शुक्रवार, ३० जुलै, २०२१

थोरांची ओळख

शाळेत असताना एका वर्षी इतिहासातील महनीय व्यक्तींची चरित्रे अभ्यासाला होती. अभ्यासक्रमाच्या या पुस्तकाचे शीर्षक होते ’थोरांची ओळख’. पण अलिकडे असे ध्यानात आले की आसपास इतके थोर लोक आहेत की त्या सार्‍यांची ओळख करुन द्यायची तर किमान शतखंडी ग्रंथच लिहावा लागेल. हे फारच खर्चिक नि वेळखाऊ काम आहे. एरवी टोमणेबाजी करणारी मीम्स बनवू म्हटले तर नको नको म्हटले तरी लोक मदतीला येतील. पण अशा उदात्त कामात सहकारी मिळणेही अवघड... अचानक मला आई म्हणायची तो एक श्लोक आठवला.

आदौ राम तपोवनादि गमनम् हत्वा मृगं कांचनम् |
वैदेही हरणम् जटायू मरणम् सुग्रीव संभाषणम् ||
वाली निर्दालनम् समुद्र तरणम् लंकापुरी दाहनम् |
पश्चात्‌ रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम् ||

चार ओळीत संपूर्ण रामायण साररूपात सांगणारा हा श्लोक आठवला नि मी एकदम ’युरेका, युरेका’ म्हणत धावत सुटलो. सुदैवाने मी न्हाणीघरात नसल्याने अंगावर कपडे होते. भर चौकात आपल्या चारचाकी गाडीची काच खाली करुन गजरेवाल्याशी भावाची घासाघीस करणारा थोर इसम दिसला नि भानावर आलो.

घरी परतलो. छान शुचिर्भूत होऊन संगणकासमोर बसलो. बाजूला उदबत्ती लावली. समोर लेखन-गुरू केशवकुमारांचा फोटो ठेवून त्याला गुलालाचा टिळा लावला नि ही थोरांची ओळख लिहायला सुरुवात केली.

बटाटेवडा खाणार्‍यांपेक्षा, तो न खाणारे
नैतिकदृष्ट्या खूपच श्रेष्ठ असतात,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

आपल्या इमारतीसाठी वापरलेल्या विटा 
शेजारच्या इमारतीहून भक्कम आहेत, 
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

आपल्या कुंडीतील झाडे, शेजार्‍याच्या 
झाडांपेक्षा जास्त ऑक्सिजन सोडतात,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

’व्हीआयपी’ कंपनीचे बनियन वापरणारे
’रूपा’वाल्यांपेक्षा मनमिळावू असतात,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

पहिल्या मजल्यावर राहणारे लोक
तळमजल्यावरच्यांपेक्षा क्रूर असतात,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

दाढीमध्ये विषम संख्येने केस असणारे
सम संख्या असणार्‍यांपेक्षा शूर असतात 
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

’अ’ आद्याक्षरवाल्यांपेक्षा ’म’वाल्यांना
साहित्यिक पुरस्कार अधिक मिळतात,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

टोपी घालणार्‍यांपेक्षा ती शिवणारे
अधिक बुद्धिमान असतात
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

चार मुलांना जन्म देणार्‍या बापापेक्षा
दशपुत्र-उत्पादक बाप महान असतो,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

पांढर्‍या कागदावर लिहिलेल्या कवितेपेक्षा
’खाकी’वरील कवितेला अधिक खोली असते
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

संत्र्याचा फोटो चिकटवलेल्या फोनला
टरबूजवाल्या फोनपेक्षा जास्त रेंज मिळते,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

माणसाच्या बाह्य कपड्यांवरुन
अंतर्वस्त्राचा रंग ओळखता येतो,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

रस्त्याच्या पूर्व बाजूला राहणारे
पश्चिमवाल्यांपेक्षा श्रीमंत असतात,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

कॉसमॉस बॅंकेत काम करणारा माणूस
जनता बॅंकवाल्यापेक्षा अधिक चांगला गातो, 
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

चार चाकी गाडीत बसल्याबसल्या
प्रत्येकी दहा रुपये किंमतीचे तीन गजरे
विक्रेत्याकडून वीस रू. ला मागतात...
... ते सर्व थोर असतात

हे सगळं कळलं, कळलं तरी 
वळलं नाही, वळलं तर उमगलं नाही,
असे ज्यांच्या बाबत होते...
... ते सर्व थोर असतात

सगळं काही कळलं, वळलं नि उमगलंही
आणि तरीही ’आम्ही नाही बुवा यातले’
असे ज्यांना वाटते...
... ते सर्वही थोरच असतात

- रमताराम

- oOo -

संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा