मंगळवार, २८ मे, २०१९

एका किंग-स्लेअरची गोष्ट (एक राजकीय रूपककथा)

एक आटपाट नगर होतं. तिथं एक पाटलाची गढी होती. पाटील अगदी पाटलासारखा होता. कधी रयतेची काळजी घेई, कधी त्यांचं शोषण करी. पाटलाचे सगे-सोयरे, सोयरे-धायरे, जातवाले-गाववाले पाटलाच्या अधिक मर्जीतले होते, हे तर ओघानं आलंच.

गावात एक तेजतर्रार फायरब्रँड तरुण तालमीत नित्य नेमानं मेहनत करत असे. त्याला पाटलाचं हे वर्चस्व मान्य नव्हतं. पाटीलकी ही शोषक व्यवस्था आहे, असं त्याचं म्हणणं होतं. त्यानं गावातच अ‍ॅंटी-पाटीलिझमची मुहूर्तमेढ रोवली. ग्रामपंचायतीची निवडणूक असो, पंचायत राजमधून मिळणारे लहान-सहान ठेके असोत की, कुठल्या-कुठल्या सरकारी योजनांमार्फत येणारी मदत असो. प्रत्येक पातळीवर तो पाटलाला नडू लागला. कालचं पोरगं आहे म्हणून पाटीलही दुर्लक्ष करत असे. गावातील लोकांना पाटलाचं वर्चस्व डाचत असलं तरी एक अपरिहार्यता म्हणून किंवा शेवटी अडीनडीला तोच कामात येतो म्हणून बहुतेक लोक त्याबद्दल फारशी तक्रार करत नसत. त्यामुळे त्या तरुणाला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. पण तरी देखील गल्लीतली चार-पाच पोरं त्याच्या आसपास असतच.

‘गांजलेल्या व्यक्तीला तुझ्या या दूरवस्थेला हा जबाबदार असे म्हणून’ दगडाकडे जरी बोट दाखवलं तरी ती ते खरं मानून ते बोट ज्याचं आहे, त्याला आपला त्राता मानत असते. कारण विपन्नावस्थेत, किमान गरजांबाबतही गांजलेल्या व्यक्तीची सारासारविवेकबुद्धी फारशी काम करत नसते. त्या क्षणी ही स्थिती लवकरच पालटेल असं आश्वासन देणारा कुणी देवबाप्पा तिला हवा असतो. एका ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी दुष्काळ पडला. आलेल्या सरकारी मदतीचा जास्त वाटा पाटलानं आपल्याच लोकांना दिला म्हणून तरुणानं रान उठवलं. त्यामुळे जनतेनं त्यालाच सरपंच म्हणून निवडून दिलं. पण एकाच वर्षांत झालेला सावळा-गोंधळ पाहून पंचायत चालवणं हे या प्राण्याचं काम नव्हे, हे लक्षात आल्यानं गावातील काही ज्येष्ठांनी त्याच्याकडून राजीनामा लिहून घेतला. पाटील पुन्हा राज्य करू लागला.

या पदच्युतीनं तो तरुण अधिकच पेटला. सनदशीर मार्गानं पाटलाला पदच्युत करता येत नाही, हे ध्यानात आल्यावर ‘या अन्यायी, शोषक पाटलाची सत्ता मी उखडून काढीन,’ अशी गर्जना त्यानं केली. मग तालुक्याला गेला, शहरात गेला नि जमेल त्या बाहेरच्यांशी संधान बांधून त्यानं एक फळी उभी केली. आपल्या या अभियानाला शहरातला एक नेता त्यानं पकडून आणला. गावात पाटलाच्या शोषणाविरोधात धामधूम सुरू झाली. गावाबाहेरून पगडीवाले, फेटेवाले, टोपीवाले, बोडके लोक धोतर नेसून, जीन्स घालून, अर्ध्या चड्डीवर जमेल तसं गावात धडकू लागले. पाहता पाहता गावात पाटीलविरोधी कृती समिती उभी राहिली. ग्रुप-ग्रामपंचायतीत या पाटलासमोर कायम माघार घ्याव्या लागणार्‍या शेजारच्या गावातल्या पाटलानं त्यात आपली वर्णी लावून घेतली. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या एकमेव न्यायानं तरुणानं त्याला ताबडतोब सोबत घेतलं. बर्‍याच दबावानंतर प्रस्थापित पाटलानं सरपंचपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. पण त्या जागी कुणी सरपंच व्हावं याबाबत कृती समितीमध्ये एकमत होईना. शेजार गावच्या पाटलानं आपलं घोडं दामटून पाहिलं, पण पुरेशा पाठिंब्याअभावी निमूट माघार घेतली.

Kingslayer

हा तिढा बरेच दिवस चालला. आपला तेजतर्रार तरुण नि त्याचे तरुण साथीदार अस्वस्थ होत होते. असला सनदशीर वगैरे प्रकार चिवटपणे चालवण्याइतकी चिकाटी त्यांच्यात नव्हती. मग त्यांच्या त्या अस्वस्थपणाला हेरून शेजारच्या गावच्या पाटलानं ‘धडक कृती करायला हवी’ असं पिल्लू सोडलं. पाटलानं धूर्तपणे नेमकं काय करावं हे सांगितलं नसलं तरी अशा उतावळ्या, अस्वस्थ तरुणांकडून धडक कृती म्हणजे काय होऊ शकते, याची त्याला धूर्ताला पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे ते जे ठरवतील त्यात ‘सक्रीय’ सहभाग घेण्याचं ठोस आश्वासन त्यानं त्यांना देऊन टाकलं. थोडक्यात निर्णयाची जबाबदारी त्यानं त्यांच्यावर टाकली.

एके दिवशी मध्यरात्र उलटून गेल्यावर पाटलाची गढी धडाडून पेटली. त्याच वेळी गावाबाहेर त्याच्या उभ्या पिकातही अग्नितांडव सुरू झालं. सकाळ होईतो अंगावरच्या कपड्याखेरीज पाटलाकडे काहीही उरलं नव्हतं. पंचनामा, सरकारी मदत या बाबी कितपत कामाच्या असतात, हे स्वत:च पाटील असल्यानं त्याला ठाऊक होतं. अशा विपन्नावस्थेमध्ये सगे-सोयरे, जातवाले-गाववाले सारे साथ सोडतात याचे भान असल्याने, शेजारच्या पाटलाने देऊ केलेली रक्कम घेऊन पाटलानं गढीची जमीन आणि शेताचा एक तुकडा वगळता उरलेलं सारं शेत त्याच्या नावावर करून दिलं. आलेल्या मूठभर पैशातून गावाबाहेरील उरलेल्या शेतात एक झोपडी बांधून पोटापुरतं पिकवत तो जगू लागला.

इकडे नव्या पाटलानं गढीची जागा साफ करून स्वत:चा नवा वाडा उभा केला. जुन्या पाटलाचे बरेचसे सगे-सोयरे, सोयरे-धायरे, जातवाले-गाववाले आता नव्या पाटलाच्या मर्जीतले झाले, हे तर ओघानं आलंच. दोनच वर्षांत जुन्या पाटलाच्या अनुपस्थितीत त्यानं इतकी वर्षं हुलकावणी दिलेलं सरपंचपदही हस्तगत केलं.

त्या तेजतर्रार तरुणाचं काय झालं? शहरातून सुटीसाठी गावात आलेल्या नव्या पाटलाच्या पोरानं तिकडे पाहिलेल्या कुठल्याशा सिनेमा की टीव्ही मालिकेतून ऐकलेली ‘किंग-स्लेअर’* ही पदवी त्याला बहाल केली. त्या धुंदीत तो काही महिने राहिला. मग अंगभूत अस्वस्थपणानं म्हणा की ‘कालचा गोंधळ अधिक बरा होता’ याची जाणीव झाल्यानं म्हणा, तो आहे तिथंच राहून आता नव्या पाटलाच्या वर्चस्वाला आव्हान देऊ पाहात होता. पण नवा पाटील पूर्वी त्याच्या बाजूलाच राहिलेला असल्यानं त्याची कुवत जाणून होता. त्यामुळे त्या तरुणाची सारी रसद तोडत, त्याच्या मित्रांना एक एक करून आपल्या बाजूला वळवून घेत त्यानं त्याला निष्प्रभ करून टाकला. त्यामुळे जुन्या पाटलाची गढी उदध्वस्त झाल्यावर आता आपण सरपंच होऊ अशी त्याला स्वप्नं पडत होती, ती धुळीला मिळाली. पण पडेल तरी नाक वर या न्यायानं ‘मला राजकारणात रस नाही. मी रयतेत राहून तिची सेवा करेन,’ अशी मखलाशी करायला सुरुवात केली.

जेव्हा नवा पाटील दुसर्‍यांदा सरपंच म्हणून निवडून आला, तेव्हा हा तेजतर्रार तरुण भडकून जुन्या पाटलाकडे गेला नि नव्या पाटलाला सरपंचपद बहाल केल्याबद्दल शिव्यांची लाखोली वाहू लागला. ‘तू मेल्याशिवाय ही पाटीलकीची व्यवस्था नाहीशी होणार नाही’ म्हणू लागला. जुन्या पाटलानं सारं ऐकून त्याला गूळपाणी देऊन शांत केलं नि परत लावून दिलं.

तेव्हापासून तो नियमच झाला. आपला तेजतर्रार तरुण रोज एकदा तरी जुन्या पाटलाच्या झोपडीवर जाऊन त्याला शिव्या देतो, ‘तू मेल्याशिवाय ही पाटीलकीची शोषक व्यवस्था नाहीशी होणार नाही’, म्हणतो आणि तिथून उठून नव्या पाटलाच्या वाड्यासमोर असलेल्या वडाच्या पारावर बसून विषण्णपणे त्या वाड्याकडे पाहात असतो. जमेल तेव्हा सरत्या तारुण्याबरोबर मागे सरत चाललेल्या केसांवर हात फिरवत जुन्या पाटलाचं राज्य आपण कसं खालसा केलं, याच्या सुरस चमत्कारिक कथा ताज्या दमाच्या मुलांना, तरुणांना सांगत बसतो, नव्या पाटलाचं राज्य घालवण्यास उद्युक्त करतो. नव्या पाटलाच्या दरबारी काठ्या घेऊन उभी राहणारी ही पोरं साळसूदपणे त्याचं ऐकतात नि दूर जाऊन त्याची टवाळी करत फिदीफिदी हसत बसतात.

त्या वेळी हातापायांचा कंप सांभाळत त्याचा म्हातारा आपली वीतभर जमीन कसत असतो आणि वाड्याच्या वरच्या खिडकीतून नवा पाटील या दोघांकडे पाहून मिशीला पीळ देत गालातल्या गालात हसत असतो.

(कथा, प्रसंग काल्पनिक असले तरी पात्रांबद्दल ती खात्री देता येणार नाही.)

- oOo -

( पूर्वप्रसिद्धी: ’अक्षरनामा’ https://www.aksharnama.com/client/article_detail/3319)
---

* किंग-स्लेअर : नुकत्याच संपलेल्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेतील जेमी लॅनिस्टरला मिळालेलं उपनाम.


हे वाचले का?

रविवार, २६ मे, २०१९

पक्षांतराचे वारे (उत्तरार्ध) : पक्षांतर आणि सामान्य मतदार

पक्षांतराचे वारे - १ : नेत्यांचे वातकुक्कुट << मागील भाग
---

नेता आणि कार्यकर्ता यांचे हितसंबंध या पक्षांतराशी निगडित असतात. पण सामान्य मतदार याच्याकडे कसे पाहातो. त्याला यात अनैतिक, गद्दारी दिसत नाही का? त्यासाठी सामान्य माणसाची मानसिकता समजून घेता यायला हवी.

त्रात्याच्या भूमिकेत नेता

सर्वसामान्य माणूस हा मुख्यत: जगण्याच्या गरजांशी जोडलेला असतो. अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, विचार यांचा खल करत बसणे त्याला परवडत नाही. हल्ली शासकीय कार्यालयात किंवा बॅंकांमध्ये जशी ’एक खिडकी योजना’ असते तशी योजना तो शोधत असतो. त्या खिडकीत गेले की त्याचे काम व्हावे अशी त्याची अपेक्षा असते.

आध्यात्मिक पातळीवर देव आणि धर्म, गुंतवणूक करताना इन्शुरन्स पॉलिसी विकणारा किंवा रिकरिंगचे/पीपीएफ/भिशीचे अकाउंट चालवणारा त्याचा ब्रोकर यांच्या शिरी तो आपला भार वाहात असतो. याशिवाय मुलाने/मुलीने दहावीनंतर काय कोर्स घ्यावा यासाठी एखादा उच्चशिक्षित परिचित, हे पुरेसे पडले नाही तर जगण्यातल्या प्रश्नांवर उपाय शोधण्यास, मन:शांती मिळवण्यास एखादे कुलदैवत, एखादा आध्यात्मिक गुरु तो नेमून ठेवत असतो. त्या त्या व्यक्तीने घेतलेले निर्णय ‘आपल्या हिताचेच असतील’ असे गृहित धरुन तो डोळे मिटून अंमलात आणत असतो.

WorshippingTheLeader
Lee Chin Chang यांचे हे भाष्यचित्र dreamstime.com येथून साभार.

राजकारणाच्याबाबतही त्याची हीच मानसिकता दिसून येते. भारतात सर्व राजकारण हे व्यक्तीकेंद्रितच आहे. सामूहिक नेतृत्व या समाजाला किंवा त्यांतील सामान्य व्यक्तीला समजू शकत नाही. त्याला एक चेहरा समोर लागतो. केंद्रीय पातळीवर प्रथम नेहरु, मग इंदिरा गांधी आणि शेवटी राजीव गांधी हा चेहरा दिसत होता तोवर काँग्रेस मुख्य पक्ष होता, सत्ताधारी होता. राजीव गांधींच्या निधनानंतर ताबडतोब तिथे अन्य कुण्या नेत्याची वर्णी न लागल्याने, सोनिया गांधी मूळ विदेशी असल्यामुळे त्यांना दूर राहावे लागल्याने दहा वर्षे काँग्रेसला असा चेहरा उरला नाही.

ती पोकळी भाजपने नरेंद्र मोदींचा चेहरा समोर ठेवून भरून काढली. इंदिराजींच्या मृत्युनंतरही अनेक वर्षे गावाकडे ’ताई, मत कुणाला देणार?’ या प्रश्नाला ’बाईला’ असे उत्तर मिळत असल्याची आठवण आमचे ज्येष्ठ पत्रकार मित्र सांगत असत. तसेच आज ’मत कुणाला देणार?’ या प्रश्नाचे उत्तर ’मोदींना’ असे झाले आहे.

अगदी सामूहिकतेचा झेंडा घेतलेल्या कम्युनिस्टांचे बंगालमध्ये राज्यही ज्योती बसू या चेहर्‍याचे होते. त्यांच्या निधनानंतर कम्युनिस्ट सत्तेबाहेर फेकले गेले नि दहाच वर्षांत विधानसभेत चौथ्या क्रमांकावर आणि २०१९ मध्ये एकही खासदार निवडून आणता न येण्यापर्यंत घसरत गेले.

ईशान्येकडील राज्यात असल्याने बव्हंशी दुर्लक्षित राहिलेले,देशभरात विक्रमी २४ वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवलेले सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे पवनकुमार चामलिंग हे सर्वात दीर्घकाळ एखाद्या पक्षाचा नि राज्याचा चेहरा म्हणून वावरले आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेस, अरुणाचल काँग्रेस, यूडीएफ, भाजप आणि अखेर जनता दल(सेक्युलर) अशा पाच पक्षांमध्ये फिरलेले, आणि तरीही तब्बल बावीस वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवलेले गेगाँग अपांग हे ईशान्येकडचे दुसरे उदाहरण. त्यांचे शेजारी मिझोरममध्ये लालथानहावला हे काँग्रेसचे, आणि हिमाचलमध्येही काँग्रेसचेच वीरभद्रसिंग प्रत्येकी एकवीस वर्षे मुख्यमंत्री होते.

उडिशामध्ये नवीन पटनायक यांचा एकमेव चेहरा असलेले बीजेडीचे सरकार विक्रमी पाचव्या वेळी स्थापन होते आहे. दोन वेळा सरकार स्थापन केलेला राजद, तितक्याच वेळा सत्ताधारी झालेला जदयु अनुक्रमे लालूप्रसाद यादव आणि नीतिशकुमार यांच्या प्रायवेट लिमिटेड कंपन्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ब.स.पा.चा चेहरा म्हणून उभ्या असलेल्या मायावतींनी स्वबळावर सरकार स्थापन केले होते. टीआरएसचे चंद्रशेखर राव, द्रमुकचे अण्णादुराई आणि करुणानिधी, अण्णाद्रमुकचे एमजीआर आणि जयललिता, केरळमध्ये नंबुद्रिपाद ही आणखी काही नावे.

नेत्याचे उपद्रवमूल्य

हीच त्राता शोधण्याची मानसिकता अगदी स्थानिक पातळीपर्यंत कायम राहते. त्यामुळे असे बांधलेले मतदार पक्षापेक्षा नेत्याला बांधिल असतात. हे प्रामुख्याने काँग्रेससारख्या फ्री-लान्सर राजकारण्यांच्या पक्षाबाबत अधिक स्पष्ट दिसते. त्यामुळे विशिष्ट पट्ट्यातला संस्थानिक बनलेला नेता उठून दुसर्‍या पक्षात गेला, तरी हे मतदार त्याचा पदर सोडत नाहीत.

याला गुंतलेले हितसंबंध हा ही एक धागा असू शकतो. ‘आपले काम करणारा नेता’ म्हणून लोक त्याच्या मागे गेला तरी केल्या कामाची किंमत तो निव्वळ मताच्या नव्हे तर आणखी काही प्रकारे वसूल करत असतो. एखादा नेता सहकारी साखर कारखाना चालू करतो नि शेतकर्‍याला उसासारखे नगदी पीक घेण्याची हुकमी संधी निर्माण करतो, त्याचवेळी तो त्या शेतकर्‍याला कारखान्याचा बांधिल करुन ठेवतो. नेता त्याची आर्थिक कोंडी करु शकत असल्याने शेतकर्‍याला मतदार म्हणून नेत्याच्या मागे जावेच लागते. असाच प्रकार सहकारी बॅंका, शिक्षण-संस्था, खासगी कारखाने वा उद्योग आदिंच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. गुंतलेले हितसंबंध मतदाराला नेत्याशी बांधून घालत असतात.

स्थितिप्रियता

याशिवाय सामान्य माणूस हा बव्हंशी स्थितीप्रिय असतो. अगदी नागरी सुस्थितीतील घरातही ’सेटल होण्या’ला म्हणजे एका ढोबळ स्थिर स्थिती प्राप्त करण्यालाच महत्व असते. आहे ती परिस्थिती कुणी आमूलाग्र बदलेल अशी आशा त्याला नसते. त्यामुळे सत्तेच्या बदलाला त्याला सबळ कारण लागते. त्याला त्याच्या स्थितीतून बाहेर काढण्यास, बदलाचा विचार करण्यास बाध्य करण्यास प्रचंड उलथापालथीची वा बलाची गरज असते.

जयप्रकाश नारायण यांच्या देशव्यापी परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने निर्माण झालेल्या काँग्रेसविरोधी मतामुळेच १९७७ साली जनता पक्षाचे सरकार अधिकारारूढ होऊ शकले. २०१४ मधील अण्णा हजारेंच्या आंदोलनाने देश ढवळून काढल्यानंतरच काँग्रेस म्हणजे मूर्तिमंत भ्रष्टाचार हा समज जनमानसात रुजवणे शक्य झाले. त्यातून सामान्य माणसाने काँग्रेसला सोडून अन्य पर्यायाचा विचार केला.

असे काही घडत नसेल तर तो आधीच निवडून ठेवलेल्या नेत्याला बांधील राहतो. त्यातून सत्ताही बव्हंशी स्थिर राहते. याला कारणे असतात. एका पक्षाची सत्ता गेली, दुसर्‍याची आली तरी परिस्थितीमध्ये फार बदल होईल यावर त्याचा विश्वास नसतो (अपवाद एखादा झंझावाती नेता स्वत:ला त्राता म्हणवत दाखल झाला तर.), आणि ते बव्हंशी खरेही असते. प्रशासन तेच असते, त्याच्या गावात वा शहरात झेंडे बदलले तरी टोप्या- म्हणजे सत्ताधारी नेते, तेच असतात. मागच्या निवडणुकीत ज्याच्यावर रोष दाखवून विरोधकाला मतदान केले तोच आज त्या पराभूताच्या पक्षात येऊन जवळजवळ तसाच करभार करताना त्याला दिसत असतो. त्यामुळे होता होईतो बदल न करता निष्ठा दाखवून निदान तिचे फळ त्या नेत्यातून मागण्याची सोय सामान्य लोक करून ठेवत असतात.

पक्षीय पातळीवरचे अथवा वैचारिक पक्षांतर

आता नेता, कार्यकर्ता आणि मतदार यांच्या बाबत विचार केल्यानंतर सर्वात वरचा स्तर म्हणजे पक्ष याचाच विचारही करता येईल. वैचारिकदृष्ट्या विरोधी अशा पक्षाशी पाट लावणे यालाही बराच मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व कालात द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतावर दोन कट्टर विरोधक म्हणून उभे राहिलेल्या मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांनीही सिंध, वायव्य सरहद्द प्रांत, आणि बंगालमध्ये संयुक्त सरकार स्थापन केले होते.

आणिबाणीनंतर समाजवाद्यांनी जनसंघाला सोबत घेऊन काँग्रेसला पाय उतार केले. अलीकडच्या काळात समाजवादाचाच झेंडा खांद्यावर घेतलेल्या नीतिशकुमार यांनी एकदा सोडून दोनदा त्यांची तथाकथित तत्त्वनिष्ठा गुंडाळून भाजपशी सोयरिक केली आहे. तर गैर-काँग्रेस, गैर-भाजप सरकारचे पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहणार्‍या आणि काँग्रेसचे कूळ मिरवणार्‍या पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला न मागता, विनाअट पाठिंबा देऊ केला होता. यात पक्षांतर नसले तरी त्याच पातळीवरचे कृत्य आहे.

२०१४ मध्ये पक्ष म्हणून भाजप आणि २०१९ मध्ये कम्युनिस्ट कार्यकर्ते गटेच्या फाऊस्ट प्रमाणे आपला आत्मा विकून सत्तासुंदरीला भोगण्याची लालसा तृप्त करताना दिसत आहेत. समाजवाद्यांनी जनसंघ-भाजपशी सोयरिक केली तेव्हाच त्यांनी वैचारिकतेला तिलांजली दिली तर काँग्रेस तर या सार्‍या प्रक्रियेची उद्गातीच म्हणावी लागेल.

थोडक्यात पक्षांतर हे पक्ष, नेता, कार्यकर्ता आणि सामान्य मतदार या प्रत्येकासाठी कुठल्या ना कुठल्याप्रकारे हितसंबंध राखणारे असते. ही साखळीच त्याला जबाबदार असते. यातील एकामध्ये खळबळ वा बदल आवश्यक असल्याची भावना निर्माण झाली – अथवा केली – की ती संपूर्ण साखळी खळाळत जागा बदलत असते. आपल्या लोकशाही व्यवस्थेचा हा अविभाज्य भागच आहे.

-oOo-

पूर्वप्रसिद्धी: ’द वायर मराठी’ (https://marathi.thewire.in/pakshantar-aani-samanya-matdar)


हे वाचले का?

शनिवार, २५ मे, २०१९

बाजू-बदल खुल खुल जाए...

आमच्या लहानपणी दूरदर्शन नुकतेच आले होते आणि टेलिविजन ही देखील गल्ली वा वाड्यात एखाद्याकडेच असणारी वस्तू होती. त्यामुळे क्रिकेटचा सामना असला की तिथे आख्खी गल्ली गोळा होई.

या गर्दीत काही नमुनेदार महाभाग हटकून असत. ते नेहमी विरोधी पक्षाच्या बाजूने असत. विशेषत: भारत हरला की यांच्या वाणीला जबरदस्त धार येई. ’बघा, सांगत होतो की नाही. तुमचा गावसकर आमच्या माल्कम मार्शल समोर झुरळ आहे. त्या मनिंदरसिंगला तर तो अमका सहज फोडून काढेल.’ आम्ही आपले पडेल चेहर्‍याने बसलो असता यांचे चेकाळून भाषण चालत असे.

आणि चुकून गावसकरने शतक केले, मनिंदरसिंगने समोरच्या टीमला स्पिनवर नाचायला लावले किंवा कपिलदेवने त्यांची भंबेरी उडवली की हे गप्प होत. पण त्यांना मनातून ज्या गुदगुल्या होत असत, त्या त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत. पण सामना प्रत्यक्ष संपेपर्यंत ते फारसे बोलत नसत. एकदा का जिंकला की, ’मी बोललो नसलो, तरी यावेळी कपिलच सामना जिंकून देणार हे मला माहित होते. तुम्हाला कितपत समज आहे हे पाहात होतो.’ टाईपचे काहीतरी समर्थन करत.

समाजातील एक मोठा हिस्सा असा असतो, तो एकतर भित्रा असतो किंवा आपण चुकतो अथवा पराभूत बाजूला असतो याने त्यांना प्रचंड अस्वस्थता येते. ती त्यांच्या मर्यादित सहनशक्तीला झेपत नसते. त्यामुळे पहिले म्हणजे ते जिंकणार कोण याचा अंदाज घेऊन तीच बाजू पकडून ठेवण्याचे धोरण ठेवतात. आणि चुकून ती बाजू हरलीच तरी त्यांच्याकडे उलटसुलट कारणमीमांसा करत ’तरी मी सांगत होतो...’ पासून सुरुवात करु हळूहळू स्वत:ला पराभूत बाजूकडून सोडवून घेत विजयी बाजूला सरकत राहतात.

निवडणुकांच्या बाबतीत काही लोक पहिल्यापासून आपला पक्ष निवडून निष्ठेने त्या बाजूला राहतात. हार होवो वा जीत, त्यांची बाजू बदलत नाहीत. वाईटात वाईट काय होईल तर हरले तर ते तोंड पाडून वा लपवून बसतील, काही जण त्रागा करतील, इतर कुणावर खापर फोडू पाहतील, तर काही मूठभर ताठ मानेने ’हार-जीत चालायचीच’ म्हणत पुढे जातील. जिंकलेले उन्मादी नाच करतील, हरलेल्या बाजूच्या मंडळींना हिणवण्यात कसूर करणार नाहीत... पण सगळ्यात इंट्रेस्टिंग जमात असते ती विजेता बदलला, की हळूहळू तिकडे सरकू लागणारी. काही तर थेट उडीच मारतात. (अगदी एक बाजूवर निष्ठा असलेल्यांच्याही बाबत हे घडू शकते. त्यांच्या नेत्याने कोलांटी मारली तरी हे करावे लागते. सेनेच्या घरबसल्या सैनिकांना गेल्या पाच वर्षात दोनदा अशा कोलांट्या माराव्या लागल्या. पण तिथे निर्णय त्यांचा नसतो.)

अशी बरीच वातकुक्कुटे पाहून मौज वाटते आहे. माझ्या परिचितांपैकी किमान सात ते आठ मंडळी आहेत, जी थेट बाजू बदलून काँग्रेस वा विरोधकांना हिणवू, चॅलेंज करु लागली आहेत. आधीच चितपट मारल्या गेलेल्या एखाद्या मल्लाला पंचानेही एक लाथ घालून, 'त्याच्या त्या पराभवात माझाही हात आहे', असे स्वत:ला सांगावे आणि इतरांना भासवावे तसे.

JumpingSides
Hohojiro Zame यांचे हे भाष्यचित्र dreamstime.com येथून साभार.

ही माणसे कशी दिसतात? दंगली घडून गेल्यावर, पोलिसांनी वा निमलष्करी दलाने दंगलखोरांना हटवून रस्ता मोकळा केल्यावर, तिथे कुणी पोलिस दिसत नाही असे पाहून हळून घराबाहेर येऊन तलवार वा चाकू नाचवून ’त्या’ बाजूला आव्हान देत शड्डू ठोकणारी... दुरून पोलिस सायरन ऐकू आला की बुलेट-ट्रेनपेक्षा अधिक वेगाने पसार होणारी.

त्याशिवाय काही मंडळी लोकांच्या ध्यानात येऊ नये अशा तर्‍हेने हळूहळू दिशा बदलत आहेत. उधोजींनी तलवार म्यान करुन अफजलखानाला मिठी मारल्यावर काही सैनिक जसे राहुल विरोधाच्या पोस्ट्स एक-दोन, मग दोन-चार, मग चार-सहा करत हळूहळू वाढवत आणि मोदीविरोधाच्या हळूहळू कमी करत 'गन्तव्य स्थानी' पोचले तसे.

त्यात आधी आपण निवडलेली बाजू कमकुवत होते आहे, हे पाहून हळूच दुसरी बाजू पकडू पाहणारे आपला अंदाज चुकला हे पाहून पुन्हा ’घरवापसी’ करणारेही काही असतात.

बराच काळ फेसबुक मित्र नि माफक मित्र असलेले काही जण असे 'तन डोले, मेरा मन डोले’ मोडमध्ये गेलेले दिसत आहेत. एकुण भली मौज येते आहे. बाजू बदलू पाहणारे कायम गर्दीत, जमावात सुरक्षितता शोधत असतात, डरपोक असतात. 'कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा’ वगैरे बाष्कळ सुविचार शाळेच्या भिंतींवर रंगवलेले असत. त्याच चालीवर ’कणाहीन समविचारीपेक्षा ठणठणीत विरोधक बरा.’ असे म्हणायला हवे.

विचारपूर्वक बाजू बदलणारे वेगळे. त्या बदलाची व्यवस्थित कारणमीमांसा त्यांना देता येते. अर्थात असे प्राणी जगात फार थोडे. बरेचदा एखाद्या वैयक्तिक आघाताची प्रतिक्रिया म्हणून आपल्या बाजूवरचा विश्वास उडतो आणि ही चूक म्हणून समोरची बरोबर असे अविचारी समर्थन करत बाजू बदलणारे बरेच.

-oOo-


हे वाचले का?

पक्षांतराचे वारे (पूर्वार्ध) : नेत्यांचे वातकुक्कुट

एखाद्या राजकीय पक्षाच्या, नेत्याच्या अथवा विशिष्ट वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या शासकांच्या हातात दीर्घकाळ सत्ता असली आणि सुरुवातीच्या काळातला आशावादाचा भर ओसरला की हळूहळू त्या व्यवस्थेतील उणीवा दिसू लागतात. मग त्यांचे परिणाम तपासले जाऊ लागतात, हळूहळू त्यावर ध्यान इतके केंद्रित होते की त्यांची सकारात्मक बाजू विसरुन ‘आता हे आता बदलले पाहिजे’ या निष्कर्षापर्यंत लोक येऊन पोचतात.

त्यांना निष्कर्षापर्यंत पोचवण्यात अर्थातच विरोधकांच्या प्रचाराचा आणि अलीकडे त्याहून महत्त्वाचा म्हणजे माध्यमांचा वाटा मोठा असतो. लोकभावनेमध्ये पडू लागलेल्या या फरकाचा अंदाज मुरब्बी राजकारण्यांना लगेच येतो. त्यामुळे निवडणुका जवळ आल्या की पक्षांतराचे वारे जोरदार वाहू लागतात. असमतोल पृष्ठभागावर पाणी नेहमी उताराकडे धावते तसे राजकारणी नेहमी (सत्तेच्या) चढाच्या दिशेने धावत असतात… कार्यकर्त्यांचे लेंढार सोबत घेऊन !

सत्तांतराचा आधार

AyaramGayaram

अलीकडच्या काळात पक्षांतर हा सत्तांतराचा प्रमुख आधार किंवा हत्यार होऊन बसले आहे. येडियुरप्पांच्या भाजप सरकारच्या काळात ’ऑपरेशन लोटस’ असे गोंडस नाव देऊन यावर शिक्कामोर्तब केले गेले. अरुणाचल प्रदेश, गोवा आदि राज्यांतही सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाला मागे सारुन भाजप सत्ताधारी झाला तो याच आधारे. त्याहीपूर्वी काँग्रेस हा प्रमुख सत्ताधारी पक्ष असताना उत्तर भारतात उ.प्रदेश, हरयाना यासारख्या राज्यांतून घाऊक प्रमाणात पक्षांतरे होत असत. त्यादरम्यान गयालाल या आमदाराने एकाच दिवसांत तीन पक्ष बदलण्याचा पराक्रम केला होता. त्यावरुन पक्षांतराला ‘आयाराम गयाराम संस्कृती’ असा वाक्प्रचारच निर्माण झाला.

बंगालमधे तेवीस वर्षे शासन केलेले कम्युनिस्ट जाऊन तृणमूल काँग्रेस सत्तेवर आली, तेव्हा अनेक वर्षे कम्युनिस्ट सरकारच्या आशीर्वादाने स्थानिक पातळीवर धन आणि बाहुबलाच्या माध्यमातून समांतर सरकार चालवणारे तृणमूलसाठी तेच काम करू लागले होते. झेंड्याचा रंग बदलला असला, तरी तो झेंडा धरणारे हात तेच होते. (त्यामुळेच कम्युनिस्ट शासन गेल्यामुळे बंगालच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही.) त्यातूनही जे लोक अजूनही कम्युनिस्टांच्या पुनरुत्थानाची आशा जिवंत ठेवून त्या पक्षांना चिकटून होते, त्यांची ती आशा २०१६ मधील विधानसभेच्या निवडणुकीत कम्युनिस्ट चौथ्या क्रमांकावर फेकले गेल्यानंतर संपुष्टात आली. त्यातले बरेच आता राज्यात नव्याने शिरकाव केलेल्या भाजपच्या गोटात शिरले आहेत आणि त्यांच्या्च मदतीने भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूलच्या तोडीस तोडी कामगिरी केली आहे.

बंगालमधे जे घडले तेच कमी अधिक फरकाने गेल्या लोकसभेच्या नि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीही घडले होते. राजकारण्यांचे प्रत्यक्ष पक्षांतर आणि त्यांना खांद्यावर घेतलेल्या धनदांडग्यांचे नि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे छुपे पक्षांतर यातूनच सत्तांतर घडून आले. सुमारे १०० ते १२५ लहान-मोठ्या नेत्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या जुन्या सत्ताधारी पक्षांतून सध्या सत्तेवर असणार्‍या पक्षांत प्रवेश केला. यातील बरेच निवडूनही आले. या राजकीय नेत्यांचे आश्रित असणार्‍या, ‘कार्यकर्ते’ म्हणवल्या जाणार्‍या अनेक धनको आणि बाहुबलींनीही आपल्या मालकासोबत नवा घरोबा स्वीकारला. २०१९च्या निवडणुकांत हे प्रमाण कमी झाले (जे समजण्याजोगे आहे) तरी नगण्य नाही.

पक्षांतराशी निगडित प्रश्न

परराष्ट्रमंत्रीपद, राज्यपालपद, मुख्यमंत्रीपद आणि उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी इतके सारे ज्या पक्षाकडून मिळाले त्या पक्षाला रामराम करुन एस.एम. कृष्णांसारखा मुरलेला राजकारणी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाऊन विजनवास का स्वीकारतो? दोन राज्यांचे मुख्यमंत्रीपद एकुण तीनवेळा भूषवूनही एन. डी. तिवारींसारखा नेता, निवृत्तीचे वय उलटून गेल्यावरही पक्षनिष्ठेला तिलांजली देऊन पक्षांतर करतो, ते काय साध्य करण्यासाठी? कोणत्या आधारे हे निर्णय घेतले जातात? या निर्णयाला धक्के देऊन पुढे ढकणारे फोर्सेस कोणते असतात? पक्षांतर हा आपल्या राजकारणाचा इतका अविभाज्य भाग झाल्यानंतर यांची उत्तरे शोधणे आवश्यक होऊन बसते.

'सत्तेच्या बाजूला असणे' हा पक्षांतराचा मुख्य उद्देश असतो हे वेगळे सांगायची गरज नाही. पण असे पक्षांतर नेहमीच सत्तारूढ पक्षाच्या दिशेने होते असेही म्हणता येत नाही. मुख्यमंत्रीपद वा अधिक महत्वाचे मंत्रीपद मिळवणे, खासदारकी वा आमदारकीची उमेदवारी मिळवणे, स्वपक्षाकडून ती मिळत असूनही अनुकूल मतदारसंघात मिळत नाही म्हणून, पक्षांतर्गत विरोधकाला उमेदवारी मिळाल्याने त्याच्या पराभवासाठी प्रयत्न करता यावेत म्हणून... असे आणखी काही आयाम असतात.

अलीकडच्या काळात, स्वपक्षात बळकट प्रतिस्पर्धी निर्माण झाल्याने आपल्या पुढील पिढीची सोय करणे अवघड होणे – म्हणजे घराणेशाही! – हे आणखी एक प्रबळ कारण दिसते आहे. यापलिकडे, आपले उद्दिष्ट सफल होण्यासाठी आपली नजर असलेला, आपल्यासाठी अनुकूल मतदारसंघ, त्यातील संभाव्य पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी, त्यांचे नि आपले श्रेष्ठींकडे असलेले वजन, प्रतिपक्षाकडे असलेली लायक उमेदवाराची वानवा, आपला वा विरोधी पक्ष सत्तेजवळ जाण्याच्या शक्यता इत्यादि घटकांचा विचार करून पक्षांतराचे निर्णय घेतले जातात.

आता प्रश्न असे पडतात, की ’हे पक्षांतर मुळात निव्वळ नेत्याच्या स्वार्थामधून होत असते का?’, ’नेते पक्षांतर करतात खरे, पण त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे बांधिल मतदार आणि सर्वसामान्य माणसे याच्याकडे कसे पाहतात? त्यांना यात कुठे तत्त्वच्युती, गेलाबाजार गद्दारी दिसत नाही का?’ आणि दिसत असेल तरी त्या नेत्यांना निवडून का देतात? ’नेत्यांसाठी अशा पक्षांतराचा अर्थ काय असतो? ते कितपत सहज होते?


पक्षांतर आणि कार्यकर्ता

२०१४ च्या सुमारास यावर बोलत असताना एक चांगला अभ्यासू मित्र म्हणाला होता, ’पण तो नेता लोकांची कामे करतो आहे, तोवर तो कोणत्या पक्षाचा आहे याने काय फरक पडतो.’ जर विविध वैचारिक दृष्टिकोनांचा अभ्यास असलेल्या व्यक्तीचे हे मत असेल, तो वैचारिक बांधिलकी तर सोडाच, पक्षीय बांधिलकीही तुलनेने बिनमहत्वाची मानत असेल, तर सर्वसामान्य माणसानेही तसाच विचार केला तर आश्चर्य नाहीच.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीपूर्वी एका नेत्याने पक्षांतर केल्यावर त्याचा समर्थक असलेल्या एका कार्यकर्त्याने उद्वेगाने विचारले होते, ’आमचा नेताच प्रतिपक्षाला फितूर झाला. आता आम्ही काय करावे?’ त्यावर त्याच्या एका मित्राने त्याला मित्रत्वाचा सल्ला दिला होता, ’तू त्याच्यासोबत पक्ष बदल. अन्यथा एक शक्यता अशी आहे, निवडणुकीनंतर तुझा पक्षच त्या विरोधी पक्षासोबत जाईल. अशा वेळी तुझी ’न घर का न घाट का’ अशी स्थिती होईल.’ अवधूत गुप्ते यांच्या ’झेंडा’ या चित्रपटात नेत्यांनी बाजू-बदल आणि भूमिका-बदल केल्याने कार्यकर्त्यांची झालेली फरफट नि उध्वस्त झालेली नाती सुरेख दाखवली होती.

CashToTheFollower

पण नेहमीच नेत्यामुळेच कार्यकर्त्यांची फरफट होते असेही नाही. स्वत:च्या घरुन डबा नेऊन नेत्याच्या प्रचाराला जाणारी पिढी केव्हाच अस्तंगत झाली. आता प्रचारासाठी पैसे, दारु नि जेवण वसूल करणारे आणि सभेसाठी लोक जमवण्याची ठेकेदारी करणारे ’कार्यकर्ते’ असतात. नेत्याला पदाची नि पदापासून मिळणार्‍या आर्थिक ताकदीची जशी आस असते, तसेच या कार्यकर्त्यांनाही त्यातला आपला वाटा हवा असतो.

नेताही त्यांच्याकडून केवळ प्रचारासाठी वेळ नव्हे, तर प्रसंगी पक्षनिधीसाठी, निवडणूक खर्चासाठी, स्थानिक कार्यक्रमांसाठी पैसे खर्च करण्याची अपेक्षा करत असतो. त्यामुळे साहजिकच त्या खर्चाचा ’परतावा’ त्यांनाही हवा असतोच. हे दोनही उद्देश नेता सत्तेच्या वर्तुळात राहिला तर सफल होण्याची शक्यता अधिक असते.

त्यामुळे सत्तेचे वारे विरोधी दिशेने वाहू लागले, पुढचे सत्ताधारी वेगळे असतील याचा अंदाज आला, की कार्यकर्तेही नेत्यावर पक्षबदलासाठी दबाव आणू लागतात. नेत्याला स्वपक्षात हवे ते सत्तास्थान मिळत नाही म्हटल्यावर ’ते जिकडे असतील, तिकडे आम्ही सोबत असू.’ अशी जाहीर विधाने करत नेत्याला पक्षांतरास उद्युक्त करत असतानाच, ’नाही गेलास तर सोबत नसू.’ अशी सूचक धमकीही देऊन ठेवतात.

पण नेता-कार्यकर्ता हे नाते सहजीवनाचे असल्याने, नेताही अनेकदा स्वत:ची इच्छा कार्यकर्त्यांकरवी जाहीर करुन ’कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर पक्षांतर’ करुन स्वार्थलोलुपतेच्या आरोपापासून स्वत:ची सुटका करुन घेताना दिसतो.

-oOo-

पुढील भाग >> पक्षांतराचे वारे - २ : पक्षांतर आणि सामान्य मतदार

पूर्वप्रसिद्धी: ’द वायर मराठी’ (https://marathi.thewire.in/pakshantarache-vare-bhag1)


हे वाचले का?

गुरुवार, २३ मे, २०१९

Standing my ground

कुणी काय करावं, बदलावं की बदलू नये हे सांगत वांझोटे उद्योग करत नाही. मी काय करेन ते नक्की सांगतो.

मोदींनी भारतात प्रत्येक घरात सोन्याचा कमोड बसवला...
जगातील सातशे कोटींपैकी सहाशे नव्याण्णव कोटी, नव्याण्णव लाख, नव्याण्णव हजार, नऊशे नव्याण्णव लोकांनी लोटांगण घातले...

... तरीही या भूतली त्यांना मतदान न करणारा मी एकटा असेन.

IamNotOkWithThis

त्या माणसाने इथे द्वेष रुजवला आहे, समाजात फूट पाडली आहे, झुंडींना निवाड्याचे स्वातंत्र्य दिले आहे, जनतेने निवडून देऊनही तो स्वत:ला जनतेला उत्तरदायी समजत नाही. इतरांना ते चालत असेल पण जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून ते मला अमान्य आहे. खोटेपणा आणि चारित्र्यहनन यांचा त्याने राजमार्ग बनवला आहे. माझ्या आसपासच्या अनेक सुज्ञ भासणार्‍या व्यक्तींना त्याने त्या खोटेपणाचे आंधळे वाहक बनवले आहे. माध्यमांची विश्वासार्हता त्याने शून्यावर आणून ठेवलेली आहे. अशा व्यक्तीला मी माझा नेता मानू शकत नाही.

त्याने राज्यकर्ता असणे ही वेगळी गोष्ट आहे. बहुमताच्या लोकशाहीत राज्यकर्त्याला माझ्यासारख्या एका नागरिकाने त्याला नेता मानण्याची आवश्यकता मुळीच नाही. तसेच त्याला तसे मानले पाहिजे असे माझ्यावरही बंधन नाही.

  • बहुमताने निवडून आला म्हणून अरुण गवळीला मी नेता मानू शकलो नव्हतो,
  • बहुमताने निवडून आला म्हणून लालूप्रसाद यादवला नेता मानू शकलो नव्हतो
  • उ.प्र. च्या तुरुंगातच वस्तीला असलेल्या, आणि सलग चार वेळा आमदार झालेल्या राजाभैयालाही मी नेता मानू शकत नाही.

माझा नेता हा चांगला माणूस असायला हवा. त्याचे भौतिक कर्तृत्व किती आहे किंवा त्याच्यासमोर किती शेपट्या हलतात याच्याशी मला कर्तव्य नाही.

त्याच्याहून अधिक चांगली माणसे राजकारणात आहेत, तोवर मी त्याला मत देणार नाही. आणि तितकी वाईट वेळ यावी इतकी या देशाची अधोगती होईल इतका निराशावादी मी कधीच नव्हतो, नसेन.

I stand on my feet, think with my own brain. I don't need anyone else to tell me what is right for me.

बर्‍या वाईटाचे मूल्यमापन करण्याची -बहुसंख्येपेक्षा अधिक चांगलीच, विश्लेषक बुद्धी मला मिळालेली आहे. तेव्हा कोणत्याही झुंडीचा भाग होऊन त्यांचा झेंडा, त्यांचा नेता, त्यांचा जगण्याचा मंत्र आंधळेपणाने स्वीकारण्याची वेळ माझ्यावर कधीच येणार नाही.

जे भित्रे असतात, निर्णय घेण्यास घाबरतात, तो चुकला तर आपलं नुकसान होईल किंवा त्याहीपेक्षा अधिक म्हणजे चारचौघात हसं होईल म्हणून ते आसपासच्या जमावाकडून विचार नि निर्णय उधार घेतात. मला त्याची गरज नाही.

कोणत्याही 'हीट-अ‍ॅंड-ईट' विचारव्यूहाच्या, देव-पारलौकिकादि काल्पनिक खुंट्यांच्या, इतकेच नव्हे तर कोणत्याही व्यक्तीच्या आधाराशिवाय माझ्या पायावर मी ठाम उभा आहे. कुण्या स्वयंघोषित त्रात्याची खुंटी वा कुबडी मला जगण्याला आवश्यक नाही.

- oOo -


हे वाचले का?

बुधवार, २२ मे, २०१९

’काँग्रेस-भाजप एकाच माळेचे मणी’ पार्टी

’काँग्रेस नि भाजप एकाच माळेचे मणी’ म्हणणार्‍यांचाही काँग्रेसच्या घसरणीत मोठा वाटा आहे हे त्यांना नाकारताच येणार नाही.

पूर्वी काँग्रेस सत्ताधारी असल्याने त्यांच्यावर अधिक आक्रमक टीका केली हे समजण्याजोगेच आहे. पण हे करत असतानाही ’भाजप नि काँग्रेस या दोघांचेही आम्ही विरोधक आहेत, पण काँग्रेसपेक्षा भाजप हा अधिक मोठा विरोधक आहे. आणि म्हणून जेव्हा अन्य सर्व पर्याय कुचकामी असतील*, अपरिहार्य असेल तेव्हा तेव्हा आम्ही भाजपपेक्षा काँग्रेसला साथ देऊ’ अशी निसंदिग्ध प्रतवारी त्यांनी लावायला हवी होती. तसे न केल्याने भाजपच्या साथीने काँग्रेसच्या नावे सतत (सकारणही, ते चुकीचे होते असे मला मुळीच म्हणायचे नाही!) शंख करत असताना त्यांच्या जागी कोण? याचे उत्तर न शोधता, त्याचा नीट पुरस्कार न करता करत असतील,आणि त्याचा फायदा भाजपच्या पारड्यात पडला असेल तर, ती तर त्यांची ती राजकीय अपरिपक्वताच म्हणावी लागेल.

NotWithCongOrBJP

कम्युनिस्ट असोत की हिंदुत्ववादी, त्यांच्या क्रांतिबिंतीच्या कल्पना अशाच भाबड्या असतात. त्यांना सद्य-व्यवस्थेचे वाईट ते सारे दिसते (कम्युनिस्टांबाबत त्याचे विश्लेषण, विवेचन व्यवस्थित शास्त्रशुद्धही असते.) ती का बदलायला हवी याची कारणमीमांसा ते व्यवस्थित करतात. (बरीचशी योग्यही असते.) पण ’तिच्या जागी कोणती दुसरी व्यवस्था हवी.’ त्यावरचे त्यांचे उपाय अतिशय भाबडे, एकांगी आणि दुराग्रहीच असतात. जुन्या व्यवस्थेतले सारे दोष महत्वाचे मानताना त्यांच्या नव्या व्यवस्थेतले संभाव्य दोष दाखवले, तर एकतर ते मान्यच करत नाहीत किंवा ते बिनमहत्वाचे आणि आपल्या स्वप्नाळू व्यवस्थेत हे धोके वास्तवात येणारच नाहीत अशी त्यांची भाबडी आशा असते. इतर व्यवस्थांचे मूल्यमापन करत असताना एक परिणामकारक घटक म्हणून गृहित धरलेल्या माणसांच्या स्वार्थलोलुपतेला ते स्वत:ला अभिप्रेत व्यवस्थेच्या मूल्यमापनात मात्र स्थान देत नाहीत. आपल्या सर्वगुणसंपन्न व्यवस्थेमध्ये माणसे गुणी होऊन स्वार्थ विसरतील असा त्यांचा होरा असावा.

असाच भाबडेपणा लोकपाल नावाच्या तथाकथित नव्या व्यवस्थेबाबत अनेकांनी केला. तेव्हा काँग्रेसचे घर उध्वस्त केले म्हणून आपली पाठ थोपटून घेणारे, स्वत: सत्ताकारणापासून पळ काढत ती जमीन (त्यांना सोबत घेण्याचे पाप करुन) भाजपला दान करणारे, आज त्याच काँग्रेसला ’भाजपला तुम्ही रोखू शकला नाहीत हे तुमचे पाप.’ म्हणून आगपाखड करत आहेत. हे भलतेच विनोदी आहे. इजिप्तच्या जस्मिन क्रांतीमध्ये हुकूमशहा जाऊन मुस्लिम ब्रदरहुडची सत्ता आली, तेव्हा जसे आगीतून फुफाट्यात पडल्याची भावना त्या जनतेची झाली असेल तशीच यांची झाली आहे, फक्त त्या पापात आपण वाटेकरी आहोत हे मान्य करण्याची यांची तयारी नाही.

आणि जर त्यांना ’काँग्रेस भाजपपेक्षा बरी’ हे मान्य नसेल, जर हे दोघेही खरोखरच एकाच पातळीवरचे आहे म्हणत असतील, जोवर त्यांची लाडकी एखादी उच्च, तात्त्विक नैतिक वगैरे पार्टी निवडून येत नाही, तोवर भाजप येवो की काँग्रेस, त्यांच्या दृष्टीने फरक काहीच नाही ना. मग त्यांनी त्यातल्या त्यात काँग्रेस हरल्याचा आनंद व्यक्त करावा की, चिडचिड कशाला उगाच.

मला तर ही मंडळी मोदींपेक्षा काही वेगळी दिसत नाहीत. जे चांगले घडेल ते आमचे किंवा त्यात आमचा वाटा आहे, नि वाईट घडले की ते काँग्रेसचे पाप किंवा त्यांच्या काळापासूनचे म्हणून बोंब मारायची असेच यांचे धोरण दिसते.

दुसरीकडे समाजवादी नीतिशपेक्षा आम्ही कित्ती नैतिक' वगैरे दावा करणारे कम्युनिस्ट राजकारणाला पूर्ण नालायक आहेत हे सिद्ध होते आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल बोलत नाही मी, त्यांच्या भारतीय राजकारणाबद्दल बोलतो आहे. २०१४ लोकसभेला नगण्य जागा मिळवूनही नीतिशकुमार भाजपाशी पाट लावून आज निम्म्या(!) म्हणजे १७ जागा लढवतो आहे, त्यातील १२-१४ खासदार निवडूनही येतील. नीतिशचे राजकारण नि:संशय अनैतिक आहे. पण त्याने त्याचा पक्ष तरतो आहे हे वास्तव विसरता कामा नये. 'समाजवादी साथी फॅसिझमची माती खाती' म्हणणारे वीर कम्युनिस्ट बंगालमध्ये आज शून्य खासदारांवर येऊ घातले आहेत.

राजकारणात सत्ताकारण अर्थातच महत्त्वाचे असते. नैतिकता नि विचारश्रेष्ठतेचे डिंडिम फक्त व्याख्यानात किंवा पुस्तकांतून मिरवता येतात. त्याचा ना मिरवणार्‍याला प्रत्यक्ष उपयोग ना जनतेला. त्याचा प्रचार-प्रसार व्यापक पातळीवर करता आला, तर जनता तुमच्या विचारांशी सुसंगत विचार करेल हे खरे, पण त्याला व्यापक नियोजन हवे (आवडत नसले तरी- संघ ते पद्धतशीर करतो हे अमान्य करता येत नाही.) निव्वळ झटका आल्यासारखी चार-दोन व्याख्याने, एक-दोन आंदोलने केल्याने हे होईल हा समज भाबडेपणाचा असतो.

जनतेच्या दृष्टीने १०० टक्के बिनकामी तत्त्वनिष्ठेपेक्षा, ५० टक्के पण काही बदल घडवण्यास कामी येणारी तत्त्वनिष्ठा अधिक मोलाची. मग त्याला कुणी माती खाणे म्हणाले तरी, अस्तित्व टिकवून धरत अनुकूल परिस्थिती येईतो तग धरणे - त्यात जमेल तितके आपल्या विचाराने वागणे - नि तशी मिळाली की ५०% हून टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करणे हे माझ्या मते अधिक परिणामकारक असते. `आमची तत्त्वनिष्ठा आम्ही सोडणार नाही, त्यासाठी हजार वर्षे सत्तेशिवाय राहू.’ म्हणणार्‍याने मुळात सत्ताकारणाच्या वाट्याला जाऊ नये. उगाच अशी चिडचिड होण्यापलिकडे पदरी काही पडत नसते.

मी २०१४ च्या पूर्वी भाजपचा मतदार होतो, २०१४ पासून टीकाकार झालो, २०१९ ला नाईलाजाने का होईना काँग्रेस आघाडीला मतदान केले. अजूनही त्यांचा समर्थक नाही. ... आणि जरी विरोधकांनी कितीही तात्पुरती बेडकी फुगवली तरी, एग्जिट पोल हे संभाव्य निकाल असण्याची शक्यता, नसण्यापेक्षा कित्येक पट अधिक असते हे मी संख्याशास्त्राचा विद्यार्थी म्हणून खात्रीने सांगू शकतो. आज दुसर्‍यांदा मोदी सरकार येते आहे. तेव्हा बाकी सार्‍या शंका सोडून काँग्रेसलाच मतदान करेन असे निश्चित केले आहे.

- oOo -

* अर्थात डिपॉजिटदेखील वाचवू न शकणार्‍या यांच्या तथाकथित उमेदवाराला देखील आपण निवडून वगैरे येणार अशी मूर्ख खात्री असते, त्यामुळे अशी अपरिहार्यता वगैरे कधी नसतेच त्यांच्या दृष्टीने. तो काँग्रेसच्या उमेदवाराची मते खाऊन त्याला खड्ड्यात घालतो नि वर ’हे काँग्रेसचेच पाप’ म्हणून चोराच्या उलट्या बोंबाही मारतो.


हे वाचले का?

Blame It On EVM

पाच वर्षांपूर्वी ईवीएम हॅकिंग आणि (त्याहीपूर्वी अनेक वर्षे) ’धनदांडग्यांच्या मदतीने सत्ताधारी जिंकले’ असे रडणारे आजही तसेच रडत असतील, तर इतक्या वर्षांत या विरुद्ध त्यांना प्रतिबंधात्मक किंवा पर्यायी असा कोणताही उपाय शोधता आलेला नाही, या आपल्या अपयशाची कबुलीच ते देत आहेत.

EVM

’ईवीएम हॅकिंग मुळे आम्ही हरलो’ हे रडगाणे म्हणजे माझे लकी पेन हरवले म्हणून नापास झालो या तर्कासारखे आहे. मतपत्रिकेकडे परत जायला हवे हे विरोधकांचे - त्यात काही वास्तविक आणि काही स्वयंघोषित पुरोगामीही आहेत - म्हणणे नि संघ-भाजपच्या ’आपल्या गौरवशाली (मनात: माझ्या सोयीच्या) भूतकाळाकडे चला.’ म्हणण्याइतकेच प्रतिगामी आहे.

ईवीएमबद्दलचा संशय हा कोणत्याही पुराव्याखेरीज खात्रीत रूपांतरीत होणे हा ते करणार्‍याच्या पूर्वग्रहालाच दृढ करत असतो इतकेच. (आणि केवळ निरीक्षण, अनुभव ते पुरावा म्हणून सिद्ध होणे यात यऽऽऽऽ मैलांचे अंतर असते हे अडाण्याला नसेल तरी जराशी समज असणार्‍यांना समजायला हवे)

अशा पळवाटा शोधू पाहणार्‍या मानसिकतेमध्ये, एकदा मोडून पडल्यावर पुन्हा उठून उभे राहण्याची जिद्द अवतरणे फार अवघड असते. ते कुणावर तरी खापर फोडून त्याखाली आपले नाकर्तेपण गाडून टाकतात नि पुन्हा सुस्त होत असतात. स्वत:च्या चुका शोधणारा नि त्यांचे निवारण करणाराच पुन्हा उठून उभा राहू शकतो.

मूळ समस्या ’पुरेसा अभ्यास केलेला नाही’ ही आहे. हे मान्य करत नाही तोवर केवळ लेखणी बदलून तुम्ही पास होणार नाहीच. फारतर स्वत:ची समजूत घालता येईल. पण त्याने होईल इतकेच, की मार्चमध्ये नापास झालेला परत ऑक्टोबरला गटांगळ्याच खाणार आहे.

-oOo-


हे वाचले का?

गुरुवार, १६ मे, २०१९

लेखन, लेखक आणि वृत्तपत्रे

शशिकांत सावंत यांची फेसबुक पोस्ट:

लोकसत्ता पूर्वी साडेसातशे रुपये मानधन देत होतं आता 500 चेक येतो तीन महिन्यानंतर महाराष्ट्र टाइम्स अनेक महिने चेक आलेला नाही. मग आता एकदम फार्मला तो भरून द्या पॅन कार्ड वगैरे. त्यात लेखकांना व्हेंडर म्हणजे पुरवठा करणाऱ्या इतर कामगार वगैरेमध्ये नेमलेला आहे. झी मराठीसाठी लीहायला लागलो सहा महिने त्यांनी कोणालाच मानधन दिलं नव्हतं एका कवीला दोनशे रुपये मानधन दिल्यावर गदारोळ झाला वगैरे. शेतकऱ्यांना मालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे वगैरे बद्दल आंदोलने झालीच पाहिजेत जे ते योग्यच आहेत पण गेली तीस वर्षे लिहिणार्‍या आमच्यासारख्यांना लेखनातून काही पैसे मिळाले पाहिजेत की नाही?ज्या पुस्तकांवर आम्ही लिहितो ती विकत घेण्याचे पैसेही लेखातून सुटत नसतील तर मराठीत कशासाठी लिहायचे. बाकी तुम्ही राजकारणावर चर्चा कराच पण हे समाजकारण जरा लक्षात ठेवा.

---

WriterAndThePaper
'Amish paper succeeds the old-fashioned way' या New York Times'च्या लेखासोबत प्रसिद्ध झालेले छायाचित्र.

पहिले म्हणजे फेसबुक, ब्लॉग वगैरे इलेक्ट्रॉनिक मीडियावर थोडेफार लिहू लागलेले अनेक लोक आहेत. चांगलेही लिहितात... मुद्दा दर्जाचा नाही हे आधी स्पष्ट करतो. पण त्यामुळे झाले आहे असे, की लेखकांची उपलब्धता वाढलेली आहे. आणि वृत्तपत्रे मूठभरच आहेत, मासिकांची संख्याही हळूहळू कमी होते आहे. तेव्हा 'मागणी कमी नि पुरवठा अमर्याद' या भांडवली बाजाराच्या निर्णयाने हा 'ग्राहकधार्जिणा बाजार' (buyer's market) झाला आहे. त्यामुळे वृत्तपत्रे निवांत राहून आपल्या नोकरांचे पगार करतात नि लेखकांना शिंक्यावर टांगून ठेवतात.

वास्तविक वृत्तपत्र हे लेखनावर चालते. पण त्यांच्या प्रशासकीय नोकरांचे पगार आधी नि नियमित होत असतात ही irony आहे. पण त्याशिवाय ते चालणारही नाही हे ही खरेच. आता पैसे मिळत नाहीत म्हणून एखाद्याने वैतागून लेखन बंद केले, तर त्यांना फरक पडत नाही. ’मी... मी... मी लिहितो’ म्हणून अहमहमिकेने पुढे येणारे अनेक आहेत. ज्यांना छापील अक्षरांत आपले नाव दिसले की कृतकृत्य वाटते - आणि ज्यांचे पोट त्यावर अवलंबून नाही, असे हौशी लेखक तयारच असतात. (वर्ष-दीड वर्षातच बंद पडलेल्या एका वृत्तपत्राने एक लेखक गेला की दुसरा पकडा, असे करत वर्षभर चालवून दाखवले होते!)

तेव्हा वृत्तपत्रांना लेखकांची चणचण कधीच नसते. परिचितांपैकी एखादा पकडतात नि 'लिही लेका' म्हणून एखादा गणपती वा गौराई बसवून देतात. गुणवत्ता वगैरे मोजण्याचे साधनच त्यांच्याकडे नाही, त्याची त्यांना गरजही नाही. कारण आता तो केवळ धंदा आहे. त्यामुळे जाहिराती छापायच्या तर अधेमध्ये लेखन असावे लागते, अन्यथा धर्मादाय आयुक्त नोंदवून घेणार नाहीत, निव्वळ जाहिरात कंपनी म्हणून नोंदवले तर करप्रणाली जाचक होऊन आतबट्ट्याचा व्यवहार होतो, म्हणून त्यांना लेखक शोधायची तसदी घ्यावी लागते आहे.

दुसरीकडे वृत्तपत्र-मालक याचा केवळ धंदा करत आहेत हे अनेक बाजूंनी पाहता येते. काही वृत्तपत्रे ’होम फेअर’ वगैरे करतात नि बिल्डरांकडून पैसे मिळवतात. कुणी एकांकिका स्पर्धाच घेतात. कुणी चित्रकलेच्या स्पर्धा घेतात. कुणी कसलासा वार्षिक महोत्सव करतात. कुणी वक्तृत्व स्पर्धा, कुणी नवरात्रातल्या नऊ रंगाचे हौशी बायांनी पाठवलेले फोटो छापून जागा भरुन काढतात. कुणी हळदीकुंकू समारंभ करतात. 'सकाळ’ने तर चक्क ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धाच भरवली होती. बहुतेकांनी आता आपापली चॅनेल्स सुरु करुन किंवा कुणाशी भागीदारी करुन तिकडे लक्ष केंद्रित केले आहे. लोकमत, सकाळ यांसारख्या वृत्तपत्रांच्या मालकांनी यात उडी मारून काही वर्षे झाली. पण आश्चर्य म्हणजे टाईम्स गटाचे ’Times Now’ इतकी वर्षे चालू असूनही अद्याप त्यांचे मराठी चॅनेल मात्र नाही.

काही दिवसांनी वृत्तपत्र आठ पानांचे, त्यातील चार पाने जाहिराती, तीन पाने त्यांच्या ’अ‍ॅक्टिविटी’ज नी भरलेली, पन्नास शब्दांचे संपादकीय, एकोळी राशीभविष्य, अध्यात्माची पिटुकली चौकट आणि दोन बातम्या पोटात घेणारे पहिले पान इतकेच शिल्लक राहिल असा होरा आहे. आणि ही अजिबात अतिशयोक्ती नाही हे प्रत्येक वृत्तपत्रातील छोट्या मोठ्या जाहिरातींची टक्केवारी पाहता (Tech-News हा भंपक प्रकार किंवा Cine-News या सरळ सरळ जाहिरातीच असतात हे गृहित धरले तर ९०% जाहिरातीच) ही अतिशयोक्ती नाही.

आश्चर्य याचे वाटते की यांचे जाहिरातीचे दर हजारांत - इंग्रजी वृत्तपत्रांचे लाखांत - असतात, यांच्या नियमित नोकरांचे मासिक वेतन किमान वीस-तीस हजार तरी असेल. हे सारे सुरळित असते. मग लेखकाच्या हजारभर रुपड्यांच्या चेकवर सही करायला यांच्या हाताला लकवा का भरतो?

आता ही एक बाजू झाली. दुसर्‍या बाजूने पाहिले तर अनेक नव्या माध्यमांच्या स्फोटात वृत्तपत्र माध्यमांचा बाजार-हिस्सा संकुचित होतो आहे, नि दुसरीकडे खर्च तर बाजार-नियमाने वाढतच जात आहेत. जाहिरातींसाठी आता वृत्तपत्रापेक्षा चॅनेल नि इंटरनेट-बेस्ड माध्यमांचा, 'व्यावसायिक SMS' चा पर्यात अधिक सोयीचा वाटतो. तरी अजून SMS सेवा इंग्रजी-बहुलच असल्याने मराठी वृत्तपत्रे तरली आहेत. त्याचीही स्थानिक भाषांत सुरुवात केली की (काही मंडळी तिचा वापर करतात, पण त्याला बव्हंशी स्मार्टफोनची गरज असते.) त्यांची पोच अधिक असल्याने जाहिरातींसाठी वृत्तपत्रांवर अवलंबून राहणे आणखी कमी होणार आहे. त्यामुळे एका मर्यादेपलिकडे जाहिरातींचे दर वाढवणे शक्य होणार नाही.

अशी व्यावसायिक कोंडी त्यांची होत आहे. त्यातून ते workable business model उभे करण्याच्या खटपटीत आहेत. पण अजून ते stable झालेले दिसत नाही. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी भांडवलशाहीचा thumb-rule असलेली नोकर-कपात कमी करुन बातमीदार म्हणून काम करणार्‍यांचे कामाचे तास वाढवण्याचे धंदे चालू आहेत. त्यातून त्यांच्या आरोग्याचे प्रश्न वाढू लागले आहेत. (मागे अजित अभंगने बहुधा यावर लिहिले होते.)

असे असले तरी त्यांच्या खर्चाच्या तोंडमिळवणीचा भार त्यांनी केवळ हजारभर देणे असलेल्या लेखकावर का टाकावा असा प्रश्न आहेच. आणि चार अनाहुत लेखकांचे चार हजार वाचवून हे कुठली माडी बांधणार आहेत?

वैयक्तिक अनुभव:

’लोकसत्ता’ने चार पाच वर्षांपूर्वी माझे दोन लेख छापले, एक दमडी मानधन दिले नाही. मी त्यांना पाठवणे बंद केले. त्यांचे माझ्याविना अडत नाही, तसेच माझेही त्यांच्याविना. ’महाराष्ट्र टाईम्स’ तर स्वत:ला ’महानतम टाईम्स’ समजत असल्याने ’अरे तुमच्यासारखे छप्पन्न लेखक आमच्या दाराशी पडलेले असतात.’ अशा आविर्भावात ते उत्तरेही देण्याच्या फंदात पडत नाहीत.

एक ’दिव्य मराठी’चा अनुभव तेवढा चांगला आहे. तिथे लिहिलेल्या प्रत्येक लेखाचे मानधन न चुकता तिसर्‍या महिन्यात ’न आठवण करता’(!) पोचते झाले आहे. आणि लेखनाचे मानधनही कोणत्याही विनंतीखेरीज वाढवून मिळाले होते. त्यामुळे मी ’दिव्य मराठी’वगळता इतरांकडे लेखन पाठवण्याचा प्रयत्नही करत नाही.

लेखनासाठी बेरोजगारी स्वीकारलेली असूनही, माझे पोट जर त्यावर अवलंबून नसेल, तर मी तरी माझे लेखन यांना फुकट का देऊ? मी सरळ तो लेख फेसबुकवर किंवा ब्लॉगवर टाकून मोकळा होतो. पुढची फॉलोअपची कटकट वाचते. परत मला ’कित्ती लोकांचे फोन आले’ वगैरेचे फार कौतुक मला नाही. मला माझे तुंबलेले विचार कुठेतरी टाकून मोकळा व्हायचे आहे इतकेच. तेव्हा ते इथे झाले, की चार लोक वाचतात, चारशे की चार लाख याचा फार फरक पडत नाही. त्यामुळे मी फेसबुकवर फार फ्रेंड-रिक्वेस्टही स्वीकारत बसत नाही. पोस्ट पब्लिक ठेवून मोकळा होतो. म्हणजे लोकांना वाचायचे असल्यास वाचता येते, फ्रेंडलिस्टमध्ये नसल्याने फार बिघडत नाही.

- oOo -


हे वाचले का?

बुधवार, १५ मे, २०१९

एक विधान, दहा फाटे

कमल हासन: नथुराम हिंदू दहशतवादी होता.
आम्ही: तुम्ही म्हणाल तसं.

एक देशभक्त भाजीवाला: महात्मा नथुराम गोडसे यांचा हा घोर अपमान आहे. कमल हासन यांचे मुंडके आणणार्‍यास मी पाच कोटी बक्षीस जाहीर करतो. असल्या देशद्रोही प्रवृत्तींचे समूळ उच्चाटन व्हायला पाहिजे.
आम्ही: तुम्ही म्हणाल तसं.

एक स्वयंघोषित पुरोगामी : हिंदूंना का बदनाम करता? तो फक्त संघी दहशतवादी आहे.
आम्ही: तुम्ही म्हणाल तसं.

ManyArguing

एक सखोल इतिहासकार: त्याला हिंदू दहशतवादी का म्हणता, तो फक्त वैदिक दहशतवादी आहे.
आम्ही: तुम्ही म्हणाल तसं.

एक जातिअंतवादी पुरोगामी: मुळीच नाही. तो फक्त बामणी दहशतवादी आहे.
आम्ही: तुम्ही म्हणाल तसं.

एक जनरल फेसबुकी: 'त्याच्या'कडे पण बघा की.
आम्ही: तुम्ही म्हणाल तसं.

दुसरा जनरल फेसबुकी: नथुराम असा होता.
आम्ही: तुम्ही म्हणाल तसं.

तिसरा जनरल फेसबुकी: नथुराम तसा होता.
आम्ही: तुम्ही म्हणाल तसं.
...

आणखी काही राहिलं असेल तर अ‍ॅड करा नि यादी पुरी करा. आणि इतिहासाच्या चिखलातून बाहेर येऊन जरा वर्तमानाची चिंता करा xxxxनो.


-oOo-


हे वाचले का?

॥ आए दिन भक्त मिलते हैं ॥

kowtow-to-leader
http://dreamtime.com येथून साभार.
भक्त दीनदयाल रोड पर मिलते हैं ।
भक्त बारामती होस्टलमें बसते हैं ।

भक्तोंका डेरा मातोश्री के दरबारमें है ।
भक्तोंका मेला कृष्णकुंज के द्वार पे है ।

भक्त कभी 'कापिताल' लिए घूमते हैं ।
भक्त साइकिल पे बैठा हाथी देखते हैं ।

भक्त ’समोसे में आलू’ रखते हैं ।
भक्त अन्योंको ’तृण’वत मानते हैं ।

भक्तोंके लिए नेता ही परमभगवान हैं । 
उसकी चरणोंमे ही उनका उत्थान है।

उसकी हर उक्ती अंतिम सत्य मानते हैं।
उसकी हर कृती आशीर्वाद मानते हैं ।

भक्तोंका भगवान गिर पडे,
तो उसे 'भूमाता-वंदन' कहते हैं।

सहसा वो वायुविजन करे,
तो मलय-गंध-युक्त मानते हैं ।

आए दिन भक्त मिलते हैं...
...भक्त अब ’२४ अकबर रोड’पर भी दिखने लगे हैं।

- परमभक्त रमताराम
 
- oOo -

हे वाचले का?