बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२

डकवर्थ-लुईस नियमावली आणि वृत्त-माध्यमे

१९९२ मध्ये झालेल्या विश्वचषक मालिकेमध्ये उपान्त्य सामन्यामध्ये द. आफ्रिका इंग्लंडशी खेळत होती. वंशभेदी धोरणांमुळे सुमारे बावीस वर्षे क्रिकेट जगतातून बाहेर ठेवल्यानंतर १९९१ मध्ये त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात सामावून घेतले गेले होते. उपान्त्य सामन्यामध्ये पोचण्यापूर्वी त्यांनी पाच सामने जिंकून- त्यातही माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन- आपली गुणवत्ता सिद्ध केली होती.

ही विश्वचषक स्पर्धा- त्याकाळात ज्याला एकदिवसीय सामना म्हटले जाई तशा सामन्यांची असे. यात दोन्ही संघांना प्रत्येकी ५० षटकांचा एक डाव खेळायला मिळे आणि जो संघ अधिक धावा करेल, तो विजयी होत असे. परंतु या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे मध्यांतराच्या वेळेपर्यंत इंग्लंडला ४५ षटकेच खेळायला मिळाली. त्यांत त्यांनी २५२ धावा केल्या. उत्तरादाखल दुसरा डाव खेळताना द. आफ्रिकेने अगदी सहज खेळ केला. पण ४२ षटके आणि पाच चेंडूंचा खेळ झालेला असताना पुन्हा पावसाचा व्यत्यय आला. वाया गेलेला नि खेळासाठी शिल्लक राहिलेला वेळ विचारात घेता या डावातील षटकांची संख्या कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

पुढे जाण्यापूर्वी क्रिकेट आणि फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी वा तत्सम अन्य लोकप्रिय आंतरराष्ट्रीय खेळांमधला फरक अधोरेखित करुन ठेवू या. अन्य खेळांमध्ये प्रत्येक खेळाडू नियमानुसार खेळला तर (किंवा संघाने बदली खेळाडू उतरवला नाही तर) सामन्यात संपूर्ण वेळ खेळू शकतो. क्रिकेटप्रमाणे ’खेळाडू बाद होणे’ हा प्रकार त्यात नसतो. त्यामुळे दोन्ही संघांचे खेळाडू सारख्याच संख्येने मैदानावर असतात, तेवढाच वेळ नि बव्हंशी एकाच कौशल्याचा खेळ खेळत असतात. याचा अर्थ संधीचा विचार केला तर दोनही संघांना नेहमीच सारखी संधी मिळत असते.. क्रिकेटखेरीज बहुधा केवळ बेसबॉल हा एकच खेळ असा असावा ज्यात दोन संघ एका डावात एकच कौशल्य वापरत असतात. या दोन्हींमध्ये प्रत्येक संघ फलंदाजी आणि गोलंदाजी (बेसबॉल/ सॉफ्टबॉलमध्ये ’पिचिंग’) असे वेगवेगळे डाव आलटून-पालटून खेळत असतात. बाकी फुटबॉल वगैरे खेळांत असा बाजूबदल नसतो.

क्रिकेटशी तुलना करता बेसबॉलसह बहुतेक खेळांच्या सामन्याचा एकुण वेळ मोजक्या तासांचाच असतो. त्यामुळे पावसाचा व्यत्यय आला तरी पाऊस थांबल्यावर उरलेला वेळ भरुन काढणे शक्य असते. क्रिकेटचा एकदिवसीय सामना हा इतर कोणत्याही प्रचलित खेळापेक्षा दीर्घकाळ खेळला जातो. प्रत्येकी चार तासांचे दोन डाव असा अंदाजे आठ तासांचा खेळ होत असतो. जवळजवळ संपूर्ण दिवसच खेळ होत असल्याने वाया गेलेला वेळ भरून काढण्याइतका वेळ सामन्यानंतर शिल्लक राहील याची शक्यता फारच कमी उरते.

त्यात जर दुसरा डाव पहिल्यापेक्षा कमी वेळेचा अशी स्थिती निर्माण झाली, तर खेळाचा समतोल बिघडतो. त्यामुळे दुसर्‍या डावातील संधीच्या प्रमाणात पहिल्या डावातील कामगिरीतही काटछाट करणे अपरिहार्य होऊन बसते. क्रिकेटमध्ये षटकांच्या मोजमापात खेळ होत असतो. त्यामुळे जेवढी षटके दुसर्‍या डावात खेळणे शक्य आहे, तितकीच पहिल्या डावात खेळली गेली असती तर पहिल्या संघाची कामगिरी काय असावी याचे गणित करावे लागते. त्यानुसार त्या संघालाही मागाहून खेळणार्‍या संघाला मिळणार्‍या संधीच्या पातळीवर आणावे लागते.

वर उल्लेख केलेल्या विश्वचषक उपान्त्य सामन्याच्या काळात हे गणित दोन प्रकारे केले जात असे. पहिले म्हणजे त्या पहिल्या डावातील एकुण धावांची सरासरी काढून जेवढी षटके कमी झाली त्यातून त्या सरासरीनुसार धावा कमी केल्या जात, आणि ते नवे लक्ष्य पुढच्या संघाला विजयासाठी दिले जाई. सरासरी हा शब्द असल्याने वरवर पाहता हा न्याय्य नियम वाटू शकेल. पण वास्तविक हा नियम प्रथम खेळलेल्या संघावर अन्याय करणारा आहे.

यात मागाहून खेळणार्‍या संघाला पहिल्यापासून एका निश्चित सरासरीने खेळता येते. पाऊस पडल्यामुळेही त्यात काही बदल होत नाही. षटके कमी झाल्याचा उलट त्यांना फायदाच मिळतो. कारण षटके कमी झाली, तरी तेवढेच खेळाडू खेळत असल्याने त्यांना अधिक धोका पत्करण्याची संधी मिळते. उलट प्रथम खेळलेल्या त्यांच्या दहा खेळाडूंना पन्नास षटके खेळण्याचे नियोजन करावे लागत असल्याने धोका पत्करण्याची क्षमता सुरुवातीला कमी असते. (फुटबॉल वगैरे खेळांत खेळाडू बाद होणे हा प्रकारच नसल्याने ही शक्यताच निर्माण होत नाही. दोन्ही संघ सारख्याच पातळीवर खेळत असतात.)

याबाबत दुसरा नियम होता तो केवळ ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमध्ये वापरला जात असे. ही विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होत असल्याने त्यातही हाच नियम लागू करण्यात आला होता. त्यानुसार दुसरा डाव चालू असताना पाऊस आला, तर जेवढी षटके कमी करावी लागतील, तेवढीच षटके पहिल्या डावातूनही कमी करावीत. पण सरासरीचा नियम न वापरता पहिल्या डावात सर्वात कमी धावा झालेली षटके आधी वगळावीत असा नियम होता. हा पहिल्या डावात खेळलेल्या संघाला न्याय देण्याचा थोडा प्रयत्न होता.

यामागचा तर्क असा की आता षटके कमी झाल्यामुळे दुसरा डाव खेळणार्‍या संघाला कमी षटके खेळण्यासाठी तेवढेच फलंदाज शिल्लक आहेत. थोडक्यात त्यांची धोका पत्करण्याची क्षमता अनायासे वाढली आहे. त्यामुळे पारडे समतोल करण्यासाठी पहिला डाव खेळलेल्या संघाला झुकते माप मिळायला हवे. त्यादृष्टीने हे उद्दिष्ट योग्यच होते. फक्त या उपान्त्य सामन्यात त्याचा जो परिणाम झाला त्यामुळे त्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

या सामन्यांत द. आफ्रिकेच्या दुसर्‍या डावात पावसाचा व्यत्यय आला, तेव्हा आफ्रिकेला विजयासाठी १३ चेंडूंत २२ धावा आवश्यक होत्या. पाऊस थांबला तेव्हा उरलेल्या वेळेचे गणित करुन दोन षटके कमी करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे एका चेंडूचा खेळ शिल्लक राहिल्याचे जाहीर करण्यात आले. त्यासाठी इंग्लंडच्या डावातून कमीत कमी धावा झालेली दोन षटके वगळण्यात येणार होती.

GoochAndMcMillan
विजयी(?) इंग्लंडचा कर्णधार ग्रॅहम गूच आणि नाबाद आफ्रिकन फलंदाज ब्रायन मॅकमिलन.

इंग्लंडच्या डावामध्ये द. आफ्रिकेच्या मेरिक प्रिंगल याने दोन षटके निर्धाव टाकली होती. ती वगळल्यामुळे इंग्लंडच्या एकुण धावांमधून एकही धाव कमी झाली नाही. परिणामी राहिलेल्या एकाच चेंडूमध्ये २२ धावा काढण्याचे अशक्यप्राय आव्हान आफ्रिकेला देण्यात आले. थोडक्यात पाऊस येण्यापूर्वी शक्यतेच्या पातळीवर असलेला आफ्रिकेचा मध्ये आलेल्या पावसाने अशक्य होऊन बसला होता.

वर म्हटले तसे, वास्तविक हा नवा नियम सरासरी नियमापेक्षा अधिक समतोल होता. तरीही हे असे का झाले? याचे कारण असे की हे दोनही नियम तसे सरधोपट आहेत. क्रिकेटसारख्या गुंतागुंतीच्या खेळातील फलंदाजी, गोलंदाजी या दोनही क्षेत्रांतील बर्‍याच शक्यतांचा विचार ते करत नाहीत.

इथलेच उदाहरण पाहिले तर, एखादे षटक निर्धाव खेळले जाणे हे फलंदाजाने धोका न पत्करल्याचे निदर्शक असेल, तसेच ते गोलंदाजाने उत्तम गोलंदाजी केल्याचेही असू शकेल. त्यामुळे त्या निर्धाव षटकांचा फायदा इंग्लंडला देताना ती निर्धाव षटके टाकणार्‍या प्रिंगलवर अन्याय झाला होता. वास्तविक इतर सर्व गोलंदाज प्रति-षटक सरासरी पाचहून अधिक धावा देत असताना, प्रिंगलने दोन षटके निर्धाव टाकतानाच जेमतेम चारच्या सरासरीने धावा दिल्या होत्या. त्याने इतर गोलंदाजांहून सरस कामगिरी केली होती. ज्याचा त्याच्या संघाला उलट तोटाच झाला.

क्रिकेटचा सामना ५० षटकांचा आहे की २० षटकांचा आहे की पाच दिवसांचा यावरुन फलंदाज नि गोलंदाजांचे खेळाचे नियोजन असते. ५० षटकांच्या सामन्यात पुरी षटके फलंदाजी व्हावी, ती पुरेपूर वापरली जावीत याचे नियोजन केले जात असते. त्यातून शक्य असलेल्या धोका पत्करुन ज्या वेगाने खेळाडू खेळू शकतील, त्याहून २० वा ३० षटकांमध्ये खेळताना, फलंदाजांची संख्या तेवढीच असल्याने, अधिक धोका पत्करू शकतात. त्यामुळे अधिक वेगाने धावा करण्याची संधी त्यांना मिळत असते. त्यामुळे सुरुवात ५० षटकांचा डाव गृहित धरुन केली, पण पावसासारख्या कारणाने एखादा डाव मध्ये कमी झाला, की तो खेळणार्‍यांचे नियोजन - त्यांची चूक नसता- बिघडते.

याउलट नंतर खेळणार्‍या संघाला किती धावा करायच्या, नि किती षटकात याचे नेमके लक्ष्य आधीच मिळते. त्यामुळे फलंदाजीतील क्रमवारी बदलण्यापासून अनेक फायदे त्यांना घेता येतात. पण फायदा केवळ नंतर फलंदाजी करणार्‍या संघालाच होतो असेही नाही. गोलंदाजी करणार्‍या संघालाही होऊ शकतो. अशा एकदिवसीय सामन्यांत पन्नास षटकांपैकी 'जास्तीत जास्त दहा षटके (वीस टक्के) एका गोलंदाजाला दिली जाऊ शकतात' असा नियम आहे. दुसर्‍या डावात पावसाचा व्यत्यय आल्याने षटके कमी झाली, तर ही संख्याही कमी व्हायला हवी. पण पंचाईत अशी, की पाऊस येण्यापूर्वीच एखाद्या गोलंदाजाने आपली दहा षटके पुरी केली असणेही शक्य आहे. त्याचे काय करायचे?

त्याची जास्तीची षटके धावफलकातून (scorecard) रद्द करायची? आणि तसे केले तर मग त्या षटकांत काढल्या गेलेल्या धावांचे काय? त्या ही फलंदाजांच्या धावांमधून वजा करायच्या? त्याहून वाईट म्हणजे त्या रद्द केलेल्या षटकांमध्ये बाद झालेल्या फलंदाजांचे काय करायचे? त्यांना खेळायला परत बोलवायचे? तसे असेल तर नंतर इतर गोलंदाजांची षटके यांना खेळायला मिळालेली नव्हती ती परत टाकायची? पण मग त्यातून सामना लांबेल त्याचे काय?...

की त्याबाबत काहीच न करता त्यातील धावाच तेवढ्या वगळायच्या? तसे असेल तर पावसाची चिन्हे दिसत असेल तर दुसर्‍या डावात गोलंदाजी करणार्‍या संघाचा कर्णधार आपल्या हुकमी गोलंदाजांची षटके आधी पुरी करुन घेऊ शकतो. (हीच संधी पहिल्या डावातही घेता येईल.) जेणेकरुन प्रतिस्पर्धी संघाला अवघड षटके अधिक खेळावी लागतील.

पण यात एक धोकाही आहे. कारण पाऊस आलाच नाही, तर दुय्यम गोलंदाजांना शेवटाकडे अधिक गोलंदाजी करावी लागेल नि फलंदाजी करणारा संघ शिल्लक फलंदाजांच्या संख्येनुसार अधिक धोका पत्करुन त्याचा फायदा करुन घेऊ शकतील. पण हल्ली हवामानाचे अंदाज बरेचसे अचूक ठरत असल्याने तो धोका पत्करणे सहज शक्य होते.

हे सारे विवेचन सामन्यातील ’पहिल्या डावात पावसाने पुरा खेळ झाला नाही तर’ या एकाच शक्यतेभोवती फिरते. या पलिकडे मुळात पहिला डाव पुरा हौन दुसरा डाव सुरु होण्यासच उशीर झाला, किंवा तो ही सुरू होऊन मध्येच व्यत्यय आला किंवा व्यत्ययानंतर खेळच झाला नाही .... अशा आणखी शक्यता आहेत. प्रत्येक वेळी दोन्ही संघांना समान संधीच्या पातळीवर आणण्याची पद्धत वेगवेगळी असणार आहे.

गोळाबेरीज सांगायची तर खेळादरम्यान अशा अनेक शक्यता उद्भवतात. त्या प्रत्येकीचा फलंदाजीवर आणि गोलंदाजीवर होणारा परिणाम जोखता आला पाहिजे, त्यानंतर त्यांचा धावांच्या स्वरूपात रूपांतरित करता आले पाहिजे. गणित करता आले पाहिजे. विविध शक्यता (possibilities) आणि त्यांच्या संभाव्यता (probabilities) मांडणे, त्यांचे धावांच्या रूपात मूल्य काढणे आणि ते सारे एकत्रितरित्या वापरून सुधारित लक्ष्य देणे हे आव्हानात्मक होते. यासाठीची सुधारित नियमावली फ्रॅंक डकवर्थ आणि टोनी लुईस या दोन शक्यताविज्ञानाच्या अभ्यासकांनी तयार केली आणि पुढे प्रा. स्टर्न यांनी त्यात भर घातली.

त्यांनी डावाच्या प्रत्येक टप्प्यावर दोन्ही संघांना उपलब्ध असणारी खेळाची 'मानवी सामुग्री' (resources) मोजून, त्यानुसार प्रत्येक संघ समान संधीच्या पातळीवर असण्यासाठी किती धावा असायला हव्यात त्याचे गणित मांडले. या ’सामुग्री’मध्ये गोलंदाजांची उपलब्ध षटके आणि फलंदाजीस उपलब्ध असणार्‍या खेळाडूंची संख्या यांचा समावेश होता. पुढचे गणित जरी समजून घेतले नाही, तरी त्यामागचा दृष्टिकोन समजून घेतला तरी त्याबद्दल अज्ञानमूलक शेरबाजी करणे टाळता येईल.

पण स्वत:च्या अस्मिता, अहंकार नि गटाच्या सोयीच्या इतिहासाच्या आवृत्त्यांमध्ये रमलेल्या भूतकालभोगी नि पाठांतरप्रधान भारतीय समाजात गणित हा विषय मुळातच आधी नावडता असतो. त्यातच असा शक्यतांचा विचार करणे ही काळे-पांढरे, चांगले-वाईट, देव-सैतान अशा द्विदल भूमिकाच घेऊ शकणार्‍या मेंदूंना शिक्षाच असते. जे आपल्याला समजत नाही ते मुळातच वाईट, चुकीचे वा घातक असते हा सोपा निवाडा बहुसंख्य निवडत असतात. त्याला अनुसरून ’डकवर्थ-लुईस नियमावली ही एक चेटकी आहे आणि पावसाने वा अन्य कारणाने वेळ वाया गेला की तिची ताकद वाढून ती एका संघावर हल्ला करते.’ असा काहीसा सार्वजनिक समज आहे.

माध्यमे हाती असलेले त्याच समाजातून येत असल्याने त्यांची स्थितीही वेगळी नाही. एवढेच नव्हे तर ’आधीच मर्कट...’ तशी त्यांची गत असते. माध्यमे हाती असल्याने ’आपण लिहू ते सत्य’ अशी काहीशी त्यांची धारणा असते. त्यातच ’नफा हेच सर्वस्व’ मानणार्‍या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये या मर्कटाला वृश्चिकदंशही झाल्याने त्यांच्या लीला अगाध असतात. आता हेच उदाहरण पाहा.

DuckworthLewis

नुकताच म्हणजे २७ जुलै २०२२ या दिवशी वेस्ट इंडिजमधील पोर्ट ऑफ स्पेन’च्या मैदानावर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात असाच प्रत्येकी ५० षटकांचा सामना खेळला गेला. भारत पहिला डाव खेळत असताना वारंवार पावसाचा व्यत्यय येत होता. अखेर या डावात भारताला ३६ षटकेच फलंदाजी करता आली. त्यांत भारताने ३ गडी गमावून २२५ धावा केल्या. षटके कमी केल्यामुळे दुसर्‍या डावात फलंदाजी करणार्‍या वेस्ट इंडिजसाठी डकवर्थ-लुईस नियमानुसार २५८ धावांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले.

२५८ धावांचे लक्ष्य घेऊन फलंदाजीस उतरलेल्या वेस्ट इंडिजचा डाव जेमतेम २६ षटकांत १३६ धावांतच संपुष्टात आला. म्हणजे सुधारित लक्ष्य तर सोडाच, पण भारताने केलेल्या २२५ धावांच्या जवळपासही तो संघ पोहोचू शकला नव्हता. भारताच्या केवळ पाच फलंदाजांनी मिळून केलेल्या धावा वेस्ट इंडिजच्या अकरा जणांनाही करता आल्या नव्हत्या. त्यांना पुरी छत्तीस षटके फलंदाजीही करता आलेली नव्हती, तब्बल दहा षटके शिल्लक असतानाच त्यांचा डाव संपला होता. क्रिकेटच्या इतिहासात ज्यांना दणदणीत म्हणावेत असे जे विजय असतात त्यातील हा एक. पण दुसर्‍या दिवशी लोकसत्ता’च्या पोर्टलवर (कदाचित छापील वृत्तपत्रातही) या बातमीचे शीर्षक होते....डकवर्थ-लुईस नियमाने केला यजमानांचा घात.’

'घात करणे’ याचा अर्थच मुळी ते कारण नसते तर ज्याचा घात झाला आहे त्याची परिस्थिती वेगळी/चांगली असती, त्याला वा तिला यश मिळण्याची शक्यता असती किंवा असलेली वाढली असती असा असतो. डकवर्थ-लुईस नियम नसता, तरीही इथे वेस्ट-इंडिजचा दारुण पराभवच झालेला आहे. एकवेळ वेस्ट-इंडिजने २२५ हून जास्त पण २५७ हून कमी धावा केल्याने ते पराभूत झाले असते तर ’कदाचित’ हे शीर्षक देता आले असते. माझ्या मते तरीही ते चूकच ठरले असते. पण एखाद्या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमाचा वापर झाला, की अशा वृत्त-जुळार्‍यांच्या जगात त्याच्या बातमीच्या शीर्षकात त्याचा उल्लेख अपरिहार्य असतो. शास्त्र असते ते.

सामन्याच्या धावफलकाकडे पाहिले तर ९८ धावांवर नाबाद राहिल्याने शतक हुकलेल्या शुबमन गिलचा घात झाला आहे. पुरी पन्नास षटके सोडा, अजून एखादे षटक खेळायची संधी मिळाली असती तरी त्याला तो टप्पा पार करता आला असता. पण तो डकवर्थ-लुईस नियमाने नव्हे तर पावसाने केला आहे. १९९२ च्या त्या उपान्त्य सामन्यात त्यावेळच्या त्या जुन्या नियमाने मेरिक प्रिंगलचा घात केला आहे. कारण त्या नियमामुळे त्याने केलेली उत्कृष्ट गोलंदाजी संघाला हितकारक ठरण्याऐवजी अपायकारक ठरल्यामुळे तो नायक ठरण्याऐवजी खलनायक ठरला आहे.

डकवर्थ-लुईस नियम ही शिक्षा नव्हे. ती वस्तुनिष्ठ मूल्यांकनातून गणित करणारी नियमावली आहे. २०१० मधले १०० रुपये नि आजचे १०० रुपये यांचे मूल्य एकसमान नसते. मधल्या काळात परिस्थिती बदलते, महागाई वाढते, आंतरराष्ट्रीय बाजारामुळे रुपयाचे मूल्य कमी-जास्त होते. त्यातून त्याच शंभर रुपयात किती टक्के जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या जाऊ शकतात याचे गणित बदलते. त्यामुळे वेतन/श्रममूल्यही बदलावे लागते. या बदलाची व्याप्ती २०१०-२०२२ या दरम्यान जितकी असेल त्यापेक्षा २०२०-२०२२ या दोनच वर्षांच्या टप्प्यात कमी असेल. हे समजत असेल तर बर्‍यापैकी विचार करु शकणार्‍याला डकवर्थ-लुईस नियमावली मागचे धोरण समजण्यास अवघड जाऊ नये.

या भारत-वेस्ट इंडिज सामन्यात झाले तसे प्रथम फलंदाजी केलेल्या संघाने ’प्रत्यक्षात केलेल्या धावांपेक्षा त्यांनी अधिक धावा केल्या असत्या’ हे संभाव्यतेचे गणित बहुतेकांच्या पचनी पडत नाही. अशा स्थितीत मागाहून फलंदाजी करणार्‍या संघावर अन्याय केला जातो आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. याचे कारण आपण त्या संघाला नाकारल्या गेलेल्या संधींचा विचार केलेला नसतो. याच सामन्याच्या धावफलकाकडे पाहिले तर भारताचे फक्त पाचच फलंदाज मैदानावर उतरू शकले होते. सुरुवातीलाच सामना ३६ षटकांचा आहे असे ठाऊक असते, (जसे वेस्ट इंडिजला दुसर्‍या डावात ठाऊक होते) तर हेच पाच फलंदाज अधिक धोका पत्करून अधिक धावा जमवण्याचा प्रयत्न करु शकले असते. त्यातून २२५ हून अधिक धावा जमवणे शक्य होते.

पण इथे बाद झालेल्या खेळाडूंचा विचारही करायला हवा. भारताचे तीन फलंदाज बाद न होता, सहा फलंदाज बाद झाले असते गणित वेगळे झाले असते. कारण शिल्लक सहा फलंदाज उरलेल्या १४ षटकांत जितका धोका पत्करुन खेळू शकले असते तितके शिल्लक तीन फलंदाज खेळू शकले नसते. तीन अधिक बळी घेतल्याचे श्रेय मिळून वेस्ट इंडिजचे सुधारित लक्ष्य २४२ धावांचे म्हणजे २५८ हून बरेच कमी असते. वेस्ट इंडिजने भारताचे अनुक्रमे आठ किंवा नऊ फलंदाज बाद केले असते तर हेच लक्ष्य २११ आणि १९३ म्हणजे भारताने केलेल्या एकुण धावांहून कमी असते! (प्रत्यक्ष सामन्यात हे १९३ धावांचे लक्ष्यदेखील वेस्ट इंडिजला पार करता आलेले नाही!) म्हणजे हा नियम केवळ एकाच बाजूला फायदेशीर ठरतो असे नाही.पण इतके समजून घेण्याची तसदी कोण घेतो.

बातमीबार पोर्टल्सचा आलेला महापूर, क्लिकवर आधारित उत्पन्न, सतत नव्या बातम्या वा पोस्टची खायखाय... या लोंढ्यामध्ये पत्रकार केव्हाच मेले, बातमीदारही अस्तंगत होत आहेत. आता हे बसल्याबसल्या संगणकावर बातम्यांची जुळणी करणारे जुळारी (compositor) उरले आहेत. सनसनाटीकरण, वैय्यक्तिक अज्ञान, ते जाहीर करण्याची खुमखुमी, एका बातमीच्या चार बातम्या खरडण्याचे कौशल्य... या अलिकडे बातमी-जुळार्‍यांसाठी अर्हता (eligibility) असाव्यात.

एका वृत्तपत्राच्या पोर्टलवरचे एक क्रीडावृत्त-जुळारी प्रत्येक क्रिकेट सामन्यापूर्वी आज कुणाला डच्चू मिळणार याचे भाकित नव्हे, निर्णय जाहीर करत असतात. पण त्यांचा हा अभ्यासू निर्णय न जुमानता दुष्ट भारतीय कर्णधार भलत्याच कुणाला डच्चू देतात, किंवा मागचाच संघ कायम ठेवतात. पण त्यांना वा त्यांच्या वृत्तपत्र-पोर्टलला त्याने काही फ़रक पडत नाही. कारण दरम्यानच्या काळात क्लिकार्थ साधून त्यांच्या वृत्तपत्र-पोर्टलने आपला खिसा भरुन घेतलेला असतो. मैदानावर वा पॅव्हेलियन वा डग-आऊटमध्ये कुणाची कणभर तीव्र प्रतिक्रिया दिसली, वा कुणी मतभेद व्यक्त करताना दिसले, की हे महाशय त्याची भलीमोठी बातमी करतात नि शीर्षकातच त्यांचा फार लाडका शब्द ’राडा’ वापरून पुन्हा क्लिकार्थ साधतात. बातमीच्या शीर्षकात डकवर्थ-लुईस नामक चेटकीचा उल्लेख हा ही असाच वाचकाने क्लिक करावे म्हणून लावलेला सापळा असतो. ’नफा हेच मुख्य नि अंतिम उद्दिष्ट आणि क्लिकार्थ हे साध्य' मानणार्‍यांच्या अहमहमिकेमध्ये माध्यमांची विश्वासार्हता लयाला जाणे हे ओघाने आलेच.

बहुतेक सार्‍या शक्यता विचारात घेऊन शक्यताविज्ञान (Statistics) नियम बनवत असते. केवळ चार ओळी लिहिता येतात म्हणून वाटेल ते खरडणार्‍या या बातमी-जुळार्‍यांसारखे मन:पूत निवाडे देणे त्याला परवडत नाही. ज्यांना त्यातील काही कळत नाही, शक्यतांची भाषाच समजत नाही, अशा अडाण्यांनी कितीही आगपाखड केली तरी जगण्यातले बहुतेक सारे हे त्या नियमांच्या आधारेच सुरळित चालत असते.

- oOo -

१. डकवर्थ-लुईस-स्टर्न लक्ष्याचे गणित https://www.omnicalculator.com/sports/duckworth-lewis येथून साभार.

२. बातमीबार पोर्टल्स = बातमीचे बार काढणारी पोर्टल्स

३. क्लिकार्थ - वाचकाने क्लिक(click) करण्यातून मिळालेले अप्रत्यक्ष उत्पन्न.

---

संबंधित लेखन:

क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे काय?
सुरेख सामन्याचे विध्वंसक कवित्व
डकवर्थ-लुईस नियमावली आणि वृत्त-माध्यमे
बा कपिल देवा
क्रिकेट आणि टीकाकार


हे वाचले का?

रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

अर्थ-साक्षरता - २ : उत्पन्न आणि खर्च

अर्थ-साक्षरता - १ : अर्थ-साक्षरता आणि मी << मागील भाग
---

उत्पन्नाचे नियोजन करता येत नाही, खर्चाचे करता येते.

उत्पन्न आणि खर्च

दरमहा उत्पन्न किती हाती यावे याचे नियोजन फार थोड्या व्यक्तींना करता येते. मासिक अथवा त्रैमासिक व्याज देणार्‍या मुदत-ठेवी, म्युच्वल फंडांच्या अथवा पोस्टाच्या ’मासिक परतावा योजना’ अथवा मालकीच्या घरांवरील ’रिव्हर्स मॉर्टगेज’सारख्या योजनांमधून नेमकी रक्कम दरमहा हाती पडेल अशी सोय करुन ठेवता येते.पण हा निवृत्तीनंतरचा विचार झाला, तोवर बचत आणि गुंतवणुकीचा विचार बव्हंशी कालबाह्य झालेला असतो.

एरवी फारतर वेतनधारी मंडळींना दरमहा किती रक्कम हाती पडेल हे ठाऊक असते, ’किती पडावी’ यावर त्यांचेही फार नियंत्रण नसते. व्यावसायिक मंडळींना तेही शक्य नसते. तेव्हा आर्थिक नियोजनाचा पहिला टप्पा हा ’सरासरी मासिक उत्पन्नाचा अदमास घेणे’ हा असायला हवा. कारण हाती पैसा किती येणार याचा ठोकताळा नसेल, तर त्यातून होणार्‍या खर्चाचे नि बचतीचे नियोजन शक्यच नसते.

ज्यांच्या उत्पन्नाचा स्रोत आयुष्याच्या सुरुवातीला बळकट असतो (उदा. खेळाडू, अभिनेते), त्यांची जीवनशैली अधिक खर्चिक बनून राहते. पण काळ पुढे जाईल तसा बहुतेकांचा उत्पन्नाचा प्रवाह आटत जातो. अशा व्यक्तींना काळाबरोबर जीवनशैलीमध्ये खर्चिकपणावर नियंत्रण आणणे अत्यंत आवश्यक असते. विशेषत: वाढत्या वयाबरोबर आरोग्याशी संबंधिक खर्चांची वाढ होत जाते, तसतसे इतर खर्चांवर लगाम लावण्याची गरज निर्माण होत असते. काहींना हे साधत नाही आणि त्यांच्या उत्तर-आयुष्यात परवड होत जाते.

IncomeAndSpending

या अनिश्चिततेवर एक सोपा तोडगा म्हणजे असे बरेच लोक बहुधा पैसे आल्यावरच खर्च वा बचतीचा विचार करतात. हे ’Don't count your chicken before they hatch’ धोरण वर्तमानाला सोयीचे असले, तरी भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेलच असे नाही. कारण यात भविष्याचा विचार केवळ वर्तमान उत्पन्नाच्या आधारेच केला जात असतो. त्याकाळची संभाव्य परिस्थिती आणि गरजा यांचा विचार यात करता येत नाही, केला तरी तात्कालिक असतो आणि भविष्यातील परिस्थिती बदलली की कालबाह्य ठरतो.

बरेच खेळाडू, सैन्यदलामध्ये सेवा करणारे लोक हे त्यांच्या मुख्य कार्यक्षेत्रातून फार लवकर निवृत्त होतात. अभिनयाच्या क्षेत्रातही अनेक कलाकार फार लवकर बाजूला पडतात किंवा त्यांना मिळणार्‍या कामाची वारंवारता नि मोबदला घटत जातो. या सार्‍यांना त्यानंतरचा प्रवास हा त्या सर्वाधिक कार्यक्षम काळात कमावलेल्या आर्थिक बळाच्या आधारेच करावा लागत असतो.

त्यातील काही जण त्या पुंजीतून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी अन्य व्यवसायामध्ये पाऊल ठेवतात.पण आयुष्याच्या मध्यावर रोजगाराचे क्षेत्र, आर्थिक स्रोत बदलले की त्या क्षेत्राशी जुळवून घेणे, त्यातील खाचाखोचा शिकून घेत त्यातून अपेक्षित उत्पन्न सातत्याने निर्माण करणे हे तुलनेने अवघड असते. त्यातून त्या क्षेत्रातील सल्लागारांवर अवलंबून राहणे अपरिहार्य होत जाते. हे टाळायचे असेल तर सुरुवातीपासून आवक नि जावक यांच्यावर लक्ष ठेवून त्यांची सांगड घालण्याचे नियोजन करणे अधिक उपयुक्त ठरते.

ामान्यपणे सर्वच व्यक्ती आर्थिक स्थिती सुधारली वा बिघडली की त्यानुसार खर्चाचा हात सैल सोडणे वा आखडता घेणे हे ढोबळमानाने करत असतातच. आल्या पैशातून बचत किती करु आणि भविष्यासाठी किती राखून ठेवू याचा विचार करतच असतात. याच विचाराला थोडे अधिक वस्तुनिष्ठ स्वरूप द्यायचे तर भविष्यातील गरज, बचत यांची रकमेच्या स्वरूपात मोजणी करावी लागते. त्यातून निव्वळ आज हातात असलेल्या पैशांवरुन नव्हे तर उत्पन्नातील बदलाची दिशा ध्यानात घेऊन खर्चाचे प्रमाण निश्चित करता येते. पहिल्या भागाच्या सुरुवातीला दिलेली एक-दोन उदाहरणांतून असे दिसते, की बरीच माणसे नेमके इथेच फसत असतात.

पण त्याला एक महत्त्वाची पूर्वअट ही आहे की तशी ती सुधारते आहे किंवा बिघडते आहे हे ध्यानात यायला हवे!

उत्पन्नाचा अंदाज

पण आर्थिक नियोजन करताना ’खर्च नि बचतीचे नियोजन करण्यासाठी मासिक/वार्षिक उत्पन्नाची आधारभूत रक्कम कशी ठरवायची?’ असा प्रश्न निर्माण होतो. त्यावर काही सोप्या गणिती पद्धतींचा वापर करता येतो. यासाठी उत्पन्न सुरू झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे प्रत्यक्ष उत्पन्नाचे आकडे पाहून त्याआधारे वार्षिक अथवा मासिक सरासरी उत्पन्नाचा ठोकताळा मांडावा लागतो.

एरवी सर्वसाधारण परिस्थितीमध्ये अनेकांच्या कामगिरीचे प्रातिनिधिक मूल्यमापन करण्यासाठी साधी सरासरी (Average अथवा Arithmetic Mean) वापरली जाते. उदाहरणार्थ एकाच वर्गातील सर्वच विद्यार्थी एकच विषय, एकाच शिक्षकाकडून शिकत असल्याने प्रत्येक त्यांची पार्श्वभूमी एकच असते. सर्व विद्यार्थी पेपर स्वतंत्रपणे लिहित असल्याने प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र एकक असतो. त्यामुळे त्यांची सरासरी कामगिरी त्यांच्या गुणांची बेरजेला एकुण विद्यार्थीसंख्येने भागून सहजपणे काढता येते.

परंतु एकाच विद्यार्थ्याच्या गुणांची विविध इयत्तांमधील कामगिरी पाहात गेलो, तर त्यामध्ये तो विद्यार्थी सामायिक असल्याने त्याला प्रत्येक इयत्तेमध्ये मिळालेले गुण हे सर्वस्वी स्वतंत्र नसतात. असाच काहीसा प्रकार शेअर्सच्या किंमतीबाबत असतो. उद्याची किंमत दहा दिवसांपूर्वीच्या किंमतीपेक्षा आजच्या किंमतीशी अधिक सलगी ठेवून असते. यासाठी काळात जसजसे पुढे जावे तसतसे सरासरी काढताना मागच्या किंमतींचे महत्त्व कमी करत न्यावे लागते. यासाठी सरकती सरासरी (moving average) या संख्याशास्त्रीय संकल्पनेचा वापर केला जातो.

MovingAverage

सरकती सरासरी या संकल्पनेमागचे धोरण सोपे आहे. आज नि काल या परस्परांशी जोडलेल्या दोन दिवशी असलेले मूल्य जितके परस्परांशी जोडलेले आहे तितके काल नि उद्याचे नाही. काल आणि दहा दिवसांनंतरच्या मूल्यांचा परस्परसंबंध फारच थोडा उरलेला असेल. त्यामुळे सरासरी काढायची झाली तर ती ’जवळच्या’ मोजमापांची वा मूल्यांची काढावी. यात सलग (समजा) पाच दिवसांची सरकती सरासरी वापरायची असेल, तर पाचव्या दिवसांपासून या सरकती सरासरी काढण्यास सुरुवात होते. पाचव्या दिवसाची सरकती सरासरी म्हणजे मागच्या पाच दिवसांची साधी सरासरी असते. सहाव्या दिवशी सरासरी काढताना पहिला दिवस वगळला जातो आणि सरासरी दोन ते सहा या दिवसांची काढली जाते...

त्यामुळे पाचव्या दिवसापासून पुढे प्रत्येक दिवसाचे वास्तव मूल्य/किंमत आणि त्याची सरकती सरासरी अशी दोन निरीक्षणे अभ्यासकाला उपलब्ध असतात. काळाच्या अक्षावर ती मांडत गेले असता दोन ग्राफ मिळतात. या दोनपैकी सरकती सरासरी कमी चढ-उतार दाखवते.त्यामुळे वास्तव किंमतींच्या तुलनेत त्यातून बदलत्या दिशेचे आकलनही अधिक चांगले होऊ शकते.

सरकती सरासरी हे कालानुरूप होत जाणार्‍या बदलाच्या दिशेचे (trend) आकलन करण्यासाठी एकमेव तंत्र नाही. परंतु सर्वसामान्यांना समजणारे आणि सहज वापरता येणारे तंत्र आहे. तुमचे उत्पन्नही शेअर्सच्या किंमतीप्रमाणे काळाबरोबर बदलत जात असल्याने त्याची दिशा समजण्यास आणि भविष्यातील उत्पन्नाचा अदमास घेण्यास उपयुक्त आहे. गेल्या पाच अथवा वर्षांची सरासरी हे पुढील वर्षीचे उत्पन्न धरुन त्या वर्षीच्या खर्च नि बचतीचे नियोजन करणे शक्य आहे.

एकदा तुमच्या उत्पन्नाचा अंदाज तुमच्या हाती आला की पुढच्या टप्प्यात खर्चाचे- आणि बचतीचेही- नियोजन करण्याचा विचार करु शकता.

खर्चाचे नियोजन : दोन दृष्टिकोन

सर्वसामान्यपणे खर्चाचे नियोजन ही संकल्पनाच बहुतेकांना आश्चर्यकारक वाटते. गंमत म्हणजे बरीच मंडळी होऊन गेलेल्या खर्चाच्या काटेकोर नोंदी ठेवणारी असतात. मग उरलेल्या पैशातून बचतीचा आणि गुंतवणुकीचा विचार करत असतात. परंतु खर्च नि बचत यांचा विचार असा वेगवेगळा करता येत नाही. बचत ही भावी खर्चासाठीच असते. तिची तशी सांगड घातली की वर्तमानातील खर्चाचा विचारही अधिक नेमकेपणे करता येतो.

परंतु खर्चाला नेहमीच उत्पन्नाशी प्रामाणिक राहावे लागते. त्यामुळे सुरुवातीलाच पुढील वर्षी हाती येऊ घातलेल्या उत्पन्नाचा किती हिस्सा या वर्षीच्या खर्चांसाठी आणि किती हिस्सा भविष्यातील खर्चांसाठी (म्हणजेच बचतीसाठी) राखून ठेवावा हे ठरवावे लागते. आणि ही विभागणी कशी असावी हे काहीसे सापेक्ष असते. ती विभागणी करण्यामागचे दोन ढोबळ दृष्टिकोन दिसतात.

एक गट असा विचार करतो की उत्पन्न सुरू झाले त्या तरुण वयातच आयुष्य अधिक सक्षमपणे भोगता येते. त्यामुळे सुरुवातीच्या वर्षांत खर्चाचे प्रमाण अधिक, तर बचतीचे प्रमाण कमी राखले जाते. घर लवकर विकत घेणे, त्यासाठी कर्ज काढणे, आर्थिक स्तर मध्यम वा त्याहून वरचा असेल तर चारचाकी गाडी घेणे आदी निर्णय यात आयुष्याच्या अलिकडच्या टप्प्यावर घेतले जातात. टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर आदी गृहोपयोगी गोष्टी टप्प्याटप्प्याने घेण्याऐवजी मासिक हप्त्यांसारख्या (EMI) कर्जाच्या आवृत्त्यांचा वापर करुन एकदम विकत घेण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. यात भविष्यातील उत्पन्नाचा वापर वर्तमानातील मोठ्या खर्चांसाठी केला जातो. याचा तोटा म्हणजे उपभोगाचा कालावधी वाढत असला, तरी भविष्यासाठी आर्थिक भार लवकर निर्माण केला जातो.

वर उल्लेख केलेल्या ’Don't count your chicken before they hatch’ दृष्टिकोनाच्या नेमका उलट असा हा दृष्टिकोन आहे. साधारणत: वायदे बाजारासारखा. अजून अंडीही हाती आलेली नसताना भविष्यात हाती येणारी ब्रॉयलर पिल्ले विकणारा, भांडवलशाही व्यवस्थेला अनुरूप मानसिकतेचे प्रतिबिंब पडलेला. यात उद्याचा आर्थिक भार पेलण्याइतपत उत्पन्न न वाढण्याचा धोका असतो. परंतु तरुण वयामध्ये धोका पत्करण्याची मानसिकता नि कुवत अधिक असल्याने तो स्वीकारणे शक्य असते. पण त्यासाठी यांना आर्थिक नियोजन अधिक काटेकोरपणे करणे आवश्यक होऊन बसते.

दुसरा गट असा विचार करतो की कमावत्या आयुष्याच्या सुरुवातीला केलेली बचत अधिक काळ गुंतवता येत असल्याने चक्रवाढव्याजाचा फायदा होऊन वेगाने वाढते. तेव्हा सुरुवातीच्या काळात शक्य तितकी बचत केली, तर भविष्यातील खर्चांसाठी अधिक रक्कम जमा करणे शक्य होईल. हा गट कमावत्या आयुष्याच्या सुरुवातीला उत्पन्नाचा अधिक हिस्सा बचतीसाठी राखून ठेवत असतो. पुढे जसजसे जबाबदार्‍या नि गरजा वाढतील तसतसा खर्चाचा हिस्सा वाढवत नेऊन बचतीचा हिस्सा कमी करत नेतात.

हा दृष्टिकोन पहिल्यापेक्षा अधिक ’आस्ते कदम’ जाणारा आहे, वर्तमानापेक्षा भविष्याला झुकते माप देणारा आहे. मागच्या पिढ्यांमध्ये आधी बचत नि त्या बचतीमधून निवृत्तीनंतर घर बांधण्याचा प्रघात मोठा होता. हा त्याचाच थोडा पुढारलेला अवतार. तो अवतार अंड्यांमधून पिल्ले जन्मल्यावर त्यांना ग्राहक शोधणारा, तर हा अंडी हाती आल्यावर त्यातील किती टक्क्यांतून पिले बाहेर येतील याचा अदमास घेऊन तेवढ्या विक्रीसाठी ग्राहक आधीच शोधून ठेवणारा.

यात आर्थिक फटका बसण्याची संभाव्यता पहिल्या पर्यायापेक्षा बरीच कमी होते. त्याचबरोबर उपभोगाचा कालावधीही कमी होत असतो. अर्थकारणाच्या भाषेत याला ट्रेड-ऑफ (trade-off) म्हणतात. पुढे गुंतवणुकीचा विचार करत असताना याला पुन्हा एकवार सामोरे जावे लागते. अधिक धोका पत्करल्यास अधिक फायदा पण त्याचबरोबर अधिक तोट्याची संभाव्यता वाढते. उलट बचतीच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले, तर संभाव्य परतावाही कमी होत जातो. आहारामध्ये चमचमीत खाणे बहुधा आरोग्यास अपायकारक होत जाते, तर आरोग्यदायक खाणे बहुधा चवीच्या बाबतीत फारसे लोकप्रिय होत नसते, तसेच हे ही. चव आणि आरोग्य या जशा व्यस्तप्रमाणात वाढणार्‍या बाबी आहेत, तसेच आर्थिक सुरक्षा आणि गुंतवणूक परतावा याही. तुमच्या आर्थिक नि मानसिक कुवतीनुसार तुम्हाला स्वत:साठी यांची विभागणी कशी असावी याचा निर्णय करावा लागतो.

दोनही पर्यायांमध्ये आयुष्याच्या सुरुवातीला खर्च नि बचत यांचे गुणोत्तार कालानुरूप बदलत जात असते. पहिल्या पर्यायामध्ये सुरुवातीच्या काळात ते खर्चाला अनुकूल असते तर दुसर्‍यामध्ये बचतीला. जसजसे काळ जातो तसतसे त्यांची दिशा बदलत जाऊन उलट होत असते. अगदी सुरुवातीला या गणिताला सामोर जायचे नसेल तर एक ढोबळ निर्णय म्हणून उत्पन्नाचे सरळ दोन सारखे भाग करुन वर्तमान आणि भविष्यकालीन खर्चाला नेमून द्यावेत.

Golden Budget Rule अथवा ५-३-२ चा नियम

MagicDistribution

आपल्या उत्पन्नापैकी किती टक्के खर्च नि किती बचत करावी यासाठी अनेक ठिकाणी एक जादूचे गुणोत्तर सांगितले जाते. यात असे म्हणतात की तुमच्या उत्पन्नाचे ५०%, ३०% आणि २०% असे तीन भाग करा. यातील पहिला नियमित वा गरजांशी निगडित खर्चांसाठी ठेवा. दुसरा चैनीसारख्या वरकड खर्चांसाठी नेमून द्या आणि उरलेला २०% भाग हा बचत म्हणून राखून ठेवावा. माझ्या मते हा नियम अजिबात पाळू नये!

ढोबळ नियम म्हटला तरीही यात चुकीची गृहितके आहेत. एकच विभागणी-नियम सर्व वयोगटाच्या, सर्व आर्थिक गटांच्या, सर्व सामाजिक परिस्थितीमधल्या व्यक्तींना लागू पडेल असे तो समजतो. अगदी टक्केवारीच्या दृष्टीने पाहिले तरी हे पटणारे नाही. नुकत्याच कमावत्या झालेल्या व्यक्तीसाठी, कुटुंबवत्सल मध्यमवयीन व्यक्तीसाठी आणि कौटुंबिक गरजा पुर्‍या होऊनही कमावत्या राहिलेल्या नववृद्धासाठी अशा सार्‍यांसाठी एकच नियम लागू पडत नाही. एखाद्या निम्नवर्गीयाला उत्पन्नाचा जितका हिस्सा गरजांवर खर्च करावा लागतो, तितकाच हिस्सा एखाद्या श्रीमंताला करावा लागतो हे पटणारे नाही. इथे आपण चैन आणि गरजा वेगळ्या मोजतो आहोत हे ध्यानात घ्या. उत्पन्न वाढेल तसे गरजांवरचे खर्च वाढवण्यास उद्युक्त करणारा हा नियम एकप्रकारे भांडवलशाहीच्या ’गरज नसेल तिथे निर्माण करा’ प्रवृत्तीला चालना देणारा आहे.

बचतीसाठी उत्पन्नातील सर्वात कमी हिस्सा ठेवणे हे अमेरिकेसारख्या सोशल सिक्युरिटी असणार्‍या देशातच शक्य आहे. कदाचित त्यामुळेच या नियमामध्ये बचत हा भाग केवळ वृद्धापकाळीचा खर्च एवढ्या एकाच उद्देशाने केलेला दिसतो. गरज, चैन आणि वृद्धापकाळासाठी तरतूद या तीनही संकल्पना या दोन समाजात वेगवेगळ्या प्रकारे पाहिल्या जात असतात. मी बचत ही देखील भविष्यकालीन खर्चासाठी केलेली तरतूद म्हणूनच पाहात असतो. त्यामुळे तिला ढोबळमानाने वृद्धापकाळाची तरतूद म्हणू शकत नाही. त्या काळच्या गरजा नि चैन यांची सांगड मी त्या तरतुदीशी घालत असतो.

भारतामध्ये वृद्धापकाळ हा बव्हंशी कार्यक्षम काळातील बचतीच्या आधारेच व्यतीत केला जात असतो. त्यासाठी सुरवातीपासून बचत नि गुंतवणूक करणे आवश्यक असते. शिवाय भारतीय समाजात केवळ स्वत:च्याच नव्हे तर आई-वडिलांच्या वृद्धापकाळातील खर्चाचा विचारही नियोजनात समाविष्ट असावा लागतो. त्याचबरोबर उलट दिशेने मुलेही तुलनेने अधिक वर्षे आई-वडीलांवर अवलंबून असतात. त्यामुळे उत्पन्नाचा केवळ पाचवा हिस्सा बचतीसाठी पुरेसा ठरण्याची शक्यता फार कमी आहे.

मुळात हा नियम आधी वाटणी करुन मग त्यात खर्चांचा विचार करतो. भारतीय दृष्टीने आपण प्रथम गरजा, त्यांसाठी लागणारा खर्च, त्यांसाठी बचत या क्रमाने खालून वर जात असतो. खर्च नेमका कशासाठी आहे, त्याला किती आर्थिक तरतुदीची गरज आहे आणि मुख्य म्हणजे ती करण्यासाठी किती काळ हाती आहे हे आधी पाहावे लागते. आपल्या उत्पन्नाच्या (बदलाच्या) दिशेचा विचार करता ते साध्य करण्याची संभाव्यता किती हे पडताळून पाहावे लागते. मग चैनीसाठी ३०% सोडाच कदाचित पाच टक्के रक्कमही उरणार नाही.

चैनीसाठी आधीच रक्कम राखून ठेवणे गृहित धरणारा हा नियम अमेरिकन अर्थकारणाचा वारसा आहे आणि भारतीय सामाजिक-आर्थिक संदर्भात तो स्वीकारणे चूकच नव्हे, तर कदाचित धोकादायकही ठरेल.

आर्थिक विचाराचे दोन दृष्टिकोन वर दिले आहेत. अधिक बारकाईने विचार करणारे आणखी काही पर्याय देऊ शकतील. उत्पन्नाची विभागणी विविध व्यक्तींसाठी, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि विविध सामाजिक, भौगोलिक तसेच आर्थिक पर्यावरणामध्ये वेगवेगळी असू शकते- नव्हे असायलाच हवी हे ध्यानात ठेवले तरी पुरे.

या वर्षातील खर्च आणि भविष्यातील खर्च (किंवा त्यासाठी केलेली बचत) या दोहोंचा वाटा निश्चित झाला की या दोन्हींचे अंदाजपत्रक तयार करायला हवे. आणि त्यासाठी दोनही प्रकारच्या गरजांची सूची तयार करुन त्यांचा प्राधान्यक्रम, अपेक्षित खर्च नि खर्चाचा काळ निश्चित करायला हवा. त्यासबंधी अधिक विवेचन पुढच्या भागात करु.

- oOo -

१. जवळच्या म्हटले तर किती जवळच्या. दोन, तीन, पाच की दहा? याला सोपे उत्तर नसते. त्याच्यासाठी वेगळे तंत्र आहे. पण तो या लेखमालेचा विषय नाही.

पुढील भाग >> (आगामी)


हे वाचले का?