रविवार, ४ जून, २०२३

जम्पकट - ५ : अजन्मा जन्मासि आला (पूर्वार्ध)

कुटुंबव्यवस्था आणि वारसा<< मागील भाग
---

मानवाच्या टोळीजीवनाच्या काळात त्याचे आयुष्य भूक, भावना आणि भय या तीनच बाबींभोवती बांधलेले होते. भूक अन्नाने भागवली जात होती. टोळीजीवनामध्ये आपल्या टोळीतील व्यक्तींबाबत बांधिलकी, आपलेपण तर अन्य टोळीतील व्यक्तींबाबत द्वेष, तिरस्कार, शत्रुत्व या भावना असत. माणसाची भूक भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्नसंपादन, आहारसिद्धता याबाबत लेखमालेच्या मागील भागांमध्ये विवेचन आलेले आहे. त्याचप्रमाणे मानवी समाजव्यवस्था विविध संक्रमणातून जात असतानाची स्थित्यंतरेही नोंदवलेली आहेत. या भागामध्ये मानवी जीवनात असलेले भय आणि त्या अनुषंगाने देव संकल्पनेची उत्पत्ती नि तिचा पुढील प्रवास याबाबत उहापोह केलेला आहे.

भयवाटेने प्रवेश

माणूस जंगलजीवी, टोळीजीवी असताना भय त्याला अनेक वाटांनी भेटीस येत असे.

LionWorshipInEgypt
https://stillunfold.com/ येथून साभार.

शिकारीला जाताना शिकारीकडे लक्ष एकाग्र केले असता सापासारखे एखादे जिवाणू त्याला दंश करुन जात असे अथवा वाघासारखे एखादे शिकारी जनावर त्याच्यावरच हल्ला करत असे. अचानक हल्ला करणारे शिकारी अथवा मांसाहारी हे प्राणी अन्नातले स्पर्धकच होते. शिकारीच्या वाटेवर असताना जोरदार पाऊस, वणवा वा वादळ त्याला अडकवून टाकत असे. रानातून जाताना सर्वत्र एकसारखा पसरलेला हिरवा-पिवळा रंग त्याला चकवा देऊन त्याची वाट चुकत असे. याखेरीज या हल्ल्याला अनुकूल परिस्थिती निर्माण करणारा अंधार अर्थात रात्र याचीही भीती.

या प्रासंगिक प्राकृतिक अडचणींपलिकडे अतिवृष्टी अथवा अवर्षणासारख्या दीर्घकाळ अन्न-तुटवडा निर्माण करणार्‍या आपत्तींनाही त्याला तोंड द्यावे लागत असे. त्यांवर मात करण्याची साधने त्याच्याकडे नव्हती- आजही नाहीत! त्यांपासून संरक्षण करणे एवढेच त्याच्या हातात होते. त्यादृष्टीने त्याने काही उपाय योजणे सुरू केले असावेत.

पावसांपासून संरक्षण करण्यासा आडोशाचा आधार घेण्यास, पावसाची वा वणव्याची चाहूल घेण्यासाठी घ्राणेंद्रियाचा वापर तसेच अन्य प्राण्यांच्या हालचालींचे निरीक्षण करण्यास त्याने सुरुवात केली. त्याच धर्तीवर वाघासारख्या शिकारी वा हिंस्र प्राण्यापासून संरक्षण करण्याचे मार्ग त्याने शोधले असतील. त्यासाठी त्यांच्या अधिवासाचा शोध घेणे, त्याच्या हालचालींच्या निरीक्षणाच्या आधारे आपले शिकारक्षेत्र निवडणे आदी ज्ञानेंद्रियांधारित उपाय तो योजू लागला असेल. पण यापलिकडेही अज्ञाताचे भय राहतेच.

लेखमालेच्या पहिल्या भागात माणसांनी कोल्ह्यांच्या टोळीला माणसाळवण्याबाबत कॉनरॅड लोरेन्झने लिहिलेल्या काल्पनिक गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्यात माणसांची टोळी कोल्ह्यांसाठी आपल्या शिकारीतील काही वाटा मागे सोडत जात असते. त्याच धर्तीवर, ‘पोट भरलेल्या वाघापासून हरणालाही भय नसते’ हे ध्यानात आल्यावर माणसाच्या एखाद्या टोळीनेही त्याच्यासाठी शिकारीचा वाटा ठेवण्यास सुरुवात केली असेल. 

याचा उगम कदाचित दोन स्पर्धक टोळ्यांमध्ये क्वचित होणार्‍या देवघेवीतूनही झाला असेल. त्यातून आपल्या शिकारीमध्ये त्याच्याकडून येणारे विघ्न त्यांना टाळणे शक्य झाले असेल. मग बहुतेक उपद्रवी प्राण्यांनाही त्यांच्या सोयीचे असे देणे दिले जाऊ लागले असेल. पुढे नागर मानवाने या विघ्नकर्त्यांना देवत्व दिल्यानंतर त्यांच्या संदर्भात याला ‘नैवेद्या’चे रूप आले असावे. गो. नी. दाण्डेकरांच्या ‘जैत रे जैत’ मध्ये ठाकर नाग्या आपल्या सोबत्यांसोबत शिकारीला जाताना वाघदेवाला, नागदेवाला निवद देऊनच पुढे जातो असा उल्लेख आहे.

पण या टप्प्यावर हा व्यवहार देवघेवीचा होता. या विघ्नकर्त्यांना आपल्या आयुष्यात अडचणी वा धोके निर्माण करण्यापासून परावृत्त करण्यासाठी काही देऊ करणे हा हेतू होता. यात श्रद्धेचा अंशही नव्हता. देवत्वाची संकल्पना अजून दूर होती. पुढे माणसाची बुद्धी नि जगण्याची व्याप्ती वाढली, त्याच्या आयुष्यातील अडचणींची, धोक्यांची संख्याही वाढली तेव्हा त्याला एखाद्या नियंत्रकाची, देवाची कल्पना करावीशी वाटली.

प्राकृतिक ते मानवी

जगातील बहुतेक संस्कृती-परंपरांमधून देवत्वाची कल्पना उत्क्रांत होत गेलेली दिसते. यात देवांची पहिली पिढी ही प्राकृतिक देवांची असते. आपल्याकडे वैदिक देवांमध्ये अग्नी, सूर्य, वरुण, वायू, उषा, आपस वगैरे देवतांची पहिली पिढी होती. टोळीप्रमुखाप्रमाणे या देवांचा राजा म्हणून इंद्र होता. ग्रीकांमध्येही टायटन्स (Titans) ही ग्रीक देवांची पहिली पिढी. यात Oceanus, Coeus, Crius, Hyperion, Iapetus, Cronus हे सहा देव नि Theia, Rhea, Themis, Mnemosyne, Phoebe, आणि Tethys या सहा देवतांचा समावेश होतो. ही सर्व युरेनस आणि गाया या आद्य माता-पित्याची अपत्ये. युरेनस आकाशाचा देव, तर गाया धरित्रीची देवता. Oceanus हा समुद्राचा देव. तो आणि Tethys यांची अपत्ये ही नद्यांचे देव नि देवता...

एकुणात ग्रीक देवांची ही पिढी म्हणजे प्राकृतिक देवांचे मनुष्यीकरण होण्याचा टप्पा आहे. ऑलिम्पियन म्हणून ओळखली जाणारी ग्रीक देवतांची दुसरी पिढी प्राकृतिक संदर्भ सोडून संपूर्णपणे मानवी झालेली आहे. (अलिकडे बर्‍याच गाजलेल्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेमध्ये बरीच पात्रे वचन देताना, शपथ घेताना ‘बाय द ओल्ड गॉड्स अँड द न्यू’ असा उल्लेख करतात. त्याचा संदर्भ इथे आहे. ) आपल्याकडे पुढच्या पिढीमध्ये विष्णू, ब्रह्मा, शिव, लक्ष्मी वगैरे देवांचा उदय झाला. यथावकाश मागील पिढीतील देवांचे नियतकार्य या नव्या पिढीच्या सुपूर्द केले गेले. हे स्थित्यंतर जंगलजीवी माणूस हळूहळू नागरजीवी अथवा स्थिरजीवी होतानाच झाले असावे.

आफ्रिकेतील जंगलवासींमध्ये आजही प्रत्येक टोळीचे एक आराध्य दैवत असते. हे दैवत निसर्गातील एखादा प्राणी, पक्षी वा सजीव असतो. त्यातून त्या त्या टोळीकडून त्या एका प्राण्याची शिकार केली जात नाही, त्याला संरक्षण दिले जाते. यातून त्या प्राण्याचा निर्वंश होणे टळते. विविध प्राण्यांना, पक्ष्यांना वेगवेगळ्या टोळ्यांकडून संरक्षण मिळाल्याने निसर्गाचा तोल राखला जातो. ही खरी संस्कृती म्हणायची! इथून पुढे मानव-समाजाचा जो ‘विकास’ झाला किंवा जी ‘प्रगती’ झाली त्यातून जे रसायन तयार झाले त्यात हा संस्कृतीचा अंश लयाला गेला.

अनागर ते नागर

जोवर सर्व उत्पादन माणूस केवळ शारीरबळ नि कौशल्याआधारे करत होता, तोवर निसर्गातून तो किती घेईल याला मर्यादा होत्या. हाताने होईल तितकेच काम तो करु शकत होता, आणि त्या कामाला आवश्यक तितकेच निसर्गातून काढून आणत होता. आणि माणूस काढून नेईल त्याहून कैकपट अधिक निसर्ग पुन्हा निर्माण करत होता. स्वयंचलित अथवा वेगवान यांत्रिक उत्पादन सुरू झाल्यावर उत्पादनक्षमता अफाट वाढली, त्याला लागणार्‍या कच्च्या मालाची गरज वाढली आणि त्याच्या पूर्ततेसाठी निसर्गाला ओरबाडण्याचा वेगही वाढला. या अफाट वेगवान आयुष्यात माणसाला निसर्गाची माफी मागून, मागणी करुन सामुग्री जमा करण्याची फुरसद आणि इच्छा दोन्ही उरली नाही. आणि त्या विनाशाच्या वेगाने पुनर्भरण करण्याची शक्तीही निसर्गात नव्हती.

वेगवान आणि यांत्रिक उत्पादकतेने समाजात आणखी एक बदल घडवला तो म्हणजे माणूस नागरी आयुष्याकडे– आणि म्हणून निसर्गापासून दूर सरकला. निसर्गापासून दूर वा त्याचा विध्वंस करुन उत्पादनकेंद्रे, व्यवस्थापनकेंद्रे आदींची उभारणी करून त्याभोवती मानवी समाजाची वस्ती आकाराला येऊ लागली. या नागर, पांढरपेशा आयुष्याची नाळ निसर्गातील फारच थोड्या मनुष्येतर सजीवांशी जोडली गेली होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील देव-संकल्पनांचा संदर्भही निसटत गेला आणि देवत्व हे निसर्गाकडून अध्याहृताकडे सरकले. जगण्याशी त्याची नाळ तुटली आणि स्वर्ग-नरक, मृत्यूपूर्व नि पश्चात जीवन, पूर्वजन्माचे ओझे वगैरे संकल्पनांच्या आधारे त्याचा विस्तार होत गेला.

देव-संकल्पना निसर्गापासून दुरावली नि माणसाच्या मनातील तिचा धाकही नाहीसा झाला. निसर्गातील नागाचा नि वाघाचा, नागदेव नि वाघदेव होऊन त्याची पूजा करणे, त्याला मान देणे, त्याच्या वाटेस जाणे टाळणे हा ‘जगा नि जगू द्या’ दृष्टीकोन मागे पडून वर्चस्ववादी वृत्ती वाढली. नागापासून दूर राहण्यापेक्षा त्याला ठार मारण्याचे उपाय सहजपणे योजले जाऊ लागले. वाघनखे गळ्यात घालून शौर्याचा आव आणला जाऊ लागला. औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि त्यातील उत्पादनांसाठी आवश्यक कच्च्या मालासाठी माणूस निसर्गाची अनिर्बंध लांडगेतोड करु लागला.

निसर्ग-मनुष्य संबंधांसंदर्भात विचार केला तर शहरीकरण ही मानवी संस्कृतीमधील सर्वात मोठी घोडचूक होती. निसर्गाशी नाते पूर्ण तुटून गेल्यावर आपल्या विकासाची किंमत फक्त पैशाने मोजली जात नाही याचे भानही हरवले. या दरम्यान माणसाच्या देवांचेही प्राकृतिक बंध तुटले. सूर्य, वायु, नदी, समुद्र यांचे तसंच नागदेव, वाघदेव, यांचे देवत्व लयाला जाऊन सोनेरी मुकुटापासून रेशमी धोतरापर्यंत पेहरावाचे आणि पीळदार संगमरवरी शरीराचे मानवी देव जन्माला आले.

Khandav-van%20Sanhaar.jpg
खांडववन: नागर देव-मानव युतीने प्राकृतिक आयुष्याचा केलेला विध्वंस.

माणसाप्रमाणे हे मनुष्यरूपी देवही निसर्गाचे शत्रू होते. वने जाळून वस्ती करणार्‍या माणसाने तेच गुण देवांनाही बहाल करुन आपल्या कृतीचे समर्थन करण्याची सोय करुन ठेवली. अर्वाचीन काळात आता ती ही आवश्यकता उरलेली नाही. ‘विकास’ नावाच्या अरुपाचा देव सारा विध्वंस आवश्यक मानत पुढे जातो आहे. माणसाच्या नीतिसंस्कारांना दिलेला आधार म्हणून देवता-संकल्पना आता निरुपयोगी ठरते आहे. जंगलवस्तीमधून गावात नि गावांतून नगरात पोहोचलेली ती संकल्पना आता देव्हार्‍यात बंदिस्त झाली आहे. तिला कर्मकांडरूपी भरजरी वस्त्र देऊ केले की त्याबदल्यात तिने माणसाच्या आयुष्यातीले नीतिनियमांच्या विरल्या वस्त्राकडे दुर्लक्ष करावे असे माणसाने तिला बजावून ठेवले आहे.


बळकट केलेला खुंटा

मनुष्यप्राण्याने आपल्या भीतीवर मात करण्यासाठी देव ही आदर्श, नियंत्रक आणि कृपाळू संकल्पना निर्माण करून त्याचे अस्तित्व आणि श्रेष्ठत्व प्रतिपादित करायला सुरुवात केली. हे अस्तित्व केवळ मानण्यावरच अवलंबून असल्याने स्वयंसिद्ध होते. पण मनुष्यप्राण्याचा माणूस होऊ लागला, त्याचे विचार-इंद्रिय विकसित होऊ लागले तसतसे श्रेष्ठत्व हे पुराव्याने, तर्काने सिद्ध करावे लागेल याची त्याला जाणीव झाली. माणसांच्या कुठल्याही टोळीला अन्नासाठी, पाणवठ्यावरील नियंत्रणासाठी अन्य स्पर्धक टोळ्यांशी संघर्ष करावा लागत असे. अन्य प्राण्यांचाही जगण्यासाठी इतर प्राण्यांशी संघर्ष होतच असे. अशा संघर्षरत आयुष्य असण्याच्या काळात श्रेष्ठत्वाची व्याख्या ही सापेक्ष असावी हे ओघाने आलेच.

JesusAndSatan

आपली रेघ मोठी करायची असेल तर शेजारची खोडून लहान करायला हवी, आणि शेजारी अशी रेघ नसेलच तर आपणच एक छोटी रेघ शेजारी ओढून आपली रेघ मोठी असल्याचा भास निर्माण करावा’ हे माणसाला संस्कृतीच्या अगदी प्राथमिक अवस्थेत झालेलं ज्ञान आहे असं म्हणायला हरकत नाही. आजही एखादी व्यक्ती ‘कुणाला तरी हरवून जिंकली’ आहे असं म्हटलं की जमावाच्या तिच्याबाबतचा आदर चटकन वाढतो आणि त्याचे म्हणणे जमाव आस्थेवाईकपणे ऐकतो. आता हे जिंकणे युद्धभूमीवरचे रक्तरंजित युद्ध असो किंवा बौद्धिक वितण्डाच्या स्वरूपातील. 

त्याचबरोबर आजही एखाद्याच्या अवगुणाबद्दल बोललात तर त्याच्या बाजूचे लोक हटकून त्याच्याहून अधिक अवगुणी व्यक्तीला चर्चेत आणून त्याच्या निरपेक्ष मोठेपणाऐवजी, सापेक्ष मोठेपणा तुमच्या गळी उतरवू पाहतो. माणसाने देवांच्या बाबतीतही हीच युक्ती वापरण्यास सुरुवात केली. आपल्या देवाच्या मोठ्या-शेजारी छोटी रेघ ओढून त्याने त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास सुरुवात केली.

पण हा जरा धोक्याचा मुद्दा आहे. हा शत्रू वास्तवातील असेल तर यात त्याचाकडून काही वेळा आपल्या देवालाही पराभवाला सामोरे जावे लागण्याची जाण्याची शक्यता असते. यावर शब्दपंडितांनी एक सुरक्षित उपाय शोधून काढला. त्यांनी या देवांचे, त्याच्या प्रेषितांचे काल्पनिक शत्रू निर्माण करून त्याच्यावर आपल्या प्रेषिताने, नेत्याने, देवाने, धर्मासारख्या व्यवस्थेने विजय मिळाल्याच्या कपोलकल्पित कथा प्रसृत करायला सुरुवात केली. अशा विजयकथांतून आपल्या देवाची, नेत्याची, धर्माची ‘विश्वासार्हता’ वाढते आणि जमाव त्याच्या शब्दाला प्रमाण मानून चालण्याची शक्यता कित्येक पट वाढते.

जगात सर्वाधिक प्रसार झालेल्या बिब्लिकल धर्मात सैतान, इब्लिस वगैरे असतात, बौद्ध धर्मात बुद्धाला तत्त्वच्युत करू पाहणारा ‘मार’ असतो, बोधिसत्त्वाचे सत्त्व हरण करू पाहणारा देवदत्त असतो. हिंदू धर्मात असा ‘एकास एक’ सामना नसला– याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदू धर्मच अनेकेश्वरवादी आहे – तरी ऋषीमुनींचा तपोभंग करणार्‍या मायाविनी अप्सरा असतात, यज्ञसंस्कृतीच्या उपासकांचे यज्ञ उद्ध्वस्त करणारे असुर असतात, क्वचित माणसामध्ये कुणी ‘कली’ शिरतो नि तो असुरवृत्तीने वागू लागतो. थोडक्यात श्रेष्ठत्वाचा मापदंडच मुळी ‘शेजारच्या लहान रेघेहून मोठा’ असा असतो. जगातील बहुतेक सर्व धर्मांमधे देवाच्या जोडीला असा एक अँटि-गॉड असतो. त्याचा रोल, त्याची भूमिका ही या शेजारील छोट्या रेघेसारखी असते.

ही आदिम जाणीव माणूस आजही पुढे घेऊन जातो आहे. राजकारणापासून समाजकारणापर्यंत कुठेही शेजारी लहान रेघ ओढल्याखेरीज आपली रेघ मोठी सिद्धच करता येत नाही इतकी श्रेष्ठत्वाची व्याख्या खुजी झाली आहे. इतिहास वा साहित्यही याला अपवाद नाही.

अतिमानवी (superhuman) देवत्व

TheAlchymist

प्रथमपासूनच अन्नाची (वा पुढे आर्थिक ) असुरक्षितता, अनारोग्य नि त्यातून येणारी वेदना आणि अखेर मृत्यू या तीन गोष्टींचे भय माणसाच्या मनाला कायम व्यापून राहिलेले असते. त्यामुळे या तीन भयांचे परिमार्जन करण्याच्या दृष्टीने त्याचा आटापिटा चालू असतो. प्राचीन काळापासून सर्वच समाजातील किमयागार(alchemist) शिशापासून किंवा अन्य सहज उपलब्ध असलेल्या धातूपासून सोने, पॅनासिया(Panacea) म्हणजे ‘हर मर्ज की दवा’ आणि मुख्य म्हणजे चिरंजीवित्व देणारे द्रव्य (elixir of immortality) तयार करण्याच्या प्रयत्नात होते. धन, आरोग्य आणि मृत्यु-मुक्ती हे तीन हेतू यामागे होते.

पण केवळ मृत्यूपासून मुक्ती पुरेशी नव्हती. कारण जगण्याच्या धबडग्यामध्ये तो अनेक धोक्यांना, लहान लहान समस्यांना सामोरे जात होता. त्यातून त्याच्या शरीराची झीज होत होती. अनारोग्याची अनेक कारणे आसपास होती. अनारोग्याने भरलेले शरीर आणि चिरंजीवित्व यांचा संयोग मृत्यूहून वेदनादायी असेल हे त्यांनी जाणले असेल. त्यामुळे चिरंजीवित्वासोबतच आरोग्याचा विचारही ते करत होते. काहींना चिरंजीवित्वाचा सुदृढ नि निरोगी शरीर आणि दीर्घायुष्य हा व्यावहारिक अर्थच अभिप्रेत होता.

पण अमरत्व देणारे द्रव्य विकसित करण्यासाठी आधी ‘असे द्रव्य अस्तित्वात आहे का?’, ‘असू शकेल का?’ ‘निर्माण करता येईल का?’ ‘अमरत्व साध्य करणे शक्य आहे का?’ या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे मिळण्याची गरज होती. तरच पुढच्या धडपडींमागे पुरेसे मानसिक नि आर्थिक बळ उभे करणे शक्य होते. यासाठी आधी कुठेतरी असे अमरत्व अस्तित्वात आहे अशी मानवाने कल्पना सुरू केली. कल्पनाविस्ताराची मोठी कुवत असलेल्या माणसांनी मग पुराणकथांना जन्म दिला.

वास्तव आयुष्यात दिसणारे आकाशातील सूर्य, तेथूनच पडणारा पाऊस, तो घेऊन येणारे पाणी हे जसे चिरंजीव आहेत तसेच दोन हात, दोन पाय नि डोके असणारे मानवसदृश जीव कुठेतरी आहेत, नि ते चिरंजीव आहेत ही कल्पना देवांना नि पारलौकिकाला जन्म देऊन गेली. यामुळे चिरंजीवित्वाला कल्पित का होईना आधार मिळाला नि त्याचा पाठपुरावा सुकर झाला.

सुरुवातीच्या काळात प्राकृतिक घटकांना, काही महानायकांना (उदा. राम, कृष्ण, अनेक ग्रीक देवता) दिले गेलेले देवत्व मागे पडून अध्याहृत, कल्पनानिर्मित देवांनी त्यांची जागा घेतल्यावर त्यांच्या गुणांमध्येही बदल होत गेले. त्यांच्यातला मानवी अंश अस्तंगत होऊन ते अधिकाधिक पारलौकिकाकडे ढकलले गेले. ही देव-संकल्पना प्राकृतिक देवता वा त्यांच्या पुढच्या पिढीच्या देव-संकल्पनेहून वेगळी होती. आता अतिमानवी देवतांची सद्दी सुरू झाली होती. यातूनच पुढे सर्वशक्तिमान, सर्वकल्याणकारी अशा एका परमेश्वराची संकल्पना बिब्लिकल धर्मांतून उदयाला आली.

आता आधीच्या पिढीतले मानवी देव-देवता या नव्या सर्वव्यापी परमेश्वराचे अवतार अथवा अंशरूप अस्तित्व म्हणून मानल्या जाऊ लागल्या. त्यांच्यामध्ये असणार्‍या मानवी गुणांचा हळू हळू लोप होत गेला आणि तेही सर्वगुणसंपन्न असल्याचे ठसवले जाऊ लागले. इंद्रादी देवांची सद्दी हळूहळू संपत आल्यानंतर पुढे आलेल्या शिव, विष्णू वगैरे वैदिकोत्तर देवांच्या पुढच्या पिढीतील आपले देव सर्वस्वी दुर्गुणविरहित असल्याचा दुराग्रह आपण धरू लागलो आहोत.

(पूर्वार्ध समाप्त)

- oOo -

    पुढील भाग >> > जम्पकट - ६ : अजन्मा जन्मासि आला (उत्तरार्ध)


संबंधित लेखन

७ टिप्पण्या:

  1. देव हा पूर्णपणे मानवनिर्मित आहे.
    त्यामुळे आपल्या स्थलकालादि गरजेनुरूप मानव देवात हवेतेवढे हवेतसे बदल करून त्याला यथेच्छ वापरून घेतो.
    एकूण बदलत्या कालप्रवाहानुसार लवकरच AI हा देव होऊ घातलाय असं वाटतं जो खरोखरच मानवांचा विधाता बनणार आहे अशी लक्षणं दिसू लागली आहेत.

    उत्तर द्याहटवा
  2. वरील टिप्पणी दिलीप जोशी याची आहे

    उत्तर द्याहटवा
  3. मानवाला मिळालेल्या बुध्दीचा वापर म्हणावा की गैरवापर? वर उल्लेख झालेल्या AI ला ही आपल्याला हवे ते वदवून घेण्याची तयारी विविध गटांकडून व्हायला लागली आहे. देव जरी मानवी मेंदूची निर्मिती असली‌ तरी त्या देवत्वाचा पगडाच कर्मकांड घडवून आणतो हे नक्की

    उत्तर द्याहटवा