सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९

भ्रमनिरास आणि अहंकाराची निरगाठ

माणूस आयुष्याच्या एका टप्प्यावर एखाद्या संकल्पनेने, एखाद्या विचारव्यूहाने, एखाद्या व्यक्तीच्या प्रभावामुळे इतका झपाटून जातो की’ ’बस्स, हेच काय ते एक सत्य’, ’हाच काय तो अंतिम सत्याचा/विकासाचा मार्ग’, ’हाच काय तो देवबाप्पाने आमच्या उत्थानार्थ पाठवलेला प्रेषित’ म्हणून भारावलेपणे तो त्याची पाठराखण करत राहतो.

GA_Antim

पण - माझ्या मते- जगातील कोणतीही विचाराची चौकट, व्यवस्था, व्यक्ती ही सर्वस्वी निर्दोष असू शकत नाही, ती कायमच यशस्वी होईल अशी खात्री देता येत नाही. माणूस भानावर असेल, डोळस असेल, तर हे सहज दिसूनही येते. देव-असुर, बरोबर-चूक, पवित्र-अपवित्र, तारक-मारक अशा द्विभाजित जगात राहणार्‍यांना हे बहुधा ध्यानात येत नाही. त्याला अर्थातच एका कळपात राहण्याची, एकट्याने उभे राहण्याच्या भीतीची जोडही असतेच.

पण डोळसांचा अनेकदा भ्रमनिरास होतो. सारे आयुष्य ज्याच्यामागे गेले, त्यातील न्यूने अनेकदा खूप खोलात शिरल्यावर दिसू लागतात. म्हणूनच बहुधा वेद, कुराण, बायबल, मॅनिफेस्टो न वाचलेलेच त्यात सर्व ज्ञान आहे, किंवा जगण्याची निर्दोष अशी चौकट ती एकच आहे असे अज्ञानमूलक दावे करतात. पण त्यांचे असो.

ज्यांचा भ्रमनिरास होतो, अशी मंडळी अनेकदा इतरांकडे तर सोडाच, पण स्वत:शीही त्याची कबुली देत नाहीत. पण त्यांच्या वर्तणुकीतून ते सहज दिसू लागते. कधी नव्हे इतके आक्रमक होऊन ते त्यांच्या श्रद्धास्थानांवरचे आक्षेप धुडकावून लावू लागतात. (खोडून काढतात असे मी म्हटलेले नाही!) चर्चेपेक्षा आक्षेपांची मुस्कटदाबी करणे ते अधिक हिरिरीने करतात. कारण साधक-बाधक चर्चेत त्यातील काही आक्षेप - खरे आहेत हे त्यांनाही ठाऊक असल्याने - ठळक होतील, अशी त्यांना भीती असते.

दुसरे असे की इतका काळ ज्याचा हिरिरीने पुरस्कार केला त्यातील न्यूने मान्य केल्याने त्यांच्या स्वत:च्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहील अशीही त्यांना भीती असते. चारचौघात त्यांचे हसे होईल, ही आणखी एक भीती त्यांना वेढून राहते. शिवाय कायम गटांच्या स्वरुपातच विचार करु शकणार्‍या समाजात सद्य गटातून हाकलले जाण्याची आणि अन्य गटांनी जवळ न करण्याची एक भीती असतेच.

मुद्दा या भीतींपासून दूर होण्याचा असतो. स्वच्छ नजरेने पाहिले, तर आपल्या संकल्पनेतील, विचारव्यूहातील, श्रद्धास्थानातील न्यूने सहज दिसतात. मोकळ्या मनाने ती मान्य केली, की माणूस त्यांची चिकित्सा करु शकतो, त्यांत सुधारणा करु शकतो. पण ’आम्ही काय बुवा, सामान्य माणसं. आम्हाला कसं जमणार.’ या सर्वस्वी आळशी, स्वार्थलोलुप तर्काच्या खाली ही शक्यता बहुतेक मंडळी दडपून टाकतात.

रुढार्थाने डावे म्हटले जातात अशा मंडळींनी असे सिंहावलोकन केल्याची, आपल्या मार्गावरील न्यूने, दोष यांचे मूल्यमापन केल्याची, क्वचित त्यांचा त्याग केल्याचीही उदाहरणे आहे्त. प्रभाकर उर्ध्वरेषे यांनी ’एका माजी कम्युनिस्टाचे मनोगत’ लिहिले. पु.य. देशपांडे यांच्यासारखी व्यक्ती (विष्णूपंत चितळे आणखी एक नाव) तर थेट अध्यात्माचा मार्ग स्वीकारती झाली.

उजव्या मंडळींत हे प्रमाण एकुणच नगण्य असावे. माझ्या पाहण्यात तरी असे कुणी नाही. फारतर विशिष्ट संघटनेपासून दूर होतील, पण विचारांतच न्यून आहे हे मान्य केलेले जवळजवळ नाहीतच. उजवी मंडळी लगेच खूष होऊन म्हणतील ’आमच्या विचारांत न्यून नाहीच मुळी. म्हणून कुणाला सापडत नाही.’ नेमके हेच विधान आत्मसंतुष्टतेचा पहिला दोष घेऊन उभे आहे. स्व-विचाराची परखड चिकित्सा हा गुण उजव्यांमध्ये दुर्मिळच आहे. 'माझा विचार मी त्यातील दोषांसकट स्वीकारला आहे’ अशी नितळ दृष्टी तिथे नसतेच. दोषच नाहीत असा दुराग्रह सतत दिसतो.

पुय आयुष्याच्या उत्तरार्धात अध्यात्ममार्गी झाले, त्याच्या उलट मीनाताईंच्या निधनानंतर उद्वेगाने बाळासाहेब ठाकरेंनी सार्‍या रुद्राक्षमाळा काढून ठेवल्या होत्या (ही दोन उदाहरणे दिल्यावर आमच्या एका अति-उजव्या तरुण मित्राने फक्त पुयंबद्दल कुतूहलाने चौकशी केली होती. ) अर्थात ते राजकारणाशी संबंधित असल्याने त्यांना अन्य कारणाने त्या पुन्हा चढवाव्या लागल्या होत्या. परंतु हे विचारांमुळे नव्हे तर उद्वेगाने, वैयक्तिक दु:खाची प्रतिक्रिया म्हणून घडले होते हे लक्षात ठेवायला हवे.

मला स्वत:ला धर्माधिष्ठित विचार असो, समाजवादी विचार असो, त्याही पुढे जाणारा कम्युनिस्ट विचार असो की सामाजिक विचार सरळ फाट्यावर मारुन आर्थिक व्यूह मांडणारी भांडवलशाही असो; या सार्‍यांच्या मुळाशी स्वप्नाळू (utopian) अशी गृहितके दिसतात. व्यावहारिक, भौगोलिक, सामाजिक, पर्यावरणीय, आर्थिक, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अन्य विचार/व्यवस्थेचे सह-अस्तित्व यामुळे या गृहितकांच्या आधारे त्यांनी मांडलेला कार्यकारणभाव कसा निसटतो याचे विवेचन अभ्यासकांनीही फारसे केलेले दिसत नाही... अपवाद मार्क्सबाबाचा. (पण त्याबद्दल लवकरच 'अन्यमुखे बोलवीन'.)

अशा वेळी ’वेदांत सगळे ज्ञान आहे’ असे विधान करणारा, एका प्रश्नातच त्या दाव्याची वासलात लागते हे ही मान्य नसलेला, काही साधक-बाधक विचार करील नि आपल्या विचारांतील कच्चे दुवे शोधून काढील हे अशक्यच आहे.

विचारांचे सोडून देऊ. निदान व्यावहारिक आयुष्यात तरी आपण आपली चूक मान्य करुन पुढे जाऊ शकतो का हा माझ्यापुढचा प्रश्न आहे. एका संस्थळावर मी ’असा मी, तसा मी... आता मी’ या शीर्षकाखाली एक लेखमाला लिहावी म्हणून लेख टाकला होता. हेतू हा की आपल्या जुन्या धारणा, आपली निवड, आपले विचार नक्की केव्हा नि कोणत्या आधाराने बदलले याचा धांडोळा घेता यावा. इतरांच्या अनुभवाशी तो ताडून पाहता यावा.

पण बुद्धिजीवी म्हणवणार्‍या, नॅनो-टेक्नॉलजी पासून सायक्लोट्रॉनच्या निर्मितीमधील आव्हाने अशा असंख्य विषयांवर तोंड वाजवणार्‍यांपैकी एकाही महाभागाने आपले अनुभव लिहिले नाहीत... यात कदाचित त्यांना ते बदलांचे आयाम शोधता आले नसावेत किंवा आपण बदललो हे सांगण्याची लाज वाटली असावी. उलट मला ’और आन्दो.’ असे प्रतिसाद मिळाले. मग मी आत्मचरित्र लिहितो आहे की काय अशी शंका मलाच यायला लागली नि तो प्रयोग बंद केला.

त्यामुळे गेल्या काही वर्षांत एक एक बाजू पकडून घनघोर लढाया करणार्‍यांनी आपल्या विरोधाची आक्रमकता वाढली आहे का, आपण उत्तर देण्यापेक्षा आक्षेपाची मुस्कटदाबी करत आहोत का याकडे बारकाईने पाहिले तर कदाचित त्यातील काहींना वास्तविक आपला भ्रमनिरास झाला आहे पण तो मान्य करण्याची आपली तयारी नाही हे ध्यानात येईल. ग्रेसच्या भाषेत सांगायचे तर ’आपल्या अहंकाराची वीण उसवून जऽरा सैल केली’ तर सतत त्रासदायक ठरणारे हे जोखड उतरवून ठेवल्यावर हलके वाटते याचा अनुभव घेता येईल.

अशांसाठी हा एक उतारा...

---

श्याम: असं कसं शक्य आहे काकाजी? आता लोक काय म्हणतील? परवा मी कॉलेजमधल्या मित्रांना भेटून त्यांचा निरोप देखील घेऊन आलो.

काकाजी: कशाबद्दल?

श्याम: मी त्यांना सांगितलं, की मी चाललो घर सोडून.

काकाजी: कुठे?

श्याम: आचार्य नेतील तिथे.

काकाजी: पण आचार्य कुठे जाणार आहेत?

श्याम: मला कुठे ठाऊक आहे!

काकाजी: त्यांना तरी कुठे ठाऊक आहे! विचार ते आल्यावर.

श्याम: पण मी दोस्तांना तोंड कसं दाखवू?

काकाजी: अरे, पण दोस्तांना तू परत आलास तर आनंद होईल की दु:ख?

श्याम: त्यातलं काहीच होणार नाही.

काकाजी: मग त्यांची चिंता कशाला?

श्याम: चेष्टा करतील ते माझी.

काकाजी: त्यांना घेऊन जा एखाद्या हॉटेलात. चांगली मुर्गीबिर्गी खाऊ घाल त्यांना. आणि म्हणावं- दोस्त, आपला बेत फिरला. कबूल कर, की मी गाढव होतो म्हणून. आपला गाढवपणा कबूल करावा. मझा असतो त्यात देखील. शतरंज खेळताना नाही आपली मूव्ह चुकत एखादवेळी- म्हणून काय गाढवपणालाच चिकटून बसायचं?

---

(तुझे आहे तुजपाशी, पृ. ७९-८०)


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा