रविवार, २८ एप्रिल, २०२४

अ.सं.सं. मध्ये मल्ल्यामहर्षी

(२०१६ मध्ये प्रथम विजय मल्ल्या यांच्या नंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी, नीतिन संदेसरा यांनीही आर्थिक गैरव्यवहाराच्या गुंत्यातून सुटण्यासाठी परदेशात पलायन केले. त्याच सुमारास भारतामध्ये झालेल्या नोटाबंदीच्या अनुषंगाने लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा थोडा विस्तार करुन लिहिलेली ही काल्पनिका.)
---

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार महान भारतीय अर्थशास्त्री विजय मल्ल्या ऊर्फ मल्ल्यामहर्षी यांनी युरपमधून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांकडे (अ.सं.सं.) गुपचूप गमन(१) केले. सुरक्षिततेच्या कारणास्तव ही बातमी तर गुप्त ठेवण्यात आलीच होती. अणुबॉम्ब निर्मितीच्या ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’च्या वेळी प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ नील्स बोर याला ज्या सफाईने अमेरिकेमध्ये नेण्यात आले होते त्याच सफाईने हे ऑपरेशन पार पाडण्यात आले.

प्रथम एका कार्गो विमानाने मल्ल्यामहर्षींना डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. आधीच सूचना मिळाल्याप्रमाणे, विमानतळावरील अ.सं.सं.च्या अधिकार्‍यांनी इमिग्रेशन-चेक वगैरेचे सोपस्कार बाजूला ठेवून त्यांना थेट एका अति-सुरक्षित अशा लहानशा विमानाकडे नेले. हे विमान खुद्द अ.सं.सं. अध्यक्षांनीच पाठवले होते, हे नंतर प्रेस-ब्रिफिंगमध्ये उघड झाले. या विमानाने महर्षींना थेट रीगन विमानतळाकडे नेण्यात आले. तिथे मात्र त्यांचे आगमन जाहीर करण्यासाठी स्पेशल बँड आणवून वाजतगाजत त्यांना थेट राष्ट्राध्यक्ष निवासाकडे नेण्यात आले.

नील्स बोर याच्या आगमनाचे कारण बरेच उशीरा उघड झाले होते. तसेच मल्ल्यामहर्षींना कोणत्या मोठ्या ऑपरेशनसाठी ‘कमिशन’ करण्यात आले आहे यावर अ.सं.सं.च्या माध्यमांमधून घनघोर चर्चा सुरू झाल्या. भारतीय माध्यमांनी ‘फक्त आमच्याच चॅनेलला मिळालेली गुप्त बातमी’ म्हणून ‘मल्ल्यामहर्षींना अध्यक्षांचा ‘मद्य-सचिव’ म्हणून नेमण्यात येणार आहे’ यापासून ‘स्वदेशात अडचणीत आल्यास परदेशाश्रय कसा घ्यावा’ यावर व्हाईट हाऊसमध्ये निवडक रिपब्लिकन खासदारांना ते मार्गदर्शन करणार असल्याची’ ब्रेकिंग न्यूज – अर्थात ग्राफिक्स वगैरेसह – वाजवण्यास सुरुवात केली. भारतीय माध्यमांच्या पावलावर पाऊल टाकत अमेरिकन माध्यमांनी मल्ल्यामहर्षींचा सहभाग असलेल्या या संभाव्य गुप्त कार्यक्रमाला ‘ऑपरेशन रॉयल चॅलेंज’ असे नाव देऊन टाकले.

MallyaaAndTrump

मल्ल्यामहर्षी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी पोहोचले. औपचारिक स्वागत झाल्यावर अध्यक्ष ट्रम्प नि मल्ल्यामहर्षी दोघेच त्यांच्या अति-सुरक्षित चर्चागृहात गेले. दोघांची जेमतेम दोनच मिनिटे चर्चा झाली. यावरून प्रस्तावित ऑपरेशनबाबत अध्यक्षांची मल्ल्यामहर्षींसोबत आधीच सविस्तर चर्चा झाली असल्याचे फॉक्स न्यूजने आळवण्यास सुरुवात झाली. चर्चागृहातून दोघेही बाहेर येऊन थेट पेंटगॉनकडे रवाना झाले. तासाभरातच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पायउतार झाल्याची आणि त्यांच्या उपाध्यक्षांनीही राजीनामा दिल्याची बातमी पसरली. सोबतच मल्ल्यामहर्षी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत असल्याची बातमीही आली.

अ.सं.सं. मधील नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रोजगार धंदे सोडून लोक रस्त्यावर आले, एकमेकांना मिठ्या मारुन, जोर-जोरात घोषणाबाजी करत आणि मुख्य म्हणजे बीअर पीत ते आपला आनंद व्यक्त करत होते. ही भिकारडी जर्मन बीअर आपल्याला प्यावी लागणार नाही, अस्सल भारतीय बनावटीची बीअर मल्ल्यामहर्षी आपल्याला उपलब्ध करून देतील या कल्पनेनेच तरुणांचा जल्लोष सुरू झाला.

पदभार स्वीकारल्यानंतर मल्ल्यामहर्षींनी पहिलीच घोषणा केली ती ‘नोटाबंदीची’! वरिष्ठ सभागृह (Senate) तसंच प्रतिनिधी-गृहातील (House of Representatives) रिपब्लिकन सदस्यांनी धडाधड केलेल्या ट्विट्स, पोस्ट्स नि फेसबुक लाईव्हद्वारे ‘अमेरिका फर्स्ट’ या मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा आता सुरु होत असल्याचे ढोल वाजवायला सुरुवात केली. भारतात अतिशय यशस्वी झालेल्या या उपायाची अंमलबजावणी करण्याचे जाहीर झाल्याने अ.सं.सं. मधील नागरिक आणखीनच खूश झाले आणि ‘आले रे आले, अच्छे दिन आले’ अशा घोषणांनी त्यांनी आसमंत दणाणून सोडले.

भारताप्रमाणेच अ.सं.सं. मधील विरोधकांचा आरडाओरडा सुरु झाला(२). पण मोदींप्रमाणेच मल्ल्यामहर्षींनी या विरोधाला भीक घातली नाही. रिपब्लिकन प्रतिनिधी, ट्रम्प-आर्मी, ‘फॉक्स’सारखी माध्यमे यांनी विरोधकांना ‘चीनचे हस्तक’ म्हणून हिणवण्यास सुरुवात केली. या गदारोळामध्ये फेडरल रिजर्वने केलेला विरोधही पाचोळ्यासारखा उडून गेला.

नोटाबंदी जाहीर झाल्याने जुन्या नोटांच्या बदली देण्यासाठी नव्या डॉलर नोटा(३) छापण्यास सुरुवात झाली. मोठ्या दर्शनी किंमतीच्या नोटांमध्ये काळा पैसा साठवला जात असल्याने रद्द केलेल्या पाचशे नि हजारच्या नोटटांऐवजी दोन हजारच्या नोटा छापणार्‍या मोदींच्या पावलावर पाऊल टाकून मल्ल्यामहर्षीं काम करू लागले. त्यांनी अ.सं.सं.ला वेगाने श्रीमंत करण्याच्या उद्देशाने थेट पाच मिलियन डॉलर्सच्या नोटा छापण्याचचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रत्येक नागरिकाला पंधरा मिलियन डॉलर्स सरकारतर्फे देण्याची घोषणा केली(४). दपुढील दोन महिन्यांमध्ये हे वाटप व्हावे या दृष्टीने नियोजन करण्याचा आदेश त्यांनी दिला.

ज्या दिवशी हे वाटप सुरू होणार होते, त्या दिवशी भल्या पहाटेपासून लोकांनी एटीएम्ससमोर रांगा लावल्या होता. रांगेतले काळे, पांढरे, पिवळे, तांबडे, बुटके, उंच, काळ्या डोळ्याचे, निळ्या डोळ्यांचे, भुर्‍या डोळ्यांचे, स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध सारेच आनंदाने एकमेकांना मिठ्या मारत होते, शुभेच्छा देत होते. येऊ घातलेल्या ‘अच्छे दिनां’च्या चाहुलीने झालेला आनंद त्यांना आवरता येत नव्हता. अखेर ती वेळ आली. सकाळी सहा वाजता रेडिओवरून(५) सर्व एटीएम नव्या नोटांनी गच्च भरल्याची नि सर्वांसाठी ते खुले झाल्याची घोषणा मल्ल्यामहर्षींनी केली नि नागरिकांची आपल्या नेहमीच्या शिस्तीला विसरून एटीएममधे घुसण्याची अहमहमिका सुरू झाली.

वॉशिंग्टनच्या रस्त्यावर राहणार्‍या एका बेघर व्यक्तीने त्याच्या ‘घरा’शेजारच्या एटीएमसमोर दोन दिवसांपासून नंबर लावलेला होता. एटीएममधून पैसे काढून ती व्यक्ती बाहेर पडली आणि कॅमेर्‍यांचे क्लिकक्लिकाट चालू झाले. ‘आम्हीच पैले’ म्हणत त्याचा ‘बाईट’ घेण्यास धावलेल्या चॅनेल प्रतिनिधी आणि स्वयंघोषित यू-ट्युब चॅनेलशास्त्रींना धक्काबुक्की करत बाजूला करुन काही तरुण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले. आनंदातिशयाने त्या भाग्यवंताला डोक्यावर घेऊन त्यांनी नाचायला सुरुवात केली. पहिला उत्साह ओसरल्यावर तिला खाली उतरवण्यात आले. नव्या नोटेस तिने उंच धरून सर्वांनी त्यासोबत सेल्फी काढावी असा प्रस्ताव एका तरुणाने मांडला नि तो उत्साहात नि एकमताने पास झाला.

ताबडतोब त्या ‘प्रथम-नोट-प्राप्त’ भाग्यवंताला मधे घेऊन त्याच्या आजूबाजूने बरेच लोक दाटीवाटीने उभे राहिले. त्या भाग्यवंताच्या शेजारी उभे असलेल्या तरुणाने मोबाईल समोर धरून सर्वांना ‘से बीअऽऽऽऽर’असे म्हणून क्लिक केले. त्याच वेळी समोरुन फोटो काढण्यासाठी सज्ज असलेल्या एकाने झूम थोडा कमी करून सर्वांना कव्हर करता यावे यासाठी स्क्रीनवर बोटे टेकवली. इतक्यात एटीएममध्ये नंबर लागून नोटा मिळालेला एकजण अत्यानंदाने धावत त्याच्या शेजारून गेला. जाता जाता त्याचा धक्का या कॅमेर्‍याधार्‍याला लागला नि वाईड अँगलऐवजी उलट कॅमेरा जास्तच झूम झाला. समोरचे सारे लोक आता आउट-ऑफ-फोकस जाऊन स्क्रीनवर फक्त नोट दिसत होती. त्यावर लिहिलेले वाक्यही स्पष्ट वाचता येत होते...

‘इन फ्रॉड वी ट्रस्ट’ (६)

- oOo -

टीपा :
(१). ‘पलायन केले’ असे म्हणणार होतो पण कुणाच्या तरी भावना दुखावल्या तर पंचाईत. (* टीप ६ पहा.)
(२). ‘तसंही या डेमोक्र्याट्यांना आरडाओरड करणं सोडून दुसरं येतंय काय?’ - सॅम-बिन पॅट्रोस, अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी, दक्षिण-पश्चिम न्यू हॅम्पशायर परगणा, गल्ली क्र. ८.
(३). तिकडे त्यांना बिल्स म्हणतात नि बिलाला चेक. पण ‘ज्याले ऑनर करु नही, त्याले चेक म्हनू नही’ असं सांगून अ.सं.सं.च्या लोकांचे हे उलटे डोकेही मल्ल्यामहर्षी लवकरच सरळ करतील.
(४). ‘त्यापेक्षा किंगफिशर माईल्डचे पंधरा क्रेट दिले असते तर अधिक उपयोगी ठरतील, या रिपब्लिकनांच्या देशात!’ - योशुआ सिनहॅम, ‘हिलरी इज किलरी’ या डेमॉक्रॅटिक पार्टी-अंतर्गत दबाव गटाचे निमंत्रक.
(५). ‘टीव्ही नव्हता का?’ बावळट प्रश्न विचारणार्‍याला ‘ग्वाटानामो बे**’ला डीपोर्ट करण्यात येईल. (** टीप ६ पहा.)
(६). ज्यांना संदर्भ माहीत नसेल, त्यांनी आपल्या धार्मिक/अधार्मिक श्रद्धेय पुस्तकांत सारे ज्ञान आहे या आपल्या दाव्याची सुरळी करून... ...माळ्यावर टाकून द्यावी.

---
संबंधित लेखन:

अब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ’मल्ल्याला सल्ला’) >>
अशी ही पळवापळवी >>
---


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा