सोमवार, ३१ जुलै, २०२३

बा कपिल देवा,

बा कपिल देवा,

तुम्हांसि नव्या पिढीतील खेळाडूंचे पैसे पाहून पोटात दुखते हे बरे नव्हे. उठसूठ आयपीएलच्या नावे खडे फोडताना या प्रकारच्या बाजारू खेळाचे उद्गाते आपणच आहोत हे विसरु नये. आयपीएलपूर्वी ’झी’च्या सुभाष चंद्रा यांनी चालू केलेल्या ’इंडियन क्रिकेट लीग’चे (ICL) पहिले सूत्रधार आपणच होतात हे लोक विसरले असतील असे समजू नये. आयपीएल वा पैशाच्या मागे लागणारे खेळाडू ही वाईट गोष्ट असेल तर त्याची पायाभरणी दस्तुरखुद्द आपणच केलेली आहे. वृथा नैतिकतेचा आव आणू नये.

याच आयपीएलमधून उभ्या केलेल्या पैशातून बीसीसीआयने घसघशीत पैशांची थैली आपल्या ओटीत घातली होती, तेव्हा दर्जेदार क्रिकेटचे रक्त आपल्या हाती लागले आहे असे तुम्हाला वाटले नसावे.

ICLTrophyAndKapil
२००७ साली ICL चे विजेतेपद मिळवणार्‍या चेन्नई सुपरस्टार्सचा कर्णधार स्टुअर्ट लॉ.
सोबत ICLचे अध्यक्ष कपिल देव.
espn.com येथून साभार.

मुळात पैसे मिळवणे हे अनैतिक आहे या बाष्कळ भारतीय समजातून बाहेर यावे. किंवा पैशापुढे खेळ दुय्यम मानतात असे समजणेही हास्यास्पद आहे. ज्या खेळाने त्यांना ओळख दिली, त्यातून त्यांच्याकडे पैसा चालत आला त्याच खेळाला दुय्यम लेखणे त्यांना परवडणारे नसते. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कापून खाल्ल्यासारखे असते ते. खेळाडूंना हे समजत नाही असा समज करुन घेणे आपल्या बुद्धीचा अहंकार दर्शवते.

तुम्ही, गावसकर, तेंडुलकर ते आजच्या विराट कोहलीपर्यंत मोजकेच असतात ज्यांना दीर्घ करियर मिळते. इतरांचे करियर जेमतेम पाच ते सात वर्षांचे असते. त्यातही अनेकदा खेळाडू संघात आत-बाहेर होत असतात. जाहिरातींसाठीही सार्‍यांनाच संधी मिळते असे नाही. त्यातून जगण्याला पुरेसे पैसे मिळवायचे असतात. भारतीय संघात जागा मिळणे जिकीरीचे असते. अशा वेळी बाहेर राहिलेल्या अनेक दर्जेदार खेळाडूंना आयपीएलने अधिक काळ खेळण्याची, पैसे मिळवण्याची संधी दिली आहे. यात वाईट काय आहे?

पैसेवाल्यांबद्दल असूया असणारे बिनडोक इथे ’टॅक्स पेअर्स मनी’ वगैरे भंपक गोष्टी आणून किरकिर करतात. त्यात तुम्ही तरी सामील होऊ नये. आयपीएलने पैसा वापरला त्याहून कैकपट निर्माणच केला आहे. गरीब देशांतून सेवा, पर्यटन आणि क्रीडा या तीन क्षेत्रांना चालना देण्याचा प्रयत्न असतो. यातून गुंतवणुकीच्या तुलनेत अनेकपट अधिक आणि वेगाने पैशाचा ओघ निर्माण होत असतो; अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते.

याच आयपीएलचा आदर्श समोर ठेवून आज फुटबॉल लीग, कबड्डी लीग, टेनिस लीग, टेबल टेनिस लीग, खो-खो लीग सुरू झाल्या आहेत. या कौशल्यप्रधान खेळांबरोबरच बुद्धिबळासारख्या बुद्धिप्रधान खेळाचीही लीग याच वर्षी सुरु झाली आहे. यातून अनेक खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. सांगलीमध्ये भाड्याच्या घरात राहणारा, सामान्य आर्थिक स्तरातील कुणी खेळाडू कबड्डी लीगमधून मिळालेल्या पैशाच्या आधाराने स्वत:चे घर बांधू शकला आहे. हे चांगलेच झाले, नाही का?

इतकेच नव्हे तर क्रिकेट नि कबड्डीमध्ये त्यांच्या सोबतीने महिला लीगही चालू झाल्या आहेत. क्रिकेटची आवड असणार्‍या मुलींना, तरुणींना आपली ती आवड जोपासण्यासाठी एक प्रेरणा, एक मोटिव्हेशन मिळते आहे आणि पुरुषप्रधान संस्कृतीची पकड घट्ट असणार्‍या समाजात ते एक दार मुलींसाठी उघडते आहे. हे चांगले की वाईट? असे असताना सतत असे ’द्राक्षे आंबट आहेत’ म्हणण्याने काय साधते?

१९८३चे आपण हीरो आहात. 'पराभूत होण्यासाठीच खेळणारा संघ' अशी ख्याती असलेल्या संघाला नवसंजीवनी देण्याचे काम तुम्ही केले. त्यातून क्रिकेट-विश्वात आपल्या मर्जीने सारे काही घडवणारी बीसीसीआय आज उभी राहिली आहे. त्याचे श्रेय तुम्हाला नि तेव्हाच्या तुमच्या संघाला आहेच. ८३ पूर्वी केवळ ऑल्सो रॅनचा घोडा असलेला संघ क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकाशी सतत झटे घेत असतो यात आपलाही वाटा आहे याचा अभिमान असायलाच हवा.

तुम्ही लावलेल्या झाडाला फळे येईतो ते खाण्यासाठी तुमच्याकडे दात उरले नाहीत ही निसर्गनियमाने घडलेली बाब आहे. भारतीय संघाच्या प्रत्येक अपयशाच्या वॆळी ’आमच्या वेळी कसं सगळं नैतिक होतं’ची पिपाणी वाजवणार्‍या किरकिर्‍या म्हातार्‍यासारखे वागून आपली शोभा करुन घेऊ नये. आपण लावलेल्या झाडावरील फळ नातवंडाच्या हातात पाहून आजोबाला असूया नव्हे, समाधान– आनंद वाटायला हवा.

- oOo -

संबंधित लेखन:

क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे काय?
सुरेख सामन्याचे विध्वंसक कवित्व
डकवर्थ-लुईस नियमावली आणि वृत्त-माध्यमे
क्रिकेट आणि टीकाकार


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा