे आर्थिक नियोजन चोख करुन देईल. दुर्दैवाने मला असा कुठला दिवा सापडला नाही, त्यामुळे त्यांना देऊ करणे मला शक्य नाही. पण माझा मार्ग मी त्यांना सांगू शकतो. त्यात त्यांचा मेंदू, वेळ, ऊर्जा यांची आधी गुंतवणूक करण्याचे त्यांनी मनावर घ्यायला हवे.

आर्थिक नियोजन हीच मला सापडलेली युक्ती आहे, आणि यात बचतीबरोबरच खर्चाचे नियोजनही समाविष्ट आहे. आपल्या गरजा कोणत्या ते प्रथम निश्चित करणे महत्त्वाचे. त्यासाठी आपण पुढील आयुष्याचा मार्ग कसा आखत आहोत याचे एक ढोबळ का होईना चित्र डोळ्यासमोर असायला हवे. वारा फिरेल त्या दिशेने पाठ फिरवणार्‍यांचे हे काम नव्हे. त्यानंतर त्या आयुष्यातील आपल्या गरजा कोणत्या, त्याच्याशी निगडित खर्च कोणते नि केव्हा येणार आहेत, आपले संभाव्य उत्पन्न काय असेल, त्यातील किती पैसा आपण नियमितपणे बचत म्हणून बाजूला काढू शकतो, खर्चासाठी तसंच बचतीसाठी आपले प्राधान्यक्रम कोणते या गोष्टींचा विचार सुरुवातीपासूनच करायला हवा.

उत्पन्नाचा स्रोत हा अत्यंत सापेक्ष मुद्दा आहे. परंतु तरीही बचत त्यातूनच होत असल्याने आर्थिक नियोजनाची सुरुवात ही सरासरी उत्पन्नाच्या आधारेच करावी लागते. ज्यांचे उत्पन्न किमान गरजांनाही पुरे पडत नाही अशा दुर्दैवी व्यक्तींच्या आयुष्यात बचत, गुंतवणूक वा अर्थ-साक्षरता या संकल्पनाही गैरलागू ठरतात. त्यामुळे हे सारे लेखन त्यांच्यासाठी नाही. पण जे बचत करू शकतात, त्यांनी आपल्या वर्तमान गरजा किती याचा अदमास घेऊन, त्यानुसार उत्पन्नाचा कितवा हिस्सा आपण बचतीकडे वळवू शकतो, हा पहिला विचार करायला हवा. पण उलट दिशेने असेही होऊ शकते, की वर्तमान गरजा भागवण्यामध्येच बरेचसे उत्पन्न खर्ची पडते आणि बचतीला वावच राहात नाही. अशा वेळी आपल्या गरजांच्या यादीकडे पाहून त्यातील काही वगळता येतील का याचा अदमास घ्यावा लागतो.

यात काही नवीन नाही. ’नियोजन’ हा शब्दही न वापरता बहुतेक लोक हे करतच असतात. पण बहुसंख्या काय करत नाही, तर या निर्णयांना वस्तुनिष्ठ निकषांच्या चौकटीत बसवत नाही. त्यामुळे पुढचा प्रवास अनमानधपक्याने वा तात्कालिक निर्णयांच्या आधारे होत राहातो. आपल्या गुंतवणुकीची एकुण स्थिती आणि भविष्यकालीन गरजांशी तिची सांगड घालणे शक्य होत नाही, आणि बहुतेकांना त्याचे भानही नसते. बचत आवश्यक असते, तसेच गरजांवरचे खर्चही. मग प्रश्न असा पडतो, की उत्पन्नातील किती वाटा या दोहोंना द्यावा? आर्थिक नियोजनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये याचा निर्णय करायला हवा. एक ढोबळ नियम असा, की निम्मे उत्पन्न हे कायमच भविष्यकालीन गरजांसाठीची तरतूद म्हणून बचतीमध्ये टाकावे. तुमच्या एकुण उत्पन्नानुसार, आणि भविष्यातील तुमच्या योजनांनुसार हे थोडे कमी-जास्त होऊ शकते. आता बचतीचा प्रश्न निकालात निघाला की बचत केलेले धन नुसते ठेवून उपयोग नाही, तर वाढवायचे कसे याचा विचार सुरू करायला हवा.

बचत किती करणार वा होणार हे निश्चित झाले, की ते पैसे गुंतवण्याचा टप्पा येतो. आणि गुंतवण्यासाठी कोणते गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत नि त्यातील कोणता पर्याय निवडावा, याचा विचार करावा लागतो. इथेही बहुसंख्य लोक मुदत-ठेवीपासून सुरुवात करत, विमा पॉलिसी आणि अधूनमधून सोने अशा अनमानधपक्याने घेतलेल्या निर्णयांच्या आधारे गुंतवणूक करत जातात. यात कुठेही गरजा नि गुंतवणूक यांची सांगड घातलेली नसते. तसेच गुंतवणुकीचा अमुक पर्याय का निवडावा याच विचार केलेला नसतो. अर्थ-साक्षरतेमध्ये तो ही करावा लागतो.

माझे आयटीमधले, दिवसाचे आठ-दहा तास संगणकासमोर आणि आणखी अधिकचा वेळ मोबाईलसमोर असणारे मित्रही जेव्हा ’सोने ही सुरक्षित गुंतवणूक’ म्हणतात तेव्हा कपाळावर हात मारून घेऊ, की आत्महत्या करु असा मला प्रश्न पडतो. क्रेडिट/डेबिट कार्ड, चोवीस तास चालू असणार्‍या एटीएम्सच्या जमान्यात सोने ’अडी-अडचणीला कामात येते’ हे समर्थन देतात तेव्हा त्या अडाणीपणाचे मला वैषम्य वाटते. ’बाळा, अरे नको रे असे करूस. दिवसाला पाच-सहा तास जे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर वाया घालवतोस ना, त्यातला एखादा तास वापरुन त्याच इंटरनेटवर ज्यांची भरपूर माहिती आहे असे गुंतवणुकीचे पर्याय, त्यांचे मूल्यमापन कसे करावे, आपली गुंतवणूक ट्रॅक कशी करावी, वगैरे बाबींवर वाचन कर रे.’ असे त्यांना सांगावेसे वाटते.

पण हे लोक फक्त सोयीच्या वेळी जागे होऊन ’तुमचा निर्णय कसा चुकला’ हे सांगण्याचा आटापिटा करण्यापलिकडे वाचन करत नाहीत. आमचे एक फेसबुक-मित्र आहेत. मी म्युच्वल फंडात गुंतवणूक करण्याबद्दल काही पोस्ट केली होती. उच्चशिक्षित असलेल्या त्या काकांच्या गुंतवणूक शहाणपणावर बहुधा त्या पोस्टमुळे मी नकळत प्रश्नचिन्ह निर्माण केले असावे. कोरोना उद्रेकाच्या आदल्या वर्षी शेअर-मार्केट घसरले, तेव्हा त्यांनी मला कुत्सितपणे, ’हं, मग क्काऽय? आता काय म्हणतात तुमचे फंडं?’ अशा थाटात प्रश्न विचारला होता. ’घसरत्या मार्केट्मध्ये अदमास घेऊन आणखी पैसे गुंतवेन.’ असे ठामपणे त्यांना सांगितले होते. तसे केलेही. पुढची दोन वर्षे मिळून सरासरी पन्नास ते सत्तर टक्के रिटर्न्स माझ्या फंडांनी दिले. त्यानंत्र सहा-आठ महिने घसरण झाली. ऑगस्टपासून बाजाराने पुन्हा वरची वाट पकडली आहे.

’चढ-उतार हा कोणत्याही गुंतवणुकीचा अविभाज्य भाग आहे’ हे त्या काकांना आणि त्यांच्यासारख्या मंडळींना माहित नसते. त्यांच्या मुदत-ठेवीचे मूल्यही महागाई-निर्देशांकानुसार, बाजार-मागणीनुसार कमी-जास्त होतच असते. फक्त ते यांना दिसत नसते इतकेच. प्रत्येक गुंतवणूक - अगदी तुमची सोने किंवा विमा पॉलिसीसुद्धा! - काहीएक धोका घेऊनच येते. इतरांवर विश्वास ठेवायला नको म्हणून घरात हंडा पुरून ठेवला, तरी पावसात पाणी तुंबून त्यातील पैशाचा चिखल होऊ शकतो. (किंवा नोटाबंदी होऊ शकते. :) ) सोने चोरीला जाऊ शकते, त्याची किंमत बाजाराच्या नियमाने कोसळू शकते- नव्हे कोसळतेच. सुरक्षित गुंतवणूक ही फक्त डोळ्यावर पट्टी बांधून गुंतवणूक करणार्‍यांनाच सापडते. कारण त्यांनी त्यातील धोके न पाहण्याचा मार्ग स्वीकारलेला असतो. हीच मंडळी अमुक पदार्थ वा औषध ’केमिकल फ्री’ आहे या तद्दन खोट्या दाव्यावरही तसाच विश्वास ठेवत असतात.

गुंतवणूक कशासाठी करत आहोत हे विचारात घेऊन गुंतवणुकीचा पर्याय निवडणे, त्याच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन वाटचालीवर नजर ठेवणे, ठराविक काळानंतर प्रत्येक गुंतवणुकीचे मूल्यमापन करण्याची शिकवणी प्रत्येक कमावत्या व्यक्तीला असायला हवी. त्यासाठी आपले काही पूर्वग्रह प्रथम दूर करायला हवेत.

१. संपूर्ण सुरक्षित गुंतवणूक हे मृगजळ आहे हे मान्य करणे हा आर्थिक-नियोजनाच्या पथावरचा पहिला टप्पा आहे. गुंतवणूक जितकी सुरक्षित तितका परतावाही कमी मिळत असतो.

२. ’अधिक परतावा म्हणजे तो गुंतवणूक पर्याय अधिक चांगला’ हा दुसरा भ्रम दूर व्हायला हवा.

३. निश्चित परतावा देणार्‍या योजना अधिक फलदायी, निदान पैसे कमी होत नाहीत हा तिसरा भ्रम दूर करायला हवा.

४. निव्वळ परतावा (आणि तथाकथित सुरक्षितता) हा एकच निकष गुंतवणूक-पर्याय निवडीसाठी पुरेसा आहे हा ग्रहदेखील सोडून द्यायला हवा.

५. करबचतीसाठी गुंतवणूक करायची नसते, गुंतवणुकीवर करबचत करण्याचा प्रयत्न करायचा असतो.

६. याखेरीज बचतीतले अनेक ’गोल्डन रूल्स’देखील गणित करुन, तपासून पाहिल्याखेरीज अंमलात न आणण्याची शिस्त अंगी बाणायला हवी. किंबहुना असे ’गोल्डन रुल्स’ नावाचे काही नसतेच. तो आळशांचा मार्ग आहे, अर्थ-साक्षर होण्याचा उद्देशच ती अंधश्रद्धा दूर करण्याचा असतो.

ROI_HouseInvestment

उदाहरणार्थ, सरकारने गृहकर्जाच्या व्याजावर कर वजावट दिली म्हणून घरे घेऊन ’कराचे तीस टक्के वाचवण्यासाठी गृहकर्जाचे व्याज (गृह-किंमतीच्या अंदाजे पन्नास टक्के जास्त खर्च) दान करण्यापूर्वी यात नक्त फायदा किती याचे - निदान संभाव्य - गणित केल्याखेरीज त्यात उडी मारणे चूक आहे. त्यातून मिळालेला परतावा मोजताना त्यावर खर्च केलेला मेन्टेनन्स, भरलेले किमान वीज बिल, दोन्ही वेळा केलेला नोंदणी खर्च, गृहकर्जावरचे व्याज, त्या वेळी तारणासाठी वगैरेसाठी केलेला खर्च, प्रोसेसिंग फी या आर्थिक बाजू लक्षात घ्यायला हव्यात. पण त्याचबरोबर घर निवडण्यावर, नोंदणी वगैरे प्रशासकीय बाजूंवर, तसेच संभाव्य खरेदीदारांसोबत खर्ची पडलेला वेळ नि ऊर्जा हे सगळे खर्च गणितामध्ये समाविष्ट करायला हवेत. याखेरीज त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यादरम्यान वाढलेल्या महागाईचा विचार करुन, आपल्याला सरासरीने किती परतावा मिळाला याचे गणित करायचे असते. याचप्रमाणे ’सोने ही अडीनडीला उपयोगी पडणारी आणि सुरक्षित गुंतवणूक आहे.’ हे गृहितक आजच्या काळातही लागू आहे की कालबाह्य झाले आहे?’ या प्रश्नालाही सामोरे जायला हवे.

गणित हा आयुष्यात अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन 'मंगोलांच्या काळात तर मुद्दलही नाहीसे होत असे, तेव्हा नाही बोललात तुम्ही' किंवा ’त्यापेक्षा तर मुदत-ठेव बरी ना?’ म्हणणार्‍या, आणि हा वाजवी प्रतिवाद आहे असे समजणार्‍या भूतकालभोगी समाजाकडून अर्थ-साक्षरतेची अपेक्षाच गाढवपणाची आहे हे मला मान्य आहे, परंतु एकाचा निर्णय बहुसंख्येचा होऊन त्याची ’सोने ही सुरक्षित, अडी-नडीला कामात येणारी गुंतवणूक आहे’ सारखी परंपरा निर्माण होऊ नये यासाठी हे सांगत राहावे लागते.

महाराजांच्या टायंबाला मोरे सरकारांच्या सैन्यात असलेल्या कुण्या शिलेदाराच्या तिसर्‍या पत्नीच्या दुसर्‍या मुलाच्या जीवनावरचा बायोपिक पाहण्यासाठी लोक पैसा नि वेळ खर्च करतील, त्यावर फेसबुक वा ट्विटरवर युद्धे लढवतील. पण आपल्या उत्पन्नाकडे लक्ष देण्यासाठी त्यातील दहावा हिस्साही खर्च करणार नाही.

माणसे विचार करत नाहीत, गणित करत नाहीत आणि माहिती करुन घेत नाहीत. सर्वात वाईट म्हणजे माहिती आणि अनुभवाऐवजी पूर्वग्रहांवर किंवा आपल्यासारख्याच अज्ञानी मंडळींच्या सल्ल्यावर विसंबून आयुष्य जगतात. सगळं काही सुरक्षित हवं या मृगजळाचा पाठलाग करता करता थकतात, पण थांबत नाहीत, कारण थांबलो तर कायमचे बसू ही ’असुरक्षिततेची’ भावना त्यांच्या मनातच असते. त्यापासून त्यांची अखेरपर्यंत सुटकाच होत नाही.

(क्रमश:)

- oOo -

    पुढील भाग >> अर्थ-साक्षरता - २ : गरजा, खर्च आणि बचतीचे नियोजन


संबंधित लेखन

८ टिप्पण्या:

  1. सर,

    तुम्ही बनवलेला tracker शेअर करता येईल का? त्याचा वापर करून बघता येईल.

    आणि सुरवातीला लागणारे tracker बनवण्याचे कष्ट कमी होतील.

    तुम्हाला तो ओपन सोर्स करता आला तर अधिक चांगले होईल.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुमच्या ईमेल अड्रेसवरुन ramataram@gmail.com या अड्रेसला एक टेस्ट ईमेल पाठवा. तिथे पाठवतो.

      हटवा
  2. सर, लेख नेहमीप्रमाणेच छान.
    मला तो tracker देऊ शकाल का ??

    Dr. Asmita Phadke, Pune

    उत्तर द्याहटवा
  3. अर्थ साक्षरता भाग 2 ची लिंक चालत नाहिये. कृपया अपडेट करा

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मला ब्लॉग वर दुसर्‍या लेखाची लिंक मिळाली आहे. तरीही वाचकांच्या सोयी साठी लेखात खाली दिलेली लिंक अपडेट करू शकता. धन्यावाद

      हटवा
    2. चूक नजरेस आणल्याबद्दल धन्यवाद. दुरुस्ती केली आहे.

      हटवा