सोमवार, १७ जुलै, २०२३

जम्पकट-७ : एकाधिकार ते विनिमय-व्यवहार

अजन्मा जन्मासि आला (उत्तरार्ध)<< मागील भाग
---

एकाधिकार

नागर आयुष्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या हा माणसाचा शेजार आहे. आपल्या मालकाबरोबर फिरायला आलेल्या पाळीव कुत्र्याने आपल्या अधिकारक्षेत्रात अतिक्रमण केल्याच्या भावनेतून त्याच्यावर खच्चून भुंकणार्‍या या टोळ्यांसोबत सहजीवन माणसाने स्वीकारले आहे. दोन प्रतिस्पर्धी शेजारी टोळ्यांमध्ये रात्री-अपरात्री भडकणार्‍या हद्दीच्या लढायांचे आपण जागृत(!) साक्षीदार असतो.

WolvesHowling
लांडग्यांचा समूहघोष

अधिकारक्षेत्राची निश्चिती आणि संरक्षण हा अतिप्राचीन काळापासून प्राणिजीवनाचा अविभाज्य भाग आहे. कुत्र्यांप्रमाणेच माकडांच्या, लांडग्यांच्या वा जंगली कुत्र्यांच्या टोळ्यांचे प्रदेश त्यांनी आखून घेतलेले असतात. वाघ-सिंहादी मार्जारकुलातील प्राण्यांमध्येही ही हद्दीची, अधिकारक्षेत्राची जाणीव पक्की असते. मूत्र-पिचकारीने आपल्या हद्दीच्या सीमा आखून वाघ/वाघीण अथवा सिंह आपल्या अधिकाराची द्वाही फिरवत असतात. त्यात प्रवेश करणार्‍या सजातीय प्राण्याला ’आपल्याशी गाठ आहे’चा इशारा देत असतात. ही एकाधिकाराची संकल्पना निसर्गात अनेक प्राण्यांमध्ये दिसते.

या प्राण्यांप्रमाणेच माणसाच्या टोळ्यांनी आपापले प्रदेश - बळाने ताब्यात ठेवून त्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर एकाधिकार प्रस्थापित केलेले होते. एका टोळीच्या हद्दीमध्ये अन्य टोळीने अथवा त्यातील व्यक्तीने शिकार करणे वा अन्न गोळा करणे हे संघर्षाला, लढाईला निमंत्रण देणारे असे. पुढे माणूस शेती करु लागला आणि हा अधिकार जमिनीवरच्या अधिकारात रूपांतरित झाला. माणूस नागरवस्ती करुन राहू लागल्यावरही गावाच्या सामायिक मालकीची- वहिवाटीची जमीन, पाणवठे राखले जाऊ लागले. टोळी ते गाव, समाज या स्थित्यंतरात या एकाधिकाराची व्याप्तीही अशी वाढत गेलेली आहे.

आता महानगरी जगामध्ये विविध वंशांची, धर्माची, वारशाची माणसे जरी मिळून मिसळून राहू लागली असली तरी त्यांच्यातील टोळीची मानसिकता कायम असते. यातून मग एकाच शहरामध्ये विविध जातिधर्मांच्या आपापल्या वस्त्या तयार होतात. एकाच लहान गावांतून वा शहरातून महानगरामध्ये स्थलांतरित झालेलेही बहुधा महानगराच्या एकाच भागात एकवटलेले दिसतात. मध्यंतरी लॉस-एंजल्स या हॉलिवूडसाठी प्रसिद्ध शहरावर 'गॅंगलॅंड' नावाचा एक माहितीपट पाहण्यात आला होता. त्यात या शहरातील निम्नवर्गीयांच्या वस्त्या या प्रामुख्याने युरपिय, आफ्रिकन आणि लॅटिन अशा तीन वंशाच्या आधारे वाटल्या गेल्या आहेत आणि एका वंशाची व्यक्ती चुकून दुसर्‍या वस्तीत गेलीच तर बहुधा तिचा मृतदेहच सापडतो असा दावा करण्यात आला होता.

एकुणात (अन्नासाठी) जमिनीवरचा, पाणवठ्यावरचा(१) आणि (देहभोगासाठी) मादीवरचा- या तीन एकाधिकारांसाठी प्राणिजीवनामध्ये सातत्याने संघर्ष होत असतो.

मालकी संकल्पनेचा उदय

हे सारे अधिकार हे एका टोळीचे, गटाचे, समाजाचे सामायिक अधिकार आहेत. यात वैय्यक्तिक अधिकाराची वा मालकी हक्काची संकल्पना नाही. टोळीमध्ये नैसर्गिक गोष्टींपलिकडे प्राथमिक स्वरूपातील भाले, धनुष्य-बाण अथवा सुरे यांसारखी हत्यारे हीच संपत्ती म्हणावीत अशी. ती सार्‍या टोळीच्या मालकीची. आज नागर वस्तीमध्ये एखाद्या हाऊसिंग सोसायटीमध्ये एक जमिनीचा तुकडा काही जणांनी मिळून स्थापन केलेल्या हाऊसिंग सोसायटीच्या मालकीचा असतो. मग त्यावर बांधलेल्या इमारतीमधील फ्लॅट्सच्या वापराचे एकाधिकार ती आपल्या सदस्यांना देऊ करते.

त्याचप्रमाणे तेव्हाही विशिष्ट हत्यार हे विशिष्ट व्यक्तीने वापरावे हा संकेत असेलच. पण स्वामित्वाची, मालकीची भावना नसावी. आज खासगी मालकीची संकल्पना मानवी समाजाचा अविभाज्यच नव्हे तर मुख्य भाग झालेली असतानाही एका व्यक्तीची वस्तू इतर कुणाला तात्पुरत्या वापरासाठी सहजपणे हस्तांतरित होऊ शकते. यावरून त्याकाळातही तो प्रघात असावा असे समजण्यास हरकत नसावी.

परंतु टोळीअंतर्गत व्यक्तिविशिष्ट एकाधिकाराची सुरुवात ही एकास-एक नर-मादीची जोडी निश्चित होऊ लागल्यावर झाली असावी. ’लुलू ही ’पश्चिम वारा’ या टोळी-सदस्याची मादी आहे. तिच्याशी जुगण्याचा अधिकार टोळीतील इतर कुणालाही नाही.’ असा दंडक घालून देण्यात आला असेल. त्यापूर्वी जमिनीवरील अधिकारासाठी होणार्‍या संघर्षाप्रमाणेच मादीशी जुगण्याच्या अधिकारासाठीचे संघर्ष- अन्य प्राण्यांमध्ये असतात तसे- होत असणार. ते टाळण्यासाठी शोधलेल्या या उपायातून स्त्रीचे असे वस्तुकरण होण्याची सुरुवात झाली असावी.

उपभोग ते उत्पादन

जमिनीवरील ’नैसर्गिक संपत्तीवरील हक्का’ची जागा शेतीच्या शोधानंतर ’जमिनीवरील हक्का’ने घेतली. आजच्या भाषेत सांगायचे तर याआधी जो अधिकार होता तो वहिवाटीचा, उपभोगाचा होता. जमिनीवरील हक्काने त्याला उत्पादन-अधिकारामध्ये रूपांतरित केले. मादीच्या ठायी फक्त आपलेच मूल जन्माला घालण्याच्या एकाधिकाराशी याची तुलना करता येईल. त्यामुळे अनेक पौराणिक कथांमधून स्त्रियांचा उल्लेख भूमी म्हणून केला जातो. एक सजीव, स्वतंत्र व्यक्ती नव्हे तर मूल जन्माला घालणारी भूमी म्हणूनच तिच्याकडे पाहिले जात असे. विशेष म्हणजे या भूमीनेच शेतीची मुहूर्तमेढ रोवली नि अन्न-संपादनादरम्यान होणार्‍या जीवघेण्या संघर्षांपासून पुरुषांना बव्हंशी मुक्त केले.

EarlyHuman

केवळ शेती-उत्पादनाच्याच बाबत नव्हे माणसाने अगदी मानवी संस्कृतीच्या उदयकालापासून आपल्या निर्मितीक्षमतेचा वापर केला आहे. प्राणीवर्गातील सजीव निसर्गात नसलेले काहीही कृत्रिमरित्या निर्माण करत नाहीत. परंतु त्याच कुलातील माणूस मात्र त्याबाबतीत पक्षी आणि कीटक यांच्याप्रमाणे निर्मितीक्षम आहे. अगदी शिकारजीवी माणूसही शिकारीपासून केवळ अन्न मिळवून थांबला नाही. हाडांपासून हत्यारे, आभूषणे तर कातड्यापासून अंग झाकणारी प्रावरणे, झाडाच्या फांद्यांपासून धनुष्य, बाण, भाले आदि हत्यारे इत्यादि गोष्टी तो अगदी आदिम काळापासून तयार करत आलेला आहे. दगडांची चकमक झाडून स्वत:चा अग्नि निर्माण करणारा पहिला प्राणीही माणूसच. यातून माणूस केवळ उपभोक्ता न राहता उत्पादकही झालेला होता.

पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे टोळीमध्ये विविध व्यक्तींना विशिष्ट कामे नेमून दिलेली असत. त्यातून उत्पादक कामे करणारे नेमाने एकच काम करत असल्याने त्यातून विशिष्ट कौशल्याचा - तज्ज्ञ संकल्पनेचा - उदय झाला. त्यातून त्या कामात अधिक सफाई येऊ लागली, कामाचा वेगही वाढला. मग टोळीच्या गरजेपुरते उत्पादन करूनही त्या व्यक्तीकडे वेळ नि ऊर्जा शिल्लक राहू लागली असेल. यातून ते विशिष्ट कौशल्य असलेली व्यक्ती वा कुटुंब काही काळ निष्क्रिय राहण्याची समस्याही निर्माण झाली असेल. त्या व्यक्तीला अन्नातील वाटा मिळायचा असेल तर तिचा वेळही पुरेपूर वापरून घेता यायला हवा. मग पुरेसा कच्चा माल उपलब्ध होत राहिला तर त्या व्यक्तीकडून टोळीला गरज भागवून अतिरिक्त उत्पादन होऊ लागले असेल. आता या उत्पादनांचे काय करायचे हा प्रश्न एकीकडे उपस्थित झाला असेल. आणि म्हणून टोळीची गरज भागवून शिल्लक राहिलेल्या उत्पादनाचा विनियोग करण्याचा विचार करणे आवश्यक होऊन बसले असेल.

विनिमय

विविध टोळ्यांनी आपापले अधिकारक्षेत्र राखलेले असे. या परिसरांची पर्यावरणीय स्थिती आणि पर्यायाने उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचे स्वरूपही वेगवेगळे असे. यातून काही टोळ्यांना भरपूर उपलब्ध असलेल्या गोष्टींचे अन्य टोळ्यांकडे दुर्भिक्ष्य असे. उदा. कुरणांच्या प्रदेशात वस्ती करून असलेल्या टोळीला शिकार सहजी उपलब्ध असे. शिवाय पशुपालकांना गवतही. याउलट जंगलांच्या प्रदेशात औषधी वनस्पती, तर डोंगरउतारांच्या प्रदेशामध्ये शुद्ध पाण्याचे स्रोत. याखेरीज प्रत्येक प्रदेशात उपलब्ध असणारे भक्ष्य प्राणी वेगवेगळे होते, तसेच त्या परिसंस्थेमध्ये ज्याची शेती करणे शक्य आहे अशी पिकेही. त्यामुळे अर्थातच त्या-त्या टोळीच्या जगण्यावर परिसरघटकांचा मोठा प्रभाव असे.

माणसाची जिज्ञासा, उपभोगक्षमता विस्तारली तसतशी इतर टोळ्यांकडे असणार्‍या उत्पादित वस्तूंची उपयुक्तताही या टोळ्यांमधील व्यक्तींना खुणावू लागली असेल. त्यावर आपलाही अधिकार असायला हवा अशी ईर्षा त्यांच्या मनात निर्माण झाली असेल. यावर सुरुवातीचा सोपा उपाय म्हणजे शेजारी टोळीच्या परिसरात घुसून हवा तो कच्चा माल हिसकावून आणणे; किंवा मानवी उत्पादन असेल तर त्या टोळीशी संघर्ष करून ते लुटून आणणे. ही लूट नंतर टोळीच्या सदस्यांना उपभोगासाठी उपलब्ध होत असे. पुढे टोळीतील मर्यादित राजकीय सत्ता राज्यसत्तेमध्ये परिवर्तित झाली तेव्हा या लुटींना - भारतात - यज्ञयागादी धार्मिक अधिष्ठाने मिळाली. जित राज्याकडून लुटून आणलेली संपत्ती राजा याद्वारे आपल्या प्रजाजनांमध्ये वाटून देऊ लागला.

परंतु या लुटीच्या झटापटीमध्ये दोन्हीं बाजूंचे नुकसान होई. अनेकदा हा प्रयत्न अयशस्वीही ठरत असेल. तसंच उलट दिशेने ती टोळीही काही गोष्टींसाठी या टोळीच्या क्षेत्रात शिरून संघर्ष उभा करत असे. त्यापेक्षा एकमेकांना आवश्यक असणार्‍या वस्तूंची देवाणघेवाण केली तर संघर्ष टाळून दोन्हीं बाजूंना हवे ते मिळवता येईल हे प्रगत बुद्धीच्या माणसाच्या लक्षात आले असेल. एका टोळीअंतर्गत विविध कामे करणारे आपापल्या सेवा वा उत्पादने टोळीला देऊ करुन त्या बदल्यात अन्नाची आणि संरक्षणाची हमी मिळवत. त्याच संकल्पनेचा विस्तार करुन ही विनिमयाची संकल्पना उदयाला आली.

विनिमय ते विक्री

विनिमयाची ही कल्पना प्राथमिक स्वरूपात शाळकरी मुलांमध्ये आजही पाहता येते. अगदी महानगरी नि उच्चभ्रू मुले सोडली तर बहुतेक मुलांमध्ये काही ना काही वस्तू जमवण्याचे वेड असते. यात स्टॅंप, स्टिकर्स; लहान शहर/गाव असेल तर विविध झाडांच्या बिया, खेळण्याच्या गोट्या आदी गोष्टी मुले जमवत असतात. यात काहीवेळा असे होते की विशिष्ट प्रकारचे स्टिकर्स/स्टॅंप्स दुर्मीळ असतात. मग ज्याच्याकडे ते एकाहुन जास्त आहेत तो त्यांच्या बदल्यात त्याच्याकडे नसलेले परंतु तुलनेने सहज उपलब्ध असणार्‍या एकाहुन अधिक स्टॅंप्सची मागणी करत असतो. शाळकरी मुलांकडे रोख पैसा असण्याची शक्यता फारच कमी असते. त्यामुळे त्यांच्यातील या व्यवहारामार्फत त्या शाळकरी वयामध्येच विनिमयाची संकल्पना रुजण्यास सुरुवात झालेली असते.

Barter

देवाणघेवाण करणे तत्त्वत: मान्य केले तरी ती प्रक्रिया इतकी सोपी नव्हती. दोन भिन्न वस्तू वा पदार्थांची देवाणघेवाण करताना ती ’वाजवी’ आहे हे निश्चित करण्याचे कोणतेही वस्तुनिष्ठ मोजमाप तेव्हा अस्तित्वात नव्हते. उदाहरणार्थ हत्तीच्या एका सुळ्याच्या बदल्यामध्ये समोरच्या टोळीने लांडग्यांची किती नखे द्यावीत किंवा उन्हाळ्यात पाणवठा आटलेल्या भागातील टोळीने अन्य टोळीच्या पाणवठ्यावरुन पाणी नेण्याचा अधिकार मिळावा म्हणून किती भारे गवत द्यावे हे ठरवणे जिकीरीचे होते. आजच्या भाषेत सांगायचे तर या दोनही वस्तूंचा- वा अधिकारांचा वाजवी दर ठरवताना दोनही बाजूंचे एकमत होणे महत्त्वाचे होते. ते होऊ शकले नाही तर पुन्हा त्या दरावरून नव्या संघर्षाची उभारणी व्हायची.

ही देवाणघेवाण, हा वस्तु-विनिमय हा बव्हंशी द्विपक्षीय कारभार असे. यात हस्तांतरित होणार्‍या वस्तू वा अधिकाराचे वाजवी मूल्य या संकल्पनेचा उदय अद्याप व्हायचा होता. तिची किंमतच काय ती दोन्हीं बाजूंकडून मान्य केलेली असे. ती तेवढ्या व्यवहारापुरतीच निश्चित केलेली असे. तिसर्‍या एखाद्या वस्तूसंदर्भात या दोहोंची किंमत तेवढीच राहील याची शाश्वती नव्हती. थोडक्यात वस्तूचे निरपेक्ष मूल्य ही संकल्पना अद्याप निर्माण झालेली नव्हती.

त्याचबरोबर विनिमययोग्य वस्तूंची, सेवांची संख्या जसजशी वाढत गेली तसतसे ही एकास-एक वस्तूंचे विनिमय दर ठरवणे अधिकाधिक जिकीरीचे होत गेले. त्यामुळे या सार्‍यांचीच किंमत एक वा मोजक्या वस्तूंच्या संदर्भातच ठरवण्याचा प्रघात पडू लागला असेल. देवाणघेवाण करण्याच्या दोन्ही वस्तूंचे मूल्य या मध्यस्थ वस्तूमार्फत निश्चित केले की त्या व्यवहाराचे मूल्यमापन नि आकलन सोपे होऊ लागले. या प्रमाणीकरणाच्या खटाटोपातून पुढे ’चलन’ ही संकल्पना निर्माण झाली.

चलन

आज मानवी व्यवहाराचा अविभाज्य भाग असलेल्या चलनाच्या संकल्पनेच्या उदयाच्या फार आधी माणसाने अस्तित्व(१) आणि नास्तित्व(०) या संकल्पनांच्या विस्तारातून अंकांची निर्मिती केली. त्यांच्या आधारे मोजणी करण्याचे कौशल्य आत्मसात केले. आता ’गुहेसमोर दोन झाडे आहेत’, ’जमिनीवर दोन भाले आहेत’ ही वस्तू-समूहांतील साम्य दर्शवणारी विधाने तो ’दोन’ या आकड्याद्वारे करु शकत होता. दोन वस्तूंच्या निरपेक्ष अशी ही अंकांची संकल्पना दोन्हींच्या मोजमापाला सामायिक एकक देऊ करत होती. हीच सामायिक एककाची संकल्पना वस्तू-विनिमयाच्या सोयीसाठी वापरली गेली आणि त्यातून चलनाची संकल्पना उभी राहिली.

पण वस्तूंची मोजणी करणारे एकक आणि तिच्या किंमतीचे एकक (चलन) यात महत्त्वाचा फरक होता. मोजणीची संकल्पना एकदा आत्मसात केली की त्याबाबत दुमत होणे शक्य नव्हते. अस्तित्वातील दोन वस्तूंची मोजणी ही कोणत्याही टोळीमध्ये दोन म्हणूनच होत होती. शिवाय तिच्यावर कोण्याही टोळीचा एकाधिकार असू शकत नव्हता. ती सर्वस्वी अमूर्त अशी संकल्पना होती.

याउलट चलन हे मूर्त होते. हत्तीच्या एका दाताची किंमत आणि एका वाघनखाची किंमत या सामायिक चलनाद्वारे स्वतंत्रपणे निश्चित केले की एका हत्ती-दाताच्या बदल्यात किती वाघनखे (वा उलट) ठरवणे सोपे जाई. वर म्हटले तसे ही संकल्पना माणसाला अंकमोजणीची कला आत्मसात केल्यानंतरच प्रत्यक्षात येऊ शकली. आता ही किंमत ज्या आधारभूत वस्तूच्या आधारे ठरवायची, ती वस्तूही मूर्त असायला हवी. त्याहून महत्वाचे म्हणजे ती सहजपणे नष्ट होणारी असता कामा नये. आणि ती ही उपभोग्य वा उपयुक्त असायला हवी. या संकल्पनेचा विस्तार होत मानवी जीवनाच्या प्रवासात बरेच पुढे सोने हे आधारभूत चलन म्हणून वापरले जाऊ लागले.

Currencies
मानवी इतिहासात वापरली गेलेली ’चलने’

चलन म्हणून वापरली जाणारी वस्तू जर स्वत:च मूर्त असेल तर तिचीच देवाणघेवाण करणेही शक्य होते. यातून आणखी एक संकल्पना उदयाला आली ती म्हणजे ’वायद्याची’. उदाहरणार्थ, तीव्र उन्हाळ्याच्या काळात पाणवठा आटलेल्या टोळीला अन्य टोळीच्या पाणवठ्यावरून पाणी नेण्याचा तात्पुरता अधिकार हवा आहे. परंतु त्या बदल्यात त्या टोळीला या टोळीच्या अधिकारक्षेत्रातील काही फळे हवी आहेत. परंतु त्या फळांचा मोसम नसेल तर हा व्यवहार पुरा होणे अवघड. परंतु यावर तोड म्हणून पाणवठ्यावरील हक्कासाठी त्या 'देय फळांच्या किंमतीइतके चलन’ ही टोळी तारणाप्रमाणे देऊ करते. मग फळांचा मोसम आल्यावर कबूल केल्याइतकी फळे देऊ करुन आपले चलन सोडवून नेऊ शके.

हा व्यवहार वायद्याचा असला, तरी हेच चलन अन्य तिसर्‍या टोळीसोबतच्या व्यवहारासही मान्य असेल तर ते परस्पर तिसर्‍या टोळीस देऊन कदाचित तिसरीच वस्तू ती पाणवठावाली टोळी घेऊ शकत असे. यातून अंकांप्रमाणेच चलनही टोळ्यांच्या सीमा लंघून हातपाय पसरू लागले. आता वायद्याचा व्यवहार हा सरळ-सरळ खरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये रूपांतरित झाला.

निव्वळ टोळीजीवनाच्या काळात हे सारेच अत्यंत प्राथमिक पातळीवरचे होते नि त्याचे प्रमाणही अल्पच असेल. परंतु मानवाने शेती आणि पशुपालनाच्या आधारे उत्पादन आणि उपभोगांच्या गरजा अनेकपट वाढवल्या आणि वायदे, विक्री आदि व्यवहार अधिक संख्येने होऊ लागले. गरजेच्या वस्तूंचे उत्पादन करण्याऐवजी त्यातील काहींसाठी माणूस सरळ खरेदीवर अवलंबून राहू लागला. यातून विनिमयाऐवजी खरेदी-विक्रीला प्राधान्य मिळू लागले आणि बाजार नावाची संकल्पना उदयाला आली.

प्राथमिक अवस्थेमध्ये सामायिक मोजमाप इतकेच महत्त्व असलेले चलन आज अमूर्ततेकडे झुकले आहे. आज जगभरात मूठभर चलनांच्या साहाय्याने व्यवहार होतो आहे. प्रत्येक चलनाला एक-एक राज्यव्यवस्था जामीन असते. पूर्वी टोळ्यांमधील विनिमयाला ज्याप्रमाणे द्विपक्षीय देवाणघेवाणीचे स्वरूप असे तसेच आजही दोन राज्यव्यवस्थांमध्ये असते. दोहोंच्या चलनांमधला विनिमय दर निश्चित केला की त्याआधारे त्या दोन राज्यांमध्ये विनिमय होणार्‍या सर्वच वस्तूंचा विनिमय-दर अनायासे निश्चित होऊन जातो. भांडवलशाहीच्या उदयानंतर ही विनिमय-दर निश्चितीची प्रक्रिया राज्यव्यवस्थेच्या हातून बाजारव्यवस्थेकडे हस्तांतरित झाली आहे.

चलनाची संकल्पना मानवी जीवनप्रवासातील सर्वाधिक क्रांतिकारी संकल्पना आहे. त्यातून केवळ विनिमयच सुकर झाला असा नव्हे तर तिने मानवी जीवन आमूलाग्र बदलून टाकले आहे.

संग्रह आणि संपत्ती

चलन नव्हते तेव्हा एखादी व्यक्ती उपभोग्य वस्तू गरजेहून फार अधिक साठवून ठेवू शकत नव्हती, कारण त्या बव्हंशी नाशवंत होत्या. त्यामुळे संग्रहित अन्न-पदार्थ, उत्पादित वस्तू यांची सर्व टोळीसदस्यांना पुरेशी उपलब्धता असे. याखेरीज वैय्यक्तिक मालकी हक्काची संकल्पना नव्हती. टोळीच्या अधिकारक्षेत्रातील सर्व उपभोग्य गोष्टी या टोळीतील सर्वांसाठी उपलब्ध होत्या.

ScroogeInHisMoneyPit
पैशाच्या राशीवर खेळणारा ’डिस्ने’च्या ’डकटेल्स’ या मालिकेतील धनाढ्य कंजूस 'स्क्रूज मॅक्‌डक'.

परंतु चलन ही संकल्पना उदयाला आल्यावर ही परिस्थिती बदलली. नाशवंत गोष्टींना चलनासारख्या दीर्घजीवी वस्तूंमध्ये रूपांतरित करुन दीर्घकाळ साठवून ठेवणे शक्य झाले. अन्य गोष्टींची गरज निर्माण होताच ही चलन-वस्तू देऊन आवश्यक त्या वस्तू मिळवता येत असल्याने हळूहळू उपभोग्य वस्तूंपेक्षाही माणसाला चलनाचे महत्त्व अधिक वाटू लागले. त्यातून चलन-संग्रहाची आस वाढू लागली आणि ’संपत्ती’ची संकल्पना निर्माण झाली.

प्राथमिक अवस्थेमध्ये वस्तु-विनिमय, नंतर खरेदी-विक्री, संपत्ती-साठवण एवढेच चलनाचे महत्त्व नाही. टोळीजीवनात वस्तू वहिवाटीच्या अधिकाराने मिळत होत्या. आता त्या विकत घेणे भाग पडले. त्यासाठी चलन आवश्यक ठरले. ते नसेल तर माणसाच्या गरजा भागवणे त्याला दुरापास्त होऊ लागले. मग ते कमावण्यासाठी रोजगार या संकल्पनेला चालना मिळाली... आणि बेरोजगारी नि उपासमारही वाढू लागलीचलनाने वायदा (credit), कर्ज (loan) यांच्यासोबतच भूकबळी, आर्थिक-विषमता यांनाही जन्म दिला(२).

नागरी जीवनाकडे

आज माणूस नागरी जीवनामध्ये बव्हंशी स्थिर होताना वर उल्लेख केलेल्या तीन प्रमुख अधिकारांपैकी जमिनीवरचा अधिकार हा देश या संकल्पनेद्वारे निश्चित केला जातो. देश ही राज्यव्यवस्था मानून त्यातील व्यवहारांचे नियमन टोळीअंतर्गत नीतिनियमांप्रमाणॆ केले जाते आहे. देशाची व्यवस्था देशाच्या नागरिकांना विविध अधिकार बहाल करत असते नि त्याचबरोबर काही कर्तव्येही नेमून देत असते. विवाहसंस्थाही स्थिर झाल्याने एकास-एक नर-मादी ही व्यवस्था बव्हंशी मान्य केली गेली आहे. विवाहबाह्य संबंध हा बहुसंख्य देशांच्या नि धर्मांच्या कायद्यामध्ये निषिद्धच नव्हे तर दंडनीय मानला जातो.

इतर सर्व उपभोग्य गोष्टींचे खासगी संपत्तीमध्ये रूपांतर झालेले असले तरी पाणवठ्यावरचा अधिकार हा आजही सामायिकच आहे. पाणी हे सर्व जीवमात्रांच्या अस्तित्वाचा मूलाधार असल्याने त्याच्या स्रोतांवर राज्यसंस्थेचा एकाधिकार असतो. आपल्या सर्व नागरिकांना ते पुरवणे हे तिचे कर्तव्य मानले जाते.

अन्नासह इतर सर्व उपभोग्य वस्तू या संपूर्णपणे खासगी मालकीच्या अधिकारात आलेल्या आहेत. ही खासगी मालकी वैय्यक्तिक न होता टोळीप्रमाणे गटाची अथवा समूहांची असू शकते. (हाऊसिंग सोसायटीचे वर दिलेले उदाहरण पाहा.) पण हे समूह जन्मदत्त असावेत अशी गरज उरलेली नाही. काही माणसे एकत्र येऊन एक गट स्थापन करुन त्याद्वारे आपली गरज एकत्रितपणे भागवण्याचे नियोजन करु शकतात. मग ते विक्रीयोग्य वस्तूंचे उत्पादन असो, वस्तीचा वा वहिवाटीचा सामूहिक हक्क असो की विशिष्ट प्रकारच्या (उदा. वीजपुरवठा, शिक्षण) सेवेचा अधिकार असो, समूहाने अपेक्षित कार्य अनेकदा अधिक सहजतेने साध्य होते यावर माणसाचा विश्वास अजूनही टिकून आहे.

पण यातही अनेकदा जात, धर्म, विशिष्ट शिक्षणसंस्था आदि पूर्वनिश्चित समूहगट सोबत काम करताना दिसतात. कारण यात व्यवहाराला तो समाजगट अप्रत्यक्षरित्या जामीन असतो. व्यवहारातील फसवणूक ही सामाजिक पत घसरण्यास कारणीभूत होत असल्याने व्यवहारांमध्ये हेतुत: परस्परांच्या अधिकारांचा अपहार होण्याची शक्यता कमी होते. अर्थकारणाच्या अभ्यासात या संघभावनेला ’सोशल कॅपिटल’ या नावाने सामावून घेतले आहे. टोळीजीवनापासून सुरू झालेला प्रवास अजूनही तिचे बोट न सोडता चालला आहे.

- oOo -

टीपा:
(१) ’लॉरेन्स ऑफ अरेबिया’ चित्रपटामध्ये पाण्यासाठी झालेल्या हत्येच्या प्रसंगाचा उल्लेख या मालिकेच्या दुसर्‍या भागात आलेला आहे.
(२) ’ऑल हेल किंग ज्युलियन’ नावाच्या एका चलच्चित्रमालिकेमध्ये "Gimme Gimme Gimme: The Game" या भागामध्ये आणि अलीकडेच येऊन गेलेल्या Asterix and Obelix: Mansion of the Gods या चलच्चित्रपटात हा सारा प्रवास सुरेख चित्रित केला आहे.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा