शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

ओझ्मा आणि वेदनेची वाट

काल ’विझर्ड ऑफ ओझ’ चे टीवी अडाप्टेशन ’एमेराल्ड सिटी’ पाहात होतो. मूळ कथानक ’इजिओटी’ झालेले, म्हणजे कलेच्या प्रत्येक क्षेत्रातील त्याच्या अवताराने त्या त्या क्षेत्रातले सर्वोच्च पुरस्कार मिळवलेले (म्हणून आता हे टीवी व्हर्शन असावे. ) मूळ कथानकातील पात्रांचे रंग थोडेफार बदलून मूळ परिकथेला व्यक्तीसंघर्षाचे नवे आयाम देत असतानाच तिला विज्ञान आणि जादू यांच्यातील सुप्त संघर्षाचे अस्तर देऊन टाकले आहे. 

कालच कट्यार...’ वर लिहिलेला लेख शेअर केला होता. तिथे कथानक नाटकाकडून चित्रपटाकडे नेताना त्याची मध्ययुगीन टोळ्यांची मानसिकता असलेल्या पटकथालेखकांनी एका जमातीचे लोक फक्त काळ्या रंगात तर ’आपले’ लोक सगळे पांढर्‍या रंगात रंगवून त्याची वाट लावलेली पाहिली होती. फरक दृष्टीकोनाचा आणि उद्दिष्टाचा असतो शेवटी. ज्यांना सतत कुणाचा तरी द्वेष केल्याखेरीज आपल्या गटाशी निष्ठा सिद्ध होत नाहीत असे वाटते ते द्वेषावरच पोसले जातात नि सर्वत्र - अगदी कलेच्या क्षेत्रातही - त्या द्वेषाची बीजेच रुजवत जातात. कट्यार... च्या पटकथा लेखकाने एमेराल्ड सिटी’ जरुर पहावा, शिकण्याची इच्छा असल्यास (आम्ही जन्मजात नि सर्वश्रेष्ठाचा संपूर्ण वारसा मिरवणारे असा माज असणार्‍यांबाबत ही शक्यता फारच कमी असते खरंतर).

एखादा चित्रपट वा मालिका याबद्दल कुणी काही चांगले म्हणतो आहे असा वास जरी आला की ताबडतोब ते कसे वाईट आहे हे सांगण्यास बाह्या सरसावून येणार्‍या समीक्षक जमातीने ती तसदी घेऊ नये म्हणून एमेराल्ड सिटी ही काही उत्तम वगैरे सीरिज आहे असे मलाही वाटत नाही हे आधीच सांगून टाकतो. मुद्दा वेगळाच आहे. आणि तो आहे कट्यार...(चित्रपट) वाल्यांची द्वेषबुद्धी आणि एमेराल्ड सिटी’चा शेवट यांना एकमेकांसमोर ठेवण्याचा.

वेगवेगळ्या व्यक्तींमधील वेगवेगळ्या संघर्षाच्या अखेरीस चार दिशांच्या जादूगारणींपैकी जिवंत राहिलेल्या दोघी ओझ ची परागंदा युवराज्ञी ओझ्मा हिला ओझ’ची राणी म्हणून घोषित करतात. त्यावेळी त्या युवराज्ञीच्या आई-वडिलांची (विझर्ड च्या बाजूने लढताना) हत्या करणारा पण त्यावेळी अजूनही बालकच असलेल्या ओझ्माच्या डोळ्यात आपल्या मुलीला पाहून तिला जिवंत ठेवणारा लायन आत्मसमर्पण करतो. आता राणीसमोर प्रश्न असतो तो त्याला शिक्षा सुनावण्याचा. ती ताबडतोब त्याच्या कुटुंबियांना हजर करण्याचा आदेश देते...

मध्ययुगीन टोळ्यांच्या मानसिकतेमध्ये विरोधी टोळीतला कुणीही असला तरी ’पुरा तयाचा वंश खणावा’ अशी मानसिकता असे, तोच न्याय होता^^. काहीही करुन प्रतिस्पर्धी टोळीचे बल खच्ची करावे. स्त्रिया नि बालके यांची सरसकट हत्या करावी. अन्यथा त्या स्त्रिया पुढे आणखी बालकांना जन्म देऊन प्रतिस्पर्ध्यांची संख्या नि बळ वाढवतील, ती बालके पुढे मोठी होऊन शस्त्रे परजून आपल्या टोळीला असलेला धोका आणखी वाढेल असा सोपा समज होता. (आजही ही मध्ययुगीन मानसिकता ’ते’ विरुद्ध ’आपण’ किंवा ’आम्ही’ या स्वरुपात अनेकांमध्ये दिसतेच.) त्यामुळे आता ओझ्माही त्याच्या कुटुंबियांसकट त्याला ठार मारणार यात कुणाच्या मनात शंकाच नसते. पण...

... ओझ्मा ही जादूगारीण आहे, सत्तेचे खेळ खेळणारी नृशंस सत्ताधारी नव्हे. पण ती जादूचा वापर करुन लायनच्या कुटुंबियांच्या स्मृतीकोषातून त्याची स्मृती पुसून टाकते... आणि त्याला परागंदा होण्याचा आदेश देते.

समोर उभे असलेले आपले कुटुंबिय आपल्याला ओळखतही नाहीत, आपले असे आता कुणी शिल्लक नाही ही वेदना तिने त्याला दिली आहे. (आमची कुटुंबसंस्था जगात सर्वश्रेष्ठ वगैरे म्हणणार्‍या अस्मितेच्या पोकळ पुढार्‍यांना ती जाणवणे अवघड आहे.) आणि टोळीच्या मानसिकतेतून आपण बाहेर आल्याचे तिने दाखवून दिले आहे. तिने जरी त्या कुटुंबियांचा एक सदस्य त्यांच्याकडून काढून घेतला असला तरी त्याचबरोबर ती गमावल्याची जाणीवही काढून घेतली आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे उरलेले आयुष्य जगताना कोणतीही अधिकची वेदना तिने दिलेली नाही. थोडक्यात तिने लायनला दिलेल्या शिक्षेचा जाच हा फक्त त्यालाच होईल, त्याच्या सोबत इतर कुणी भरडले जाणार नाही याची काळजी घेतली आहे. आपले सारे बालपण कुटुंबाशिवाय, कुणाही ’आपल्या’ व्यक्तीच्या सोबतीशिवाय तिने काढले आहे. ते संदर्भहीन, जिव्हाळाहीन आयुष्य कदाचित मृत्यूहूनही वेदनादायी असेल हा तिचा होरा अनुभवातूनच आलेला आहे. त्याचा वापर करुन तिने शिक्षेची व्याप्ती फक्त गुन्हेगारापुरती ठेवताना त्याच्या कुटुंबियांना तिची यत्किंचितही झळ पोचणार नाही याची काळजी घेतली आहे.

कुण्या जमातीतले लोक आपल्याला डोईजड होतील अशी निराधार भीती डोक्यात घेऊन त्यातले दुबळे हेरून, झुंडीने घेरुन त्यांची हत्या करत आपले तथाकथित शौर्य साजरे करणार्‍यांची संख्या वाढत असताना हे शहाणपण आसपास दिसणे दुर्मिळ झाले आहे. 'कट्यार...' चित्रपटाच्या पटकथेमध्ये ओतप्रोत भरलेला मुस्लिम द्वेष पाहता हे अधिकच जाणवून गेले.

एमराल्ड च्या एझ्मा सारखा विचार करणारे दुर्मिळ, तेव्हा त्या पटकथेच्या लेखकाला कुर्निसात करण्यासाठी ही पोस्ट.

---

^^ इथे ’लॅरी गॉनिक’ या व्यंगचित्रकाराने त्याच्या मध्ययुगीन इतिहासाच्या पुस्तकात काढलेले एक चित्र आठवले, जे माझ्या मनात कायम कोरलेले आहे. त्यात मध्ययुगीन पती, पत्नी उभे आहेत, पत्नीच्या कडेवर त्यांचे मूल आहे, ते रडते आहे. बाप अतिशय काळजीने विचारतो आहे, ’त्याला काय झाले आहे. त्याची तब्येत बरी आहे ना.’ त्याचवेळी आसपास प्रतिस्पर्धी टोळ्यांच्या संहाराच्या खुणा विखरुन पडलेल्या दिसतात आणि त्या बापाने खांद्यावर घेतलेल्या भाल्याच्या टोकाला एक अर्भक ’टोचून’ ठेवले आहे. माणसाच्या मानसिकतेचे इतके मार्मिक विवेचन खंडीभर शब्दांनीही होऊ शकेल असे मला वाटत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा