मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

पांचामुखी परमेश्वर ?

“इतक्या लोकांनी धर्म स्वीकारला तर तो खरा, नाहीतर खोटा, हे कसले तर्कशास्त्र आहे? ... एखाद्या धर्माचे अनुयायी असणे ही डोळसपणे स्वीकारलेली कृती नसून ती एक अंगवळणी पडलेली केवळ सवय झालेली असते. आणि अशांच्या संख्येच्या आधारे तुम्ही तुमच्या ज्ञानाची पारख करता, हे सगळे विचित्रच नाही का?”
(जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘यात्रिक’ या कथेमधून)

एखाद्या दाव्याच्या पाठीमागे उपस्थितांचे बहुमत उभे करून तो दावा वास्तव असल्याशी मखलाशी करण्याला बराच प्राचीन इतिहास आहे. बहुतेक धार्मिकांनी आपले संख्याबळ वाढवत नेत आपल्या धारणा इतरांवर लादण्याचा मार्ग अनुसरला आहे. धर्म नि त्यावर आधारित समाजव्यवस्था ही ‘वरून खाली’ स्वरूपाची आहे. व्यवस्थेचे नीतिनियम नि अवलोकन हे मूठभर श्रेष्ठींकडून निर्माण नि नियंत्रित केले जात असते. उलट प्रातिनिधिक लोकशाही ही ‘खालून वर’ म्हणजे समाजगटाकडून व्यवस्था नियंत्रकांकडे जाणारी आहे. विशेष म्हणजे इथेही या नियंत्रकांची निवड पुन्हा बहुमताच्या तत्त्वानेच होत असते. आपल्या भारतीय परंपरेमध्ये ‘पांचामुखी परमेश्वर’ ही म्हण रुजली ती याच अर्थाने.

निवाडा नि वास्तव या दोन वेगळ्या गोष्टी असतात, निवाडा हा एका गटासंदर्भात असेल तर तो त्यातील बहुसंख्येने– अथवा त्यातील अधिक सुज्ञ बहुसंख्येने– केला तर तो समजण्याजोगे आहे. परंतु वास्तव हे व्यक्तिंच्या मताच्या निरपेक्ष उभे असू शकते. निवाड्याचा विषय असणारे वास्तव हे बहुसंख्येच्या आकलनकक्षेच्या बाहेर असले तर तो निवाडा वास्तवाच्या विपरीत असू शकतो. उदा. ‘भारताने संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठी मिग विमाने विकत घ्यावीत की F-16 विमाने?’– याची कल-चाचणी केवळ संरक्षण तज्ज्ञांमध्येच व्हायला हवी. लॉलिपॉप अथवा आईसफ्रूट चोखत बसलेला शाळकरी खंडूही मतदान करु शकतो अशा एखाद्या इन्टरनेट पोर्टलवर करुन उपयोगाची नाही. परंतु रोजच्या जगण्यात ‘बहुसंख्येचे मत’ हा निकष अनेकदा असा अस्थानी वापरला जात असतो आणि त्यातून वास्तवाचे विपरीत आकलन अनेकांच्या माथी मारले जात असते.

काही वर्षांपूर्वी एका प्रथितयश आयटी कंपनीमध्ये मी काही काळ काम करत होतो. तिथे आलेला हा एक अनुभव. मी तिथे नुकताच रुजू झालो होतो. माझी निवड होण्यासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये मी विषय-तज्ज्ञ आहे नि त्या भूमिकेला अनुसरूनच काम करू इच्छितो असे स्पष्ट केले होते. त्यामुळे तिथे असलेल्या प्रशासकीय उतरंडीचा मी भाग नव्हतो. तरीही एकुण उतरंडीमध्ये मी वरच्या स्तरात काम करत असल्याने तिथल्या प्रोजेक्ट मॅनेजर्सच्या मीटिंग्सला मी शक्य तेव्हा उपस्थित राहावे असे मला सांगण्यात आले होते. अशाच एका मीटिंगमध्ये एका कटकट्या ग्राहकाचा नि त्याच्याकडे अडकलेल्या पैशाचा विषय निघाला. एरवी मी फार लक्ष दिले नसते पण ‘स्वीकार्यता चाचणी’ (acceptance test) अशी संज्ञा ऐकली आणि कान टवकारले.

हा ग्राहक बहुधा एखादी ऑनलाईन विक्रेती साखळी होती. विविध प्रकारची उत्पादने त्यांच्यामार्फत विकली जात होती. अशा मोठ्या विक्रेत्यांना आपली उलाढालीची दिशा ठरवण्यासाठी ग्राहकांचे कल ध्यानात घेण्याची गरज असते. इंटरनेट-पूर्व काळात अशा कंपन्या वा विक्रेते आपले प्रतिनिधी नेमून त्यांच्यामार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचत असत. हे प्रतिनिधी अक्षरश: दारोदार जाऊन– प्रसंगी ग्राहकांकडून होणारे अपमान गिळून– ही माहिती जमा करत असत. मग त्याआधारे हे मोठे विक्रेते वा उत्पादक कंपन्या आपल्या उत्पादन वा विक्रीधोरणांमध्ये आवश्यक ते बदल करत असत.

परंतु इंटरनेट अवतरले आणि कुणीही न मागता आपली मते भसाभस त्यावर ओतणारे ग्राहक तयार झाले. त्या त्या ग्राहकाला रुचेल त्या व्यासपीठावर आपल्या वापरात येणार्‍या विविध उत्पादनांबद्दल ते आपली मते व्यक्त करू लागले. फेसबुक, ट्विटर, रीडिफ वा रिडिटसारखे फोरम्स तसंच इतर विक्रेत्यांची संकेतस्थळे, वृत्तपत्रांची पोर्टल्स आदिंवर या प्रतिक्रियांचा मारा सुरू झाला. आयतीच मिळणारी ही माहिती उचलून त्याआधारे घरबसल्या विविध उत्पादनांबद्दलची बाजारातील कल-चाचणी करणे शक्य आहे असे अमेजनसारख्या(Amazon) बहुतेक मोठ्या विक्रेत्यांच्या ध्यानात आले.

इंटरनेटवरील सर्वात चाणाक्ष विक्रेता असलेल्या ‘गुगल’ने आपल्या सर्व सेवा फुकट(?) देण्याच्या बदल्यात आपल्या ग्राहकांच्या इमेल्ससकट सर्व प्रकारची माहिती गोळा करण्याचे हक्क पदरात पाडून घेतलेले असतात. या माहितीच्या आधारे त्या त्या ग्राहकाच्या आवडीनिवडी ओळखून त्या ग्राहकाला त्यासंबंधी जाहिराती दाखवण्याचे तंत्र आधीच विकसित केले होते. इथे एकाच ग्राहकाची माहिती नि तिचा वापर केवळ त्याच्या वा तिच्यापुरताच होत असे. त्याच तंत्राचा विस्तार करून अनेक ग्राहकांकडून उपलब्ध होत जाणार्‍या माहितीचे एकत्र संकलन करून ग्राहकाऐवजी त्याला अपेक्षित उत्पादन वा सेवेचे मूल्यमापन करण्याचे तंत्र विकसित केले जाऊ लागले. आमचा हा ग्राहक असेच काही साध्य करू पाहात होता.

Sentiment

या पुढच्या टप्प्यात एखाद्या उत्पादनाबद्दल, घटनेबद्दल जनतेमध्ये सरासरी प्रतिक्रिया काय आहे, याचा अदमास घेण्याचा- अर्थात लोकांचा ‘कल’ (sentiment) काय आहे हे ठरवण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. फेसबुक, ट्विटरसह बहुतेक फोरम्सनी व्यावसायिकांकडून पैसे घेऊन आपल्या डेटाचा अ‍ॅक्सेस देणे सुरू केले होते. तो घेऊन आपल्या उत्पादनाशी, विशिष्ट घटनेशी संबंधित पोस्ट्स, ट्विट्स, वगैरेचा डेटा खेचून घेण्याची सोय त्यांना मिळत असे. या डेटाचे विश्लेषण करुन त्यातून आपल्या उत्पादनाबद्दल सर्वसाधारण मत काय आहे याचा अदमास घेण्याचा या व्यावसायिकांचा प्रयत्न असे. ‘Sentiment Analysis’ (कल-मूल्यमापन) नावाने ही एक शाखाच उदयाला आलेली होती.

तेव्हा स्मार्टफोन हा आजच्या इतका सार्वत्रिक झालेला नव्हता. त्यामुळे माहितीचा ओघ बराच कमी होता. हे तंत्रही अजून बाल्यावस्थेतच होते. आमच्या कंपनीकडे त्यावर आधारित एक प्रोजेक्ट होता, तो पुराही झाला होता. परंतु त्यातून मिळणार्‍या परतावा अथवा मूल्यमापनाबाबत ग्राहक समाधानी नव्हता आणि झाल्या कामाचे पैसे देण्यास नकार देत होता. गाडं अडलं होतं ते गुणवत्ता मूल्यमापनावर, आणि या संदर्भातच त्या मीटिंगमध्ये ’स्वीकार्यता-चाचणी’चा उल्लेख झाला होता.

आमच्या कंपनीने प्रोजेक्ट घेताना बहुतेक भारतीय कंपन्या करतात तशी घाई केली होती. माझा अनुभव असा की आपल्या कंपन्या स्वत:ला पळवाटा ठेवण्यासाठी काटेकोरपणा टाळतात. पण कधी कधी तोच उलट अंगाशी येतो तसे इथे झाले होते. प्रोजेक्ट पुरा झाला हे उभयपक्षी मान्य करण्यासाठी ’स्वीकार्यता-चाचणी’ काय असावी हे निश्वित न करताच कंपनीने प्रोजेक्ट हाती घेतला होता. आता ग्राहकाने आपली अशी चाचणी एकतर्फीच लादली होती.

Sentiment म्हणजे मत, कल वा भावना हा सापेक्ष मामला आहे. एकाच व्यक्तीने, एकाच वस्तू वा उत्पादनाबद्दल वेगवेगळ्या वेळी वा संदर्भामध्ये व्यक्त केलेले मत वेग-वेगळे असू शकते. एक सोपे उदाहरण म्हणजे गुंतवणूक पर्यायांकडे पाहू.

‘संभाव्य नुकसान’ हा निकष मानला तर एखाद्या गुंतवणूक पर्यायाची स्वीकार्यता माझ्या दृष्टीने नकारात्मक असेल; पण त्याच वेळी मला त्यातून ‘अपेक्षित परताव्या’च्या दृष्टीने मूल्यमापन करण्यास सांगितले तर ते सकारात्मक असू शकते. म्हणजे निकष काय यावरून त्या पर्यायाचे मूल्यमापन होते आहे.

हे झाले एकाच व्यक्तीबाबत. विविध व्यक्तींची एकाच उत्पादन, सेवा, घटना यांबाबतची अनुभव नि मते ही भिन्न भिन्न असणार हे ओघाने आलेच. या खेरीज चार व्यक्ती एकाच भाषेत नेमके एकच मत देत असतील तरी प्रत्येकाची वाक्यरचनेची पद्धत वेगवेगळी असू शकते. त्यातून ते वाचणार्‍या हाडा-मांसाच्या माणसांच्या आकलनातही फरक पडतो. याखेरीज वाचणार्‍याचा दृष्टिकोन वा पूर्वग्रह यांच्या प्रभावही त्याच्या आकलनावर पडत असतो. त्यामुळे एकच मत देणारे चार वेगळे प्रतिसाद वेगवेगळ्या प्रकारे ध्वनित होत असतात.

आता माणसा-माणसांतच अशी मतभिन्नता असते, तिथे जे माणसाला दिसते ते संगणकाच्या प्रोग्रामला दिसेलच असे याची शाश्वती देताच येत नाही. उदाहरणार्थ ‘अमुक उत्पादन उत्कृष्ट बिनडोक व्यक्तीने तयार केले आहे’ असे वाक्य असेल, तर त्याला उत्कृष्ट शब्दामुळे सकारात्मक म्हणावे की बिनडोक शब्द आल्याने नकारात्मक हे प्रोग्रामला नीट समजत नाही. निव्वळ सकारात्मक नि नकारात्मक विशेषणांकडे पाहून मूल्यमापन करत राहिले तर अशी पंचाईत होते. शिवाय कुठले विशेषण उत्पादनाचे नि कुठले त्याचे उत्पादन करणार्‍या व्यक्तीचे, त्यासंबंधी इतर गोष्टींचे हा पेचही सोडवायचा होताच. एक चांगल्यापैकी अल्गोरिदम लिहून आमच्या मंडळींनी तो सोडवलाही होता. 

पण पंचाईत अशी होती की या प्रोग्रामने दिलेले उत्तर बरोबर आहे की चूक (खरेतर स्वीकार्य म्हणजे acceptable!) हे ठरवणार कसे? हे काही गणित नाही की ज्याचे एक निश्चित उत्तर आहे, जे एखादा हुशार माणूस कागदावर गणित सोडवून शोधून काढेल नि प्रोग्रामच्या उत्तराशी ताडून बघेल. त्यामुळे इथे बरोबर वा चूक असा निवाडा असूच शकत नव्हता.

ManVsRobot
https://www.vecteezy.com/ येथून साभार.

यावर आमच्या ग्राहकाने तोड काढली होती. त्यांनी त्यांच्याकडून पाच जणांची तज्ज्ञ (Expert Tester) म्हणून नेमणूक केली होती. यांना कल-चाचणी करण्यासाठी डॉक्युमेंट्स/ पोस्ट्स/ ट्विट्स/ रिव्यूज्‌ यांचा एक संच देण्यात आला होता. कल-चाचणी कशी करावी याबाबत त्यांना काही ठोकताळे देण्यात आले होते. हे समान तंत्र वापरून या पाचांनी आणि अर्थातच आमच्या संगणकीय प्रोग्रामने आपापले अभिप्राय द्यायचे होते. आमच्या संगणकीय प्रोग्रामचे उत्तर ९०% हून अधिक वेळा या पाचांच्या सरासरीच्या जवळपास आले तर हा प्रोग्राम पुरेसा सक्षम आहे असे ग्राहक मान्य करणार होता.

त्यानुसार चाचणी पार पाडली, नि असे दिसले की संगणकीय प्रोग्रामने दिलेले उत्तर नि या पाच तथाकथित तज्ज्ञांचे सरासरी उत्तर जेमतेम ६५-७०% वेळाच जुळत होते. त्यामुळे ग्राहकाने तो संगणकीय प्रोग्राम पुरेसा सक्षम असल्याचे मान्य करण्यास नकार दिला होता. आणि त्यामुळे कंपनीचे सहा आकडी (डॉलरमध्ये) पैसे अडकून पडले होते. पुन्हा नव्याने संगणकीय प्रणाली नि प्रोग्राम तयार करणे हे जवळजवळ एक नवा प्रोजेक्टच केल्यासारखे ठरणार होते.

हे सारे ऐकून मी माझ्या लक्षात आले की ही स्वीकार्यता चाचणी मुळी प्रोग्रामची accuracy– बिनचूक उत्तर देण्याची क्षमता तपासतच नाही. ती फक्त निवडलेल्या पाच माणसांचे कौशल्य नि संगणकीय प्रोग्रामचे कौशल्य यांची तुलना करते इतकेच. जर आपण ही चाचणी प्रोग्रामची वास्तवाच्या जवळ जाणारी गुणवत्ता तपासते असे मान्य करत असू तर त्या पाच मंडळींना ‘बरोबर’ काय ते बिनचूक ठाऊक आहे आणि त्यामुळे त्यांची मूल्यमापनाची सरासरी ही ‘वास्तवा’च्या जवळ आहे असे आपण मानतो आहोत.

प्रत्येकाचा निवाडा त्या त्या माणसाच्या आकलनशक्तीवर बराच अवलंबून राहतो. हे पाच नसता अन्य पाच असते नि प्रोग्रामने त्यांच्याशी ९९% वेळा सहमती दर्शवली असती तर ग्राहक ते मान्य करणार होता का? असा प्रश्न मला पडला होता. या पाचांचे सरासरी उत्तर ‘कुठल्याही पाच व्यक्तींच्या सरासरी उत्तराच्या जवळपास राहील– म्हणजे हे पाच सर्वांच्या कलाचे प्रातिनिधित्व करतात’ याची खात्री करून देणारी संख्याशास्त्रीय चाचणी स्वतंत्रपणे केल्याखेरीज या पांचामुखी परमेश्वर असेलच असे म्हणता येणार नाही.

यातून दुसरा मुद्दा असा निर्माण होतो की हे पाच जण जवळजवळ सारख्याच बुद्धिमत्तेने अथवा आकलनातून काम करत आहेत का? असतील, तर त्यांच्या मूल्यमापनाची सरासरी हे मूळ पोस्ट/डॉक्युमेंट/ट्विट/रिव्ह्यूचे प्रातिनिधिक अथवा ‘वास्तव’ मूल्यमापन मान्य करताही येईल कदाचित. पण ते खरेच तसे आहेत का? म्हणजे असं पाहा, की पहिले पाच तज्ज्ञ मानले तर प्रोग्राम हा सहावा कल्पित (virtual) तज्ज्ञ आणला आहे– किंवा आहे का याचे उत्तर आपण शोधतो आहोत. पण मुळात हे पाच तज्ज्ञ आहेत हे कुणी आणि कसे ठरवले?

मुळात sentiment या शब्दातच सापेक्षता आहे हा पहिला मुद्दा. त्यामुळे निश्चित वास्तव असे काही नाहीच. समोरच्या पोस्ट/डॉक्युमेंट/ट्विट/रिव्ह्यू यात बरेच काही लिहिलेले असते, त्यातून निव्वळ नकारात्मक वा सकारात्मक असे द्विपर्यायी निकाल आपण देत आहोत. मी विचारले, ‘तुम्हाला तुमचा प्रोग्राम हा वास्तवाच्या(?) जवळ जाणारे उत्तर देणारा हवा आहे की ‘पांचामुखी परमेश्वर’ या न्यायाने त्या पाच न्यायाधीशांच्या ‘निकाला’च्या जवळ जाणारा? कारण इथे वास्तव नावाचे काही नाहीच असे माझे मत आहे.’ त्यामुळे ही चाचणीच योग्य आहे का हेच आधी तपासायला हवे असा सल्ला मी त्या प्रोजेक्टच्या मॅनेजरला आणि त्याच्या व्यवसाय-विभाग प्रमुखाला (BU-head) दिला.

HumanLost

“त्या पाचांची आपसांत– एक विरुद्ध इतर चार अशी– चाचणी करुन ते पाच जण परस्परांशी बहुतेक वेळा सहमत होतात का हे आधी पाहायला हवे. जर त्यांच्या मूल्यमापनात आधीच भरपूर तफावत असेल, तर त्यांच्या उत्तराची सरासरी हे ‘वास्तवाच्या जवळचे’ उत्तर हे गृहितकच चुकेल.

“तेव्हा तुम्ही या पाच जणांच्या गटात एका वेळी एक बाहेर ठेवून त्याची उरलेल्या चौघांबरोबर चाचणी घ्या. त्यातून त्यांची कामगिरी परस्परांच्या जवळपास आहे असे सिद्ध झाले तर असे म्हणता येईल की या पाचांची मत-तपासणीचे कौशल्य जवळजवळ सारखेच आहे. प्रोग्रामचेही त्यांच्याशी जुळते का हा प्रश्न पुढचा राहिला. मुळात त्यांच्यातच भरपूर मतभिन्नता असेल तर त्यांतून प्रातिनिधिक उत्तर काढण्यास पाचांची सरासरी पुरेशी नसेल, कारण त्यातील विचरण (variance) बरेच असेल.

या पद्धतीने चाचणी घेतली असता त्या पाचांच्या श्रेणीदानात आपसांतच भरपूर तफावत असल्याचे दिसून आले. जी चाचणी संगणकीय प्रोग्रामची तीच त्यांची घेतल्यावर प्रत्येकाचे इतरांशी मतैक्य हे सत्तर टक्क्याहूनही कमी दिसू लागले. म्हणजे त्यांच्या निकषांवर त्यांच्याच तज्ज्ञांची(?) कामगिरी ‘अस्वीकार्य’ ठरू लागली. परिणामी त्यांची सरासरी हे ‘मत-मोजमाप’ म्हणून रद्द करावे लागले. ग्राहकाने हे मान्य करुन नवी स्वीकार्यता चाचणी तयार करण्यास अनुमती दिली आणि अखेरीस त्या सहा आकडी डॉलर्सची नौका ऐलतीरी पोचली...

...आणि तरीही सहा आकड्यातला एकही आकडा कंपनीने माझ्याकडे सरकवला नाही. हे मात्र अंमळ खटकलेच मला. 😉

-oOo -


हे वाचले का?

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०२३

शतक हुकलेल्या खेळाडूप्रत—

दिनांक: २२ ऑक्टोबर २०२३
भारताचा प्रमुख आधारस्तंभ फलंदाज विराट कोहली दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याच्या उंबरठ्यावर असताना बाद झाला. नव्वदीमध्ये रेंगाळलेला कोहली ९५ धावांवर खेळत असताना एकाच षटकाराने शतकाकडे उडी मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. मिडविकेटला एक सोपा झेल देऊन तो बाद झाला. तो नव्वदी पोहोचल्यापासून उत्कंठेने श्वास रोखून सामना पाहात असलेल्या त्याच्या चाहत्यांची दारूण निराशा झाली. एकीकडे आपल्या आवडत्या खेळाडूचे शतक नि विक्रम हुकला याचे वैफल्य आणि असा बेजबाबदार फटका मारून बाद झाल्याबद्दलचा राग व वैताग या दोहोंतून व्यक्त झालेली ही संमिश्र भावना.
---

DistraughtKohli
(कवि अनिल यांची क्षमा मागून...)
    
आज अचानक विकेट पडे ॥ ध्रु.॥

भलत्या वेळी भलत्या खेळी ।
असतां मन शतकाकडे ॥

बॅट फिरवितां तू मिडविकेटी ।
एकाएकी झेल पडे ॥

दचकुनि जागत जीव अचानक ।
क्षणभर हार्ट हे थंड पडे ॥

गूढ डिलिव्हरी तव नाकळुनि ।
अघटित असे हे आज घडे ॥

निसटुनि जाई संधीचा क्षण ।
सदा असा आवेश नडे ॥

- कवि तुंदिल
 
- oOo -

हे वाचले का?

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३

क्रिकेट आणि टीकाकार

निवडणुकीच्या आगेमागे ‘ईव्हीएम टॅम्परिंग’चा कोलाहल ऐकू येत असतो. हे जणू राजकीय वास्तव असल्याची एका राजकीयदृष्ट्या सजग गटाची श्रद्धा आहे.

दुसरीकडे क्रिकेट सामन्यांच्या– विशेषत: कुठलाही वर्ल्ड-कप किंवा भारतीयांच्या दृष्टीने ताटा-पोटातील अन्नापेक्षाही महत्त्वाच्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी काही मंडळींकडून न चुकता घातला जाणारा ‘मॅच फिक्सिंग’चा रतीब ही दुसर्‍या श्रद्धेची किंवा सामान्यांपेक्षा आपल्या उच्च अभिरुचीची द्वाही आहे.

या दोनही गोष्टी शक्यतेच्याच नव्हे तर संभाव्यतेच्या पातळीवरही आहेत हे मला मान्य आहे. पण संभाव्य आहे म्हणजे ते घडलेच किंवा घडतेच असा कांगावा करण्यात अर्थ नसतो. शक्यता ते घटित यात बराच प्रवास असतो. तो किती खडतर आहे यावर संभाव्यता ठरत असते. शक्यता नि खात्री यातील फरक करण्यास शिकले की आयुष्य सुसह्य होते असे माझे प्रामाणिक मत आहे.

ईव्हीएम हॅकिंग अथवा टॅम्परिंगला लागणारे कुशल(!) मनुष्यबळ, गुप्ततेची खडतर वाट आदि गोष्टींचा विचार करता कोणताही पक्ष त्याची व्याप्ती पुरी निवडणूक फिरवावी इतकी व्यापक ठेवू शकणार नाही. अत्यंत मर्यादित प्रमाणात हे साध्य होऊ शकेल. पण तरीही ईव्हीएमबाबतची तक्रार मी समजून घेऊ शकतो. कारण त्यातून तुमच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असते. कदाचित तुम्ही न निवडलेला उमेदवार तुमचा प्रतिनिधी म्हणून तुमचे भवितव्य आपल्या हाती घेत असतो.

BatBallAndMoney

परंतु क्रिकेट वा अन्य कुठल्याही खेळाबाबत, साहित्याबाबत, संगीताबाबत, चित्रपटादि दृश्य कलांबाबत असे लादणे होत नसते. तरीही तिथे ‘सगळ्या मॅचेस फिक्स्ड असतात म्हणून मी क्रिकेट पाहणे सोडले.’ हा दावा आपण चारचौघांपेक्षा वेगळे- शहाणे, उच्च अभिरुचीचे असणे ठसविण्यासाठीच असतो असे माझे मत आहे. एरवी न विचारता हे का सांगता हो भाऊ/ताई ? विचारल्यावरही ‘मी पाहात नाही.’ एवढे सांगणे पुरेसे का वाटत नाही? म्हणून त्या दाव्यामध्ये काही वेळा ‘क्रिकेटप्रेमी कसे बावळट असतात’ हा एक उन्नतनासिका सूर मला दिसतो. (काही कॉफीप्रेमी ’चहा की कॉफी?’ या सोप्या प्रश्नाला ‘कॉफी’ असे उत्तर न देता, ’मी चहा पीत नाही, मला कॉफी’ असे आवर्जून सांगतात, तसे काहीसे.) तो गंमतीशीर असतो.या दोनही मुद्द्यांकडे पाहू.

आता शक्यतांचा विचार केला तर...

> आपण खातो त्यातील प्रत्येक पदार्थात भेसळ होऊ शकते– काही वेळा होत असतेच. म्हणून आपण खाणे खायचे थांबवत नाही. भेसळ नसण्याची संभाव्यता अधिक असणारे पदार्थ वा भेसळ ओळखण्याचे तंत्र कुठले हे शोधतो.
> दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीबद्दल वारंवार बोलले जाते. भेसळयुक्त पदार्थ विशेषत: दिवाळी सारख्या सणांच्या तोंडावर वारंवार पकडले जातात. म्हणून आपण दुग्धजन्य पदार्थ खाणे सोडतो का?
> रस्त्यावरून जाताना अनेक वाहनचालक बेफाम गाडी चालवतात. त्यातून काही निरपराधांचा बळी जातो. म्हणून आपण रस्त्यावर येणे थांबवतो का?
> अगदी जीवरक्षक म्हणावी अशा डॉक्टरांच्या वर्तुळातही बनावट, स्वार्थी डॉक्टर्स असतात. मग आम्ही डॉक्टरकडे जाणे बंद करतो की पूर्वानुभव असणार्‍यांकडून डॉक्टरबाबत खात्री करुन घेऊन त्याच्याकडे जातो?

या सार्‍या उदाहरणांमध्ये शक्यता आणि खात्री यात फरक करत असतो. प्रासंगिक घटना, अपवाद आणि सरसकट नियम यात फरक करायला हवा. अर्थात, कोणत्याही पुराव्याखेरीज ‘ईव्हीएम हॅक होतेच्चं’ किंवा ‘प्रत्येक मॅच फिक्स्ड असतेच्चं.’ म्हणणार्‍यांना कोपर्‍यापासून एकदाच दंडवत घालून दूर व्हावे. कारण हे दावे सामान्यपणे केवळ दुराग्रहाचे, विचार बंद केल्याचे आणि निष्कर्षापेक्षा श्रद्धेचे निदर्शक असतात. अशा पालथ्या घड्यांवर पाणी ओतण्यात अर्थ नसतो.

MatchFixing

आता पुढचा मुद्दा असा की मग ‘क्रिकेट मॅचेस फिक्स्ड नसतात असे रमतारामांचे म्हणणे का आहे ?’ प्रश्न गंडलेला असतो. ‘प्रत्येक मॅच फिक्स्ड असते’ असे म्हणणार्‍यांचा प्रतिवाद करणारा ‘प्रत्येक मॅच फिक्स्ड नसते’ असे म्हणतो आहे हा दावा चलाखीचा असतो वा अज्ञानमूलक. 

ही दोन विधाने परस्परविरोधी असली तरी त्यांच्या पलीकडे शक्यतांचा बराच मोठा अवकाश असतो आणि तिथे विश्लेषणाला वा समजून घेण्याला वाव असतो. ‘सगळ्या क्रिकेट मॅचेस फिक्स्ड असतात.’ या विधानाचे सर्वसमावेशक विरोधी विधान हे वरचा प्रश्न नसतो तर ‘सर्व क्रिकेट मॅचेस फिक्स्ड असतात असे म्हणता येत नाही.’ असा असतो. पण अज्ञानी मंडळींची पंचाईत अशी की त्यांना फक्त ठोस, निश्चित विधान समजते. त्यामुळे ’होतात’ किंवा ’होत नाहीत’ या दोनमध्ये त्यांचे तर्क फिरत बसतात.

बरं हे शक्यतांचं खटलं (आणि म्हणून ईव्हीएमही) जाऊ दे. समजा... समजा असल्या मॅचेस फिक्स्ड तरी जोवर तुम्हाला ते ठाऊक नाही, तोवर तुमच्या दृष्टीने तो सामना एन्जॉय करणे शक्य नाही का? जुना एखादा सामना क्रिकेट चॅनेलवर लागला तरी तो एन्जॉय करता येतो ना? त्याचा तर निकाल लागून जमाना झालेला असतो. कालच्या सामन्याचे ’हायलाईट्स’ आज मी पुन्हा पाहतो तेव्हा ते ही एन्जॉय करता येतातच. एखादा उत्तम फटका, एखादा सुरेख वळलेला वा स्विंग झालेला चेंडू, एखादा अप्रतिम झेल मला तेवढाच नसला तरी आनंद देत असतो.

इतर खेळांमध्ये अनेकांनी WWFच्या (आता WWE) कुस्त्या पाहिल्या असतील. त्या फिक्स्ड– खरंतर स्क्रिप्टेड म्हणायला हवे– असतात हे पाहणार्‍या बहुतेकांना ठाऊक असते. तरीही त्यांना मनोरंजन म्हणून लोक पाहतात. फुटबॉलपाठोपाठ तो खेळ(?) वा त्याचे प्रक्षेपण सर्वाधिक उत्पन्न मिळवत असतो.

त्याहीपेक्षा तुमच्या-आमच्या आयुष्यातील महत्त्वाचे मनोरंजन म्हणजे चित्रपट. तो तर १००% स्क्रिप्टेड असतो. एवढेच कशाला त्यातील फाईट्स, युद्धे, बॉम्बस्फोट, वगैरे हिंसक बाबी तर सोडा पण प्रेमसुद्धा १००% टक्के खोटे असते. तरीही आपण तो पाहात असताना खरे मानून त्यात रमतो की नाही. सलमान खान नि ऐश्वर्या रायचे (किंवा त्याच्या मुस्लिम नावाने लव्ह-जिहादची वगैरे आठवण होत असेल तर शाहिद कपूर-करिना म्हणा, किंवा तुमची आवडती जोडी उदाहरण म्हणून घ्या) आता फाटलं आहे हे मौलिक ज्ञान आपल्याला आधीच असूनही त्यांचा पडद्यावरचा प्रेमालाप पाहताना आपण रंगून जातो की नाही. एवढे पुरेसे नसते म्हणून आवडलेले चित्रपट लोक एकाहुन अधिक वेळा पाहतात. आता तर पडद्याबाहेरचे सोडा, पडद्यावरचेही त्यांना शंभर टक्के माहिती असूनही त्यात त्यांना मनोरंजन सापडतेच; एरवी पुन्हा पैसे का खर्च करतील ते?

सध्या पॉप्युलर असणारे रील्स अथवा मायक्रोव्हिडिओंचे माध्यम तर याचे उत्तम उदाहरण आहे. एखाद्या मांजराचे, माकडाचे विशिष्ट हावभाव, कुणी केलेली एखादी कमेंट लोकप्रिय झाली की वेगवेगळॆ लोक त्याचे मिक्सिंग करुन आपापली स्टोरी बनवून त्याचे व्हिडिओ तयार करतात. एखाद्या चिनी व्यक्तीच्या व्हिडिओचा तुकडा घेऊन एखादा मराठी तरुण व्हिडिओ बनवतो नि त्यावर इंग्रजीमधून अनोटेशन चिकटवतो. तरीही त्या व्हिडिओचा एकुण परिणाम आपल्याला आनंद देतो की नाही. ‘हॅं: दुसर्‍याचा व्हिडिओ चोरून केलेला.’ म्हणून धुडकावतो का आपण?

तसेच क्रिकेट पाहताना तुमचे मनोरंजन होत असेल, सचिनचा स्ट्रेट-ड्राईव्ह पाहून तुमचा जीव निवत असेल, धोनीचा हेलिकॉप्टर शॉट पाहून खणखणीत शिट्टी वाजवावी असे वाटत असेल, किंवा एखाद्या परक्या संघातील फिरकी गोलंदाजाने एखाद्या कसलेल्या फलंदाजाची भंबेरी उडवल्यावर (परवाच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या मुजीबने इंग्लंडच्या जो रुटचा केलेला मामा ही अशीच घटना होती.) त्याच्या पाठीवर दाणकन्‌ शाबासकी द्यावीशी वाटत असेल. मग हे सारे केवळ कौशल्यावर चालू आहे की कुठल्या आर्थिक नियंत्रणाच्या आधारेही यावर तुमच्या आकलनात, मनोरंजनात काय फरक पडतो? थोडक्यात, मुद्दा ‘आपला हेतू काय नि तो साध्य होतो का’ हा आहे.

‘माणसाला भूक असते नि ती भागवण्याची त्याची प्रेरणा असते’ हे आदिम सत्य. बाकी माणसाची सारी संस्कृती ही कृत्रिमच असते. तिच्याकडून नैसर्गिक असण्याची अपेक्षाच चुकीची आहे. कोणत्याही प्रकारचे मनोरंजन हा संस्कृतीचा भाग असतो आणि तो कृत्रिमच असतो, माणसांनीच केलेल्या नियमांनी बद्ध असतो, काही लिखित असतात, काही अलिखित.

हे मॅच-फिक्सिंग प्रकरण नवे नि ताजे ताजे असल्याने त्या कारणाचा वापर अधिक होत असला तरी त्या शिवायही टीकेचे काही मुद्दे फिरत असतात. हे मॅच-फिक्सिंगचे कारण सापडण्यापूर्वीची– आमच्या वडिलांची – एक पिढी ‘काय ते इंग्रजांनी आणलेला खेळ खेळत वेळ घालवता रे.’ म्हणून आगपाखड करत. किंवा आमच्यासोबत मॅच पाहताना, ‘पाकड्यांसमोर तुमचा काय निभाव लागणार.’ ‘शारजा में हार जा.’ किंवा ‘पॅटरसनसमोर तुमचा गावसकर म्हणजे झुरळ आहे.’ वगैरे पिंका टाकत आम्हाला हतोत्साह करण्याचा प्रयत्न करत असे.

‘टॅक्सपेअर्स मनी वाया जातो’ असा एक दावा असतो, तो सर्वस्वी चुकीचा आहे. मुळात वाया जातो हे फारच सबगोलंकार विधान आहे. एखाद्या समाजाला, शोषिताला दिलेली नुकसानभरपाईदेखील वाया गेल्याचा कांगावा करणारे असतात. त्याला फार महत्त्व द्यायचे कारण नाही. उलट भांडवलशाही नियमाने भरपूर उलाढाल झाल्याने अनेक रोजगार निर्माण होत असतात. बीसीसीआय सरकारला पैसे देत नसली, तरी सरकारकडून पैसे घेतही नाही, अन्य खेळांसारखे. खेळाच्या मैदानांसाठी राखीव भूखंडांचे म्हणाल तर सामने नसतात तेव्हा ते स्थानिक खेळांसाठी उपलब्ध असतातच. तेव्हा केवळ सामन्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था ते देतात हे म्हणणे चुकीचे आहे.

CricketVsHockey
https://www.business-standard.com/ येथून साभार

आणखी एक प्रकार म्हणजे हॉकीशी तुलना. हॉकीमध्ये ध्यानचंद यांचा थोडका काळ वगळता आपण कधीही श्रेष्ठ वगैरे नव्हतो हे आपण मान्य करण्याची गरज आहे. शीतयुद्धाच्या काळात भांडवलशाही राष्ट्रांनी बहिष्कार घातलेल्या मॉस्को ऑलिंपिक वगळता अलीकडच्या कित्येक दशकांत भारताने त्यात फार काही चमक दाखवलेली नाही. आणि हा खेळ आपल्या सरकारांचा कायमच डार्लिंग राहिलेला आहे.

याउलट १९८३मध्ये विश्वचषक जिंकून आणेतो क्रिकेट हा हिणवण्याचा खेळ होता. आपला संघ हरण्यासाठीच खेळतो असे ही क्रिकेटद्वेष्टी जमात कुत्सितपणे म्हणत असे. त्या विजयानंतर आणि अगदी तळागाळात त्याचा प्रसार झाल्यानंतर बीसीसीआयने क्रिकेटचे जाळॆ वेगाने विणले, त्यातून पैसा निर्माण केला. इतकेच नव्हे तर आज आयसीसीला आपल्या मनाप्रमाणे वाकवण्याइतकी ताकद निर्माण केली. हॉकीने इतिहासात एकदा तरी याच्या दशांशाने दबदबा निर्माण केला होता का?

काही दीडशहाणे ‘क्रिकेटमुळे हॉकी मागे पडली’ वगैरे निराधार विधाने करत असतात. का बुवा, क्रिकेटने तुमचे पैसे ढापले, मैदाने बळकावली की खेळाडू पळवून नेले? गल्लीबोळात हॉकीऐवजी क्रिकेट अधिक खेळले जाऊ लागले याला सोपी कारणे आहेत. हॉकीला विशिष्ट मापाचे मैदान लागले, विशिष्ट बनावटीची काठी लागते, खास असा चेंडू लागतो, पेनल्टी कॉर्नर वगैरेचे नियम नीट माहित असलेला पंच असावा लागतो...

याउलट कुठल्याही लाकडापासून गल्लीतल्या सुताराकडून तासून आणलेली बॅट, कागदाच्या चिंध्या दाबून बसवून त्यावर सायकलच्या चाकातील ट्युबचे तुकडे बसवून तयार केलेला चेंडू आणि कुठेही भिंतीवर खडूने तीन रेघा ओढून तयार केलेले स्टंप्स यावर मुलांचे क्रिकेट सुरू होते. खेळाचे मैदान लागत नाही. रस्त्याच्या चिंचोळ्या पट्टीतही खेळता येते. नियमही इतके लवचिक की अशा ‘स्थानिक’ क्रिकेटला रुचतील झेपतील अशा तर्‍हेने ते वाकवता येतात. उदा. एलबीडब्ल्युचा निर्णय वादग्रस्त होतो म्हणून तो नियम बाद. पण त्याऐवजी तीनवेळा पायाला लागले की फलंदाज बाद. अमुक भिंतीला लागला तर दोन धावा, गच्चीवर मारला की आउट. यातून गल्लीतली मुले सहजपणे क्रिकेटची मजा लुटत.

पुढे आयपीएलच्या यशानंतर राज्य पातळीवर, जिल्हापातळीवरील लीग्ज सुरू झाल्या नि या गल्लीतील खेळाडूंना मोठ्या सामन्यांत खेळण्याची संधी मिळू लागली. याला पर्यायी व्यवस्था हॉकीसाठी का केली नाही, केली नसल्यास काय करता येईल याचा विचार का केला गेला नाही? मेजर ध्यानचंद यांच्या काळातील यशाच्या जोरावर हॉकीचे किती काळ कौतुक करत बसणार आपण?

स्वत: पैसा निर्माण करून त्याआधारे खेळाला तळागाळापर्यंत पोहोचवणारी बीसीसीआय कुठे नि सतत - जी काही तुटपुंजी असेल ती- सरकारी मेहेरबानी घेऊन ’राष्ट्रीय खेळा’चे बिरुद मिरवणारी हॉकी कुठे. ज्यांचे कर्तृत्व सामान्य आहे त्यांना अट्टाहासाने डोक्यावर घ्या म्हणायचे आणि ज्यांनी इतके काही साध्य केले आहे त्यांच्या नावे नाके मुरडायची हा वाकुडेपणा का करत असावेत लोक?

तिसरा मुद्दा म्हणजे `ब्रिटिशांनी आणलेला खेळ का खेळता?' हा अत्यंत बावळट तर्क आहे! या वक्रनासिका मंडळींनी आयुष्यात कोणकोणते खेळ खेळले मला सांगावे. त्यातील बहुतेक खेळ हे परदेशातून आलेले आहेत हे मी दाखवू शकतो. बैठ्या खेळांमध्ये पत्ते, कॅरम, बुद्धिबळ वगैरे बहुतेक खेळ थेट वा अप्रत्यक्षपणे बाहेरूनच आलेले आहेत. बॅडमिंटन हा परदेशी व्यक्तींनी पण या देशात सुरू केलेला एकमेव खेळ असावा. याखेरीज आपले लंगडी, कबड्डी वगैरे मैदानी खेळ आज अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. आयपीएलच्या यशानंतर तेच मॉडेल राबवून चालू झालेल्या कबड्डी लीगने त्यांत पुन्हा प्राण फुंकले आहेत.

एरवी बहुतेक सर्व मैदानी खेळदेखील परदेशातूनच आलेले आहेत. आणि परदेशाचे एवढे वावडे आहे तर आपल्या आयुष्यातील कोणता भाग आपण स्वदेशी वस्तूंसाठी राखला आहे सांगाल का? जगण्यातील जवळजवळ प्रत्येक सुविधा, भोगवस्तू या परदेशी कल्पना वा तेथील उत्पादन आहे. आपल्या स्वदेशी प्रेमाची सुरुवात ६० हजाराचा चिनी मोबाईल न घेता देशी बनावटीचा मोबाईल, लॅपटॉप घेऊन करावी. स्वयंचलित दुचाकी, चारचाकी या संकल्पना परदेशी असल्याने त्या सोडून सायकल वापरावी वा घोडेस्वारी करावी. (घोडेही पुन्हा अरबस्तानातून किंवा त्याही पलिकडच्या आफ्रिकेतून आले हे जाताजाता सांगून टाकतो.)

गोळाबेरीज ही की ‘सामने फिक्स्ड असतात म्हणून मी पाहात नाही.’ या वा अशांसारख्या दाव्यांना माझ्या मते शून्य अर्थ आहे. मुळात तुम्हाला तो खेळ आवडत नसेल, किंवा पूर्वी आवडत होता नि आता आवड ओसरली असेल म्हणून पाहावासा वाटत नसेल, तर तो पाहू नयेच. त्याबद्दल इतर कुणी आग्रह करण्याचा प्रयत्न केल्यास वा न पाहिल्याबद्दल हिणवल्यास त्याला जरूर फटकारावे. पण उगाच इतरांपेक्षा आमची अभिरुची उच्चीची नि काय फालतू गोष्टीत लोक वेळ वाया घालवतात या आविर्भावात हे असे विधान करू नये.

पण हे क्रिकेटपुरते आहे असेही नाही. साहित्य, संगीत, चित्रपटादि दृश्य कला वगैरे अनेक क्षेत्रांत असेच नसते का? धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातही? आपली निवड ही चांगली आहे हे सांगून पुरत नाही, इतरांची– विशेषत: बहुसंख्येची अभिरुची वा निवड कशी निम्न दर्जाची आहे हा सूर लावल्याखेरीज लोक बोलतच नाहीत. मग ‘पुलं-वपु आवडणारे’ हा टिंगलीचा किंवा ‘कोसलाही न आवडणारे लोक असतात.’ असा हिणवणारा सूर लागतो, ‘मी हिंदी सिनेमे पाहात नाही. फक्त वर्ल्ड सिनेमा पाहतो.’ हे उच्च अभिरुचीचा दावा करणारे विधान येते, कोणत्याही व्यापक अभ्यासाखेरीज ‘मराठी लेखनाला जागतिक दर्जा नाही.’ (थोडक्यात क्रिकेटप्रमाणेच ते लेखन सर्वसामान्यांसाठी, फुटकळ असते) वगैरे विधानाच्या पिंका टाकल्या जातात.

मुद्दा खेळाचा असो, साहित्याचा असो, कलेचा असो, श्रद्धेचा असो, स्वश्रेष्ठत्वाचे दावे न्यूनगंडी मनांना पुरेसे वाटत नाहीत. आपली रेघ इतरांपेक्षा मोठी आहे हे सिद्ध करण्यासाठी इतरांची रेघ खोडून लहान करण्याचा आटापिटा निरंतर चालू राहतो.

- oOo -

संबंधित लेखन:

क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे काय?
सुरेख सामन्याचे विध्वंसक कवित्व
डकवर्थ-लुईस नियमावली आणि वृत्त-माध्यमे
बा कपिल देवा


हे वाचले का?

मंगळवार, १० ऑक्टोबर, २०२३

बुद्धिबळाचा अंत निश्चित आहे?

दहा-एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ऑफिसमध्ये चहापान करता-करता गप्पा चालू होत्या. विषय बुद्धिबळाचा होता. स्वत: उत्तम बुद्धिबळ खेळणारा आमचा बॉस म्हणाला,‘एक ना एक दिवस बुद्धिबळ हा खेळ बाद होऊन जाईल!’

त्याचा मुद्दा असा होता की बुद्धिबळातील प्रत्येक खेळीनंतर प्रतिस्पर्ध्याला उपलब्ध असणार्‍या खेळींची संख्या ही मर्यादित (finite) असते. त्या सार्‍यांची सूची बनवणे शक्य आहे. आता पहिल्या खेळाडूला या प्रत्येक खेळीसाठी प्रतिवाद करायचा आहे. पण त्या प्रत्येक खेळीनंतर पहिल्या खेळाडूलाही मर्यादित खेळ्या उपलब्ध आहेत. त्यांचीही सूची करता येईल...

मुद्दा अगदी वाजवी होता. कारण आता या सार्‍या खेळींची ’ख्रिसमस ट्री’सदृश एक उतरती भाजणी तयार करता येईल. प्रत्येकी खेळी ही त्या वृक्षासाठी फांदीचा-फुटवा असेल. आणि या प्रत्येक फुटव्यापासून तयार झालेली फांदी हा– एक फांदी कमी असलेला, परंतु मूळ ट्रीसारखाच ट्री तयार होईल. प्रत्येक फांदीच्या टोकाशी पोहोचलो, की त्या मार्गाने गेले असता सामन्याचा काय निकाल लागेल हे निश्चित होईल.

आता सामन्याची पहिली खेळी करणार्‍या खेळाडूला विजय मिळवून देणार्‍या सर्व फांद्या बिनचूक माहित असतील. त्यातील एका मार्गाने तो खेळत राहिला की विजय निश्चित असेल. त्यामुळे - पांढर्‍या मोहर्‍यांनिशी - पहिली खेळी करणारा हा नेहमीच जिंकेल. काळ्याला केवळ अपघातानेच जिंकण्याची संधी राहील. त्यातही पांढर्‍याने गाफीलपणे एखादी खेळी करून ठरवलेला मार्ग सोडला, तरीही ही नाही दुसरी विजयी फांदी पकडून तो पुन्हा गाडी रूळावर आणू शकतो. त्यामुळे आता सामना खेळण्याला काहीच अर्थ राहणार नाही.

TheMoveTree
खेळ्यांचे झाड.

पत्ते अथवा मैदानी खेळ खेळत असताना असलेल्या यादृच्छिकतेचा(randomness) अथवा पर्यावरणीय घटकांचा कोणताही परिणाम या खेळावर होत नाही. बैठे खेळ जरी म्हटले, तरी पत्त्यांमध्ये वितरणामध्ये यादृच्छिकता येते; फासे वापरून खेळले जाणारे खेळ तर त्यावर अवलंबूनच असतात. खेळातील सार्‍या शक्यता मर्यादित(finite) आणि निहित(defined) असल्याने सूचिबद्ध करता येत असलेला (enumerable) बुद्धिबळ हा अपवादात्मक असा खेळ आहे. त्यामुळे तो बाद होण्याची शक्यता(possibility) नक्कीच आहे... पण याची संभाव्यता (probability) किती हा प्रश्न माझ्यातील शक्यताविज्ञानाच्या(१) विद्यार्थ्याला टोचू लागला.

खेळ, सामने नि निकाल हा बराच पुढचा पल्ला झाला. सुरुवातीला मोहरे बाजूलाच ठेवले नि निव्वळ पटाकडे पाहून विचार करण्याची सुरुवात केली, नि फार वर्षांपूर्वी ऐकलेली एक दंतकथा आठवली. तुमच्यापैकी अनेकांना आठवत असेल.

एका कलाकारावर संतुष्ट होऊन राजाने त्याला ‘हवे ते माग, मी देईन. या जगात असे काहीच नाही जे मी तुला देऊ शकणार नाही.’ असे आढ्यतेखोरपणे सांगितले. त्यावेळी राजाच्या समोरचा बुद्धिबळाचा पट पाहून कलाकार हसून म्हणाला, ‘महाराज, मला फार काही नको, तुमच्या त्या पटावरील प्रत्येक घरासाठी त्या घराच्या मागील घराच्या दुप्पट तांदुळाचे दाणे मला द्या.’ राजा आढ्यतेखोरपणे हसला नि म्हणाला, ‘बस, एवढेच? मी तर तुला भरपूर पैसे, दागदागिने, जडजवाहीर, शेतीवाडी काय वाटेल ते देऊ शकतो.’ कलाकार म्हणाला, ‘नको महाराज, मला एवढेच पुरे.’

PowerOfPower

पटावरील पहिल्या घरासाठी एक, दुसर्‍यासाठी दोन, तिसर्‍यासाठी चार, चौथ्यासाठी आठ, पाचव्यासाठी सोळा... असे करत शेवटच्या घरासाठी २ चा त्रेसष्टावा घात (२‍६३) इतके दाणे राजाने त्या कलाकाराला देणे अपेक्षित होते. या सार्‍यांची बेरीज केली तर ती (२‍६४ - १) इतकी भरते. अर्थातच राजाकडे तेवढे धान्यही नव्हते की त्यांची मोजदाद करायला मनुष्यबळ. कलाकाराचे देणे भागवणे अशक्य झाल्याने लज्जित झालेल्या त्या राजाचे गर्वहरण होते अशी ती कथा.

कुणी म्हणेल,‘राजा पण खुळाच आहे. इतके दाणे मोजत कशाला बसायचे? दाणे मोजण्यापेक्षा त्यांचे वजन करणे जास्त सोपे आहे. त्याने पन्नास, शंभर वा त्या काळी वजनाचे जे काही सर्वात लहान माप असेल ते घेऊन ते भरणारे तांदुळाचे दाणे मोजायचे. तांदुळ-संख्येच्या मोजणीचे हे माप जिततके लहान, तितके दाणे लवकर मोजून होतील. आता पटीच्या हिशोबाने या (२‍६४ - १) दाण्यांसाठी किती किलो तांदुळ द्यावे लागतील याचे मोजमाप करता येईल. झाले काम.’

दाणे मोजताना लागणारी ऊर्जा, मेंदूची जागरूकता (किंवा उलट दिशेने सहनशक्ती) ही वजन करताना लागणार्‍या ऊर्जेपेक्षा बरीच जास्त असते. त्यामुळे वजन करणे हे कमी थकवणारे असते. त्यामुळे निव्वळ दाणे-मोजणीची जागा वजन-मोजणीने बदलून घेतली, तर मोजणीचे कष्ट कमी होतील हे यामागचे गृहितक आहे. पण...असे म्हणणार्‍याने मोजणीतील तसंच पटीच्या गणितातील त्रुटींचा विचार केलेला नाही!

एखाद्या किरकोळ भाजीविक्रेत्याशी अथवा फळविक्रेत्याशी बोलून पाहा. ठोक बाजारातून त्याने वीस किलो माल आणला, तर तो साधारण साडे-एकोणीस किलो मालच विकत असतो. याचे कारण आठ ते दहा जणांना तो अर्धा किलो, एक किलो मोजून देतो तेव्हा प्रत्यक्षात त्याला त्याहून काही ग्रॅम अधिक माल द्यावा लागतो. कारण तराजूची तागडी नेहमी आपल्या सोयीच्या बाजूला कललेली असावी असा ग्राहकाचा आग्रह असतो. (विक्रेता तराजू वा मापे स्वत:च्या सोयीसाठी अनुकूल करून ही त्रुटी भरून काढू शकतो. पण तो फसवणुकीचा भाग आहे.) त्यामुळॆ हे वीस किलो दहा जणांत वाटले गेले तर होणारा तोटा हा केवळ दोघांत वाटले तर होणार्‍या तोट्याहून अधिक असतो. विभागणी संख्या जितकी अधिक तितका तोटा- किंवा गणिताच्या भाषेत मोजणीची त्रुटी (approximation error) अधिक.(आता डिजिटल वजनकाट्यामुळे विक्रेत्याच्या दृष्टीने स्थिती सुधारली आहे.)

वर म्हटले तसे, माप जितके लहान तितके त्यात मावणार्‍या दाण्यांची संख्या कमी. म्हणजे दाणे लवकर मोजून होतील. पण त्याचवेळी त्या मापाने धान्य अधिक वेळा मोजावे लागेल. याउलट माप मोठे घेतले तर त्याच्या साहाय्याने धान्य-मोजणीची संख्या कमी असेल. परंतु एका मापात असणार्‍या दाण्यांची संख्या अधिक असल्याने दाणे-मोजणी अधिक जिकीरीची होणार.

‘Type-I error’ आणि ‘Type-II error’ असे त्रुटींचे दोन प्रकार संख्याशास्त्रीय (Statistical) निष्कर्षामध्ये अंतर्भूत असतात. या दोघी परस्पर-विरोधी परिणाम घडवणार्‍या असतात. दोघींनाही एकाच वेळी कमी करणे शक्य नसते. एकीला कमी करू गेले तर दुसरी वाढते. तांदुळ-मोजणीचे हे उदाहरण या दोन संकल्पनाचे प्रभाव अतिशय सोप्या प्रकारे समजावून देते आहे. तिथे त्या दोहोंना अनुक्रमे false-positive आणि false-negative (चूक असता बरोबर असा निवाडा देणे आणि उलट) असे ढोबळमानाने म्हटले जाते. त्याच धर्तीवर आपल्या उदाहरणासंदर्भात या दोन्ही मोजण्यांमध्ये येणार्‍या त्रुटींना अनुक्रमे ‘विभागणीतील त्रुटी’ आणि ‘एकत्रीकरणातील त्रुटी’(२) असे म्हणता येईल. आता मोजणी करताना राजाला या दोन्ही (वजन नि संख्या) मोजणींच्या संख्येचा सुवर्णमध्य साधणे हे आव्हान असेल.

विक्रेत्यांच्या हाती डिजिटल वजन-काटा हे अत्याधुनिक उपकरण आले आहे, त्यातून ठोक मालाच्या विभागणीतील त्रुटी कमी होऊन त्याचे नुकसानीचे प्रमाण आता नगण्य झाले आहे. त्याचप्रमाणे तुमच्या-आमच्या सर्वांच्या हातीही संगणक नावाचे बहुगुणी उपकरण आले आहे, जे तांदुळ मोजणार्‍या राजाच्या काळी नव्हते. अशा अवाढव्य मोजणीचे काम या नव्या उपकरणाने करायचे ठरवले तर...? ‘एक-एक दाण्याची मोजणी आपण वजन-मोजणीने बदलून घेत मोजणीतील कष्ट घटवू शकतो, तसेच संगणकाच्या मोजणी-क्षमतेचा वापर करून करु शकतो का?’ या प्रश्नाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करू.

संगणकाच्या स्मरणमंजुषेच्या व्याप्तीसाठी बाईट(byte) हे एकक वापरले जाते. त्याच्या पटींची गणिते पाहिली, तर ज्याला एक पेटाबाईट(petabyte) म्हणतो ते म्हणजे १०‍ या आकड्याचा जेमतेम बारावा घात आहे. २ चा दहावा घात म्हणजे १०२४ हा अगदी ढोबळ मानाने दहाच्या तिसर्‍या घाताच्या जवळ जातो. त्याचप्रमाणे अगदी ढोबळ गणिताने पाहिले तर आपल्या मोजणीसाठी आवश्यक असणारी २६३ ही संख्या १०१९च्या जवळपास जाते. १०‍१८ या आकड्याला गणिती भाषेत Quintillion म्हटले जाते. आता आपल्याला १० क्विंटिलियन इतके तांदुळाचे दाणे मोजायचे आहेत. सर्वसाधारण संगणकाची कुवत पाहता एवढ्या संख्येने दाणे मोजायचे तर विशेष गणनपद्धती (algorithm) विकसित करावी लागेल.

बुद्धिबळाचा पट हा आठ ओळी नि आठ स्तंभांचा चौरस असतो. खेळ सुरू करण्यापूर्वी दोन्ही बाजूंनी पहिल्या दोन ओळीत काळ्या नि पांढर्‍या रंगाचे मोहरे उभे केले जातात. मधल्या चार ओळी मोकळ्या राहातात. पांढरा पहिली खेळी करत असतो. त्यासाठी त्याला पुढची आठ प्यादी आणि दोन घोडे उपलब्ध असतात. प्रत्येक प्यादे हे पहिल्या खेळीत एक किंवा दोन घरे पुढे जाऊ शकते तर घोड्यांना त्यांच्या पहिल्या घरातून बाहेर पडण्यासाठी दोन पर्याय असतात. पहिल्या खेळीसाठी असे एकुण वीस पर्याय पांढर्‍याला उपलब्ध असतात.

पांढर्‍याच्या खेळीनंतर समोरून काळ्या मोहर्‍यांसह खेळणार्‍यालाही तितकेच पर्याय उपलब्ध असतात. त्यानंतर पटावरची परिस्थिती जसजशी बदलत जाते तसतसे प्रत्येक खेळाडूला उपलब्ध खेळ्यांची संख्या कमीजास्त होत जाते.

समजा सुरुवात करताना पांढर्‍याने e2-e4 खेळी केली असेल तर पटाची स्थिती एका प्रकारची असेल. त्याऐवजी त्याने c2-c4 केली असेल तर स्थिती वेगळी असेल. म्हणजे मागची खेळी कुठली यानुसार पटाची स्थिती आणि पुढच्या खेळ्यांच्या पर्यायांची उपलब्धता, त्यांची संख्या बदलत जाते.

e2e4
e2-e4 opening.
c2c4
c2-c4 opening.

आता समजा पांढर्‍याने c4 किंवा e4 पैकी कोणतीही खेळी केली तरी काळ्याने त्याचा g स्तंभातील घोडा f स्तंभात आणून ठेवला. तर दोन्ही परिस्थितीमध्ये पटाची स्थिती अनुक्रमे अशी दिसेल. दोनमधील फरक पाहिला तर पहिल्या शक्यतेमध्ये हा घोडा पांढर्‍याच्या पुढे आलेल्या प्याद्याला ठार मारण्याची धमकी देतो आहे. त्याचबरोबर त्याने ती कृती न करण्याचे ठरवले तर ती एका जागा त्याला बंद होते आहे. याउलट दुसर्‍या शक्यतेमध्ये त्याला ती खुली राहिली आहे.

पांढर्‍या मोहर्‍यांची पहिली खेळी २० पर्यायांची, त्यावर काळ्या मोहर्‍यांची पहिली खेळी पुन्हा वीस पर्यायांची, त्यानंतर- पहिल्या दोन खेळ्या केल्यानंतर तयार झालेल्या पट-स्थितीसंदर्भात - पुन्हा पांढर्‍याच्या खेळीसाठी समजा १९ खेळी शक्य असतील, तर खेळ सुरू होऊन तीन खेळ्यांनतर पटाच्या स्थितीचे २०x२०x१९ = ७६०० पर्याय दिसतात. प्रत्येक खेळीगणिक हा आकडा भूमितीश्रेणीने वाढत जातो. निव्वळ घरांचा विचार केला तर प्रत्येक घरागणिक मोजणी २च्या घाताने वाढते हे आपण सुरूवातीला पाहिले. इथे तर तो तिसर्‍या खेळीअंती ८ ऐवजी ८०००च्या जवळ पोहोचतो आहे. शक्यतांच्या संख्येतील वाढीच्या वेगाचा अंदाज यातून येतील.

e2e4BlackKnightMove
e2-e4, N-f6.
c2c4BlackKnightMove
c2-c4, N-f6.

निव्वळ घरांच्या हिशोबाचा विचार केला, तर सर्व घरे सारखीच असल्याने मोजणी सहजपणे पटींच्या हिशोबात जात होती. इथे मोहर्‍यांच्या स्थितीनुसार प्रत्येक पट-मांडणीला(board-position) पुढील उपलब्ध खेळ्यांची संख्या कमी-जास्त होणार आहे. एक घोडा पटांच्या मध्यभागी असलेल्या C-3 ते F-6 (वरचे पट पाहा) या सोळा घरांमध्ये असतो, तेव्हा त्याच्या जास्तीत-जास्त आठ संभाव्य खेळी होऊ शकतात. तोच घोडा इतर चार स्तंभ आणि/किंवा पट्टीमध्ये असेल तर पटाच्या मर्यादेमुळे ही संख्या कमी होईल. त्याचप्रमाणे त्याच्या संभाव्य जागी आपलेच अन्य एखादे मोहरे असेल तर त्याला ती जागाही बंद होईल (प्रतिस्पर्ध्याचे असेल तर मारण्याचा विचार करावा घ्यावा लागेल.). घोडा निदान इतर मोहर्‍यांवरून उडी मारू शकतो. इतर मोहर्‍यांना अन्य मोहर्‍यांचा निव्वळ अडथळाही अनेक जागा बंद करू शकतो. या सार्‍या बंधनांमुळे सुरुवातीच्या तांदुळांच्या गणितात जसे ‘प्रत्येक घराला दुप्पट’ असे सोपे गुणाकाराचे गणित होते तसे राहात नाही. त्यामुळे काही ‘फांद्या’ अधिक लांबीच्या तर काही आखूड अशी स्थिती होते. त्यातून मोजणी अधिकच जिकीरीची होत जाते.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या पहिल्या दोन खेळींप्रमाणेच प्रत्येक खेळीनंतर पुढच्या खेळींची बिनचूक यादी करणे शक्य आहे. मानवी मेंदूच्या गणनशक्तीला हे शक्य आहे! परंतु त्यासाठी लागणारी ऊर्जा, चिकाटी आणि वेळ प्रचंड आहे. आणि म्हणूनच हे आजवर शक्य झालेले नाही. यात रस असणार्‍या अनेक व्यक्तींचा एक गट सामूहिकपणे कदाचित हे साध्य करू शकेल. माणसाच्या मदतीला आता संगणक असल्याने त्याची मदतही घेता येईल. मुद्दा एवढाच आहे की, ‘तसे करणे शक्य आहे का आणि या सार्‍या शक्यता कोण मांडून पाहणार?’

बुद्धिबळ– विशेषत: जागतिक– स्पर्धा होतात, तेव्हा त्या सामन्याचे समालोचन करणारे खेळाडू ‘सद्यस्थिती पाहता कुणाचे पारडे जड आहे नि कसे’ याबाबत तुम्हाला सांगत असतात. त्यामध्ये ते त्यांना चटकन सुचतील त्या पुढच्या खेळ्यांकडे पाहून आपला अंदाज बांधत असतात. इंटरनेटवर पाहात असाल, तर बाजूला ‘Stockfish’ किंवा ‘Houdini’ तुम्हाला सांगतो की सध्या कुणाची स्थिती चांगली आहे नि तो जिंकण्याची शक्यता किती आहे. हे दोन ‘संगणक-खेळाडू’ अथवा ‘एंजिन्स’ असतात. 

हे खेळाडू मानवी असतील असोत वा एंजिन्स, यांना शेवटपर्यंत सार्‍या खेळ्यांच्या सर्व शक्यता मोजत जाणे शक्यच नसते. एंजिन्स सोळा ते अठरा खेळ्यांपर्यंत जाऊ शकतात. त्याहून अधिक पुढे जाण्यासाठी आवश्यक असणारी संगणक क्षमता आजही अस्तित्वात नाही हे ऐकून अनेकांना धक्का बसेल, पण हे सत्य आहे. महासंगणकांचे जाळे उभारले तर ही कुवत थोडी वाढवता येईल. माणसाला तर जेमतेम सहा-सात खेळ्यांपर्यंतचे मोजता येईल. 

त्यामुळे हे खेळाडू असोत की एंजिन्स, दोघेही वास्तवात एक एक खेळी नि त्यापुढच्या शक्यता पाहात नाहीत; दोघांकडेही यापूर्वीच्या खेळांचा डेटाबेस असतो. खेळाडू असतील तर ते त्यातून सर्वाधिक संभाव्य अथवा पूर्वी पाहिलेल्या शक्यतांचा विचार करतात.

‘Stockfish’ अथवा ‘Houdini’ तर त्यातून सरळ पटाची सद्यस्थिती ती स्थिती आलेल्या पूर्वीच्या सार्‍या सामन्यांचे निकाल पाहून त्यांच्या सरासरीनुसार कोण वरचढ दिसते हे सांगत असतात. म्हणजे ते विश्लेषण करत बसत नाहीत. त्याऐवजी चौसष्ट घरांमध्ये विविध ठिकाणी स्थानापन्न झालेल्या मोहर्‍यांच्या स्थितीवरून ते पटाची ओळख म्हणून पटस्थितीशी एकास-एक नाते सांगणारा एक निदर्शक आकडा अथवा शब्दसमूह (checksum) तयार करतात. 

यापूर्वी झालेल्या सामन्यांमधील पटांच्या प्रत्येक पटस्थितींचे असे निदर्शक आधीच तयार असतात. आता चालू सामन्यातील हा आकडा कोणकोणत्या सामन्यांच्या डेटामध्ये दिसतो,त्यांचा निकाल काय लागला होता हे पाहून त्यानुसार निकाल काळा वा पांढरा विजेता होण्याच्या बाजूला मोजणी करत जातात. अखेरीस यातून दोन्ही प्रकारच्या मोहर्‍यांच्या विजयांची संख्या मिळते. त्यांचे गुणोत्तर हे चालू सामन्याचे भाकित म्हणून ते सांगत असतात.

हे ही वाटते तितके सोपे नाही. ‘सर्च’ ही प्रक्रिया किती किचकट असते हे संगणकावर प्रत्यक्ष प्रोग्रामिंग करणार्‍यांनाच ठाऊक आहे. आणि वर दिलेल्या प्रक्रियेमध्ये कित्येक लक्ष सर्च करायचे असतात. त्यासाठी पुन्हा वेगळ्या प्रक्रियेची (algorithm) शोधाशोध, अंमलबजावणी, नवा पर्याय, अंमलबजावणी या मार्गाने प्रवास करत राहावे लागते. यासाठी अनेक मंडळी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत असतात. 

यातूनच वर उल्लेख केलेल्या Stockfish, Houdini यांच्याखेरीज Komodo, Lc0 (Leela Chess), Fritz वगैरे एंजिन्स अथवा संगणक-खेळाडू तयार झाले आहेत. ही मंडळी इतकी बलशाली झाली आहेत की आता त्यांच्या-त्यांच्यातच Computer Chess Championships होऊ लागल्या आहेत. बुद्धिबळाचे गणित सोडवता-सोडवता संगणकालाच त्याची गोडी लागली असावी बहुधा.

ही एंजिन्स केवळ आकडेमोड करत असतात. आणि म्हणूनच एखादी नवी, अनपेक्षित खेळी करुन एखादा खेळाडू त्यांचे अंदाज चुकवू शकतो. तर उलट दिशेने एंजिन्सची कुवत नि सामान्य खेळाडूची कुवत यात प्रचंड फरक असल्याने खेळाडू तितकी खोलवर मोजणीही करू शकत नाहीत. आणि म्हणून असा ‘निश्चित अंत असलेला’ हा खेळ अजूनही जिवंत आहे.

संगणकाची प्रगती वेगाने होत असल्याने कदाचित तो अंत जवळ येतो आहे असे भासत राहील. पण इंग्रजीत म्हणतात तसे ‘so close, yet so far’ अशीच स्थिती राहील असा माझा होरा आहे. कारण ज्या वेगाने संगणक प्रगती करत आहेत, त्याच वेगाने शस्त्रास्त्रनिर्मिती नि ती वापरण्याची माणसांतील खुमखुमीही. त्याला खतपाणी घालायला नि वारा पाजायला धर्म, वंश, देश, आर्थिक विषमता वगैरे घटकही जोमाने काम करत आहेत. त्यामुळे बुद्धिबळ रद्दबातल करणारा संगणक तयार होण्यापूर्वीच माणसातील हिंसा नि त्याच्या हातातील शस्त्रे त्या संगणकासह सार्‍या मानवी प्रगतीचा विध्वंस करण्याइतपत प्रगती(?) करतील. त्यामुळे या खेळाचा अंत होण्याआधी मानवजातीचा अंत होईल अशी मला खात्री आहे.

बुद्धिबळाचा पट आणि तांदुळ मोजणीचे काम यांसारख्या जगण्यातील काही अतिशय सामान्य वाटणार्‍या गोष्टी संगणकालाही झेपणार नाही एवढ्या व्याप्तीचे काम तुमच्या पुढ्यात आणून टाकू शकतात. आपल्या बुद्धीला फार ताण देत देण्याची तसदी घेतली नाही, तर ते त्या राजासारखेच सोपे वाटू शकते. शक्यतांचा विचार केला तर मात्र त्याची व्याप्ती आणि जटीलता ध्यानात येते. आपण त्यावर काढलेला उपाय हा बिनचूक तर नाहीच, पण इतर कुणाला त्याहून चांगला सापडू शकेल, याचे भान जिवंत राहते. आणि ते तसे राहिले तर अस्मिता नि उद्दामपणापासून दूर राहून माणूस नम्र राहतो. त्या राजासारखे गर्वहरण होण्याची वेळ येत नाही.

- oOo -

(१). सुरुवातीला केवळ आकडेमोडीशी संबंधित तंत्रे समाविष्ट असलेला Statistics हा विषय मराठी भाषेमध्ये ‘संख्याशास्त्र’ या नावाने ओळखला जाऊ लागला. परंतु पुढे विश्लेषण व भाकिते करण्यास उपयुक्त असा स्वतंत्र विषय म्हणून तो उदयाला आला. ‘संभाव्यता’ (Probability) ही संकल्पना हा त्याचा मुख्य आधार होता. सरसकट संख्याशास्त्र या नावाने आता याला ओळखणे चुकीचे ठरते आहे. यासाठी निव्वळ आकडेमोडीशी (data) संबंधित अशा संख्याशास्त्रीय पद्धतींचा वापर करताना मी त्याला संख्याशास्त्र याच नावाने संबोधतो. तर Probability theory आधारे उभ्या असलेल्या उर्वरित भागाला ‘शक्यताविज्ञान’ ही संज्ञा वापरतो. खरेतर त्याला संभाव्यताविज्ञान म्हणायला हवे. कारण संभाव्यता ही शक्यतेच्या पुढचा टप्पा आहे. परंतु शक्यता हा शब्द तसा सोपा नि रुळलेला असल्याने तो वापरला आहे.

(२). भारतीय राजकारणाच्या संदर्भात यांना ‘फूट त्रुटी’ आणि ‘युती त्रुटी’ही म्हणता येईल. :) फूट पडल्याने दोन बाजूंचे काही मतदार कमी होतील वा काही नवेही मिळतील. तर युती करूनही दोन्ही घटकपक्षांच्या मतांची बेरीज पदरी पडेल असे नाही.

---

संबंधित लेखन:

१. बुद्धिबळातील ‘मार्शल’ आर्ट


हे वाचले का?

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ९ : Foot that fits

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

पाऊस << मागील भाग

---

काही वर्षांपूर्वी ‘सिंडरेला’ या गाजलेल्या परीकथेवर आधारित एक चित्रपट पाहिला होता. मध्यरात्रीचे टोले ऐकून घाईने निघून गेलेल्या सिंडरेलाचा काचेचा(१) बूट निसटून पडतो. तिच्या प्रेमात पडलेला राजपुत्र तो घेऊन तिचा शोध घेण्याचा मनोदय जाहीर करतो. ‘इतक्या सार्‍या प्रजेमध्ये हा बूट कुणाचा असेल हे कसे शोधणार?’ या प्रश्नावर राजपुत्र म्हणतो, ‘Every shoe has a foot that fits.’ आणि तो त्या बुटाच्या मालकिणीच्या शोधात निघतो.

आज भांडवलशाहीच्या जमान्यामध्ये विशिष्ट व्यक्तिच्या पायाच्या नेमक्या मापानुसार पादत्राणे, बूट शिवणारे चर्मकार दुर्मिळ झाले आहेत. पावलांच्या निव्वळ लांबीवरून बारा-चौदा आकारांत ठोक वर्गीकरण करून जगभरातील सर्व माणसांसाठी पादत्राणांचे घाऊक उत्पादन करणार्‍या ‘उत्पादकांनी’ त्यांची जागा घेतली आहे. दुसरीकडे अगदी लहान शहरांतूनही एखाद्या विशिष्ट बुटाशी सोयरिक करू शकतील अशी शेकडो ‘पावले’ सापडतील. त्यामुळे एखादा बूट हाती घेऊन आपल्या ‘स्वप्नसुंदरी’च्या शोधात निघालेल्या त्या प्रिन्स चार्मिंगची कदाचित एखाद्या ‘क्रुएला’शी(२) गाठ पडण्याची शक्यता आहे.

ConfusedKey

परंतु तुम्ही बिम्मच्या वयाचे असता, तेव्हा तुम्हाला जगाच्या या व्यापाची फारशी समज नसते. त्यामुळे त्या वयात सिंडरेलाची कथा वाचलेली असो वा नसो, ‘या बुटाची मालकीण कोण?’ असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पडू शकतो का– पडलाच होता. एकदा त्याला एक पितळी किल्ली सापडली. त्याने ती घरातील प्रत्येक कुलुपाला लावून पाहिली. पण तिने कुठलेच कुलूप उघडेना. शेवटी तो आईकडे आला नि म्हणाला ‘आई, या किल्लीचे कुलूप कुठे आहे?’

पुस्तकामध्ये बिम्मचा हा प्रश्न वाचल्यावर वाचणार्‍याच्या चेहर्‍यावर हमखास हसू फुटते. ‘दाराच्या कुलुपाची किल्ली कुठे पाहिलीस का?’ ‘माझ्या गाडीची किल्ली...’ ‘तिजोरीची किल्ली...’ असा किल्लीचा परावलंबी उल्लेख ऐकण्याची आपल्याला सवय असते. आपल्याला कपाट उघडायचे असते, गाडी चालू करायची असते, तिजोरीमध्ये पैसे ठेवायचे वा त्यातून काढायचे असतात... म्हणून आपण त्या त्या वस्तूची किल्ली शोधतो. हे प्रश्न आपल्याला परिचित असल्याने, ‘या किल्लीचे कुलूप कुठे आहे?’ हा उलट प्रश्न हास्यास्पद असल्याचा ‘प्रथमश्रवणी’ ग्रह होत असतो. असा विचार करणार्‍या बिम्मला आपण हसत असतो. काचेचा बूट घेऊन आपल्या प्रेमिकेला शोधत जाणार्‍या राजपुत्राची कथा परीकथा– अवास्तव म्हणून सोडून देत असतो.

पण बिम्मचा हा हास्यास्पद वाटणारा प्रश्न तुम्हीही कधी न कधी, वेगळ्या संदर्भात विचारलेला असतो. फक्त तो तुमच्या ध्यानात आलेला नसतो. किल्ल्यांच्या जुडग्यामध्ये, किल्ली ठेवण्याच्या बोर्डवर अथवा ड्रॉवरमध्ये एखादी अपरिचित किल्ली दिसली तर ‘ही कशाची– कुठल्या कुलुपाची किल्ली आहे?’ असे आपण विचारतो ना? प्रश्न तोच असला, तरी रोख उलट असतो. ‘हिने एखादे कुलूप उघडत असेल तरच तिचा उपयोग, एरवी ती इथे का सांभाळून ठेवली आहे?’ असा या प्रश्नाचा रोख असतो. यात किल्ली ही दाराच्या कुलुपापेक्षा, गाडीपेक्षा, तिजोरीपेक्षा दुय्यम, परावलंबी वस्तू मानली जाते. तिच्या अस्तित्वाचे कारण तिचे उपयुक्ततामूल्यच हेच असते, आणि ते मूल्य या अन्य वस्तूंच्या संदर्भातच निश्चित होत असते.

माणसांच्या बहुतेक समाजांत स्त्रीची ओळख तिच्या पुरुषाची जोडीदार इतकीच असते. तिला स्वतंत्र ओळख या सामाजिक व्यवस्था देत नाहीत. जिच्या पोटी मूल जन्माला आलेले नाही, अथवा येऊ शकत नाही, अशा विवाहित स्त्रीचे अथवा पतीचे निधन झाल्याने निरूपयोगी(!) ठरलेल्या स्त्रीचे सामाजिक स्थान शून्य होऊन जाते. आपल्या कुटुंबाचा भाग असलेल्या, समाजाच्या अर्धा हिस्सा असलेल्या जिवांकडे अशा दृष्टीने पाहिले जाते, तिथे किल्लीसारख्या जड वस्तूंकडे याच दृष्टिकोनातून पाहिले जाणार हे उघडच आहे.

पण हे संस्कारांचे, व्यवस्थांचे जोखड मानगुटी बसण्यापूर्वी तुम्ही बिम्म असता. या संस्कारांनी, व्यवस्थांनी लादलेल्या तयार उत्तरांच्या वैचारिक शृंखला अद्याप तुमच्या मेंदूंना वेटोळे घालू शकलेल्या नसतात. अनुभवांना नाकारून, पोथ्यांना वास्तव मानून चालण्याची झापडबंद वृत्ती अद्याप पुरेशी प्रबळ झालेली नसते... जगण्याने समोर ठेवलेल्या प्रश्नांना भिडण्याची तुमची तयारी असते.

बिम्मच्या वयात स्वार्थ समजू लागला असला, तरी व्यक्तिनिरपेक्ष अशी ‘मालकी हक्क’ ही संकल्पना फारशी ठळक झालेली नसते. त्यामुळे ही किल्ली दुसर्‍या कुणाच्या कुलुपाची असेल, ही शक्यता त्याच्या डोक्यात येणे अवघड आहे. त्याच्या विचारशक्तीवर अद्यापही जिज्ञासेचा बराच प्रभाव शिल्लक असतो. त्यामुळे हा उलट शोध बिम्मला घ्यायचा असतो.

प्रत्येक कुलुपाला किल्ली असेल, तर प्रत्येक किल्लीचे एक कुलूप असणारच की! किंबहुना कुलूप आधी तयार होणार नि नंतर त्याच्यासाठी किल्ली बनवली जाणार हे उघड आहे. त्यामुळे प्रत्येक किल्लीला तिचे असे एक कुलूप असायलाच हवे. मग एखाद्या कुलुपाची हरवलेली किल्ली शोधण्यात हसण्याजोगे काही नसेल, तर एखाद्या किल्लीचे कुलूप शोधण्यात हसण्यासारखे काय आहे? न जाणो, काचेच्या बुटाची मालकीण शोधताना एखाद्या बिम्मला एखादी सिंडरेला भेटेलही.

बिम्मच्या या प्रश्नासारखे इतर काही प्रश्न तुमच्या बिम्मपणीही परिचयाचे असतात आणि ते उपयुक्तही असतात. उदाहरणार्थ, ‘अमुक शर्ट कुणाचा आहे, बिम्मचा की त्याच्या बाबांचा?’ या प्रश्नामध्ये शर्ट हा एखाद्या किल्लीसारखा किंवा सिंडरेलाच्या बुटासारखा नाही का? तो बिम्मचा असेल तर तो बाबांच्या अंगावर बसणार नाही. म्हणजे तो त्या कुलुपाची किल्ली नाही. त्यामुळे तो शर्ट जर नीट घडी करून कपाटात ठेवलेला नसेल, तर त्याबद्दल बिम्मला रागे भरावे की बाबांना, हे आईला समजते की नाही? शर्टऐवजी तिथे एखादा फ्रॉक असेल, तर तो या दोघांचाही नसून बब्बीचा आहे, हे आईला ठाऊक असते की नाही? म्हणजे एकप्रकारे ‘किल्ली पाहून याचे कुलूप कुठले’ हे आई ओळखते की नाही?

आता तुम्ही म्हणाल,“पण या ‘किल्ल्या’ अनेक कुलुपे उघडतात. तसंच एका कुलुपाच्या एकाहुन अधिक किल्ल्या असतात/असू शकतात. बिम्मचा शर्ट त्याच्याच अंगकाठीच्या एखाद्या मुलाला– अथवा मुलीलाही वापरणे शक्य आहे. त्यामुळे हे एकास-एक नाते नाही.” पण बिम्म प्रत्येक किल्लीला कुलूप असण्याबद्दल बोलतो आहे. ‘एकही किल्ली अनाथ नाही, तिला ‘किमान’ एक कुलूप असते. आणि हे खरे असल्याने ते कोणते आहे?’ असा त्याचा प्रश्न आहे. ‘ती एकच किल्ली एकाहुन अधिक कुलुपे उघडते का?’ याबद्दल तो बोलत नाही. कदाचित तो प्रश्न त्याला अजून पडलेला नाही. एक अनायासे हाती आलेली किल्ली असे एकाहुन अधिक प्रश्न तुमच्यासमोर उभे करू शकते, त्यांना सामोरे जाण्याची तयारी मात्र हवी.

You-Tube वा त्यासारख्या व्हिडिओ-शेअरिंग साईट्सवर मांजरांचे, माकडांचे वा अन्य प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सापडतात. त्यातील काहींमध्ये त्यांना आरशासमोर अथवा टीव्हीसमोर उभे केले असता त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होतात त्या टिपलेल्या असतात. त्यामध्ये आरशाच्या, टीव्हीच्या वा संगणकाच्या पडद्याच्या मागे डोकावून पाहणे ही एक प्राधान्याने दिसते.

प्रत्येक गोष्टीला, सजीवाला पुढची, समोरची बाजू असते तशीच मागची बाजूही असणार असा सामान्य प्राण्यांचा कयास असतो. कारण ते कायमच त्रिमित जगात जगत असतात. संस्कारांनी, शिक्षणाने विचाराची एक मिती नाहीशी करून आरसा वा संगणकासदृश द्विमितीमध्ये फिरणार्‍या मानवी दृष्टिकोनाशी त्यांचा फारसा परिचय नसतो. त्यामुळे आरशात दिसणारा सजातीय प्राणी तिथे आहेच असे समजून एखादे मांजर अथवा कुत्रे त्या आरशाच्या मागे जाऊन पाहात असते. टीव्हीच्या पडद्यावरून दिसेनासा झालेला एखादा प्राणी त्याच्या मागे कुठे दडला आहे, हे ती मांजर वा कुत्रे डोकावून पाहात असते.

माणूस हा प्राणी मात्र बहुतेक वेळा जे आणि जेवढे पाहातो, ऐकतो तेवढेच तंतोतंत खरे मानून चालतो. त्याच्या रूपाचे पुरे आकलन होण्यासाठी विश्लेषण-विचाराच्या साहाय्याने त्याची पाठीमागची बाजू तपासून पाहण्याची तसदी घेत नाही. विचार करून पाहा– ‘समोर दिसणार्‍या जगातील नियमांच्या उलट असेल तर काय घडेल?’ किंवा ‘आपण अनुसरतो त्या क्रियांचा क्रम बदलला, उलट करून पाहिला तर परिणाम काय असेल?’ असा विचार तुमच्या मनात येऊन किती दिवस झाले?

हा एक व्हिडिओ पाहा. ब्राझीलमध्ये घडलेली घटना आहे ही. अर्थात त्या विशेष आहे असे नाही. कारण हैदराबादपासून पंजाबपर्यंत अनेक ठिकाणचे अगदी नेमक्या याच प्रकारे अडचणीत सापडलेल्या मुलांचे व्हिडिओ मी पाहिले आहेत.

मांजर, कुत्रे अथवा मूल खिडकीच्या, जिन्याच्या गजांमध्ये आपले डोके अडकवून घेणे हा देशोदेशी पसरलेला ‘आजार’ आहे. पश्चातबुद्धीने पाहिले, तर सोपा वाटणारा त्यावरील उपाय बहुतेकांना बराच उशीरा सापडलेला दिसतो.‘जिथून डोके आत गेले, तिथूनच ते बाहेर काढावे लागेल’ या धोपटमार्गी विचाराने यातील बहुतेक वय वाढलेले चकले आहेत. पठडीबाज विचार म्हणायचा तो हा. डोके मागे ओढण्याचा प्रयत्न करण्याऐवजी उरलेल्या शरीराला डोक्याकडे पाठवावे हे उत्तर सुचण्यास बहुतेकांना बराच वेळ गेला आहे... ब्राझीलमधील या वडिलांना तब्बल दोन तास लागले.

बिम्मच्या वयात असताना कदाचित त्याच्यामध्ये ते कुतूहल, ती जिज्ञासा, तो पर्यायी विचार (lateral thinking) जिवंत असेल. पुढे संस्कार-शिक्षणाची झापडे लागली, विचारांची पठडी निश्चित झाली की त्याला नजरेच्या टप्प्यात आहे तेवढेच पाहण्याची, एखाद्या घोड्याप्रमाणे त्या चाकोरीतूनच पुढे जाण्याची सवय अंगवळणी पडून जाते. त्याचबरोबर त्याची जिज्ञासाही त्या घोडागाडीच्या चाकांवर लावलेल्या लोखंडी धावेसारखी जणू त्या एका केंद्राभोवती फिरत राहते.

आपल्या संस्कार-शिक्षणाचा उद्देशच मुळी तुमच्या-आमच्या मनातील ही स्वतंत्र, पर्यायी विचारांची शक्यता खुडून तुमच्या विचारक्षमतेला एका पठडीमध्ये बांधून घालण्याचा असतो असे म्हणता येईल. त्यामुळे या ‘पर्यायी विचारा’साठी तुम्हा-आम्हाला खास क्षमता विकसित करावी लागते.

लहानांच्या परीकथांमधे वा मोठ्यांच्या भयकथा वा गूढकथांमधे – ज्यांना अलीकडे हास्यास्पद शौर्यकथांचे स्वरूप आले आहे– अवास्तव असे भौतिक नियम आपण पाहतो. त्यात अमानवी अथवा अलौकिक पातळीवर जगणारे हीरो, त्यांचे विरोधक अथवा व्हिलन, चित्रविचित्र प्रकारचे प्राणी वगैरे गोष्टींबाबत वगैरेंबाबत आपण वाचतो वा पाहतो. परंतु ‘ते जग आपले नाही, वास्तव नाही’ याची पक्की खूणगाठ आपल्या मनात बांधलेली असते. त्यामुळे आपल्या अनुभूतीच्या वा विचार-मूल्यमापनाच्या पातळीवर ते कधीच येत नाहीत.

पण बिम्मसारख्या ‘शेजारघरच्या मुला’च्या (a boy next door) बाबतीत आपण हे वाचतो, तेव्हा ते सारे आपल्या अगदी जवळचे भासते. आता त्याच्याकडे पाहण्याचा, त्याबाबात विचार करण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा होऊ शकतो. मग आपण सापडलेल्या एखाद्या किल्लीचे कुलूप कुठले असावे असा विचार करून पाहतो, आसपास दिसणार्‍या विविध रंगांच्या उत्पत्तीचे कोडे सोडवण्याचा प्रयत्न करून पाहातो. पक्ष्याचा नि पिंजर्‍याचा आकार यांचा मेळ बसत नसेल, तर दोहोंपैकी एकाच्या आकारमानानुसार दुसरा आणण्याऐवजी पक्ष्याला पिंजर्‍याच्या आकाराचे होण्यास भाग पाडतो आणि उडणार्‍या नव्हे तर ‘उडवणार्‍या’ पतंगाला लटकून आभाळाची सैर करून येतो.

बिम्म वयाने वाढतो, यथावकाश बाबांच्या वयापर्यंत पोहोचतो, तोवर एका बुटाच्या आधाराने माणूस शोधण्यामध्ये असलेली यशाची नगण्य शक्यता त्याला जाणवू लागलेली असते. त्याचबरोबर तिच्या आधारे लिहिलेल्या परीकथेतला त्याचा रसही संपून गेलेला असतो. ‘पिनोकिओ’सारखा एखादा लांबनाक्या बिम्म तर सिंडरेलाच्या कथेला ’हुं: मेलोड्रामा सगळा.’ म्हणून उडवूनही लावतो. एका दुबळ्या धाग्याच्या आधारे गमावलेल्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचण्यातली असोशी, जिद्द वा प्रेम त्याच्या जाणिवेतून हद्दपार झालेले असते. जगण्याऐवजी आता त्याची वाटचाल जिवंत राहण्याकडे, चोख व्यावहारिक जिण्याकडे वळलेली असते. माणसाचा पुन्हा मनुष्यप्राणी होण्याकडे वाटचाल सुरू झालेली असते.


(क्रमश:) पुढील भाग >> (आगामी)     

-oOo-

(१). तो काचेचा असण्यातही एक औचित्य आहे का? असा एक प्रश्न मला पडलेला आहे. जगभरातील सर्व समाज, सर्व काळ चामड्यांचीच पादत्राणे वापरत आलेला आहे. मानवी संस्कृतीच्या उदयकाळात शिकारी मानवाला वस्त्रप्रावरणांसाठीही चामडेच उपलब्ध नि उपयुक्त असे. त्यामुळे पादत्राणेही चामड्याची असणे अपरिहार्यच होते. परंतु आज प्रगत मानवी समाजातही - प्रक्रिया केलेले का होईना- चामडेच वापरले जाते हे विशेष

या खेरीज काच हा पदार्थ बव्हंशी मानवनिर्मित आणि तसा प्रकृतीने नाजूक असल्याने पादत्राणांसाठी सर्वस्वी निरुपयोगी. पण सिंडरेलाच्या कथेमध्ये हा उल्लेख महत्त्वाचा आहे. कारण अनेक ठिकाणी त्या कथेचे शीर्षकच मुळी ‘ द लिट्‌ल ग्लास स्लिपर’ असे आहे. इसवी शतकाच्या सुरूवातीला ग्रीक तत्त्वज्ञ स्ट्राबोच्या लेखनात तिचे आद्य रूप सापडते. त्यानंतर या कथेची विविध रूपे जगभरातील अक्षरश: प्रत्येक प्राचीन संस्कृतीमध्ये लोकप्रिय झालेली आहेत.

(२). क्रुएला डी’विल: डोडी स्मिथ हिच्या ‘हंड्रेड अँड वन दाल्मेशिअन्स’ या कादंबरीतील एक प्रमुख पात्र. ज्यांचे बाह्यरूप आवडले अशा प्राण्यांना ठार मारून त्यांच्या कातड्यांपासून विविध प्रकारची वस्त्र-प्रावरणे व आभूषणे तयार करून मिरवणारी स्त्री.


हे वाचले का?

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ८: पाऊस

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास.)

अभिव्यक्ती, माध्यम आणि साधन << मागील भाग

---

सध्या पाऊस देशातून माघार घेण्याच्या टप्प्यात पोहोचला आहे. भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात जीवनदायी पाण्याचा मुख्य स्रोत हा मोसमी पाऊसच असतो. अगदी गेल्या शतकाअखेरपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती ही सर्वस्वी पावसावर अवलंबून. त्यामुळे पाण्याबरोबरच अन्नाचा पुरवठाही त्याच्यावरच अवलंबून.

या टप्प्यावर ‘या वर्षी पावसाने काय दिले?’ याचा आढावा घेतला जात असतो. पाऊस पुरेसा पडला की अधिक पडला, ओला दुष्काळ की कोरडा दुष्काळ, याबाबतचे आडाखे घेण्यास आता सुरुवात होईल. कारण पाऊस हा ‘पुरेसा’ कधीच होत नाही. कधी– वा कुठे, तो जेमतेम तहान भागवण्याइतक्या पाण्यासाठी चातकासारखी वाट पाहायला लावतो, तर कधी शेतातील उभे हिरवे वैभव एका झपाट्यासारशी नाहीसे करून शेतकर्‍याच्या तोंडचा घास हिरावून घेतो. शृंगार काव्यामध्ये पावसाभोवती कितीही रम्य वर्णने विणली गेली असली, तरी वास्तवात पाऊस हा या ना त्या प्रकारे माणसाच्या जीवनावर आघातही करतो. याचा अनुभव अलीकडच्या काही दशकांत अधिक प्रकर्षाने येऊ लागलेला आहे.

पण हा झाला एकुण समाजाच्या वा भूगोलाच्या संदर्भातील सरासरी अथवा व्यापक विचार. विशिष्ट व्यक्तींना पाऊस कसा दिसतो, जाणवतो, त्याचे पैलू कसे असतात याचे चित्र आणखी वेगळे दिसू शकते. वर म्हटले तसे वयात आलेल्या तरुण-तरुणींच्या मनात त्याच्या आगमनाने कुठल्या भावना उमटतात; शाळकरी मुलांकडून पावसाचे स्वागत कसे केले जाते, ज्यांचे रोजगार हे आकाशाच्या उघड्या छताखाली चालणार्‍या व्यवसाय/रोजगारावर अवलंबून असते त्यांची त्याच्याबद्दल काय भावना असते (लिंक झिपर्‍या) आणि या सार्‍यांपलिकडचे सारे आयुष्यच उघड्यावरचे असणार्‍यांसाठी हा पाऊस काय घेऊन येतो... या सार्‍या प्रश्नांची उत्तरे नेहमीच एकमेकांना छेद देऊन जात असतात.

नुकत्याच चालत्या-बोलत्या झालेल्या, स्वत:हून घराबाहेर पाऊल टाकू लागलेल्या बिम्मच्या दृष्टीने पाऊस कसा असतो? जंगलजीवी प्राण्यांचे जग सर्वस्वी निसर्गाधीन असत, निसर्गातील घडामोडींचे त्यांच्याशी अतूट नाते असते. पण माणूस नागर झाल्यानंतर त्याचा निसर्गाशी असलेला संबंध संपला. बिम्मचे आयुष्य आई-वडिलांच्या सोबत नि चार भिंतींच्या आत सुरू होत असते. हे जग बव्हंशी स्थिर असते. आई-वडील असोत की घरातील इतर व्यक्ती, त्यांचे चेहरे दिवसचे दिवस तसेच असतात. त्याच्या पाळण्याची जागा, घरातील विविध वस्तू या आपापल्या जागा न सोडता कायम एका जागी वस्तीला असतात.

ते मूल जेव्हा पहिले पाऊल घराबाहेर टाकते, तेव्हा परिसराची ओळख करुन घेऊ लागते. आता त्याला मोठी माणसे झाडावर उमललेले फूल, दारी आलेले एखादे आगंतुक कुत्र्याचे, मांजराचे वा शेळीचे पिलू काही अशा ‘दोन हात नि दोन पाय’ नसलेल्या गोष्टींची ओळख करुन देऊ लागतात. हे जग तितके स्थिर नसते. काल दारी असलेले मांजर आज दिसत नाही. कदाचित तिथे एखादे वासरू येऊन बसलेले असते. झाडावर काल पाहिलेले देखणे वा सुगंधी फूल आज तिथून नाहीसे झालेले असते. भवतालामध्ये होणार्‍या बदलांची ओळख बिम्मला होऊ लागलेली असते.

विशिष्ट मोसमात येणारा पाऊस ही बिम्मला होणारी निसर्गाची आणि ‘तो स्थिर नसतो, त्यात सतत स्थित्यंतरे होत असतात’ याची पहिली भक्कम ओळख असते. जगातील काही गोष्टी आपल्या आई-वडिलांच्या नियंत्रणाबाहेर असतात, निसर्गात होणारे बदल आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम घडवू शकतात, याची ही पहिली चुणूक असते. पावसाने ओढ दिल्याने पाण्याची होणारी चणचण किंवा अतिवृष्टीमुळे शेतीचे नि वाहतुकीचे नुकसान होऊन पर्यायाने झालेली तुटवड्याची परिस्थिती यावर आई-वडील बोलतात, बिम्मला ते समजू लागते तेव्हा त्याला पावसाचे– आणि पर्यायाने निसर्गाचे आपल्या आयुष्यातील स्थान समजू लागते.

निसर्ग-मानव संबंधांचा विचार करायचा तर माणसाने निसर्गातील बहुतेक घटकांना ‘आपलेसे’ केले आहे नि त्यांचा साधन म्हणून वापर केला आहे. अगदी सर्वदाहक अशा अग्निलाही ‘माणसाळवून’ अनेक प्रकारे त्याचा उपयोग केला आहे, करतो आहे. अपवाद आहे तो पावसाचा आणि चक्रवातादि काही घटकांचा. आदिमानवाने आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम घडवणारे हे घटक देवत्व देऊन, त्या अनुषंगाने काही देवाणघेवाण करुन अंकित करण्याचा प्रयत्न केला होता. हा एक प्रकारे विनिमयाचा करार होता. परंतु यथावकाश माणसाने अग्निवर नियंत्रण मिळवले, नि जगभरातून अग्निदेवाचे महत्त्व लयाला गेले. यथावकाश नागर झालेल्या माणसाने सार्‍याच प्राकृतिक देवांशी नाते तोडले आणि स्व-रूपातील देवतांची पिढी जन्माला घातली.

TheMandanRainDance
अमेरिकेतील मँडन इंडियन जमातीचा टोळीप्रमुख पर्जन्याला आवाहन करतो आहे.
चित्रकार: जॉर्ज कॅटलिन.

अग्निवर नियंत्रण मिळवल्यानंतर आपण पावसावरही नियंत्रण मिळवू शकतो असा भ्रम त्याला झाला असावा. त्यामुळे बहुतेक प्राचीन समाजांतून पर्जन्यनृत्यासारख्या विधींची निर्मिती झाली. जे प्रामुख्याने पर्जन्याला आमंत्रित करत असे, आवाहन करत असे. जी.एं.च्याच ‘कळसूत्र’मध्ये लाल गरुडाच्या टोळीने पावसाला आवाहन करण्यासाठी केलेल्या नृत्याचे मनोवेधक वर्णन आहे(१).

परंतु हे नियंत्रण श्रद्धेच्या पातळीवरच राहिले. आपली कृती नि पावसाचे आगमन अथवा माघार यांमध्ये कार्य-कारणभाव प्रस्थापित करण्यास माणसाला अपयश आले. प्राकृतिक दैवतांकडून माणूस नागर वा अध्याहृत मानवी देवत्वाकडे सरकला आणि पर्जन्यनृत्यांची जागा यातुविधिंनी घेतली. या विधींचे अवशेष म्हणा, की अवतार म्हणा, हे आजच्या तथाकथित प्रगत समाजातही कुठे-कुठे मूळ धरून राहिले आहेत.

आजच्या एकविसाव्या शतकातील मानवालाही पावसाला लगाम घालणे शक्य झालेले नाही. तो जास्तीत जास्त त्याच्या आगमनाचा नि व्याप्तीचा वेध घेऊ शकतो; त्याने वर्षिलेल्या पाण्याचे नियोजन करू शकतो. तो कुठे नि किती पडेल यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. हवे तेव्हा हुकमी पाऊस पाडू शकत नाही, की ‘आता पुरेसा झाला’ म्हणून नळ बंद करावा तसा थांबवूही शकत नाही. म्हणजे अग्निप्रमाणे पावसाचा साधन म्हणून वापर करण्यात आजवर अपयशच आलेले आहे.

पण समजा— समजा माणसाने पावसालाही अंकित केले तर... ही कल्पना तशी आश्वासक आहे आणि दाहकही! तिचा विचार करण्यास भाग पाडले ते बिम्मच्या एका कृतीमुळे. यापूर्वी बिम्मने पत्र आणि चित्र यांचा वापर हवे ते पदरी पाडून घेण्यासाठी साधन म्हणून केला आहे. या दोन्ही गोष्टी त्याची स्वत:ची निर्मिती आहेत. पण पुढे चक्रनेमिक्रमाने येणार्‍या पावसाचा वापरही त्याने अशाच प्रकारे केलेला आहे. त्याद्वारे त्याने बब्बीच्या मैत्रिणींवर हुकुमत गाजवली आहे.

आयुष्याच्या त्या इतक्या परावलंबी टप्प्यावरदेखील बिम्मसारख्या मुलावर संघर्षाचे प्रसंग येतात. इतक्या सुरक्षित जगातही एखादा लहानसा कोपरा लढून, पाय रोवून उभा राहण्याचा असतो. त्याचा खाऊ हिरावून घेणार्‍या चंद्रीशी नि तिच्या गँगशी आपला खाऊ वाचवण्यासाठी बिम्मला संघर्ष करावाच लागतो. त्यासाठी बिम्मकडे कोणतेही प्रत्यक्ष साधन उपलब्ध नसते. त्यासाठी मग तो त्याच्या हुकुमासरशी धावून येणार्‍या पावसाचे काल्पनिक हत्यार वापरतो.

IBroughtThatRain
I Brought That Rain. (Image Credit: Getty Images)

एकीकडे बिम्मची आई नि इतर बायका पावसाने ओढ दिल्याबद्दल बोटे मोडत असतात. त्यांना हवा तेव्हा पाऊस आलेला नाही. पण बिम्मला हवा तेव्हा मात्र तो येतो. ‘पाऊस पाडून तुमचा खेळ बंद पाडतो’ या त्याने दिलेल्या पोकळ धमकीनंतर योगायोगाने तो येतो आणि त्यातून हवा तेव्हा पाऊस पाडण्याच्या बिम्मच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब होते. वयाने आणि शारीरबळाने वरचढ असलेल्या त्या मुलींवर हुकूमत गाजवण्यासाठी त्याला एक हत्यार मिळून जाते.

इतक्या लहान वयात बिम्मने प्राचीन समाजातील पर्जन्यनृत्यांच्या वा प्राकृतिक घटकांवर नियंत्रण मिळवण्याच्या गोष्टी ऐकल्या असण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तरीदेखील त्याचा विचार नेमक्या त्याच मार्गाने जातो आहे. जे अनायासे घडते ते हेतुत: घडवू इच्छिणार्‍या मानवाच्या संस्कृती-प्रवाहाचा तो ही एक भाग होतो आहे.

प्रथम त्या मुलींनी आपल्याला खेळायला घेतले नाही म्हणून बिम्मने पाऊस पाडण्याची धमकी दिली होती. त्यामध्ये कोणताही कार्य-कारणभाव त्याला अपेक्षितही नव्हता. पाऊस पडला की मुलींना खेळ बंद करावा लागतो एवढे निरीक्षणच काय ते त्या धमकीमागे होते. त्याच्यापुरती ती एक पोकळ धमकी होती. परंतु प्रत्यक्षात पाऊस पडल्याने त्याच्या त्या शक्तीबाबत त्या मुलींचा संशय फिटला आहे. आता त्यांच्या मनात निर्माण झालेली भीती बिम्मला खुणावते आहे. ‘आपण बोलावल्याने पाऊस आलेला नाही’ हे कदाचित बिम्मच्या वयाच्या मुलालाही ध्यानात आले असेल. पण जे घडले त्याच्यामुळे ‘त्याची धमकी सत्यात आणता येऊ शकते’ असा संभ्रम त्या मुलींच्या मनात निर्माण झालेला आहे. आणि त्या संभ्रमाचा फायदा आता बिम्म घेणार असतो.

अशा काल्पनिक हत्याराचे यश प्रामुख्याने त्याचे अस्तित्व, त्याची भीती समोरच्याचा मनात निर्माण करण्यावर अवलंबून असते. त्या काल्पनिकतेची वास्तव परिणामांशी सांगड घालून तिच्या अस्तित्वाचा आभास निर्माण करता येतो. योगायोगाने पडलेल्या पावसाने बिम्मला त्यात यश मिळून जाते. इथे मला शाळेत असताना ‘आपली पण गँग आहे, तुला बघून घेईन.’ अशी बतावणी(bluff) वा पोकळ धमकी देऊन दांडगट पोरांपासून आपला बचाव करू पाहणारी दुबळी मुले आठवतात.

बिम्मच्या ‘सामर्थ्या’चा पुरावा त्या पोरींना आता समोर दिसला आहे. त्याचा खाऊ बळकावणार्‍या, त्याला खेळायला न घेणार्‍या मुलींवर बाजी उलटली आहे. आता बिम्मच पाऊस पाडून त्यांचा खेळ विसकटण्याची धमकी देतो आहे. पण केवळ खेळायला घेण्यापलिकडे जाऊन त्याला त्यांच्यावर हलकासा सूड उगवायचा आहे. आजवर त्याच्या खिशातील खाऊ लुटणार्‍या त्या ढालगज पोरींना त्याला धडा शिकवायचा आहे. त्यामुळे तो आता त्यांना त्यांच्याकडील सारा खाऊ आपल्याला मिळावा अशी मागणी करतो नि प्रत्येकीच्या खाऊचा अगदी शेवटचा कण तो वसूल करतो.

पण या सार्‍यात विजूसारखी एक मुलगी अशी निघतेच, जी बिम्मच्या या धमकीला भीक घालत नाही. मग तिच्याऐवजी भेदरलेली यास्मिन त्याला तिच्या वाटचा खाऊ द्यायचे कबूल करते नि बिम्ममहाराजांचा ‘कोप’ शांत करते. शिवाय दांडगट चंद्रीही विजूला पकडून तिची सारी करवंदे बिम्मला द्यायला लावते.

GiveYourFoodToHim
Give your food to him.(Image Credit: Getty Images)

विजूला काल्पनिक बळाची भीती नाही, पण चंद्रीच्या शारीरबळाची आहे. कदाचित तिने ते अनुभवले आहे. याउलट शारीरबळात तिच्यापेक्षा उजवी असलेली चंद्री मनोबलात तिच्यापेक्षा दुबळी आहे. बिम्मसारख्या धिटुकल्या मुलाच्या पाऊस पाडण्याच्या धमकीला केवळ एकाच अनुभवावरून ती बळी पडली आहे.

एकाच निरीक्षणातून– अथवा त्याच्या आभासातून– कार्य-कारणभाव सिद्ध झाल्याचे मानणारी, वारंवारतेच्या आवश्यकतेला नाकारणारी उतावीळ, एकांगी वा मनोदुर्बल माणसे आपल्या आसपास अनेक दिसतील. त्या अर्थी चंद्री ही एका मोठ्या समाजगटाचे प्रतिनिधित्व करते आहे. तिच्या या मानसिक दुर्बलतेमुळे विजूला नमवण्याचे बिम्मचे काम झाले आहे. प्रत्यक्ष बळापेक्षा त्यावरील अप्रत्यक्ष नियंत्रणही अनेकदा आपले काम करून देऊ शकते. (जुन्या तमाशापटांतून धिप्पाड शरीराचे बेरड अथवा रामोशी अंकित ठेवून त्यांच्या बळावर सत्ता गाजवणारे पाटील आठवा.) त्यातून त्या दोघींपेक्षा सर्वच दृष्टीने दुबळा बिम्मच अखेर वरचढ ठरुन जातो. हा धडा तितकी विचाराची झेप अजून विकसित न झालेल्या बिम्मला जरी कळला नाही, तरी तो त्याच्या आईच्या वयातल्या एखाद्या वाचकाला उमगायला हवा.

‘देव’ नावाच्या कुण्या काल्पनिक सत्तेची ठेकेदारी करत सर्वसामान्यांवर वर्चस्व गाजवणारा सर्वधर्मीय पुरोहितवर्ग याहून वेगळे काय करत असतो? पाच-पंचवीस भाकितांपैकी एखादे अनमानधपक्याने खरे ठरले, की त्याच्या आधारे त्यांची दैवी ठेकेदारी सामान्यांच्या मनात रुजून जाते. तरीही शिल्लक राहिलेल्या विवेकी विजूसारख्यांचा नि:पात करण्याचे काम मानसिक गुलाम झालेल्या चंद्रीसारख्या बाहुबली पार पाडत असतात.

बिम्मच्या निरागस पातळीवरही पावसाचे– काल्पनिक का होईना, एक हत्यार हाती आल्याने उफाळून आलेल्या वर्चस्ववादी प्रेरणेला तो उपभोगतो आहे. इथे जी.एं.नीच अनुवाद केलेल्या विल्यम गोल्डिंगच्या ‘लॉर्ड ऑफ द फ्लाईज’ ची आठवण होते. कोणत्याही नियंत्रक व्यवस्थेअभावी माणसाच्या पिलांमध्ये ही वर्चस्ववादी प्रेरणा किती हिंस्र पातळीवर उतरते याचे स्तिमित करणारे दर्शन त्यात गोल्डिंगने घडवले आहे. संस्कार-शिक्षणाने माणसाच्या जिज्ञासेची निरभ्रता काळवंडून जात असली तरी त्यातूनच मनुष्यप्राण्याचा माणूसही होत जातो.

‘पावसालाही अंकित केले तर... ही कल्पना तशी आश्वासक आहे आणि दाहकही’ असे वर का म्हटले याची एक अत्यंत लहानशी चुणूक बिम्मने दाखवली आहे. कारण पाऊस नियंत्रित करता आला तर तो अग्निप्रमाणेच हवा तिथे, हवा तितकाच वर्षेल अशी तजवीज करता येईल, तसेच त्या साधनाला हत्याराचे रूप देऊन इतर कुणाला पीडा देण्यासाठीही त्याचा वापर होऊ शकेल.

माणसाच्या हिंसेला भौतिक शस्त्रे पुरेशी न वाटून त्याने रासायनिक, जैविक माहितीला, ज्ञानाला, निर्मितीला हत्यारांचे रूप देऊन आपल्यातील मि. हाईडला(२) आणखी बळ पुरवले आहे. कल्पना करा एखाद्या राष्ट्राने मोसमी पावसाच्या ढगांवर नियंत्रण मिळवून शेजारी, शत्रूराष्ट्रामध्ये पाऊसच पडणार नाही याची तजवीज केली तर... माणसातल्या माणूसपणाचा तो अंत तर ठरेलच, पण मनुष्यप्राण्याने मानव होताना अन्य प्राणिमात्रांहून प्रगती नव्हे तर अधोगतीचा मार्ग निवडला आहे यावरही शिक्कामोर्तब होईल.

‘पाऊस आला की मुलींचा खेळ थांबतो, त्यांना दु:ख होते.’ हे पाहून त्यांना दु:ख देण्यासाठी पाऊस पाडला पाहिजे याची जाणीव बिम्मच्या मनात उमटणे हा त्याच्यातील मि. हाईडचा जन्म म्हटला पाहिजे. हेतुत: कुणाला दु:ख देण्याचा, सूडाची भावना त्याच्या मनात उदयाला आली, ती जीवनदायी पावसाचे बोट धरून. माणसाच्या आयुष्यातील प्रगतीचे प्रत्येक पाऊल हे पुढे नेणारे असते तसेच मागेही याचे हे उत्तर निदर्शक म्हणावे लागेल.

पण बिम्म नि पावसाची गोष्ट इथे संपत नाही...

पाऊस आल्याने घरात येऊन, मुलींचा सारा खाऊ गट्ट करुन ताजेतवाने झालेल्या बिम्मला शाळेच्या आवारात आपल्या गाठोड्याशेजारी बसून रडणार्‍या पमी पठाणची आठवण होते. ‘अशा पावसात ती अडकली असेल की आधीच घरी गेली असेल?’ असा प्रश्न त्याला पडतो. तो प्रश्न ऐकून त्याची आईदेखील अचानक गंभीर होऊन जाते. तिने गंभीर का व्हावे हे पुन्हा थोडे तर्काने जाणून घ्यावे लागते.

पमी ही पहिल्याच इयत्तेत अनेकदा नापास होऊन शाळा सुटलेली, इतर मुलींप्रमाणे बिम्मचा खाऊ हिसकावून न घेणारी. बाकीच्या मुली शाळेत गेल्यावर करण्यासारखे काहीच नसल्याने शाळेच्या आवारात स्वतःशीच बोलत बसणारी. बब्बी तिच्याशी खेळे, पण तिला घरी बोलावत नसे. आसपासच्या आयाबाया तिच्याकडून कामे करून घेत, क्वचित तिची मस्करीही करत. ती मात्र ती मस्करी मनावर न घेता स्वत:वरच हसे नि ती गंमत इतरांना सांगून त्यांनाही हसवी.

‘तिचे कपडे तिच्या मापाचे कधीच नसत’ या एकाच वाक्यात जी.एं.नी तिची सामाजिक पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे. जरी स्पष्टपणे लिहिले गेलेले नसले, तरी पमी ही बेघर/अनाथ किंवा अतीव दरिद्री घरातील असावी असा तर्क सहज करता येतो. तसे असेल तर इतरांच्या दृष्टीने अमृतधारा होऊन वर्षणारा तो धुवांधार पाऊस तिच्या जगण्यातील खडतर मोसमाची सुरुवात करणारा ठरतो. कदाचित हे जाणवल्यामुळेच बिम्मची आई गंभीर झाली असावी. आपल्या हाती केवळ तर्कच उरतो.

WhenWillTheRainStop
हा पाऊस कधी थांबेल?
(श्रीनगरच्या एका रस्त्यावरील छायाचित्र).

‘पावसाने कुणाच्या आयुष्यातील समस्यांचा निरास होतो, तर कुणासाठी त्यांची सुरुवात होत असते’ हे एक वास्तव, पमी पठाणमुळे बिम्मच्या विचारात नसले तरी जाणिवेत शिरत असते. पावसाला हत्यार म्हणून वापर करणार्‍या, त्याच्या साहाय्याने कुणावर सूड घेण्याची कल्पना सुचलेल्या बिम्मच्या मनात त्या हिसेंवर करुणेचे शिंपण करणारे ते दोन थेंबही शिंपडले जातात. तो पाऊस महत्त्वाचा तसाच हा ही.


(क्रमश:) पुढील भाग >> Foot that fits     

-oOo-

(१). केवळ आवाहनासाठीच नव्हे काही वेळा वर्षा-स्वागताची नृत्येही केली जात असावीत. प्रसिद्ध अभ्यासक जेन गुडाल हिने चिम्पान्झी माकडांच्या अभ्यासादरम्यान त्यांनी पावसाच्या स्वागतासाठी केलेल्या वर्षा-नृत्याची नोंद केलेली आहे. पुढे मानवाने शेतीप्रधान जीवन स्वीकारले आणि ही वर्षा-हर्ष नृत्ये सुगीच्या मोसमापर्यंत पुढे सरकली असावीत.

(२) रॉबर्ट लुई स्टीव्हनसन या लेखकाच्या ’द स्ट्रेंज केस ऑफ डॉ. जेकिल अँड मि. हाइड’ या लघुकादंबरीतील एक पात्र. एखाद्या सप्रवृत्त व्यक्तिच्या मनात दडून असलेल्या दुष्प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून याच्याकडे पाहिले जाते.


हे वाचले का?

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ७: अभिव्यक्ती, माध्यम आणि साधन

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

रंगांचे कोडे << मागील भाग
---

बबिम्मच्या पतंगावरून आतापावेतो झालेल्या प्रवासामध्ये त्याने प्रतिबिंब, सावली, पक्षी, रंग, फळे यांच्या संदर्भात निरीक्षण-शक्तीचा उपयोग केला आहे. त्याद्वारे भवतालाचे आकलन करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. या सर्व टप्प्यांमध्ये तो केवळ निरीक्षक आहे, जिज्ञासू आहे. त्याची भूमिका अकर्मक आहे. भवतालावर परिणाम घडवणारी कोणतीही कृती त्याने अद्याप केलेली नाही. निरीक्षणांकडून अनुकरणाकडे जाण्याची, अकर्मकता झाडून सकर्मक होण्याची, कृतीप्रवण होण्याची वेळ आता आलेली असते.

आयुष्याचा प्रवास बिम्म जेव्हा सुरु करतो, तेव्हा स्वत:हून केलेली पहिली कृती असते ती पहुडल्या ठिकाणी पालथे पडणे. ही पहिली कृती घरच्या मोठ्यांकडून नावाजली गेली आणि त्यातून भवतालाकडे पाहण्याचा – शब्दश: – वेगळा दृष्टिकोन मिळतो, हे उमगले की त्याला स्वावलंबी आयुष्याची चाहूल लागते. त्यातून स्वप्रेरणेने आणखी काही कृती करण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होतात. यथावकाश उठून बसणे, रांगणे, पलंग वा खुर्चीसारख्या एखाद्या भक्कम वस्तूला धरून उभे राहणे, त्यानंतर तो आधार न सोडता पाऊल पुढे टाकणे नि अखेर केवळ स्वत:च्या पायांचा भरवसा धरून तो आधारही सोडून चालू लागणे, ही माणसाच्या पिलाने स्वावलंबी आयुष्याकडे टाकलेली पहिली काही पावले.

पण निव्वळ स्वप्रेरणेपलिकडे बाह्य प्रेरणेनेही ते काही कृती साधू लागते. आपले बोट, खुळखुळा वा pacifier यांसारख्या गोष्टी आई-वडील त्याच्या हाती देत असतात. मग त्या प्रेरणेने पालथे पडलेले असताना समोरचे खेळणे वा अन्य काही पकडण्याचा प्रयत्न करते. ते मूल बसते झाल्यावर आई-वडीलही फळांच्या फोडी वा तत्सम हाती पकडता येतील असे खाद्यपदार्थ त्याच्यासमोर ठेवून ते स्वहस्ते खाण्यास उद्युक्त करतात. ते जमू लागले की मग ते मूल हाती सापडेल ते तोंडात घालण्याचा प्रयत्न करू लागते. भुकेचा निरास हे एकमेव सुख तोवर त्याच्या जाणीवेच्या कक्षेमध्ये आलेले असते आणि हे सुख तोंड या अवयवामार्फत साध्य होत असते. त्यामुळे आता जे आवडते त्याचा आस्वाद तोंडाने घेण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होतो. सुख मिळवण्यासाठी ती एकच कृती त्याला ठाऊक असते. जे आवडेल ते सारे त्या कृतीच्या कक्षेत आणून आपलेसे करण्याचा प्रयत्न केला जात असतो.

समोर येईल ती गोष्ट तोंडात घालण्यास सुरुवात झाली, की तिची जिभेला जाणवलेली चव किंवा आई-वडिलांनी त्याला दिलेले प्रोत्साहन वा केलेला प्रतिरोध यातून काय तोंडात घालावे नि काय नाही याची समज विकसित होत जाते. पुढे बरेच मोठे नि कमावते झाल्यावर आवडलेल्या वस्तूचे स्वामित्व मिळवण्याची– ती विकत घेण्याची चव समजली की माणूस आवडते त्या सार्‍यावर स्वामित्व मिळवण्याचा आटापिटा करू लागतो, त्यासाठी बिनदिक्कतपणे ते कुणाकडून हिरावूनही घेऊ लागतो. ही प्रवृत्ती मूलपणातील ‘काहीही आवडले की उचलून तोंडात घालण्याची’ आवृत्ती म्हणावी लागेल. कारण तोवर स्वामित्व मिळवणे ही कृती सर्वाधिक सुखाचा स्रोत म्हणून मनुष्यप्राण्याने निश्चित केलेली असते.

हे बसते-रांगते मूल बिम्मच्या वयात येते– म्हणजे चालू-बोलू लागते, घराचे कुंपण ओलांडून बाह्य जगाची ओळख करून घेऊ लागते, तेव्हा त्याच्या ज्ञानकक्षा रुंदावतात. आता निव्वळ प्रेरणेपलीकडे जाऊन जाणीवपूर्वक काही कृती ते करू लागते. त्याची पहिली कृती ही स्वतंत्र विचारातून न येता अनुकरणातून येत असते आणि अनुकरणाआधी निरीक्षण आवश्यक असते. निरीक्षण हे प्रामुख्याने आपल्यासारख्या दोन हात नि दोन पाय असलेल्या जीवांचे – प्रामुख्याने कुटुंबातील व्यक्तींचे – केले जात असते, तसेच आसपासच्या जीवमात्रांचे, निर्जीव वस्तूंचे, घटनांचेही. त्यातून माहिती, साधर्म्यसंगतीचे भान आणि अखेरीस आकलन या मार्गाने प्रवास होत जातो.

डोळे, नाक, कान, जिंव्हा आणि स्पर्श या पाच ज्ञानेंद्रियांच्या आधारे आकलनाचा प्रवास बिम्मपणात पाऊल ठेवण्याच्या बराच आधी सुरू झालेला असतो. मूल पालथेही पडत नसते तेव्हा त्याचे डोळे नि कान भवतालाशी नाते जोडत असते. माणसाच्या संवादी भाषेतील ज्यांना शब्द म्हणून मान्यता आहे असा ध्वनिसमूह त्याच्या तोंडून बाहेर पडण्यापूर्वीच त्याची अभिव्यक्ती कार्यरत झालेली असते. त्याच्या आई-वडिलांना, घरच्या इतर व्यक्तींना अगम्य वाटणार्‍या अशा ध्वनिसमुच्चयातून ती प्रसारित होत असते.

पण त्यातून संवाद प्रस्थापित होत नाही हे ध्यानात आल्यावर इतरांच्या तोंडून निघणार्‍या ध्वनिसंकेतांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न सुरु होतो. त्यासाठी आधी इतरांच्या तोंडून ऐकू येणार्‍या या ध्वनिसंकेतांचा अर्थ लावणे सुरू होते. त्यासाठी या मुलांचा मेंदू कार्यरत होतो. मग आई-वडिलांची भाषा नि त्या मुलाची भाषा यांचा द्वैभाषिक संवाद सुरू होतो.

माझी भाची साधारण सहा महिने-वर्षभराच्या वयाची असताना भूक लागली की ‘मँ, अँ’ अशी स्वरावली तिच्या तोंडून निघत असे. तिकडे लक्ष दिले नाही की आरडाओरडा सुरू होई. ती दंगा करु लागली की आम्ही खाण्याचा आविर्भाव करत विचारायचो, ‘मँ का?’ त्यावर ‘हो’ या अर्थाचा एक ‘अँ’ वा ‘हँ’च्या दरम्यानचा उच्चार येई. याचा अर्थ आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे आकलन तिच्या मेंदूद्वारे होत असे आणि आमच्याच भाषेत नाही तरी तिच्या गळ्याला साध्य झालेल्या ध्वनिसंकेतांतून उत्तरही दिले जात असे.

ककाही वेळा मी मुद्दाम पेडगांवला जाऊन एखादे खेळणे दाखवून ‘हे का?’ असे विचारले की हाच उच्चार जरा जोरकस नि पुनरावृत्त होत जाई, साधारणपणे ‘अँ हँ हँ हँ...’ असा. त्याचा अर्थ ‘नाही’ असा होता. काही वेळा जरा अधिक ताणून धरण्यासाठी आणखी एक-दोनदा हा प्रकार केला असता, आवाजाबरोबरच त्याचवेळी हातपाय वेगाने हालचाल करत. याचा अर्थ ‘अजिबात नाही’ किंवा ’एकदा सांगितलं ना नाही म्हणून’ असा होता. मग पुन्हा ‘मँ का?’ या प्रश्नाला अँ वा हँ ने उत्तर देतानाच त्या सोबत पोट उचलून दुजोरा दिला जाई. म्हणजे ध्वनिद्वारे दिलेल्या उत्तराला शारीर हालचालींनी अधिक ठळक करण्यात येत असे.

या प्रकारे बहुपर्यायी प्रश्नोत्तरे होऊन मुलाला काय हवे ते मोठ्यांना समजू लागते. परंतु मोठी माणसे वापरतात तेच ध्वनिसंकेत भाषा या संज्ञेला पात्र असतात असा आपला समज असतो. हे दुभाष्याखेरीज होणारे दोन भाषांमधले संभाषण आहे हे आपल्याला ध्यानात येत नाही. कारण आई-वडिलांची भाषा अद्याप आत्मसात न केलेल्या मुलाची स्वत:ची अशी भाषा विकसित होऊ लागलेली आहे याची जाणीव आपल्याला होत नसते.

थोडा विचार केला तर लक्षात येईल की आजवर कधीही, कुठल्याही प्रकारे परस्परांशी संपर्क न आलेल्या दोन भाषिक समूहातील व्यक्तींमध्ये होणारे संभाषण साधारण असेच सुरू होईल नि हळूहळू संवादाचा पूल बांधला जाईल. संवादाचे हे माध्यम जेव्हा सर्वच सहभागी संवादकर्त्यांच्या आकलनाच्या कक्षेत येते, तेव्हाच संवाद सुकर होत असतो. त्यामुळे भाषा ही नेहमीच एका समूहाचे संवाद-माध्यम म्हणून रुजत जाते. ‘भाषा’ या संज्ञेला पात्र होण्यासाठी एखादा ध्वनिसंकेतांचा समुच्चय किमान दोन व्यक्तींना आकलनयोग्य असायला हवा. (आयनेस्कोच्या ‘र्‍हिनसोरस’मध्ये ‘माझी भाषा माझ्याशिवाय कुणालाच समजत नसेल तर तिला भाषा म्हणता येईल का?’ असा प्रश्न बेहॉन्जेला (Berenger) पडलेला आहे.)

मुलाची ही भाषा त्याला स्वत:ला सोडून इतरांना– अगदी आई-वडिलांनाही उमगत नसल्याने संवादास निरुपयोगी ठरते. ती सोडून त्याला निमूटपणे आपल्या घरातील इतरांची भाषा स्वीकारणे भाग पडते. यथावकाश ते मूल आई-वडिलांना उमगणारा पहिला शब्द उच्चारते. तो बहुधा आई, बाबा, मामा, पापा असा स्वरप्रधान किंवा द्विरुक्तीप्रधान असतो. त्या मुलाने उच्चारलेला तो पहिला कुटुंबमान्य अधिकृत शब्द ठरतो आणि ते मूल ‘माणसांत’ आल्याचा जल्लोष होतो. मोठ्यांच्या उच्चारांचे अनुकरण ही त्या मुलाची स्वप्रेरणेने केलेली पहिली ठोस भाषिक कृती म्हणता येईल. त्यानंतर त्या मुलाची प्रगती त्याच मार्गावरून होऊ लागते.

माणसांमध्ये भाषा ही अगदी अमूर्त, अनुपस्थित, वर्तमानापलिकडील गोष्टींबाबतही बोलावे इतपत प्रगत झालेली असली, तरी इतर प्राण्यांतही त्यांच्या आपसांतील संवादास पुरेशी अशी भाषा वा संवाद-माध्यम विकसित झालेले असते. आदिम माणसामध्ये प्राण्यांहून अधिक प्रगत अशी संवाद-भाषा विकसित होत होती तेव्हाच त्याने अभिव्यक्तीला निरपेक्ष पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरू केला. अनेक गुंफाचित्रांमधून एक वर्तुळ नि पाच रेषांनी काढलेला मानव, अशाच रेषासमुच्चयाच्या आधारे रेखाटलेले हरीण वगैरे चित्रे सापडलेली आहेत. हा ही अनुकरणाचाच एक मार्ग म्हणता येईल.

इथे ध्वनिसंकेतांऐवजी रेखाटनांचा आधार घेतला आणि हेतू संवादाऐवजी दस्तऐवजीकरणाचा दिसतो. ‘मी हरीण पाहिले, ते मला कसे दिसले त्याला प्रातिनिधिक स्वरूपात मी रेखाटतो नि त्यातून – उदाहरणार्थ – शिकारीचे पाहिलेले दृश्य गुहेच्या भिंतीवर नोंदवून ठेवतो’ असा त्याचा पहिला माफक हेतू होता. पुढे या रेखाटनांतून निर्माण झालेल्या काही आकृतींची तोंडून निघणार्‍या ध्वनिसंकेतांशी सांगड घालून भाषेला लिपी देण्यात आली. (त्याही पूर्वी काही चित्रांना अंकांचे स्वरूप मिळाले.)

लिपी मिळाली आणि माणसाच्या अभिव्यक्तीची व्याप्ती वाढली. कारण लिखित संवाद साधण्यासाठी दोन्ही – अथवा एकाहुन अधिक – संवादी एकाच ठिकाणी अस्तित्वात असण्याची गरज संपली. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये अभिव्यक्तीने माध्यम गुंफा-भिंत, शिळा यांसारखे अचल माध्यम सोडून भूर्जपत्रे, कागद यांसारख्या सुटसुटीत, माणसासोबत सहजपणे स्थलांतर करू शकणार्‍या माध्यमांचा स्वीकार केला. आता अभिव्यक्ती एका वेळी, एका ठिकाणी, तर तिचा ग्राहक, तिचे आकलन व तिचा प्रतिसाद अन्य वेळी, अन्य ठिकाणी अशी किमया साधली गेली. लिपीमुळे नि माध्यमबदलामुळे मनुष्य-संवाद स्थल-कालाच्या बंधनातून मुक्त झाला.

मनुष्यप्राण्याने स्थलकालापलिकडचा पहिला संवाद हा पत्ररूपाने केला होता. असंगत (asynchronous) संवादाचे हे आद्य माध्यम आज वैय्यक्तिक संवादाच्या दृष्टीने बव्हंशी कालबाह्य झालेले असले, तरी व्यावसायिक व प्रशासनिक देवाणघेवाणीसाठी अजूनही वापरात आहे. याचे कारण लिखित दस्तऐवजाला अधिकृततेचा जो दर्जा आहे तो संगणकीय माध्यमांतील दस्तांना अजूनही मिळालेला नाही.

बिम्मचे वडील परगावी राहात. त्याकाळी टेलेफोन हे माध्यमही सर्वसामान्यांच्या आवाक्यात नव्हते. त्यामुळे आई-वडिलांचा संवाद हा प्रामुख्याने पत्रामार्फतच चाले. वडिलांकडून आलेले पत्र नि आईने त्यांना उत्तरादाखल लिहिलेले पत्र हे बिम्मच्या निरीक्षणाचा भाग होते. त्यामुळे अनुकरणाच्या एका टप्प्यावर तो ही वडिलांना पत्र लिहिणार ही काळ्या दगडावरची रेघ होती.

TheWokeBaby
स्वत: लिहिलेला घोषणाफलक उंचावणारी सॅम सोरीची मुलगी.

काही काळापूर्वी मला एक हृद्य छायाचित्र पाहायला मिळाले होते. त्यात एक-दीड वर्षांची एक लहान मुलगी पुठ्ठ्यावर ओढलेल्या रंगीबेरंगी रेघोट्यांचा एक फलक घेऊन आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसलेली होती. हे छायाचित्र एका निषेध मोर्चामध्ये काढलेले होते. त्याच्या मागची कथा अतिशय रोचक होती. सॅम सोरी हा बाप नि त्याच्या पत्नीने आपल्या मुलीच्या हाती तिने स्वत:च रंगवलेला हा फलक दिलेला होता. या दांपत्याने त्या मागची आपली भूमिका पुढे विशद केली. (ती ’जागी झालेली मुले’ या ’वेचित चाललो...’ वरील लेखात वाचता येईल. )

आज संगणकाच्या नि मोबाईलच्या जमान्यात जन्मलेल्या बिम्मना आई-वडील हाताने काही लिहित आहेत, चित्र काढत आहेत हे दृश्य क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळे बिम्मच्या आयुष्याचे हे अनुषंग आता जवळजवळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पण अगदी एक-दीड दशकांपूर्वी मुलांच्या कुतूहलाचा आणखी एक विषय होता तो म्हणजे आईबापाचे अनुकरण करत त्यांचे पेन-पेन्सिल घेऊन कागदावर ‘अब्याश करणे’ किंवा ‘चित्लं काढणे’ या नावाखाली काहीतरी बरबटून ठेवणे. (आता आई-वडिलांचा मोबाईल घेऊन व्हिडिओ पाहात बसतात. हे ही अनुकरणच. ) बिम्मही याला अपवाद नव्हता.

परगावी असलेल्या बाबांना आई पत्र लिहिते, तसेच तिकडून बाबांनी लिहिलेले पत्रही येते हे बिम्मने पाहून ठेवले होते. त्यांच्या पत्रातून आईला घरासंदर्भात अनेक गोष्टींबाबत सूचना केलेल्या असत यांची नोंदही त्याने घेतलेली होती. मग एकदा एक कोरा कागद घेऊन त्याने बाबांच्या नावे आईला एक पत्र लिहिले नि लिफाफ्यात टाकून आईच्या हाती ठेवले. तिने ते पत्र उघडले, तर त्यात सॅम सोरीच्या त्या छोटीप्रमाणेच आडव्या उभ्या रेघांचे कडबोळे खरडून ठेवलेले असते.

अशा वेळी बहुधा आई बहुधा ‘कामात आहे, नंतर वाचते हां’ वगैरे काहीतरी कारण काढून बोळवण करेल, ते त्यानेच लिहिलेले आहे हे ठाऊक असल्याने उगाचच ‘बाबांचे अक्षर छान आहे’ वगैरे आडवळणी खोटी स्तुती करेल; फारच कामात असेल तर वैतागेल, बिम्मला कामाची खोटी केल्याबद्दल रागे भरेल. पण बिम्मची आई हुशार होती. पत्र कागदावर नाही तर मनात प्रथम उमटते हे तिला ठाऊक होते. कागदावरचे जाऊ द्या, निदान मनातले तरी काढून घ्यावे म्हणून ती आपण कांदे चिरत असल्याने डोळ्यात पाणी आले असल्याने नीट वाचता येणार नाही अशी बतावणी करते आणि म्हणून ‘तूच ते वाचून दाखव बघू.’ असे सुचवते. (सार्‍यांच्या आया इतक्या सुज्ञ झाल्या तर पोरे किती सुखी होतील नाही?)

BabyWritingLetter

त्या पत्रात बाबांनी सारे काही बिम्मबाबतच लिहिलेले असते. ‘बिम्मला मागेल त्यावेळी लाडू द्यावा, त्याला त्रास देण्याबद्दल बब्बीला रागवावे, त्याला कुठली कुठली फळे घेऊन द्यावीत, बाहेर जाताना बरोबर न्यावे’ वगैरे ‘ऑर्डर्स’ आईला दिलेल्या असतात. वडिलांनी आईला नि आईने वडिलांना पत्र लिहिणे हा त्यांच्या संवादाचा, देवाणघेवाणीचा भाग आहे. पण बिम्मचे पत्र हे केवळ त्याच्या स्वत:च्या संदर्भातच आहे. इतकेच नव्हे तर ते पत्र स्वत: बिम्मने लिहिलेले नाही, बाबांनी लिहिले आहे अशी बतावणी त्याने केली आहे.

थोडा विचार केला तर लक्षात येईल की बाबांनी केलेल्या सूचना आई वाचते, अनेकदा त्यानुसार आई वागते हे एव्हाना त्याच्या लक्षात आले असावे. मग त्यामध्ये बाबांनी बिम्मला हवे ते सारे करण्याची सूचना आईला दिली तर आई त्या पाळेल असा त्याचा अंदाज आहे. आता बाबांच्या नावे आपण आपल्याला हवे ते पदरात पाडून घेऊ शकतो इतपत स्वार्थाची जाणीव त्याला झालेली आहे. आईवडिलांच्या दृष्टीने संवाद-माध्यम असलेल्या पत्राला त्याने स्वार्थ साधण्याचे साधन म्हणून रूपांतरित केले आहे. निरीक्षणातून रुजलेल्या आकलनातून साधनांचा वापर कसा करावा हे बिम्म शिकू लागला आहे.

पेन वा पेन्सिल घेऊन कागदावर काहीतरी खरडणे बिम्मला जमत असले, तरी त्याला आकाराचे ज्ञान अजून झालेले नसते. ते होईल तेव्हाही त्याला कागदावर उतरवणे हे एक वेगळेच कौशल्य असते, जे स्वतंत्रपणे आत्मसात करावे लागते. पण लिपी म्हणजे अनेकांना ओळखता येणार्‍या मोजक्या चित्रांची जंत्री एकापुढे एक मांडून त्यांना अर्थ देणेच असते. त्यामुळे अक्षराआधी ओळख व्हावी लागते ती आकारांची आणि त्यांतून तयार होणार्‍या चित्रांची. आणि आदिमानवाने चित्रे काढण्यासाठी जसे आसपास दिसणारे प्राणी, सजीव व साधने यांची निवड केली तसेच आधुनिक बिम्मच्या सुरुवातीच्या चित्रांमध्ये ‘मॉडेल’ म्हणून घरातील माणसांची वर्णी लागणार हे ओघाने आलेच.

त्याप्रमाणे एकदा बिम्मने आई आणि बब्बीचे चित्र काढले. माणूस म्हटले की एक डोके नि हातापायांची प्रत्येकी एक जोडी एवढे प्रातिनिधिक रूप तूर्त पुरे असा त्याचा बाणा असतो. पण हे ‘चित्रीकरण’ एवढ्यावर थांबत नाही. पूर्वी कधीतरी खरोखरच्या बेडकीने बब्बीच्या पायावर उडी मारली तेव्हा ती घाबरुन किंचाळली होती, हे त्याने ध्यानात ठेवले होते. त्यामुळे ते चित्र अधिक वास्तववादी होण्यासाठी त्याने बब्बीच्या तिच्या पायावर बेडूक काढून ठेवलेला होता. (ते चित्र काय आहे हे आईला नि बब्बीला आधी समजावून सांगावे लागले इतके अप्रतिम होते हा भाग वेगळा.) त्या चित्रातही आपल्या पायावर बेडूक आहे हे समजल्यावर बब्बी पुन्हा एकवार पाय झाडत किंचाळली.

या चित्राची आणखी एक गंमत म्हणजे त्या चित्रात आई बब्बीच्या गुडघ्याइतक्या आकाराची होती. याचे कारण तो आई आणि बब्बी या दोन स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहतो आहे नि त्यांचे चित्र काढतो आहे. त्या दोघी एकत्रितरित्या एका मोठ्या देखाव्याच्या, वास्तवाच्या भाग आहे याचे आकलन त्याला अद्याप झालेले नाही, आणि झाले असले तरी ते कागदावर उतरवण्याचे कौशल्य त्याला अद्याप आत्मसात झालेले नाही. दोन वस्तू सोबतीने अस्तित्वात असण्यामध्ये असलेले प्रमाणाचे वा गुणोत्तराचे भान त्याच्याकडे अजून नाही. पुढे मोठे झाल्यावर ते झाले तरी ते कागदावर उमटवणे जमेलच असेही नसते. कागदावर वा भिंतीवर मनाला वाटेल तशा रेघा मारण्यापासून सुरू झालेली वाटचाल आकार, प्रमाण, प्रातिनिधिक रूपे, सह-अस्तित्वाची इतर परिमाणे या मार्गाने चालू राहते आणि अखेर अनुकरणाचे अथवा वास्तवाचे बोट सोडून कल्पनेच्या साम्राज्यात प्रवेश करते.

FinalDestination
Credit: Getty Images/Dennis Hallinan

पत्र असो वा चित्र, त्याची वास्तवाशी कुठेतरी सांगड घातलेली असते हे बिम्मला समजते. बाबांच्या नावावर पत्र लिहून स्वार्थ साधण्याचा त्याचा प्रयत्न आईने उधळून लावला होता. पण चित्रात आपल्या पायावर बेडूक बसलेला पाहून बब्बी पुन्हा किंचाळल्याने त्याने चित्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्याने स्वत:चे चित्र काढून त्याच्या हाती दोन लाडू काढून ठेवले नि ते आईला दाखवले. वास्तवाचे चित्रांत रूपांतर करता येत असेल तर चित्राचेही वास्तवात रूपांतर व्हायला काय हरकत आहे, नाही का? ...आईच्या समंजसपणाने या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी मिळते!

पत्र हे आज्ञार्थक होते, फसवणूक करणारे होते; तर चित्र हे अप्रत्यक्ष विनंती करणारे आणि प्रामाणिक होते. कदाचित म्हणून दोहोंच्या यशापयशाची शक्यताही वेगवेगळी होती हे पुढे मोठे झाल्यावर बिम्मला समजणार असते.


(क्रमश:) पुढील भाग >> पाऊस     

-oOo-


हे वाचले का?