’वेचित चाललो...’ वर नवीन:   

प्रतीक्षा       सत्तांतर       हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

शनिवार, २५ मे, २०१९

बाजू-बदल खुल खुल जाए...

 आमच्या लहानपणी दूरदर्शन नुकतेच आले होते आणि टेलिविजन ही देखील गल्ली वा वाड्यात एखाद्याकडेच असणारी वस्तू होती. त्यामुळे क्रिकेटचा सामना असला की तिथे आख्खी गल्ली गोळा होई. या गर्दीत काही नमुनेदार महाभाग हटकून असत. ते नेहमी विरोधी पक्षाच्या बाजूने असत. विशेषत: भारत हरला की यांच्या वाणीला जबरदस्त धार येई. ’बघा, सांगत होतो की नाही. तुमचा गावसकर आमच्या माल्कम मार्शल समोर झुरळ आहे. त्या मनिंदरसिंगला तर तो अमका सहज फोडून काढेल.’ आम्ही आपले पडेल चेहर्‍याने बसलो असता यांचे चेकाळून भाषण चालत असे. आणि चुकून गावसकरने शतक केले, मनिंदरसिंगने समोरच्या टीमला स्पिनवर नाचायल लावले किंवा कपिलदेव ने त्यांची भंबेरी उडवली की हे गप्प होत, पण त्यांना मनातून ज्या गुदगुल्या होत असत त्या त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत. पण सामना प्रत्यक्ष संपेपर्यंत ते फारसे बोलत नसत. एकदा का जिंकला की, ’मी बोललो नसलो, तरी यावेळी कपिलच सामना जिंकून देणार हे मला माहित होते. तुम्हाला कितपत समज आहे हे पाहात होतो.’ टाईपचे काहीतरी समर्थन करत.

समाजातील एक मोठा हिस्सा असा असतो तो एकतर भित्रा असतो किंवा आपण चुकतो अथवा पराभूत बाजूला असतो याने त्यांना प्रचंड अस्वस्थता येते. ती त्यांच्या मर्यादित सहनशक्तीला झेपत नसते. त्यामुळे पहिले म्हणजे ते जिंकणार कोण याचा अंदाज घेऊन तीच बाजू पकडून ठेवण्याचे धोरण ठेवतात. आणि चुकून ती बाजू हरलीच तरी त्यांच्याकडे उलटसुलट कारणमीमांसा करत ’तरी मी सांगत होतो...’ पासून सुरुवात करु हळूहळू स्वत:ला पराभूत बाजूकडून सोडवून घेत विजयी बाजूला सरकत राहतात.

निवडणुकांच्या बाबतीत काही लोक पहिल्यापासून आपला पक्ष निवडून निष्ठेने त्या बाजूला राहतात. हार होवो वा जीत, त्यांची बाजू बदलत नाहीत. वाईटात वाईट काय होईल तर हरले तर ते तोंड पाडून वा लपवून बसतील, काही जण त्रागा करतील, इतर कुणावर खापर फोडू पाहतील तर काही मूठभर ताठ मानेने ’हार-जीत चालायचीच’ म्हणत पुढे जातील. जिंकलेले उन्मादी नाच करतील, हरलेल्या बाजूच्या मंडळींना हिणवण्यात कसूर करणार नाहीत... पण सगळ्यात इंट्रेस्टिंग जमात असते ती विजेता बदलला की हळूहळू तिकडे सरकू लागणारी. काही तर थेट उडीच मारतात. (अगदी एक बाजूवर निष्ठा असलेल्यांच्याही बाबत हे घडू शकते. त्यांच्या नेत्याने कोलांटी मारली तरी हे करावे लागते. सेनेच्या घरबसल्या सैनिकांना गेल्या पाच वर्षात दोनदा अशा कोलांट्या माराव्या लागल्या. पण तिथे निर्णय त्यांचा नसतो.)

अशी बरीच वातकुक्कुटे पाहून मौज वाटते आहे. माझ्या परिचितांपैकी किमान सात ते आठ मंडळी आहेत, जी थेट बाजू बदलून कॉंग्रेस वा विरोधकांना हिणवू, चॅलेंज करु लागली आहेत. आधीच चितपट मारल्या गेलेल्या एखाद्या मल्लाला पंचानेही एक लाथ घालून, ''त्याच्या त्या पराभवात माझाही हात आहे', असे स्वत:ला सांगावे तसे. ही माणसे कशी दिसतात? दंगली घडून गेल्यावर, पोलिसांनी वा निमलष्करी दलाने दंगलखोरांना हटवून रस्ता मोकळा केल्यावर, तिथे कुणी पोलिस दिसत नाही असे पाहून हळून घराबाहेर येऊन तलवार वा चाकू नाचवून ’त्या’ बाजूला आव्हान देत शड्डू ठोकणारी... दुरून पोलिस सायरन ऐकू आला की बुलेट-ट्रेनपेक्षा अधिक वेगाने पसार होणारी.

त्याशिवाय काही मंडळी लोकांच्या ध्यानात येऊ नये अशा तर्‍हेने हळूहळू दिशा बदलत आहेत. उधोजींनी तलवार म्यान करुन अफजलखानाला मिठी मारल्यावर काही सैनिक जसे राहुल विरोधाच्या पोस्ट्स एक-दोन, मग दोन-चार, मग चार-सहा करत हळूहळू वाढवत आणि मोदीविरोधाच्या हळूहळू कमी करत 'गन्तव्य स्थानी' पोचले तसे.

त्यात आधी आपण निवडलेली बाजू कमकुवत होते आहे हे पाहून हळूच दुसरी बाजू पकडू पाहणारे आपला अंदाज चुकला हे पाहून पुन्हा ’घरवापसी’ करणारेही काही असतात.

बराच काळ फेसबुक मित्र नि माफक मित्र असलेले काही जण असे तन डोले, मेरा मन डोले’ मोडमध्ये गेलेले दिसत आहेत. एकुण भली मौज येते आहे. बाजू बदलू पाहणारे कायम गर्दीत, जमावात सुरक्षितता शोधत असतात, डरपोक असतात. 'कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा’ वगैरे बाष्कळ सुविचार शाळेच्या भिंतींवर रंगवलेले असत. त्याच चालीवर ’कणाहीन समविचारी पेक्षा ठणठणीत विरोधक बरा.’ असे म्हणायला हवे.

विचारपूर्वक बाजू बदलणारे वेगळे, त्या बदलाची व्यवस्थित कारणमीमांसा त्यांना देता येते. अर्थात असे प्राणी जगात फार थोडे. बरेचदा एखाद्या वैयक्तिक आघाताची प्रतिक्रिया म्हणून आपल्या बाजूवरचा विश्वास उडतो आणि ही चूक म्हणून समोरची बरोबर असे अविचारी समर्थन करत बाजू बदलणारे बरेच.

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा