वर्णभेदभेदी कॅथी हॅरिस << मागील भाग
---
७ जून १९८१, इराक अण्वस्त्रांसाठी उपयुक्त इंधन तयार करत असल्याचा आरोप करत त्या देशातील ओसिरॅक अणुभट्टीवर इस्रायलने बॉम्बवर्षाव केला. आजवर इस्रायलने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आपल्या अणुकार्यक्रमाबाबत कायम ’नरो वा कुंजरो वा’ भूमिका ठेवली होती. उघड झालाच, तर तो स्वसंरक्षणार्थ आहे अशी मखलाशी यातून करणे शक्य होते. त्यांच्याच एका तंत्रज्ञाने लवकरच तो उघड केलाही. त्याचे नाव मोर्देशाय वानुनू.
एका कर्मठ ज्यू घरात जन्मलेला मोर्देशाय दहा वर्षांचा असताना आपल्या भलामोठ्या कुटुंबासह इस्रायलमध्ये स्थलांतरित झाला. लष्करी अभियांत्रिकी सेवेत तीन वर्षांच्या सक्तीच्या लष्करी सेवेनंतर सैन्यात भरती होण्याचा प्रस्ताव नाकारुन त्याने पुढील शिक्षणासाठी तेल अविव विद्यापीठात प्रवेश घेतला. शिक्षण संपल्यावर त्याने इस्रायलच्या ’निगेव अणुसंशोधन केंद्रा’त कामास सुरुवात केली. इथे वानुनूची आर्थिक प्राप्ती सरासरी इस्रायली नोकरदाराच्या कित्येक पट अधिक होती. एक सुस्थिर नि सधन आयुष्याची सुरुवात होत होती.
रोजगार चालू असतानच १९७९ मध्ये त्याने एंजिनियरिंगच्या औपचारिक शिक्षणासाठी निगेवच्या बेन गुरियान विद्यापीठात प्रवेश घेतला. पुढे त्याने अर्थशास्त्र आणि ग्रीक तत्वज्ञानाकडे आपला मोर्चा वळवला. यासोबतच त्याने भटकंती करत युरप पालथा घातला. या सार्यांतून त्याची राजकीयदृष्ट्या अधिक व्यापक होत गेली.
आफ्रिकेतील मोरोक्कोमध्ये जन्मलेल्या मोर्देशायचे बालपणही तिथेच गेले होते. इस्रायलमधील बहुतेक राजकीय आर्थिक सत्ता ही युरपमधून आलेल्या ’अश्केनाझी’ ज्यूंच्या हाती होती. लॅटिन वंशाचे’ ’सेफर्डिक’ आणि मोर्देशायसारखे मध्यपूर्व आशिया आणि उ. आफ्रिकेतून आलेले ’मिझ्राई’ ज्यू यांना दुय्यम भूमिकेत राहावे लागे. या विषमतेबद्दल अस्वस्थ होऊन त्याबद्दल तो उघड बोलू लागला. ताबडतोब ’डाव्या विचारांचा आणि अरब-धार्जिणा’ असल्याची नोंद त्याच्या गुप्त फाईलमध्ये झाली.
लहान-सहान बाबतीत त्याला समज देण्यात येऊ लागली. त्याच्या प्रत्येक प्रवासानंतर, कुण्या अरब मित्राशी वा अपरिचिताशी झालेल्या भेटीनंतर चौकशीच्या फेर्या सुरु झाल्या. त्यातून या अन्यायकारक व्यवस्थेबद्दल त्याच्या मनात अधिकच अढी निर्माण झाली. कट्टर धर्मश्रद्ध घरातील कडवा उजव्या विचारसरणीचा मोर्देशाय विचाराने डाव्या बाजूला झुकत गेला. त्याच्यातील बंडखोर जागा होऊ लागला. इस्रायलच्या छुप्या अणुकार्यक्रमाची लक्तरे जागतिक वेशीवर टांगण्याचे त्याने निश्चित केले.
१९८६ मध्ये तो ऑस्ट्रेलियामध्ये असताना त्याची गाठ एका कोलंबियन पत्रकाराशी पडली. त्याच्यामार्फत प्रसिद्ध ब्रिटिश वृत्तपत्र ’संडे टाईम्स’च्या पीटर हुनाम याच्याशी संपर्क साधला. पण काही फसव्या प्रकरणात यापूर्वी हात पोळले असल्याने त्यांनी आस्ते कदम जाण्याचे धोरण स्वीकारले. मोर्देशायने दिलेल्या माहितीमधील अणुविज्ञानासंबंधीच्या तथ्यांसंबंधी स्वतंत्रपणे तज्ज्ञांकरवी खात्री करुन मगच ही सारी माहिती प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला.
निगेवच्या केंद्रात सुरु असलेल्या प्रक्रियेबाबत मोर्देशायने माहिती संडे टाईम्सला दिली. यात अण्वस्त्रांना लागणार्या ट्रिटियम या इंधनाच्या निर्मितीसाठी आवश्यक असणार्या लिथियम-६ च्या निर्मितीप्रक्रियेचा समावेश होता. यातून इस्रायल वर्षाला तब्बल ३० किलो प्लुटोनियम तयार करत असल्याचे उघड झाले. आतापर्यंत त्या देशाने तब्बल १५० अण्वस्त्रे तयार करता येतील इतके इंधन जमा केल्याचे सिद्ध झाले. ओसिरॅकवर हल्ला करताना इराक अण्वस्त्रसज्ज होईल असा कांगावा या ’चोराच्या उलट्या बोंबा’ असण्याची शक्यता बळावली.
दरम्यान अधीर होऊन कोलंबियाच्या त्या पत्रकाराने स्वतंत्रपणॆ काही माहिती ’संडे मिरर’ या वृत्तपत्राला विकली. या संडे मिररचा मालक होता रॉबर्ट मॅक्सवेल, आणि हा इस्रायलच्या ’मोसाद’ या गुप्तहेर संघटनेचा हस्तक असल्याची वदंता होती. यानेच इस्रायलला वानुनूबद्दल सावध केले असे मानले जाते.
’मोसाद’ ही संघटना आंतरराष्ट्रीय कटकारस्थाने, अपहरणे, हत्या यांसाठी कुप्रसिद्ध आहे. त्यांनी आपले जाळे मार्देशायभोवती पसरायला सुरुवात केली. अखेर निर्वासिताच्या, एकलकोंड्या जिण्याला कंटाळलेल्या त्याला ’गुलाबी कोड्या’त अडकवण्यात त्यांना यश आले. रोममध्ये सुटीवर आलेल्या मोर्देशायचे अपहरण करुन एका व्यापारी जहाजातून इस्रायलला नेण्यात आले.
सर्व तांत्रिक बाबींची खात्री करुन झाल्यावर अखेर ५ ऑक्टोबर १९८६ रोजी ’संडे टाईम्स’ने इस्रायलच्या छुप्या अणुकार्यक्रमाबद्दलची माहिती जगजाहीर केली... आणि दोनच दिवसांनी म्हणजे सात ऑक्टोबर रोजी मोर्देशायला मोसादने इस्रायलच्या भूमीवर यशस्वीरित्या पोचते केले.
पुढल्या प्रदीर्घ संघर्षादरम्यान मोर्देशायने अनेक लहान लहान संघर्ष उभे केले. तुमची व्यवस्था कितीही बलवान असली तरी मी मोडणार नाही हे तो पुन्हा-पुन्हा सिद्ध करत राहिला. सर्वप्रथम त्याने त्याच्या तुरुंगातील सोयींच्या अभावाविरोधात तब्बल ३३ दिवसांचे उपोषण केले. पुढच्या प्रत्येक टप्प्यावर व्यवस्थेने केलेल्या लहान लहान अडवणुकींविरोधात त्याने न थकता प्रतिकाराचे अस्त्र उपसले. यात भेटीगाठींच्या अटींविरोधात केलेल्या लहान-सहान संघर्षांपासून, व्यवस्थेच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान देत ’आपले इस्रायली नागरिकत्व रद्द करावे’ या मागणीपर्यंत त्याचा लढा अथक चालू आहे.
ऑगस्ट १९८७ मध्ये त्याच्यावर देशद्रोह, हेरगिरी, गुप्ततेच्या कराराचे उल्लंघन आणि देशाच्या हिताला बाधा उत्पन्न करणारे वर्तन केल्याबद्दल खटला दाखल करण्यात आला. जो अर्थातच व्यवस्थेला अनुकूल अशा गुप्त पद्धतीने चालवला गेला. मार्च ८८ मध्ये त्याला निकाल लागून त्याला अठरा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. या शिक्षेदरम्यान त्याला बेकायदेशीररित्या एकांतवासाची शिक्षा देण्यात आली. तब्बल अकरा वर्षे तो एकांतवासात होता. त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न होता. पण मोर्देशाय त्याला पुरून उरला आणि २००४ मध्ये तुरुंगवासातून बाहेर आला.
पण या सुटकेचा अर्थ तो स्वतंत्र झाला आहे असा मात्र नव्हे. या सुटकेनंतरही त्याच्यावर असंख्य बंधने आहेत. त्याने त्या बंधनांचे उल्लंघन करावे आणि त्याबद्दल सरकारने पकडून त्याला शिक्षा करावी असा उंदरा-मांजराचा खेळ आजतागायत पंधरा वर्षांहून अधिक काळ चालू आहे. ना तो झुकतो आहे ना सरकार. जगाच्या नाकावर टिच्चून आपले राज्य वाढवत नेत असलेल्या एका दमनकारी व्यवस्थेच्या छाताडावर न मोडता तो उभा आहे.
१९८७ सालापासून जवळजवळ दरवर्षी त्याच्या नावाची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस होते आहे. पण २००९ मध्ये मोर्देशायने नोबेल पुरस्कार समितीला एक पत्र लिहून ’इस्रायलच्या अणुकार्यक्रमाचा जनक आणि माझा अपहरणकर्ता शिमॉन पेरेझ याचे नाव असलेल्या यादीमध्ये माझे नाव पाहण्याची मला इच्छा नाही. तेव्हा माझे नाव कृपया वगळावे.’ अशी विनंती केली. पुढे तो म्हणतो, ’मी जोवर स्वतंत्र नाही तोवर मी हे नामांकन वा असे पुरस्कार स्वीकारु शकत नाही. माझे स्वातंत्र्य हाच माझ्या दृष्टीने जगातील सर्वोच्च पुरस्कार असेल.’
- oOo -
(पूर्वप्रसिद्धी: दिव्य मराठी १४ जून २०२०)
पुढील भाग >> पर्यावरणाचा पहारेकरी: विल्यम सॅंजुअर
---
संबंधित लेखन:
१. विनोद दोशी नाट्य महोत्सव - २: मै हूँ युसुफ और ये है मेरा भाई
२. एका शापित नगरीची कहाणी
३. बेगिन, बालाकोट, बुश आणि अंधारातील अधेली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा