शनिवार, १३ एप्रिल, २०२४

हे ही असेच होते...ते ही तसेच होते

(परस्परविरोधी विचारांचे(?) झेंडे घेतलेल्या दोघांचे अनुभव.)

जय श्रीराम

TwoFlagsAlike

आमच्या सोसायटीमध्ये सलग तीन इमारती आहेत. पैकी आमच्या शेजारील इमारतीमध्ये एक उतारवयाकडे झुकलेले गृहस्थ राहतात. अयोध्येमधील राममंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशीच्या उन्मादात ते अक्षरश: लहान मुलांनी हंडीच्या वेळी अथवा गणेश-विसर्जन मिरवणुकीत नाचावे तसे नाचत होते. तिकडे प्रतिष्ठापना पुरी झाल्यावर हे सोसायटीतील घरोघरी जाऊन ‘पूजा केली का?’ विचारत होते नि देवघराचा फोटो काढत होते. मला विचारल्यावर मी ‘हो’ म्हणून वाटेला लावण्याचा प्रयत्न केला. त्यावर ‘फोटो काढायचे आहेत’ म्हणत घरात घुसू लागले. त्यांना थोपवत मी आडवळणाने कारणे सांगून वाटेला लावले.

दाराशी आलेल्या प्रचारकांकडून स्वीकारलेली अक्षत आईने त्या दिवशी देवावर वाहिलीही होती हे तिने मला नंतर सांगितले. (मला छुपा मनुवादी म्हणण्यास उत्सुक नि होश्शियार बसलेल्या स्वयंघोषित पहिल्या धारेच्या पुरोगाम्यांसाठी हा दारूगोळा माझ्याकडून सप्रेम भेट.)

दुसर्‍या दिवशी सकाळी प्रभातफेरीहून परतताना पाहिले की हे महाशय येणार्‍या जाणार्‍या अपरिचितालाही ‘जय श्रीराम’ म्हणून अभिवादन करत नाचत होते. एखाद्याचे लक्ष नसेल तर तरातरा चालत जवळ जाऊन लक्ष वेधून घेत. बहुतेक सगळे प्रति-अभिवादन करत.

मलाही ‘जय श्रीराम’ म्हटल्यावर मी हसून हात केला. ते आणखी दोन पावले पुढे येत म्हणाले, “जय श्रीराम”. मग मी “राम राम” म्हणून अभिवादन केले. त्यावर ते ‘जय श्रीराम’ म्हणा असा आग्रह धरू लागले. म्हटलं, “आम्ही वर्षानुवर्षे असे अभिवादन करत आलो आहोत. फोनवर बोलताना परिचित, जवळची व्यक्ती असेल तर मी ‘राम राम’ म्हणूनच संवाद सुरू करतो.” त्यांना एवढंही पुरेसं नव्हतं. “पण ‘जय श्रीराम’ म्हणायला काय हरकत आहे?”

मग माझं झाकण उडलं. मी ताडकन म्हटलं, “मी कसं अभिवादन करायचं हा माझा प्रश्न आहे. ते तुम्ही मला सांगायची गरज नाही.”

एकुणात सश्रद्धांची जुलूमजबरदस्ती हा का नवा मुद्दा नाही. सार्वजनिक कार्यक्रमांच्या नावाखाली रस्ते अडवून दहा-दहा दिवस मांडव घालणे नि आपल्या देवाचे भक्त नसलेल्या सरसकट सर्वांची वाट अडवणे, भलेमोठे स्पीकर्स लावून त्यावर ‘जलेबी बेबी’ वाजवत सर्वांना भक्तिभाव शिकवणे, मिरवणुकांमध्ये वा एरवीही फटाक्यांची आतषबाजी करून श्रद्धाळू, पर-श्रद्धाळू, अश्रद्ध सर्वांच्याच फुप्फुसात धूर सोडून त्यांना निर्जंतुक करणे वगैरे कामे हे लोक स्वयंस्फूर्तीने करत असतात.

मी त्यांना म्हटलं, “मी ‘जय श्रीराम’ का म्हणत नाही असा प्रश्न तुम्ही विचारत असाल, तर ‘तुम्ही सर्वसमावेशक ‘राम राम’ का म्हणत नाही?’ असा प्रश्न मी विचारू शकतो. ‘राम राम’ हे आपल्या वारकरी पंथाने दिलेले अभिवादन आहे, तर ‘जय श्रीराम’ हे द्वेषमूलक राजकारणाचं अपत्य आहे. कुणीतरी दिल्लीतून ऑर्डर सोडतो म्हणून आमचा वारसा आम्ही का सोडावा?”

तोंड वेडेवाकडे करीत, “हे एक नवीनच समजलं.” म्हणून ते जवळच्या तिसर्‍याकडेच त्याने सामील व्हावे अशा अपेक्षेने पाहू लागले. त्यावर तो बिचारा ही ब्याद नको म्हणून वेग वाढवून निघून गेला. मग मी ही वस्तरा घडी करून घरी परतलो.

जय संविधान

काही काळापूर्वी माझ्या एका मित्राकरवी मला एक दीर्घ असा व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड आला. यात एका तरुणाने आपला वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनुभव लिहिला होता.

त्याची पत्नी आमच्या भागातील एका हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी अ‍ॅडमिट होती. त्यात काही गुंतागुंत होऊ लागली होती. सर्व योग्य पद्धतीने हाताळले जात असून आणि वरकरणी सर्व ठीक दिसत असूनही मुलाच्या हृदयाचे ठोके मंद होऊ लागले होते. अखेर त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरने परिस्थिती गंभीर असल्याचे आणि पत्नी व मूल दोघांच्याही जिवाला धोका असल्याचे त्या तरुणाला सांगितले आणि एखाद्या अधिक अनुभवी तज्ज्ञाकडे नेण्याचा सल्ला दिला.

दरम्यान ‘सेकंड ओपिनियन’ म्हणून समोरच असलेल्या अन्य एका हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरांशी हे डॉक्टर बोलले. त्यांनी त्या स्त्रीला तातडीने भरती करून घेतले. तपासणीअंती अत्यंत दुर्मीळ अशी स्थिती असल्याचे भाकित त्यांनी केले. त्यावर उपचारही सुरू केले. चोवीस तासांत त्या स्त्रीची सुखरूप सुटका झाली. मूलही सुदृढ निपजले.

हे दुसरे डॉक्टर रुग्णाला/नातेवाईकांना बारीक सारीक तपशीलासह, शक्य तितक्या सोप्या भाषेत परिस्थिती समजावून सांगत असल्याने ही पुरी केस त्यांनी त्यांनी त्या तरुणाला उलगडून सांगितली. तो तरुण बर्‍यापैकी शिक्षित असल्याने त्याला त्याचे गांभीर्य ध्यानात आले. त्याने तो सारा अनुभव लिहून काढला नि काही परिचितांना पाठवला. तो काही परिचितांमार्फत फिरत माझ्याकडे आला होता.

पहिल्या डॉक्टरकडे असता आशा सोडलेल्या त्या पती/बापाची जिवाची उलघाल, तो सारा प्रवास वाचून त्या अंती त्याची मानसिक अवस्था कशी असेल याचे दर्शन त्यातून घडत होते. हा तरुण लेखनक्षेत्राशी संबंधित नव्हता. कदाचित एरवी तो एखाद्या मुद्द्यावर सुसंगत लिहू/बोलूही शकला नसता. परंतु तो अनुभव अक्षरश: एकटाकी लिहिल्यासारखा प्रवाही भाषेत त्याने लिहिलेला होता.

यात आणखी एक वैय्यक्तिक आस्थेचा मुद्दा म्हणजे ते दुसरे डॉक्टर हे माझेही फॅमिली डॉक्टर आहेत.

हा अनुभव एका पुरोगामी, बुद्धिजीवी, लेखक वगैरेंच्या एका गटाला पाठवला. एका वंशपरंपरागत पुरोगाम्याचा तातडीने प्रतिसाद आला, “यात तो बाप ‘देवाच्या कृपेने आम्ही सारे यातून सुखरूप बाहेर पडलो.’ असे म्हणतो आहे. त्यावर तुझे काय म्हणणे आहे?” संपूर्ण अनुभव, त्यातील त्या बापाची तडफड, त्या डॉक्टरची चाणाक्ष बुद्धी व ज्ञान, पहिल्या डॉक्टरचे प्रसंगावधान यातील कशाचाही स्पर्श त्याला झाला नसावा. (कदाचित त्याने पुरे वाचलेही नसावे.) ते एक शेवटचे वाक्य धरून तो ‘जितं मया’चा डान्स करायला उगवला होता.

मी म्हटलं, “एकतर ज्याने तो मेसेज लिहिला आहे तो माझ्या मताचा असण्याची गरज आहे का? दुसरे, बोली भाषा ही नेहमीच विचारांशी कायम सुसंगत असते असे नाही. त्याक्षणी शब्दाच्या काटेकोरपणाऐवजी त्यामागची भावना लक्षात घ्यायला हवी.

“मी ही अनेकदा बोलण्याच्या ओघात ‘अरे देवा’ असा उद्गार काढतो किंवा ‘दुर्दैव’ हा शब्द वापरतो. याचा अर्थ मी त्याक्षणी देवाचा धावा करतो आहे असे नव्हे किंवा मी दैवावर विश्वास ठेवतो आहे असे नव्हे. भाषेवर परिसराचे, संवादाच्या दुसर्‍या बाजूच्या शब्दकळेचे काही संस्कार नकळत होत असतात.

माझ्या मते पुरोगामी वर्तुळात असे शब्दांशी खेळ करणं नि श्रद्धाळूंची कर्मकांडे यात काही फरक नसतो. वरच्या ‘जय श्रीराम’वाल्यासारखे कर्मठ पुरोगामी असतात. त्याला ‘राम राम’ चालत नाही, ‘जय श्रीराम’च हवा असतो, आणि इतरांनीही आपल्याच पद्धतीने अभिवादन करण्याचा अट्टाहास तो करतो. तसेच हे कर्मठ पुरोगामी तिथे ‘व्यासपीठ म्हणायचे नाही, विचारपीठ म्हणायचे’ असे बजावत असतात.

एकतर व्यासाने यांचे काय घोडे मारले मला माहित नाही. दुसरे म्हणजे खरंतर व्यासपीठ या शब्दाचा नि व्यासाचाही काही संबंध नाही. व्यस् म्हणजे मांडणे, रचना करणे- जिथे आपण बोलून मुद्द्यांची मांडणी करतो अशी पीठ म्हणजे आसनाची जागा. किंबहुना विखुरलेल्या वेदांची नीट रचना केली म्हणून व्यासाला ‘वेद-व्यास’ हे नाव पडलं(१). (त्यांचे मूळ नाव कृष्ण-द्वैपायन.) अर्थात पुरोगामी वर्तुळात एकुणच ब्राह्मण नि संस्कृत या दोहोंचेही वावडे असल्याने (एकदा मनुवादी व्हायचंच म्हटल्यावर हे ही लिहून टाकू. :) ) असा एकांगी दुराग्रह– ‘जय श्रीराम’ वाल्यासारखाच– केला जात असावा.

“पण त्या डॉक्टरचे श्रेय तो देवाला देतो आहे हे तुला खटकत नाही का?” त्याची गाडी त्याच्या स्वयंघोषित पुरोगामित्वावर (जे इतर अनेक ठिकाणी बाधित झालेले मीच दाखवून देऊ शकलो असतो) अडली होती.

मी म्हटलं,“हा एवढा दीर्घ अनुभव त्याने लिहिला त्यात कुठली पूजाअर्चा, अनुष्ठाने, गंडेदोरे केल्याचे तपशील आहेत की डॉक्टरने सांगितलेल्या माहितीचे, त्याने केलेल्या धडपडीचे? आपल्या आसपासच्या सार्‍यांशी हा अनुभव शेअर करावासा वाटला तो ‘देवाची कृपा’ म्हणून की एका डॉक्टरने दुर्मीळ स्थिती ओळखून योग्य उपचाराची तजवीज केली म्हणून?” (जी पहिल्या डॉक्टरच्या ध्यानात आलेली नव्हती, त्याला तो तर्क करता आला नव्हता. पण लगेच अडाणीपणाने ‘तो डॉक्टर कमी अकलेचा’ असा ग्रह यातून करून घ्यायचा नसतो.)

अर्थात देवाचे नाव आल्यावर त्याची पुरोगामी बाभळ बुडली ती बुडलीच. त्या व्यक्तीच्या भावना, डॉक्टरचे ज्ञान, एकुण त्या अनुभवातून दिसलेली माणसांची बांधिलकी याबद्दल बोलावे असे त्याला वाटले नाही. त्याचप्रमाणे ‘जय श्रीराम’ वाल्याला आपण आपली अभिवादनाची पद्धत दुसर्‍यावर लादणे चुकीचे आहे याचा गंधही नव्हता.

भावनेला दुय्यम मानणे हे ‘जय संविधान’ वाल्याचे लक्षण होऊ पाहते आहे, तर भावनेच्या फसफसणार्‍या फेसालाच आपले साध्य समजणे हे ‘जय श्रीराम’वाल्याचे. सदैव एकाच चष्म्यातून जगाकडे पाहात ते एकरंगी असल्याची तक्रार करण्याचा गाढवपणा मात्र दोहोंचा समान आहे.

-oOo-

(१). ही व्युत्पत्ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभाग-प्रमुख श्रद्धा कुंभोजकर यांच्याकडून साभार.

संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा