जिन्हे नाज़ था हिंद पर... : सत्येंद्र दुबे << मागील भाग
---
सोविएत युनियनप्रमाणेच कम्युनिस्ट राजवटीखाली असलेल्या युगोस्लाव्हिया या देशाच्या वांशिक, धार्मिक, भाषिक आधारावर विघटनास सुरुवात झाली. सात देश वेगळे झाले. यातील बोस्निया या राष्ट्रात झालेली यादवी सर्वात भयानक होती. तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि लोकशाही रुजवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे (UN) मिशन हाती घेण्यात आले. याचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय पोलिस दलाची (IPTF) स्थापना करण्यात आली. यात विविध देशांचे नागरिकांची निवड करण्यात आली.
ही निवड करण्याची जबाबदारी असलेल्या ’डाईनकॉर्प’ या कंपनीतर्फे नेब्रास्का पोलिस दलाच्या नोटीस बोर्डवर लावलेली भरतीची नोटीस कॅथरीन बोल्कोव्हॅक या अधिकार्याच्या नजरेस पडली. भरपूर पगार, राष्ट्रसंघाच्या मिशनमध्ये काम करण्याची आणि आपल्या आजोबांच्या मूळ देशाला (क्रोएशिया) भेट देण्याची संधी तिने स्वीकारली.
या आयपीटीएफचे काम करत असताना सोळा-सतरा वर्षांची एक मुलगी स्थानिक पोलिसांनी तिच्याकडे आणली. मुलगी संपूर्ण दहशतीखाली होती. तिची भाषा कॅथरीनलाच नव्हे तर तिच्या स्थानिक दुभाष्यांनाही नीटशी समजत नव्हती. हावभावांद्वारे आणि स्थानिक भाषेतील काही सामायिक शब्दांच्या आधारे तिला एवढेच समजू शकले की ती मुलगी एका स्थानिक बारमालकाने लैंगिक वेठबिगार म्हणून डांबून ठेवली होती. त्याचे एकाशी भांडण चालू असताना चुकून दार उघडे राहिल्याने तिला पळून येणे शक्य झाले होते.
तिला सोबत घेऊन कॅथरीन ती काम करत असलेल्या त्या तथाकथित बारमध्ये गेली आणि एका यातनाघराचे दार कॅथरीनला उघडले गेले. प्रथम काडतुसांच्या रिकाम्या बॉक्समध्ये भरलेले प्रचंड प्रमाणावर अमेरिकी डॉलर्स तिला दिसले. एका कोंदट खोलीत लहानशा सतरंजीवर सहा-सात १५ ते २० या वयोगटातील मुली भेदरुन बसलेल्या सापडल्या. त्यांच्या शरीरावर अत्याचारांच्या असंख्य खुणा होत्या. आजूबाजूला कंडोम्सची रिकामी पाकिटे, कपडे विखरुन पडलेले होते. त्यांच्यापैकी एकीकडे एक डायरी सापडली, ज्यात तिने ’सर्व्हिस’ दिलेल्या व्यक्तींच्या नोंदी सापडल्या. पुढे एका सहकार्याबरोबर प्रवास करत असताना अनाहुतपणे त्याने सहा हजार डॉईशमार्कला आपण विकत घेतलेल्या अशा मुलीचा उल्लेख केला, आणि या प्रकाराची मुळे थेट आपल्या कंपनीपर्यंत येऊन पोचली आहेत असे तिच्या ध्यानात आले.
डाईनकॉर्पचे आणि इतर अधिकारी व कर्मचारी या अल्पवयीन मुलींना तात्पुरत्या लैंगिक भोगासाठी वेश्या म्हणून तर उपभोगत होतेच, वर त्यांना विकत घेऊन हक्काच्या भोगदासी म्हणून ठेवून घेत होते. मारहाण, बलात्कार, त्या बलात्काराच्या टेप्स बनवून त्या विकणे चालू होते.इतकेच नव्हे तर काही अधिकारी त्यासाठी आवश्यक मानवी-तस्करीच्या व्यवहारातही सामील होते. तिथे काम करणार्या बहुतेकांना या व्यवहाराची कल्पना असूनही ते त्याकडे सरळ दुर्लक्ष करीत होते.
कॅथरीन म्हणतात, ’आपल्या मायदेशापासून, कुटुंबापासून दुरावल्यामुळे येणार्या असुरक्षितेच्या भावनेतून त्यांना लैंगिक भोगाची गरज भासते हे मान्य केले, तरी ते या सार्या प्रकाराबाबत निर्ढावत गेले होते. त्यातच संयुक्त राष्ट्रासाठी काम करत असल्याने त्यांना राजकीय, न्यायिक अभय होते. पकडले गेले तरी मिशनची जागा बदलण्यापलिकडे काही कारवाई होत नसल्याने निर्घोर होऊन गेले होते. एका अधिकार्याने त्यांचा उल्लेख ’युद्धभूमीवरील सैनिकांच्या भोगदासी’ असा केला होता. हे युद्धात लढणारे सैनिक नव्हते, सुरक्षित वातावरणात भक्कम पगार घेऊन काम करणारे कर्मचारी होते. आणि तो काळही युद्धाचा नव्हे तर देशाच्या पुनरुभारणीचा होता.
त्याहून महत्वाचे म्हणजे, त्या स्त्रिया - नव्हे मुली - या स्वेच्छेने त्या देहव्यवहारात आलेल्या नव्हत्या. तसे निर्णयस्वातंत्र्य असावे इतक्या सज्ञानही नव्हत्या. काही जणींना जरी आपल्याला हे काम करावे लागेल याची पुसट कल्पना असली, तरी आपले पासपोर्ट काढून घेऊन कायमचे गुलाम केले जाणार आहोत याची कल्पना नव्हती. पण त्यासोबतच शोषण, अत्याचार, वेठबिगारीचे आणि दहशतीखालील जिणे आपल्यासमोर वाढून ठेवले आहे याची कल्पना असणे तर शक्यच नव्हते.
या मुलींना इतकी दहशत होती, की त्या बारमध्ये कॅथरीनने सुटका केलेल्या मुलींपैकी बहुतेकींनी बाहेर पडण्यास नकार दिला. ’नदीत फुगून वर आलेला मृतदेह’ अशी आपली अखेरची ओळख नोंदली जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती. बहुतेक मुलींना बारमध्ये मेड, वेट्रेस अथवा नर्तिका, घरकामासाठी वा नोकरीची लालूच दाखवून आणले जात असे. काहींना दारिद्र्यातून टेकीला आलेले आई-बापच दलालांना विकत. या मुली प्रामुख्याने रुमानिया, युक्रेन, माल्डोवा आदि पूर्व युरपिय देशांतून आणल्या जात. त्यांची सीमापार सहजपणे ने-आण करण्यासाठी या ’शांतता समिती’च्या मंडळींच्या देखरेखीखाली लाचखोरी, कागदपत्रांतील हेराफेरीच्या माध्यमातून सीमेवर एक यंत्रणाच उभी राहिली होती.
कॅथरीनने प्रथम आपल्या वरिष्ठ अधिकार्यांचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या मुद्द्यांवर तयार केलेली टिपणे आणि पुरावे असलेली एक फाईल तिने आपल्या वरिष्ठांकडे पाठवली होती. त्यावर ’या प्रकरणाबाबत आधीच तपास नि कारवाई झालेली आहे’ अशी टिपणी ’जे.पी.’ आद्याक्षराने करुन ती फाईल त्यांच्याकडे परत आली. हे जे.पी. म्हणजे जाक क्लाईन, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांचे बोस्नियातील प्रतिनिधी हे कॅथरीनला नंतर समजले! ताबडतोब कॅथरीन यांची पदावनती करुन त्यांना बिनमहत्वाचे टेबल-खुर्चीवरचे काम देण्यात आले, आणि चार महिन्यातच ’टाईमशीट म्हणजे हजेरीपत्रकामध्ये चुकीची माहिती दिल्याबद्दल’ बडतर्फ केल्याची नोटीस बजावण्यात आली. तिला कायदेशीर आव्हान देण्याचा निर्णय कॅथरीनने घेतला.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क सचिवालयाच्या अधिकारी मॅडेलिन रीस कॅथरीनच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या. त्यांनी कॅथरीन यांच्या बाजूने साक्ष दिली. कामगार लवादाने एकमताने कॅथरीन यांच्या बाजूने निकाल दिला. कॅथरीन यांचे निलंबन त्यांनी कंपनीच्या अधिकार्यांविरोधात आवाज उठवल्यामुळेच झाले असल्याचे त्याने मान्य केले. यावर अपील करण्याचा आधी घेतलेला निर्णय निर्णय ’डाईनकॉर्प’ने मागे घेतला... आणि लगेचच अमेरिकेच्या गृह विभागातर्फे इराकमधील एका कामाचे कंत्राट तिला बहाल करण्यात आले!
बोस्नियाप्रमाणेच पुढे इक्वेडोर, कोलंबिया, इराक, अफगाणिस्तान आदी देशांतही ’डॉईनकॉर्प’वर आरोप आणि खटले होतच राहिले. असे असूनही कंपनीला अमेरिकन शासनाशी, राष्ट्रसंघाशी संबंधित कामांचे ठेके मिळण्यात कोणतीही अडचण आलेली दिसत नाही.
२०१० साली कॅथरीनच्या या अनुभवांवर आधारित ’द व्हिसलब्लोअर’ या नावाने एक चित्रपट तयार करण्यात आला. पत्रकार केरी लिन यांनी याच शीर्षकाखाली तिचे अनुभव पुस्तकरूपातही आणले आहेत. २०१५ मध्ये ’नोबेल शांतता पुरस्कारा’साठी तिच्या नावाची शिफारसही करण्यात आली होती.
- oOo -
(पूर्वप्रसिद्धी: दिव्य मराठी - रसिक पुरवणी, दिनांक ८ मार्च २०२०)
पुढील भाग >> नैतिक तंत्रभेदी : सॅमी कामकार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा