गुलामाला मालक दोन वेळचे अपुरे जेवण देतो आणि त्याच्याकडून बेदम काम करुन घेतो. ’तुला पैसे दिले तर ती जोखीम तुला सांभाळता येणार नाही, पोटभर जेवलास तर सुस्ती येईल नि काम करता येणार नाही आणि सतत काम केले नाहीस तर तुझे आरोग्य बिघडेल.’ असे मालकाने गुलामाला पक्के पटवून दिलेले असते.
कुणी गुलामाला त्याच्या गुलाम असण्याची जाणीव करुन दिली तर उलट, ’अरे उलट इथे दोनवेळच्या अन्नाची शाश्वती आहे. एरवी त्यासाठी किती वणवण’ करावी लागली असती?’ असा प्रतिप्रश्न करतो. कारण आज त्याचे जे जगणे आहे त्याहून चांगले जगणे अस्तित्वातच नाही अशी मालकाने त्याची खात्री पटवून दिलेली असते.
इतरांचे स्वातंत्र्य किंवा त्याचेच गुलामीपूर्व आयुष्य हे खरे स्वातंत्र्य नाही, अध:पाताचे जिणे आहे असे त्याचे सांगणे असते आणि गुलामाला ते पुरेपूर पटलेले असते. गुलाम मालकाला मालक न समजता त्राता समजत असतो.
कुटुंब, पैसा आदि गोष्टी माया आहेत. त्यात अडकून पडणे हेच तुझ्या दु:खाचे कारण आहे. ही सारी माया गुरुचरणी त्यागून तू बाबाजींच्या उन्नतीच्या मार्गात सामील हो’ असे पटवून अनेक आश्रम, डेरे, देवस्थाने (अरे हो हो, लिहितोय. लिहितोय बाबांनो, जरा दम धरा की) चर्चेस, मशीदी/मदरसे, ’हलाहल कंठी धारण करुन उरलेल्या जगाला त्या प्रकोपापासून वाचवणार्या शंकराप्रमाणे ती माया आपल्या पोटी घेत असतात. ती त्याच्या ओटीत घालून भक्त मुक्तीचा आनंद उपभोगत असतो. गुरुला त्राता समजत असतो.
’मी जगातील सर्व समस्या चुटकीसरशी नाहीशा करुन टाकणार आहे.’ असे सांगणार्याच्या हाती आपल्या गळ्यातील पट्ट्याची दोरी देऊन गुलाम स्वत:च गुलामगिरी पत्करतो आणि समस्याविहीन जगाची स्वप्ने पाहात त्याच्यासाठी राबत राहतो.
बाजारात आर्थिक टंचाई आली की लोक त्रात्याने काटकसरीने राहण्याची शिकवण देण्यासाठी आपल्या नेत्याने मुद्दाम निर्माण केली असे गुलाम समजतो. गुलाम त्रात्याच्या शब्दाखातर रेशनच्या, मतदानाच्या, कागदपत्रे पडताळणीच्या, ब्रेडसाठी बेकरीच्या, स्वत:चे पैसे देऊ करण्यासाठी बॅंकेच्या अशा अनेक रांगातून तास न् तास निमूट उभा राहतो.
याशिवाय...
- मालकाने तुडवून काढलेला, जिवाला मुकलेला, दुसरा गुलाम हा नालायक कामचुकारच होता, मालकाने इतके देऊनही धड काम करत नव्हता, असे गुलाम समजतो...
- मालक गुलामगिरीची अनिष्ट प्रथा पाळतो आहे असा आरोप करणारे आपल्या सहृदयी मालकाचा विनाकारण द्वेष करतात असे गुलाम समजतो...
- मालकाने ’सध्या व्यवसाय मंदीत असल्याने तुला एकवेळच जेवण देणे परवडते’ म्हटले की गुलामाला मालकाच्या आर्थिक स्थितीची चिंता भेडसावू लागते...
- मालकाने गुलामाला अन्य मालकाला विकले तरी, ’त्याचा निर्णय आहे म्हणजे काही चांगल्या हेतूनेच घेतला असणार’ असे गुलाम समजतो...
- मालकाकडे दोन गुलाम असतील तर दुसर्यापेक्षा आपण मालकाच्या अधिक मर्जीत असायला हवे म्हणून एकमेकांपेक्षा जास्त काम करण्याची शर्थ करतात...
- मालकावर झालेले वार गुलाम आपल्या छातीवर झेलतात, उपचारात वाया गेलेले कामाचे तास भरुन काढण्यासाठी नंतर अविश्रांतपणे काम करतात...
- मालकाच्या विरोधकांशी, शत्रूंशी आणि मुख्य म्हणजे त्यांच्या गुलामांशी गुलाम आजन्म वैर जोपासतात...
- मालकाने त्याच्या विरोधकांशी, शत्रूंशी प्रसंगोत्पात केलेली हातमिळवणी हा त्याचा मास्टरस्ट्रोक असतो असे गुलाम समजतात...
- मालकाचा शब्द हे जगातील अंतिम सत्य आहे यावर गुलामांची अविचल श्रद्धा असते...
-oOo-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा