गुरुवार, १९ मार्च, २०२०

अफवांवर विश्वास ठेवू नका... म्हणे!

"पार्टीच्या चुकीच्या आज्ञा पाळत जाऊ नकोस." वैतागलेल्या मेयर पेपोनने आपल्या कॉम्रेडला खडसावले.
’आता चुकीची आज्ञा कुठली हे कसे ओळखायचे’ कॉम्रेड बिचारा बुचकळ्यात.

जिओवानी ग्वेरेसीच्या ’डॉन कॅमिलो स्टोरीज’ मधला हा संवाद मार्मिक आहे. मुद्दा असा आहे की एकदा आपल्या प्रजेला आज्ञाधारक बनवले की त्यांना तुमच्या नावे जे येते ते निमूटपणॆ अनुसरण्याचे अंगवळणी पडून जाते. त्यांची विचारशक्ती खुंटते. आता आज्ञा देणार्‍यांवर अधिक जबाबदारी येते. अशी आज्ञा सर्व बाजूंचा विचार करुन, कमीत कमी नुकसान आणि जास्तीत जास्त अपेक्षित परिणाम अशी असावी याचे पूर्वमूल्यमापन त्यांनाच करावे लागते. त्या आज्ञेच्या अंमलबजावणीच्या बर्‍या-वाईट परिणामांची जबाबदारी पूर्णपणे त्यांना घ्यावी लागते (आपल्या महान देशात राजकारण, समाजकारणापासून सर्वच क्षेत्रात नेमके उलट आहे. ’समस्या इतरांमुळे आणि कर्तृत्व फक्त आमचे’ असे बहुतेक सारे इझम्स, नेते, पक्ष, संघटना, धर्म, जाती, व्यक्ती गृहित धरत असतात.)

त्यामुळे जसे पूर्वमूल्यमापन काटेकोर व्हावे तसेच आज्ञादेखील काटेकोर, नि:संदिग्धपणॆ पोचली पाहिजे याचीही काळजी घ्यावी लागते. त्यासाठी अंमलात आणणार्‍यांच्या मनात कमीत कमी संभ्रम राहावा अशा तर्‍हेने ती द्यायला, पोचवायला हवी. इतकेच नव्हे तर आपले सैनिक ती तंतोतंत पाळतील इतका वचक त्यांच्यावर असायला हवा.

TruthOrLie

सध्या आपल्याकडे ’अफवांवर विश्वास ठेवू नका’ हे जे आवाहन केले जात आहे ते पेपोनच्याच धर्तीचे आहे. ठीक आहे अफवांवर विश्वास ठेवत नाही मी, पण अफवा कुठली नि खरे कुठले हे ठरवू कसे?

त्यामुळे होते असे की एकीकडे कुणी अर्धवट डॉक्टर सांगतो की ’ ह्या: करोनाचे काय एवढे, साधा फ्लू तर आहे.’ म्हणून, किंवा कुठलातरी धर्मगुरु सांगतो म्हणून मंत्राने, गोमूत्राने, कसल्याशा तेलाने हा आजार हाऽ असा बरा होतो यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो किंवा कुठला अगम्य नंबर हा 'डब्ल्यूएचओ'चा आहे म्हणून खपवले जाते, पण याच सोबत अमुक लक्षणे असली तर तुम्ही बाधित आहात हे सांगणारे अनेक परस्परविरोधी मेसेजेस, बातम्या प्रसिद्ध होतात. कुणी तापाचा उल्लेख करते आहे, कुणी डायरियाचा, कुणी डोकेदुखीचा. या लक्षणाचा उल्लेख त्याच्यात नाही. आता कुठली अफवा समजायचे?

हा प्रकार लोक कदाचित सद्भावानेही करत असतील (बरेचसे आपल्या धारणांचे एम्बेडेड मार्केटिंग करतात.) पण अनेकदा ही सद्भावना विकृतीचे रुप घेऊनच समोर येते.

मागे कुण्या बिहेविरल सायन्सच्या अभ्यासकाने सांगितले होते ते आठवले. लोकांना - विशेषत: लहान मुलांना - काय 'करु नकोस' पेक्षा 'काय करावे' हे सांगावे. ते अधिक नेमके असते. ’हे नाही तर काय करु?’ असा संभ्रम नसतो त्यात.

तेव्हा हे असे ’अफवांवर विश्वास ठेवू नका’चे बाष्कळ इशारे देण्यापेक्षा. शासनाने अधिकृत अशी माहिती शासनदरबारी रेजिस्टर्ड माध्यमांना पुरवावी आणि 'ही आणि एवढीच’ त्यांनी प्रसिद्ध करावी, त्याबाबत आपले इंटरप्रिटेशनही देऊ नये असे आदेश द्यावेत. लोकांना काय शंका असतील, खुलासे असतील ते अधिकृत हेल्पलाईनकडे येऊ द्यावेत नि तिथून आलेले प्रतिसादच जाहीर करावेत. आणि या अधिकृत माहितीखेरीज अन्य सर्व पर्याय अफवा आहेत असे गृहित धरावे, भले तुमच्या पावरबाज बाबाने सांगितले असोत की कुठल्या पर्यायी उपचारपद्धतीवाल्याने.

’गृहित धरावे’ म्हणतोय, अफवा आहेच असे म्हणत नाही. कदाचित यातले काही उपयुक्त असतीलही. पण प्रचंड मिस-इन्फरमेशनच्या गोंधळात असे चार जेन्युईन सल्ले शोधणे तसेही जिकीरीचे आहे. तेव्हा या सल्लागारांनी थेट शासकीय कंट्रोल रूमशी संपर्क करुन त्यांना आपल्या उपायाची उपयुक्तता सिद्ध करुन द्यावी. मग अधिकृत चॅनेलमधून ते प्रसारित व्हावेत.

अर्थात मधुमेहावरचा पाच-पाच रुपये किंमतीच्या स्वस्त आणि मस्त गोळ्या हे फ्रॉड सरकारी आशीर्वादानेही येऊ शकतेच. इतर प्रिस्क्रिप्शनविना उपलब्ध नसणार्‍या औषधांना थेट जाहिरातींची परवानगी नाही. पण मधुमेहासारख्या गंभीर आजावरचे औषध असून हे मात्र करु शकतात.

एवढे करुनही ’सरकारी मंडळींना काही कळत नाही, आमची महान परंपरा...’ वाले दीडशहाणे तरीही आपले घोडे, गाढव, डुक्कर, ढेकूण दामटत राहतीलच. त्यामुळे या मार्गाने अफवांचे संपूर्ण निर्दालन होईलच असे म्हणता येणार नाही. पण आपण अफवेच्या प्रसाराची व्याप्ती नि शक्यता कमी करत आहोत, जबाबदार संस्थांना लूपमध्ये आणत आहोत हे ध्यानात घ्या. आपण शक्यतांच्या भाषेत विचार करु शकलो, तर माणसे शहाणी होतील. कोणताच उपाय रामबाण नसतो. प्रत्येकाचे फायदे-तोटे असतात. आपल्या उपायाचे फक्त फायदे दाखवून, तोटे नाहीतच हा दुराग्रह धरुन समोरच्याबाबत नेमके उलट धोरण अनुसरणारेच जगातील बहुसंख्य संघर्ष उभे करत असतात.

याचा अर्थ लोकशाही व्यवस्थेत आपण ही गोष्ट अधिकाधिक केंद्रशासित करत आहोत का, याचे उत्तर नि:संदिग्धपणे 'हो आहोत' असेच आहे. पण आणिबाणीच्या प्रसंगी त्या कराव्याच लागतात. अन्यथा सुसूत्रपणे उपाययोजना करणे अवघड जाते. व्हॉट्सअ‍ॅप-कथित पर्यायी उपचारावर विसंबून राहून हॉस्पिटलमधून पळून जाणारे रुग्ण एकुण समाजाच्या दृष्टीने घातक असतात. तेव्हा त्यांना पळून जाण्याचे ’स्वातंत्र्य’ देणे एकुण समाजाच्या निरोगी आयुष्य जगण्याच्या स्वातंत्र्याला छेद देत असते हे विसरता कामा नये.

-oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा