रविवार, १४ जून, २०२०

अण्वस्त्रस्पर्धा आणि नग्न महासत्ता

इस्रायलच्या एका व्हिसलब्लोअरवर लेख लिहित होतो. जगाच्या डोळ्यात धूळ फेकून राबवलेल्या अणुकार्यक्रमांमधून इस्रायलने म्हणे १५० न्यूट्रॉन बॉम्ब बनवण्याइतके इंधन जमा केले आहे ! प्रश्न पडला...

... काय करायचे हो या १५० बॉम्ब्सचे? 

सांगा ना. नाही म्हणजे आमच्या डिस्नेच्या ’डकटेल्स’मधला अंकल स्क्रूज जसा आपले पैसे रोज मोजून खुश होतो तसे आहे का हे? की खरंच काही कामाचे आहेत इतके बॉम्ब?

नाही, मी शांततावादी भूमिकेतून नाही, सध्या निव्वळ गणिती मूल्यमापनाच्या आधारे हा प्रश्न विचारतो आहे. इस्रायलची सारी शत्रू-शेजारी राष्ट्रे- अगदी सगळी इस्लामिक राष्ट्रे धरली तरी, उध्वस्त करायला असले ते पन्नास बॉम्ब्स सहज पुरतील. मग उरलेल्या शंभरेक बॉम्ब्सचे काय लोणचे घालायचे का हो? कशासाठी निर्माण केले ते? का जमवले?

उत्तर एकच, माणूस हा हपापलेला प्राणी आहे. उपयुक्ततेचा विचार न करता तो हपापलेपणे गरजेच्या कित्येक पट जमवत राहतो... जमवत राहतो. पैसा मिळतो म्हणून जमवत राहतो. मग खूप पैसा झाला, की त्या पैशातून - एकावेळी एकातच राहाता येत असूनही- एकाहुन अधिक घरे बांधतो. त्याचे काय करायचे? द्या भाड्याने नि आणखी पैसा मिळवा आणि त्या पैशातून आणखी घरे बांधा... आणखी पैसे मिळवण्यासाठी! या सार्‍या मिळवलेल्या पैशातून किती उपयुक्ततामूल्य अथवा भोगमूल्य खरोखरच वापरले जाते हो? आणि जितके मिळवले ते सारे भोगण्याइतकी माणसाची भोगक्षमता तरी असते का हो? का जो पदार्थ जेमतेम काही रुपयांचा असतो गुळगुळीत टाईल्स, कडक इस्त्रीचे वेटर, झगमग दिवे लावलेल्या होटेलमध्ये जाऊन कैकपट पैसे देऊन खाल्ला तर त्याचे उपभोगमूल्य वाढले अशी स्वत:ची समजूत करुन घ्यायची... जमवलेल्या पैशातून आपण काहीतरी अधिकचे मिळवले असे समाधान करुन घेता यावे म्हणून?

केवळ आपल्याकडे अधिक आहे याचे वांझ समाधान मिळवण्यापलिकडे यातून काय साधते?

चंदूलालने दीड-दोन कोटी खर्च करुन कुठेतरी कोकणात निसर्गरम्य ठिकाणी म्हणे फार्महाऊस बांधले. त्याच्या मेन्टेनन्सला दोन माणसे ठेवून त्यावर नियमित खर्च केला. वर्षातून आठवडाभर तिथे राहण्यासाठी हा सारा जामानिमा. एरवी ते पडीक. मग इतर मित्रांना वा परिचितांना कधीतरी जाण्यास मुभा देऊन थोडा टेंभा मिरवायचा. किंवा सरळ त्याचे एरवी भाड्याने देण्याचा धंदाच करायचा... म्हणजे आणखी पैसे मिळवायचे. ते खरं रे बाबा, पण त्यातले स्वत: भोगलेस किती... आठ दिवस!

या आठ दिवसांचे भोगमूल्य काढ बरे. काही हजारात काम होईल. त्यापेक्षा तूच असा एखादा चंदूलाल शोधून त्याच्या फार्महाऊसवर जा ना बाबा सुटीला. उगाच कोटभराचे मृगजळ कशाला उभारून ठेवायचे त्यासाठी? तर ’स्वत:च्या फार्महाऊसवर सुटी घालवतो’ या अस्मितेच्या झेंड्यासाठी हा खर्च! अर्थात कुणाच्या लहरीखातर तीन-चार हजार कोटींचे पुतळे नि त्याहून चौपट खर्च करुन जेमतेम तीन-चारशे किलोमीटर धावणारी रेल्वे उभे करण्याइतके पैसे खर्च करणार्‍या या श्रीमंतांच्या देशात कोटभर रुपये काहीच नाहीत म्हणा.

माणसे असली अव्यवहार्य वर्तणूक करतात म्हणून मूर्ख ठरतात. सिंह अथवा वाघाने ’चला हा हरणांचा जथा सापडला आहे तर भरपूर शिकार करुन साठवून ठेवू.’ असा विचार केला आहे का कधी? एक जनावर मारले, ते खाऊन पोट भरले की दिली ताणून असा त्यांचा खाक्या असतो. त्याने जर बरीच जनावर मारुन साठा केला, तर जिवंत सुटलेल्या हरणांची संख्या खूप कमी होईल. त्यातून त्यांच्या नव्या पिढीची संख्या कमी होईल. यातून हळूहळू सिंहाला शिकारीला उपलब्ध असणारी हरणे कमीकमी होत जातील. आणि भविष्यात या सिंहाला नाही, तरी त्याच्या पुढच्या पिढ्यांना अन्नाचा तुटवडा भासू लागेल. शिवाय एकाच वेळी भरपूर शिकार केली, तरी ते अन्न साठवून ठेवण्याचे तंत्र त्याला माहित नसल्याने त्यातून मिळालेले बहुतेक मांस हे सडून वाया जाईल. किंवा शिळे मांस खाऊन त्याला पोटाचे विकार होतील.

अर्थात हा सारा विचार, हा सारा तर्क करण्याइतकी सिंहाची बुद्धी परिपक्व आहे की नाही हा मुद्दा आहेच. सध्याच्या शास्त्रीय ज्ञानानुसार तरी तशी ती नाही असे म्हणता येईल. पण हेतूने नसले तरी कृतीने सिंह गरजेपेक्षा अधिक जमवून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही एवढे मात्र नक्की. म्हणून त्याच्याकडून गरजेहून अधिक शिकार होत नाही. म्हणूनच हरणांची वीण वाढू शकते, आणि त्यांच्यावर पोसल्या जाणार्‍या सिंहांचीही. स्वत:ला अक्कल आहे असा माणसाचा दावा असेल तर हे साधे गणित त्याच्या डोक्यात सहज शिरायला हवे. सिंहाच्या कृतीपेक्षा माणसाची कृतीमागे विचाराचे पाठबळ अधिक दिसायला हवे.

माणसाने आपल्या उपभोगक्षमतेच्या कैकपट संपत्ती वा उपभोग्य वस्तू जमा करुन श्रीमंतीचा टेंभा मिरवणे आणि एखाद्या देशाने - म्हणजेच त्याच्या संचालक मंडळाने - गरजेच्या कैकपट अधिक शस्त्रास्त्रांचे भांडार जमा करुन महासत्तेचा झेंडा मिरवणे हा सारख्याच पातळीवरचा मूर्खपणा म्हणायला हवा... फारतर व्याप्तीचा फरक आहे म्हणू या.

याहून कहर म्हणजे ’माझ्या देशाकडे १५० अ‍ॅटमबॉम्ब आहेत. लै भारी का नाय’ अशी फुशारकी रोजगाराची भ्रांत असलेल्या देशातील कुणी जयसिंह, गुटखा चघळता चघळता किंवा ’हर फिक्र को सिगरेट के धुएं में उडाता हुवा’ मारत असतो. महासत्ता म्हणजे नक्की काय. त्यात देशातील प्रत्येकाला पोटभर अन्न मिळेल इतपत रोजगार, परवडेल अशा दरात अत्याधुनिक आरोग्यव्यवस्था वगैरे जीवनावश्यक बाबींना स्थान असते की नसते? असे प्रश्न या ’जयसिंहा’च्या मनात कधी उमटत नसतात... कारण खूप अण्वस्त्रे असणॆ म्हणजे महासत्ता हे समीकरण त्याच्या डोक्यात रुजवणार्‍या हिंसापिपासू, सत्तापिपासू शासनकर्त्यांनी त्याच्या मेंदूची वैचारिक लोबॉटमी करुन टाकलेली असते.

आज या महासत्तेच्या वेडामुळे पृथ्वीवरील संपूर्ण लोकसंख्या किमान पाच-पंचवीस वेळा समूळ नष्ट करता येईल इतकी अण्वस्त्रे जगभर, विशेषत: इतरांच्या अण्वस्त्रांबाबत कांगावा करणार्‍या अमेरिका नि इस्रायलसारख्या देशांकडे, जमा झाली आहेत. पण या संपूर्ण लोकसंख्येला किमान गरजांसह जगवता येईल इतके अन्न नि आरोग्यव्यवस्था मात्र कोणत्याच देशाकडे नाही. कोरोनाच्या उद्रेकानंतरची ’महासत्ता’ अमेरिकेची स्थिती पाहता हे अधिकच अधोरेखित होते. त्या महासत्तेच्या दाव्याला नजरेला दिसूही न शकणार्‍या एका य:कश्चित विषाणूने पुरे नग्न केले आहे.

आणि तरीही माणसे मारणार्‍या शस्त्रांची स्पर्धा करत ’महासत्ता’ म्हणून मिरवणार्‍या सत्ताधार्‍यांची आणि त्यांच्या अर्धपोटी भाटांची संख्या काही कमी होत नाही.

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा