’इंडियन आयडॉल’ या तथाकथित गुणवत्ता-शोध स्पर्धेबाबत सध्या बरीच उलटसुलट चर्चा चालू आहे. मे महिन्यामध्ये त्यात स्व. किशोरकुमार यांना आदरांजली वाहणारा विशेष भाग सादर झाला. त्यात किशोरकुमार यांचे चिरंजीव आणि गायक अमितकुमार यांना खास पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी या कार्यक्रमातील गायकांचे कौतुक केले होते.
पण हा कार्यक्रम संपल्यावर अनेक किशोरप्रेमींनी त्या कार्यक्रमावर टीकेची झोड उठवली. या कार्यक्रमात किशोरदांच्या गाण्यांची पार वाट लावली असा सूर अनेक किशोरप्रेमींनी लावला. परीक्षक म्हणून बसलेल्या नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि अनु मलिक यांच्यावर टीकेची झोड उठली. स्वत: अमितकुमार तिथे उपस्थित असून त्यांनी याबाबत स्पष्टपणे न बोलता, उलट सुमार गायन नि गायकांची प्रशंसा केल्याबद्दल लोकांनी त्यांनाही धारेवर धरले.
अखेर एका स्वतंत्र मुलाखतीमध्ये ’हा कार्यक्रम आपल्याला अजिबात आवडलेला नाही. तो अध्येच थांबवावा अशी माझी इच्छा होती.’ असे अमितकुमार यांनी कबूल केले. ’गायक कसाही गायला तरी त्याचे कौतुकच करायचे’ असे मला आयोजकांकडून सांगण्यात आले होते’ असा खुलासा त्यांनी केला. दोनच आठवड्यांनी या स्पर्धेतील एक परीक्षक गायिका सुनिधी चौहान यांनी ’फक्त स्तुतीच करायची’ या नियमाला कंटाळून या स्पर्धेतून माघार घेतली. माजी परीक्षक सलीम मर्चंट यांनीही आपल्यालाही असेच सांगण्यात आले होते असा दावा केला. काही वर्षांपूर्वी एका चॅनेलवरील मराठी गीत-संगीत स्पर्धेदरम्यान आपल्याला असेच बजावण्यात आले होते अशी नाराजी परीक्षक म्हणून काम केलेल्या गायिकेने व्यक्त केली होती.
पण हे आता तसे गुपित राहिलेले नाहीच. अशा तथाकथित गुणवत्ता-शोध कार्यक्रमांतून कोणताही परीक्षक कोणाही स्पर्धकाचे सादरीकरण अगदी सुमार झाले, तरी थेट टीका करताना वा त्याचे विश्लेषण करुन नेमका सल्ला देताना दिसत नाही. फार फार तर सुधारणेला वाव आहे इतपतच टिपण्णी केली जाते.
इंडियन आयडॉलच्या 'किशोर कुमार स्पेशल’ भागानंतर ’फादर्स डे स्पेशल’मध्ये स्पर्धकांच्या वडिलांना स्टुडिओत बोलावून छानपैकी ड्रामा करण्यात आला. स्पर्धकांच्या पितृप्रेमाने गहिवरलेले परीक्षक कधी ढसाढसा रडले, कधी त्यांनी डोळे पुसले. पण मेलोड्रामाप्रेमी भारतीय प्रेक्षकही या अतिरेकाला वैतागले नि त्यावर चौफेर टीका सुरू झाली. समाजमाध्यमांतून यावर मीम्सचा, विनोदांचा भडिमार सुरू झाला.
प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी यावर मार्मिक टिप्पणी केली. 'टीका, गॉसिप जितके अधिक तितकी त्या कार्यक्रमाबद्दल चर्चा अधिक होणार नि त्यातूनही त्याला टीआरपीमध्ये फायदाच होणार' हे त्यांनी नमूद केले. ’देअर इज नथिंग लाईक बॅड पब्लिसिटी’ हा भांडवलशाहीचा मूलमंत्र आहे. चित्रपट अभिनेते वा अभिनेत्री जेव्हा एकमेकांवर टीका करतात तेव्हा ती छापणार्या वृत्तपत्रांचे वा चंदेरी नियतकालिकांचे, स्क्रीनवर दाखवणार्या चॅनेल माध्यमांचे उखळ तर पांढरे होत असतेच, पण त्या दोघांनाही माध्यमांत नि चर्चेत राहण्याचा फायदा मिळत असतो.
ा इंडियन आयडॉलचा ’बाप-शो’ असलेल्या अमेरिकन आयडॉलबद्दलही अशाच स्वरुपाच्या तक्रारी ऐकल्या होत्या. पण ते अधिक चलाख असल्याने म्हणा, वा त्यांचे प्रेक्षक वेगळे असल्याने म्हणा, त्यांच्याकडे परीक्षकही ’गुड परीक्षक, बॅड परीक्षक’चा खेळ खेळत असत. परीक्षकांना आयोजकांनीच भूमिका नेमून दिलेल्या असत. एखादा परीक्षक हा घणाघाती टीका करण्यासाठी बसलेला असे.
ज्यांना अन्य स्पर्धक जिंकावा अशी अपेक्षा आहे, समोरचा सादरकर्ता, गायक पराभूत व्हावा असे वाटते, अशा प्रेक्षकांना ही टीका मनापासून आवडत असे. त्यामुळे या टीकेतून समोरच्या नकोशा स्पर्धकाचे खच्चीकरण होऊन आपल्या पसंतीच्या स्पर्धकाला फायदा होईल, अशी त्यांना आशा असे. हा टीकाकार परीक्षक आपल्या लाडक्या स्पर्धकावरही अशीच टीका करतो हे त्यांच्या ध्यानात येत नसे. आणि आलेच तरी ती फारशी गंभीर नाही, उलट ’त्या दुसर्या स्पर्धकाला कस्सला फाडला’ असा समज ते करुन घेत.
भांडवलशाहीचा मूलाधार असलेल्या असलेल्या स्पर्धाव्यवस्थेत अधिकाधिक ग्राहक मिळवणे आणि त्यांच्याकडून जास्तीतजास्त उत्पन्न पदरी पाडून घेणे हे उद्दिष्ट असते. ग्राहकसंख्या जितकी अधिक तितका उत्पादनावर केलेल्या पायाभूत खर्चाचा त्यांना उचलावा लागणारा वाटा कमी. याचा परिणाम म्हणजे त्या उत्पादनाची विक्रीची किंमत कमी ठेवूनही अपेक्षित नफा मिळवणे शक्य होते. त्यामुळे अधिकाधिक ग्राहक मिळवण्यासाठी उत्पादनाचा पूर बाजारात सोडावा लागतो, नि हा प्रवाह वाटेवरल्या जास्तीत-जास्त घरांच्या उंबर्यापर्यंत कसा पोहोचेल याचा विचार करावा लागतो.
याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे समाजातील सर्वात तळाच्या वर्गातील व्यक्तीला प्रमाण मानून आपले धोरण आखावे लागते. आपले उत्पादन त्याला उपयुक्त ठरेल आणि त्याचवेळी आर्थिक, बौद्धिकदृष्ट्या त्याच्या आवाक्यात राहील हे पाहिले जाते. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी का होईना, भांडवलशाही उत्पादकाला हा ’समाजवादी’ मार्ग निवडावा लागतो. भांडवलशाहीच्या पोटातच असा समाजवाद असतो, त्याशिवाय तिला उभे राहता येणार नाही. श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेले, तर गरीबांची संख्या वाढत राहून ग्राहकांची कमी होत जाईल. उत्पादनाचा पायाभूत खर्च वाटून घेणारे कमी झाल्याने दरडोई वाटा वाढेल. त्यातून उत्पादनाची विक्री किंमत वाढत जाईल. आता हे उत्पादन आणखी ग्राहकांच्या आर्थिक आवाक्याबाहेर जाईल नि ग्राहक-संख्या आणखी कमी होईल.... उत्पादन अव्यवहार्य होत जाईल.
आणि म्हणून ’खपते ते विकते’ हे भांडवलशाहीतील माध्यमांचेही सूत्र आहे. त्यांना गुणवत्तेपेक्षा विक्रीमूल्य अधिक महत्वाचे असते. टीआरपी (Television Rating Point) अर्थात बहुसंख्येने दिलेली श्रेणी हा त्यांचा ध्रुवतारा असतो. त्याच्याकडे नजर ठेवूनच ते वाटचाल करत असतात. सामान्य माणसे मृत्यूला घाबरत नाहीत, इतकी ही माध्यमे टीआरपीच्या नुकसानीला घाबरत असतात. म्हणून आपल्या संभाव्य ग्राहकांपैकी कुणालाही नाराज करणे ते टाळतात.
इंडियन आयडॉल वा तत्सम स्पर्धेमध्ये स्पर्धकांचे दोष स्पष्ट सांगितले, तर ते आणि त्या स्पर्धकांचा पक्षपाती प्रेक्षकांचा गट दुरावेल नि टीआरपी घटेल अशी भीती असते. याखेरीज ’भावना दुखवून घेण्यास तत्पर’ असणार्यांच्या या देशात जात, धर्म, शहर, भाषा वा तत्सम निकषांच्या आधारे पराभूत स्पर्धकाने वा त्याच्या समर्थकांनी रान उठवले, तर आणखी नुकसान सहन करावे लागणार असते. कारण मिळणारे उत्पन्न त्याच्या समप्रमाणात वाढत वा घटत असते. इतकी काळजी घेऊनही ’पुढच्या फेरीत पाठवण्यासाठी इतके पैसे मागत होते. मी स्पष्ट सांगितले; माझ्या गुणवत्तेवरच गेलो/गेले तर जाईन, एक पैसा देणार नाही.’ वगैरे खरी वा खोटी मखलाशी करत स्वत:ची इमेज उजळण्याची, आपल्या पराभवाचे खापर माध्यमावर फोडण्याची चलाखी हे स्पर्धक समाजमाध्यमांवर करत असतातच.
त्यामुळे दर्जेदार कार्यक्रम देण्यापेक्षा ’बहुसंख्य लोकांना हवे ते’ देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि बहुसंख्य लोकांना काय हवे यासाठी माहिती जमा करण्यावर वेळ नि पैसा खर्च करत बसत नाहीत. आधीच प्रसिद्ध असलेल्या एखाद्या कार्यक्रमाच्या, मालिकेच्या कथानकात थोडेफार फेरफार करुन ते आपले कार्यक्रम उभे करतात.
मध्यंतरी 'एपिसोड्स' नावाची एक ब्रिटिश-अमेरिकन मालिका पाहण्यात आली. नव्या वर्षांतील कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी एका चॅनेलची बैठक सुरू असते. त्यात सहभागी असणारे सदस्य वेगवेगळ्या कल्पना सुचवत असतात. त्यावर चर्चा होत असते. थोडा वेळ शांत बसलेला नि अस्वस्थ झालेला प्रमुख त्यात हस्तक्षेप करतो. अन्य चॅनलवरील एका प्रसिद्ध मालिकेचा उल्लेख करतो आणि आपल्या सहकार्यांना म्हणतो की 'आपल्याला अशी मालिका हवी'. बस्स मीटिंग संपते!
मराठीमध्ये बाहेरख्याली नवरा आणि त्याची सर्वगुणसंपन्न बायको या समीकरणाने एक मराठी मालिका प्रसिद्ध होते आहे म्हटल्यावर लगोलग अन्य चॅनेल्सनी त्याच आधारावर दोन मालिका 'बाजारा'त आणल्या. प्रेक्षकांच्या पन्नास पिढ्या जन्मून सरून गेल्या तरी चिरतरुण राहिलेली एक सासू नि तिची गुणी सून यावर 'चार दिवस' चांगले जातात म्हटल्यावर अन्य चॅनेल्सनी त्या कथानकाचेही रतीब घातले. एकुणातच गुणी, सोशिक आणि शोषित सून मध्यवर्ती ठेवूनच बहुतेक मराठी मालिका टीआरपीचे गणित जमवू पाहतात. मध्यमवयीन स्त्रियांमधील मोठा वर्ग सासू वा एकुणातच सासरकडून शोषित असतो किंवा त्यांचा तसा समज असतो. या सुनेमध्ये तो स्वत:ला पाहात असतो. दुसरीकडे तरुण मुलींच्या महत्वाकांक्षांना चुचकारण्यासाठी याच सुनेला कर्तृत्ववान वगैरे दाखवून त्याही वर्गामध्ये टीआरपीचे गणित बसवले जाते. यातील नवरा जरी बाहेरख्याली रंगात रंगवलेला असला, तरी बहुतेक पुरुष प्रेक्षकांना पत्नीखेरीज प्रेमपात्र असणे यात शरमेपेक्षा पौरुषाचाच भास अधिक होत असल्याने, त्यांची त्याबद्दल तक्रार नसते. उलट त्याच्या कृतीमध्ये कदाचित ते आपली पुरी न झालेली महत्वाकांक्षा पाहात असावेत. एकुणात असे टीआरपीचे गणित चोख बसणारी ही चौकट थोड्याफार फरकाने चार ते पाच मालिका एकाच वेळी वापरत असतात.
ा मालिका जोरदार धंदा करत असताना महाराष्ट्रातील स्त्रियांच्या नि पददलितांच्या शोषणमुक्तीचे अध्वर्यू असलेल्या फुले पती-पत्नींच्या जीवनावरील ’सावित्री-ज्योती’ मालिका मात्र प्रेक्षकांअभावी, टीआरपीअभावी बंद केली जाते. इतिहासातील शूरवीरांची चरित्रे मिटक्या मारत पाहणार्या प्रेक्षकालाही याची लाज वाटत नाही. मग ती बंद करणार्या चॅनेलला का वाटावी? हिंदीमध्ये सागरांचे रामायण लोकप्रिय झाल्यावर पौराणिक-ऐतिहासिक मालिकांचा जो पूर आला त्यात तर सारे दर्जेदार, सुज्ञ मनोरंजन वाहून गेले, दिवंगत झाले. दूरदर्शनच्या काळात अतिशय व्यापक असलेले मनोरंजनाचे क्षेत्र ’खपेल ते विकेल’ बाण्याच्या खासगी वाहिन्यांनी ऐतिहासिक पौराणिक, विनोदी, कौटुंबिक आणि पोलिसी-कथा या चार विषयांत बंदिस्त करुन ठेवले.
खपते ते विकण्यात लाज पूर्णपणे कोळून प्यायलेली माध्यमे म्हणजे अर्थातच न्यूज-चॅनेल्स. वृत्तपत्रांना किंचित बांधिलकी वा प्रामाणिक व्यवसायाची बंधने पाळण्याची वृत्ती असते. इंटरनेट वेबसाईट्स त्या तुलनेत ’सैल चारित्र्याच्या’ असतात. न्यूज-चॅनेलमाध्यमे सरळ खिडकीत बसून प्रेक्षकांना डोळे मारण्यास निर्ढावलेली असतात, विधिनिषेध गुंडाळून बसलेली दिसतात. ’अमेरिकन आयडॉल’मध्ये रंगवलेला प्रयोग भारतीय वृत्त-चॅनेलवर राजकीय चर्चांच्या स्वरुपात सादर होतो. अर्थात इथे त्यांना सहभागी व्यक्तींना भूमिका नेमून देण्याची गरज नसते. मुळातच परस्परविरोधी भूमिका असलेल्यांना स्टुडिओच्या आखाड्यात सोडून चॅनेलमालक लढत सुरू झाल्याची घंटा वाजवत असतात. त्या मूर्ख चर्चकांच्या ’घमासान’ चर्चेला चॅनेल सबस्क्रिप्शन, जाहिराती, तो व्हिडिओ यू-ट्यूब वा तत्सम ठिकाणी अपलोड करुन पुन्हा टीआरपी आणि त्यातून आर्थिक लाभ अशा अनेक मार्गांनी मलिदा जमा करत असतात.
अयोध्या विवादाच्या निकालाच्या दिवशी चालू असलेल्या चर्चेमध्ये एका माध्यमाने तीन सुमार मॉडेल्सना भयाण मेकअप करुन राम, लक्ष्मण आणी सीतेच्या वेषात स्टुडिओत आणून बसवले होते. चर्चेदरम्यान मधून मधून हा कोदंडधारी श्रीराम ’मुझे न्याय कब मिलेगा’ असे अत्यंत करुण आवाजात विचारत होता. स्क्रीनवर चालते-बोलते श्रीराम पाहून धन्य-धन्य वाटणार्या शिक्षित अडाणी जनतेला प्रभू रामाचे हे बाजारीकरण अजिबात खटकले नाही. (गेल्या तीस वर्षांत बहुधा ते अंगवळणी पडले असावे.)
’इंडियन आयडॉल’सारख्या तथाकथित स्पर्धांच्या निकालांवर प्रेक्षक जात, गाव, विभाग याच्या आधारे पार्ट्या पाडून भांडणे लढवत असतात. दुसरीकडे चॅनेलवरील उथळ राजकीय चर्चांमधून होणार्या आरोप-प्रत्यारोपांना त्यात सहभागी असणार्यांच्या गटाचे लोक या-ना-त्या कारणाने पुन्हा समाजमाध्यमांत नेऊन गदारोळ करतात. त्यातून चॅनेल्सप्रमाणेच समाजमाध्यमांनी आपले उखळ पांढरे करुन घ्यायला सुरुवात केली.
या दरम्यान ’विविध जाती, धर्म, विभाग वगैरेंच्या आधारे गट बांधू पाहणार्या स्वयंघोषित समाजसेवकांना ’भावना दुखावणे’ या हुकमी हत्याराचा शोध लागला. कुठल्याशा मालिकेतील कुठल्याशा प्रसंगाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या, म्हणून कांगावा केला, की लगेच चॅनेल माध्यमे ’त्याची बाजू पण ऐकायला हवी’ म्हणत त्याला फुटेज देऊ लागल्या. त्या निमित्ताने वादंग शक्य तितका लांबवून ’ब्रेकिंग न्यूज’ची सोय करुन घेऊ लागल्या.
'चंदेरी दुनिया' म्हणत चित्रपट अभिनेत्यांच्या घरच्या नळाला पाणी आले नाही याचीही बातमी करणारी ही माध्यमे, एखाद्या लेखकाच्या, कवीच्या, नाटककाराच्या नव्या कलाकृतीबाबत बोलण्यास मात्र पाच मिनिटे देण्यास तयार नसतात. हपापलेपणे सतत सनसनाटीपणा, ’ब्रेकिंग न्यूज’च्या मागे धावणारे, ट्विटरवर कोणत्या अभिनेत्रीने कोणत्या अभिनेत्रीला खडसावले याची बातमी करणारे हे लोक, रचनात्मक, सर्जनशील कामांना जागा देण्यास नाखूश असतात.
मराठी माध्यमेही आता हळूहळू या प्रकाराला सरावू लागली आहेत. प्रथितयश वृत्तपत्रांची पोर्टल्स वृत्तपत्रीय चौकट सोडून टीआरपीच्या आखाड्यात केव्हाच धावू लागली आहेत. क्लिकबेटी शीर्षके (Click-bait titles) म्हणजे उत्सुकता वाढवणारी शीर्षके देऊन वाचकाला त्यावर क्लिक करण्यास, ती उघडण्यास भाग पाडणे हा पहिला टप्पा. दुसर्या टप्प्यात एकच बातमी एखादा परिच्छेद वा चार वाक्यांची भर घालून वेगळ्या शीर्षकाने प्रसिद्ध करुन त्यावर एकाहुन अधिक वेळा जाहिरातीचे पैसे वसूल करू लागली आहेत. तिसर्या टप्प्यात कमरेचे आणखी खाली सोडून म्हणजे अॅमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे ऑनलाईन विक्री करणार्या पोर्टल्सवरील डिस्काउंट सेलच्या जाहिराती, बातम्या म्हणून छापू लागली आहेत. बाजारात आलेल्या प्रत्येक मोबाईलची ’फीचर्स लीक झाली’, ’व्हिडिओ लीक झाला’ ही बातमी म्हणून छापत उत्पादकाकडून जाहिरातीचे पैसे वसूल करु लागली आहेत.
या पोर्टल्सवर पाहिले तर एक बातमी/लेख वाचून झाला की तळाला पोचताच लगेच दुसरा लेख चालू होतो. जगभरातील वेबसाईट्सवर ही युक्ती वापरली जाते. ’ते वाचून झाले, आता हे ही वाचा’ असे अप्रत्यक्षपणे उद्युक्त करुन वाचकाला आपल्या वेबसाईटवर आणखी वेळ व्यतीत करण्यास भाग पाडले जाते. याचा संबंध पुन्हा टीआरपीशी आणि जाहिरात उत्पन्नाशी आहे. चलाख मराठी पोर्टल्सवर अनुभव असा की भले तुम्ही राजकारण, समाजकारण, क्रीडा कोणत्याही विषयाशी संबंधित बातमी वाचली असेल, ही खाली येणारी बातमी हटकून अॅमेझॉन वगैरेंच्या सेलची किंवा ’तंत्रज्ञान’ विभागातील बातमी म्हणून छापलेल्या मोबाईलच्या नव्या मॉडेलची असते. थोडक्यात त्यांच्या उत्पन्नाच्या गाडीला जाहिरातींची अशी अनेक एंजिने जोडलेली असतात.
फोटो-धमाल वगैरे नावाखाली फक्त बिकिनीवेष्टित(?) अभिनेत्रींची, मॉडेल्सची छायाचित्रे छापणेही सुरु झाले आहे. एका वृत्तपत्राच्या वेबसाईटवर तर संपूर्ण नग्न स्त्री-पुरुष मॉडेल्सचे परस्परांना मिठी मारलेल्या स्थितीतील छायाचित्रही छापले होते. कॅमेर्याकडे पाठ असल्याने, दोघांची जननेंद्रिये झाकून नग्नतेच्या आरोपातून निसटण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते. मी मुद्दाम ते छायाचित्र उतरवून घेऊन फेसबुकवर टाकले, नि मराठी वृत्तपत्रांची पोर्टल्स वयात आल्याची उपहासगर्भ पोस्ट टाकली. अपेक्षेप्रमाणे फेसबुकने ते छायाचित्र नग्नतेचा शिक्का मारून काढून टाकले. अमेरिकन संस्कृतीमधील फेसबुकसारख्या माध्यमालाही जे आक्षेपार्ह वाटले, ते विकून टीआरपीचे चार-चव्वल कमावण्याची आमच्या ’मित्रपत्र’ पोर्टलची तयारी होती.
धंदेवाईकपणा हा एक निसरडा रस्ता (slippery slope) आहे हे त्यांना ठाऊक नाही असे मुळीच नाही. पण टीआरपी नि त्यातून मिळणार्या पैशापुढे सारे काही क्षम्य आहे या मतापर्यंत ती पोचलेली आहेत. All is fair in love and war या म्हणीला त्यांनी All is fair in love, war and TRP असे बदलून घेतले आहे.
'ब्लॅक मिरर’ या विज्ञान-काल्पनिकेच्या ’फिफ्टिन मिलियन मेरिट्स’ या एपिसोडमध्ये माध्यमांच्या धंदेवाईकपणावर भाष्य केले आहे... चॅनेल माध्यमात असणारे हे टीआरपीचे गणित आता वास्तव जीवनात येऊन बसले आहे. चलन नावाचा प्रकार नाहीसा होऊन त्याची जागा टीआरपीसदृश गुणांनी घेतली आहे. वेगवेगळी कामे करत हे गुण जमवायचे नि त्याआधारे जगण्यातले हवे ते मिळवायचे असे या जगात घडते आहे. ते ही मिळेलच असे नाही. आंघोळीच्या साबणासारख्या, कॉफीच्या एका कपासारख्या किमान गरजेच्या गोष्टी विकत घेण्यासाठी प्रथम काम करुन पुरेसे गुण मिळवावे लागतात.
कुणी कुठले कार्यक्षेत्र निवडावे हे कुणी संचालक निश्चित करत असतात. ते निवडण्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तीला नसते. गायिका होण्यास आलेल्या एका स्त्रीला पोर्नोग्राफी म्हणजे लैंगिकसंबंध चित्रित करणार्या चित्रपटांमध्ये अभिनेत्री होण्यास फर्मावले जाते. या गुलामगिरीविरोधात संतापलेला कुणी ’बिंग’ तिरमिरीसरशी जाऊन त्वेषाने संचालकांना सुनावतो.
पण चतुर संचालक त्याचा हा विद्रोहच ’विक्रीयोग्य’ आहे ओळखतात. त्याला चॅनेलवर विद्रोही कार्यक्रम करण्यास निवडले जाते. सदैव कशा न कशा विरोधात आक्रमक विद्रोहाची त्याची भाषणे विकली जाऊ लागतात, प्रेक्षकांना आवडू लागतात. विद्रोहाचीच क्रयवस्तू होऊन संचालक आणि बिंग दोघेही त्याचा फायदा लुटू लागतात.
आपल्याला त्रासदायक असलेली, पण जी बदलणे आपल्या कुवतीच्या बाहेरचे आहे अशी परिस्थिती बदलण्याचा एल्गार कुणीतरी करतो आहे, हे पाहूनच सामान्य माणसांच्या मनावरील ताण हलका होतो. मग त्या माणसावर भार टाकून ती निश्चिंत होतात. म्हणूनच प्राचीन काळात जन्मलेल्या देव-संकल्पनेपासून सुरू होऊन चित्रपटांतील ’अॅंग्री यंग मॅन’च्या गोष्टींपर्यंत आणि एखाद्या राजकारणी नेत्याच्या देशाला महासत्ता बनवण्याच्या वल्गना हातोहात विकल्या जातात... बिंगच्या चौकटबद्ध विद्रोहासारख्या.
उत्क्रांतीच्या सर्वात अर्वाचीन टप्प्यावर 'आपल्याला जगातलं सग्गळं कळतं' असं समजणारी मॅनेजर ही प्रजाती निर्माण झाल्यावर सारे व्यावसायिक निर्णय तिच्या मुठीत एकवटले गेले आहेत. बाजारातले सारेच विषय पाच-पाच गुणांसाठी शिकलेली ही मंडळी त्या सर्वच विषयांतले तज्ज्ञ असल्याच्या थाटात वावरू लागली आहे. केवळ नफ्याचे आकडे वाढवणे या एकमेव निकषांवर निर्णयांचे गोंधळ घालू लागली आहे. त्यामुळे मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रात गुणवत्ता विरलेली साडी नेसून माजघरातल्या अंधारात दिवस दिवस कंठू लागली आहे, आणि धंदेवाईकता चेहरा रंगवून टेलिव्हिजनच्या रंगीत खिडकीत बसून प्रेक्षकांना डोळे मारू लागली आहे.
गुणवत्तेपेक्षा विक्रीमूल्य अधिक महत्वाचे ठरल्यावर, माध्यमांनी काही नवे देण्याचा, लोकांच्या लोकांची अभिरुचीला नवी वाट दाखवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वत:लाच त्यांच्या वर्तुळात बंदिस्त करुन घेऊन त्यांच्याभोवती प्रदक्षिणा घालत आवस मागितल्यासारखे 'पैसे वाढा वं माय' म्हणायला सुरुवात केली आहे.
आणि हे चालू असताना 'वादंग झाला म्हणून' इंडियन आयडॉल पाहायला जाणारे, चटपटीत शीर्षक पाहून बातमी वाचण्यासाठी क्लिक करणारे, ’सावित्री-ज्योती’ऐवजी एका नवर्याच्या चार बायकांची मालिका पाहणारे, बिंगशी बांधिलकी जाहीर करण्याऐवजी, त्याचा विद्रोह स्क्रीनवर पाहून ’वा: छान’ म्हणून आपापल्या कामाला लागणारे प्रेक्षकही या पापात तितकेच वाटेकरी म्हणावे लागतील.
- oOo -
पुढील भाग >> माध्यमे - २: ’प्रॉफिट ही भगवान है’
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा