शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३

कविचा वडा

BusyEating
https://pixers.hk/ येथून साभार.
“डोंगराला आग लागलेली आहे...
डोंगराला आग लागलेली आहे,
आणि तू बटाटेवडा खातो आहेस...?”

कविता सादर करणार्‍या कविने 
माझ्याकडे बोट दाखवले. 
मी दचकलो! 

बटाटेवडा निसटून चटणीमध्ये... 
आणि ड्रग्जचा व्हावा तसा 
मला चटणीचा ओव्हरडोस 

“... याला तूच जबाबदार आहेस!”
ऐकणार्‍या चार जणांकडे फिरवून  
कविने बोट माझ्यावर रोखले.

“पण मी कुठे लावली ती आग?” 
मी वड्यापासून तिखट चटणी 
निपटून काढत विचारले.

“पण ती लागताक्षणीच 
विझवायला धावलाही नाहीस तू.” 
कविने डोळे वटारत म्हटले.

“तू तरी कुठे विझवायला गेलास?” 
मी हेत्वारोप कम व्हॉटअबाऊटरी 
असा दुहेरी राष्ट्रीय तर्क अनुसरला.

“पण मी कवी आहे 
आणि कविता वाचतो आहे.” 
कवी छाती फुगवून म्हणाला.

“मी ही खादाड आहे 
आणि बटाटेवडा खातो आहे.” 
मी कवितेचे पुस्तक मिटले.

- रमताराम

- oOo -
	

हे वाचले का?

सोमवार, २४ एप्रिल, २०२३

ह्याला भाजप आवडत नाही... (ऊर्फ इलेक्शनचा ’गारवा’)

(’ कुण्या एकाची सत्तागाथा’ या ’राजकीय विरहगीता’नंतर त्याच दोन मित्रांच्या राजकीय जीवनातील एक टप्पा.)

DepressedDevendra
(कवि सौमित्र यांची क्षमा मागून...)

ह्याला भाजप आवडत नाही, त्याला भाजप आवडतो.
निकाल हाती आल्यावर हा त्याच्या तावडीत सापडतो.

’मी तुला आवडतो, पण भाजप आवडत नाही,
असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही.’

’भाजप म्हणजे चिखल सारा, एक तू सुदृढ कमळ.’
’भाजप म्हणजे हुकमी सत्ता, अमित किती प्रेमळ.’

’भाजप नंतर दगा देतो, भाजप दगाबाजी’  
’भाजप म्हणजे वॉशिंग-मशीन, भाजप तरती होडी.’

’भाजप म्हणजे मुरगळल्या माना, भाजप म्हणजे मुकी वरात.’
’भाजपमध्ये, तपासातून सुटून, मन होऊन बसतं निवांत.'

जेव्हा जेव्हा इलेक्शन येते, दरवेळी असं होतं
सरकारवरून भांडण होऊन, लोकांमध्ये हसं होतं
भाजप आवडत नसला, तरी तो ह्याला आवडतो
भाजपसकट आवडावा तो, म्हणून तो ही झगडतो.
रूसून मग तो निघून जातो, झुरत राहतो पक्षात.
ह्याचं त्याचं भांडण असं इलेक्शनच्या दिवसात.

- सन्मित्र

- oOo -
	

हे वाचले का?

गुरुवार, २० एप्रिल, २०२३

जम्पकट - ४ : कुटुंबव्यवस्था आणि वारसा

टोळी ते समाज आणि माणूस<< मागील भाग
---

खाण तशी माती, झाड तशी कैरी

जी. ए. कुलकर्णींच्या ’बखर बिम्म’ची मध्ये बिम्म आंब्याच्या झाडाला विचारतो की, ’तुझ्या झाडाला आंबेच का लागतात?’ त्या प्रश्नाला झाडाने दिलेले उत्तर मार्मिक आहे. ते म्हणते, ’असेच काही नाही. माझ्या झाडाला संत्री, मोसंबी, सफरचंदे, केळी अशीही फळे लागतात. पण ती सर्व कैरीसारखीच दिसतात.’

LikeFatherLikeSon

तीन-चार वर्षे वयाच्या बिम्मची जिज्ञासू बुद्धी ज्या पातळीवर असते, त्याच पातळीवर टोळीमानवाचीही असावी. एखाद्या फळातून निघालेली बी रुजली तर त्यातून आलेल्या झाडाला परत तेच फळ येते, तसेच माणसाचे मूल हे माणसासारखेच असते हे त्याला समजत होते. अनुवांशिकतेचे वैज्ञानिक कोडे उकलण्यास अजून कित्येक सहस्रकांचा अवकाश असला, तरी निव्वळ निरीक्षणाच्या पातळीवर ती नोंद घेतली जात होती.

माणूस प्राणिजीवनातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर होता, तेव्हा नर-मादी संबंध हे देहभोगाच्या पातळीवरच होते. त्याचा मूल होण्याशी असलेला संबंधही अद्याप माणसाला उलगडला नव्हता. पुढे व्यवस्था म्हणून एकास-एक असे नर-मादी संबंध प्रस्थापित झाले आणि तोवर पुर्‍या टोळीची असलेली मुले ही केवळ त्या दांपत्याची होऊ लागली, त्या मुलांची टोळीतील इतरांपेक्षा या जोडप्याशी अधिक जवळीक होत गेली.

जोडीदारांची निवड

कोणताही जीव वयात येतो तेव्हा त्याच्यामध्ये देहभोगाची जाणीव विकसित होते नि त्यासाठी त्याला जोडीदाराची गरज भासू लागते. जोडीदार मिळवण्याच्या पद्धती प्रत्येक प्रजातीमध्ये वेगवेगळ्या दिसतात. बहुसंख्य प्राण्यामध्ये मादीसाठी नरांमध्ये बाहुबलाचा संघर्ष होतो. पक्ष्यांमध्ये नर हा अनुनयाला अधिक महत्त्व देणारा असतो. तो घरटे बांधून, गाऊन, नृत्य करून मादीला समागमास राजी करतो. प्रत्यक्ष शरीरसंबंध न येणार्‍या माशांसारख्या प्रजातींमध्येही अनुनयालाच अधिक महत्त्व असते. प्राण्यांमध्ये नराचा सद्दी असते तर पक्ष्यांमध्ये मादीची. नराने बांधलेले घरटे तिला आवडले नाही, तर ते उखडून टाकून ती चालती होत असते. प्राण्यांमध्ये मादीला बहुतेक वेळा बलवान नराशी समागम करावाच लागतो.

माणूस हा प्राणिकुलातला, त्यातही शिकारी असल्याने त्याच्या टोळीमध्ये बलवंताची सद्दी होती. परंतु माद्यांसाठी झुंजणारे काळवीट शक्तिपात करून घेऊन भक्षकांची आयती शिकार होतात हे पाहिले असल्याने, आणि मादीवरून झालेली भांडणॆ टोळी फुटण्यास कारणीभूत ठरताना दिसत असल्यानेही, ती टाळणे शहाणपणाचे आहे माणसाच्या लक्षात आले. त्यातून एकास-एक अशी नर-मादी व्यवस्था उदयाला आली.

पण एकास-एक हे ठरले तरी ’कोणाचा जोडीदार कोण असावा?’ हा नवा प्रश्न निर्माण झाला. काळाच्या ओघात याच्या सोडवणुकीसाठी विविध पर्याय निर्माण झाले. परंतु सुरुवातीच्या काळात हे काम टोळीतील ज्येष्ठांचे किंवा अनुभवी व्यक्तींचे असे. ही व्यवस्था स्थिर झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील ज्येष्ठांचे मतही महत्त्वाचे ठरू लागले.

दुसरीकडे पक्ष्यांच्या नि प्राण्यांच्या पद्धतीचा काहीसा संकर करुन स्त्री ही वीर्यशुल्का ठरू लागली. अमुक प्राण्याची एकट्याने शिकार करुन आणल्यास मुलगा मादी मिळवण्यास पात्र ठरू लागला. भारतीय पौराणिक वाङ्मयात क्षत्रिय राजकन्या अशा वीर्यशुल्का असत. जोडीदार निवडण्यासाठी विशिष्ट कार्य करुन दाखवण्याचे आव्हान त्या पुरुषांना देत असत. परस्पर-संमतीने जोडीदार निवडणे अजून बरेच दूर होते.

लैंगिक संबंध

एकास-एक नर-मादी संबंध ही व्यवस्था प्रस्थापित झाल्यानंतर त्या एका जोडीदाराशीच लैंगिक संबंध ठेवणॆ बंधनकारक ठरले. माणसाने स्वत:ची ’गुहा’ स्वत: निर्माण करुन तिला आपले वसतीस्थान केले. टोळीअंतर्गत प्रत्येक कुटुंबाची स्वतंत्र गुहा- म्हणजे झोपडीसदृश निवारा तयार होऊ लागला. माणसांतील नर-माद्यांमधील देहभोग हा याच जागेमध्ये म्हणजे टोळीतील सदस्यांच्या नजरेआड होऊ लागला. पण त्यामुळे शरीरसंबंध ही एकांतात करण्याची कृती आहे हा परस्परसंबंध रूढ झाला नि भावनेच्या विस्ताराबरोबरच त्या क्रियेशी निगडित इंद्रिय्प्रदर्शनाबाबत शरमेची भावना रूढ होऊ लागली.

एकांतात शरीरसंबंध प्रस्थापित करणारा माणूस हा पहिला प्राणी ठरला. एरवी निसर्गामध्ये एकांत ही संकल्पनाच निसर्गात अस्तित्वात नाही. इतर प्राण्यांच्या दृष्टिने एकांत म्हणजे सुरक्षित ठिकाण इतकाच असतो. त्यातही जोडीदाराची अथवा कळपाच्या सदस्यांची साथ असते. माणसाची बुद्धी आणखी विकसित होत गेली तसतसे पुढे त्याने एकांताचा वापर चिंतन नि वैचारिक विकासासाठीही करून घेतला. त्यातून निर्माण झालेले बुद्धिजन्य ज्ञान ही माणसाला प्राणिविश्वापासून वेगळे करणारी सीमारेषा ठरली.

नग्नतेची जाणीव

AdamAndEve
Adam and Eve in the Garden of Eden, oil painting by Titian, c. 1550; in the Prado, Madrid.

नागर समाजात प्राधान्याने रुजलेली नग्नतेची जाणीव ही जननेंद्रियांच्या सार्वजनिक दर्शनासंदर्भात असते. अन्न आणि संरक्षण/निवारा या माणसाच्या आदिम काळातील गरजा. जंगलनिवासी असताना आसपास सारी जनावरेच असल्याने नग्नतेची जाणीव माणसाला नसणार. बायबलमध्ये कुणा तिसर्‍याने- सर्पाने, आदम-ईव्हला त्यांच्या नग्नतेची जाणीव करुन दिल्याची कथा आहे.

जननेंद्रिये हा शरीराचा सर्वात नाजूक भाग असतो. चार पायांवर चालणार्‍या जनावरांमध्ये त्यांना दोन पायांचे संरक्षण मिळत होते. माणसांचे इतर जनावरांहून वेगळे-- मागील दोन पायांवर चालणे, सुरू झाल्याने माणसाची जननेंद्रिये समोरच्या बाजूने उघडी पडली. जंगलातून माणूस दोन पायांवर चालत असताना पुढे चालणार्‍याच्या हातून निसटलेल्या एखाद्या लहानशा फांदीचा आघातही अतिशय वेदनादायक होत असणार.

हे टाळण्यासाठी माणसाने शिकारीतून मिळालेल्या जाड कातड्याने जननेंद्रिय झाकण्यास सुरुवात केली. वन्यजीवी मानवाची जाणीव लज्जा नव्हती आणि लज्जारक्षण ही गरज नव्हती, जाणीव वेदनेची होती तर संरक्षण ही गरज होती. म्हणून त्याची प्रावरणे ही जाड कातडी होती, अ‍ॅडम-ईव्हच्या कथेत दाखवतात तशी अंजिराची दुबळी पाने नव्हती.

माणूस नागर झाल्यावर आणि सामाजिक चालीरीतींमध्ये बरेच बदल घडल्यावर, नागर आयुष्यात जननेंद्रियांवरील आघाताची शक्यता/संभाव्यता नगण्य झाल्यावर, वेदना-संरक्षण जोडीला मागे ढकलून नग्नतेची जाणीव पुढे सरकली असावी.

अपत्य संगोपन

पुनरुत्पादनानंतर अपत्य-संगोपन हा पुढचा टप्पा येतो. विविध सजीवांमध्ये तो विविध प्रकारे हाताळला जातो. प्राण्यांमध्ये ही जबाबदारी बव्हंशी मादीची असते. नर क्वचितच त्यात सहभागी असतो. बर्‍याच पक्ष्यांमध्ये मात्र एकास-एक अशी नर-मादी जोडी असते नि अपत्य-संगोपनामध्ये दोघांचाही सहभाग असतो. माशांमध्ये अथवा कीटकांमध्ये मात्र अपत्य संगोपनामध्ये नर अथवा मादी दोहोंचाही सहभाग नाही.

माणसांमध्ये पक्ष्यांप्रमाणे एकास-एक जोडी प्रस्थापित झाल्यानंतर अपत्यसंगोपनात नरही आपली जबाबदारी उचलू लागला. इतर प्राण्या-पक्ष्यांपेक्षा माणसाचे पिलू बरेच अधिक काळ परावलंबी राहात असल्याने मादीला या मदतीची आवश्यकताही होती. सुरुवातीच्या काळात ही जबाबदारी म्हणजे प्रामुख्याने अन्नाची सोय एवढीच होती. पुढे अनुवांशिकतेची जाणीव जसजशी दृढ होत गेली तसतसे या अपत्य-संगोपनाला नातेसंबंधाच्या भावनेचे अस्तर मिळून गेले आणि त्याचे रूपांतर जबाबदारीतून कर्तव्यामध्ये होत गेले.

मम, आत्मन:

शिकारीतून अथवा संकलनातून मिळालेले अन्न हे पुर्‍या टोळीसाठी असे. मुलेही टोळीचा भाग असल्याने त्यांचाही वाटा त्यात असे. त्यामुळे परावलंबी मुलांना अन्न पुरवण्याची जबाबदारी कुणाची हा प्रश्न नव्हता. ती पुर्‍या टोळीची जबाबदारी होती. टोळीअंतर्गत कुटुंबे तयार झाली आणि ती जबाबदारी त्या-त्या कुटुंबप्रमुखाची ठरली. त्यातून अन्न-संकलन हे टोळीचे सामूहिक काम हळूहळू कौटुंबिक पातळीवर सरकले.

त्याचबरोबर कुटुंबाने कमावलेले अन्न हे प्राधान्याने त्या कुटुंबाचे ठरू लागले. प्रत्येक जोडप्याने कमावलेल्या अन्नातील वाटा टोळीतील इतरांकडे जाण्यापूर्वी त्यांच्या मुलांकडे जाऊ लागला. यातून खासगी मालकीच्या संकल्पनेकडे माणसाची वाटचाल सुरू झाली. अशा तर्‍हेने अनुवांशिकतेची जाण निर्माण होण्याआधीच माणसामध्ये वारशाची जाणीव निर्माण झाली होती.

कुटुंब संकल्पनेचा विस्तार

मागील भागात म्हटल्याप्रमाणे माणसाचे शिकारीसह शेतीचे तंत्र आत्मसात केले नि जगण्यामध्ये आवश्यक तसंच उपयुक्त कौशल्यांची जंत्री वेगाने वाढली. शिकारीपासून कातडे कमावणे, तिला आवश्यक ती हत्यारे तयार करणे, भक्ष्याचा माग काढणे अशी विविध कौशल्ये शिकारीसाठी तर शेतीमध्ये शेतीयोग्य जमीन तयार करणे, तिची स्वच्छता, रुजवण्यास बीजे शोधणे व त्यांचा साठा करणे, जनावरांच्या धाडीपासून त्यांचे रक्षण करणे अशी अनेक पर्यायी कौशल्ये माणसाच्या जमातीमध्ये विकसित होऊ लागली.

ते विशिष्ट कार्य करणारा कुटुंबप्रमुख शिकार्‍यांप्रमाणेच आपण जमा केलेले त्यासंबंधीचे ज्ञान आपल्याच पुढच्या पिढीकडे वारसा म्हणून सोपवू लागला. यातून त्या-त्या कौशल्याआधारे कुटुंबे विस्तारली आणि विशिष्ट कामे करणार्‍या जमातींचा उदय झाला. यातून भारतातील वर्णव्यवस्था नि जातिव्यवस्थेकडे वाटचाल सुरू झाली. टोळी विस्तारत विविध कुटुंबांच्या उतरंडींचा समाज निर्माण झाला.

एकविसाव्या शतकातील लग्नसंस्था

टोळीजीवनाच्या काळात प्रस्थापित झालेली एकास-एक नर-मादीची जोडी हे लग्नसंस्थेचे प्रारूप बव्हंशी स्थिर झालेले आहे. काळाच्या ओघात तिच्यामध्ये फारसा बदल झालेला नाही. खासगी मालमत्तेचेही कौशल्याप्रमाणेच वारशामध्ये रूपांतर झाल्यामुळे या लग्नसंस्था स्थिर होत गेली. त्याचबरोबर लग्नसंस्था ही धार्मिक व्यवस्थेने आणि राज्यव्यवस्थेनेही आपल्या व्यवस्था-उतरंडीमध्ये सामावून घेतल्याने ती अधिक बळकट होत गेलेली आहे. धार्मिकतेने तिच्याभोवती पावित्र्याची झूल पांघरली, तर राज्यव्यवस्थांनी तिच्या-आधारे खासगी मत्तेसंदर्भामध्ये वारसाहक्काचे नीतिनियम बांधत नेले आहेत.

बहुपत्नित्व ही पर्यायी व्यवस्था अस्तित्वात असली, तरी त्यांची संख्या एकुण लोकसंख्येच्या तुलनेत नगण्यच राहते. ही व्यवस्था प्रामुख्याने युयुत्सु समाजांतच उदयाला आली. माणसांनी शिकार म्हणून प्राण्यांशी केलेला संघर्ष बराच मागे पडून जल, जंगल, जमीन या नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी माणसांच्या टोळ्या आपसात लढू लागल्या. त्यात बळी पडत असल्याने समाजातील पुरुषांची संख्या घटू लागली. त्यातून नर गमावलेल्या स्त्रीलाही नवा जोडीदार देणे आवश्यक ठरले. यामागे तिच्या उदरनिर्वाहाची सोय नि तिचे उत्पादक भूमी म्हणून असलेले स्थान अशी दोनही कारणे होती. आणि स्त्री-पुरूष संख्येतील असमतोलामुळे एक नर नि एकाहुन अधिक माद्या अशी व्यवस्था स्वीकारणे भाग पडले.

टोळीयुद्धांची वारंवारता कमी झाली, जगभरात लोकशाही राज्ये उदयाला आली आणि स्त्री-पुरुष गुणोत्तर पुन्हा एकास-एकच्या आसपास आल्यामुळे बहुपत्नित्व ही आता कालबाह्य झालेली व्यवस्था आहे. तरीही काही प्रमाणात ती टिकून आहे. त्यात याचे एक कारण बलवंताचा आश्रय घेऊन आपल्या मुलांचे भविष्य अधिक सुरक्षित करण्याच्या स्त्रीच्या उपजत उत्क्रांतीवादी प्रेरणेत आहे. दुसरीकडे राजकीय आर्थिक नि सामाजिकदृष्ट्या बलवान असलेले राजे, सुलतान सरदार जसे एकाहुन अधिक स्त्रियांशी सहवास करत असत. त्याचा परिणाम म्हणून एकाहुन अधिक स्त्रिया भोगणे याला एकप्रकारे पौरुषाचे परिमाण मिळाले आहे. जे जाणीव-नेणिवेच्या पातळीवर सर्वसामान्यांतही रुजून बसले आहे.

स्वातंत्र्य, समता नि बंधुता या त्रिसूत्रींच्या आधारे उभ्या राहिलेल्या लोकशाहीने एकाधिकार स्वरूपाची शासनपद्धती मोडीत काढली. प्रजेची जनता झाली नि तिला आपले राज्यकर्ते निवडण्याचा अधिकार मिळू लागला, त्याचप्रमाणे ज्येष्ठांचे अथवा मागील पिढीचे जोडीदार निवडण्याचे एकाधिकार संपुष्टात येऊन प्रत्येकाला ते स्वातंत्र्यही मिळू लागले.

चाचणी आणि विच्छेद

टोळीजीवनाच्या काळात विवाहविच्छेद होत असत का, असल्यास त्यांचे प्रमाण किती आणि त्यातून सुटे झालेले जोडीदार पुन्हा नव्या जोडीदारांचा शोध कसा घेत असत याबाबत मला फारशी माहिती मिळाली नाही. परंतु अर्वाचीन काळात पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये असो की मुस्लिम कायद्यामध्ये असो, विवाहविच्छेद नि पुनर्विवाह फारसे दोषास्पद मानले जात नाहीत. भारतीय समाजामध्ये मात्र अद्यापही योनिशुचिता आणि त्या अनुषंगाने लग्नसंस्थेला नेसवलेले पावित्र्याचे प्रेतवस्त्र यामुळे विवाहविच्छेद हा सामाजिक कलंक मानला जातो.

सुदैवाने नागरी नि महानगरी समाजात हे बंधन बरेचसे सैल होऊ लागले आहे. लग्न हा कायदेशीर करारही असल्याने त्याच्या संभाव्य विच्छेद हीदेखील कायदेशीर प्रक्रिया असते. त्याची संभाव्यता कमी करण्यासाठी ’विवाहपूर्व सहजीवन’ अर्थात लिव्ह-इन ही अनौपचारिक व्यवस्थाही हळूहळू रूढ होऊ लागली आहे. त्याहीपूर्वीची स्थिती म्हणजे परस्परांना अधिकृतपणे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड अशी जोडी जाहीर करुन बांधिलकीची औपचारिक घोषणाही केली जाऊ लागली आहे. काळाच्या ओघात लग्नसंस्थेची बंधने वा प्रारूप फारसे बदलले नसले तरी तिला अशी अनुषंगे मिळू लागली आहेत.

पर्यायी लैंगिकता

AlternateSexuality
.

मानवी इतिहासामध्ये प्रामुख्याने नर-मादी अशीच जोडी दिसत असे. या दोन्ही गटात न बसणारे सरसकट ’तृतीयपंथी’ समजले जात. त्यांना समाजात स्थान नसे. काही समाजांनी आपल्यातील एक मोठा भाग ’अस्पृश्य’ म्हणून गावकुसाबाहेर ठेवला होता. हे तृतीयपंथी त्यांच्याहूनही उपेक्षित मानले जात.

परंतु हा सरसकट एक वर्ग वा गट नाही हे आता पाश्चात्त्य समाजव्यवस्थांमध्ये मान्य होऊ लागलेले आहे. स्त्रीला स्त्री किंवा पुरुषाला पुरुष जोडीदारच हवासा वाटणे हे संख्येने कमी असले तरी अनैसर्गिक नाही हेही आता पुरेसे स्पष्ट होऊ लागले आहे. यातून समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यतेची मागणी लावून धरली जात आहे. अमेरिकेसारख्या देशातील काही राज्यांत ती मान्यही झालेली आहे.

टोळीजीवनात माणसाच्या जगण्याला फारसे पैलू नव्हते. नर-मादी संबंध हा केवळ देहभोगापुरता नि पुढे अपत्यसंगोपनापुरताच येत असे. आज मानवी बुद्धीच्या अफाट प्रगतीनंतर जगण्याला कला, विचार, अजैविक निर्मिती, समाजधारणा असे असंख्य पैलू निर्माण झाले आहेत. एखाद्या चतुरस्र व्यक्तीला यातील प्रत्येक पैलूमध्ये त्याचा/तिचा जोडीदार साथ देऊ शकेलच असे नाही. अशा वेळी त्या व्यक्तीचे एकाहुन अधिक जोडीदार का असू नयेत असा एक विचार मांडला जाऊ लागला आहे. सैद्धांतिक पातळीवर का होईना, पण एकास-एक या व्यवस्थेला आव्हान देणारी मांडणी होऊ लागलेली आहे.

कृत्रिम गर्भधारणा

अपत्याची आस माणसाला प्राणिजगतापासून वेगळे करणारी भावना आहे. पण सर्वच नर-मादी जोडप्यांना यात यश मिळेलच असे नाही. जर त्यांच्यामध्ये अपत्यसंभवासाठी आवश्यक असणार्‍या पुंबीज वा स्त्रीबीजाची कमतरता नाही, तरीही त्यांना मूल होत नाही अशी स्थिती असेल, तर कृत्रिम गर्भधारणा हा विज्ञानाने अशा जोडप्यांना दिलेला पर्याय आहे. त्या दोघांच्या बीजांचे बाह्य फलन घडवून आणून नंतर तो गर्भ थेट स्त्रीच्या गर्भाशयाकडे पुढील वाढीसाठी सोपवला जातो. यातून गर्भधारणा प्रक्रियेतील अडचणीला वळसा घालून पुढे जात आपल्याच बीजांचे मूल त्यांना मिळत असते.

या प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष देहभोगाखेरीजही गर्भधारणा शक्य होते आहे. यामुळे समलैंगिक जोडप्यांना अपत्यसंभवासाठी हा पर्याय उपयुक्त ठरतो आहे. यात दोघांकडेही स्त्री अथवा पुरुष यापैकी एकाच प्रकारचे बीज उपलब्ध असते. त्याचे फलन करणारे दुसर्‍या प्रकारचे बीज हे तिसर्‍या अन्य-लिंगी व्यक्तीकडून घेऊन अपत्यजन्म शक्य होऊ लागला आहे. या कृत्रिम गर्भधारणा प्रक्रियेमुळे त्या तिसर्‍या व्यक्तीशी थेट शरीरसंबंध प्रस्थापित करण्याची आवश्यकता राहात नाही.

एक बीज उसने आणून गर्भधारणा शक्य होऊ लागल्याने जोडीदार नसणार्‍यांनाही अपत्य जन्माला घालण्याचा पर्याय उपलब्ध झाला. अर्वाचीन समाजातील ’मला मूल हवे, मातृत्वाची आस आहे. पण त्यासाठी कुण्या पुरुषाचे दास्यत्व पत्करण्याची माझी इच्छा नाही.’ असे म्हणणार्‍या स्वतंत्र विचारांच्या स्त्रियांना एखाद्या दात्याकडून पुंबीज घेऊन स्वत:च्या बीजाचे मूल जन्माला घालणे शक्य झाले आहे. अपत्यप्राप्तीसाठी आजवर अपरिहार्य मानल्या गेलेल्या लग्नसंस्थेला यातून आव्हान मिळू लागले आहे.

अन्य बीजापोटी

AdoptAChild

समलैंगिक जोडीदारांना किंवा एकल मातांना एका प्रकारचे बीज एखाद्या बाह्य दात्याकडून घेणे अपरिहार्य ठरते. परंतु अनेकदा नर-मादी जोडप्यामध्ये दोघांपैकी एक-जण अपत्यजन्मातील आपली भूमिका पार पाडू शकत नसेल, आणि तरीही त्यांचे परस्पर नाते दृढ असेल अपत्यसंभवासाठी त्यांच्याकडे दोन पर्याय शिल्लक राहातात.

दोघांपैकी निदान एकाच्या बीजाचे मूल जन्माला घालण्याचा निर्णय ते घेऊ शकतात. यातून समलैंगिक जोडप्याप्रमाणे जोडीदारांपैकी एकाचे बीज आणि त्रयस्थ विरुद्धलिंगी दात्याचे बीज यांचे फलन घडवून कृत्रिम गर्भधारणा घडवली जाते.

दुसरा पर्याय असतो दत्तक घेण्याचा. आधीच जन्मलेले वा गर्भात असलेले मूल अपत्याची आस असलेले हे भिन्न-लिंगी वा समलिंगी जोडपे दत्तक घेते. यात जोडीदारांपैकी एकाचेही बीज त्या गर्भाशी जोडले गेलेले नसते. दत्तक मूल हे सर्वस्वी वेगळ्या बीजांचे असते. ते जोडपे परस्परांना बांधिल असलेले, पण अपत्य-संगोपनाची कुवत नसलेले असू शकते, किंवा बांधिल नर-मादी नसून त्यांच्या केवळ प्रासंगिक देहभोगातून जन्मल्यामुळे ते मूल त्यांना नकोसे झालेले असू शकते. या ना त्या प्रकारे अपत्याचे मूळ आई व वडील त्या मुलाचे पालकत्व सोडून देत असतात.

दत्तक घेण्याचा पर्याय हा मानवाच्या कुटुंबसंस्थेतील सर्वात प्रागतिक पर्याय आहे असे म्हटले पाहिजे. कारण यात ’शुद्ध बीजापोटीच फळे रसाळ गोमटी’ हा दुराग्रही दावा नाकारला जातो. बीजासोबतच संगोपन आणि संस्कार यांचा त्या अपत्याच्या प्रगतीमध्ये तितकाच महत्त्वाचा वाटा असतो हे यातून अनेकदा सिद्ध होत असते. अपत्याची आस असणारी जगभरातील जोडपी आपल्या वंश, देशाची नसलेली अपत्येही दत्तक घेऊन वाढवताना दिसतात. यातून हे भेदाभेद फारसे दुबळे झाले नसले तरी निदान आपल्यापुरत्या या भिंती पाडल्या जाऊ शकतात हे मात्र अधोरेखित होते आहे.

वर म्हटल्याप्रमाणे स्त्री जसे एकल-माता होण्याचा निर्णय घेऊ शकते तसेच एखादा पुरुषही लग्नसंस्थेशिवाय, स्त्रीसंगाशिवाय आपल्या पुंबीजाचे अपत्य जन्माला घालण्याचा निर्णय घेऊ शकतो. फरक इतकाच की गर्भ धारण करण्याची क्षमता स्त्रीमध्ये असल्याने ती स्वत: ते मूल वाढवू शकते. पण एकल पुरुषाला मात्र जशी स्त्रीबीजदात्री आवश्यक असते तसेच त्यातून तयार होणारा गर्भ वाढवण्यासाठी एक दत्तक माताही.

दत्तक मातृत्व

जोडप्याने मूल दत्तक घेण्याप्रमाणेच मुलासाठी माता दत्तक घेणे हा ही एक पर्याय मानवी संस्कृतीमध्ये विकसित झालेला दिसतो. हे दत्तक मातृत्व हे दोन प्रकारचे दिसते.

लोकशाहीपूर्व काळात राजे, सरदार वगैरेंच्या पत्नी या आपल्या ’मालकांना’ मूल म्हणजे ’वारस’ देण्यास कटिबद्ध तर होत्या. परंतु हे ’नर’ समाजातील उच्चभ्रू, अन्य स्त्रियांसाठी - आजच्या भाषेत - ’डिझायरेबल’ नरही असल्याने ते अन्य स्त्रियांकडे आकर्षित होण्याचा धोकाही होता. त्यांनी आपण सोडून अन्य माद्यांकडे जाऊ नये यासाठी त्यांच्या अनुरंजनासाठी सतत सिद्ध राहणे या पत्नींना आवश्यक असे.

अपत्यसंगोपनाचा काळ हा त्या दृष्टीने गाफील काळ असे. त्यासाठी तो कमीत-कमी राखण्याकडे त्या स्त्रियांचा कल असे. त्यामुळे या मुलांसाठी दाई अथवा आया नेमून संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जात असे. पाश्चात्य जगतातील नॅनीज् हे यांचेच एक रूप. या दाई अनेकदा दूध-माताही असत. आपल्या मुलांबरोबर या दत्तक मुलाला आपले दूध पाजत असत. या श्रेष्टींच्या मुलांचे नि त्यांच्या दाईंचे आईखालोखाल विशेष असे नाते निर्माण होत असे.

दुसरे दत्तक मातृत्व हे सर्वस्वी शारीर पातळीवरचे. ज्याला ’सरोगसी’ असे म्हटले जाते. मूल आधी जन्माला घालून ते दाईकडे सोपवण्याऐवजी तिच्याच पोटी ते वाढवले तर...? अशी कल्पना अर्वाचीन विज्ञानाने केली. यातून गर्भधारणेच्या काळात येणारे परावलंबित्व, त्यातून होणारे शारीर बदल हे ही टाळता येतात. कृत्रिम गर्भधारणेचा पर्याय उपलब्ध होताच. आता फक्त तयार झालेला गर्भ मूळ मातेच्या गर्भाशयात प्रत्यारोपित न करता एखाद्या अन्य स्त्रीच्या गर्भाशयामध्ये ठेवला नि वाढवला तरी चालते. 

हे मूल, तो गर्भ मूळ माता-पित्यांच्या बीजातून जन्मलेला असल्याने तेच त्याचे जैविक माता-पिता असतात. गर्भाशय भाड्याने देणारी स्त्री मुलाच्या जन्मानंतर आपला मोबदला घेऊन निघून जाते. अमेरिकेमध्येच नव्हे तर भारतामधील करियरप्रधान समाजातील अनेक जोडपी अथवा एकटे स्त्री वा पुरूष या पर्यायाची निवड करताना दिसतात.

परित्यक्त, अनाथ मुले

एकास-एक असो वा बहुपत्नीत्व, जोडीदार निश्चित झाल्यावर त्याच्याखेरीज अन्य व्यक्तीसोबत देहभोग निषिद्ध मानला जाऊ लागला. भिन्न कारणांनी एकाहुन अधिक जोडीदार पसंत असतील तरीही त्यातील एकच निवडण्याचे बंधन निर्माण झाले. आधीच निवडलेल्या जोडीदाराहून अन्य जोडीदार हवासा वाटला तर विवाहविच्छेद तुलनेने सोपा झाला हे खरे, परंतु भारतीय समाजामध्ये पुनर्विवाह फारसा स्वीकारार्ह नसल्यामुळे त्यातून परित्यक्तांचा प्रश्न गंभीर झाला.

टोळीजीवनात एकास-एक नर-मादी अशी व्यवस्था नव्हती तेव्हा मुले ही सार्‍या टोळीची असत. माकडांच्या टोळीमध्ये लेकुरवाळ्या माकडिणीचे पिलू उचलून होऊ घातलेल्या आया वा वयात येऊ लागलेल्या माकडिणी अपत्य-संगोपनाचा सराव करत असतात. एकुणात टोळीमध्ये कोणतेही मूल हे अनाथ राहात नसते. एखाद्याची जैविक आई काही दगावली, तरी त्याच्या ’मावशा’ त्याचे संगोपन करताना दिसतात. एकास-एक जोडप्याचे कुटुंब आकाराला आले नि अनाथ मुलांचा प्रश्न निर्माण झाला, आणि अनौरस मुलांचाही.

वर उल्लेख केल्याप्रमाणॆ सुदैवाने अपत्य दत्तक घेण्याचे प्रमाण बरेच वाढल्यामुळे या मुलांना पालकांचे छत्र मिळण्याची शक्यताही वाढते आहे. जनावरांप्रमाणे मावशा नसल्या तरी अनाथांचे संगोपन ही लोकशाही व्यवस्थेने आपली जबाबदारी मानलेली आहे. त्यातून अनाथालयांसारख्या संस्था उभ्या राहात आहेत.

लेखाच्या सुरुवातीला बिम्मने आंब्याच्या झाडाला विचारलेल्या प्रश्नाचा आणि त्याला झाडाने दिलेल्या उत्तराचा उल्लेख केला आहे. वेगवेगळ्या फळांमध्ये वेगवेगळी बीजे असतात. पण त्या सार्‍यांचे संगोपन करणारे झाड एकच असू शकते ही कल्पना फक्त माणूसच करू शकला आहे.

WalkingAChild

- oOo -

    पुढील भाग >> > अजन्मा जन्मासि आला (पूर्वार्ध)


हे वाचले का?

मंगळवार, १८ एप्रिल, २०२३

कुण्या एकाची सत्तागाथा (एक राजकीय विरहगीत )

राजकीय आखाड्यामध्ये एका राजकीय नेत्याच्या विरोधी पक्षनेत्याशी असणार्‍या साट्यालोट्याबद्दल सतत कुजबूज होत असते. एका पंच पंच उष:काली दोघांनी बांधलेली गाठ ज्येष्ठांच्या आशीर्वादाअभावी सोडावी लागल्यानंतर त्यांच्यातील संबंधांबद्दल अधूनमधून वावड्या उठत असतात. त्यात कितपत तथ्य आहे ते त्या दोघांनाच ठाऊक. एक नक्की, भूतकालातील त्या आशादायी पहाटेची आठवण काढत त्यांच्यातील एक जण संध्याकाळी उदास फिरताना दिसतो. एका हताश क्षणी त्याने शब्दबद्ध केलेली आपली विरहवेदना...

AjitToRajbhavan
https://www.bhaskar.com/ येथून साभार
(कविवर्य ’आरती प्रभू’ यांची क्षमा मागून...)
 
तो येतो आणिक जातो
येताना कधी सह्या आणितो
अन् जाताना चिठ्या मागतो 
येणे-जाणे, देणे-घेणे 
असते सारे जे न कधी तो सांगतो

येताना कधी आधी लपतो 
तर जाताना तो लपवितो
कळते काही, उगीच ते ही 
नकळत बोले पुशित बाही 
पदावाचून कधीच ’नाही... नाही...’ म्हणतो 

येताना त्याची खुलते कळी 
गुणगुणतो तोही भूपाळी* 
जाताना कधी करून बेत 
येण्यासाठीच फिरून येथ 
मध्येच येतो, निघून जातो... हे सलते

- oOo -

* प्रात:काली गाण्याचा एक प्रकार
	

हे वाचले का?

मंगळवार, ११ एप्रिल, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ४ : आपल्या पक्ष्याचा शोध

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

प्रतिबिंबांचा प्रश्न << मागील भाग

---

एकदा कपाट आवरत असताना बिम्मच्या आईने त्यातून एक लहानसा पिंजरा बाहेर काढला. पिंजर्‍याचे दार मोडलेले होते, पक्ष्याचे अस्तित्त्व संपून गेले, पण रंग नि आतील दांडी नव्या पक्ष्याचे स्वागत करायला अजूनही उत्सुक होती. पूर्वी त्यात एक पिवळा पक्षी(१) होता हे आईकडून बिम्मला समजते. ‘आता तो कुठे गेला?’ हा प्रश्न ओघाने आलाच.

त्या पक्ष्याचे काय झाले असेल हे तर्क करण्याजोगे आहे. पण खरे ते सांगणे म्हणजे बिम्मच्या पुढच्या अवघड प्रश्नांना सामोरे जाणे आहे. साहजिकच ‘त्याच्याशी खेळायला कोणी नव्हते म्हणून कंटाळा येऊन तो उडून गेला असेल.’ असे सांगत आईने ते टाळले आहे. ‘मग मी त्याला बोलावून आणतो.’ असे म्हणून बिम्म त्या कामगिरीवर निघतो. मग मागील आवारातील आजोबांच्या मदतीने त्याने त्या पक्ष्याचा शोध सुरू करतो.

या आधीच्या भागांमध्ये सामोरे गेलेल्या ‘मी कोण?’, ‘यापैकी मी कोण?’ याचा पुढचा प्रश्न म्हणजे ‘माझे कोण?’ या प्रश्नापाशी बिम्म आता पोहोचला आहे. नीनमला शोधायला बाहेर पडलेल्या बिम्मला आजोबा विचारतात, ‘काय शोधतो आहेस? काय पाहिजे तुला?’ तेव्हा त्याचे उत्तर असते, ‘मला आमचा पिवळा पक्षी पाहिजे.’ यात ‘मला’ आणि ‘आमचा’ असे दोनही शब्द येतात. आमचा म्हणताना आमच्या आई-वडिलांचा, बब्बीचा या सार्‍यांचा मिळून ‘आमचा’ असे अभिप्रेत आहे. त्यामुळे एका दृष्टीने पाहिले तर तो पक्षी हा त्याचा वारसा आहे. जन्मलेल्या प्रत्येकाला आईवडिलांकडून जात, धर्म, संस्कार या खेरीज जड संपत्तीही मिळत असते. पण ते सारे फार पुढे. बिम्मच्या वयात पिवळ्या पक्ष्यासारख्या अलवार वारशाचे अप्रूपच अधिक असते.

ComeNeenam
http://www.cs4fn.org/ येथून साभार.

मग आजोबांनी दाखवलेल्या पक्ष्यांमध्ये कुरापती काढून त्यांना नाकारत जातो. कुणी पिवळा नाही, कुणी पुरेसा पिवळा नाही, कुणाची फक्त चोचच पिवळी आहे, तर भारद्वाज हा तर ‘बदामी कोट घातलेला कावळ्या’सारखा दिसतो आणि पिंजर्‍यात मावणार नाही म्हणून निकालात काढला जातो. बिम्मला त्यांचा संपूर्ण पिवळा पक्षीच हवा असतो.

‘लैलाको मजनूं की नज़रसे देखना चाहिए’ असं म्हटलं जातं. त्यामागे हीच आस असते. इतरांना जे दुय्यम वाटतं, कुरूप वाटतं, सामान्य वाटतं त्यामध्ये एखाद्याला जगातील अद्वितीय सौंदर्य दिसू शकते. कारण त्या दृष्टीमध्ये त्याच्या भावनांचे, भावबंधांचे अस्तर असते. म्हणून ‘लैलाहून देखणी नि बुद्धिमान पत्नी तुला सहज मिळेल’ हे सांत्वन मजनूंला पुरेसे ठरत नसते.

परिपूर्णतेचा ध्यास घेण्याचा, पूर्वनिश्चित साध्याशिवाय कोणत्याही अपुर्‍या, दुय्यम, कमअस्सल अथवा वेगळ्या पर्यायी साध्याबाबत असमाधानी असण्याचा बिम्मचा हा स्वभाव वय वाढते तसा कमीकमी होत जातो. अखेर ‘मिळते तेच साध्य’ असे पटवून घेण्याचा/ देण्याचा खेळ सुरू होतो. एक पक्षी ‘निघून’ गेल्यावर बिम्मची आई नवा पक्षी आणण्याची तसदी न घेता पिंजराच अडगळीत टाकून देते. बिम्म मात्र त्या हरवल्या साथीदाराला पुन्हा शोधून आणण्याची उमेद बाळगतो, कुठल्याही पर्यायाला हट्टाने नाकारतो. सान आणि थोरांच्या दृष्टिकोनातील हा फरक ध्यानात ठेवण्याजोगा.

आईपेक्षाही चार-दहा पावसाळे पाहिलेले आजोबा सुज्ञ असतात. जे वास्तवात अप्राप्य असते ते स्वप्न-साध्य असते हे त्यांना ठाऊक होते. म्हणून ते बिम्मला घरी जाऊन एक झोप घेण्याचा सल्ला देतात. ‘तोवर नीनम आलाच तर मी त्याला तुझ्याकडे पाठवतो’ असे आश्वासनही देतात. खट्टू होऊन घरी आलेल्या बिम्मला आई बिम्मला झोपायला नेमकी पिवळी फुले असलेलीच एक उशी देते.

झोपलेल्या बिम्मच्या स्वप्नात निळे पक्षी आले, गुलाबी पक्षी आले, पांढरे-काळे ठिपके मिरवणारे पक्षी आले, हिरवे पोपट आले, पांढर्‍या ढगातून पांढरे बगळेही आले. सारे रंग दिसले. पण पण पिवळा कोणी दिसेना आणि नीनम काही भेटेना. नंतर आलेल्या कोंबडा, मोर, कबुतर यांच्यापाठोपाठ अखेर तो आला. त्याच्या आगमनाचे जी.एं.नी केलेले वर्णन बिम्मच्या कल्पनाविलासाचे दर्शन घडवणारे आहे. ते वाचल्यावर ‘किती खाऊ हवा?’, ‘तुझ्याकडे खेळणी किती आहेत?’ वगैरे प्रश्नांना ‘इन्फिनिटीऽऽऽऽ’ असे उत्तर देणारा, त्या शब्दाचा अर्थही नेमका ठाऊक नसलेला, एका मित्राचा छोटा मुलगा आठवून गेला.

त्याच क्षणी स्वरांच्या जरकाड्या झाल्याप्रमाणॆ तीन अत्यंत सुरेल व रेखीव असे शिट्टीचे आवाज ऐकू आले आणि सगळीकडे सोनेरी प्रकाश पसरला. मग खिडकीत एक विशाल पिवळा पक्षी आला, आणि क्षणभर त्याने पंख उघडताच सारी खिडकी भरून जाऊन क्षणभर एक चौकोनी सूर्योदय झाल्यासारखे दिसले. त्याचा प्रकाश फार झळझळीत होता. त्याच वेळी पाच कोकीळ नि दोन कावळे तिथे आले नसते, त्यांनी आपल्या काळ्या रंगाने तो प्रकाश सौम्य केला नसता, तर सर्वांना डोळे उघडे ठेवणे अशक्य झाले असते.

भग्न वर्तमान मिरवणार्‍या जमातींना आपला भूतकाळ असा देदिप्यमान, सूर्योदयासारखा प्रखर आणि सारे आकाश व्यापणारा होता असे स्वप्न पाहायला आवडते. तसंच वास्तवातील आपले साध्य अप्राप्य राहिल्याने, ते मुळातच त्यांच्या कुवतीहून बरेच मोठे, असाध्य होते अशी कल्पना करणेही त्यांना सोयीचे वाटते. त्यातून एकीकडे त्याचा अभिमानही मिरवता येतो तर दुसरीकडे अपयशाचे न्यूनही झाकता येते. आपल्या भूतकाळाचे रूप इतके तेजस्वी आहे की ’त्याच्या असूयेने कुणी सैतान, कुणी मार, कुणी राक्षस त्याला ग्रासू पाहतो म्हणून त्याचे काळवंडलेले तेजच आपल्या नजरेस सहन करता येते’ अशा बढाया मारण्याची तजवीज करण्यासाठी ते आपले कोकीळ, आपले कावळेही निवडून ठेवत असतात.

त्या पिवळ्या पक्ष्याला पाहताच हाच नीनम आहे याची बिम्मला खात्रीच पटली. पण त्याने तो पिंजरा उचलला त्याला लक्षात आले की हा नीनम तर पिंजर्‍यापेक्षा बराच मोठा दिसतो. मग त्याने विचारले, “नीनम, अरे तू एवढा मोठा आणि तुझे घर तर अगदी लहान आहे. आता कसे रे?” आता पिंजरा राखायचा तर पक्ष्याला सोडायला हवे आणि पक्षी राखायचा तर पिंजरा सोडावा लागणार असा पेच निर्माण झाला आहे.

तुम्ही-आम्ही या पेचातून सुटण्यासाठी काय करु? साहजिक मोठ्या पक्ष्यासाठी मोठा पिंजरा आणण्याचा विचार करु. (सजीवाला प्राधान्य हा नेणिवेतील नियम यामागे असावा.) पण त्यासाठी नवा पिंजरा आणण्यासाठी पैसे नि प्राधान्य दोन्ही हवे. विचार आणि कृती यांच्यामध्ये कुवत उभी असते. कुवतीपेक्षा मोठी स्वप्ने पाहण्यातून हा पेच निर्माण होतो. साध्य तर विशाल आहे, पण ते कवेत घेण्यास कुवत बहुधा कमी पडत असते.

आणखी एका दृष्टीने पाहता येते. पूर्वी कधीतरी हाती निसटून गेलेले जिवंत सख्य हे मधल्या काळात चक्रनेमिक्रमाने वाढून बसलेले असते. आपल्या मनातील त्याचा पिंजरा तेवढाच राहिलेला असतो, कदाचित आपण हेतुत: तसा जपलेला असतो. यासंदर्भात रणजित देसाईंच्या ’राधेय’मधील एक हृद्य प्रसंग आठवतो. गुरुगृही शिक्षणासाठी गेलेल्या कर्णाच्या आठवणीने व्याकुळ झालेले अधिरथबाबा त्याच्यासाठी रथ बनवू लागतात. तो रथही बिम्मच्या पिंजर्‍याप्रमाणे त्यांच्या मनातील कर्णाचे प्रतीकरूप आहे.

पण गंमत अशी होते बाल्यावस्थेमध्ये गुरुगृही गेलेला कर्ण परतून येतो तो ताडमाड वाढलेला, एक तरुण योद्धा म्हणून. त्याच्यासमोर तो रथ अगदी पिटुकला असतो... कारण तो वास्तव कर्णासाठी नव्हे तर अधिरथबाबांनी मनात जपलेल्या बाल्यरुपातील कर्णासाठी असतो! बिम्मचा नीनमही परतला आहे तो वयाने नि शरीराने वाढूनच. ते पिंजर्‍याचे घर आता त्याला पुरणार नसते.

YellowBirdBeingFed
https://www.omlet.co.uk/ येथून साभार.

आता बिम्मला मोठा पक्षी नि लहान पिंजरा यात निवड करायची आहे. पण तो पिवळा पक्षी जसा बिम्मचा वारसा आहे नि तो पिंजराही. त्यामुळे त्याला ते दोघेही हवे आहेत. इथे एक गंमत होते आहे. मोठ्यांना उपलब्ध नसलेला पर्याय बिम्मला मात्र उपलब्ध आहे, आणि तो म्हणजे त्याची कल्पनाशक्ती! बिम्म चतुर आहे, त्याने पक्ष्यालाच पिंजर्‍याच्या आकारामध्ये लहान केले आहे.

तुम्ही म्हणाल, ‘त्यात काय, मनात आणले असते ते पिंजराही मोठा करता आला असता. सगळे स्वप्नातच असेल तर सोयीचे घडायला काय हरकत आहे, नाही का?’ पण थांबा. बिम्म फारसा विचार न करताही नेमका निर्णय घेतो आहे. पिंजर्‍याला वास्तवाचे बंधन आहे. त्यामुळे पक्ष्यालाच लहान होणे भाग आहे.

नीनम ऊर्फ पिवळा पक्षीच बिम्मला सांगतो, “तू काळजी करू नको. घर बघून मी लहान-मोठा होतो.” मग तो अगदी बिम्मच्या करंगळीहून लहान होतो नि पिंजर्‍यात जाऊन दांडीवर बसतो. बिम्मने त्याला दिलेला पेरूही पिंजर्‍याजवळ नेताच तोही एखाद्या फुटाण्याएवढा लहान होतो. नीनम त्याला सहजपणे एका पायाच्या बोटात धरून खाऊ लागला. नीनम पुढे म्हणतो, “तू झोपलास की मी येत जाईन तुझ्या सोबतीला. इतर वेळी मी आभाळात उडत राहीन.” वास्तवात येऊ न शकलेल्या पक्ष्याला आता स्वप्नाच्या वाटेनेच यावे लागणार हे ओघाने आलेच.

बिम्मपणीची स्वप्ने नीनमसारखी विशाल असतात, तेजस्वी असतात. आपल्या आकाराने सारे आकाश व्यापून राहतात नि तेजाने सारा दिक्काल उजळू पाहतात. परंतु जसजसे मोठे व्हावे तसे व्यक्तीच्या, पिंजर्‍याच्या म्हणजे कुवतीच्या मर्यादा ध्यानात येऊ लागतात. सर्वांच्याच नशीबी आभाळाचे घर नसते. मग त्या स्वप्नांना लहान व्हावे लागते आणि मिळेल त्या पिंजर्‍यात निमूटपणे सावरून रहावे लागते. त्यांची भूकही पेरूइतकी असली, तरी एखाद्या फुटाण्यावर भागवून घ्यावे लागते. पण असे असले तरी ती स्वप्ने सहजी नष्ट होत नाहीत. जागेपणी तुमच्यापासून दूर असली, तरी निद्रेच्या साथीत तुम्हा-आम्हाला भेटायला येत असतातच. त्यांचा आपला ऋणानुबंध असा सहजासहजी तुटत नाही. आपला पक्षी पिंजर्‍यात नसला तरी स्वप्नात घर करून राहातो.

स्वप्न ही – बहुधा केवळ – माणसाला असलेली एक मोलाची देणगी आहे. माणसे झोपेमध्ये स्वप्ने पाहतात तशीच जागेपणीही. मागेपणीच्या स्वप्नांमध्ये काहीवेळा कुवतीपलिकडील, वास्तवात येण्याची सुतराम शक्यता नसलेली म्हणता येतील अशी दिवास्वप्ने असतात, तशीच जगण्यातील असोशीला मूर्त रूप देऊ पाहणारीही. जिच्याशी वास्तवात संवाद साधण्याचे धैर्य गोळा करू न शकलेला एखादा मजनूं स्वप्नराज्यात तिच्याशी मनमोकळा संवाद साधत असतो. आणि त्यात भाऊसाहेब पाटणकरांच्या रुबाईत म्हणतो तसा, ‘स्वप्नातही येशील ऐसे स्वप्नात नव्हते वाटले.’ असे म्हणून लटका राग दाखवू शकतो.

सासणेंच्या राहीच्या स्वप्नांचा उलगडा करताना एका कादंबरीचा प्रवास होऊन जातो. “ ‘स्वप्नं सत्यात उतरतात; पण ती उतरवावीही लागतात.’ राहीनं हे कुठं तरी वाचलं. कुठल्याशा प्रसिद्ध पुस्तकातलं वाक्य. ती विचारात पडली. त्यातून बुद्धिमत्ता असली की माणसाला प्रश्न पडतात; नसली की मग बरं असतं. ताप नाही– नि:स्वप्न निद्रा येते. इथं तसं नाही. आपण विचार करतो. प्रश्न विचारतो, स्वत:ला. आपल्याला स्वप्नं पडतात.”(२) असं म्हणताना सासणे स्वप्नांना विचाराचे दालनही उघडून देत असतात.

एकुणात स्वप्ने ही माणसाच्या आयुष्यातील वास्तवाइतकीच महत्त्वाची असतात. त्यांच्याविना माणसाला वास्तवाची प्रखरता सहन करता येणे अवघड होत जाते. ’पाश’ची प्रसिद्ध कविता आहे ‘सपनों का मर जाना’. त्यात तो म्हणतो,

घर से निकलना काम पर
और काम से लौटकर घर आना
सबसे ख़तरनाक होता है
हमारे सपनों का मर जाना

पपाशचे म्हणणे बिम्मला समजावे हे त्याचे वय नव्हे. पण बिम्मच्या बखरीतील कथांमध्ये जी.एं.नी ती वाचणार्‍या आई-वडिलांनाही सामील करुन घेतले आहे याची आठवण करुन देतो. या आईवडिलांना या कवितेचा अर्थ लगेच ध्यानात येईल. स्वप्ने नसतील तर अनेकांसाठी आयुष्याची चाकोरी अवजड भार होऊन राहील. म्हणून स्वप्ने पाहणे; राहीने म्हटले तसे ती सत्यात उतरवण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न करत राहणेही आवश्यक होऊन बसते.

पण मागच्या शतकामध्ये सिग्मंड फ्रॉईड नामे एक इसम होऊन गेला. ज्याने आपल्या सर्व स्वप्नांचा उगम नेहमीच आपल्या अतृप्त लैंगिक प्रेरणेत असतो असा दिव्य शोध लावला. (किंवा त्याच्या अभ्यासकांनी तसा अर्थ लावला.) पुढे कित्येक दशके वॉशिंग्टनच्या कुर्‍हाडीसारखा(३) त्याचा वापर करत, लोक स्वप्नांवर चित्रविचित्र लैंगिक धारणांचे आरोपण– मानसशास्त्रीय विश्लेषणाच्या नावाखाली करत राहिले. त्याद्वारे ती पाहणार्‍यांचे एकांगी मूल्यमापन करत राहिले. या काळात स्वप्नांमधली आस हरली नि आसक्तीच काय ती वास्तव मानली जाऊ लागली. बिम्मची, पाशची, राहीची स्वप्ने अवास्तव ठरली.

या प्रत्येकाचा नीनम वेगळा असतो. त्याचा रंग नेहमीच पिवळा, गुलाबी, जांभळा वा केशरी नसतो. त्यात त्या स्वप्नांचा पिंजरा असलेल्या व्यक्तिचे रंगही मिसळलेले असतात. आणि म्हणून आई-वडिल वा कोणतेही आजोबा तो तुम्हाला देऊ शकत नाहीत. स्वप्नांच्या वाटेने का होईना, पण तो आपला आपणच शोधावा लागतो.

(क्रमश:) पुढील भाग >> खेळ सावल्यांचा     

- oOo -

(१). आयुष्यातून निसटून गेलेल्या, हव्याशा वाटणार्‍या गोष्टींचे प्रतीक म्हणून पिवळ्या पक्ष्याचे रूपक वापरणार्‍या अनेक कविता नि गाणी सापडतात. बहुतेकांमध्ये हा पिवळा पक्षी म्हणजे गोल्डन ओरिओल किंवा ज्याला आपल्याकडे कांचन, हळद्या किंवा पीलक म्हटले जाते. गाणार्‍या पक्ष्यांमध्ये ’कॅनरी’चा उल्लेख प्राधान्याने होतो. शकुनांवर विश्वास असणार्‍यांच्या मते स्वप्नात पिवळा पक्षी दिसणे हे शुभ असते. तर दुसरीकडे स्वप्नात ’पिवळा पक्षी खाणे’ हे येऊ घातलेल्या संपन्नतेचे चिन्ह असते. हरिधृव नावाच्या कुण्या आयुर्वेदिय ग्रंथामध्ये पिवळा पक्षी काविळीच्या निर्दालनाचे प्रतीक मानला जातो. एकुणात पिवळा पक्षी हा प्रतीकांच्या दुनियेतील लोकप्रिय प्रतीक दिसते आहे.

(२). ‘राहीच्या स्वप्नांचा उलगडा’ (ले. भारत सासणे) या कादंबरीतून

(३). वॉशिंग्टनची कुर्‍हाड: अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन लहान असताना त्याला एक लहानशी कुर्‍हाड भेट मिळाली. हाती हत्यार मिळाल्यावर ते चालवायलाच हवे याची सुरसुरी आलेला जॉर्ज दिसेल त्याला झाडावर ती चालवत जातो. अखेर त्याच्या वडिलांनी लावलेल्या परसातील चेरीच्या झाडावरही सपासप वार करून आपली हौस भागवतो. (ही एका चरित्रकाराने रचलेली दंतकथा आहे.)


हे वाचले का?

गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

भाषा: राष्ट्र... आणि हत्यार!

(प्रसिद्ध उर्दू शायर नि कवी जावेद अख़्तर यांनी २०१५ मध्ये ‘जश्न-ए-रेख़्ता' या वार्षिक ऊर्दू संमेलनामध्ये केलेल्या भाष्याचा व्हिडिओ यापूर्वी ‘वेचित चाललो...’ वर शेअर केला होता. त्या अनुषंगाने भाषा, राष्ट्र ही संकल्पना आणि तदनुषंगिक विद्वेषाचे राजकारण यावर काही भाष्य केले होते. अख़्तर यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांना खडे बोल सुनावल्याच्या पार्श्वभूमीवर त्या लेखातील बहुसंख्य मुद्दे घेऊन ‘तत्रैव’ नियतकालिकाच्या जाने-फेब्रु २०२३ च्या अंकासाठी लिहिलेला लेख.)

JavedAkhtar

पु. ल. देशपांडे यांनी एका दंगलीच्या काळातील एक गंमतीशीर किस्सा सांगितला आहे. त्या काळात संघाचे स्वयंसेवक गस्त वगैरे घालत असत. एकदा पुलं नि त्यांचे काही मित्र रात्री उशीरा घरी परतत असताना एका अंधाऱ्या बोळातून आवाज आला, ‘थांबा. कोण आहे, मित्र की शत्रू?’ पुलंनी खोडसाळपणे उत्तर दिले, ‘शत्रू!’ काही क्षण शांतता होती. मग आवाज आला, ‘जा.'

किस्सा गंमतीचा असला तरी त्यातून आपली मानसिकता दिसते. समोरून आलेली व्यक्ती ही आपली मित्र असू शकते किंवा शत्रू. याच्या अधले-मधले काही संभवतच नाही, असा बहुसंख्येचा समज असतो. आपल्याला हवे ते बोलले की कौतुक, न रुचणारे बोलले की बोलणारा देशद्रोही, अर्बन नक्षल किंवा उलट दिशेने छुपा मनुवादी, अंधभक्त वगैरे असल्याचे शिक्के मारून मोकळे होणे हा अलिकडच्या काळात प्रकर्षाने दिसू लागलेला प्रकार आहे.

खरंतर एखाद्याचे काही बाबतीत आपले एकमत झाले नाही याचा अर्थ तो थेट शत्रूपक्षात जातो असे नसते. किंबहुना एकुणात शत्रू-पक्ष वा मित्र-पक्ष असे ठोस गट पाडता येत नाहीत. काही वेळा त्याचे नि आपले एकमतही होते. ही परिस्थिती त्याचा द्वेष करण्यास अडचणीची होते. म्हणूनच मग द्वेषसंपृक्त मने जात, धर्म, देश यांसारखे आधीच निश्चित झालेल्या गटांच्या आधारे आपापल्या द्वेषाचे विरेचन करू पाहात असतात.

हे आठवण्याचे कारण हिंदुत्ववाद्यांचे लाडके शत्रू जावेद अख़्तर आहेत. त्यांनी नुकतेच पाकिस्तानात जाऊन पाकिस्तान नि पाकिस्तानी मंडळींना खडे बोल सुनावल्यामुळे त्यांना अचानक अख़्तर यांच्याबद्दल ममत्व वाटू लागले आहे. अगदी कंगना राणावत सारख्या ट्विटरब्रँड अभिनेत्रीनेही त्यांचे कौतुक केले आहे. आजवर आपण ज्यांना देशद्रोही, अर्बन नक्षल वगैरे त्यातल्या त्यात सभ्य नि इतर अश्लाघ्य विशेषणांनी गौरवले, त्याच व्यक्तीने देशाची बाजू थेट शत्रूच्या गोटातच जाऊन मांडल्याने नाईलाजाने का होईना त्यांना अख़्तर यांचे कौतुक करावे लागते आहे.

अख़्तर यांचे उर्दू भाषेवरील प्रेम आणि प्रभुत्व हे संस्कृतप्रेमींना रुचत नसते हे तर उघडच आहे. हिंदुत्ववाद्यांनी आपल्या धार्मिक राष्ट्रवादाला भाषिक राष्ट्रवादाची जोड देण्याचाही आटोकाट प्रयत्न चालवला आहे. त्यातून ‘संस्कृत ही प्राचीन नि देवभाषा आणि हिंदी ही समस्त हिंदुस्थानची भाषा’ हा तर्क बहुसंख्येच्या गळी उतरवण्याचा आटापिटा चालू आहे. धार्मिक पातळीवर मुस्लिमांचे जसे खच्चीकरण चालू असते तसेच उर्दू या भाषेचेही. त्यासाठी मुस्लिम आणि उर्दू यांचे अभिन्नत्व वारंवार ठसवण्याचा प्रयत्न हिंदूराष्ट्रवाद्यांकडून होत असतो. २०१६ साली जश्न- ए-रेख़्ता (रेख़्ता = उर्दू) या वार्षिक उर्दू-महोत्सवामध्ये भाषा आणि धर्म यासंबंधी जावेद अख़्तर यांनी भाष्य केले होते. त्या निमित्ताने भाषा आणि राष्ट्र यांच्या परस्परसंबंधाने केलेली ही ‘माझी’(!) मांडणी.

राष्ट्र (nation) ही अखेर एक संकल्पना आहे. त्याच्या सीमारेषा तुम्हाला आखाव्या लागतात, संबंधित समाजाच्या गळी उतरवाव्या लागतात. राष्ट्राच्या भौगोलिक, भाषिक, वांशिक अशा अनेक प्रकारच्या व्याख्या निर्माण केल्या गेल्या, रुजवल्या गेल्या. त्याआधारे राजकीय सत्ता उभ्या राहिल्या, देश (state) निर्माण झाले. ‘आमच्या देशाला इतक्या वर्षांचा इतिहास आहे’ वगैरे वल्गना वर्तमानात कर्तृत्वाची वानवा असलेले, किंवा त्यासाठी करावे लागणारे कष्ट वा मेहनत करण्याबाबत आळशी असणारेच अधिक करत असतात. भविष्याची भीती गाडून टाकण्यास उत्सुक असणारे भूतकालभोगी समाजच असले आधारहीन दावे कुरवाळत बसतात. वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहिले, तर काळाच्या प्रवाहात देश निर्माण होत असतात, विखंडित होतात, विलयाला जातात, कधी ते पादाक्रांत केले जातात, आणि भूगोल बदलत राहतो...

अमुक काळात तमुक भूभाग हा ढमुक देशाचा भाग होता म्हणजे आज त्या वारशाने ढमुक देशाचा वारस मिरवणाऱ्या देशाने वा गटाने त्यावर हक्क सांगणे याला सोयीची भूमिका घेणेच म्हणता येते. इतिहासातील काळाचा कोणता तुकडा आपण निवडतो, त्यानुसार त्या भूभागाची मालकी या किंवा त्या – कदाचित त्या काळात अस्तित्वातही नसलेल्या – देशाच्या ओटीत टाकता येते. ही कृती स्वार्थप्रेरित आणि आपल्या गटाची पक्षपातीच असते. भारतामध्ये मुस्लिम लीग आणि हिंदुमहासभेसारख्या संघटनांनी धार्मिकतेला राष्ट्रवादात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. पण मध्यपूर्व आशियामध्ये पसरलेल्या ख्रिश्चनबहुल देशांकडे पाहिले तर धर्म हे राष्ट्र असल्याची संकल्पना मोडीत निघालेली दिसते. इथे राष्ट्र (nation) आणि देश (state) या दोन संकल्पनांतील फरक अधोरेखित होतो आहे. पूर्व पाकिस्तानने पश्चिम पाकिस्तानपासून दूर होताना ‘उर्दू = मुस्लिम’ हे गणित मोडीत काढले. तिथे भाषा हा राष्ट्रनिश्चितीचा निकष अधिक प्रबळ ठरला.

Hindustani

दोन देशांच्या निर्मितीनंतर हिंदूमहासभेचा प्रभाव ओसरत गेला. तिची जागा घेण्यास सरसावलेल्या संघ परिवाराने धार्मिक राष्ट्रवादासोबतच भाषिक राष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी पद्धतशीरपणे भारतातील मुस्लिम हे उर्दू भाषिक असल्याची हाकाटी पसरवण्यास सुरुवात केली.

या दाव्याचे महत्त्व मुस्लिम कट्टरवाद्यांनीही ओळखले होते. विविध स्थानिक भाषा संवादासाठी वापरणाऱ्या भारतीय मुस्लिमांना एकाच सूत्रात बांधण्यास हा धागा उपयुक्त ठरणार होता. हिंदुत्ववाद्यांना द्वेषाला सोयीचे असलेले गृहितकच कट्टरतावादी मुस्लिमांना आपला गट बांधण्यास उपयुक्त ठरत होते. थोडक्यात आपापले स्थान बळकट करण्यासाठी दोनही विरोधकांनी अप्रत्यक्षपणे एकमेकांच्या हातात हात घेऊन पावले टाकली... आजही टाकत आहेत. आणि सामान्य त्यांच्यामागे फरफटत जात आहेत.

भूतकालभोगी हिंदुत्ववाद्यांनी संस्कृत ही प्राचीन आणि हिंदी ही अर्वाचीन भाषा आपल्या भाषिक राष्ट्रवादाचे साधन म्हणून पुढे रेटायला सुरुवात केली आहे. आणि त्यासाठी उर्दूला मागे रेटणे त्यांना अपरिहार्य ठरले. त्यासाठी याच देशात निर्माण झालेली, गंगा-जमनी संस्कृतीचे एक प्रतीक असलेली उर्दू त्यांनी मुस्लिम समाजाच्या ओटीत टाकली, नव्हे त्यांना करकचून बांधून टाकली. आणि मग ‘त्या अमंगळ लोकांची’ भाषा आत्मसात करण्यापासून आपल्या लोकांना परावृत्त करणे सोपे झाले.

द्वेष रुजवणे हा सर्वात सोपा उपाय दोन्ही धार्मिक कट्टरतावादी वापरतात. तो सर्वाधिक परिणामकारकही असतो. एखाद्या झाडाच्या मुळाशी मोरचूद टाकून निश्चिंतपणे निघून जाणाऱ्या आणि त्या झाडाचा तिळतिळ होत जाणारा मृत्यू समाधानाने पाहात राहणाऱ्या विकृत लाकूडतोड्यासारखे हे दोघे गळ्यात गळा घालून या भाषिक लढाईतून समाजातील भेग वेगाने वाढत जाताना पाहून संतोष पावत असतात. माथेफिरु धर्मवेडापायी दंगली पेटवून नरबळी देण्यासही न कचरणारे एखाद्या भाषेच्या हत्येबाबत संवेदनशील असतील ही अपेक्षाच मूर्खपणाची आहे.

अमंगळ लोकांच्या भाषेचा मुद्दा आला आहे तर हिंदुत्ववाद्यांच्या लाडक्या संस्कृतचा उल्लेखही अपरिहार्य आहे. सोयीचा इतिहास, समाजव्यवस्था, नीतिनियम रुजवणे, त्यासाठी उपयुक्त ठरणारा प्रॉपगंडा ऊर्फ प्रचार-प्रसारासाठी माध्यमांचे महत्व ब्राह्मणांनी फार प्राचीन काळापासून चोख ओळखले होते. त्यामुळे देवांशी आपले देवांशी ‘हॉटलाईन कनेक्शन’ असल्याचा दावा करणाऱ्या त्या जमातीने देव-भाषा म्हणत तिला इतर अमंगळ समाजामध्ये फारसे रुजू दिले नाही. त्यातून पवित्र देव-भाषा विटाळेल असा त्यांचा दावा होता.

पुढे ब्रिटिशांसोबत आलेल्या इंग्रजी भाषेसोबत आलेल्या रोजगार संधीही सर्वप्रथम साधणाऱ्या याच समाजाने व्यवहारात संस्कृतचे बोट सोडले. त्यातून तिची पीछेहाट होत गेली. त्यांच्याच कर्माने मरु घातलेली ही भाषा जिवंत ठेवण्यासाठी आणि प्राचीनत्वाचा सोस मिरवण्यासाठी आता त्याबाबत आक्रोश सुरु आहे. विशेष म्हणजे तो करणारे स्वतः आपल्या पुढच्या पिढीला इंग्रजी आणि चोख व्यावहारिक शिक्षणच देत आहेत. संस्कृत ही भाषा त्यांच्या खांद्यावरचा एक अस्मितेचा झेंडा म्हणूनच शिल्लक राहिली आहे.

थोडक्यात संस्कृतच्या ठेकेदारांनी तिला आपल्याच लोकांपासून दूर ठेवून तिची वाढ खुंटवली, इंग्रजीच्या आगमनानंतर स्वत:ही तिचा हात सोडून तिला वाऱ्यावर सोडली. आता केवळ देव्हाऱ्यातल्या शाळिग्रामासारखी तिची पळभराची पूजा उरकून इंग्रजीची दिवसभराची चाकरी करायला ते चालते होतात.

हिंदुत्ववाद्यांनी आणि मुस्लिम कट्टरतावाद्यांनी कितीही भेग पाडण्याचा प्रयत्न केला तरी, संस्कृतला ज्या दुर्भाग्याला सामोरे जावे लागले तसे उर्दूला सामोरे जावे लागलेले नाही. उर्दू ही भारतीय मुस्लिमांची भाषा ही हाकाटी दोन्ही बाजूंनी केल्याने, भाषांनी विभागलेल्या मुस्लिम समाजाला एक सामायिक ओळख मिळत असल्याने ती आनंदाने स्वीकारली हे खरे. पण असे असूनही तिच्यामध्ये निर्माण झालेल्या दर्जेदार साहित्यामुळे, विशेषत: शायरीमुळे, ती मुस्लिम समाजाबाहेरही अंगीकारली नि अभ्यासली गेली आणि वाढत गेली. भाषेच्या आणि लिपीच्या पावित्र्याच्या खुळचट कल्पनांनी आपल्याच भाषेची हत्या करणाऱ्यांच्या हाती उर्दूचा द्वेष करण्यापलिकडे काही उरलेले नाही.

जश्न-ए-रेख़्तामधील त्या मुलाखतीदरम्यान जावेद अख़्तर समोरच्या पंजाबी तरुणांना जावेद तळमळीने विचारतात, ‘अरे तुम्ही सर्वाधिक उत्तम साहित्य यात निर्माण केले, ही तुमची भाषा आहे. मग तुम्ही असे कसे तिला इतरांच्या ओटीत टाकून मोकळे होतात, आपल्याच अपत्याला असे कसे नाकारता?’

खरंतर त्यांना हा प्रश्न पडायला नको. इथला करंटा हिंदू समाज ‘ब्रेड खाल्ला म्हणन त बाटलास’ म्हणत आपल्याच लोकांना ख्रिश्चन धर्माच्या ओटीत टाकून मोकळा होत असे. एखाद्याची जबरदस्तीने सुन्नत केली गेली म्हणून, मूळ धर्म, देव-विचार-परंपरा-रीतीभाती यावरची श्रद्धा कितीही अभंग असली तरी त्याला मुस्लिम मानू लागे. यांना श्रद्धेतून, बांधिलकीतून निर्माण होणारी ओळख मान्य नाही. त्यांना ती कर्मकांडांच्या प्रांतातच शोधायची असते. काहीही नि कुणालाही आपलेसे करण्यापेक्षा दूर ढकलण्यास उत्सुक असलेला हा समाज आहे. त्यातील अगदी पुरोगामी मंडळींमध्येही मला हा दोष ओतप्रोत भरलेला दिसतो.

१७९८ मध्ये, म्हणजे जेमतेम सव्वादोनशे वर्षांपूर्वी कुराण उर्दूमध्ये प्रथम अनुवादित केले गेले. सिंधीतील त्यापूर्वी सातशे वर्षे (हा तपशील अख़्तर यांनी दिलेला, बरोबर चूक मला माहित नाही!) ‘अशा अमंगळ भाषेत आमचे पवित्र पुस्तक लिहिले’ म्हणून हे करणाऱ्याविरोधात मौलवींनी फतवा जाहीर केला होता! थोडक्यात मौलवी लोक अठराव्या शतकाच्या शेवटी उर्दूला अमंगळ भाषा मानत होते! ती मुस्लिमांची असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता! त्यामुळे द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांच्या सोयीसाठीच ती मुस्लिमांची भाषा ठरवली गेली हे उघड आहे.

अख़्तर यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे तो असा की बहुतेक भाषांमधले पहिले साहित्य हे धार्मिक आहे. उर्दू ही अशी पहिली आणि कदाचित एकमेव भाषा आहे जिचे पहिले साहित्य हे विद्रोही आहे. आणि अगदी अख़्तर म्हणतात ते शब्दशः खरे असले/नसले तिचा प्रचार-प्रसार हा शायरीच्या माध्यमातून झाला ज्यात तरक्कीपसंद शायरीचा वाटा मोठा आहे.

उर्दू ही या देशातच तयार झालेली भाषा आहे, सर्वात अर्वाचीन, सर्वात तरुण भाषा आहे. त्या अर्थी ती तरुणांची आहे, तशीच दार्शनिक शायरांचीही. एका धर्माच्या दावणीला तिला बांधणारे द्वेषाने आंधळे झालेले असतात. हे आधी द्वेष करतात, तो परिणामकारक ठरत नाही म्हटल्यावर मग ‘ही आमचीच’ म्हणत त्याला आपल्या रंगाचा लेप देण्याचा प्रयत्न करत असतात.

मुळात सजीवांनी भाषा विकसित केली ती संवादासाठी, संदेशांच्या वा विचारांच्या देवाणघेवाणीसाठी. माणसांची भाषा तर अधिक समृद्ध. अन्य सजीवांप्रमाणे तिला केवळ वर्तमानाचे बंधन नाही. भूतकाळाचे, भविष्यकाळाचे, इतकेच काय निखळ विचाराचेही पैलू तिला मिळत गेले आहेत. अशा वेळी तिला द्वेषाचे, फाटाफुटीचे साधन बनवणाऱ्या विकृतांच्या झुंडींचा विवेकी विरोध अतिशय महत्वाचा ठरत असतो. जावेद अख़्तर हे त्या विवेकी विरोधाचे एक अध्वर्यू म्हणून उभे आहेत.

त्यामुळे या झुंडींच्या सोयीची काही घडले म्हणून अख़्तरांचे कौतुक करणे हे तात्कालिकच असणार आहे. परंतु यातून ‘बरेच मतभेद असणाऱ्यांचे नि आपले काही बाबतीत मतैक्यही असू शकते, त्याला थेट शत्रू मानण्याचे कारण नाही’ हे शहाणपण ही मंडळी शिकतील असे मुळीच नाही. नव्या मतभेदाच्या मुद्द्यावर अख़्तर यांना पुन्हा शिव्याशाप नि पाकिस्तानचे तिकीट(!) मिळेल यात शंका नाही. अख़्तर हे उर्दूचे पक्षपाती आहेत आणि त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे मुस्लिम आहेत ही दोन कारणे या मंडळींना त्यांचा द्वेष करण्यास पुरेशी आहेत.

- oOo -


हे वाचले का?

मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ३ : प्रतिबिंबांचा प्रश्न

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

हा बिम्म आहे << मागील भाग

---

BemmaAaniBimma
बेम्म आणि बिम्म ( https://www.nenko.com/ येथून साभार.)

एकदा एका कापडाच्या दुकानात बिम्मला दोन आरसे दिसले. एकात डोकावून पाहिले तर त्यात उंचच उंच काठीसारखा बिम्म दिसला, तर दुसर्‍यात तो हवा भरलेल्या फुग्यासारखा जाडजूड दिसला. आता हे दोघे कोण बुवा? असा प्रश्न निर्माण होणे अपरिहार्य होतेच.

मग घरी परत येईतो त्याच्या कल्पनेचा वारू उधळतो. त्यापैकी उंच माणसाचे नाव बेम्म आणि फुग्यासारख्याचे नाव बूम्म आहे असे निश्चित केले जाते.

घरी आल्यावर तो आईला हे सारे सांगून त्याच्या मते अवघड प्रश्न विचारतो, 'यातला खरा बिम्म कोण ते तुला ठाऊक आहे का?'

’मी कोण?’ या प्रश्नाचा हा पुढचा टप्पा दिसतो, ’यापैकी मी कोण?’!

बिम्म हा बब्बीचा भाऊ आहे, आईचा/बाबांचा मुलगा आहे, मागच्या आवारातील आजोबांचा मित्र आहे... आणखी बराच काही आहे. त्यापैकी खरा बिम्म कोण हा प्रश्न आहे. तो जीएंनी आरशांतील प्रतिबिंबांच्या रूपकातून विचारला आहे... आणि त्याचे उत्तरही शेवटी बिम्मच्याच तोंडून देऊन टाकले आहे.

गोष्टीमध्ये आरशांचा उल्लेख असला तरी त्याला एकुणात माणसाच्या वास्तविक ओळखीच्या व्याख्येचा संदर्भ आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे. जन्मलेल्या प्रत्येक माणसाला जन्मत: नावाबरोबरच इतर काही ओळखी चिकटलेल्या असतात. तो कुणाचा मुलगा असतो, कुणाचा भाऊ असतो अथवा बहीण असते, कुणाचा नातू वा नात असते...

या क्रमाने सामाजिक उतरंडीमध्ये त्याचे एक स्थान निर्माण झालेले असते. त्यामुळे ’अमुक व्यक्ती कशी आहे?’ या प्रश्नाचे चांगली, वाईट, मनमिळाऊ वगैरे उत्तरे देता येत असली, तरी ती त्या प्रश्नाप्रमाणेच ढोबळ राहतात. ती व्यक्ती ’भाऊ म्हणून कशी आहे?’, ’कुणाचे वडील म्हणून कशी आहे?’, ’कुणाची मुलगी म्हणून कशी आहे?’,’कुणाची मैत्रिण म्हणून कशी आहे?’ हे आनुषंगिक प्रश्न असतात, ज्यांची उत्तरे स्वतंत्रपणे शोधून त्यांची समष्टी अथवा सार हे मूळ प्रश्नाचे उत्तर म्हणून घेता येते. बिम्मच्या या प्रश्नाला जीएंनी आरशांचे रूपक वापरले आहे.

आरशात दिसणारे, हालचाल करणारे ’ते कुणी’ लहान मुलाच्या, घरातील पाळीव प्राण्या-पक्ष्यांच्या कुतूहलाचा भाग असते. समोर दिसते ते आपले प्रतिबिंब, आपण असे दिसतो याचा शोध लहानपणी जेव्हा लागतो, तेव्हा या नव्याने सापडलेल्या माध्यमातूनच माणसाचं पिलू स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात करत असतं. पण ’काय खरं नि काय खोटं?’ या ढोबळ, काळ्या-पांढर्‍या विभागणीपाशी न थांबता, साक्षेपी चिकित्सक आणखी एक पाऊल पुढे टाकून ’किती खरं नि किती खोटं?’ हा पुढचा प्रश्न हाती घेत असतो.

बिंब आणि प्रतिबिंबातील खर्‍या-खोट्याचे भास नि सत्य-वास्तवाचे कोडे जीएंना नेहमीच मोहवत असावे असे दिसते. 'इस्किलार'(१) मधल्या गारुड्याच्या तोंडी ते येते. त्यांच्या 'प्रवासी'(२) मधला आंधळा शिकारी प्रतिबिंबांचे जाळे निर्माण करतो. त्याद्वारे मानवी दृष्टिला दिसणारे निश्चित वास्तव विस्तार पावल्यास संशयाच्या भोवर्‍यात सापडते, हे स्वत:ला अंधाहुन अधिक लायक समजणार्‍या डोळसांना दाखवून देतो.

हे अंध-डोळसाचे तत्त्व त्यांच्या ‘ठिपका’(३) मधे पुन्हा एकदा डोकावते. ‘प्रवासी’मध्येच प्रवाशाला भेटलेला पांगळा जटाधारीही त्यासंबंधीचे एक आकलन त्याच्या ओटीत टाकून देतो. ‘माणसे: अरभाट आणि चिल्लर’ मध्ये ते अ‍ॅलिस इन वन्डरलॅन्डमधील अ‍ॅलिसचा आरशाशी आलेला संबंध अधोरेखित केला जातो. अ‍ॅलिसची मूळ कथाच स्वप्न-सत्याच्या संभ्रमाभोवती विणली गेलेली आहे. तिचे आरशामध्ये प्रवेश करणे म्हणजे पर्यायी नियमांनी बद्ध अशा प्रतिबिंबांच्या जगाला सामोरे जाणेच आहे.

त्यांच्या ’प्रवासी’मध्येच अकाल या दैत्याला मोह असलेले हिरवे रत्न त्याला प्राप्त होऊ शकत नाही, समोर आले तरी त्याला ते ओळखता येत नाही. कारण त्याच्या दृष्टिची मर्यादा, त्याचे रंगांधळेपण. परंतु त्यात पुन्हा एक पळवाट होती. तो रंगांधळा असला तरी आरशातील प्रतिबिंबांमध्ये त्याला सारे रंग दिसू शकतात. तो हिरवा रंगही त्याला आरशामध्ये- म्हणजे पुन्हा प्रतिबिंबामध्ये मात्र दिसू शकला असता. हा उपाय त्याच्या भावाला- महाकालाला ठाऊक असूनही स्वार्थापोटी तो अकालास ते सांगत नाही. म्हणजे अकालाला त्याच्या भावाच्या नजरेतून दिसणारे स्वत:चे प्रतिबिंब यथातथ्य नाही, महाकालाच्या स्वार्थाने ते दूषित झालेले आहे.

त्यांच्याच ‘अस्तिस्तोत्र’(४)मध्ये ते म्हणतात, ‘समुद्राचा करडा पडदा स्थिर आहे. त्यांच्यात आपली प्रतिबिंबे आहेत म्हणून आपण अस्तित्वात आहो असे नि:शंकपणे खडकांना वाटते.’ म्हणजे एखाद्याच्या अस्तित्वाचे प्रमाण अथवा सिद्धता देण्याचे माध्यम म्हणून प्रतिबिंबाचा वापर केला जातो आहे. माणसाला स्वत:बद्दलचे पुरे आकलन वस्तुनिष्ठपणे करता येत नाही. यासाठी इतरांच्या नजरेने स्वत:कडे पाहण्यास सूचित करणारे हे रूपक जीएंच्या कथनातून वारंवार येत राहाते. ’बिम्म'च्या जीवनप्रवासाच्या सुरुवातीलाच हे प्रतिबिंबाचे कोडे त्याच्या पुढ्यात ठाकते, त्याच्या परीने तो ते सोडवतोही.

बिम्मचीच आई या प्रश्नाचे सरधोपट उत्तर देऊन टाकते. ती म्हणते, 'तूच खरा बिम्म. कारण तू तुझ्याइतकाच उंच आहेस नि तुझ्यासारखाच रुंद.' वरकरणी आईचे उत्तर बिनचूक आणि निरुत्तर करणारे आहे. पण बिम्म म्हणतो 'मुळीच नाही. आम्ही सगळेच खरे. फळीवरचे खाऊचे डबे काढतो तो उंच असलेला बेम्म. पण त्याला पोटच नाही. मग तो खाऊ खाण्यासाठी येतो तो बूम्म. ऐसपैस पोटाचा हा बूम्म सार्‍या खाऊचा चट्टामट्टा करतो. आता या दोघांची गरज संपली की बिम्म परत येतो.’ बिम्मच्या या खुलाशावर आई शरणचिट्ठी लिहून देण्यापलिकडे काही करूच शकत नाही.

ही तशी छोटीशी गोष्ट, बिम्मच्या वयाच्या मुलांची कल्पनेची भरारी लक्षात घेता अशा अचाट वाटणार्‍या कल्पना आपण त्यांच्याकडून ऐकत असतोच. पण बिम्मच्या बाबतीत हा कल्पनाविस्तार त्याच्या बाजूने निर्हेतुक असला, तरी त्या पलिकडे जाऊन जीएंनी त्यात बिम्मच्या आई-बापांसाठी काही ठेवून दिले आहे. इथे लहानांच्या नि मोठ्यांच्या विचारातला फरक पाहता येईल.

'या तीन बिम्म पैकी खरा कोण?' या प्रश्नाचे उत्तर शोधताना आईने तिच्या वाढल्या वयात घट्ट झालेल्या जाणीवांनुसार 'एकच बिम्म असू शकतो' हे गृहित धरून तो कोणता हे ठरवण्याचा प्रयत्न केला. हे तीनही खरे ही कल्पना तिच्या मनात उमटू शकली नाही. समोर दिसणारी तीन रूपे ही तीन वेगळी व्यक्तिमत्त्वे आहेत आणि त्यातून आपल्याला निवड करायची आहे, हे आई सहज मान्य करते आहे. खर्‍या खोट्याला एक निश्चित चेहरा असतो, सार्‍यांना तो सारखाच दिसतो हे कुसंस्काराच्या ओझ्याखाली वाढल्या वयाच्या माणसांचे गृहितक सोबत घेऊनच ती पाहते आहे.

बिम्मच्या माध्यमातून या आईला जी.ए. काही वेगळे सांगू पाहताहेत. ते दोन आरसे दाखवतात ती प्रतिबिंबे निव्वळ मूळ बिंबाचे 'जसे आहे तसे' प्रतिरूप नाहीतच. त्या पलिकडे जाऊन ते आपल्या - म्हणजे आरशांच्या - अंगभूत गुणांनुसार त्या बिंबाचे एक वेगळे प्रतिबिंब तुम्हाला दाखवतात. थोडक्यात एखादी व्यक्ती कशी आहे हे त्याच्या असण्या बरोबरच अनुभवणार्‍याच्या, ते तुमच्यापर्यंत पोचवणार्‍या दुसर्‍या - साक्षी असलेल्या - व्यक्तीच्या दृष्टिकोनावर, त्याच्या कुवतीवर आणि प्रामाणिकपणावरही अवलंबून असते.

दोन वेगळ्या व्यक्ती एकाच तिसर्‍या व्यक्तीबद्दल सर्वस्वी भिन्न चित्रे उभे करू शकतात ते त्यांच्या दृष्टिकोनामुळे, कुवतीमुळे आणि त्यात त्यांच्या मिसळलेल्या स्वार्थामुळे. ही चित्रे काहीशी बेम्म किंवा बूम्म सारखीच तर असतात, ते पूर्णांशाने बिम्म नसतात. पण त्यात थोडा थोडा बिम्म देखील असतो.

मग एकुणात 'बिम्म असा आहे' म्हणजे तरी नक्की काय. त्याचे असणे, ते पुरे चित्र, आसपासच्या इतरांच्या त्याच्याबाबत असणार्‍या अनुभवांच्या, मतमतांतराच्या निरपेक्ष असे उभे असते का? की यातला एक खरा नि इतर खोटे वा आभासी असे काही नसतेच? कदाचित असं म्हणू शकतो की हे सारेच बिम्म खरे असतात, त्यांच्या खरेपणाची व्याप्ती वेगवेगळी असते इतकेच !

Boomma
बूम्म (https://www.iStock.com/ येथून साभार).

बिम्मही त्या तिघांना एकाच व्यक्तिमत्त्वाची अभिव्यक्ती म्हणून पाहतो आहे, जे वास्तवही आहेच. बिम्म त्या आरशांसमोर उभा आहे तेव्हाच ते आरसे ती प्रतिबिंबे दाखवतात, आणि तेवढ्यापुरतेच त्या दोघांचे अस्तित्व असते. शिक्षण आणि संस्काराच्या चरकातून जाण्यापूर्वी, ’दोन भिन्न बिंदूंतून एक आणि एकच रेषा जाते’ यांसारख्या निश्चित विधानांच्या आधारे जगणे सुरू करण्यापूर्वी, माणसाच्या पिलाची दृष्टी अधिक नितळ असते, विभागणीऐवजी पैलूंचा, अनुषंगांचाही विचार करते, असे असावे का?

दुसर्‍या दृष्टीने पाहिले तर बूम्म आणि बेम्म ही बिम्म ची प्रतिबिंबे म्हणून न पाहता त्याचे एक एक अनुषंग (profile) म्हणून पाहिले तर आणखी एक वेगळाच दृष्टिकोन समोर येतो.

एकट्या बिम्मला जे साधणार नाही - फळीवरचे डबे खाली उतरवून खाऊ खाणे - ते बेम्म, बूम्म नि बिम्म मिळून पार पाडतात. नकळत का होईना सहकाराचे लहानसे तत्त्व कुठेतरी बिम्म शिकला आहे नि ते त्याच्या या कल्पनाविस्तारात डोकावते आहे. एकाच रूपातील बिम्म हा परिपूर्ण बिम्म नसतो, तर बूम्म, बेम्म आणि बिम्म मिळूनच एक पुरा बिम्म होत असतो.

एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबाबत आपण बोलतो, तेव्हाही विशिष्ट संदर्भात बोलताना त्याच्यामधल्या एखाद्या बेम्मबद्दल वा बूम्मबद्दलच आपण बोलत असतो, त्याला जाणून घेत असतो. अन्य एखाद्या संदर्भात तो सर्वस्वी वेगळ्या रूपात समोर येऊ शकते. तोही बिम्म असू शकतो!

(क्रमश:) पुढील भाग >> आपल्या पक्ष्याचा शोध     

- oOo -

(१). कथा: इस्किलार ; कथा-संग्रहः रमलखुणा.
(२). कथा: प्रवासी ; कथा-संग्रहः रमलखुणा.
(३). कथा: ठिपका ; कथा-संग्रहः काजळमाया.
(४). कथा: अस्तिस्तोत्र; कथा-संग्रहः सांजशकुन.

---

संबंधित लेखन:

द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च
सत्य-असत्याची कोण देई ग्वाही (पूर्वार्ध) : प्रचलित निकष


हे वाचले का?

शनिवार, १ एप्रिल, २०२३

पदवीधरा...

(एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने खुद्द पंतप्रधानांची पदवी दाखवावी अशी मागणी केली. त्यावर पंतप्रधानांच्या राज्यातील न्यायालयाने त्या मुख्यमंत्र्याला २५,०००/- चा दंड केला. या अनुभवावरून संगीताचार्य गो. ल. माल यांनी अशा प्रकारची मागणी करणार्‍यांना इशारा देणारे हे पद रचले.)

EDAttacks
(देवल मास्तरांची क्षमा मागून...) 
 
पदवीधरा हा बोध खरा
जिज्ञासा कबरीं पुरा ॥

संशय खट झोटिंग महा
देऊ नका त्या, ठाव जरा ॥

ईडीपिडा त्राटिका जशी ।
कवटाळिल ती, भीती धरा ॥

छिन्नमस्ता* ती बलशाली ।
आव मानितां, घाव पुरा ॥ 

---
* पूर्ण जीभ बाहेर काढलेलं महाकालीचं एक रूप. 

- oOo -

गीत/संगीत गो. ल. माल
नाटक: संशयलोळ
चाल: चल झूठे कैसी... 
	

हे वाचले का?