’वेचित चाललो...’ वर नवीन:   

प्रतीक्षा       सत्तांतर       हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

गुरुवार, २५ एप्रिल, २०१९

शहाणपण: रुजणारे काही, मिरवणारे काही

सिंहावलोकन:  http://ramataram.blogspot.com/2016/05/MyIsm.html
---

हा लेख जरी त्यावेळी स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवणार्‍यांच्या आरोपाला प्रतिसाद म्हणून लिहिलेला असला तरी त्याची व्याप्ती बरीच आहे. इथे जसे सवर्णांनी आंबेडकरवादी असणे ही सतत सिद्ध करत बसण्याची तक्रार आहे तसेच:

१. मुस्लिमांनी देशभक्त असणॆ सतत सिद्ध करावे लागते. आणि तसे असले तरी एक मुस्लिम गुन्हेगार वा दहशतवादी सापडला की ज्याच्या जाती/धर्मात महामूर गुन्हेगार आहे अशी व्यक्ती देखील त्याच्याकडे संशयाने पाहणे सुरु करते.

२. ब्राह्मणाने पुरोगामित्व सतत सिद्ध करत राहावे लागते. स्वत: अब्राह्मण असल्याने जन्मजात पुरोगामी आहोत असे समजणार्‍या प्रत्येकाची वेगवेगळी मते असतात जी परस्परविरोधी असू शकतात. त्या सार्‍यांशी एकाच वेळी सहमती दाखवावी लागते. नाहीतर ज्याच्याशी असहमती दाखवतो तो त्याचा’ छुपा मनुवादी वा संघवादी’ म्हणून ’सत्कार’ करतो. पुढच्या मुद्द्यावर त्याच्याशी सहमत होऊन अन्य कुणाशी असहमती झाली की सत्काराची जबाबदारी तो उचलतो.

३. गुन्हेगार जमाती म्हणून ब्रिटिशांनी शिक्का मारलेल्या जातींमधला कुणी स्वकष्टाने प्रगती करुन मोठा झाला तरीही पुन्हा असहमतीच्या क्षणी त्याच्या जातीचा उद्धार त्याला सहन करावा लागतोच. त्या धोक्याचा विचार करुन आयुष्यभर त्याला सतत आपल्या मुळांपासून दूर झाल्याचे सिद्ध करत राहावे लागते. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे आपल्या समाजापासून तो दूर जातो आणि ’आता तू बामण झालास.’ हा आरोप स्वजातीयांकडून सहन करावा लागतो.

४. ९५ - ९९ टक्के सहमत असलेला उरलेल्या एक वा पाच टक्क्यावर असहमत असेल तर लगेच तो ’छुपा तिकडचा’ ठरतो (तो आपल्या जातीचा, धर्माचा नसेल तर मग नक्कीच). हा अनुभव स्वयंघोषित पुरोगाम्यांकडून अधिक येतो. ते तुम्हाला जवळ करण्यापेक्षा दूर ढकलण्यास अधिक उत्सुक असतात.

... यादी भरपूर लांबेल. तूर्त इतके पुरे.

कोणतही इझम परिपूर्ण नसतो तसेच तो ब्लू-प्रिंट स्वरुपात, काटेकोर नसतो. त्यातही मूल्यमापनाचे सापेक्षत्व अनुस्यूत असतेच. संस्कृती, विचार नि विचारव्यूह हे प्रवाहीच असावे लागतात. एकच नाव मिरवणार्‍या विचारधारेच्या विविध प्रवाहांत भौगोलिक, सामाजिक, कालसापेक्षता असतेच. रशियातल्या कम्युनिजमची जातकुळी वेगळी नि चीनच्या वेगळी. क्यूबामधला आणखी तिसर्‍या प्रकारचा. त्यांच्यात परस्परात अंतर्विरोध असणारच. हिंदू धर्म या नावाने काही संघटना काहीतरी अभंग, एकसंघ आहे असा दावा करतात त्या परंपरांमध्ये तर प्रचंड अंतर्विरोध आहेत. त्या उपप्रवाहांचेही पुन्हा परस्पर-संघर्ष होतच राहतात. उदा. सध्या शाकाहाराचे हुकूमशहा तो उरलेल्या हिंदूंवर लादू पाहात आहेत.

दुसरे असे की मी अमुकवादाचा वा तमक्या विचारवंताच्या मांडणीचा अभ्यास केला आहे म्हणजे तो मला तंतोतंत समजला आहे आणि मी तो तंतोतंत आचरणात आणतो आहे हा समज एका बाजूने भाबडेपणाचा आणि दुसर्‍या बाजूने धूर्तपणाचा असतो. बहुसंख्य मंडळी ज्या विचाराची मांडणी करतात तो विचार ते आचरणात आणत असतीलच असे नाही. याला त्यांची विचारांची समज, कुवत, गाफीलपणा, परिस्थिती, ज्यांच्याशी सहजीवन जगावे लागते अशा इतरांच्या विचार-वर्तनामुळॆ पडणारी बंधने अशी अनेक कारणे असू शकतात.

हे सारे लक्षात न घेता स्वत:च स्वत:ला ठेका बहाल करत ’हे आमच्या संस्कृतीत/विचारात बसत नाही.’ म्हणणारे दुराग्रही किंवा अज्ञानी असतात.

मी अमुकवादी आहे हे केवळ झेंडा मिरवणॆ आहे.जात, धर्म आणि स्वीकृत इझम याचा गजर करणे, त्याच्या अस्मितेच्या ढेकरा देणे हे कम-अस्सल लोकांचे काम आहे. ज्यांना शहाणपण रुजवून दाखवता येत नाही ते मिरवून दाखवतात इतकेच.

-oOo-

सोमवार, २२ एप्रिल, २०१९

साहित्यिक अ‍ॅटमबॉम्ब

"तो अ‍ॅटमबॉम्ब बनवण्याच्या कारखान्यात एक वेल्डर म्हणून नोकरीला होता."

एका कथेमध्ये हे वाक्य वाचले आणि मरता मरता वाचलो. आईच्यान सांगतो, मी एका काना-मात्रेचाही फरक केलेला नाही.

लगेच पुढचा देखावा माझ्या डोळ्यासमोर... चुकलो, मन:चक्षूंसमोर आला.
---

मोगॅंबोच्या बेटावर हा अ‍ॅटमबॉम्बचा कारखाना आहे. रात्रीच्या वेळी मांडवा बंदरातून या बेटावर गुपचूप येणार्‍या होड्यांमधून दणादण युरेनियमच्या पेट्या उतरवून घेतल्या आहेत. पण त्यापूर्वी अर्धी-अर्धी नोट जुळवून आयात नि निर्यात या दोन्ही बाजूंच्या किरकोळ प्रकृतीच्या दाढीवाल्यांनी एकमेकांना अंगठे उंचावून दाखवले आहेत.
इकडे कारखान्यात अणुबॉम्बची असेम्ब्ली लाईन चालू आहे. तासाला शंभर या वेगाने अणुबॉम्ब तयार होत आहेत. आमच्या कथेतले हे पात्र डोळ्यावर काळा गॉगल चढवून दणादण वेल्डिंग करते आहे. असेम्ब्ली लाईनच्या शेवटी येऊन पडलेले बॉम्ब पटापट उचलून खोक्यात ठेवणारे वीर त्याच्या भोवती थर्माकोलचे पॅडिंग लावण्यास विसरत नाहीत. इतक्यात त्यांच्यापैकी एकावर त्याचा ठेकेदार ’इथे बिड्या ओढू नकोस, बॉम्ब फुटेल नि मरु सगळे’ म्हणून खेकसतो आहे.

आत चकाचक वॉर-रुममध्ये मोगॅम्बो कोणा-कोणाच्या ऑर्डर पुर्‍या झाल्या कोणत्या पेंडिंग आहेत याचा हिशोब घेतो आहे. किम-जॉंग-इल आणि ट्रम्प यांनी यावेळी कमी ऑर्डर दिल्यामुळॆ ’मुख्य कष्टमर्सचे बिलिंग कमी होऊ लागले तर क्वार्टरली टार्गेट कसे अचिव होणार?’ असा जाब विचारतो आहे. त्यावर ’पण यावेळी मोदींकडून जास्तीची ऑर्डर येते आहे. आणि हे इम्रानच्या कानावर जाईल याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे तिकडूनही मोठी ऑर्डर मिळू शकते.’ असा दिलासा त्याचा ’ऑर्डर्ली’ देतो आहे...

च्यामारी बघता बघता एक कथा खरडून काढली. हाय काय न नाय काय. अन् म्हणे मराठी लेखनाला वैश्विक परिमाण नाही. समीक्षक कुठले.

सोमवार, ८ एप्रिल, २०१९

पुरोगामित्वाचा राजकीय प्रवास

<<पुरोगामीत्व हे जाती सारख "बंदिस्त" होत आहे . पुरोगामित्वाचा प्रवास भाजपा ते काँग्रेस एवढ्याच परिघात फिरतो .!!>> या दाव्याला दिलेला प्रतिसाद.

थोडी दुरुस्ती ’राजकीय पुरोगामित्वाचा’ प्रवास भाजप ते कॉंग्रेस असा होतो. हा मुद्दा मान्य.

पण राजकारणात व्यवहार्यता नावाचा एक भाग असतो. लोकशाही मध्ये बहुसंख्य मतदार हे अपुरोगामी (प्रतिगामी म्हणत नाही मी) असतात. त्यांची मते हवी असतील तर व्यवहार्य, मर्यादित, आणि उलट आपल्याच डोक्यावर बसणार नाही इतपत तडजोड अपरिहार्य ठरते. अति ताठर पुरोगामित्वाचे राजकारण अपुरोगामी -बहुसंख्य समाजात अयशस्वीच होत असते. मार्क्सने जसे सोशलिझम हा कम्युमिझमचा पहिला टप्पा (अंतिम साध्य नव्हे) मानला, सोविएत ’सोशलिस्ट’ (कम्युनिस्ट नव्हे!) रिपब्लिक होते, त्याच धर्तीवर पुरोगामी राजकारणाचा कॉंग्रेस हा पहिला राजकीय टप्पा मानायला हवा.

दुसरे असे की जेव्हा स्वच्छ पुरोगामी राजकीय पर्याय उभा राहिल तेव्हा त्यांना कोणता विरोधक अधिक सोपा असेल असा विचार करुन पाहा. या पुरोगामी पक्षाला राजकीय पराभव करताना भाजपचा पराभव करताना अधिक सोपे की कॉग्रेसचा? माझ्या मते कॉंग्रेसचा. त्यामुळॆ जोवर तसा स्वच्छ पुरोगामी पर्याय उभा होत नाही, तोवर कॉंग्रेसला जिवंत ठेवणे, भाजपचा पराभव करुन सत्तेजवळ नेणॆ हा पुरोगामी राजकारणाचा मधला टप्पा मानायला हवा. स्वच्छ पुरोगामी पर्याय उभा राहितो काहीच न करणे, भाजपलाच सत्तेसाठी पुढे चाल देणे मला मान्य नाही.

असा स्वच्छ पुरोगामी पर्याय केव्हा उभा राहील, कसा उभा राहील याबाबत अजूनही मंथन होत नाही. त्यामुळॆ तो किमान दहा वर्षे तरी उभा राहू शकेल असे मला वाटत नाही. अशा वेळी दगडापेक्षा वीट मऊ हा निर्णयच करावा लागणार आहे आणि तो राजकीय दृष्ट्या भानावर असलेले. अति-स्वप्नाळू नसलेले पुरोगामी करत आहेत असा माझा समज आहे. वैचारिकतेचा बडिवार, तुमच्यापेक्षा आम्हाला अधिक कळते हा ’होलिअर दॅन दाऊ’ दावा, त्यामुळॆ वैचारिक सुधारणा वरुन खाली होणार हा गैरसमज, ही पुरोगामी विचारांचा पाया आकुंचित होत चालल्याची कारणे आहेत. भाजप-संघाची चलाखी ही की ’तुमचे जे आहे ते जगात भारीच आहे’ असे म्हणत सामान्यातल्या सामान्यांचा अहंकार ते कुरवाळतात नि खांद्यावर हात टाकायचा हक्क मिळवतात. यथावकाश खांद्यावरचा हात खिशात जाऊन त्या माणसाचे सर्वस्व हिरावून घेऊन त्याला गुलाम करतात. सामान्यातल्या सामान्यालाही ’तुला कळत नाही. माझे ऐक.’ असे सांगणे अपमानास्पद वाटत असते, हे पुरोगामी अजून समजून घ्यायला तयार नाहीत. आणि मुळात तयार विचारव्यूहांतून जगण्याचे सारे शहाणपण मिळते नि ते रुजवले की काम झाले या गैरसमजातून बाहेर येण्याची गरज आहे. सामान्यांच्या जगण्यातून येणारा विस्ड्म आपल्या विचारात अंतर्भूत करुन घ्यायला हवा, केवळ आपल्या विचारवंतांच्या पोथीचे प्रेषित बनून भागणार नाही हे समजून घ्यायला हवे आहे..

कम्युनिस्ट स्वत:ला सर्वात प्युअर पुरोगामी समजत असतील तरी त्यांना राजकारणाची व्यवहार्यता मुळीच समजलेली नाही असे माझे ठाम मत आहे. (भाजपने त्या व्यवहार्यतेला शरण जात लोटांगण घातले आहे, ते दुसरे टोक.) सत्ता असेल तर विचार रुजवणे सोपे जाते. २०१४ च्या विजयानंतर आसपास किती नव्या ’शाखा’ निर्माण झाल्या, किती शाळकरी पोरे अर्धी चड्डी घालून तिथे जाऊ लागली याचे निरीक्षण करा. या उलट ज्योतिबाबूंना पंतप्रधानपदाची संधी होती तेव्हा कम्युनिस्टांनी वैचारिक प्युरिटी वगैरेची बढाई मारत माती खाल्ली. ते पंतप्रधान झाले असते तर लोकांना कम्युनिस्ट विचारांबद्दल कुतूहल निर्माण झाले असते, त्यात विचार निदान काही प्रमाणात तरी पसरला असता असे म्हणणे फार टोकाचे होणार नाही.

तेव्हा पुरोगामी मंड्ळी १०० टक्के पुरोगामी असा राजकीय पर्याय उभा करतील तेव्हा आम्ही नक्कीच त्या बाजूचे असू. पण तोवर पुरोगामित्वाची पोथी व्याख्यान-लेखनादी देव्हार्‍यात ठेवून पूजा करत निष्क्रिय बसणॆ जमणार नाही. आमचा गण्या शंभर टक्के नसेल, चाळीस टक्के पुरोगामी असेल तरी त्याला निवडून देणार आहोत. कारण पुरोगामित्वात साफ नापास असणार्‍यापेक्षा निदान तो पास तरी होतो आहे. आणि अशा वेळी वैचारिक सक्षम पुरोगामी ’मी अधिक पुरोगामी की तू’ या वादात संघटनेला नगण्य महत्व देत स्वत:च्या सर्वस्वी वैयक्तिक पुरोगामित्वाचा खुंटा हलवून बळकट करण्यासाठी आपले वर्तुळ लहान करत नेत आहेत. त्यासाठी अन्य पुरोगाम्यांचे तथाकथित दोष शोधून शोधून ’तो छुपा तिकडचा’ वगैरे बिनडोक धंदे करत बसले आहेत. जवळ करण्यापेक्षा दूर करण्याची ही अहमहमिका, ती ’अस्पृश्यता’च त्यांना दुबळे करत नेते. पुरोगाम्यांनी राजकीयदृष्ट्या बरेच शाहाणे होण्याची गरज आहे. वैचारिकता नि राजकारण हे तंतोतंत साधले पाहिजेत हा अव्यवहार्य आग्रह सोडण्याची गरज आहे. वैचारिक निष्ठा हा जगाच्या अंतापर्यंत केवळ मूठभरांचाच प्रश्न राहणार आहे, इतरांपुढे अधिक मूलभूत प्रश्न असतात नि तेच राजकारणात अधिक प्रभावी ठरतात. तेव्हा हे जमेल तेव्हा खरे. आणि तसे झाले तरच तात्पुरती तडजोड म्हणून स्वीकारलेला कॉंग्रेस हा पर्याय कचराकुंडीत फेकून देता येईल.

-oOo-

शुक्रवार, ५ एप्रिल, २०१९

द्वेषोत्सुकं जगत्सर्वं


केवळ आपल्याच निर्मात्यावर उलटला म्हणून भस्मासुर निर्माण करु नये इतका संकुचित अर्थ त्याच्या कथेतून घ्यायचा नसतो. भस्म हे सर्वंकष नाशाची परिणती आहे. उपासनेसाठी भस्माची सोय करण्यासाठी म्हणून दिलेला हा वर प्रत्यक्षात बुद्धीहीनाच्या हाती दिलेले सर्वनाशाचे हत्यार असते .

व्यावहारिक जगातही बुद्धीची जोड नसलेल्या विद्रोहाचेही अनेकदा हेच होताना दिसते. आपल्या विरोधकांविरोधात पहिले यश मिळताच ’हाच रामबाण उपाय’ समजणार्‍या त्या गटातील लोक एक-एक करुन एकमेकांविरोधात उभे राहात विद्रोहाचाच विध्वंस करत नेतात हा इतिहास... नव्हे, वर्तमान आहे. एका बाजूला बुद्ध्यामैथुनात रमलेले विद्रोही आणि दुसर्‍या बाजूला बुद्धी बाजूला ठेवून विध्वंसालाच विद्रोह समजणारे अर्धवट, यात विद्रोहाचे शतखंड विभाजन होत प्रस्थापित पुन्हा बळकट होत जाणे ही शोकांतिका आपण पाहतोच आहोत.

पण हे विद्वेषाचे हत्यार केवळ त्याच्या निर्मात्यालाच भस्म करते असे मात्र नव्हे. निव्वळ एखाद्यावर हात ठेवून त्याचे पुरे भस्म करणारे सक्रीय झाले की जगातील सार्‍या निर्मितीची घटिका भरली समजावे. भस्मासुराला एकदा भस्म करण्याची चटक लागली, त्या उपायाला तो ’हर मर्ज की दवा’ समजू लागला की मग अमुक एका गोष्टीचा विध्वंस का करायचा याला कारण शोधायचीही गरज उरत नाही. अगदी क्षुल्लक कारणानेच नव्हे, तर कोणत्याही कारणाशिवाय, ’कुणाचेही मी भस्म करु शकतो’ या उन्मादात तो समोर दिसेल त्याचे भस्म करु शकतो. सोबतीला अहंकाराची जोड मिळाली की मग 'लग्नाचा प्रस्ताव नाकारला', ’दारुला पैसे दिले नाहीत’, ’जेवण दिले नाही’, ’माझ्याकडे टक लावून पाहिले’, ’आमच्या नेत्याला नावे ठेवली’, ’इतिहासातील आमच्या जातीच्या/प्रदेशाच्या/राज्याच्या/देशाच्या/धर्माच्या नेत्याच्या कार्यशैलीतील, कृतीमधील न्यून वा चुका दाखवल्या’ या आणि अशा असंख्य कारणाने कुणा-कुणाची हत्या घडवली जाते हे आपण नित्य पाहात आलो आहे.

समूळ नाशाची ही प्रेरणा माणसाच्या आदिम मानसिकतेचा भाग आहे. विरोधी टोळीचा वंश खणावा म्हणून अर्भकांनाही ठार मारण्याची ही मानसिकता आपल्या मनाच्या तळाशी सतत खदखदत असते. या ना त्या प्रकारे ती उसळी मारुन वर येत असते. मग एखाद्या दीड-दोन वर्षाच्या पोराचे नाव तैमूर आहे, या एकाच धाग्यावर त्याच्या जमातीचा जहरी विद्वेष करणारी एखादी आई, ऐतिहासिक तैमूरच्या कृत्यांवरुन त्या बालकाचे मूल्यमापन करणारी किळसवाणी विधाने करते. किंवा भारतातील क्रिकेट वर्ल्ड कप च्या दरम्यान आपल्या जिंदादिल कमेंट्रीने एखाद्या क्रिकेटरच्या तोडीस तोड लोकप्रियता मिळवलेल्या ’सायमन डूल’सारख्या व्यक्तीला ठार मारण्याची इच्छा एखाद्या धंदेवाईक टीमच्या समर्थकाला होते.

राजकारणात गेल्या पाच वर्षात भाताची रोपे तयार करावीत तशी विद्वेषाची रोपे बनवून देशभरात रुजवली गेली आहेत. एकदा ही विषवल्ली रुजली, की ती समूळ उखडणे अवघड. निर्मितीला कष्ट लागतात, बुद्धी लागते, सामूहिक कृती लागते. ते जिकीरीचे पण अपार समाधान देणारे काम असते. अर्थात ’आमच्याकडे आहे तेच सर्वात भारी, तसे सिद्ध होत नसेल तर सारे स्पर्धक नष्ट केले की पुरते’ असे समजणार्‍या, ’आपली उंची वाढवण्यासाठी स्पर्धकांचे पाय कापा’ मानसिकतेच्या मंडळींना ते कधीच समजणार नसते. ते न केलेली निर्मितीसुद्धा बहुमताने सिद्ध करु पाहात असतात. आणि त्यासाठी जी टोळी जमवावी लागते, ती विचारापेक्षा विखाराने अधिक चटकन जमते, हे त्या धूर्तांना चांगलेच ठाऊक असते. कारण निर्मितीच्या कामापेक्षा विध्वंस अधिक सोपा असतो, विशेषत: टोळी जमवून केलेला.

---
(बातमी: आयपीएल’ या क्रिकेट लीग मधील बंगळुरु संघाच्या एका चाहत्याने सायमन डू’ल या कमेंटेटरला ठार मारण्याची धमकी दिली.)