गुरुवार, २३ मार्च, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - १ : पहिले पाऊल

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

रांगते लहान मूल जेव्हा प्रथम एखाद्या गोष्टीला धरून दोन पावले टाकते, तेव्हा त्याला ‘चालणे’ या क्रियेचा वा हालचालीचा शोध लागतो. यात त्याने ज्या जड गोष्टीचा आधार घेतलेला असतो अशा– भिंत, टेबल, खुर्ची, पलंग वगैरे वस्तूंना पकडले, की आपण केवळ उभेच राहू शकतो असे नव्हे, तर पायांची हालचाल केल्यावरही पडत नाही इतका आधार मिळतो, याचे भान त्याला येत असते.

परंतु याने आधाराचे भान आले तरी ‘खोली’चे येत नाही. म्हणून मग पलंगावर उभे राहून चालता चालता पलंगाच्या वा सोफ्याच्या कडेपाशी पोचते तेव्हा थांबावे हे त्याला समजत नाही. जेव्हा ते पायाखालची जमीन संपून धाडकन पडते, तेव्हाच त्याला पायाखाली नेहमीच आधार असतो असे नाही याचे भान येते. मग ते एक एक पाऊल टाकताना जमिनीकडे ध्यान ठेवायला शिकते.

भाषेबाबतही आपण पाहतो की भारतीय अनाथालयातून अमेरिकेत दत्तक गेलेले मूल हे इंग्रजी – वा आपल्या दत्तक पालकांची – भाषाच बोलते, ज्या भारतीय प्रदेशात जन्मले ती नव्हे. मुलाच्या जडणघडणीत– ‘ख़ानदान की इज़्जत’ वगैरे बाष्कळ संकल्पना बाळगणार्‍यांना अमान्य असलेला, परिसर घटकांचा आणि त्या मुलाच्या चुकांमधून, अनुभवातून, जाणिवेतून होणार्‍या विकासाचा भागच मोठा असतो. असे असूनही अगदी मुलांसाठीच म्हणून लिहिलेल्या साहित्यातूनही याचा मागमूस कुठे आढळत नाही.

आपल्याकडे लहान मुलांसाठी म्हणून लिहिल्या जाणार्‍या साहित्याचा साधारण आराखडा ठरलेला आहे. यात स्वतः वयाने मोठ्या असलेल्या नि आपल्याला लहान मुलांचे भावविश्व समजते असा ‘समज असणार्‍या’ लेखकांचा कल्पनाविस्तार असतो. यात अगदी लहान मुलांसाठी बडबडगीतांपासून जी सुरुवात होते ती परिकथा, काल्पनिक जग, अद्भुत कथा वगैरे प्रवास करत किशोरवयीन मुलांसाठी ऐतिहासिक-काल्पनिक हीरोंपर्यंत गाडी पोहोचते.

काही मंडळी त्यापुढे जाऊन मुलांना अगदी सुसंस्कारित करण्याचे कंकण वगैरे बांधून बोधकथा, नीतिकथा लिहितात. याची मोठ्यांसाठीची थोडी सुधारित आवृत्ती म्हणजे पंचतंत्र, इसापनीती वगैरे प्रकारच्या तात्पर्यकथा.

कालानुरुप यात थोडे बदल होऊन आता यात लवकर वयात येऊ लागलेल्या नि मोठ्यांची ‘पॉकेट-बुक एडिशन असलेल्या नव्या पिढीला’ आवडते म्हणून यात मारधाड, हीरो, व्हिलन, परग्रहावरचे वा याच ग्रहावरचे आक्रमक मग त्यांना विरोध करण्यास उभा ठाकणारा आपला हीरो, त्याला मिळालेली अलौकिकाची किंवा जादूच्या एखाद्या साधनाची साथ, हे अनेक धर्मग्रंथातून वा ऐतिहासिक दस्तऐवजातून सापडणारे तपशीलच वेगळ्या संदर्भात मांडून आता मुलांचे मनोरंजन केले जाते.

मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांमधून परी, राक्षस, राजकन्या, राजपुत्र, वर देणारे देव अथवा जिन यांची हकालपट्टी होऊन तिथे थेट समोरासमोर युद्ध करावे लागणारे चित्रविचित्र रंगांचे, आकाराचे, नावाचे व्हिलन आणि वीत-दीडवीत उंचीचा आपला हीरो यांच्यात हास्यास्पद पातळीवर होणारी लढाई वगैरे मालमसाला असतो.

चलत्-चित्राचे (Animation) माध्यमही याला अपवाद ठरलेले नाही. स्नोव्हाईट, सिंडरेला, हकलबेरी फिन, टॉम सॉयर वगैरे नायक/नायिकांची जागा आता ही-मॅन, स्पायडरमॅन, सुपरमॅन वगैरे ’ढिशुम-मॅन्स’नी घेऊनही जमाना झाला. आता बेन-१०, जस्टीस-लीग, सुपरहिरो-लीग वगैरे करत आपल्या या तथाकथित हीरोंनी-सुपरहीरोंनी आपले कार्यक्षेत्र पृथ्वीबाहेर विस्तारत नेले आहे. एकुणात सतत कुठल्या ना कुठल्या धोक्याशी, आक्रमणाशी, शत्रूशी लढणे त्याला नेस्तनाबूद करणे हाच या महाभागांचा एकमेव कार्यक्रम वर्षानुवर्षे चालू राहतो. ढोबळमानाने एकाच कथेच्या सांगाड्यावर ‘स्टार-वॉर्स’ मालिकेतले सात ते आठ चित्रपट आणि पाच-दहा मालिका सनसनाटीपणा आणि पोशाखीपणाप्रेमी प्रेक्षकांच्या ताटात पुन्हा-पुन्हा वाढून त्या प्रत्येक ताटाचे वेगळे दाम जॉर्ज लुकसने वसूल केले आहेत.

जगण्यातील कुतूहलाचे, माहितीचे, विकासाचे, नात्या-गोत्यांचे इतर कोणतेही आयाम या कथानकांना नसतात; असलेच तर ते या तथाकथित हीरोगिरीसमोर किती दुय्यम ठरतात/ठरवावे लागतात हे दाखवण्यापुरतेच.

या सार्‍या तथाकथित प्रगतीच्या वाटेवर त्या मुलांच्या प्रत्यक्ष भावविश्वातील गोष्टींना कोणतेही स्थान नाही. एखादे मूल आयुष्यात वाढत जाते, तेव्हा त्याच्यावर होणारे विविध प्रकारचे संस्कार, त्याच्या अंगभूत गुणांच्या आधारे त्यातून त्याने अंगीकृत केलेले कौशल्य, जमा केलेली माहिती नि सिद्ध केलेले ज्ञान या मार्गाने त्या व्यक्तीची जडणघडण होत असते. त्याच्या व्यक्तिमत्त्वावर अंगभूत गुणांबरोबरच त्याच्या आजूबाजूच्या परिसर-घटकांचा परिणामही मोठा असतो. त्याचा विचार मुलांसाठी अथवा मुलांबद्दल लिहिल्या गेलेल्या बहुतेक पुस्तकांमधे, तयार केल्या गेलेल्या करमणूकप्रधान दृक्-श्राव्य कार्यक्रमात बहुधा नसतोच.

BakharBimmachi

‘बखर बिम्मची’ हे पुस्तक त्या अर्थाने आगळे वेगळे म्हणावे लागेल. लहान मूल ज्या विशिष्ट परिसरात, कौटुंबिक-सामाजिक पार्श्वभूमीवर जगत असते त्याचा परिणाम, प्रभाव त्याचा भावविश्वावर पडत असतो. त्याचबरोबर त्या लहान मुलाची कल्पनारम्यता हा आणखी एक मोठा घटक असतो. त्या लहान मुलाचे जग हे अशा वास्तव-कल्पनेच्या तीरावर उभे असते. जसजसे वय वाढते तसतसे माणूस वास्तवाशी अधिकाधिक जुळवून घेण्याचा प्रयत्न करत जातो, त्याच्या भावविश्वातील कल्पनारम्यतेचा भाग कमी होत जातो. त्या वयातील ही वास्तव-कल्पनेची सरमिसळ नेमकी हेरून या छोटेखानी पुस्तकामध्ये जी.ए. कुलकर्णींनी बिम्मचे आयुष्य चितारले आहे.

‘याला बखर का म्हटले आहे?’ असा पहिला प्रश्न मनात आला, तर समजावे हे पुस्तक वाचण्यासाठी तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात. बखर हा साहित्यप्रकार इतिहासाची कालानुक्रमे नोंद घेणारा, प्रामुख्याने एका मुख्य व्यक्तिरेखेचा आयुष्याचा प्रवास नोंदवणारा. एरवी आपण बखरी वाचतो त्या ऐतिहासिक पुरुषांच्या आयुष्यावरच्या. पण बखरी फक्त राजे-रजवाड्यांच्या नि श्रेष्ठ पुरुषांच्याच असाव्यात असा नियम कुणी केलाय, केला असला तरी तो आपण का मानावा? शूरवीरांच्या लष्करी विजयांबद्दल जसे लिहिता येते तसेच सर्वसामान्यांच्या आयुष्यात पादाक्रांत केलेल्या एकेका टप्प्याची, विचार व जाणिवेतून सिद्ध नि अंगीकृत केलेल्या ज्ञानाची बखर का लिहू नये?

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे जन्माला आलेले प्रत्येक मूल हे आपल्या आसपासच्या जगाचा आपल्या परीने, आपल्या कुवतीच्या मर्यादेत वेध घेत असते. त्यातून ते आपले निष्कर्ष काढते, आपल्या वर्तणुकीत त्याला अनुरूप बदल करत जाते. त्यामुळे माणसाच्या आयुष्याचा पाया आणि विस्ताराची क्षमता ही त्याच्या मूलपणात त्याने केलेल्या प्रवासावर बरीच अवलंबून असते.

अलीकडे मनोरंजनप्रधान माध्यमांकडून बहुसंख्येला प्रामुख्याने अपेक्षित असते तसे चित्तचक्षुचमत्कारिक, थरारक असे बिम्मच्या आयुष्यात काही नाही. पण तुमच्या आमच्या जगण्याची, बालपणीची नाळ तिथे जुळली आहे. मग असे वाटेल की ‘मग त्यात काय वाचायचे?’. पण बखर बिम्मची तुमच्या बालपणीचेच वाटणारे किस्से मांडून, नेमक्या ठिकाणी काही अधोरेखिते वाढवून त्यांच्याकडे डोळसपणे पहायला भाग पाडते.

आता हे पुस्तक, त्यातील गोष्ट ती बिम्मच्याच वयाच्या – वय वर्षे दोन ते पाच – मुलांसाठी आहे असे वरकरणी दिसते. पण यात अडचण अशी की त्यांच्यात अद्याप वाचनाची क्षमता विकसित झालेली नसते. तेव्हा ते पालकांनी/मोठ्यांनीच त्यांच्यासाठी वाचायला हवे. याचा फायदा घेऊन जीएंनी बिम्मची ही गोष्ट दुपदरी ठेवली आहे, ऐकणार्‍या बिम्मबरोबरच वाचणार्‍या त्याच्या आई-वडिलांसाठी त्यात काही ठेवून दिले आहे. ही ‘छोट्याची मोठी गोष्ट’ वाचताना गोष्टीतल्या बिम्मप्रमाणेच ऐकणार्‍या बिम्मच्या मनात जसे काही उमटते, तसेच त्याच्यासाठी ते वाचणार्‍याच्याही मनातही काही उमटून जाऊ शकते. या बिम्मबरोबरच त्या बिम्मचे आई किंवा वडीलही या वाचनातून काही वेगळे गवसल्याचे समाधान उपभोगू शकतील असं मला वाटतं.

या द्विस्तर योजनेमुळेच कदाचित केवळ लहान मुलांचे पुस्तक म्हणून वाचताना काही गोष्टींचा – विशेषत: एक दोन प्रकरणातल्या शेवटांचा – उलगडा होणे किंचित अवघड जाते. तिथे थोडा तर्काचा आधार घ्यावा लागतो. कदाचित या दुसर्‍या स्तराचा शोध वाचकाने घ्यावा असे जीएंना अपेक्षित असावे. अर्थात हा जीएंचा मूळ उद्देश होता की माझा उगाच ‘पिंडात ब्रह्मांड’ पाहण्याचा प्रयत्न आहे हे वाचकाने आपल्यापुरते ठरवावे.

बिम्म आणि बब्बी

त्याचे वडील कामानिमित्ताने परगावी असल्याने आपले घर, आई आणि बब्बी इतकेच बिम्मचे जग. बिम्म आणि त्याची मोठी बहीण बब्बी, हे आसपास दिसणार्‍या कोण्याही भावा-बहिणींसारखेच आहेत. बिम्म वाचा नि विचाराचे इंद्रिय नुकतेच जागे झालेला, तर बब्बीने ‘शाळा’ नावाच्या नव्या जगात नुकतेच पाऊल ठेवले आहे. हे दोघे आपापल्या वाट्याचे उपद्व्याप करतात नि एकमेकांचे उपद्व्याप आईच्या कानावर घालण्याचे काम मोठया आनंदाने करतात.

आयुष्यात काही टप्पे असे असतात जे पार केले असता इतका काळ बरोबर असलेल्यांप्रती अचानक एक सूक्ष्मसा तुच्छभाव, श्रेष्ठत्वाची भावना, एक अभावित अहंकार निर्माण करतात. यात शाळेत पाऊल टाकणे हा पहिला. मग महाविद्यालय ऊर्फ कॉलेजमध्ये जाणे नि पदवी मिळणे, पहिला रोजगार सुरू करणे, जोडीदार मिळणे वा मिळवणे, दारी पहिली गाडी येणे आणि मग नव्या जगातला सर्वोच्च वगैरे म्हणतात तो म्हणजे परदेशप्रवासाची संधी चालून येणे.

या प्रत्येक टप्प्यावर ती काल्पनिक रेषा पार केलेल्या प्रत्येकाच्या मनात मागे राहिलेल्यांबद्दल – ते ही यथावकाश पुढे येतील, येऊ शकतील हे ठाऊन असूनही – एक प्रकार अहंभाव निर्माण होतो. त्यांच्यापेक्षा आपला अधिकार अधिक आहे असे त्या व्यक्तीला वाटू लागते नि बरेचदा तो गाजवण्याच्या प्रयत्नही होत असतो. बब्बी शाळेत जात असल्याने ‘बिम्मपेक्षा आपण अधिक शहाणे आहोत’ असा तिचा समज झाला आहे. त्याला अनुसरून बब्बी बिम्मवर जमेल तितकी दादागिरी करत असते.

याशिवाय त्यांच्या या जगात एक आजोबा आहेत. मागच्या आवारात भेटणारे हे आजोबा खरंच अस्तित्वात आहेत, की केवळ बिम्मच्या कल्पनेत हे जीएंनी स्पष्टपणे उलगडलेले नाही. कारण खुद्द बिम्म सोडून आईला अथवा बब्बीला ते कधीच दिसत नाहीत. पण त्याबाबतीत खरे-खोटे तपासण्याची आवश्यकताही नाही. त्याच्या भावविश्वात, त्याच्यापुरते ते आहेत नि त्या दोघांची छान मैत्रीही झाली आहे.

ते बिम्मला पतंगाला बांधून उडायचे – उडवायचे नव्हे! – कसे ते दाखवतात, पिवळ्या पक्ष्याच्या त्याचा शोधात मदत करतात, त्याच्यासाठी पेरू आणून देतात, बिम्मला सापडलेल्या किल्लीचे कुलूप शोधून देतात. थोडक्यात ज्या गोष्टींत आई अथवा बब्बी उपयोगी पडत नाहीत, तिथे ते बिम्मच्या मदतीला धावून येतात. बिम्मला त्यांच्या अस्तित्वाचा एवढा पुरावा पुरेसा आहे. त्याच्या वयाच्या मुलाला अस्तित्वाबाबतचे याहून अवघड प्रश्न मुळी पडतच नसतात. हीच तर बिम्मच्या जगाची गंमत आहे.

वडील परगावी असल्याने (अलीकडच्या नागरी जीवनात सतत कामात व्यग्र असल्याने) घरात जवळच्या वडिलधार्‍या पुरूष माणसाशी संवाद होत नसल्याने ती गरज हे आजोबा भागवत असावेत. वय वाढते तसे हे कल्पनेतले आजोबा तुमच्या आयुष्यातून हद्दपार होतात... आणि अनेकदा वास्तवातलेही!

बिम्मचे आयुष्य हे सुमारे दहा ते बारा टप्प्यात जीएंनी साकार केले आहे. यातील प्रत्येक टप्पा लहानसाच असला तरी बिम्मच्या वयातल्या मुलांच्या भावविश्वातील विविध वस्तू, गोष्टी, संकल्पना याबाबत बोलणारा आहे. हा बिम्म साधारणपणे चार दशके मागच्या जगातला आहे. त्याचे आयुष्य महानगरी नसल्यामुळे मनुष्य नि मनुष्यांनी अट्टाहासाने जवळ केलेल्या कुत्र्या-मांजराखेरीज अन्य सजीवसृष्टीशीही त्याची नाळ अजून घट्ट जुळलेली आहे. त्यामुळे त्याच्या जिज्ञासेचा, कुतूहलाचा प्रवास या जीवांना वाट पुसतु होतो आहे.

स्वत:च्या अस्तित्त्वाबद्दलच्या प्रश्नापासून नाते, रंग, आकार, उत्पत्ती पासून निव्वळ कल्पनारंजनापर्यंत अनेक बाबतीत बिम्मचे आयुष्य विहरते आहे. वाटेवर भेटलेल्या पिट्टूशी, चारा खाऊन दूध देणार्‍या गायीशी, वारशाने मिळालेल्या पिवळ्या पक्ष्याशी, स्वप्नांच्या वाटे भेटलेल्या इतर पक्ष्यांशी, आपल्या पाठीवर बसवून फिरवून आणणार्‍या हत्तीशी, बेहद्द आवडणारी कैरी देणार्‍या आंब्याच्या झाडाशी ऋणानुबंध जोडत जातो... बिम्म लहान मुलाचा ‘छोटा माणूस’ होत जातो.

पैसे देऊन कुत्र्याचे पिलू अथवा गाणारा पक्षी विकत आणून स्वामित्वभावनेनेच त्याच्याशी नाते जोडणार्‍या, प्लॅस्टिकच्या पिशवीतून दूध विकत आणणार्‍या, हत्ती फक्त प्राणिसंग्रहालयात अथवा पुस्तकांत पाहणार्‍या नि लोणचे नामक बाजारात मिळणार्‍या पदार्थामध्ये कैरीची करकरीत अवस्था संपून येणारी तिची विकलांग अवस्थाच पाहणार्‍या नागरी अथवा महानगरी बिम्मला हे सारेच अपरिचित वाटणार आहे. पण बिम्मने जसा आपला पिवळा पक्षी शोधला, तसे आपल्या बापदाद्यांचे बिम्मपणातील आयुष्य कसे होते याबाबत त्यांना कुतूहल असेल तर ‘बखर बिम्मची’ हे पुस्तक आणि ही लेखमाला त्यांच्यासाठीच आहे.

बिम्मच्या मागील आवारातील त्या आजोबांनी बिम्मला उडणारा नव्हे– तर उडवणारा पतंग दिला होता. त्यावर बसून आकाशात उडता येई. थोडे उंचावरून, थोडे दुरून पाहिले, की आपले जग किती वेगळे दिसते याचा अनुभव बिम्मला त्या पतंगाने दिला आहे. बिम्मने आता हा पतंग माझ्या हाती सोपवला आहे. त्यावर बसून मीही जगण्यात हरवून गेलेला माझ्यातील बिम्म कुठे दिसतो का ते पाहातो आहे.

(क्रमश:) पुढील भाग : >> हा बिम्म आहे    

- oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा