रविवार, ७ जून, २०२०

रंगार्‍याचा ब्रश

रंग लावण्याचा ब्रश हा परावलंबी असतो. भिंती(!)वर रंग लावण्याचे काम त्याचे असते खरे, पण रंग कोणता लावायचा ते डब्यात कोणता रंग आहे यावरुन ठरते. ’जा मी हा केशरी रंग लावणार नाही. लाल किंवा हिरवा आणलास तरच लावेन’ असे ब्रश कधी रंगार्‍याला सांगू शकत नाही. रंगार्‍याने निवडलेला रंग भिंतभर पसरवण्याचे काम तो इमानेइतबारे करत असतो. रंगार्‍याने आज लाल रंगाशी सलगी केली की ब्रश त्याचे फटकारे भिंतीवर मारतो. तो ओतून देऊन रंगार्‍याने ’केसरिया बालम’ निवडला की ब्रश त्या रंगाने भिंत रंगवून काढतो. थोडक्यात रंगार्‍याचा रंग बदलला की ब्रशचा रंग बदलतो, आणि त्याच्या भिंतीचाही!

ब्रशचा मालक असलेल्या रंगार्‍याच्या निष्ठा मात्र ब्रशइतक्या घनतेच्या नसतात, त्या तरल असतात. रोख पैसे मोजणार्‍या कुणाही घरमालकाच्या भिंतींना तो निवडेल तो रंग लावण्याची त्याची तयारी असते. त्यातही एका खोलीत एक रंग, दुसर्‍या खोलीत दुसराच अशी निवड असली तरी बिनतक्रार आपले काम करत राहतो. शिवाय रंग व्यवस्थित बसला नाही तर ब्रशच्या नावे खडे फोडून रंगारी तो फेकून देतो आणि नवा ब्रश आयात करतो. रंगार्‍याने घरमालक, आणि म्हणून रंग बदलला की जुना ब्रश हमखास फेकून दिला जातो.

ब्रश हा वापरुन घेऊन फेकून देण्याची गोष्ट आहे तर रंगांचा आधार असलेला प्रायमर किंवा पुट्टी हे रंगाला कायमस्वरूपी आधार देणारे. त्यामुळे रंग कुठलाही असला तरी त्याखालच्या प्रायमरला विसरायचे नाही. तो नसेल तर सारे रंग गळून पडतात नि भिंत बोडकी होते. पण तो रंगाच्या प्रसिद्धीमध्ये पार लपून गेलेला असतो. ब्रश निदान काही काळापुरता मिरवून घेतो. प्रायमरला तेवढे फुटेजही मिळत नाही. जेवढ्या काळापुरता तो भिंतीवर दिसतो त्या काळात कुणी त्याच्याकडे ढुंकून पाहात नसते. पण तरीही तो प्रायमर निरपेक्ष भावनेने सर्व भिंतींशी आणि रंगांशी सलगी राखून असतो, यांच्यापैकी कुणीही त्याला कसलीही प्रसिद्धी, कुठलेही exposure देत नसून!

रोख पैसे मोजणार्‍या घरमालकाच्या लहरीवर, रंगार्‍याच्या स्वार्थावर आणि प्रायमरच्या निस्वार्थ वृत्तीवर जग चालले आहे. ब्रश हा मर्यादित आयुष्य असलेला, त्या मार्गावरचा केवळ एक प्रवासी आहे इतकेच! प्रायमरची बांधिलकी भिंत आणि रंगाशी, रंगार्‍याची रंग लावण्याबद्दल मिळणार्‍या दामाशी, घरमालकाची त्याच्या घराशी. यात ब्रशला कुठेच स्थान नाही. तो या सार्‍या निर्मितीमागचे प्रासंगिक, नैमित्तिक कारण वा हत्यार आहे इतकेच. श्रेयाच्या वाटणीत त्याला कुठेच स्थान नाही. रंग पक्का बसला , पोपडे न निघता दीर्घकाळ टिकला तर प्रायमरच्या दर्जाला दाद मिळते. कोणत्याही ओरखड्याखेरीज रंगाचा सफाईदार थर बसला तर ते श्रेय रंगार्‍याचे. रंगाची निवड कुणाला आवडली तर घरमालकाची प्रशंसा... ’वा: ब्रशने काय सुरेख काम केले हो.’ अशी दाद कुणी दिलेली ऐकली आहे का?

हे एकदा ध्यानात घेतले की रंगांच्या अस्मितेचे खेळ खेळण्याचा मूर्खपणा ब्रश करत नाही. पण बहुतेक ब्रश इतके सुज्ञ असत नाहीत. स्वत:चा चॉईस नसलेल्या, रंगार्‍यानेच त्यांच्यासाठी निवडलेल्या रंगांच्या अस्मितेच्या लढाया ते खेळत राहतात. आणि लढता लढता विदीर्ण होऊन नष्ट होतात. मात्र रंगार्‍याला त्याचे सोयरसुतक नसते. शांतपणे जुना ब्रश फेकून देऊन तो नवा घेऊन येतो. घरमालकाला तर त्याचीही फिकीर नसते. खिशात चोख रोकडा असल्याने तो तर रंगारीही बदलू शकतो.

हे झालं रंगकामाबद्दल...

... धर्म, उद्योग आणि राजकारणाचे तरी याहून काय वेगळे असते हो!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा