'कट्यार काळजात घुसली' - एक दृष्टिक्षेप (पूर्वार्ध) : सेरिपी << मागील भाग
---
'कट्यार...' नाटकाबद्दल बाबत बोलताना प्रामुख्याने त्यातील व्यक्तिरेखांचा विचार मागील भागात केला आहे. आता याच व्यक्तिरेखा चित्रपटात कशा येतात ते पाहणे रोचक ठरेल. पण सुरुवातीलाच हे स्पष्ट केले पाहिजे चित्रपटाचे नाव नि कथानकाचा गाभा तोच असला तरी चित्रपट ही एक स्वतंत्र कलाकृती आहे हे अमान्य करता येणार नाही. तेव्हा 'नाटकात जे आहे ते इथे का नाही किंवा चित्रपटात नव्याने जे आले आहे ते का आले आहे?' हे दोन प्रश्न गैरलागू आहेत. ते चित्रपटकथालेखकाचे स्वातंत्र्य मान्य करायला हवे. परंतु दोन्हींमध्ये जे सामायिक आहे त्याची तुलना मात्र करणे शक्य आहे नि न्याय्यही.
चित्रपटात सामान्य प्रेक्षकासाठी बरेच रंग गडद करावे लागतात हे मान्य. पण चित्रपटात गडदच काय पण भडक करून वर पात्रांची नि कथानकांची संपूर्ण मोडतोड केली आहे. इतकी की मूळ शालीचे तुकडे करून भलत्याच क्रमाने जोडून त्याची गोधडी केल्यासारखे दिसते. हे खरे की चित्रपटाच्या निर्मात्याला त्यांची कलाकृती घडवण्याचे स्वातंत्र्य आहे, पण जेव्हा दारव्हेकरांच्या मूळ कलाकृतीचे नुसते नावच घेतले असे नव्हे, तर त्या कथानकावर आधारित असे मान्य केले असेल, तर निव्वळ पात्रांची नावे आणि काही संवादांचे उचललेले तुकडे नि किमान पार्श्वभूमी या पलीकडे मूळ नाटकाशी त्याचा सांधा जुळायला हवा.
पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे दारव्हेकरांचे 'कट्यार...' हे सुष्टांच्या संघर्षाचे नाटक आहे, जे परिस्थितीजन्य बंधनांतून उभे राहते, तर पडद्यावरचे 'कट्यार...' हे सुष्ट-दुष्टांच्या भडक कथानकाच्या स्वरूपात उभे आहे. हे पुरेसे नाही म्हणून की काय पंडितजी नि खाँसाहेब हे भिन्नधर्मीय असल्याचा फायदा घेऊन त्याला हिंदु-मुस्लिम संघर्षाचे एक अस्तरही जोडून दिले आहे. (सतत पराभूत होणार्या खाँसाहेबांना पटकेवाला हिंदू 'परास्त खान' म्हणून हिणवितो तर दर्ग्यातले मुस्लिम सदाशिवच्या पराभवाबद्दल त्याची हुर्यो उडवतात. ते तसं घडावं म्हणूनच जणू मूळ नाटकातला सदाशिवला चोरुन गाणे ऐकताना पकडल्याचा प्रसंग हवेलीतून उचलून दर्ग्यात आणून ठेवला आहे.) भरीला एक इंग्रज आणून त्याने खाँसाहेबांना चिथावण्याचा प्रसंग घालून ते अधिकच बटबटीत पातळीवर नेऊन ठेवले आहे.
इतक्यावरच न थांबता खाँसाहेब स्वतःला रामलीलेत जाळल्या जाणार्या रावणाच्या जागी स्वतःला पाहतात असे दाखवून आणखी सुर-असुर संघर्षही त्याला जोडून दिला आहे. बरं संकेतार्थाने हा काळा-पांढरा बालिशपणा पुरेसा नव्हता म्हणून की काय निवेदन करणारी कट्यार ''रावणाचे दहन केले की त्याचा परकाया-प्रवेश झाला?' असे म्हणत संकेतार्थ वगैरे न समजणार्या सामान्य - कदाचित तिच्या मते बुद्दू - प्रेक्षकाला हे 'समजावून'ही सांगते.
काळ्या रंगाच्या जितक्या छटा सापडतील तितक्या घेऊन त्या सार्यांची पुटे खाँसाहेबांवर चढवून दिली आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांवरही - झरीनाचा अपवाद- त्यांचे काही फराटे मारून दिले आहेत. खाँसाहेब दुष्ट, रावण आहेत इ. ठसवणं चित्रपटकथा-लेखकाला पुरेसं वाटलं नाही म्हणून की काय ते आततायीपणे स्वतःवर लांबलचक बंदुकीने गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करतात, पंडितजी न गाता निघून जात असतानाही महाराजांनी 'फैसला' सुनवावा असा आग्रह धरतात, नंतरचा 'आपण कसे अनेक वर्षे झुंजलो नि जिंकलो' वगैरे थयथयाट करतात आणि निघून जाऊ पाहणार्या पंडितजींना थांबवून त्यांच्याकडूनच विजयचिन्हे स्वीकारण्याचा हट्ट धरतात.
मूळ नाटकात न गाता निघून जाणार्या पंडितजींना पाहून खाँसाहेब हतबुद्ध होतात नि असे का झाले असावे अशा विचारात पडतात (पुढे कदाचित हे मला औट घटकेचे राजगायकपद पुन्हा हिरावून घेण्यासाठीच दिले असावे असा तर्कही करतात), पण चित्रपट पाहताना खाँसाहेबांऐवजी हतबुद्ध होण्याची पाळी आम्हा प्रेक्षकांची होती.
चाँद-उस्मान ही दोन पात्रे नाटकात बाँकेबिहारी म्हणतात तसे केवळ 'गायकाआधी येणारे डग्गा नि तबला' म्हणूनच उभी आहेत. पण इथे चाँद पंडितजींची तस्वीर हवेलीतून बाहेर फेकून देतो, उस्मान भांडी घासत असणार्या सदाशिवच्या अंगावर थुंकतो. इतकेच नव्हे तर मूळ नाटकात पंडितजींच्या विरोधातील कटात प्रत्यक्ष सहभागी नसणारी झरीनाची आई चित्रपटात स्वतःच्या हाताने पंडितजींना शेंदूर कालवलेली मिठाई आणून देते.
मूळ नाटकात खाँसाहेबांना पत्नीच्या चलाखीमुळे सिद्धीस गेलेल्या कटाची माहिती राजगायकपदाची स्पर्धा जिंकल्यानंतर होते. इथे त्यांनी त्याची माहिती आहे नि त्याबद्दल काडीची खंत न करता, त्याचा फायदा घेत असताना, त्या पापाचे खापर मात्र- अगदी नि:संदिग्ध शब्दांत फक्त आणि फक्त आपल्या पत्नीवर फोडून मोकळे होतात. नाटकांत खाँसाहेबांची पत्नी अपराधगंडातून स्वतःहून खाँसाहेबांपासून दूर राहते, खाँसाहेब तशी आज्ञाही करत नाहीत. उलट चित्रपटात खाँसाहेब तिला तलाक देऊन मोकळे झाले आहेत.
नाटकात खाँसाहेब अखेरच्या एका प्रसंगात झरीनाने केलेल्या पक्षपाताच्या आरोपावर संतापून "मी तुझावर आजवर हात उगारला नाही, आता या वयात ती वेळ माझ्यावर आणू नको." म्हणतात तर चित्रपटात ते सरळ झरीनाच्या थोबाडीत मारतात. आपल्या हवेलीत नव्हे तर भर दरबारात कट्यारीचा वार करून सदाशिवला ठार करण्याची अनुमती मागणारे खाँसाहेब एका अर्थी दारव्हेकरांच्या खाँसाहेबांच्या थडग्यावर फुले वाहून त्यांना अखेरचा निरोप देतात. एक अखेरचा धाडकन येणारा गाण्याचा उमाळा वगळता खाँसाहेबांच्या व्यक्तिमत्वात कुठेही पांढर्या रंगाचा अंशही सापडू नये याची चित्रपटलेखकाने डोळ्यात तेल घालून काळजी घेतली आहे. थोडक्यात झरीना वगळता खाँसाहेबांशी संबंधित सर्वच मुस्लिम पात्रे संपूर्णपणे खलनायकी म्हणूनच रंगवली आहेत.
याच्या उलट मूळ नाटकात केवळ पार्श्वभूमी म्हणून येणारे पंडितजी - कारण नाटकाचा गाभा हा प्रामुख्याने सदाशिव नि खाँसाहेबांच्या संदर्भात आहे - इथे सद्गुणाचे पुतळे म्हणून येतात. त्यांच्या गाण्याने काजवे धावून येतात (तानसेन नि दीपक रागाची दंतकथा आठवते ना?), तेच खाँसाहेबांना विश्रामपुरात बोलावून त्यांची राहण्याची सोय करतात (ज्याची परतफेड 'कृतघ्न' खाँसाहेब त्यांना प्रथम राजगायकपदाच्या स्पर्धेत आव्हान देऊन नि नंतर शेंदूर खाऊ घालून करतात), सदाशिवने खाँसाहेबांकडे गाणे शिकावे अशी मनीषा व्यक्त करतात (मूळ नाटकात हा सल्ला कुणीही दिलेला नाही, पंडितजी नाहीत म्हटल्यावर सदाशिव खाँसाहेबांना विनंती करतो, पुढची 'शर्विलकी' बाँकेबिहारींच्या सल्ल्याने करतो.), दरबारात गुडघे टेकून खाँसाहेबांना कट्यार देऊ करतात.
एवढेच काय नाटकाचा अगदी गुरुत्व-मध्य म्हणावे असे सदाशिवचे ते अतिशय तरल असे स्वप्न चित्रपटकथा-लेखकाने सदाशिवऐवजी पंडितजींना बहाल करून टाकले आहे. थोडक्यात खाँसाहेबांच्या व्यक्तिमत्वात जसे झाडून सग्गळे दुर्गुण घुसवायचा पणच चित्रपटकथा-लेखकाने केला होता त्याच जोडीला सर्व प्रकारचे सद्गुण फक्त पंडितजींना बहाल करण्याचाही!
नाटकातला गाण्यावर नि गाण्यावरच निष्ठा असलेला तरल, भावुक स्वभावाचा सदाशिव मात्र चित्रपटाने एकदम अँगी यंग मॅन करून टाकला आहे. हिंदुस्तानी संगीत क्षेत्रातील म्लेंच्छ वर्चस्व हाती कट्यार घेऊन नाहीसे करु पाहणारा सुपरमॅन म्हणूनच त्याचा प्रवेश होतो. विश्रामपुरात आल्यावर त्याचे पहिलेच कृत्य आहे ते खाँसाहेबांच्या हवेलीत घुसून त्यांच्याच कट्यारीने त्यांचा खून करून सूड घेण्याचा प्रयत्न करणे.
त्यापूर्वी तो चाँदला गळा दाबण्याची धमकीही देतो. पुढे तो भर दर्ग्यात चारचौघांसमोर खाँसाहेबांना आव्हानही देतो. जिथे कुणालाही राजरोस प्रवेश आहे अशा त्या दर्ग्यात सदाशिवने बुरखा घालून येणे हा प्रकार अनाकलनीय म्हणायला हवा. स्थानिक नाट्यस्पर्धांमधून सादर होणार्या नाटकाचे नवशिके लेखकही इतका हास्यास्पद प्रसंग लिहितील असे वाटत नाही.
नाटकातील सदाशिवचा गायनाचा ध्यास अतिशय विलोभनीय आहे, त्याची गाण्यावरची निष्ठा, आस, नि आपले मनोरथ सिद्धीस जात नाही हे पाहून उमटणारी वेदना त्याच्या आसपासच्या व्यक्तींच्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती प्रेम निर्माण करणारी आहे. ज्याची सुरुवातच कट्यार घेऊन आपल्या शय्यागृहात घुसण्याने होते, अशा व्यक्तीबद्दल चित्रपटात झरीनाला सहानुभूती निर्माण होणे अनाकलनीय आहे. नाटकातले सदाशिवचे स्वप्न ऐकणार्याला रोमांचित करणारे आहे. त्याच्या तरल, भावुक, निष्ठायुक्त स्वभावाला ते शोभणारे आहे. सूडभावनेने प्रेरित झालेल्या आणि जाहीरपणे खाँसाहेबांना आव्हान देत फिरणार्या आततायी सदाशिवच्या तोंडी ते बिलकुलच शोभत नाही.
चित्रपटाने हे स्वप्न पंडितजींना नुसतेच बहाल केले असे नव्हे, तर ते चित्रपटाच्या सुरुवातीलाच साकारही करून टाकत त्याचे ओबडधोबड थडगे बांधून काढले. (मूळ नाटकाची ती परिणती आहे, सुरुवात नव्हे.) उमेदवारी करणार्या सदाशिवचे ते स्वप्न असणे समजू शकतो पण प्रथितयश नि राजगायक असलेल्या पंडितजींच्या बाबत ते आयुष्याच्या बर्याच मागच्या टप्प्यावर असणेच शक्य होते.
शिवाय स्तब्धता ही दाद म्हणून अतिशय नाजूक गोष्ट आहे. अतीव तद्रूपतेतून स्तब्धता येऊ शकते तशीच श्रोते सर्वस्वी उदासीन राहिल्याने, गाणे फसल्यानेही येऊ शकते. इथे चित्रपटातले पंडितजींचे गाणे इतके त्रोटक आहे की त्यात तल्लीनता संभवत नाही. तेव्हा ती स्तब्धता 'चला संपलं ब्वा एकदाचं' म्हणून हुश्शः केलेल्या प्रेक्षकांची म्हणून अधिक मान्य होण्याजोगी आहे. थोडक्यात स्वप्नाला वास्तवात आणून त्याची पुरी माती केली आहे, साकार करून त्याचे सारे सौंदर्य मातीमोल केले आहे.
त्याही पुढचा एक अतर्क्य प्रकार म्हणजे मूळ नाटकात सदाशिव खाँसाहेबांचे गाणे चोरून ऐकतो ते त्याला राजरोसपणे ऐकता यावे म्हणून त्याला खाँसाहेबांचा 'गुलाम' म्हणून हवेलीत आणले आहे. आता ज्या खाँसाहेबांना पंडितजींबद्दल नि सदाशिवबद्दल प्रचंड असूया, द्वेष आहे ते खाँसाहेब आपल्याला जाहीरपणे आव्हान देणार्या सदाशिवला गुलाम झाला तरी रियाज ऐकू देतील? तो त्यांची गायकी आत्मसात करू पाहणार हे त्यांना पक्के ठाऊक असताना रियाजाच्या वेळी त्याने हवेलीत असू नये याची पुरेपूर काळजी ते घेणार नाहीत?
दुसरे म्हणजे अखेरच्या प्रसंगात कट्यार घेऊन सदाशिवची हत्या करण्याचा अधिकार गाजवण्याची अनुमती मागण्यासाठी बराच वेळ लांबलचक वकिली करणारे खाँसाहेब त्याचे टीचभर गाणे ऐकून अचानक भावुक होतात हे केवळ लेखक-दिग्दर्शकाला 'आता संपवायला हवे हं. चला आवरा'ची जाणीव झाल्याचेच निदर्शक असू शकते. मूळ नाटकाची वीण घट्ट आहे. प्रसंग, संवाद परस्परपूरक आहेत; त्यातल्या पात्रांना निश्चित चेहरा आहे आणि घटनांना निश्चित संगती. अशा कोलांटउड्या मारण्याची वेळ दारव्हेकरांवर आलेली नाही.
नाटकाचा संदर्भ सोडून देऊन चित्रपट ही स्वतंत्र कलाकृती म्हणून पाहिला तरी त्यात अनेक विसंगती दिसून येतात. चित्रपटाची समीक्षा करणे हा या लेखनाचा उद्देश नसल्याने सारेच तपशील देण्याचा मोह टाळतो. पण दरबारी संकेतांचे उल्लंघन, प्रसंगाचे स्थान बदलण्याने त्याचा संदर्भच नाहीसा होऊन परिणामकारकता कमी होणेच नव्हे थेट रसातळाला जाणे, संगीत क्षेत्रातील घराण्यांसंबंधीचे काही अलिखित नियम वा संकेत धुडकावले जाणे, अशा अनेक ढोबळ चुकांची जंत्री सहज मांडून दाखवता येईल. पण हेतू केवळ मूळ नाटकाबद्दल बोलण्याचा असल्याने तूर्तास ते सोडून देऊ.
एका ओळीत सांगायचे तर झरीना वगळता सारी मुस्लिम पात्रे खलप्रवृत्तीची, सर्वगुणसंपन्न पंडितजी आणि अँग्री यंग मॅन सदाशिव यांची ही कथा कुणासाठी किंवा कुठल्या उद्देशाने लिहिली गेली असेल याचा तर्क करणे फारसे अवघड नाही, त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकताही नाही.
जीएंच्या 'इस्किलार' मध्ये त्याच्या वडिलांनी बनवलेली 'सेरिपी' नावाची कट्यार याकीर हा विक्रेता प्रवाशाला दाखवतो. तपमान, पर्यावरण, रसायन, काळ, वेळ आणि मुख्य म्हणजे तिच्या कर्त्याचे कष्ट आणि बांधिलकी या सार्यांमधून तयार झालेली ही कट्यार अद्वितीय अशी असते. ती तयार करण्याची तपशीलवार कृती अशा जीव जडवून केलेल्या हत्यारांशी इमान राखता राखता अंध झालेले ते वडील प्रवाशाला उलगडून दाखवतात.
याउलट याकीर हा धंदेवाईक आहे, एकेका हत्यारासाठी इतका वेळ नि श्रम खर्च करण्याची त्याची तयारी नाही आणि त्याने ती तयारी दाखवली तरी 'अशा जातिवंत हत्यारापेक्षा रत्नजडित मुठीच्या मिरवण्याच्या तलवारी अथवा कट्यारींनाच गिर्हाईक मिळत असल्याने मुळात ते श्रम करावेतच का?' (थोडक्यात केवळ मिरवण्याची कट्यार विकत घेणारेच ग्राहक त्याच्याकडे आहेत.) असा त्याचा व्यवहारी बाणा आहे.
दारव्हेकरांची 'कट्यार...' आणि चित्रपटाच्या पडद्यावर आलेल्या 'कट्यार...' मध्ये वडिलांनी बनवलेल्या 'सेरिपी' आणि याकीरने बनवलेली भरजरी पण सामान्य कुवतीची कट्यार यांच्याइतकेच साम्य आहे. पहिलीची मूठ जुनी नि टवका उडालेली असेल कदाचित, पण तिची धार जातिवंत आहे; तर दुसरी कमरेला पैशांची थैली नि कट्यार सोबत मिरवणार्या धनदांडग्यांच्या सोयीसाठी रत्नजडित करुन मांडली आहे.
'सांगे वडिलांची कीर्ती तो येक मूर्ख' असं रामदासांनी म्हटलंच आहे, संगीत क्षेत्रातही सुमार गायकालाच वारंवार घराण्याच्या नावाचा जप करावा लागतो असं म्हणतात. नव्या 'कट्यार...' ने बापाचे - दारव्हेकरांचे - नाव लावणे हे ही त्याच प्रकारचे म्हणावे लागेल.
-oOo-
उद्बोधक रे भाऊ, मस्त लिहीलंय
उत्तर द्याहटवा