बुधवार, १४ जुलै, २०२१

भोपळे

मोठ्ठ्या कलादालनात
मोठ्ठ्या कलाकाराचे
मोठ्ठे प्रदर्शन चालू

आग्नेयेला
एक चित्र
माणसाचं वाटणारं
बिनधडाचं मुंडकं

नैऋत्येला
एक शिल्प
एक लोभस स्नोमॅन
सनबाथ घेणारा

ईशान्येला
एक कॅनव्हास
कचर्‍यातून कलेचा
उभा एक डोलारा

वायव्येला
फक्त एक टेबल
त्यावर मधोमध
ठेवलेला भोपळा


एक दाढीवाला म्हणाला,
परीक्षा व्यववस्थेवरचे
केवढे मौलिक भाष्य

एक झोळीवाला म्हणाला
हॅलोविनच्या पोकळतेचा
केवढा मार्मिक निषेध

एक जाड-भिंगवाला म्हणाला
अंतर्बाह्य रंगसंगतीचा
देखणा आविष्कार

एक बोकड-दाढी म्हणाली
आईन्स्टाईनच्या मेंदूचे
लक्ष्यवेधी इन्स्टॉलेशन

एक कुणी आला, तिथे  
पाण्याच्या बाटल्या ठेवून 
भोपळा घरी घेवोनि गेला

- oOo -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा