बुधवार, १७ एप्रिल, २०२४

गजरा मोहोब्बतवाला

सिंहगड रस्ता हा पुण्यातील काही प्रमुख रस्त्यांपैकी एक. पुण्याच्या दक्षिण भागाकडे जाणारा एकमेव मोठा नि म्हणून वर्दळीचा रस्ता. एका अस्मिताजीवी कोथरूडकर मैत्रिणीच्या मते ’ईं ऽऽऽऽ सिंहंगंडं रोंडं कांऽऽयं...’ असा प्रश्न विचारण्याजोगा असला, तरी रस्त्याचा आकार नि वर्दळीच्या गुणोत्तराच्या दृष्टीने पाहिले तर रस्त्यांमधला उच्चवर्गीय (उ.र.) .

माझ्या घराकडे यायचे तर या मुख्य रस्त्यावरून एका चौकात आत वळावे लागते. याच्या आजूबाजूला मोठी वस्ती पसरल्याने मुख्य रस्त्याच्या इतका नाही पण अगदी गल्लीही नाही असा– मध्यमवर्गीय रस्ता (म. र.). या रस्त्यावरूनही आमच्या सहनिवासाकडे (सोसायटी) यायचे तर एका गल्लीत वळण घ्यावे लागते. ही गल्ली अर्थातच निम्नवर्गीय रस्ता (नि.र.), जेमतेम एक लेनइतकी रुंद. आता मी सांगणार आहे तो किस्सा या म.र.कडून आमच्या नि.र.च्या वळणार घडलेला आहे.

‘याला किस्सा, अनुभव म्हणावे का?’ असा प्रश्न कुणाला पडेल. पुरे वाचल्यावर ‘ही एक नित्य घडणारी किरकोळ, अदखलपात्र घटना आहे’ असे बहुतेकांचे मत असेल. (आणि हे खरडणे खरं तर त्यांच्याच साठी आहे.) पण हा प्रसंग माझ्या डोक्यात कायमचा घर करून राहिलेला आहे याचे कारण– कदाचित– माझी पिंडात ब्रह्मांड पाहण्याची अगोचर वृत्ती असेल. ते काही असो, तो प्रसंग आणि त्या वेळी माझ्या मेंदूचे फसफसणे इथे मांडून मोकळा होणार आहे.

---

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एके दिवशी घरातून बाहेर पडलो, सोसायटीचे फाटक ओलांडून नि.र. वर आलो. इथून म.र.ला जोडणारे वळण काही फुटांवर आहे. भारतीय मंडळींचा वाईट सिव्हिक-सेन्स आणि इतरांच्या सोयीचा शून्य विचार यांचा सज्जड पुरावा पाहायचा तर ‘जरा विसावू या वळणावर’.

StreetFlowerSeller
https://scroll.in/ येथून साभार.

नि.र.कडून उजवीकडे वळणावरच एक गजरेवाला उभा आहे. त्याच्या समोर काही क्रेट्स आडवे टाकून त्यावर एक फळी टाकलेली आहे. त्यावर ओतलेल्या अनाकलनीय रंगाच्या मोगर्‍याच्या फुलांवर तो पाणी मारतो आहे. त्याच्या शेजारी एका फळवाल्याने त्याच पद्धतीने पथारी लावलेली आहे. त्याच्या पायाशी फळांच्या खोक्यांतून बाहेर पडलेले गुलाबी कागद, स्पंजची जाळी, पुठ्ठे वगैरे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. या दोघांनी मिळून उजवीकडे वळण्यास– आणि तिकडून नि.र.कडे आत वळण्यास अडथळा निर्माण केला आहे.

नुकताच गजरा किंवा मोगरा घेऊन निघालेली एक माता, कुणी एक आजी भेटल्यामुळे तिच्याशी गप्पा मारत फळवाल्यासमोरच उभी आहे. तिचे तीन-चार वर्षांचे मूल तिचे बोट पकडून असले तरी रस्त्याच्या मधोमध उभे आहे, याची तिला जाणीव नाही. या तिघांनी मिळून नि.र.चा अर्धा रस्ता अडवलेला आहे. या दोन विक्रेत्यांच्या समोरच्या बाजूला, म्हणजे डावीकडील वळणावर आणखी एक फळवाला आपले दुकान मांडून आहे. त्यामुळे हा फळवालाआणि ते पलीकडचे मूल यांच्या मधून जेमतेम एक रिक्षा कशीबधी जाऊ शकेल इतकाच रस्ता शिल्लक आहे. त्यातूनच मला बाहेर पडून इच्छित स्थळाकडे प्रयाण करायचे आहे.

मी तिथे पोहोचतो न पोहोचतो, तोच म.र. वरून उजव्या बाजूने एक कार येते नि थेट त्या गजरेवाल्याच्या शेजारी थांबते. आता म.र.कडून आमच्या नि.र. कडे वळण्यासाठी तिकडून येणार्‍यांना राँग साईडने जाऊन या कारच्या पुढून काटकोनात वळण घेण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. आणि तसे केलेच तरी... माता, मूल आणि आजींच्या गप्पा चालू आहेत... दोन्ही फळवाल्यांसमोर कुणीतरी उभे आहे... म्हटल्यावर ते वळलेले वाहन उरलेला रस्ता बंद करत अडकून पडणार हे नक्की झाले.

पण ते जाऊ द्या. आपल्या वाहतूक नियमांबाबत बेशिस्त देशात (एक मिनिट– चुकलो हं. आमच्या बेशिस्त गावात– तुमचे गाव गुणी आहे, ओके?) यात काय नवीन असे तुम्ही म्हणणार हे मला ठाऊक आहे. महासत्ता होण्याच्या वाटेवर सिव्हिक-सेन्स– जबाबदार सार्वजनिक वर्तणूक हा मुद्दा आपण धरत नाही. किंबहुना एकुणातच इतिहासाचा चिखल चिवडणार्‍यांच्या शिक्षणपद्धतीमध्ये नागरिकशास्त्र तसेही दहा-वीस गुणांपुरते अंग चोरून उभे असते; बहुतेकांनी ऑप्शनला टाकलेले असते.

त्या कारची काच ऐटीत सर्रकन खाली होते. खिडकीतून गॉगल लावलेला एक ऐटबाज चेहरा बाहेर डोकावतो. शेजारी त्याचं खटलं/पत्नी/पार्टनर/जोडीदार बसलेली आहे. ऐटबाज चेहरा गजरेवाल्याला दोन गजरे मागतो. गजरेवाला प्रत्येकी दहा रुपये प्रमाणे एकुण वीस रुपये किंमत सांगतो. ऐटबाज चेहरा ‘छे: इतक्या लहानशा गजर्‍याचे दहा रुपये? काहीही काय सांगतोस. दहाला दोन दे.’ म्हणत घासाघीस सुरू करतो. गजरेवालाही ‘खरेदी पण एवढी नाही’ वगैरे सुरू करतो. अठरा रुपये, पंधरा रुपये वगैरे एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे सुरू होते. पण गजरेवाला अजिजीने नकार देत राहतो.

ऐटबाज व्यक्तीच्या कारने म.र. आणि नि.र. दोहोंचीही कोंडी केलेली असल्याने आसपास हॉर्न वाजू लागलेले असतात. ऐटबाज चेहर्‍याशेजारच्या पत्नीच्या चेहर्‍यावर वैतागाचे भाव दिसू लागतात. अखेर ‘दे चल.’ असे म्हणत ऐटबाज चेहरा दोन गजरे घेतो आणि बायकोकडे देतो. खिशातून पाकीट बाहेर काढतो नि गजरेवाल्याच्या हातावर पंधरा रुपये टिकवतो. गजरेवाला ‘अजून पाच रुपये द्या.’ म्हणू लागतो. पण ‘नाही नाही, हे बरोबर आहेत’ असे म्हणत ऐटबाज चेहरा आपल्या अष्टलक्षी गाडीला टाच मारून भरधाव वेगाने निघून जातो.

हतबुद्ध झालेला गजरेवाला गोठलेल्या अवस्थेत काही क्षण उभा असतो. भानावर येतो नि नशिबाला बोल लावत पैसे खिशात टाकून मोकळा होतो. दरम्यान म.र. नि नि.र. दोन्ही रस्ते मोकळे झाल्याने हुश्श: करत मागचे सारे मोकाट सुटतात. गजरेवाला पुढच्या गाडीवाल्याची वाट पाहात ताटकळत उभा राहतो.

---

ऐटबाज चेहर्‍यावरचा दीड-एक हजार रुपयांचा गॉगल, जोडीदाराच्या अंगावर असलेली पाच ते सात हजारांची साडी आणि पाच ते आठ लाखांची गाडी खरेदी करताना याला पैसे कमी पडले नसावेत. गजरेवाल्याप्रमाणेच रस्त्याच्या कडेला गाडी लावून विकले जाणारे शंभर-दीडशे रुपयांचे गॉगल त्याला ‘बिलो डिग्निटी’ वाटत असावेत. चांगल्या दर्जाचे, पण अन-ब्रँडेड कपडे त्याला चालत नसावेत. पैसे देताना– देणार्‍या हातात घातलेली अंगठी पितळेची आहे की सोन्याची हे त्याला स्वत:ला खात्रीपूर्वक सांगता आले नसते. त्यात घातलेला खडा वा हिरा खरा आहे की खोटा याचीही त्याला गंधवार्ता नसते. तरीही सुवर्णकाराने सांगितलेली (आणि वर डिस्काउंटची भाषा करून थातुरमातुर कमी केलेली) किंमत त्याने निमूट मोजली असेल. पण गजरेवाल्याचे पाच रुपये मारण्यासाठी भर चौकात चालत्या गाडीत बसून त्याने पेट्रोल जाळले होते, म.र. नि नि.र. दोहोंकडे अडकलेल्या वाहनांनाही जाळण्यास भाग पाडले होते. यातून पाच रुपयांहून अधिक रकमेची नासाडी त्याने केली होती. पण याची त्याला समजच नव्हती.

यावरून मला ‘डिस्काउंट असेल तरच पुस्तक खरेदी करणार, तीनशेहून अधिक रकमेचे पुस्तक खरेदी करणार नाही,’ म्हणणारे पण बारमध्ये बसल्यावर पुर्‍या बाटलीच्या किंमतीमध्ये एक पेग विकत घेताना कोणतीही घासाघीस न करणारे, वर वेटरला उदारहस्ते टिप देणारे मित्र आठवतात. ऋण काढून सण साजरे केल्यासारखे कुवत नसताना आयफोन, आयपॅड मिरवणारे, पण आरोग्य-विमा (health-insurance) मात्र ‘महाग आहे’ म्हणून न घेणारे मित्र आठवतात. इतरांकडे आहे म्हणून चार-चाकी गाडी घेऊन पेट्रोल– चुकलो, डीजल परवडत नाही म्हणून दारी शोभेची वस्तू म्हणून उभी करुन ठेवणारे, पण त्याचवेळी पैसे वाचवण्यासाठी अर्धा रविवार– कुटुंबाला न देता, स्कूटर हाणत मंडई वा मार्केटयार्डमध्ये जाऊन आठवड्याभराची स्वस्त(?) भाजी घेऊन येण्यावर खर्च करणारे आठवतात...

आपल्या जगण्याचे प्राधान्यक्रम गंडले आहेत असे यांना वाटत नसावे का? आरोग्य-विम्यापेक्षा आयफोन हवासा वाटत असेल, तर आपल्या गरजांची व्याख्या दुसरेच कुणी करते आहे याचे भान आपल्याला कधी येईल? मुळात ज्यांच्या आठवड्याभराच्या भाजीचे एकुण बिल दोनशेच्या वर जात नाही, त्यांचे किती पैसे घाऊक खरेदी केल्याने वाचणार आहेत?

त्यावर एक पळवाट असते की तिकडे चांगली भाजी मिळते म्हणे. सोने गुंतवणूक म्हणून फायदेशीर नाही हे दाखवून दिल्यावर, ‘पण ते ल्यायलाही मिळते’ ही पळवाट जशी काढली जाते तसेच हे. ते खरे असले तरी बरोबर घट नि घडणावळ नावाचे तोट्याचे हिस्से येतात, ते मात्र मोजायचे नसतात... जसे इथे वेळ नि ऊर्जा जमेस धरायची नसते. खरा धार्मिक-खोटा धार्मिक, आर्थिक मध्यमवर्गीय वि. मानसिकतेने मध्यमवर्गीय वगैरे पळवाटा याच जातीच्या. गैरसोयीच्या, तोट्याच्या बाजूकडे दुर्लक्ष करत आपले पूर्वग्रह जपणे हा ग्राहक म्हणून, गुंतवणूकदार म्हणून, सश्रद्ध म्हणून, नास्तिक म्हणून, पुरोगामी म्हणून, धर्मराष्ट्रवादी म्हणून आपल्या प्रत्येकाची सवय असतेच. तिथे पुन्हा ‘आपला गट सोडून ती इतरांमध्येच आहे’ हा एक जास्तीचा नि सामायिक पूर्वग्रहदेखील असतो.

कौतुकाने पत्नीसाठी गजरा घेताना तो मिळाल्यावर तिच्या चेहर्‍यावरचा आनंद अधिक सुखदायक, की पाच रुपये वाचवण्याच्या खटाटोपात तिच्या चेहर्‍यावर उमटलेला वैताग? चलनात मोजलेली किंमत हे सुखाचे, आनंदाचे, समाधानाचे मोजमाप कधीपासून झाले याचा विचार कधी करावासा वाटतो का? विकत घेतलेला ‘गजरा मोहोब्बतवाला आहे, घासाघीसीचे पंधरा रुपयेवाला नाही’ याची जाणीव बायकोला झाली तर ती अधिक आनंदी होईल ना? त्यातून नाते अधिक दृढ होईल की आठ लाखाच्या कारमध्ये बसून, दहा मिनिटे खर्च करुन, वट्ट पाच रुपये वाचवल्यानंतर?

असे प्रसंग पाहिले, की बार्गेनिंग करणार्‍या जमातीबद्दलची माझ्या मनातील तिडिक अधिक तीव्र होत जाते. आपल्या महान देशांतील हे खुजे लोक, ‘घासाघीस केली नाही तर आपल्याला फसवतील, किंवा इतरांना स्वस्त मिळेल नि आपण जास्त पैसे देऊन येऊ’ या न्यूनगंडाने पछाडलेले असतात. दुसरीकडे घासाघीस या प्रकाराने जगण्यातील अनेक वस्तूंबाबत गुणवत्तेची ऐशीतैशी होते हे यांच्या ध्यानात येत नाही. सतत स्वस्त ते उचलायचे या एकांगी भूमिकेने गुणवत्ता असलेले पण अधिक किंमतीचे उत्पादन स्पर्धेबाहेर फेकले जाते. वर हे जीव ‘दोन्हींची गुणवत्ता सारखीच आहे’ असे अट्टाहासाने प्रतिपादन करत राहतात, कारण ‘आपण गुणवत्तेशी तडजोड केलेली नाही’ हे ते स्वत:ला नि इतरांना पटवू पाहात असतात. (दुसरीकडे ‘महाग तेच गुणवत्ता असलेले’वाली जमात असते, पण हा लेख त्यांच्यासाठी नाही.)

इतिहास हा देशाच्या प्रगतीच्या वाटेवरली क्विकसँड किंवा दलदल आहे, तसेच बार्गेनिंग करणे ही ग्राहकाच्या मनोभूमिकेतील. ही विषवल्ली उपटून टाकली तर आपली ऊर्जा, वेळ तर वाचतोच, पण खरेदीतला, उपभोगातला आनंदही अधिक निष्कलंक, निर्भेळ होत जातो. बघा एकदा प्रयत्न करून.

-oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा