रविवार, २१ मार्च, २०२१

बालक - पालक

मागील आठवड्यात तीन दशकांपूर्वी बॉलिवूडमध्ये कारकीर्दीच्या शिखरावर असलेल्या स्मृती विश्वास यांच्या वृद्धापकाळातील दारूण स्थितीबाबत बातमी वाचली. काही काळापूर्वी अशाच स्वरुपाची बातमी गीता कपूर या तुलनेने दुय्यम अभिनेत्रीबाबत वाचण्यास मिळाली होती. कारकीर्दीच्या भरात असताना मिळवलेला पैसा हा पुढची पिढी, नातेवाईक किंवा स्नेह्यांमुळे बळकावल्यामुळे वृद्धापकाळात आर्थिक विपन्नतेचा सामना करावा लागल्याची ही उदाहरणे.

गीता कपूर यांच्या मुलाने त्यांना हॉस्पिटलमधे सोडून नाहीसे होण्याबद्दल एका चॅनेलने - नेहमीप्रमाणे सनसनाटी - बातमी केली होती. त्यावर लगेच नेहेमीप्रमाणे 'हल्लीची पिढी...' या शब्दाने सुरू होणारी रडगाणी ऐकायला मिळाली. आपली मानसिकताच 'एकाची चूक ही त्याच्या गटाची चूक किंवा खरंतर त्याची एकुण प्रवृत्तीच' अशी कोटीच्या कोटी उड्डाणे गाठण्याची आहे. 'अमुक एक असा आहे म्हणजे त्याची अख्खी जात अशीच आहे म्हणून तो असा आहे किंवा तो असा आहे म्हणजे त्याची अख्खी जात अशी आहे' हे अर्थनिर्णयन सर्रास वापरले जाणारे (जात काढून धर्म, शहर/गांव, देश, भाषा, एकाच गावातील उपनगरे/वस्ती हे टाकले तरी हे विधान तितकेच खरे ठरते.) त्यातलाच हा एक नमुना. 

आईबाप नेहेमी बिचारे वगैरे असतात, मुलं वैट्टं वैट्टं असतात. गंमत म्हणजे हे असले लिहिले की 'आईबापांना सांभाळणे ही आपली संस्कृती आहे, 'त्यांच्या'सारखे नाही हो आम्ही’च्या बाता मारणारे, लग्न होताच 'मग आम्हाला प्रायव्हसी नको का?' असं म्हणत आईबापांवेगळे राहणारे, सोशल मीडियाच्या पारावर नि बारमधे भरपूर टाईमपास करुनही 'आईवडिलांसाठी वेळच मिळत नाही हो' म्हणून फेसबुकवर मातृ-पितृदिन 'साजरे' करणारे बरेच जण धावून येतात. यात संस्कृतीचे ठेकेदार म्हणून मिरवणारे अधिक दिसतात हे ओघाने आलेच.

अशी फीचर्स करणार्‍या चॅनेल्सना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की, ’एखाद्या दारुड्या बापाच्या किंवा सोन्याचांदीच्या, साड्यांच्या अतिरेकी आहारी गेलेल्या आत्ममग्न आईच्या, एका जिद्दीने आपल्या पायावर उभे राहिलेल्या मुलीचे/मुलाचे असे फीचर केले होते का हो?’ नाही म्हणजे जिद्दीने उभे राहिलेल्यांवर फीचर होते हे खरे. पण त्यात 'बाप दारुच्या व्यसनात बुडालेला असून निर्व्यसनी राहून स्वकष्टावर यश मिळवलेली/ला' अशी हेडलाईन पाहिली आहे का कधी? केवळ आपले तथाकथित पौरुष सिद्ध करण्यासाठी पोर जन्माला घालून आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकून न पाहणारे आईबाप - बाप अधिक - माझा आसपास असंख्य दिसतात. त्यांची स्वकष्टाने, चुकतमाकत, धडपडत, पुन्हा उठून उभे राहात बराच पल्ला गाठलेली अनेक मुले माझ्या पाहण्यात आहेत. त्यांच्या यशाच्या संदर्भात 'आईबापांच्या पाठिंब्याशिवाय' हा शब्दप्रयोग आवर्जून वापरतो का हो आपण? मग हे सतत आईबापांना बिच्चारे नि मुलांना व्हिलन बनवणारे फीचर्स का करतो आपण? किती काळ असल्या पूर्वग्रहांच्या आधारे जगणार आहोत आपण? जात, धर्म, गाव, भाषा यांच्याबाबत होते तशी एकांगी शिक्केबाजी का बरं?

पुढे कपूर यांच्या मुलाची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली होती, हॉस्पिटलचे भले-मोठे बिल भरण्याइतकी त्याची कुवतच नव्हती हे उघड झाले. पैसे नाहीत म्हणून उपचार न करता घरी ठेवून आईला मृत्यूच्या दारात नेऊन ठेवण्याऐवजी, निदान उपचार होतील म्हणून हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडण्याचा निर्णय त्याने घेतला. तो प्राप्त परिस्थितीत स्वार्थी– तरीही योग्यच म्हणावा लागेल. पण एक सनसनाटी बातमी वाजवून झाल्यावर ही बाजू मांडण्याची तसदी त्या चॅनेलने अर्थातच घेतली नाही.

आणखी एक ठळक उदाहरण आठवते ते प्रसिद्ध सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे. अभिजात संगीताच्या क्षेत्रात सर्वाधिक मानधन घेणारा आणि ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमातूनही भरपूर उत्पन्न मिळवणार्‍या या कलाकाराला भल्यामोठ्या कुटुंबाचा पोशिंदा या भूमिकेत वावरल्याने आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला होता. त्यांच्या विपन्नावस्थेची बातमी आल्यानंतर त्यांना आर्थिक मदत करावी म्हणून काही कलाकार नि रसिक मंडळी प्रयत्न करत होती.

त्यांच्या खाँसाहेबांबद्दलच्या प्रेमाबद्दल किंवा खुद्द खाँसाहेबांच्या सनईवादनातील गुणवत्तेबद्दल शंका नाहीच, पण 'शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील कदाचित सर्वाधिक बिदागी घेणारा कलाकार' अशी ख्याती असलेल्या खाँसाहेबांवर ही वेळ आली यात त्यांचा मोठा दोष नव्हे का?' असा प्रश्न अन्य एका दिग्गज कलाकाराने विचारला होता आणि मला तो पूर्ण पटलेला होता. 

इतका पैसा मिळवला त्याचे नियोजन नको? (दणादण इन्शुरन्स पॉलिसीज घेणारे नाहीतर प्लॅट घेणारे कदाचित सर्वोत्तम गुंतवणूक करत नसतील, पण ती करावी लागते हे त्यांना उमगलेले असते इतपत श्रेय त्यांना द्यायलाच हवे.) त्या दिग्गज गायकांना 'माजले आहेत', 'एका कलाकाराने दुसर्‍याबद्दल असे बोलावे का?' वगैरे शेरेबाजी झाली पण त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या फंदात कुणी पडले नाही... आपण कधीच त्या फंदात पडत नाही. सोपा उपाय म्हणून प्रश्न विचारणार्‍यावर शेरेबाजी, त्याची लायकी काढणे, तिसर्‍याच कुणाला मध्ये आणून 'यापेक्षा तर बरे ना' असा फाटा फोडणे आदी मार्गांनी आपण आपल्यापुरता प्रश्न नाहीसा करुन टाकतो.

अशा तर्‍हेची बातमी पाहिली की माझ्या डोक्यात हटकून विचार येतो तो एखाद्या 'कामातून गेलेल्या' मजुराचा (मी वृद्ध म्हणत नाही कारण वृद्धावस्थेच्या सरकारी अथवा रूढ कल्पना त्यांच्या संदर्भात लागूच पडत नाहीत असे मला वाटते.). त्याला खायला घालणे परवडणार नाही म्हणून मुलगा अचानक सोडून गेल्यामुळे निराधार अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या मजुरावर कधी चॅनेल्सनी फीचर्स केले आहेत?(१) त्या निमित्ताने सर्वांना निवारा नि अन्न याबाबत काही करता येणे शक्य आहे का याबाबत चर्चा घडवून (आज कोणता राजकारणी काय बरळला यावरच्या सनसनाटी चर्चा सोडून) काही हाती लागते का याचा निदान प्रयत्न केला आहे? मुळातच जे समाजाच्या वरच्या, निदान मधल्या प्रवर्गात मोडतात आणि स्वतःच्या दुरवस्थेला बर्‍याच अंशी जबाबदार असतात, त्यांची दु:खे मांडून सहानुभूती नि मदत द्या वगैरे आवाहने करून समाजातल्या या ’आहे रे’ वर्गाच्या समस्या सोडवण्यातच हातभार का लावतात?

PlanForRetirement

गीता कपूर यांनी शंभरेक चित्रपटांतून काम केले. सगळ्या भूमिका हीरोईनच्या नसतील. तेव्हा खूप नाही पण एखाद्या मजुरापेक्षा, दुकानात काम करणार्‍या/रीपेक्षा, रस्त्यावर झाडू मारणार्‍या/रीपेक्षा नक्कीच चांगले पैसे मिळवले असतील. मग त्यांनी वृद्धावस्थेसाठी आर्थिक नियोजन केले नव्हते का? (करूनही ते फसणे सहज शक्य आहे, पण तो मुद्दा वेगळा आहे.) की मुलाने सगळे पाहावे असा परावलंबी विचार होता? तसे असेल तर 'माझ्या मते' ही चूक मानायला हवी. पेन्शनर नावाची प्रिव्हिलेज्ड जमात वगळता जगातील प्रत्येकालाच आपल्या कार्यक्षम, उत्पादनक्षम काळात वृद्धावस्थेसाठी तरतूद करून ठेवायची असते. म्हातारपणी मुले सांभाळतील हे गृहित धरणे म्हणजे मुलांना पोस्ट-डेटेड चेक समजण्यासारखे आहे. आपली मिळकत मुलाच्या नावे करून त्याने म्हातारपणची आर्थिक बाजू सांभाळावी ही विचारसरणी निदान बर्‍यापैकी सुस्थिर आयुष्य जगलेल्यांच्या संदर्भात चूकच म्हणायला हवी.

पालकांची पहिली जबाबदारी मूल हे काही अंशी मला मान्यच आहे, कारण पालकांच्या निर्णयानेच ते या जगात आले आहे. परंतु मुलाला सर्व काही मिळावे म्हणून उरस्फोड करत हिंडणारे पालक पाहिले की मला त्यांची दया येते, कधी रागही येतो. नात्यात देवाणघेवाणीचा विचार नसतो हे ही मान्य, पण हे असे धावाधाव करून आपल्या सार्‍या इच्छा-आकांक्षा मारून ज्या मुलाला उभे केले ते पोरगं खरंच आईबापाबद्दल तेवढीच आस्था बाळगून राहील याची किती शक्यता राहील? 

मध्यंतरी दूरदर्शनवर एका चर्चा कार्यक्रमात एक भाजीवाला आपण कसे मुलाला बेष्टं इंग्लिश शाळेत घातले आहे वगैरे सांगत होता. उच्चशिक्षण वगैरे घेऊन बालिष्टर झालेलं त्याचं पोरगं किती अभिमानाने वा आत्मीयतेने बापाबरोबर राहणार आहे? लग्नानंतर प्रायव्हसीच्या नावाखाली किंवा तोही वाईटपणा नको म्हणून परगावी वा परदेशी रोजगारास जाऊन तो झटकून टाकण्याची शक्यता किती?

इथे मी त्या मुलाला सर्वस्वी दोष देत नाही. पालक-मुलाच्या राहणीमानात फरक पडला की विचारात पडतो आणि सहजीवन अवघड होत जाते. हे सर्वस्वी गैर आहे असे एकतर्फी विचार करण्याचे काहीच कारण नाही. तसा फरक पडू नये म्हणून मुलाने पालकांच्याच पातळीवर रहावे असा आग्रह धरणे तर चूक आहेच. त्यामुळे आपल्यापुरती आपली जीवनशैली, आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेत आपण आधीच आखून घ्यावी हे केव्हाही श्रेयस्कर असते.एखाद्या मजुराला वा सर्वसामान्य श्रमजीवीला हे कदाचित जमणार नाही, तेवढी फुरसत वा समज त्याला असण्याची शक्यता फार कमी आहे. पण चित्रपट क्षेत्रासारख्या क्षेत्रात काम करणार्‍यांना जमायला हवे.

त्याशिवाय 'तुम्ही अमुक केले असतेत तर माझं असं नुकसान झालं नसतं' असं किरकिरणार्‍या मुला/मुलीला 'माझी जेवढी कुवत होती तेवढं मी केलं, कदाचित तुझी कुवत कमी पडली म्हणून तेवढ्यात तुला हवं ते मिळवू शकला नाहीस' असं ठणकावून सांगण्याचा कणखरपणा पालकांमधे असायला हवाच असं मला वाटतं. पण इथे मुख्यतः धाडस कमी पडतं. त्याचबरोबर 'चार लोक काय म्हणतील' या अदृश्य भीतीला बळी पडणं नि शेजारपाजार्‍यांशी वा एकुण आपल्या वर्तुळात असणार्‍यांशी - त्यांच्या पोरांशी आपल्या पोराची - स्पर्धा करण्याच्या नादात सारासार विवेक केव्हाच खुंटीला टांगला जातो.

आता मला पुन्हा आई-वडिलांच्या दृष्टिकोनातून पाहायचे आहे. अलीकडे फार प्रसिद्ध झालेला ’आपण गेल्या सत्तर वर्षांत काय झालं?’ हा कुत्सित प्रश्न विचारतो, तेव्हा आपण नकळत ज्या अमेरिकेशी तुलना करत असतो, त्या अमेरिकेतील समाज आणि भारतीय (कदाचित एकुणच आशियाई) समाज यांच्या अर्थकारणात फरक आहे. अमेरिकेमध्ये अस्तित्वात असलेल्या ’सोशल सिक्युरिटी’ नावाच्या व्यवस्थेचा भारतात संपूर्ण अभाव आहे. त्यामुळे ज्येष्ठांना म्हातारपणी आर्थिक आणि वैय्यक्तिक अशा दोनही बाबींसाठी मुलांवर अवलंबून राहणे अधिक सोयीचे वाटते. आणि त्याने/तिने ती आपली जबाबदारी स्वीकारावी यासाठी त्यापूर्वी त्याला/तिला जास्तीत-जास्त देऊ करत त्या ओझ्याखाली ठेवण्याचा प्रयत्न करणे, हा तिसरा मुद्दाही प्रबळ ठरतो. इथे मुलाच्या भविष्यातील गुंतवणूक ही आपल्याही भविष्यासाठीची गुंतवणूक म्हणून पाहिली जाते.

मुळात एकुणातच गुंतवणूक-भान ही आपल्या समाजात दुर्मिळ असलेली बाब आहे. गुंतवणूक ही केवळ अपेक्षित परताव्याकडे पाहून करता येत नसते, तो परतावा मिळण्याची संभाव्यताही(probability) ध्यानात घ्यावी लागते. इतर गुंतवणुकीप्रमाणेच इथे निव्वळ परतावा नव्हे, तर त्याचे त्या संभाव्यतेशी गुणोत्तर पाहावे लागते. 

या दृष्टीने पाहिले तर स्वत:च स्वत:च्या भविष्याची तरतूद करणे हे किमान-धोका (Low-risk) आणि कमी-परतावा(Low-returns) प्रकारची गुंतवणूक असेल, तर मुलांमध्ये केलेली गुंतवणूक ही अधिक-धोका (high-risk) आणि अधिक-परतावा(high-return) प्रकारची गुंतवणूक म्हणावी लागेल. कारण मुला/मुलीने पालकांना आर्थिकदृष्ट्या वार्‍यावर सोडले तर त्यांच्यावरची गुंतवणूक वाया गेली म्हणावे लागेल. आणि ती शक्यता जशी मूल अमेरिकेला जाऊन सेटल होण्यामुळे प्रत्यक्षात येऊ शकते, तशीच कदाचित मूल मुळातच सामान्य कुवतीचे असल्याने आई-वडिलांच्या त्या गुंतवणुकीतून फारसे काही साध्य करुन न शकल्यामुळेही. स्वत:च स्वत:ची तरतूद करण्यामध्ये अशी गुंतवणूक संपूर्णपणे वाया जाण्याची शक्यता तुलनेने कमी राहते. परंतु दुसर्‍या बाजूने मूल मागच्या पिढीच्या तुलनेत अधिक कर्तबगार निघाले, तर उतारवयातले ते परावलंबी आयुष्य कदाचित स्वावलंबी आयुष्याहून अधिक सुखकर असू शकते... पण तसेच होईल हे गृहित धरणे म्हणजे शक्यतांना मोडीत काढून स्वार्थाला निश्चित भविष्याचे रूप देण्यासारखे आहे.

जसे मूल ही आपली जबाबदारी आहे, तसे आपले आयुष्य चांगले असावे याची जबाबदारीही मुख्यतः आपली स्वतःचीच असते ना? स्वतःसाठी थोडे स्वत:चे असे आयुष्य, थोडे धन राखून ठेवले, तर त्याला स्वार्थीपणा का म्हणावे? पुढे जाऊन मूलही स्वार्थीपणाने वागणार नाही याची काय खात्री? तेव्हा पश्चात्ताप करण्यापेक्षा आधीच थोडे स्वतःसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला तर काय चूक? त्यामुळे कमावते झाल्यापासूनच निवृत्तीसाठीचे पैसे, मुलांच्या शिक्षणासाठीचे पैसे, रोजच्या गरजांचे पैसे... वगैरे विभागणी प्रथमपासूनच करुन एका गोष्टीसाठी राखून ठेवलेले पैसे अन्य कारणासाठी न वापरण्याची, त्या-त्या कामासाठी जे पैसे राखून ठेवले आहेत तेवढ्यामध्येच त्या कामाची व्याप्ती वाढवण्याची शिस्त प्रथमपासून लावून घ्यायला हवी. त्यातून पोरगं पुढे आई-बापांबद्दल कृतज्ञ राहणार नाही कदाचित, पण उतारवयात आई-बापाला दोन वेळच्या अन्नाची नि आवश्यक उपचारांची वानवा पडणार नाही याची शक्यता बरीच वाढते.

शिवाय इतके सारे पुढे पुढे करून, बाह्य कुबड्यांचा आधार देत पोराला उभे करायचा प्रयत्न केला, तर ते पोरगं अधिकच परावलंबी वृत्तीचे होईल ही एक शक्यता राहतेच. मुळात इतके सुरक्षित आयुष्य त्याच्या भोवती उभे केले, तर पहिल्या संघर्षाच्या प्रसंगी ते मोडून पडण्याची शक्यता अधिक. कारण 'दोन द्यावे दोन घ्यावे' च्या खुल्या जगात त्याला पाय रोवून उभे रहावेच लागणार आहे, पडत, उठत त्यातून शिकत पुढे जावे लागणार आहे. तिथे आई-बापाने देऊ केलेल्या तयार चौकटीचे आयुष्य जगणार्‍या मुलांमध्ये आवश्यक ती कौशल्ये विकसित झालेली असणार आहेत का? की ती कौशल्येही आधीच ठरवून त्या चौकटीत बसवून देणार आहेत, आणि असल्यास कशी? कारण ते मूल जगण्याचा स्वत:चा संघर्ष सुरु करेल तेव्हाची परिस्थिती आणि त्याच स्थितीत त्याचे आई-वडिल असतानाची परिस्थिती यात कालमानानुसार दोन ते तीन दशकांचा फरक असणार आहे. कदाचित त्याच्या जगण्यातले संघर्ष आई-वडिलांच्या काळात त्यांच्यासमोर असलेल्या संघर्षांपेक्षा सर्वस्वी वेगळे असतील अशी शक्यता बरीच आहे. तेव्हा मुलामध्ये गुंतवणूक म्हणून पाहणॆ जसे घातक तसेच स्वार्थत्यागाच्या कैफात त्याला नव्या आव्हानांसमोर पंगू करुन ठेवणेही.

आणि हा स्वार्थत्याग वगैरे मुख्यतः घरच्या बाईच्या प्रगतीच्या मुळावर येत असतो. दुर्दैवाने 'मुलाचं सुख ते आपलं सुख' वगैरे बाष्कळ कल्पनांच्या ब्रेन-वॉशिंगमुळे अनेकींना त्यात काही गैर आहे असे वाटत नाही, हे अलाहिदा. अर्थात विचारपूर्वक, सारा साधकबाधक विचार करून जर त्यांनी मुलासाठी आपले वैयक्तिक आशा-आकांक्षा बाजूला ठेवल्या तर त्या निस्वार्थ भावनेचं कौतुक आहेच. फक्त तो निर्णय जाणतेपणे घेतलेला असेल तरच, केवळ परंपरेच्या वा सामाजिक दडपणाखाली - आणि अर्थातच घरातील दडपणाखाली - घेतलेले असेल तर नव्हे. 

परंतु दुर्दैवाने हा समूह-दडपणाचा (peer pressure) भाग मातेवर अधिक परिणाम करतो असा अनुभव आहे. माझं पोरगं 'सग्गळ्या मुलांत नि सग्गळ्या विषयात' हुश्शार वगैरे करण्याचा आटापिटा - मुख्यतः उच्चशिक्षित स्त्रियांमधे - अनुभवाला येतो. एकाच वेळी महागडं शिक्षण - जे चांगलं असतं असं गृहितक आहे - जास्तीचे क्लासेस, वर पोरगं चतुरस्र वगैरे असावं म्हणून गाण्यापासून क्रिकेटपर्यंत आणि मुलगी असेल तर नाचापासून कराटे-तायक्वोंदोपर्यंत (सेल्फ डिफेन्स नको का शिकायला?) सग्गळं त्या पोराला नाचायला लावायचं नि स्वतःही नाचायचं... खरंतर धावत रहायचं! 

सगळं एकदम करण्यापेक्षा एकामागून एक करणं शक्य नाही का? पण तसं नाही. ऑलराउंडर पाहिजे पोरगं. म्हणून मग आपल्या याच वृत्तीप्रमाणॆ सगळं थोडं थोडं पण कुठलंच खोलात न शिकवणारे एमबीएचे अभ्यासक्रम हे आमचे ध्येय असते, कारण अजून तरी त्यात आर्थिक स्थैर्याची शक्यताही बरीच अधिक आहे.

या सार्‍या विवेचनात सर्वत्र शक्यतांच्या भाषेत बोलणं याचा अर्थ ठाम विधान करण्याचे टाळणे आहे, असा अर्थ काढला जाण्याची ’शक्यता’ बरीच आहे. आणि माझा मूळ मुद्दा तोच आहे. निर्णय हे नेहमी शक्यता (possibility) आणि त्यांची संभाव्यता(probability) यांच्या आधारे घेणे अधिक शहाणपणाचे असते. अमुक एकच घडेल असे गृहित धरुन निर्णय घेणे, आणि तसे न घडल्याने निर्णय चुकला की ’नशीब’ वा 'दैव' यांवर खापर फोडून कपाळाला हात लावून बसणे, हे वैचारिक आळशीपणाचे लक्षण आहे. निर्णयापूर्वी सर्वच शक्यतांना ध्यानात घेणे अत्यंत गरजेचे असते.

पण ज्यांना ठोस विधानेच समजतात त्यांच्यासाठी एका वाक्यात सांगायचे तर, ’जसं आई-बापाने मुलाला सारं सारं देण्यासाठी उरस्फोड करणं विकृत, तसंच आईचं त्याने सग्गळं सग्गळं शिकावं नि इतर पोरांपेक्षा लै भारी असावं म्हणून त्याला सतत धावतं ठेवत त्याचं बालपण हिरावून घेणंही... आणि अर्थातच आई-बापाने स्वत:चे भावी आयुष्य धोक्यात घालून आपल्याला आर्थिक मदत करावी ही त्या मुलाची अपेक्षाही!

काही वर्षांपूर्वी ’दूरदर्शन'वर 'कथासागर' नावाची एक मालिका दाखवली जात असे. देशोदेशीचे उत्तमोत्तम कथाकार निवडून त्यांच्या कथांवर आधारित एपिसोड दाखवले जात. गावाकडून येताना केवळ आपले शरीर आणि शेतीवरचे कर्ज एवढ्या दोन गोष्टी सोबत आणलेला एक बाप. आपल्या मुलाने शिकावे आणि कुटुंबाचा भार थोडा आपल्याही खांद्यावर घ्यावा अशी अपेक्षा असलेला. बापाच्या डोक्यावरचे कर्ज वाढवून डॉक्टर झालेला मुलगा श्रीमंत वर्गमैत्रिणीशी लग्न करुन सासर्‍याच्या मदतीने उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचा निर्णय बापाला सांगतो. एवढ्या कर्जाचा बोजा आणखी काही वर्षे वागवावा लागणार हे जाणवून खचलेला बाप मुलाला त्याची आठवण करुन देतो. 'पण मी इथे आलो तेव्हाही तुमच्या डोक्यावर कर्ज होतंच की!' हे मुलाचे शेवटचे वाक्य आणि आता आपला दोघांचा मार्ग वेगळा झाला आहे हे जाणून, विमानतळाकडे जाणार्‍या मुलाच्या टॅक्सीतून उतरुन हताश चेहर्‍याने पाय ओढत जाणारा तो बाप, हे दोनही माझ्या डोक्यात बराच काळ रुतून बसले होते. ’मुलाची स्वप्ने कितीही मोठी असली तरीही ती आपली नसतात, फक्त त्याचीच असतात’ हे आई-बापाने विसरता कामा नये, असे मला प्रामाणिकपणे वाटते.

- oOo -

(१).'वृद्धाश्रमात फक्त श्रीमंतांचे आईबाप असतात, गरीबांचे नाहीत' असा दावा करत गरीब हे याबाबतीत सधनांपेक्षा नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ असतात असा एक दावा केला जातो. तो फारच उथळ असतो असे माझे मत आहे. वृद्धाश्रमात ठेवणे याचा अर्थ खर्चाचे एक जास्तीचे खाते खुले करणे असाच असतो, आणि गरीबाला ते परवडणारे नसते हे ध्यानात घ्यायला हवे.

(पूर्वप्रकाशित: ’मिळून सार्‍याजणी Online’, मार्च २०२१)

---

संबंधित लेखन: गीता कपूर, 'हल्लीची पिढी...' वगैरे


संबंधित लेखन

1 टिप्पणी: