विचाराचे वावडे नि माणसांची ड्रांव ड्रांव
कळत्या वयापासून मी कोणतेही कर्मकांड, उपासना करणे बंद केले. अर्थात घरच्यांनी ते करण्यास माझा विरोध नव्हता/नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असे मी मानतो. इतकेच काय त्याला लागणारे साहित्यही आणून देत असे.
पण त्यामुळे आमचे तीर्थरूप आमच्यावर उखडून होते. म्हणजे ते स्वत: काही करत/करतात असे मुळीच नाही. अस्सल भारतीय मानसिकतेप्रमाणे जे काय करायचे ते काटेकोर करायचे नि ते इतरांनी - म्हणजे आईने - करायचे असा त्यांचा बाणा होता. आपण नाही का ज्ञानेश्वर जन्मावेत पण इतरांच्या घरी, तुकोबा जन्मावा पण तो आमचा जावई म्हणून नको, शिवाजी जन्मावा तो फार लांब नको म्हणून शेजारच्या घरी...
अलीकडचे पाहिले तर ’हौं जौं द्या एकदाचे युद्ध, पण जवान आमच्या घरुन नाही ते तिकडे गावाकडून घ्या.’ अशा बाण्याचे राष्ट्रभक्त असतात ना, त्याच माळेतले मणी. संपात सामील न होता शासनभक्ती/मालकभक्ती दाखवून त्यातून मिळवलेल्या फायद्याचे मात्र काटेकोर गणित करणारी मंडळी असतात ना तशा प्रकारचे. त्याग, गुंतवणूक इतरांनी करावे नि आम्हाला फक्त झेंडा मिरवायला द्यावा.
एकदा काही कारणाने खटका उडाला नि तीर्थरुप वैतागून म्हणाले, ’हे कम्युनिस्ट देवाला विचारत नाहीत, आम्हाला काय विचारणार उद्या.’ मी ठो: ठो: हसत सुटलो नि ते आणखी भडकले.
केवळ मी पूजा-अर्चा करत नाही म्हणजे मी कम्युनिस्ट हा निकाल ऐकून मी हसत सुटलो होतो. कम्युनिस्ट असणं म्हणजे काय, हे तेव्हाही मला माहित नव्हतं, आजही माहित नाही. तसं ते कम्युनिस्ट म्हणवणार्यालाही ठाऊक असेल असे नाही. कारण प्रत्येकाची व्याख्या ही तंतोतंत सारखी असेलच असे नाही. मी नास्तिकतेचा दावाही करत नाही... आस्तिकतेचाही. दोन्हीची मला गरज वाटत नाही.
पण कर्मकांड न करणे म्हणजे कम्युनिस्ट असणे असले सरधोपट निर्णय करु शकणार्यांचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. जगणे खूप सोपे असते त्यांचे. देव सर्वोच्च, मग आईबाप ही त्यांची उतरंड; आमच्या बाबत कदाचित उलट असू शकते असा विचारही आमच्या वडिलांनी केला नव्हता, इतरही फारसे कुणी करत असतील असे मला वाटत नाही.
घरचे मतभेद तसे निरुपद्रवी असतात, सहज मिटवलेही जातात. कारण तिथे भेदापेक्षा सांधणारे बंध अधिक बळकट असतात. प्रश्न असतो तो ‘ही मानसिकता उंबरा ओलांडून घराबाहेर पडते तेव्हा काय होते?’ हा. आपल्या आसपास काही लोक आपल्या पार्टीचे, काही विरोधी पार्टीचे हे ही ठरलेले. बरं हे देखील आपण ठरवायची गरज नाही. जन्माबरोबरच या पार्ट्या – जात, धर्म, वंश, कुलदैवतादि विभागणीतून – तयार मिळतात. आपण फक्त आपलीच पार्टी भारी हे कोणत्याही मूल्यमापनाखेरीज ठरवून याच्या-त्याच्यावर भुंकत राहायचे. इतके पुरते.
आपल्या जगण्याची चौकट बिनचूक, आपले नीतिनियम नेमके नि अपरिवर्तनीय; आपल्याच काय इतरांच्याही बाबत ते तसेच काटेकोरपणे पाळले जावेत. एखाद्याने थोडे डावे-उजवे केले, एखाद-दोन मुद्द्यावर आपले मतभेद झाले की बस्स, आपल्या दोन पार्ट्या झाल्या आता असे ते जाहीर करणार. मग तुम्ही नेहमीच यांच्या विरोधी असणार हे ठरवून टाकतात.
म्हणजे बघा त्यांना पांढरा रंग आवडत असेल की लगेच ‘तुमच्यासारखे काळा रंग आवडणारे येडपट...’ किंवा यांना आंबा आवडत असेल तर ‘हॅ: तुमच्यासारखे आंबा न आवडणारे लोक...’ असे म्हणून तुमची उणीदुणी काढायला तयार. सदोदित तुम्ही आमच्या विरोधी पक्षातच असला पाहिजेत– नव्हे आहातच असा दुराग्रह घेऊन जगणारे लोक हे. चार गोष्टींत सहमती, चार गोष्टींत असहमती असू शकते याची समजच नाही. तेवढी बौद्धिक कुवतच विकसित झालेली नसावी. किंवा त्या रंगावर वा फळावर फक्त आपल्याच गटाचा एकाधिकार स्थापित करण्याचा स्वार्थी विचार – तो अव्यवहार्य आहे हे समजण्याइतकी बुद्धी नसल्याने – देखील त्यात असू शकतो.
माणूस आदिम काळात टोळ्या बनवून राहायचा, नि प्रतिस्पर्धी टोळी ही विरोधक नव्हे तर शत्रूच मानून चालायचा. तीच मानसिकता आजही घेऊन जगतो आपण. प्रतिस्पर्ध्याचा एखादा माणूसच काय त्यातले एखादे लहान मूलही रांगत आपल्या हद्दीत आले तरी ठार मारणार्यांचे हे वंशज. आज ठार मारत नसलो, तरी इतर कुणी मारले की मनातल्या मनात सुखावतो नक्की. ’त्यांची’ संख्या कमी झाली असा अमानवी विचार दळभद्री मनांतून डोकावतोच, तो रानटी पूर्वजांचाच वारसा आहे.
पुलवामा हत्याकांडानंतर ‘आता तुम्हाला आनंद झाला असेल’ किंवा आजच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर ‘आज तुम्हाला दु:ख झालं असेल ना?’ असं पलीकडच्या गटात ढकलून दिलेल्यांना विचारणारे बुद्धिहीन याच रानटी जमातींचे अजून शिल्लक असणारे वंशज आहेत असे माझे प्रामाणिक मत आहे.
आपणच आरोप करतो त्यानुसार ‘हे पाकिस्तानच्या व्यक्तींचा जीव जाऊ नये म्हणून प्रयत्न करणारे देशद्रोही, ते आपल्याच चाळीस माणसांची हत्या झाल्यावर आनंदी कसे होतील?’ असा प्रश्न या बेअक्कल माणसांना पडत नसावा. किंवा उन्माद इतका, की शत्रूपेक्षाही हे विरोधक आधी मारले पाहिजेत इतका जहरी द्वेष रक्तात मुरलेला असावा. निर्बुद्धपणा इतका असावा की ‘हे आपले विरोधक पाकिस्तान्यांना वाचवून आपल्या लोकांच्या मरणाचा विचार करतात’ असा समज करुन घेत असावेत.
इतकी निर्बुद्ध जमात या देशात जन्मली कशी हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि या जमातीकडून देशाला प्रगतीपथावर नेले जाण्याची आशा असणारे सुशिक्षित लोक आपल्या डोक्यातला मेंदू कुठल्या फ्रीजमध्ये ठेवून जगत असावेत असाही एक प्रश्न पडतो आहे.
शेवटी बेडकांना ड्राव ड्रांव करणेच जमणार. त्यांच्याकडून माणूस असण्याची अपेक्षा ठेवणं हा माणसाचा गाढवपणा ठरतो.
कुणाच्या खांद्यावर...
मी कायमच ‘विरोधी पक्षाची’ भूमिका स्वीकारलेली असते. २०१४ पर्यंत राजकीयदृष्ट्या काँग्रेस-विरोधक असलेला मी भाजप सरकार अधिकारारूढ झाल्यावर भाजप-विरोधक झालो. ही माझी भूमिका नि त्या अनुषंगाने विविध संदर्भातील माझे विश्लेषण, भाष्य, उपहास, अधिक्षेप मी स्पष्टपणे मांडत असतो.
मध्यंतरी एका प्रोजेक्टमध्ये अडकलेला असल्याने दोन महिने मी फेसबुकपासून दूर होतो. तेव्हा आणि एरवीही अनेक मंडळी मला फोन करुन ‘तू लिहीत राहा बरं का रे. यांची खोड मोडली पाहिजे.’ असे तथाकथित प्रोत्साहन देत. ‘अरे पण तुला पटते, तर तुझ्या परीने तू ही लिहित जा की.’ असा सल्ला मी देई. त्यावर ‘अरे आम्हाला तुझ्यासारखं थोडीच लिहिता येईल.’ असं म्हणत मला हरभर्याच्या झाडावर चढवत (बिचारे मला फार जवळून ओळखत नसावेत) स्वत:चे शेपूट सोडवून घेत.
‘आम्ही काय बुवा सामान्य माणसं’ हा आव भारतीय मानसिकता अतिशय चतुराईने अंगावरची जबाबदारी झटकण्यासाठी वापरते असा माझा अनुभव आहे.
मोदी आणि मोदीभक्त यांना लष्कराने लढावे नि आम्हाला घरबसल्या युद्ध जिंकल्याचे श्रेय मिळावे, पत्रकारांना बोलावू बोलावू अलका टॉकीज चौकात पाकिस्तानला धडा शिकवल्याचे झेंडे मिरवता यावेत असे वाटते. त्यांचे देशप्रेम हे इतरांच्या जिवावर, इतरांच्या खर्चाने सिद्ध करायचे असते त्यांना. तसेच या तथाकथित मोदी-भाजप विरोधकांचे असते असे मला दिसून आले. स्वत:च्या वॉलवर फारसे काही नाही; किंवा अत्यंत सपक, कोणतेही माल मसाले नसणारे गुळगुळीत लेखन ही मंडळी करतात. आणि आतून हा असा जाज्ज्वल्य विरोध वगैरे बनाव.
रमतारामाच्या काठीने परस्पर साप मरावा अशी यांची इच्छा.
आणखी काही जण ‘आमचेही तुझ्यासारखे मत आहे रे. पण काय करणार. व्यावसायिक/ ऑफिसमधले संबंध खराब होतील म्हणून बोलता येत नाही.’ असे कारण पुढे करतात. ही जमात तर सर्वात नालायक. म्हणजे जे बदल घडावेत अशी यांची इच्छा आहे त्याच्यासाठी तुम्ही कष्ट करा हे निर्लज्जपणे सांगतात. आमच्या स्वार्थाला धक्का बसता कामा नये बरं का, रमतारामांच्या स्वार्थाला बसला तरी चालेल.
हा सणसणीत बेशरमपणा आहे हे यांच्या गावीही नसते. भित्रेपणे संपात सहभागी न होता मालक-निष्ठा दाखवत, त्यातून मिळालेल्या आर्थिक वाढीचे गणित मात्र इतरांपेक्षा अधिक चपळाईने करणारी.
मी तर म्हणतो कदाचित हे उलट दिशेने आपल्या भक्त बॉसशी बोलताना, ‘तो रमताराम ना. अरे डोक्यावर पडलेला आहे तो. सतत मोदींचा द्वेष. इतकं ग्रेट काम केलं मोदींनी...’ च्या आट्याही सोडत असेल. खरंतर ही जमात नेहमी ‘चित भी मेरी, पट भी मेरी’ प्रकारची असते. केवळ खासगीत तुमच्या बाजूला असलेल्या अशा व्यक्तिंवर भरवसा ठेवून नये, हे मी फार लहानपणी शिकलो आहे. एकवेळ सणसणीत विरोधक परवडला, तो तुम्हाला विरोध करणार हे बहुधा नक्की असते. (उलट कधी सहमत झालाच तर नुकसान नव्हे, फायदाच असतो) पण हे ‘मी तुमचाच’ म्हणणारे पाय अडकवून केव्हा पाडतील सांगता येत नाही.
यातली काही डरपोक जमात तुमच्या पोस्ट, मुद्दे उचलून सिक्रेट ग्रुपमध्ये नेऊन तुमची टिंगलटवाळीही करत असते. स्वत:च्या वॉलवर उघडपणे लिहिण्याची त्यांची छाती नसते. मग आपल्यासारखेच डरपोक जमवून ते सिक्रेट ग्रुपच्या बंद दाराआड या बाजूची, त्या बाजूची टवाळी करत बसतात.
लोकहो, आपापल्या विरोधकांपेक्षाही या जमातीपासून सावध नि स्वत:ला दूर राखण्याचा प्रयत्न करा. आणि ‘ऐशा अभक्ताशी संग शिरसी मा लिख मा लिख’ अशी आपापल्या देवाकडे प्रार्थना करा.
- oOo -
<< हे ही असेच होते... ते ही तसेच होते - २
---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा