शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

छद्म पर्यावरणवाद्यांचा धोका

काही जमाती अधिक भ्रष्ट आहेत का?’ या मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे आमच्या कंपनीच्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने एक महत्त्वाचा प्रश्न धसास लावण्यात आल्यामुळे कंपनीला समाजाच्या एका गटात प्रतिष्ठा मिळाली. पण तलवारीला दोन्ही बाजूंनी धार असते हे लवकरच कंपनीला दिसून आले.

TreeHugger

काही काळानंतर एका (बहुधा ग्रीन-पीस) पर्यावरणवादी संघटनेचे लोक कंपनीसमोरच्या फुटपाथवर जमले आणि कंपनीच्या नि विशेष करुन आमच्या चेअरमनच्या नावे निषेधाच्या घोषणा देऊ लागले. हे आंदोलन बराच काळ चालले होते. त्यांनी चेअरमनच्या नावे लिहिलेल्या बॅनरवर त्याला चक्क प्राणी-द्वेष्टा ठरवून टाकले होते.

हे सॉफ्टवेअर एकाच स्वरुपाच्या मूल्यमापनासाठी नव्हते, त्यातील संख्याशास्त्रीय तंत्रे ही अनेक क्षेत्रातील संख्याशास्त्रीय अभ्यासांतून निष्कर्षांपर्यंत नेण्यास मदत करणारी होती. औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये हेच सॉफ्टवेअर ’क्लिनिकल ट्रायल्सच्या’ पहिल्या टप्प्यात, किंवा फेज-१ ट्रायल्स मध्ये वापरले जाई.

या फेज-१ मध्ये होणारा अभ्यास हा प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांतून होतो. साहजिकच यात प्राण्यांच्या नैसर्गिक आयुष्यात ढवळाढवळ होतेच. त्याविरोधात या प्राणिमित्र संघटना आंदोलन करत होत्या नि त्या ट्रायल्समध्ये जणू आमचे चेअरमन सामील होऊन त्या मुक्या जिवांना त्रास देतात असा यांचा कांगावा होता. एखाद्याने नीब-पेनाचा वापर कुणाला भोसकून लुटण्यासाठी केला तर हे लोक त्या नीब-पेन उत्पादक कंपनीसमोर आंदोलन करुन त्यांच्यावर खटला भरण्याची मागणी करतील असे मला वाटून गेले.

हे सारे लोक ज्याला कुत्सितपणे अ‍ॅलोपथी म्हणतात त्या 'मॉडर्न मेडिसीन' ऐवजी कायम पारंपरिक औषधेच घेतात का असा मला प्रश्न पडला होता. आणि जी पारंपरिक औषधे आहेत ती सुदूर भूतकाळात काही माणसांवर प्रथम - औषध म्हणून पूर्वेइतिहास नसतानाही - वापरली गेली असतील, त्यांच्यातील काही जणांना त्यांचा त्रासही झाला असेल, मग ती औषधे यांना कशी चालतात असाही प्रश्न मला पडला होता. (अलीकडे आपला 'आयुर्वेदिय औषध सम्राट' उपोषणाने घाबरा झाल्यावर याच मॉडर्न मेडिसीनवाल्या डॉक्टरकडून उपचार करुन घेताना पाहिला तेव्हा छान करमणूक झाली होती.)

रुढार्थाने मी पर्यावरणवादी वगैरे नसलो (तसे कोणत्याही वादाचे एकटांगी धोतर नेसण्याची माझी इच्छा नाही), तरी त्यांच्या बहुसंख्य मुद्द्यांना माझा पाठिंबा असतोच. पण त्यांचे हे असे अतिरेकी प्रकार मला अजिबात पसंत नसतात. एका पर्यावरणवादी गटाशी मी संबंधित होतो. तिथे प्राणिमित्र असण्यासाठी तुम्ही शाकाहारी असणे कसे अपरिहार्य आहे वगैरे अतार्किकता दिसून आल्यावर हळूहळू दूर होत गेलो.

फर्गसन रस्त्यावरील रस्तारुंदीकरणात तोडल्या जाणार्‍या एका वटवृक्षाला वाचवण्यासाठी चिपको स्टाईल आंदोलन वगैरे करुन चमकोगिरी करणारे तथाकथित पर्यावरणवादी सिंहगड रोडवर तब्बल पंचावन्न झाडे तोडून रस्ता-रुंदीकरण केले तेव्हा ढिम्म होते, हे ही मी पाहिले होते. वास्तविक सिंहगड रोडचा भावी विस्तार लक्षात घेता ते वृक्ष सरळ मध्ये घेऊन दोन बाजूंनी रस्ता काढणे शक्य होते (खर्चाचा मुद्दा आहे पण तो तथाकथित पर्यावरणप्रेमी आंदोलक तसाही कधी विचारात घेतात? तूर्त मुद्दा त्यांचा आहे.)

पर्यायी रस्ताच नसल्याने विल्डर बीस्टच्या बेफाम कळपाप्रमाणे धावत जाणार्‍या सिंहगड रोडवरील वाहनांच्या, माणसांच्या अमानवी गर्दीला पर्याय देण्यासाठी, आता पार नाला झालेल्या नदीकाठाने जवळजवळ पूर्ण होत आलेला रस्त्याबाबत पर्यावरण रक्षणाचा मुद्दा उचलून गळा काढला गेलेला नि बनवलेला रस्ता उखडण्यास भाग पाडण्यापर्यंत ताणून धरले गेलेले आम्ही पाहिले. यात आजवर झालेला कोट्यवधींचा खर्च वाया गेला. आपण थोडे आधी जागे झालो असतो तर तो वाचला असता; किंवा आता हे फार पुढे गेले, उशीर झाला असा सुज्ञ विचार केला नाही. खर्चाबाबत विचार न करण्याबाबत मी वर म्हटले ते इथे तंतोतंत लागू पडते.

प्रदूषणाचा नि मृत्यूचा सापळा होऊ घातलेल्या कर्वे रस्त्याला पर्याय म्हणून बालभारती मागील डोंगरावरुन प्रस्तावित असलेल्या रस्त्याचा मार्ग वृक्ष नि प्राणिजीवनाने संपन्न अशा परिस्थितीकीतून जातो. त्यामुळे त्याला होणारा विरोध समजण्याजोगा आहे. पण नदीकाठचे पर्यावरण एखाद्या काँक्रीटच्या रस्त्याइतकेच ’जिवंत’ आहे असा माझा समज आहे.

गंमत म्हणजे हा सारा खटाटोप करणारे सत्ताबदल होताच अंगावर ओले फडके पडल्याने कलकलाट थांबवून गपगार झालेल्या कोंबडीसारखे शांत झालेले आम्ही पाहिले.

या अशा मूठभरांमुळे एकुणच पर्यावरणवादी म्हणजे विकासाचे विरोधक अशी मखलाशी, कांगावा करणे ’विकासाच्या माथेफिरुंना’ शक्य होते. पर्यावरणाचा काडीचा अभ्यास नसलेले (आमच्यासारखे) लोक फेसबुक नि ट्विटर सारख्या माध्यमांतून निरलसपणे कार्य करणार्‍या, समर्पित वृत्तीच्या पर्यावरणवाद्यांच्या नावेही शंख करतात, त्यांची अक्कल काढतात. आपल्या कुण्या नेत्यालाच सगळे समजते आणि यांना काही कळत नाही असा त्रागा करतात. याला कोणताही राजकीय पक्ष अथवा उद्योगधंद्यांचे भाट अपवाद नाहीत!

अशा दोन बाजूंच्या माथेफिरुंमध्ये मूळ प्रश्नांच्या चिंध्या होतात नि आमच्यासारखे दोन्ही बाजूंतील तथ्य नि कांगावा पाहून कुठली बाजू घ्यावी (ती घ्यायलाच हवी असा दम दोन्ही बाजू देत असतात) या विचाराने हतबुद्ध होऊन बसतात.

- oOo -


हे वाचले का?

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

काही जमाती अधिक भ्रष्ट आहेत का?

(शेखर गुप्ता यांचा लेख: Are Leaders from 'lower' casts and subaltern groups more corrupt? )
---

काही काळापूर्वी माझ्या पहिल्या आयटी कंपनीत काम करत असताना त्यांच्या एका सॉफ्टवेअरबाबत एक इंटरेस्टिंग टेस्ट केस वाचली होती.

RacismProtest

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये गोर्‍या व्यक्तींपेक्षा कातडीचा रंग काळा असलेल्या - आफ्रिकन-अमेरिकन - लोकांना शिक्षा होण्याचे प्रमाण आणि तीव्रता अधिक आहे अशी तक्रार मानवाधिकार संघटना बराच काळ करीत होत्या.

परंतु नुसता दावा पुरेसा नसतो कारण परस्परविरोधी दावे, आरोप-प्रत्यारोप हे होतच असतात नि प्रत्येक बाजूला आपले मत हे वास्तवच आहे असा ठाम विश्वास असतोच. अशा वेळी वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारावा लागतो नि निष्कर्षाला अधिक विश्वासार्ह दावा म्हणून समोर ठेवावे लागते.

आणि नुसते इकडे अठ्ठेचाळीस आहेत नि तिकडे एकुणपन्नास आहेत म्हणजे एकुणपन्नासच्या बाजूचा दावा करणारे बरोबर आहेत असे नसते. कारण तुम्ही काळाच्या अशा तुकड्यावर असू शकता जिथे केवळ योगायोगाने एक बाजू जड दिसते आहे. कदाचित काही दिवसातच पारडे दुसर्‍या बाजूला जाऊ शकते आणि तुम्हाला निर्णय बदलावा लागू शकतो. (अर्थात आमचा नेता दोषमुक्त झाला की न्यायव्यवस्था निर्दोष नि त्यांचा झाला की न्यायव्यवस्था सदोष असे बालीश विचार करणारे बहुसंख्य असतात. पण ते असो.) तेव्हा निव्वळ आकडे पुरेसे नसतात, कार्यकारणभाव सिद्ध करण्यासाठी त्याहून अधिक काही हाती असावे लागते.

इथे त्या सॉफ्टवेअरचा प्रवेश झाला. एका संघटनेने आरोप सिद्ध झालेल्या अनेक केसेसचा वंशाधारित डेटा जमा केला. त्यानंतर त्या सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध असलेल्या संख्याशास्त्रीय तंत्रांचा वापर करुन आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तींच्या बाबत दोषी ठरवले जाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे, इतकेच नव्हे तर त्यांना देण्यात येणार्‍या शिक्षेचे स्वरुप अधिक तीव्र असल्याचे साधार सिद्ध केले.

हे वस्तुनिष्ठ निष्कर्ष मानवाधिकार आंदोलनांना बळ देऊन गेले. आजही न्यायव्यवस्था तिथली आफ्रिकन-अमेरिकन नागरिकांबाबत पक्षपाती आहेच, पण निदान इतके झाले आहे की अशी एखादी केस घडली की त्याविरोधात उभे राहणार्‍यांची संख्या बरीच अधिक असते.

शेखर गुप्तांनी हा लेख लिहिण्यापूर्वीपासूनच त्यातील अध्याहृत निष्कर्षाला पुष्टी देणारी उदाहरणे - डोळ्यावर जातीची झापडे नसलेल्यांच्या - वारंवार समोर येत असतात. तेव्हा अशाच प्रकारचा व्यापक अभ्यास भारतातही व्हायला हवा. मुख्य म्हणजे मुख्य म्हणजे निरपेक्षपणे व्हावा, अमुक एक निष्कर्ष निघालाच पाहिजे या दृष्टीने नव्हे.

दुर्दैव हे की या देशात आज माध्यमांची, अभ्यासकांची, अभ्यासाची, व्यवस्थेची सार्‍या सार्‍यांचीच पूर्वग्रहांच्या, गटनिष्ठेच्या आधारे इतकी काटेकोर वाटणी झाली आहे, की असा वस्तुनिष्ठ अभ्यास करणार कोण आणि केलाच तरी तो तसा वस्तुनिष्ठ आहे असे मानणार किती टक्के लोक हा एक प्रश्न आहेच. कारण निष्कर्ष सोयीचा असला तरच तो पुरेसा वस्तुनिष्ठ नि वास्तव मानणारे नि गैरसोयीचा असला की तो एकांगी असल्याचा कांगावा करणारेच बहुसंख्य आहेत.

- oOo -

या विषयावरील आणखी लेख:

रॅडली बाल्को यांचा ’वॉशिंग्टन पोस्ट’ मधील लेख: There’s overwhelming evidence that the criminal justice system is racist. Here’s the proof.

अ‍ॅना-ली फर्थ यांचा जजेस.ऑर्ग वरील लेख: Most judges believe the criminal justice system suffers from racism

 


हे वाचले का?

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

ओझ्मा आणि वेदनेची वाट

OzmaAndTheLion

विषयसंगती ध्यानात घेऊन, काही अधिक भर घालून, हा लेख ’परीकथा आणि वेदनेची वाट’ या शीर्षकासह ’वेचित चाललो...’ या ब्लॉगवर हलवला आहे.

- oOo -


हे वाचले का?

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

'कट्यार काळजात घुसली' - एक दृष्टिक्षेप (उत्तरार्ध) : रत्नजडित पण बिनधारेची कट्यार

'कट्यार काळजात घुसली' - एक दृष्टिक्षेप (पूर्वार्ध) : सेरिपी << मागील भाग
---

'कट्यार...' नाटकाबद्दल बाबत बोलताना प्रामुख्याने त्यातील व्यक्तिरेखांचा विचार मागील भागात केला आहे. आता याच व्यक्तिरेखा चित्रपटात कशा येतात ते पाहणे रोचक ठरेल. पण सुरुवातीलाच हे स्पष्ट केले पाहिजे चित्रपटाचे नाव नि कथानकाचा गाभा तोच असला तरी चित्रपट ही एक स्वतंत्र कलाकृती आहे हे अमान्य करता येणार नाही. तेव्हा 'नाटकात जे आहे ते इथे का नाही किंवा चित्रपटात नव्याने जे आले आहे ते का आले आहे?' हे दोन प्रश्न गैरलागू आहेत. ते चित्रपटकथालेखकाचे स्वातंत्र्य मान्य करायला हवे. परंतु दोन्हींमध्ये जे सामायिक आहे त्याची तुलना मात्र करणे शक्य आहे नि न्याय्यही.

चित्रपटात सामान्य प्रेक्षकासाठी बरेच रंग गडद करावे लागतात हे मान्य. पण चित्रपटात गडदच काय पण भडक करून वर पात्रांची नि कथानकांची संपूर्ण मोडतोड केली आहे. इतकी की मूळ शालीचे तुकडे करून भलत्याच क्रमाने जोडून त्याची गोधडी केल्यासारखे दिसते. हे खरे की चित्रपटाच्या निर्मात्याला त्यांची कलाकृती घडवण्याचे स्वातंत्र्य आहे, पण जेव्हा दारव्हेकरांच्या मूळ कलाकृतीचे नुसते नावच घेतले असे नव्हे, तर त्या कथानकावर आधारित असे मान्य केले असेल, तर निव्वळ पात्रांची नावे आणि काही संवादांचे उचललेले तुकडे नि किमान पार्श्वभूमी या पलीकडे मूळ नाटकाशी त्याचा सांधा जुळायला हवा.

पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे दारव्हेकरांचे 'कट्यार...' हे सुष्टांच्या संघर्षाचे नाटक आहे, जे परिस्थितीजन्य बंधनांतून उभे राहते, तर पडद्यावरचे 'कट्यार...' हे सुष्ट-दुष्टांच्या भडक कथानकाच्या स्वरूपात उभे आहे. हे पुरेसे नाही म्हणून की काय पंडितजी नि खाँसाहेब हे भिन्नधर्मीय असल्याचा फायदा घेऊन त्याला हिंदु-मुस्लिम संघर्षाचे एक अस्तरही जोडून दिले आहे. (सतत पराभूत होणार्‍या खाँसाहेबांना पटकेवाला हिंदू 'परास्त खान' म्हणून हिणवितो तर दर्ग्यातले मुस्लिम सदाशिवच्या पराभवाबद्दल त्याची हुर्यो उडवतात. ते तसं घडावं म्हणूनच जणू मूळ नाटकातला सदाशिवला चोरुन गाणे ऐकताना पकडल्याचा प्रसंग हवेलीतून उचलून दर्ग्यात आणून ठेवला आहे.) भरीला एक इंग्रज आणून त्याने खाँसाहेबांना चिथावण्याचा प्रसंग घालून ते अधिकच बटबटीत पातळीवर नेऊन ठेवले आहे.

इतक्यावरच न थांबता खाँसाहेब स्वतःला रामलीलेत जाळल्या जाणार्‍या रावणाच्या जागी स्वतःला पाहतात असे दाखवून आणखी सुर-असुर संघर्षही त्याला जोडून दिला आहे. बरं संकेतार्थाने हा काळा-पांढरा बालिशपणा पुरेसा नव्हता म्हणून की काय निवेदन करणारी कट्यार ''रावणाचे दहन केले की त्याचा परकाया-प्रवेश झाला?' असे म्हणत संकेतार्थ वगैरे न समजणार्‍या सामान्य - कदाचित तिच्या मते बुद्दू - प्रेक्षकाला हे 'समजावून'ही सांगते.

काळ्या रंगाच्या जितक्या छटा सापडतील तितक्या घेऊन त्या सार्‍यांची पुटे खाँसाहेबांवर चढवून दिली आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांवरही - झरीनाचा अपवाद- त्यांचे काही फराटे मारून दिले आहेत. खाँसाहेब दुष्ट, रावण आहेत इ. ठसवणं चित्रपटकथा-लेखकाला पुरेसं वाटलं नाही म्हणून की काय ते आततायीपणे स्वतःवर लांबलचक बंदुकीने गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करतात, पंडितजी न गाता निघून जात असतानाही महाराजांनी 'फैसला' सुनवावा असा आग्रह धरतात, नंतरचा 'आपण कसे अनेक वर्षे झुंजलो नि जिंकलो' वगैरे थयथयाट करतात आणि निघून जाऊ पाहणार्‍या पंडितजींना थांबवून त्यांच्याकडूनच विजयचिन्हे स्वीकारण्याचा हट्ट धरतात.

मूळ नाटकात न गाता निघून जाणार्‍या पंडितजींना पाहून खाँसाहेब हतबुद्ध होतात नि असे का झाले असावे अशा विचारात पडतात (पुढे कदाचित हे मला औट घटकेचे राजगायकपद पुन्हा हिरावून घेण्यासाठीच दिले असावे असा तर्कही करतात), पण चित्रपट पाहताना खाँसाहेबांऐवजी हतबुद्ध होण्याची पाळी आम्हा प्रेक्षकांची होती.

चाँद-उस्मान ही दोन पात्रे नाटकात बाँकेबिहारी म्हणतात तसे केवळ 'गायकाआधी येणारे डग्गा नि तबला' म्हणूनच उभी आहेत. पण इथे चाँद पंडितजींची तस्वीर हवेलीतून बाहेर फेकून देतो, उस्मान भांडी घासत असणार्‍या सदाशिवच्या अंगावर थुंकतो. इतकेच नव्हे तर मूळ नाटकात पंडितजींच्या विरोधातील कटात प्रत्यक्ष सहभागी नसणारी झरीनाची आई चित्रपटात स्वतःच्या हाताने पंडितजींना शेंदूर कालवलेली मिठाई आणून देते.

मूळ नाटकात खाँसाहेबांना पत्नीच्या चलाखीमुळे सिद्धीस गेलेल्या कटाची माहिती राजगायकपदाची स्पर्धा जिंकल्यानंतर होते. इथे त्यांनी त्याची माहिती आहे नि त्याबद्दल काडीची खंत न करता, त्याचा फायदा घेत असताना, त्या पापाचे खापर मात्र- अगदी नि:संदिग्ध शब्दांत फक्त आणि फक्त आपल्या पत्नीवर फोडून मोकळे होतात. नाटकांत खाँसाहेबांची पत्नी अपराधगंडातून स्वतःहून खाँसाहेबांपासून दूर राहते, खाँसाहेब तशी आज्ञाही करत नाहीत. उलट चित्रपटात खाँसाहेब तिला तलाक देऊन मोकळे झाले आहेत.

नाटकात खाँसाहेब अखेरच्या एका प्रसंगात झरीनाने केलेल्या पक्षपाताच्या आरोपावर संतापून "मी तुझावर आजवर हात उगारला नाही, आता या वयात ती वेळ माझ्यावर आणू नको." म्हणतात तर चित्रपटात ते सरळ झरीनाच्या थोबाडीत मारतात. आपल्या हवेलीत नव्हे तर भर दरबारात कट्यारीचा वार करून सदाशिवला ठार करण्याची अनुमती मागणारे खाँसाहेब एका अर्थी दारव्हेकरांच्या खाँसाहेबांच्या थडग्यावर फुले वाहून त्यांना अखेरचा निरोप देतात. एक अखेरचा धाडकन येणारा गाण्याचा उमाळा वगळता खाँसाहेबांच्या व्यक्तिमत्वात कुठेही पांढर्‍या रंगाचा अंशही सापडू नये याची चित्रपटलेखकाने डोळ्यात तेल घालून काळजी घेतली आहे. थोडक्यात झरीना वगळता खाँसाहेबांशी संबंधित सर्वच मुस्लिम पात्रे संपूर्णपणे खलनायकी म्हणूनच रंगवली आहेत.

याच्या उलट मूळ नाटकात केवळ पार्श्वभूमी म्हणून येणारे पंडितजी - कारण नाटकाचा गाभा हा प्रामुख्याने सदाशिव नि खाँसाहेबांच्या संदर्भात आहे - इथे सद्गुणाचे पुतळे म्हणून येतात. त्यांच्या गाण्याने काजवे धावून येतात (तानसेन नि दीपक रागाची दंतकथा आठवते ना?), तेच खाँसाहेबांना विश्रामपुरात बोलावून त्यांची राहण्याची सोय करतात (ज्याची परतफेड 'कृतघ्न' खाँसाहेब त्यांना प्रथम राजगायकपदाच्या स्पर्धेत आव्हान देऊन नि नंतर शेंदूर खाऊ घालून करतात), सदाशिवने खाँसाहेबांकडे गाणे शिकावे अशी मनीषा व्यक्त करतात (मूळ नाटकात हा सल्ला कुणीही दिलेला नाही, पंडितजी नाहीत म्हटल्यावर सदाशिव खाँसाहेबांना विनंती करतो, पुढची 'शर्विलकी' बाँकेबिहारींच्या सल्ल्याने करतो.), दरबारात गुडघे टेकून खाँसाहेबांना कट्यार देऊ करतात.

एवढेच काय नाटकाचा अगदी गुरुत्व-मध्य म्हणावे असे सदाशिवचे ते अतिशय तरल असे स्वप्न चित्रपटकथा-लेखकाने सदाशिवऐवजी पंडितजींना बहाल करून टाकले आहे. थोडक्यात खाँसाहेबांच्या व्यक्तिमत्वात जसे झाडून सग्गळे दुर्गुण घुसवायचा पणच चित्रपटकथा-लेखकाने केला होता त्याच जोडीला सर्व प्रकारचे सद्गुण फक्त पंडितजींना बहाल करण्याचाही!

AngryYoungManSadashiv

नाटकातला गाण्यावर नि गाण्यावरच निष्ठा असलेला तरल, भावुक स्वभावाचा सदाशिव मात्र चित्रपटाने एकदम अँगी यंग मॅन करून टाकला आहे. हिंदुस्तानी संगीत क्षेत्रातील म्लेंच्छ वर्चस्व हाती कट्यार घेऊन नाहीसे करु पाहणारा सुपरमॅन म्हणूनच त्याचा प्रवेश होतो. विश्रामपुरात आल्यावर त्याचे पहिलेच कृत्य आहे ते खाँसाहेबांच्या हवेलीत घुसून त्यांच्याच कट्यारीने त्यांचा खून करून सूड घेण्याचा प्रयत्न करणे.

त्यापूर्वी तो चाँदला गळा दाबण्याची धमकीही देतो. पुढे तो भर दर्ग्यात चारचौघांसमोर खाँसाहेबांना आव्हानही देतो. जिथे कुणालाही राजरोस प्रवेश आहे अशा त्या दर्ग्यात सदाशिवने बुरखा घालून येणे हा प्रकार अनाकलनीय म्हणायला हवा. स्थानिक नाट्यस्पर्धांमधून सादर होणार्‍या नाटकाचे नवशिके लेखकही इतका हास्यास्पद प्रसंग लिहितील असे वाटत नाही.

नाटकातील सदाशिवचा गायनाचा ध्यास अतिशय विलोभनीय आहे, त्याची गाण्यावरची निष्ठा, आस, नि आपले मनोरथ सिद्धीस जात नाही हे पाहून उमटणारी वेदना त्याच्या आसपासच्या व्यक्तींच्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती प्रेम निर्माण करणारी आहे. ज्याची सुरुवातच कट्यार घेऊन आपल्या शय्यागृहात घुसण्याने होते, अशा व्यक्तीबद्दल चित्रपटात झरीनाला सहानुभूती निर्माण होणे अनाकलनीय आहे. नाटकातले सदाशिवचे स्वप्न ऐकणार्‍याला रोमांचित करणारे आहे. त्याच्या तरल, भावुक, निष्ठायुक्त स्वभावाला ते शोभणारे आहे. सूडभावनेने प्रेरित झालेल्या आणि जाहीरपणे खाँसाहेबांना आव्हान देत फिरणार्‍या आततायी सदाशिवच्या तोंडी ते बिलकुलच शोभत नाही.

चित्रपटाने हे स्वप्न पंडितजींना नुसतेच बहाल केले असे नव्हे, तर ते चित्रपटाच्या सुरुवातीलाच साकारही करून टाकत त्याचे ओबडधोबड थडगे बांधून काढले. (मूळ नाटकाची ती परिणती आहे, सुरुवात नव्हे.) उमेदवारी करणार्‍या सदाशिवचे ते स्वप्न असणे समजू शकतो पण प्रथितयश नि राजगायक असलेल्या पंडितजींच्या बाबत ते आयुष्याच्या बर्‍याच मागच्या टप्प्यावर असणेच शक्य होते.

शिवाय स्तब्धता ही दाद म्हणून अतिशय नाजूक गोष्ट आहे. अतीव तद्रूपतेतून स्तब्धता येऊ शकते तशीच श्रोते सर्वस्वी उदासीन राहिल्याने, गाणे फसल्यानेही येऊ शकते. इथे चित्रपटातले पंडितजींचे गाणे इतके त्रोटक आहे की त्यात तल्लीनता संभवत नाही. तेव्हा ती स्तब्धता 'चला संपलं ब्वा एकदाचं' म्हणून हुश्शः केलेल्या प्रेक्षकांची म्हणून अधिक मान्य होण्याजोगी आहे. थोडक्यात स्वप्नाला वास्तवात आणून त्याची पुरी माती केली आहे, साकार करून त्याचे सारे सौंदर्य मातीमोल केले आहे.

त्याही पुढचा एक अतर्क्य प्रकार म्हणजे मूळ नाटकात सदाशिव खाँसाहेबांचे गाणे चोरून ऐकतो ते त्याला राजरोसपणे ऐकता यावे म्हणून त्याला खाँसाहेबांचा 'गुलाम' म्हणून हवेलीत आणले आहे. आता ज्या खाँसाहेबांना पंडितजींबद्दल नि सदाशिवबद्दल प्रचंड असूया, द्वेष आहे ते खाँसाहेब आपल्याला जाहीरपणे आव्हान देणार्‍या सदाशिवला गुलाम झाला तरी रियाज ऐकू देतील? तो त्यांची गायकी आत्मसात करू पाहणार हे त्यांना पक्के ठाऊक असताना रियाजाच्या वेळी त्याने हवेलीत असू नये याची पुरेपूर काळजी ते घेणार नाहीत?

दुसरे म्हणजे अखेरच्या प्रसंगात कट्यार घेऊन सदाशिवची हत्या करण्याचा अधिकार गाजवण्याची अनुमती मागण्यासाठी बराच वेळ लांबलचक वकिली करणारे खाँसाहेब त्याचे टीचभर गाणे ऐकून अचानक भावुक होतात हे केवळ लेखक-दिग्दर्शकाला 'आता संपवायला हवे हं. चला आवरा'ची जाणीव झाल्याचेच निदर्शक असू शकते. मूळ नाटकाची वीण घट्ट आहे. प्रसंग, संवाद परस्परपूरक आहेत; त्यातल्या पात्रांना निश्चित चेहरा आहे आणि घटनांना निश्चित संगती. अशा कोलांटउड्या मारण्याची वेळ दारव्हेकरांवर आलेली नाही.

नाटकाचा संदर्भ सोडून देऊन चित्रपट ही स्वतंत्र कलाकृती म्हणून पाहिला तरी त्यात अनेक विसंगती दिसून येतात. चित्रपटाची समीक्षा करणे हा या लेखनाचा उद्देश नसल्याने सारेच तपशील देण्याचा मोह टाळतो. पण दरबारी संकेतांचे उल्लंघन, प्रसंगाचे स्थान बदलण्याने त्याचा संदर्भच नाहीसा होऊन परिणामकारकता कमी होणेच नव्हे थेट रसातळाला जाणे, संगीत क्षेत्रातील घराण्यांसंबंधीचे काही अलिखित नियम वा संकेत धुडकावले जाणे, अशा अनेक ढोबळ चुकांची जंत्री सहज मांडून दाखवता येईल. पण हेतू केवळ मूळ नाटकाबद्दल बोलण्याचा असल्याने तूर्तास ते सोडून देऊ.

एका ओळीत सांगायचे तर झरीना वगळता सारी मुस्लिम पात्रे खलप्रवृत्तीची, सर्वगुणसंपन्न पंडितजी आणि अँग्री यंग मॅन सदाशिव यांची ही कथा कुणासाठी किंवा कुठल्या उद्देशाने लिहिली गेली असेल याचा तर्क करणे फारसे अवघड नाही, त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकताही नाही.

जीएंच्या 'इस्किलार' मध्ये त्याच्या वडिलांनी बनवलेली 'सेरिपी' नावाची कट्यार याकीर हा विक्रेता प्रवाशाला दाखवतो. तपमान, पर्यावरण, रसायन, काळ, वेळ आणि मुख्य म्हणजे तिच्या कर्त्याचे कष्ट आणि बांधिलकी या सार्‍यांमधून तयार झालेली ही कट्यार अद्वितीय अशी असते. ती तयार करण्याची तपशीलवार कृती अशा जीव जडवून केलेल्या हत्यारांशी इमान राखता राखता अंध झालेले ते वडील प्रवाशाला उलगडून दाखवतात.

याउलट याकीर हा धंदेवाईक आहे, एकेका हत्यारासाठी इतका वेळ नि श्रम खर्च करण्याची त्याची तयारी नाही आणि त्याने ती तयारी दाखवली तरी 'अशा जातिवंत हत्यारापेक्षा रत्नजडित मुठीच्या मिरवण्याच्या तलवारी अथवा कट्यारींनाच गिर्‍हाईक मिळत असल्याने मुळात ते श्रम करावेतच का?' (थोडक्यात केवळ मिरवण्याची कट्यार विकत घेणारेच ग्राहक त्याच्याकडे आहेत.) असा त्याचा व्यवहारी बाणा आहे.

दारव्हेकरांची 'कट्यार...' आणि चित्रपटाच्या पडद्यावर आलेल्या 'कट्यार...' मध्ये वडिलांनी बनवलेल्या 'सेरिपी' आणि याकीरने बनवलेली भरजरी पण सामान्य कुवतीची कट्यार यांच्याइतकेच साम्य आहे. पहिलीची मूठ जुनी नि टवका उडालेली असेल कदाचित, पण तिची धार जातिवंत आहे; तर दुसरी कमरेला पैशांची थैली नि कट्यार सोबत मिरवणार्‍या धनदांडग्यांच्या सोयीसाठी रत्नजडित करुन मांडली आहे.

'सांगे वडिलांची कीर्ती तो येक मूर्ख' असं रामदासांनी म्हटलंच आहे, संगीत क्षेत्रातही सुमार गायकालाच वारंवार घराण्याच्या नावाचा जप करावा लागतो असं म्हणतात. नव्या 'कट्यार...' ने बापाचे - दारव्हेकरांचे - नाव लावणे हे ही त्याच प्रकारचे म्हणावे लागेल.

-oOo-


हे वाचले का?

'कट्यार काळजात घुसली' - एक दृष्टिक्षेप (पूर्वार्ध) : सेरिपी

अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणार्‍या कौशल्यांनंतर माणसाने सर्वप्रथम विकसित केलेले कौशल्य असावे ते गाण्याचे. मनोरंजनाचे दालन माणसाने सर्वप्रथम खुले केले ते गाण्याचे दार उघडूनच. एखादे आवडते गाणे, आवडती धून गुणगुणला नाही असा माणूस सापडणे दुर्मिळ. अगदी आपला आवाज बेसूर आहे हे पक्के ठाऊक असलेली माणसेही निदान बाथरुममध्ये तरी - जिथे समोर कुणी नसल्याने भिडस्तपणा आड येत नाही - अधेमधे आपला गळा तासून पाहतात. असा सुरांचा मोहक दंश जर योग्य वयात झाला तर त्या डसण्यातून जी बाधा होते ती अलौकिक अशीच असते.

'कट्यार काळजात घुसली' या नाटकातल्या सदाशिवला तो सूर सापडतो 'पंडित भानुशंकरांच्या' गाण्यातून. त्या सुरांनी वेड लावलेला तो दहा-बारा वर्षांचा मुलगा, त्यांच्या अनुपस्थितीतही अनेक वर्षे सांभाळून ठेवतो आणि अखेर घरच्या जबाबदारीतून मुक्त होताच पहिली धाव घेतो ते पंडितजींकडे. तिथून पुढे त्याच्या गायनविद्येच्या - किंवा कविराज बाँकेबिहारीच्या शब्दात सांगायचे तर 'गायनकलेच्या' - ध्यासाचा प्रवास उलगडत जातो.

KatyarCover

मराठी संगीत नाटकांच्या परंपरेत संगीत हा ज्यांचा अविभाज्य भाग आहे अशी मोजकीच जी नाटके आहेत त्यातील 'कट्यार काळजात घुसली' हे एक, कदाचित सर्वाधिक लोकप्रिय देखील. या नाटकाचा विषय निघाला की आठवतात ते डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेले खाँसाहेब. वसंतराव म्हणजे 'कट्यार...' आणि 'कट्यार...' म्हणजे वसंतराव हे जणू समीकरणच बनून गेले आहे. हे रसिकांचे सुदैव असले तरी माझ्या मते नाटकाचे दुर्दैव आहे!

मागच्या वर्षी याच नाटकावर आधारित एक मराठी चित्रपट येऊन गेला, आणि त्याहीपूर्वी त्या चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध भावे यांनी प्रसिद्ध गायक आणि आद्य खाँसाहेब डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल देशपांडे यांना सोबत घेऊन हे नाटक रंगमंचावर आणले होते. या नव्या संचाला कट्यार कशी दिसली, त्यांनी कशी मांडली याचा विचार करण्यापूर्वी मूळ नाटकाचा विचार करणे भाग आहे.

मराठी संगीत नाटक म्हणजे त्यातील गाणी, ती गाजली की नाटक चांगले असा संकेत होता. नाटकाची संहिता तशी ढोबळच असे. बहुधा नाटकाचा विषय हा पौराणिक अथवा ऐतिहासिक असल्याने त्यातील पात्रे प्रेक्षकांना आधीच ठाऊक असत, त्यामुळे त्याच्या गुणवैशिष्ट्यांसह पुरे पात्र उभे करण्याची गरज नसे. 'कट्यार...' सारख्या वास्तववादी (?) नाटकांना मात्र ही सवलत नसल्याने पात्रनिर्मिती हा एक महत्त्वाचा मुद्दा नाट्यलेखकाला विसरता येत नाही.

काही दशकांपूर्वी नाटक, चित्रपटादि परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये आणि कथा-कादंबर्‍यादी ललित लेखनामध्ये साधारणपणे 'चांगली व्यक्ती' आणि 'वाईट व्यक्ती' यांची अगदी व्यवस्थित फारकत झालेली दिसे. पण अलीकडे ग्रे-शेड्स असलेली म्हणजे एकाच वेळी गुण तसंच अवगुणांनी युक्त व्यक्तिमत्त्वे दिसू लागली आहेत. हिरो विरुद्ध विलन अशी बालिश वर्गवारी आता बरीच कमी झालेली दिसते आहे.

पण माझ्या डोक्यात अनेकदा असा विचार येत असतो तो असा की हे सारे ठीकच आहे, दोन व्यक्तींमध्ये नसला तरी दोन परस्परविरुद्ध अशा गुणांमध्ये, पैलूंमध्ये का होईना संघर्ष रंगवणे तुलनेने सोपे आहे. पण ज्यांना आपण सद्गुण म्हणतो अथवा मानतो, व्यक्तिमत्त्वाचे फक्त असेच पैलू घेऊन त्यांतून कथानक निर्माण करता येईल का? (ज्यांना आपण निव्वळ अवगुण म्हणतो, त्याआधारे ते उभे करणे कदाचित अधिक सोपे असावे असा कयास आहे.) म्हणजे सुष्ट-दुष्टांच्या लढाया, संघर्ष खूप पाहिले आपण; परंतु सुष्ट-सुष्टांचे संघर्ष कसे उभे करत येतील, मुळात हे शक्य आहे का? जर दोन व्यक्ती सद्भाव घेऊनच उभ्या असतील तर त्यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडावी कशी?

थोडा विचार केला तर असं दिसून येईल की हे अगदीच शक्य आहे. व्यक्ती सुस्वभावी, सद्गुणी, सद्भावी असतील, परंतु त्यांचे अस्तित्व हे अनेक व्यवस्थांनी बांधले गेले आहे. माणूस उभा असतो तो अशा एकाहुन अधिक व्यवस्थांच्या झुली पांघरूनच. कुटुंब, जात, धर्म, देश या आणि यासारख्या इतर अनेक चौकटींशी तो बांधला गेलेला असतो. जरी विचारांनी तो स्वतंत्र असला, त्यातून त्याचा सद्भाव त्याला जोपासता येत असला तरी त्याची कृती मात्र या चौकटींना नेहमीच झुगारू शकेलच असे नाही. आणि पुन्हा तो त्याच्या कृतीचा नियामक असतो, त्या निर्णयाशी निगडित अशा अन्य व्यक्तींच्या निर्णय त्याच्या नियंत्रणाबाहेरचा असतो. दोघांची कृती एकाच साध्याच्या दिशेने जाणारी असूनही कदाचित आकलनातील फरकामुळे किंवा अन्य परिस्थितीजन्य कारणांमुळे परस्परांना छेदणारी असू शकते; आणि यातून संघर्ष उभा राहू शकतो.

याशिवाय सद्भावाने केलेली कृती नेहमीच अपेक्षित परिणाम साधेल असेही नाही. 'कट्यार...' हे नाटक असेच सर्वस्वी सद्भावी व्यक्तिमत्वांचे नाटक आहे. यात दुष्टबुद्धी व्यक्तिमत्व जवळजवळ नाहीच. अगदी वरकरणी स्वार्थी अथवा क्षुद्रबुद्धी भासणारी, आपल्या पतीने राजगायक व्हावे या हेतूने पंडितजींना शेंदूर खाऊ घालण्याच्या काही जणांच्या कटास अप्रत्यक्ष साह्य करणारी खाँसाहेबांची पत्नीही याला फारसा अपवाद म्हणता येणार नाही. कारण तिने हा कट सिद्धीस नेण्यास अडथळा येऊ नये म्हणून खाँसाहेबांना गुंगीचे औषध दिले खरे, पण यातून आपण केवळ पंडितजींवरच अन्याय केला असे नव्हे तर कदाचित आपल्या पतीच्या यशालाही डागाळले आहे या अपराधगंडातून नंतर तिने त्यांच्या सोबत राजगायकाच्या हवेलीत त्यांच्या सोबत येण्यास नकार दिला आहे. म्हणजे ती स्खलनशील असली तरी तिची संवेदनशीलता, न्यायबुद्धी तिला सोडून गेलेली नाही. ही सारी 'सुष्टांची गोष्ट' आहे असे मी म्हणतो ते यासाठी. असे असूनही नाटकात संघर्ष आहे आणि तो सर्वस्वी परिस्थितीजन्य, जगण्याच्या स्वीकृत चौकटींनी निर्माण केलेला आहे.

गायनविद्येचा - किंवा कविराजांच्या व्याख्येनुसार गायनकलेचा - ध्यास घेतलेला सदाशिव हा या नाटकाचा खर्‍या अर्थाने केंद्रबिंदू. (आणि म्हणूनच 'कट्यार...' म्हणजे खाँसाहेब आठवणे हे त्या नाटकाचे दुर्दैव आहे असे मी म्हणतो.) त्याच्यावर जीव जडवून बसलेल्या दोन स्त्रिया - झरीना आणि उमा - त्याच्या गायननिष्ठेचे अपरंपार कौतुक असणारे, पण दोन भिन्न कारणांनी त्याला त्याच्या साध्य-साधनेमध्ये सहाय्य करण्यास असमर्थ असलेले दोन गानगुरू - पं भानुशंकर आणि खाँसाहेब अल्ताफ हुसेन.

उल्लेखनीय बाब ही पंडितजी आणि उस्ताद यांच्यात जसे हे साम्य आहे तसेच उमा नि झरीना दोघीही भिन्न कारणांनी मातृसुखापासून दूर असलेल्या, एक प्रकारे आपापल्या वडिलांचा वारसा सांभाळण्याच्या अपेक्षांचे अप्रत्यक्ष ओझे वाहणार्‍या. या चौघांशिवाय एक महत्त्वाचे पात्र आहे ते कविराज बाँकेबिहारी यांचे. सदाशिव नि बाँकेबिहारी एकाच नाण्याच्या दोन बाजू, कदाचित बाँके हा सदाशिवचा भूतकाळ म्हणून पाहता येईल किंवा बाँके हा विफलमनोरथ सदाशिव असे म्हणू शकतो.

सदाशिवने लहानपणापासून गाण्याच्या ध्यास घेतलेला तर बाँके मूळचे कवी; 'सूर काळजाला भिडतात पण गळ्याला स्पर्श करत नाहीत' ही खंत असलेले. एरवी विनोदाच्या मुखवट्याआड चिणून टाकलेली त्यांची ती वेदना 'जे गळ्यातून येत नाही ते डोळ्यातून काढावं लागतं याची खंत वाटते' असं म्हणताना अचानक उघडी पडते. वाढत्या वयाचे भान असून, आता उशीर झाला आहे हे ध्यानात येत असूनही पंडितजी किंवा खाँसाहेब यांच्या कृपेने अजूनही जमेल अशी वेडी आशा बाळगणारे आणि - कदाचित - 'सदाशिव'मध्ये आपलेच तरुण प्रतिबिंब पाहात त्याची मनोकामना पुरी व्हावी म्हणून हरप्रकाराने सहाय्य करणारे, "मला गाणं कळत असलं तरी वळत नाही. गळा 'असा' फिरत असला तरी 'तसा' फिरत नाही अजून" म्हणताना ज्याला गाणं 'वळतं' आणि ज्याचा गळा 'तसाही' फिरतो त्याच्या- म्हणजे सदाशिवच्या पारड्यात आपले सारे दान टाकण्यास सिद्ध असलेले.. 'मी जुना असलो तरी जुनाट नाही' म्हणताना नव्या क्षेत्रात शिरण्याची अजूनही उमेद असणारे.

उस्मानच्या कटकटीला वैतागून खाँसाहेब जेव्हा मुरलिधराची मूर्ती विकण्यास तयार होतात तेव्हा चलाखीने तिला सदाशिवकडे घेऊन येणारे कविराज; "या जगात काही मिळत नसतं- मिळवावं लागतं. तेव्हा साध्यांचा विचार करा, साधनांचा नको" असा सल्ला देणारेही कविराज; आणि पडद्याआड बसून चोरून गाणे ऐकताना खाँसाहेबांनी प्रथम पकडल्यानंतर (आणि पंडितजींमुळे त्याची सुटका झाल्यानंतर) उत्तरेकडे नव्या गुरूच्या शोधात निघालेल्या सदाशिवला बद्रिप्रसाद या मुक्या नोकराच्या रूपात पुन्हा हवेलीत प्रवेश मिळवून देणारेही कविराजच.

कविराज हे केवळ विनोदनिर्मितीसाठी निर्माण केलेले पात्र नव्हे तर प्राचीन नाटकांतून दिसणार्‍या व्युत्पन्न विदूषकाचे - इथे 'सक्रीय'ही! - आहे. संपूर्ण कथानकाचा तो सूत्रधार आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गाण्यावर प्रेम करणार्‍या, पण ते कंठसाध्य नसणार्‍या आणि ज्यांच्याकडे तो ठेवा आहे त्यांच्यावर मनापासून प्रेम करणार्‍यांचा तो प्रतिनिधी आहे. त्यामुळे हे नाटक जितके 'सदाशिव'चे आहे, जितके 'खाँसाहेबां'चे आहे तितकेच ते कविराज बाँकेबिहारींचेही आहे हे विसरुन चालणार नाही!

सदाशिवची खाँसाहेबांशी प्रथम गाठ पडते नि तो त्यांच्याकडे गाणे शिकण्याची इच्छा प्रदर्शित करतो तेव्हा त्याच्या 'गळ्याची जात' पाहण्यासाठी ते त्याला काही गायला सांगतात. तो गातो ते 'घेई छंद' हे पंडितजींचे आवडते भजन. इतकेच नव्हे तर या भेटीच्या काही वेळ आधी उमा नेमके हेच पद खाँसाहेबांच्या आग्रहावरून गाऊन गेली आहे. या पाठोपाठ गाण्याने खाँसाहेबांच्या मनात सदाशिवच्या गळ्यावरचे पंडितजींचे संस्कार स्पष्ट कोरले जातात. आणि म्हणूनच ते सदाशिवला शागीर्द म्हणून स्वीकारण्यास नकार देतात. नाटकातील संघर्ष सुरु होतो तो असा. तो संघर्ष व्यक्तींमधला नाही, तो आहे दोन गायकी परंपरांमधला.

थोडं बारकाईने पाहिलं तर 'कट्यार...'मध्ये भारतीय रागसंगीतामधील 'ख्याल गायकी' आणि 'ध्रुपद गायकी' या दोन परंपरांतील स्पर्धेचे प्रतिबिंब पडलेले दिसते. वास्तवात ख्यालाने ध्रुपद गायकीहून अधिक लोकप्रियता मिळवली. शृंगार-विरहादी भावनांना सोबत घेऊन केवळ भक्तीपर पदे नि मूठभरांची मक्तेदारी मोडून काढत गाण्याचे क्षितिज विस्तारले आणि समाजात खोलवर रुजवले. त्याचबरोबर त्याच्या व्याकरणालाही काहीसे सैल करत गतिमान केले. 'घेई छंद...' हे गाणे नाटकात दोन वेळा येते ते पंडितजी आणि खाँसाहेब या दोघांच्या गायकीतील फरक अधोरेखित करते. पंडितजींनी 'सालगवराळी' मधे बांधलेली बंदिश भक्तिभावाला अनुकूल, गाणार्‍याला-श्रोत्याला तल्लीन करणारी; याउलट धानीसारख्या तुलनेने चंचल प्रकृतीच्या रागाशी सोबत करत जाणारी खाँसाहेबांनी बांधलेली बंदिश कडाडत्या चपलेसारखी, मान डोलावून दाद देण्यापेक्षा 'आहा', 'वाहवा' किंवा 'क्या बात है' ची मौखिक दाद मिळवणारी.

सदाशिवने पंडितजींचा स्वर-लगाव आणि एकुण गाण्याची बैठक घेऊन त्यावर खाँसाहेबांच्या गायकीचे संस्कार करणे हा एकुण भारतीय रागसंगीताचा प्रवाच्या प्रवासाशी सुसंगत आहे. मंदिरांमध्ये बंदिस्त असलेली धृपद गायकी घेऊन त्यावर आपल्या गायकीचा संस्कार करत मुस्लिम गायकांनी तिला अधिक लोकाभिमुख बनवले; जिला आपण ख्यालगायकी म्हणून ओळखतो. सदाशिव हा एकप्रकारे त्या मुस्लिम नायकांचा प्रतिनिधीच म्हणता येईल, पण सदाशिव त्यांच्या नेमके उलट करतो आहे!

सदाशिव खाँसाहेबांच्या हवेलीत लपून छपून राहतो नि एकलव्याच्या निष्ठेने खाँसाहेबांचे गाणे शिकतो या प्रकारालाही हिंदुस्थानी संगीताच्या इतिहासात एक दाखला मिळतो तो ख्याल गायकीतील सर्व घराण्यांचे आद्य घराणे मानले गेलेल्या ग्वाल्हेर घराण्याच्या इतिहासात. गायकीला खर्‍या अर्थाने सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचे प्रथम श्रेय ज्यांना जाते ते गुलाम रसूल (जे मुळात ध्रुपदिये होते.) यांचे दोन शिष्य होते शक्कर खाँ आणि मक्खन खाँ आणि या दोघांचे पुत्र होते महंमद खाँ आणि नत्थन पीरबक्ष. (या दोघांपैकी एकाने ग्वाल्हेर घराण्याची सुरुवात केली असे मानले जाते, नक्की कुणी यावर नेहमीप्रमाणे वाद आहेत.) परंतु त्यांच्यात एकाच गायन परंपरेतले असूनही भाऊ-बंदकी प्रमाणेच फारसे चांगले संबंध नव्हते.

पुढे नत्थन पीरबक्ष यांचे पुत्र कादरबक्ष यांच्या मृत्युनंतर त्यांचे तीन पुत्र हद्दू, हस्सू आणि नत्थू खाँ यांना त्यांचे आजोबा नत्थन पीरबक्ष यांना वयोमानापरत्वे त्यांना तालीम देणे जमेना; म्हणून या मुलांना महंमद खाँ यांची तालीम मिळावी असे त्यांना वाटत होते. परंतु कौटुंबिक दुराव्यामुळे महंमद खाँ या गोष्टीला मान्यता देतील अशी शक्यताच नव्हती. तेव्हा त्यांनी शिंदे सरकारांना गळ घालून जेव्हा जेव्हा दरबारात महंमद खाँ याचे गाणे होईल तेव्हा या तिघांना पडद्याआडून ते ऐकता येईल याची सोय करण्याची विनंती केली. आणि महाराजांच्या कृपेने बराच काळ हा क्रम चालू राहिला नि या तिघांनी महंमद खाँ यांचे गाणे आत्मसात केले असे म्हटले जाते. (पण इथे दोन वेगळ्या गायकी-परंपरा नव्हत्या, दोनही उस्ताद हे एकाच परंपरेतले होते, हा एक फरक जाताजाता नोंदवून ठेवायला पाहिजे.)

YouTube वर भीमसेन जोशी यांनी १९७१ मध्ये गायलेला एक 'मियाँ-मल्हार' मधली 'महंमदशाह रंगीले' ही बंदिश पाहता/ऐकता येईल. (https://www.youtube.com/watch?v=9I3rXKmGxlI) त्यात भीमसेन हा माणूस गाताना या भूतलावर नाहीच जणू असा भास होतो. त्यांना फक्त आसमंतातले सूरच काय ते दिसताहेत नि आसपासच्या रसिकांचे, सहकार्‍यांचे अस्तित्वही जाणवत नसावे वाटते. सुरांची हीच बांधिलकी, हेच स्वप्न सदाशिवने आयुष्यभर जोपासलेले दिसते. त्याचे हे स्वप्न कोणाही संवेदनशील कलाकाराला त्याच्याशी तद्रूप झाल्याची भावना निर्माण होईल इतके तरल आहे.

वसंतरावांनी खाँसाहेबांची भूमिका केलेल्या पहिल्या संचासह तीन ते चार नटसंचांनी केलेले 'कट्यार...' चे सादरीकरण आजवर पाहण्यात आले आहे. पण सर्व नाटकाचा चरमोत्कर्ष बिंदू असलेले हे स्वप्न, त्याची तरलता, त्यातली सदाशिवची भावुकता एकालाही पकडता आलेली नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागते. मनसोक्त गायल्यानंतर कुण्या दिग्गजाकडून मिळालेली पसंतीची पावती आणि 'जीते रहो बेटा, गाते रहो.' हा मिळवलेला आशीर्वाद, आणि ती कृतकृत्य भावना निरंकुशपणे डोळ्यातून वाहते आहे... इतके - बहुतेकांच्या मते- महत्त्वाकांक्षेचा अभाव भासणारे, पण विलक्षण अशा आत्मतृप्तीची आस दाखवणारे स्वप्न, ते साध्य राजगायकपदापेक्षाही प्रचंड मोलाचे आहे असे तो म्हणतो. नाटकाच्या अखेरीस खाँसाहेबांकडून ही दाद तो मिळवतो तेव्हा त्याच्या त्या स्वप्नाची पूर्ती होते.

परंतु त्याच नाटकावरुन काढलेल्या चित्रपटात मात्र अंतर्बाह्य विलन असलेले खाँसाहेब हे 'उस्तादोंके उस्ताद' किंवा 'दिग्गज' गायक म्हणून उभेच राहात नाहीत आणि म्हणून चित्रपटाच्या अखेरीस त्यांनी सदाशिवला दिलेली दाद नि आशीर्वाद आवश्यकतेहून दशांशाइतकाही मूल्यवान दिसत नाही. ज्या खाँसाहेबांवर वार करण्यासाठी कट्यार घेऊन धावलेला सदाशिव, सतत त्यांच्याशी प्रत्यक्ष संघर्ष केलेला सदाशिव, त्यांनी दिलेली दाद मोलाची मानेल यावर विश्वास बसणेच अवघड आहे. त्याच्या मनात उलट सूडपूर्तीचे समाधानच उमटण्याची शक्यता अधिक उभी राहते आणि म्हणून चित्रपटाचा शेवटही अतर्क्य, केवळ मूळ नाटकाशी सांधा जोडणारे काहीतरी हवे म्हणून ओढून ताणून आणल्यासारखा दिसला.

सदाशिवच्या स्वप्नाची आणि खाँसाहेबांच्या स्वप्नाची (किंवा साध्याची) तुलना करायची झाली तर झरीनाचे शब्द उसने घ्यावे लागतात. आपण दरबारचे चाकर झाल्याने आपल्यासारख्या प्रथितयश गायकाला महाराजांच्या आज्ञेने केवळ सात सूर रेकॉर्ड करण्यापुरती सेवादेखील रुजू करावी लागती हे जाणवून वैफल्याच्या भरात 'ऐसी लाचारीसे तो भीक माँगना अच्छा' असे म्हणत ते राजगायकपद लाथाडून निघून जाण्याचा निश्चय करु पाहणार्‍या खाँसाहेबांना रोखताना झरीना म्हणते, "मग पंडितजींशी स्पर्धा करण्यात दहा वर्ष रक्त का आटवलंत तुम्ही? आपल्या घराण्याच्या गायकीला प्रतिष्ठा मिळावी, राजमान्यता लाभावी, प्रत्यक्ष राजाश्रय मिळावा म्हणून कशाला दिवसाकाठी बारा बारा तास रियाज केला? अब्बाजान, प्रश्न केवळ तुमच्या मानापमानाचा नाही... घराण्याचाही आहे!"

थोडक्यात 'एकदा घराण्याची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर वैयक्तिक मानापमानापेक्षा घराण्याच्या हिताऽहिताला अधिक प्राधान्य द्यावे लागते, स्वाभिमानाला मुरड घालावी लागते, स्वातंत्र्याच्या काही पैलूंना तिलांजली द्यावी लागते' याची जाणीव झरीना खाँसाहेबांना करून देते आहे. त्यातच पुढे ती म्हणते." ... आणि काही काही उसूल, कायदे कानून असे असतात... ज्यांच्यासाठी तुम्ही जीव देखील द्यायला तयार आहात... जीव घ्यायला देखील तयार व्हाल!" इथे पाहिले तर झरीना पुढे येणार्‍या घटनेची भीती व्यक्त करते आहे, कारण यापूर्वी सदाशिव कट्यारीचा बळी होण्यापासून पंडितजींमुळे वाचला असला, तरी त्या धोक्याला न जुमानता तो खाँसाहेबांचे गाणे चोरून ऐकत राहणार आणि ऐकताना भान न राहून दाद देताना कदाचित पुन्हा पकडला जाणार, याची तिला साधार भीती आहे. खाँसाहेबांना रोखतानाही ती भीती तिच्या डोक्यात ठाण मांडून बसली आहे.

नाटकातले संवाद हे असे घट्ट विणीचे आहेत. केवळ दोन वा अधिक व्यक्तीतले सुटे-सुटे संवाद नाहीत, त्यांना बरेचदा संपूर्ण कथानकाचा संदर्भ आहे. असेच आणखी एक उदाहरण. 'किसी के दिलमें प्यास पैदा कर देना- फिअर उसे अधूरी छोडकर जाना.... हे वाक्य खाँसाहेबांच्या तोंडी दोनदा येते, एकदा नाटकाच्या सुरुवातीला उमाला उद्देशून; ती वडिलांच्या आठवणीने भावनाविवश होऊन गाणे अर्धवट सोडून जाते तेव्हा; तर दुसर्‍यांदा नाटकाच्या अखेरीस सदाशिवला, तो 'सुरत पिया की...' अर्धवट ऐकवूनच थांबतो तेव्हा! थोडक्यात त्यांचा जीवनप्रवास त्या 'प्यास'शी निगडित आहे आणि तो कायमच अधूरा आहे.

त्याचबरोबर हे ध्यानात घेतले पाहिजे की उमा आणि सदाशिव हे दोघेही त्या गायकीचे शागीर्द आहेत जिला खाँसाहेबांनी सातत्याने आव्हान देत परास्त करण्याचा प्रयत्न केला आहे. 'कटार तो उस लडकीने/उसने चलायी, अभी यहाँ' हे वाक्यही खाँसाहेबांनी या दोघांच्याही संदर्भात उच्चारले आहे.

'त्याला (म्हणजे सदाशिवला) गाण्यातलं काय कळतं.' असं आढ्यतेखोरपणे म्हणणार्‍या उस्मानला खाँसाहेब म्हणतात 'त्याचा गळा जिथं पोचतो तिथे तुझी नजरसुद्धा पोचायची नाही.' एकदा त्याचा रियाज ऐकून परतलेले खाँसाहेब झरीनाला म्हणतात, "क्या गला पाया है लौंडेने! आदत बोल रही थी... और जिगर भी महसूस होता था... मगर हिसाबमें जरा गडबड होती थी... झरीना! कुठलाही गायक टप्प्याटप्प्यानं पुढं जातो... पहले कुछ दिन उसका गला बजता है... फिर आदत के बाद बोलता है... और जब काफी रियाज होता है... जिगर के साथ... तब गला बजने लगता है... अच्छी तबियत पायी है लौंडेने... किसी अच्छे उस्ताद के हातों भेजा जाएगा... घिसा पिटा जाएगा... तो हीरा बन जाएगा. "

या माणसाला वास्तवाचे भान तर आहेच पण इतर घराण्यांबद्दल ईर्षा, स्पर्धा असली तरी तुच्छता नाही, त्या प्रवाहातील गायकाचे मोठेपण मान्य करण्याइतका उमदेपणा त्याच्याकडे आहे. इतकंच काय 'पंडितजींना आपलं स्वतःचं गाणंही अर्धवट वाटतं' हे ऐकून ते खुश न होता, त्यांच्याकडून कुत्सित प्रतिक्रिया न येता आश्चर्याची, विचारात पडण्याची येते. खाँसाहेबांच्या निष्ठा प्रथम गाण्याशी आहेत नि नंतर धर्म वगैरे बाबींशी. मुरलीधराची मूर्ती उस्मान फोडू पाहतो तेव्हा 'तो आपला रिश्तेदार आहे, कारण त्याच्या हातात मुरली आहे.' असे सांगत थोपवतात.

उत्तरार्धात झरीनाच्या सदाशिवबाबतच्या भावना त्यांना समजतात तेव्हा ते झरीनाला स्पष्टच सांगतात, 'एकवेळ मी माझी 'बेटी' त्याला देईन, पण घराण्याचा इल्म... तो हुनर मात्र देणार नाही.' पंडितजींनी न गाता आपल्याला राजगायकपद मिळू दिले याचा अर्थ आपण जिंकलो नाही तर फक्त 'पुढे चाल' मिळाली याची जाणीव आणि खंत ते बाळगून आहेत. आज ना उद्या पंडितजींचा गळा पुन्हा साथ देऊ लागेल, ते पुन्हा आपल्याला आव्हान देतील, 'त्या लढाईत आमचा पराभव झाला तरी जास्त समाधान वाटेल, ह्या- ह्या असल्या विजयापेक्षा.' असं ते झरीनाला बोलून दाखवतात.

आपण गुरुदक्षिणा म्हणून दिलेला ढब्बू पंडितजींच्या पोथीमध्ये जपून ठेवलेला पाहून 'म्हणजे पंडितजींनी मला शिष्य मानलं होतं, मी धन्य झालो.' असं म्हणणार्‍या सदाशिवला उमा म्हणते 'खर्‍या अर्थानं धन्य होशील त्या दिवशी... जेव्हा राजगायक पदावर पुन्हा पंडित भानुशंकरांची घरंदाज गायकी प्रतिष्ठित करू दाखवशील! तीच महत्त्वाकांक्षा असायला हवी तुझी.' दोघांच्या दृष्टिकोनातला हा फरक! गमावल्याची वेदना 'न कमावल्या'च्या वेदनेपेक्षा अधिक ठसठसणारी असते हे उघड आहे.

इथेच उमा नि झरीना यांच्या दृष्टिकोनातील फरकही पहायला हवा. दोघींच्याही मनात सदाशिवबाबत जवळजवळ सारख्याच कोमल भावना असल्या तरी उमाच्या मनात हा स्वार्थाचा एक धागा जास्तीचा मिसळलेला आहे, नकळत का होईना पण सदाशिवला ती आपल्या वडिलांच्या नि खाँसाहेबांच्या स्पर्धेतला मोहरा म्हणून पाहते आहे.

याउलट झरीनाचा कोणताच स्वार्थ सदाशिवच्या यशापयशाशी निगडित नाही, किंबहुना आपल्या नात्याला कोणतेही भवितव्य नाही हे ती पुरेपूर जाणून आहे, एवढेच नव्हे तर तिने सदाशिवला साहाय्य करणे हा एक प्रकारे कौटुंबिक, धार्मिक नि सांगीतिक परंपरेशी द्रोहच आहे. त्यातून 'योग्य व्यक्तीला मदत केल्याच्या' समाधानापलिकडे तिच्या हाती काहीच लागण्यासारखे नाही. त्यामुळे निस्वार्थीपणा हा गुण मानला, तर उमा नि झरीना यांच्यात तुलना करता झरीना उंचच भासते.

उमाही सदाशिवमध्ये गुंतली असली तरी त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेमभावना नाही हे तिला प्रथमपासून ठाऊक आहे, त्यामुळे कदाचित अशा ताटातुटीला तिच्या मनाची तयारी होणे तुलनेने अधिक सोपे होते. पण कळत-नकळत सदाशिवही झरीनामध्ये गुंतल्याचे दिसत असल्याने त्यांचा विरह अधिक वेदनादायी होणार होता. सदाशिव आणि खाँसाहेब किंवा पंडितजी आणि खाँसाहेब यांच्यातील संघर्षाचा सर्वात मोठा बळी जर कुणी असेल तर ती आहे झरीना.

अशा या देखण्या शिल्पाचे चित्र काढण्याची उर्मी, सुरसुरी एखाद्याला आली आणि त्याने ते रेखाटताना आपलेही काही रंग त्यात मिसळले तर ’प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट’ होते की ताजमहालाला कावेचे रंगरोगण केल्यासारखे भासते हे त्या कलाकाराच्या कुवतीवर अवलंबून असते. या नाटकाचे नाव घेऊन उभ्या राहिलेल्या चित्रपटाचे काय होते ते पुढच्या लेखांकात पाहू.

(पूर्वार्ध समाप्त)

पुढील भाग >> 'कट्यार काळजात घुसली' - एक दृष्टिक्षेप (उत्तरार्ध) : रत्नजडित पण बिनधारेची कट्यार

-oOo-


हे वाचले का?

सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

उठवळांचे आत्मरंग

पश्चिमेत लॉरेन्स ऑलिव्हिए किंवा लिव उलमनसारख्या प्रथितयश कलावंतांच्या आत्मचरित्रांची जशी परंपरा आहे, तशी ती आपल्याकडे नाही. पण म्हणून दिग्गज कलावंतांची अगदीच टाकाऊ वा उथळ स्वरूपाची आत्मचरित्रंही आजवर प्रकाशित झालेली नव्हती. मात्र, अलीकडे बॉलीवूडमधील नट-नट्यांच्या प्रकाशित आत्मचरित्रांनी ती पायरीसुद्धा ओलांडली आहे. त्यातल्या नवाजुद्दीनने उठवळ स्वरूपाचं आत्मचरित्र लिहून त्या बदलौकिकात भर घातली आहे इतकेच...

AnOrdinaryLife

अष्टपैलू अभिनेता अशी ज्याची ओळख झाली, ज्याच्या संघर्षाच्या मिथक कथा मोठ्या प्रेमाने पसरवल्या गेल्या, त्या नवाजुद्दीन सिद्दिकीवर उथळ आणि उठवळ मांडणीमुळे आत्मचरित्र (अ‍ॅन ऑर्डिनरी लाइफ - ए मेमॉयर) मागे घेण्याची नुकतीच वेळ आली. नवाजुद्दीनच्या आधी करण जोहर, ऋषी कपूर, आशा पारेख, अनू अगरवाल आदी आजी- माजी कलावंतांची आत्मचरित्रं बाजारात आली, पण त्याचं साहित्य-मूल्य सोडा, पण चरित्र-मूल्य देखील वाचकांच्या मनावर ठसलं नाही. इतकंच नव्हे, तर चित्रपट, अभिनय आणि साहित्य या तिन्ही क्षेत्रांत दबदबा असणाऱ्या गिरीश कर्नाडांसारख्या दिग्गजाचे ‘आडाडता आयुष्य’देखील अपेक्षाभंग करणारे ठरलं. कर्नाडांनी आपला प्रवास ग्रंथित करताना मूल्यमापनाला, वैचारिक जडणघडणीला फारसे महत्त्वच दिलेले दिसले नाही. निव्वळ कालानुक्रमे नोंदवलेल्या घटनांची ‘बखर’ आणि (आत्म)चरित्र यात मूलभूत फरक असायला हवा. इथे नसिरुद्दीन शहा आणि सई परांजपेंसारख्या सर्वार्थाने अनुभवी म्हणता येतील अशी नट-दिग्दर्शिकेच्या आत्मचरित्रांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. पण हे दोघेही वर्तमानातील अपवाद म्हणावे लागतील अशा स्वरूपातील चरित्रे वाचायला मिळत आहेत.

आत्मचरित्र कुणी लिहावं, कधी लिहावं याचा काही नियम असू शकत नाही; असूही नये. असे असले तरी ‘आत्मचरित्र का लिहायचे आहे?’ याबाबत निदान लिहिणाऱ्याच्या मनात स्पष्टता हवी. आणि मुख्य म्हणजे आपले आयुष्य ग्रथित करताना त्यातील आपल्या दृष्टीने आणि संभाव्य वाचकाच्या दृष्टीने महत्त्वाचे पैलू कोणते याचे भान राखणे आवश्यक असते.

कारण असे लेखन जितके लेखकासाठी असते त्याहून अधिक त्याच्या वाचकासाठी असते. आपल्यासाठी आपल्या आयुष्यातील संघर्षबिंदू तसेच विसाव्याचे क्षण हे कितीही महत्त्वाचे असले, तरी वाचकाच्या दृष्टीने ते त्यांनी यापूर्वी अन्यत्र वाचल्या-अनुभवलेल्या गोष्टींची केवळ एक पुनरावृत्ती असू शकते. थोडक्यात सांगायचे तर तुमचे आयुष्य हे केवळ ‘आणखी एक डेटा पॉइंट’ न ठरता त्यात त्याचे स्वत:चे असे वैशिष्ट्य असणे आवश्यक असते. वैयक्तिक पातळीवरील वैशिष्ट्यांखेरीज इतर सामाजिक, राजकीय, कलात्मक आणि परस्परसंबंध हे अन्य पैलूही याबाबत ध्यानात घ्यावे लागतात.

एरवी ‘का लिहावे?’ पाठोपाठ दुसरा येणारा प्रश्न म्हणजे ‘केव्हा लिहावे?’ हा आहे. आजवर कारकीर्दीची अखेर झाल्यावर, निवृत्तीच्या काळात आत्मचरित्र लिहायचे असते असा समज होता. याचे कारण निवृत्ती नंतर निवांतपणा नि वेळ दोन्ही उपलब्ध असतात हे तर आहेच, त्याचबरोबर वयाबरोबर वाढत जाणारी जाणीव, अनुभव आणि त्यातून येणारी वैचारिक परिपक्वता हे ही एक महत्वाचे कारण असते. ज्या प्रवाहाचे मूल्यमापन करायचे त्याचा भाग असताना ते करण्यापेक्षा त्यातून बाहेर पडल्यावर ते करणे तुलनेने अधिक तटस्थपणे होऊ शकते.

परंतु नवाझुद्दिन, करण जोहर आदिंचा विचार करता हा समज रद्दबातल होतो आहे असे दिसते. करियरच्या एका टप्प्यावर - साधारण परमोच्च बिन्दूवर - हे लिहिण्याचा प्रघात पडू लागलेला दिसतो. त्यामुळे चरित्र नायक वा नायिका तेवढी बदलते, मसाला थोडाफार फरकाने तोच राहतो. त्यात ना मानवी वर्तनाचा नवा कोपरा उजळून निघतो, ना वाचकाचे जगण्याचे भान विस्तारते, ना उन्नत होत गेलेल्या तत्त्वमूल्यांची ओळख होते, ना आत्मचरित्र सांगणाऱ्याच्या चिंतन-मननाची साक्ष पटते. अर्थातच याला कलाबाह्य कारण आहे, आणि ते म्हणजे बाजारपेठ! या बाजारपेठेच्या प्रभावामुळेच जाहिराती, ब्रॅंडिंग वगैरे सोबतच आता आत्मचरित्राचे क्रियाकर्म उरकून घेण्याची पद्धत रूढ होते आहे.

आजची बाजारपेठ अशी आहे की, जिथे वस्तू विकली जात नाही, ती ‘विकावी लागते' हा ठाम समज आहे. चित्रपट असो की पुस्तक, ते बाजारात येताना भल्या-बुऱ्या कोणत्याही मार्गाने त्याची प्रसिद्धी व्हावी, असा बाजारतज्ज्ञांचा प्रयत्न असतो. एक पुस्तक बहुधा एकदाच विकत घेतले जाते, एक चित्रपट एकदाच पाहिला जातो, त्यामुळे ग्राहकाला त्याबाबत फसवणुकीची भावना पुढे निर्माण झालीच, तरी तोवर पुरेशी विक्री होऊन अपेक्षित लाभ साध्य झालेला असतो. इथे रेप्युटेशनचा प्रश्न नसतो. पुस्तकाच्या बाबत दोष दिला गेलाच तर तो चरित्रनायकाला दिला जातो, प्रकाशक आपला फायदा घेऊन पुढच्या सेलेब्रिटीला आत्मचरित्र लिहिण्यास उद्युक्त करण्याच्या कामाला लागलेला असतो. चित्रपटाबाबत नेमके हेच नाते निर्माता/वितरक आणि मुख्य हीरो यांच्यात दिसून येते.

या प्रक्रियेत एकदा का सेलेब्रिटीची लोकप्रियता एन्कॅश करायची म्हटले की, विक्रीसाठी धडाकेबाज जाहिरात करणे अपरिहार्य ठरते, पण त्याहून महत्वाचे असते ते त्यावर वादंग निर्माण होणे! कलाकृती जितकी वादग्रस्त तितके ग्राहकांचे लक्ष त्याकडे सहज वेधले जाणार हे मार्केटिंगचे परिचित तंत्र असते. या तंत्राचा वापर करून माध्यमांनाही हात धुऊन घेता येत असल्याने तेही या प्रसिद्धीला हातभार लावतात. चरित्रनायकाच्या आयुष्यातील संघर्षबिंदू हे असे वादंग निर्माण करणारे हुकमी एक्के ठरतात. वादाची दुसरी बाजू जर दुय्यम, अप्रतिष्ठित असेल तर वादंग निर्माण करण्याची (हे विरोध-विकासाचे तत्त्व राजकारणात अधिक प्रभावी दिसते.) हमखास खात्री असते. नवाजुुद्दीनच्या पुस्तकातील गत आयुष्यातील स्त्रियांबाबत बदनामीकारक उल्लेख असलेले जे उतारे वृत्तपत्रांतून झळकले ते पाहता त्यातही वादंग माजवून पुस्तक ‘खपवण्या’चा हेतू अधिक स्पष्ट होता. पण तसे करताना चरित्रनायकाचा अप्रामाणिकपणा, असंवेदनशीलता आणि उद्दामपणाच प्रकर्षाने उघड झाला.

असं म्हटलं जातं की, बहुतेक आत्मचरित्रे ही स्व-समर्थनार्थ लिहिलेली असतात. फार क्वचितच लेखक दुसरी बाजू समजून घेण्याचा अथवा किमान तशी असू शकते, हे मान्य करण्याचा उदारपणा दाखवत असतो. ज्यांना हे जाणवते ते अनेकदा त्या संघर्षाची धार बोथट करून वादात न पडण्याची भूमिका घेतात. (आशा पारेख यांच्या आत्मचरित्रात ‘मी कुणावर टीका केली नाही’ असे त्यानी अभिमानाने सांगितले आहे.) पण यातून त्या कथनातला प्रामाणिकपणा कमी होतो.

आत्मचरित्र लिहिणाऱ्याचे आयुष्य प्रभावी आणि आदर्शवादी नसले तरीही त्याच्या त्याच्या परिघात समृद्ध असावे, प्रगल्भतेनं जगलेले असावे आणि त्या जगण्याचा तितक्याच प्रगल्भतेनं वेध घेतलेला असावा, अशी माफक अपेक्षा असते. राजकारणी, साहित्यिक, कलाकार सिने नट-नट्यांच्या अलीकडे प्रकाशित अनेक आत्मचरित्रांनी ती पूर्ण केलेली नाही.

‘खुल्लम खुल्ला’ नावाचे आत्मचरित्र लिहिताना ऋषी कपूरने तो ज्या चित्रपट कलेचा एक भाग आहे, त्या सतत विकसित होत गेलेल्या कलेचा स्वत:वर झालेला प्रभाव आणि परिणाम सोडून स्वत:मधल्या अहंगंड-न्यूनगंडांचेच तेवढे दर्शन घडवले आहे. तीच गोष्ट शत्रुघ्न सिन्हाच्या ‘एनिथिंग बट खामोश’या चरित्राबाबतीत, ‘बियाँड दी ड्रीम गर्ल’ या हेमा मालिनीच्या आणि करण जोहरच्या ‘अ‍ॅन अनसुटेबल बॉय’ या आत्मचरित्राबाबतही घडली आहे.

यातली बहुतांशी आत्मचरित्रं स्वत:भोवती फिरणारी आहेत. यात ज्या वातावरणात, ज्या काळात, ज्या राजकीय-सामाजिक आणि सांस्कृतिक स्थितीत संबंधित कलावंत घडला, त्या चित्रपटसृष्टीपलीकडच्या जगाचे दर्शन घडलेले नाहीे. कलाविषयक चिंतन सोडाच, पण स्वत:च्या आयुष्याबद्दलचेही आकलन पूर्णांशाने उमटलेले नाही. त्यामुळे ‘विकत घ्या, वाचा, विसरून जा’ असाच साधारण या चरित्र आणि आत्मचरित्रांचा बदलौकिक राहिला आहे. त्यात भरीस भर म्हणजे, नवाजुद्दिन सिद्दिकीच्या विचारहीन मांडणीने त्या बदलौकिकास अधिकच खालच्या पातळीवर आणले आहे. परिणामी, अनेक उठवळांचे आत्मरंग आत्मचरित्रे म्हणून वाचण्याचे दुर्भाग्य वाचकांच्या नशिबी वारंवार येते आहे.

-oOo-

(पूर्वप्रकाशित: 'दैनिक दिव्य मराठी - रसिक'. दिनांक १९ नोव्हेंबर २०१७)

टीप: दिव्य मराठी - रसिक' चे प्रशांत पवार आणि शेखर देशमुख यांनी या लेखामध्ये उपयुक्त माहितीची भर घातली आहे. त्यांचे आभार.


हे वाचले का?

मंगळवार, २५ जुलै, २०१७

एका धबधब्याचे विधिलिखित

स्थळः कुण्या एका घाटातील एक अनामिक पण नयनरम्य धबधबा
काळः ऐन पावसाळ्याचा

AWaterfall

प्रसंग १:
दिवसः आठवड्याअखेरचा
वेळः ऐन दुपारची

ऐन धुवांधार पावसात धबधब्याची मजा लुटण्यासाठी आलेले उत्साही पर्यटक. दोन चार मिनीबसेस, पाच सहा 'कॉर्पिओ' आणि आठ दहा मध्यमवर्गीय गाड्या घाटरस्ता अडेल, वाहनांना, वाहतुकीला अडथळा होईल याची फिकीर न करता उभ्या केलेल्या. एका स्कॉर्पिओवर थोरल्या आबासाहेबांचा फोटो/स्टिकर, मध्यमवर्गीय गाड्यांवर मागच्या काचेतून डोकावणार्‍या मांजरीचे, कुत्र्याचे किंवा वाघाचे चित्र... आणि हो गाडी पार्क करताना ऐकू येणारा 'सारे जहाँसे अच्छा' ही रिवर्स इन्डिकेटर ट्यून. आसपास चहा, वडापाव, मक्याची भाजलेली कणसे यापासून थेट 'टू मिनिट नूडल्स' तयार करून देणारी टपरीवजा दुकाने नि हातगाड्या.

एक रोमँटिक जोडी धबधब्याखाली फोटो काढण्यासाठी अधिकाधिक वर जाण्याचा प्रयत्न करते आहे. एक दोन सुज्ञ पर्यटक त्यांना तसे करु नये म्हणून सावध करतात. रोमँटिक जोडी आपल्याच धुंदीत. कॉर्पिओवर बसलेल्या नि गळ्यात सोन्याचे चेन असलेल्याने तेवढ्यात काही शेरा मारून शेजारच्या शेंगा खाणार्‍या दोस्ताला टाळी दिली नि ते दोघे फिदीफिदी हसतात. त्या हसण्याने सार्‍यांचे लक्ष तिकडे जाते इतक्यात रोमँटिक जोडीपैकी स्त्रीची किंकाळी ऐकू येते. तिचा जोडीदार पाय घसरून पडलेला आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहात चाललेला. पर्यटकांपैकी एक दोघे भानावर येऊन काही करेतो प्रवाहाबरोबर कड्यावरून अदृश्य होतो.

अपघाताचा दुसरा दिवस :
घाटावरचे (किंवा खालचे) वृत्तपत्र ठळक हेडलाईन देते: शासनाचे दुर्लक्ष, पोलिसांचा हलगर्जीपणा. बातमीमधे अपघाताचे वेळी उपस्थित पर्यटकांपैकी दोन मध्यमवर्गीय गाड्या 'संभाव्य अपघाताच्या ठिकाणी पोलिस असायला हवेत' अशी जबानी देतात. त्या तथाकथित वृत्तपत्राच्या तथाकथित पत्रकाराने ती वदवूनच घेतलेली असते. चॅनेल्सचे तथाकथित पत्रकार नळकांडी घेऊन धावतात. त्यांची चॅनेल्स तासभर तीच तीच दृश्ये दाखवून पोलिसांच्या हलगर्जीपणाबाबत आगपाखड करत राहते.

प्रसंग २:
स्थळः तेच
दिवसः पहिल्या प्रसंगानंतर दोन चार दिवसांनंतरचा
वेळः कुठलीही का असेना, जोरदार पावसाची इतके सांगितले की पुरे

गाड्यांची नेमकी संख्या तीच नसली तरी साधारण तीच परिस्थिती. पण आता तिथे एक हवालदार उपस्थित आहे. वरुन दट्ट्या आल्याने जवळच्या पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांपैकी एकाची ड्यूटी इथे लावण्यात आली आहे. तो पर्यटकांना अधूनमधून धबधब्यात फार वर जाऊ नये म्हणून दटावतो आहे. मध्यमवर्गीय गाड्या दबक्या आवाजात त्यांची नाराजी व्यक्त करतात नि त्याची नजर चुकवून धबधब्यात धोकादायक दरडीवर चढून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. तास दोन तास अशा रीतीने लोकांना त्यांच्याच हितासाठी ओरडून सांगत असलेला हवालदार थकतो. घोटभर चहा घशाखाली उतरवावा यासाठी एका टपरीवर जातो. इतक्यात एक मध्यमवर्गीय गाडी चटकन त्याचा फोटो काढते नि 'जिथे डोळ्यात तेल घालून ड्यूटी करावी तिथे कायद्याचे रक्षक कसे कामचुकार पणा करतात ते पहा.' असे शीर्षक टाकून फेसबुकवर अपलोड करते. पाच दहा मिनिटात त्याला शंभरेक लाइक्स आणि पोलिसांवर शिव्यांचा भडिमार करणार्‍या पंचवीसेक कॉमेंट्स पडतात.

थोड्या वेळाने हवालदार पुन्हा आपल्या कामावर परततो. इतक्यात दोन स्कॉर्पिओ नि एक बोलेरो येऊन तिथे आदळते. त्यातून आठ दहा सोन्याच्या चेन्स आणि काळे-हिरवे गॉगल्स उतरतात. पावसाबरोबर अन्य कशाची तरी धुंदी त्यांच्या तनमनावर चढली आहे. आसपासच्या माणसांची फिकीर न करता कमरेचे अंतर्वस्त्र वगळता बाकीचे कपडे उतरवून त्यातील एक दोघे धबधब्यात शिरतात, त्यांच्या मित्रांनी फोटो काढावेत म्हणून एखाद्या स्ट्रगलिंग मॉडेलला लाजवतील अशा पोज देऊ लागतात. धबधब्यात फोटो काढणे हे भलतेच मोठे अ‍ॅडवेंचर आहे असा आविर्भात त्यांच्या चेहर्‍यावर दिसतो. फोटो काढणारे मित्रही 'भाऊ तिकडे त्या दगडावर, भाऊ अजून वर, भाऊ धारांच्या आत उभे राहून फक्त सोन्याचे ब्रेसलेट असलेला हात आशीर्वाद देण्याच्या पोजमधे बाहेर काढा' वगैरे तज्ज्ञ फोटोग्राफरच्या आविर्भावात सूचना देत आहेत.

हा सारा प्रकार पाहून धोक्याची जाणीव झालेला हवालदार धावत येतो. भाऊंना ओरडून खाली येण्यास सांगतो. भाऊंवर ओरडल्याने त्यांचा अपमान झाल्याने त्यांचे फोटोग्राफर मित्र हवालदारावर गुरकावतात, 'भाऊंना ओळखत नाहीस का तू?' म्हणून सराईतपणे नेहेमीच्या धमक्या देतात. हवालदार काकुळतीला येऊन सांगतो, 'अहो तो खडक फार निसरडा आहे, चार दिवसांपूर्वी एक पोरगं मेलंय.' फोटोग्राफर्स हवालदाराची टर उडवतात, 'आमचे भाऊ काय येडे खुळे आहेत का, असे सहजासहजी वाहून जायला' म्हणतात. या सार्‍या गोंधळात खडकावरून घसरून थेट डोक्यावर पडलेले भाऊ रक्ताची धार धबधब्याच्या पाण्यात मिसळत राहतात.

अपघाताचा दुसरा दिवस :
तथाकथित वृत्तपत्र हवालदाराच्या हलगर्जीपणाचे वृत्तपत्र ठळपणे छापते. सोबत मध्यमवर्गीय गाडीने काढलेला फोटो असतो. भाऊ घाटावरच्या हॉस्पिटलमधे मृत्यूची गाठ घेण्याच्या स्थितीत. भाऊंच्या डोक्यावर वरदहस्त असलेल्या कुण्या अण्णांनी किंवा साहेबांनी चाव्या फिरवून पोलिस कमिशनरला दमात घेतलेला. तो हवालदाराला निलंबित करतो, एका ऐवजी दोन हवालदार धबधब्यावर नेमून देतो नि हात झटकतो. आधीच जेमतेम एक एक हवालदार सोबत घेऊन काम करणारे त्यांच्या चौक्यांमधले सब-इन्स्पेक्टर्स ऐन वारीच्या काळात बंदोबस्ताची जबाबदारी असताना हा प्रकार केल्याबद्दल साहेबाला मनातल्या मनात खच्चून शिव्या घालतात.

प्रसंग ३:
स्थळः तेच
दिवसः दुसर्‍या प्रसंगानंतर पंधरा दिवसानंतरचा
वेळः ऐन पर्यटकांची गर्दी होण्याची

दरम्यानच्या काळात पावसाने उघडीप दिल्याने धबधब्याच्या आसपास नेत्रदिपक हिरवाई दिसून येते आहे. पण त्याच बरोबर सार्‍या खडकांवर भरपूर शेवाळेही साचले आहे. छोट्या गाड्या, मोठ्या गाड्या येताहेत. पर्यटक धबधबा नि भुरुभुरू पावसाबरोबरच हिरवाईचा आनंद लुटताहेत. दुपार होईतो आभाळ गच्च भरून आले आहे. पाहतापाहता धुवांधार पावसाला सुरुवात होते. अशा पावसात पर्यटकांनी शेवाळ्याने निसरड्या झालेल्या खडकांवर, धबधब्यात जाऊ नये म्हणून दोनही हवालदार पर्यटकांना तिथून जाण्यास सांगताहेत. दोन अपघातांच्या अनुभवाने त्यांनी धबधब्याजवळ थांबण्यास मनाई करणारा हा तात्पुरता उपाय योजला आहे. पर्यटक चरफडत गाड्या काढून पुढे जाताहेत. इतक्यात तिथे तात्पुरता व्यवसाय करणारे लोक येऊन हवालदारांशी हुज्जत घालू लागतात. पर्यटकांना थांबू न दिल्याने आमचा धंदा बुडतो आहे, अशी तक्रार करू लागतात. पण 'पुन्हा अपघात झाला तर तुमची खैर नाही' अशी तंबी साहेबाकडून मिळालेले हवालदार धोका न पत्करता, त्यांच्या निषेधाला न जुमानता, पर्यटकांना हाकलून लावत आहेत. अजिबात उसंत न घेता चार पाच तास सार्‍या घाटाला झोडपून पाऊस थोडी विश्रांती घेईतो संध्याकाळ होते.

बिन-अपघाताच्या दिवसांनतरचा दुसरा दिवस :
तथाकथित वृत्तपत्र हवालदारांच्या मुजोरीने अनेक गरीब, हातावरचे पोट असलेल्यांचा रोजगार बुडतो आहे, गेले काही दिवस हवालदारांची ही अरेरावी चालू आहे अशी बातमी ठळकपणे छापते. एक दोन गल्ली सेना, ब्रिगेड, संघटना यांचे प्रतिनिधी घाटाखाली पाच पंचवीस लोकांना घेऊन निदर्शने करतात, नि त्याचे फोटो तथाकथित वृत्तपत्रांत आणि फेसबुकवर छापून आणतात. काही मध्यमवर्गीय गाड्या आणि काही स्कॉर्पिओ-बोलेरो घरबसल्या ती बातमी नि फोटो दणादण शेअर करतात. पार्ट्या पाडून दोन बाजूंनी जोरदार वादविवाद करतात. उरलेला वाद संध्याकाळच्या बैठकीत रंगवतात. पुन्हा एकवार चक्रे फिरून असे काही न करण्याची तंबी हवालदारांना मिळते.

प्रसंग ४:
स्थळः तेच
दिवसः तिसर्‍या प्रसंगानंतर आठ दिवस उलटल्यानंतरचा
वेळः अवेळ

एकाहुन अधिक मध्यमवर्गीय गाड्या, काही स्कॉर्पिओ-बोलेरो, काही बुलेट आणि थोड्याफार हाय-एन्ड बाईक्स. धबधबा किडामुंगीसारख्या संख्येने आलेल्या माणसांनी वेढलेला. दोन हवालदार नावापुरते पहारा देणारे. अधूनमधून उपचार म्हणून एक दोघांना धबधब्याच्या फार जवळ वा फार वर चढून जाऊ नये म्हणून सूचना देणारे. डीजे न लावताही तितक्या डेसिबलचा आवाज निर्माण करत 'सेल्फी विथ धबधबा' कार्यक्रम जोरात चालू. इतक्यात दोन सेल्फीकुमारांमधे भर खडकावर काहीतरी बाचाबाची होते. एकमेकांच्या 'कुटुंबियांची विचारपूस करणे' पुरेसे न वाटून, परस्परांच्या शरीराच्या कणखरपणाची परीक्षा घेणे सुरू होते. पाहता पाहता दोन गटात 'काया-वाचा-मने' वादविवाद सुरू होतो. हवालदार प्रथम दुर्लक्ष करतात. इतक्यात एक सेल्फीकुमार घसरून पाण्यात पडतो नि त्याला मार लागतो. ते पाहून त्याचे सेल्फीमित्र धावतात. परिस्थिती नियंत्रणात आणणे गरजेचे आहे हे पाहून हवालदार प्रथम दोन शेलक्या शिव्या हासडून धावतात. सेल्फीकुमारांच्या दोन गटांना दूर करू पाहतात. इतक्यात एक बेभान सेल्फीकुमार झटापटीत नकळत एका हवालदाराला ढकलून देतो. दगडावर आदळून वेदनेने कळवळून उठलेला हवालदार नि त्याचा जोडीदार चवताळतात नि दोघे मिळून हातातील काठीने सेल्फीकुमारांचा समाचार घेतात. एकमेकांशी भांडणारे दोन्ही गट इतस्ततः धावण्याच्या प्रयत्नात धडपडतात, आदळतात, जखमी होतात. पैकी एक जण वाहून जाऊ लागतो. पण भानावर आलेला एक हवालदार आपले सुटले पोट सांभाळूनही त्याला आपली काठी देऊन वाचवतो.

लाठीमाराच्या घटनेनंतरचा दुसरा दिवस :
तथाकथित वृत्तपत्राने लाठीमाराची बातमी हेडलाईन केली आहे. ज्याचा जीव हवालदाराने वाचवला त्याच्यासकट सार्‍यांनी पोलिसांच्या क्रौर्याच्या कहाण्या रसभरीत वर्णन करून सांगितल्या आहेत. दोनही भांडणार्‍या गटांनी आपल्या जखमा या पोलिस लाठीमारातच झाल्याचा दावा केला आहे. पुन्हा एकदा गल्लीतल्या सेना, ब्रिगेड नि संघटना आंदोलने उरकून घेतात, दादा-भाऊ-अण्णा वरुन दबाव आणतात. दोन्ही हवालदार सस्पेन्ड होतात. आणखी एक चौकशी समिती नेमून पोलिस कमिशनर पावसाळी सुटीसाठी निघून जातात.

प्रसंग ५/६/७...:
स्थळः तेच
दिवसः लाठीमारानंतरचा कुठलाही
वेळः कुठलीही

मध्यमवर्गीय गाड्या, स्कॉर्पिओ, बोलेरो, मिनी बसेस भरून सेल्फीकुमार नि कुमारी, स्त्री नि पुरुष तसंच भाऊ, दादा अण्णा अजूनही धबधब्यात वर्षाविहारासाठी येतात. त्यातले काही अपघातात सापडतात, एक-दोघांचा मृत्यूही झाला.

पण तथाकथित वृत्तपत्राचा आणि सेना, ब्रिगेड, संघटना यांचा घाटातल्या धबधब्यातला इन्ट्रेस्ट आता संपला आहे. मध्यवर्ती सरकारने घेतलेल्या कुठल्याशा महत्त्वाच्या, दूरगामी, कदाचित आत्मघाती निर्णयावर देशभर चालू झालेल्या चर्चा, निदर्शने, निषेध, आंदोलने इ. मधे आता त्यांनी उडी घेतली आहे. तीन हवालदार अजूनही निलंबित आहेत, चौकशीचा फेरा अजून थांबलेला नाही. पावसाळा संपल्यामुळे आता धबधब्याची तब्येतही खालावली आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघही आता थांबला आहे. त्यांच्या पाठोपाठच तिथे तात्पुरती खाद्यपदार्थांची दुकाने लावणार्‍या लोकांनीही आपला बाडबिस्तरा गुंडाळला आहे. अखेरचा उपाय म्हणून लावलेला 'धबधब्याच्या फार जवळ जाऊ नये, निसरड्या खडकांमुळे अपघात होतात नि मृत्यू संभवतो.' अशी सूचना देणारा बोर्ड एकाकी धबधब्याला सोबत करत उभा आहे.

हे सारे केवळ साक्षीभावाने पाहावे लागण्याचे धबधब्याचे विधिलिखित याही वर्षी चुकलेले नाही.

-oOo-

(कथा, प्रसंग पात्रे काल्पनिक असली तरी तिचा वास्तवाशी अगदी घट्ट संबंध आहे!)


हे वाचले का?

गुरुवार, १३ जुलै, २०१७

अरे सेन्सॉर सेन्सॉर...

Censored
(बहिणाईची क्षमा मागून...)

अरे सेन्सॉर सेन्सॉर, जसा उभा दारावर,
आधी करावा सलाम, तेव्हा मियते मोटर ।

अरे सेन्सॉर सेन्सॉर, म्होटा कधी म्हनू नही
अरे उदाच्या काडीला, सोटा कधी म्हनू नही ।

अरे सेन्सॉर सेन्सॉर, नाही सोचनं बिचनं
येड्या पायातली व्हान, म्हनू नको रे तोरन ।

अरे सेन्सॉर सेन्सॉर, जसा कारल्याचा येल
एक खुळं म्हनं गोड, बाकी सार्‍याले अकाल ।

अरे सेन्सॉर सेन्सॉर, म्हनू नको रे बहावा,
त्याले नही पान फूल, वाजि होयबाचा पावा ।

देखा सेन्सॉर सेन्सॉर, शेंग वरतून काटे,
अरे वरतून काटे, मधी मठ्ठ सागर गोटे ।

ऐका सेन्सॉर सेन्सॉर, निर्‍हा पदाचा इचार,
देते खोट्याले होकार, अन् खर्‍याले नकार ।

देखा सेन्सॉर सेन्सॉर, म्हनं फिल्लम सुधार
आधी अक्कल उधार, त्यात पदाचा तेगार ।

अरे सेन्सॉर सेन्सॉर, वरी मोठा जादुगर
याच्या पदाचा मालक; त्याच्यापुढी हे लाचार ।

असा सेन्सॉर सेन्सॉर, आधी 'देवा'चा इचार
मर्जी माझी तू सांभाळ, तुवा मिळंल मोकार।

- बहिराभाई पायधरी

- oOo -
(दै. सकाळ - सप्तरंग पुरवणी दि. २० ऑगस्ट २०१७)

हे वाचले का?

सोमवार, २९ मे, २०१७

गीता कपूर, 'हल्लीची पिढी...' वगैरे

आज गीता कपूर यांच्या मुलाने त्यांना हॉस्पिटलमधे सोडून नाहीसे होण्याबद्दल एका चॅनेलने - नेहमीप्रमाणे सनसनाटी - बातमी केली आहे.

DemonKid

त्यावर लगेच नेहेमीप्रमाणे 'हल्लीची पिढी...' या शब्दाने सुरू होणारी रडगाणी ऐकायला मिळू लागली आहेत. एकतर आपली मानसिकताच 'एकाची चूक ही त्याच्या गटाची चूक किंवा खरंतर त्याची एकुण प्रवृत्तीच' अशी कोटीच्या कोटी उड्डाणे गाठण्याची आहे. 'अमुक एक असा आहे म्हणजे त्याची अख्खी जात अशीच आहे म्हणून तो असा आहे' किंवा 'तो असा आहे म्हणजे त्याची अख्खी जात अशी आहे' हे अर्थनिर्णयन सर्रास वापरले जाणारे (जात काढून धर्म, शहर/गांव, देश, भाषा, रोजगार-क्षेत्र, एकाच गावातील उपनगरे/वस्ती हे टाकले तरी हे विधान तितकेच खरे ठरते.) त्यातलाच हा एक नमुना. आईबाप नेहेमी बिच्चारे वगैरे असतात, मुलं वैट्टं वैट्टं असतात.

गंमत म्हणजे हे असले लिहिले की 'आईबापांना सांभाळणे ही आपली संस्कृती आहे(१), 'त्यांच्या'(२)सारखे नाही हो आम्ही" च्या बाता मारणारे धावून येतात. यातील बरीचशी मंडळी लग्न होताच 'मग आम्हाला प्रायवसी नको का?' असं म्हणत आईबापांवेगळे राहतात, वास्तवातील वा फेसबुकच्या पारावर नि बारमधे भरपूर टाईमपास करुनही 'आईवडिलांसाठी वेळच मिळत नाही हो' म्हणून फेसबुकवर मातृदिन पितृदिन 'साजरे' करतात. वर केवळ दुसर्‍यावर आगपाखड करत संस्कृतीचे ठेकेदार म्हणून मिरवतात.

अशी फीचर्स करणार्‍या चॅनेल्सना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. की एखाद्या दारुड्या बापाच्या किंवा सोन्याचांदीच्या, साड्यांच्या अतिरेकी आहारी गेलेल्या आत्ममग्न आईच्या, एका जिद्दीने आपल्या पायावर उभे राहिलेल्या मुलीचे/मुलाचे असे फीचर केले होते का हो? नाही म्हणजे जिद्दीने उभे राहिलेल्यांवर फीचर होते, पण त्यात 'बाप दारुच्या व्यसनात बुडालेला असून, निर्व्यसनी राहून स्वकष्टावर यश मिळवलेली/ला' अशी हेडलाईन पाहिली आहे का कधी?

केवळ आपले तथाकथित पौरुष सिद्ध करण्यासाठी पोर जन्माला घालून आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकून न पाहणारे आईबाप - बाप अधिक - माझा आसपास असंख्य दिसतात. त्यांची स्वकष्टाने, चुकतमाकत, धडपडत, पुन्हा उठून उभे राहात बराच पल्ला गाठलेली अनेक मुले माझ्या पाहण्यात आहेत. त्यांच्या यशाच्या संदर्भात 'आईबापांच्या पाठिंब्याशिवाय' हा शब्दप्रयोग आवर्जून वापरतो का हो आपण? मग हे सतत आईबापांना बिच्चारे नि मुलांना विलन बनवणारे भिकार फीचर्स का करतो आपण? किती काळ असल्या पूर्वग्रहांच्या आधारे जगणार आहोत आपण? जात, धर्म, गाव, भाषा यांच्याबाबत होते तसे हे एकांगी विक्टिमायजेशन का बरं?

मुळात पेन्शनर नावाची प्रिव्हिलेज्ड जमात वगळता जगातील प्रत्येकालाच आपल्या कार्यक्षम काळात वृद्धावस्थेसाठी तरतूद करून ठेवायची असते. म्हातारपणी मुले सांभाळतील हे गृहित धरणे म्हणजे मुलांना पोस्ट-डेटेड चेक समजण्यासारखे आहे.

आज गीता कपूर यांच्याबद्दल ही बातमी आहे. काही काळापूर्वी उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या म्हातारपणच्या विपन्नावस्थेबाबत बातमी होती नि त्यांना मदत करावी म्हणून काही कलाकार नि रसिक मंडळी प्रयत्न करत होती. त्यांच्या खाँसाहेबांबद्दलच्या प्रेमाबद्दल किंवा खुद्द खाँसाहेबांच्या सनईवादनातील गुणवत्तेबद्दल शंका नाहीच, पण 'शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील कदाचित सर्वाधिक बिदागी घेणारा कलाकार' अशी ख्याती असलेल्या खाँसाहेबांवर ही वेळ आली यात त्यांचा मोठा दोष नव्हे का?' असा प्रश्न अन्य एका दिग्गज कलाकाराने विचारला होता आणि मला तो पूर्ण पटलेला होता.

इतका पैसा मिळवला त्याचे नियोजन नको? (दणादण इन्शुरन्स पॉलिसीज घेणारे नाहीतर प्लॅट घेणारे कदाचित सर्वोत्तम गुंतवणूक करत नसतील, पण ती करावी लागते हे त्यांना उमगलेले असते इतपत श्रेय त्यांना द्यायलाच हवे.) त्या दिग्गज गायकांना 'माजले आहेत', 'एका कलाकाराने दुसर्‍याबद्दल असे बोलावे का?' वगैरे शेरेबाजी झाली पण त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या फंदात कुणी पडले नाही, आपण कधीच त्या फंदात पडत नाही. सोपा उपाय म्हणून प्रश्न विचारणार्‍यावर शेरेबाजी, त्याची लायकी काढणे, तिसर्‍याच कुणाला मध्ये आणून 'यापेक्षा तर बरे ना' असा फाटा फोडणे आदी मार्गांनी आपण आपल्यापुरता प्रश्न नाहीसा करुन टाकतो.

गीता कपूर यांनी शंभरेक चित्रपटांतून काम केले. भूमिका हीरोईनच्या नसतील. तेव्हा खूप नाही पण एखाद्या मजुरापेक्षा, दुकानात काम करणार्‍या/रीपेक्षा, रस्त्यावर झाडू मारणार्‍या/रीपेक्षा नक्कीच चांगले पैसे मिळवले असतील. मग त्यांनी वृद्धावस्थेसाठी आर्थिक नियोजन केले नव्हते का? (करूनही ते फसणे सहज शक्य आहे, पण तो मुद्दा वेगळा आहे.) की मुलाने सगळे पाहावे असा परावलंबी विचार होता? तसे असेल तर 'माझ्या मते' ही चूक मानायला हवी. आपली मिळकत मुलाच्या नावे करून त्याने म्हातारपणची आर्थिक बाजू सांभाळावी ही विचारसरणीच- निदान सुस्थिर आयुष्य जगलेल्यांच्या संदर्भात चूक म्हणायला हवी.

अशा तर्‍हेची फीचर्स पाहिली की माझ्या डोक्यात हटकून विचार येतो तो एखाद्या 'कामातून गेलेल्या' मजुराचा त्याला मी वृद्ध म्हणत नाही. कारण वृद्धावस्थेच्या सरकारी अथवा रूढ कल्पना त्यांच्या संदर्भात लागूच पडत नाहीत असे मला वाटते. त्याला खायला घालणे परवडणार नाही म्हणून मुलगा त्याला अचानक सोडून गेल्यामुळे(३) निराधार अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या मजुरावर कधी चॅनेल्सनी फीचर्स केले आहेत? त्या निमित्ताने (आज कोणता राजकारणी काय बरळला यावरच्या सनसनाटी चर्चा सोडून) सर्वांना निवारा नि अन्न याबाबत काही करता येणे शक्य आहे का याबाबत चर्चा घडवून काही हाती लागते का याचा निदान प्रयत्न केला आहे?

मुळातच समाजाच्या वरच्या, निदान मधल्या प्रवर्गात मोडतात, स्वतःच्या दुरवस्थेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जबाबदार असतात, त्यांची दु:खे मांडून सहानुभूती नि मदत द्या वगैरे आवाहने करून समाजातल्या या आहे रे वर्गाच्या समस्या सोडवण्यातच हातभार का लावतात?

- oOo -

(१). असे मी मानत नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे माझे मत, एकुणच संस्कृतीच्या नावाखाली होणारे भंपक सरसकटीकरण अथवा एकसाचीकरण धोकादायक असे मी मानतो.

(२). कुण्या 'त्यांची' रेघ लहान केल्याशिवाय आपली रेघ मोठी करताच येत नाही हे दुर्दैव.

(३). वृद्धाश्रमात फक्त श्रीमंतांचे आईबाप असतात, गरीबांचे नाहीत' असा दावा करत गरीब कित्ती गुणी वगैरे दावे करणारे वृद्धाश्रमाच्या अर्थकारणाबाबत पूर्ण अनभिज्ञ असतात इतकेच बोलून थांबतो.

---

संबंधित लेखन: बालक-पालक


हे वाचले का?

बुधवार, ४ जानेवारी, २०१७

आपण निषेध विशिष्ट घटनेचा करतो की प्रवृत्तीचा...?

(हरिश्चंद्र थोरात यांनी << हे भलतंच काय झालंय आपलं? >> असा प्रश्न उपस्थित केला त्याच्या अनुषंगाने मांडलेला हा विचार, एकाच वेळी सर्व बाजूंचा मार खाण्याबद्दल ख्याती असणार्‍या रमतारामांचा.)

...हे आपल्यापुरतं प्रत्येकाने तपासून पहायला हवं.

ज्यांचा 'माझ्या गटाच्या हितासाठी केलेला कायदेभंग समर्थनीय आहे पण 'त्यांच्या' गटाच्या हितासाठी केलेला कायदेभंग मात्र समर्थनीय नाही' असे उघड विषमतावादी, वर्चस्ववादी मत आहे, त्यांचा मुद्दा मी सोडून देतो. निदान ते आपल्या एकांगी भूमिकेशी प्रामाणिक तरी आहेत. पण जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरेचा उद्घोष करतात, आपली न्यायबुद्धी जिवंत असल्याचा किंवा आपण समतोल विचाराचे असल्याचा दावा करतात त्यांच्यासाठी हा वरचा प्रश्न आहे.

प्रश्न अगदी वाजवी आहे. 'आपण' बदललो, आपण वाहवत जाणारे मुद्दे बदलले म्हणूनच संघटन उभे करणार्‍यांनी ते मुद्दे उचलले. ढेकर येईतो पोट भरलेले शहरातील व्यक्तिवादी, उच्चशिक्षित, उच्चवर्णीयदेखील ज्या प्रकार फुटकळ अस्मितेच्या लढाया हिरिरीने लढवत असतात ते पाहता मुळातच एका समाजगटाला धरून राहणे ही बर्‍याच प्रमाणात अपरिहार्यता असलेला सर्वसामान्य व्यक्ती याबाबत किती पायर्‍या खाली उतरली असेल याची कल्पना करता येईल.

दीर्घकालीन विधायक कार्याचा कार्यकारणभाव उलगडून दाखवणे, पटवणे फारच अवघड असते. त्यामुळे त्यापेक्षा एका बाजूला कुण्या स्वयंघोषित त्रात्याने 'याचे परिणाम आता दिसणार नाहीत, दीर्घकालीन उपाय आहे हा.' ही कोणत्याही कार्यकारणभावाशिवाय मारलेली थाप एकीकडे चालवून घेत असतानाच ताबडतोब रिजल्ट देणार्‍या मोडतोडीच्या घटना - एक प्रकारे सूडाच्या - लोकांना अधिक आकर्षक नि 'एकदाचं काहीतरी केलं ब्वा' म्हणून समाधान देतात.

आज* पुतळा फोडला, फेकून दिला, म्हणून राग राग करणार्‍या किती जणांना बाबरी मशीद पाडल्याबद्दल आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या, किंवा ते कृत्य आजही अभिमानाचे वाटते याचा शोध घेतला, तर त्यांचा दांभिकपणा उघड होईल.

IamAlwaysRight
https://joshuaingle.com/2020/08/my-group-is-always-right/ येथून साभार. येथील संवादही या लेखनाला पूरक असाच आहे.

मला न पटणारी गोष्ट कायदा हातात घेऊन नष्ट करणे (वर्ष-दीड वर्षांपूर्वी हत्या झालेला अख्लाखही आठवायला हरकत नाही.) मलाच बरोबर समजते, इथे न्याय होत नाही म्हणून मी कायदा हातात घेणार हे जोवर आपण स्वतःसाठी, स्वतःच्या गटासाठी समर्थनीय मानतो, तेव्हाच ते दुसर्‍यासाठी, त्याच्या गटासाठी समर्थनीय होऊन जाते. कारण त्याच्या सोयीच्या प्रसंगी 'इथे न्याय होत नाही म्हणून कायदा हातात घेणे समर्थनीय आहे' असा त्याचाही दावा असतो. आणि जर कायद्यासमोर, घटनेसमोर सारे समान असतील तर दोन्ही गटांचे कायदा मोडण्याचे समान समर्थन वा निषेध करावा लागेल. जर एकावेळी समर्थन नि दुसर्‍यावेळी निषेध अशी भूमिका घेणार असू तर आपण दुटप्पी असतो हे समजून जावे... इतकेच.

अर्थात हे कायद्यासमोर, घटनेसमोर सारे समान मानणार्‍यांसाठी, काही गटांना आपले हक्क अधिक असायला हवेत असे वाटते त्यांचा मुद्दा सोडून द्या. ते सरळच विषमतावादी म्हणता येतील.

ज्या देशात बहुसंख्येचे मूलभूत प्रश्न अजून गंभीर आहेत, तिथे अस्मितेच्या प्रश्नावर माणसे दिवसचे दिवस वाया घालवतात, सत्ताधारी नि विरोधक मूलभूत प्रश्नांपेक्षा याबद्दल अधिक आरोप-प्रत्यारोपात रमतात. आज निवडणुकीची चाहूल लागताच वेगवेगळे पक्ष प्रश्न घेऊन आंदोलन करण्याऐवजी 'होम मिनिस्टर', अनेक बक्षीसे जिंकायची संधी देणारी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम या नावाखाली करमणुकीचे कार्यक्रम, ज्येष्ठांना देवदर्शनाची सहल असे कार्यक्रम आयोजित करतात.

आश्वासनांमधे स्थानिक पातळीवर फ्री वाय-फाय तर राष्ट्राच्या पातळीवर बुलेट ट्रेन, स्मार्ट सिटी वगैरे चमकदार वाटणारी पण थोडे खोलात गेले तरी सर्वस्वी निरुपयोगी आहेत हे अर्धशिक्षितालाही सहज समजू शकेल अशा पातळीवरची आश्वासने दिली जातात.

त्याचे कारण आपल्या नेत्यांनी आपल्याला अगदी योग्य जोखले आहे. नेते अध:पतित नाहीत, आपण अध:पतित आहोत, थिल्लर पातळीवरचे जिणे जगतो आहोत. आपण घसरलो आहोत म्हणून नेते घसरले आहेत. पण राजकारणात सत्ताधार्‍यांसह विरोधकांना, समाजकारणात दलितांपासून ब्राह्मणांना, या गावापासून त्या गावापर्यंत सार्‍यांना दोषाचे धनी 'ते' आहेत अशी बोटे मोडून मोकळे व्हायची इतकी सवय झाली आहे, की समस्या समोर आली की उपायांऐवजी कोणाकडे बोट दाखवता येईल याचा विचार आधी होतो आहे. ही आपला देश 'महान' होण्याची चाहूल आहेच... फक्त महानतेची व्याख्या थोडी बदलून घ्यायला हवी आहे.

- oOo -

* संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडने हटवला.

---

(ते तत्त्वज्ञान घाला खड्ड्यात, अमुक बाबतीत तुमचे मत काय ते सांगा हो ... हा याकूबच्या फाशीच्या वेळेसह वेळोवेळी विचारला गेलेला प्रश्न. त्या प्रश्नातच वेगवेगळ्या वेळी, वेगळ्या गटांच्या वा व्यक्तींच्या संदर्भात परस्परविरोधी सोयीच्या भूमिका घेण्याची प्रवृत्ती स्पष्ट दिसून येते हे सांगणे न लगे. त्यांच्यासाठी हा ताजा कलम.)

माझ्या दृष्टीने पुतळे, स्मारके ही अस्मितेच्या दृष्टीने वा विद्रोहाच्या दृष्टीने सारखीच कुचकामी आहेत. कोण्या श्रेष्ठीचा पुतळा उभारल्याने माणसे त्याच्यापासून काही डोंबलाची प्रेरणा वगैरे घेत नसतात. त्याच्या भोवती दृश्य/अदृश्य देऊळ तेवढे उभारले जाते आणि त्याच्या भोवती उत्सवांचे कर्मकांड आणि त्याच्या जिवावर फुकाची गुरगुर करणार्‍या कार्यकर्ते म्हणवणार्‍यांचे कोंडाळे तेवढे उभे राहाते.

तसंच एखादा पुतळा नष्ट केल्याने त्याचे असलेले महत्त्व नष्ट होते असेही मला वाटत नाही. ही सारी फुटकळ प्रतीकांची लढाई माझ्या दृष्टीने वांझ आहे, प्रसिद्धीलोलुपांची आहे. आणि याबाबतीत मी या समाजातील प्रातिनिधिक व्यक्ती अजिबातच नाही याची मला चांगलीच जाणीव आहे.

---

संबंधित लेखन: नक्षलवादी उजवे आणि सनातनी डावे


हे वाचले का?