रविवार, २६ मार्च, २०२३

राजसा, किती दिसांत...

उशीरा केलेल्या आंघोळीदरम्यान पकडलेला Eureka moment...

( लग्नापूर्वी प्रियेसाठी चंद्रावर जाण्यास सिद्ध असलेला प्रियकर नवरा नि बाप झाला की स्नानासाठी मोरीपर्यंत जाण्यासही उत्सुक नसतो. अति झालं म्हणजे त्याची पूर्वीची प्रिया नि आताचं खटलं त्याला निर्वाणीचा इशारा देते.)

HelgaAndHagar
(कविवर्य सुरेश भट यांची क्षमा मागून...)

आंघोळून टाक आज, विसळून अंग अंग
राजसा किती दिसांत न्हायला नाहीस सांग

त्या तिथे जुन्या खणात, पेंगतो तव गंजिफ्रॉक  
हाय रे नको तयाचे, झोपेतच होणे दुभंग  

दूर दूर राहतो बघ, रुसला तुझाच लेक 
साहवेना त्या जराही, प्राचीन तव देहगंध

गार गार या हवेत घेऊनी पंचा समेत
मोकळे करून टाक एकवार सर्व अंग

काय हा तुझा रे श्वास, दर्प हा इथे भकास
बोलावण्यास तुला, उठला पाण्यावरी तरंग

हे तुझे तुला कळेल, स्नान हे तुवा फळेल 
सांग ना अता खरेच...

(चाल बदलून आर्जवी स्वरात)
... वाटते ना तुलाच फ्रेश ?

- रमताराम

- oOo -

(न्हाणीघर,  दि. २६ मार्च २०२३)
	

संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा