शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२

(आपले) स्वातंत्र्य, (इतरांचे) चारित्र्य आणि (तथाकथित) संस्कृती

परवाच फेसबुकवर एका ग्रुपवर नटनट्यांच्या शिर्डीप्रेमाचा विषय निघाला होता. गप्पा तशा खेळीमेळीत चालू असताना अचानक एक नवा सदस्य अवतीर्ण झाला नि त्याने काही स्टेटस् टाकले ते वाचून अख्खा ग्रुप हादरला. एकदोघांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, स्त्री सदस्यांनी त्याच्या विधानाला तीव्र आक्षेप घेतला. परंतु महाराज अजिबात बधले नाहीत. एकामागून एक अशी तिरस्करणीय विधाने करणे चालू होते. यात त्यावर आक्षेप घेणार्‍या सदस्यांवर वैयक्तिक शेरेबाजीही चालू होती. सारा रोख स्त्रियांच्या - चित्रपटात काम करणार्‍या नट्यांच्या - चारित्राबद्दल होता. त्यांची विधाने आठवली तरी अंगावर शहारे येतात. 'असल्या स्त्रिया जवळून जरी गेल्या तरी इतकी घाण येते, म्हणून तर त्या इतक्या मेकअप करतात नि सेंट लावतात.' हे त्यांचे सर्वात सभ्य विधान. यावरून इतर विधानांचा तर्क तुम्ही करू शकाल... खरंतर करू नकाच असे म्हणेन मी. हा प्राणी आहे तरी कोण म्हणून त्यांचे प्रोफाईल पाहता बसलेला धक्का अजूनच तीव्र होता. हे महाराज भारत सरकारच्या न्यायव्यवस्थेमधे न्यायाधीश म्हणून निवृत्त झालेले होते. म्हटलं वा काय निवड आहे. एकुणच 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचं पहायचं वाकून' अशा वृत्तीची बहुसंख्या असलेल्या समाजाला गुन्ह्यांचा निवाडा करायला याहुन अधिक लायक माणूस कुठून मिळणार, नाही का? या साहेबांची वृत्ती खर्‍या अर्थाने आपल्या समाजाची मानसिकतेचे प्रातिनिधित्व करते मला वाटते.

कणेकरांनी आपल्या तिरकस शैलीत 'हिंदी चित्रपट ही आपली राष्ट्रीय संस्कृती आहे...' असं म्हटलेलं आहे. ते अक्षरश: खरं आहे. जिवंत असलेल्या नि हाती पैसे असलेल्या प्रत्येकाने हिंदी चित्रपट पाहणे हे रोजच्या जेवणाइतकेच जगण्याचे अविभाज्य कार्य आहे. अशा चित्रपटांशी संबंधित मासिके पाहिली तर आपल्या मनोऽवस्थेची कल्पना येईल. यात चित्रपट व्यवसायासंबंधित व्यक्तींच्याबाबत जो मजकूर छापून येतो त्यात मसालेदार  गोष्टी म्हणजे नट-नट्यांची परस्परांवर चिखलफेक, पडद्यामागचे राजकारण आणि अर्थातच कोणाचे कोणाशी जुळले अथवा फाटले, अमक्यांचे लग्न कसे 'ऑन रॉक' आहे वगैरे मजकूर प्राधान्याने असतो. आणि या मासिकांचा इतिहास भारतातील चित्रपटसृष्टीतल्या इतिहासाइतकाच जुना आहे. या असल्या गॉसिप कॉलमचे लेखक समाजात संभावित म्हणून मिरवतात, एखाद्या आणिबाणीच्या प्रसंगी एखाद्या टीवी च्यानेलवर बसून समाजाला शहाणपण शिकवण्याचा अगोचरपणाही करतात. एकुणच लायकी नि प्रातिनिधित्व याचा संबंध या देशात फारसा लागत नसल्याने हा बेशरमपणाही खपून जातो. पण या लेखकांचे सोडा. आपल्या चित्रपटप्रेमींची अवस्था काय वेगळी आहे. आमचा एक जालीय मित्र आहे. बिचारा अधूनमधून एकेका नटीच्या प्रेमात असतो. तिचे फोटो आपल्या वॉलवर चिकट्वत असतो. आम्ही सारे अधूनमधून त्याची माफक चेष्टा करतो. तो ही राजा माणूस ती थट्टा खेळकरपणे घेत असतो. एका नटीचा फोटो बरेच दिवस दिसल्यावर आम्ही त्याला चिडवत होतो 'बाबा रे, एवढी आवडली आहे तर घे उरकून. नुसते फोटो लावण्याऐवजी प्रपोज कर तिला. लगीन कर. म्हणजे आम्हाला फुकटचे जेवण तरी मिळेल.' अचानक एक कॉमेंट आली 'आधी तिची एड्स टेस्ट करून घे रे.' हा दुसरा मित्र एरवी तसा सरळ मार्गी, निदान तसे भासवणारा. समोरच्या त्या स्त्रीच्या चारित्र्याबाबत असे जाहीर विधान करणे यात काही अश्लाघ्य, गैर असे वर्तन करतो आहोत असे त्याच्या गावीही नसेल. खरंतर कायद्यानुसार हा गुन्हा आहे हे त्याला ठाऊक असायला हवे. पण इतरांचे चारित्र्य कःपदार्थ नि आपण घट्ट चाकोरीतून चालतो म्हणून आपण चारित्र्यवान अशी काहीशी समजूत असल्याने नकळे. किंवा समाजात प्रसिद्ध व्यक्तींबद्दल काहीही बोलण्याचा खुला परवाना उरलेल्या क्षुद्र समाजघटकांना असतो असा हाडीमासी नकळत रुजलेला समजही बोलत असेल.

चित्रपट नि त्यासंबंधित व्यक्ती हे तरुणाईच्या दृष्टीने रोल-मॉडेल अथवा आपली जीवनशैली कशी असावी याचे प्रतिबिंब अथवा कुठे पोचायचे आहे याचा आराखडा असतो. परंतु जे आपल्या वृत्तीतच आहे ते चित्रपटापुरते मर्यादित कसे राहील? एरवी आपली महान संस्कृती वगैरेच्या गप्पा मारणारे नि त्यासाठी यंव केले पाहिजे नि त्यंव केले पाहिजे वगैरे गप्पा मारणारे लोक जेव्हा 'तू ब्ल्यू फिल्म पाहिली नाहीस, काय खोटं सांगतोयस?' असा अविश्वास दाखवतात तेव्हा त्याच्या आयुष्याचा आराखडा लगेच समजून येतो. जालावर थोड्याफार गप्पांपलिकडे फार मैत्री नसलेली व्यक्ती प्रथमच भेटताना तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चौकशी करते, एखाद्या अविवाहिताला 'तू गे नाहीस ना?' असे बिनदिक्कत विचारते, 'तुम्हाला एक बाई पुरत नाही का?' असे विचारते यात समोरच्यावर आपण अश्लाघ्य आरोप करत आहोत याचा तिला गंधही नसतो. किंबहुना बहुतेकांची प्रतिक्रिया 'यात काय विशेष' अशीच असणार आहे हे ठाऊक आहे. एकीकडे संस्कृतीच्या गप्पा मारायच्या नि लैंगिक शिक्षण या नावानेच बिचकून जाऊन शास्त्रशुद्ध नि तज्ञांकडून माहिती अथवा शिक्षण (जे प्रामुख्याने वाढत्या वयातील शारिरीक मानसिक बदल इ. बाबत असते, संभोगाचे प्रशिक्षण नव्हे) देण्याला विरोध करायचा नि घरात काँप्युटरवर ब्ल्यू-फिल्म्सचा साठा करायचा हा दांभिकपणा आपल्या रक्तातच मुरलेला आहे. मुक्त विचारांच्या नावाखाली इतरांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायची परवानगी मिळाली आहे असा आपला समज आहे का?. अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त आपले नि बंधने तेवढी इतरांना असा आपला समज आहे का?

लहान लहान अर्ध्या चड्डीतली पोरे गांधींजींबद्दल गलिच्छ विनोद सांगताना मी ऐकले आहेत. हे विनोद गांधींजींच्या भारतीयांच्या मनातील आदराचे स्थान हिरावून घेऊ पाहणार्‍या संघटनेकडून कसे प्रसृत केले जातात हे मी त्या संघटनेत असतानात स्वतः अनुभवले आहे. आपल्या राजकारणाच्या सोयीसाठी आपण किती खाली घसरलो आहोत याची त्यांना जाणीवही नसते (किंबहुना आपण करतो म्हणजे ते श्रेष्ठच असते असा गंडही असतो.) नेहरू म्हटले की फक्त 'एडविना' आठवणारे महाभाग भरपूर आहेत. ही विषवल्ली आपण आपल्या राजकारणाच्या सोयीसाठी जरी रुजवली असली तरी मुळातच हा दांभिकपणा महामूर असलेल्या ठिकाणी ही काँग्रेस-गवतासारखी इतर व्यक्तींच्या चारित्र्यावर, वैयक्तिक आयुष्यावर अतिक्रमण करत जाणार आहे हे समजून घ्यायला हवे. अर्थात मुळात ही समज त्यांच्याकडे आहे का, असल्यास त्याबाबत काही करण्याची त्यांची इच्छा आहे का हे प्रश्न आहेत. माझ्यापुरती या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारात्मक आहेत. या संघटनांच्या संदर्भात नि एकुणच भारतीय मानसिकतेच्या संदर्भातही!