गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

भस्मासुराच्या भस्मासुरांचा उदय - १

(....’युद्धखोर’ ही मोदींना कदाचित अपेक्षित नसलेली भूमिका माध्यमांनी त्यांच्यावर लादली. ते राजा बनू पाहात असताना माध्यमांनी त्यांना सेनापतीपद बहाल करुन टाकले आहे...)

---

दोन दिवसांपूर्वी एका मित्रांनी मला स्ट्राईकबाबतच्या एका प्रतिसादात टॅग केले होते. तेव्हा मी पुरेसे समजल्यावरच बोलेन असे लिहिले होते. एकतर आमची समज कमी आणि त्यात धुरळ्यामध्ये सारे स्पष्ट दिसेल इतकी इन्फ्रारेड विजनही नाही. त्यामुळे थोडा वेळ द्यावा लागतो समज विकसित व्हायला.

मी मूळचा संख्याशास्त्राचा विद्यार्थी, त्यामुळे पर्सेप्शन हा प्रकार आम्हाला पसंत नाही. डेटा महत्वाचा आणि त्याहून महत्वाचा त्याचा स्रोत नि त्याचा अभ्यासविषयाशी असलेला संबंध. उदा. ’भारतात आधी पूल बनवावेत की पुतळा?’ याचा सर्वे अमेरिकेत घेऊन उपयोग नाही (तिथले मूठभर भारतीय उत्साहाने पुतळा म्हणून मतदान करतील म्हणा) तो भारतात करायला हवा. तसेच भारताने आणखी मिराज विकत घ्यावीत की एफ-१६ याची कलचाचणी केवळ संरक्षण तज्ज्ञांमध्येच व्हायला हवी, लॉलिपॉप अथवा पॉप्सिकल्स चोखत बसलेला खंडू मतदान करु शकतो अशा न्यूज पोर्टलवरुन करुन उपयोगाची नाही. (अर्थात भारतीय माध्यमांना आपल्याला करोडो प्रकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगांचीही बरोब्बर माहिती आहे असा माज असतो म्हणा. पण ते सोडा.) त्यामुळे भारताने बालाकोट मध्ये केलेल्या हल्ल्याच्या प्रत्यक्ष नुकसान आणि त्या नंतर राजकीय वा डावपेचात्मक परिणामांची माहिती १. त्या निर्णयाशी संबंधित व्यक्तींकडून आलेली २. भारत-पाक यांच्या शिवाय त्रयस्थ माध्यमांतून आणि ती ही एकाहून अधिक ठिकाणी - स्वतंत्र स्रोतामार्फत - प्रसिद्ध झालेली असावी असे किमान दोन निकष होते. आज दोन दिवसांनंतरचे चित्र कसे दिसते. (अर्थात नवी माहिती येईल तसे हे बदलूनही घ्यायला हवे.)

भारतीय राजकीय नेतृत्व आणि संरक्षण क्षेत्रांकडून जी अधिकृत माहिती दिली गेली त्यात ’जैश चे तळ उध्वस्त केले आणि त्यांची भरपूर हानी झाली’ एवढीच माहिती आहे. बळींच्या संख्येचा त्यात कुठेही उल्लेख नाही वा नुकसानीचा कोणताही तपशील नाही. त्रयस्थ आंतरराष्ट्रीय माध्यमांतूनही कुठे याबाबत माहिती नाही. ३०० बळी वगैरे शोध हा फक्त भारतीय माध्यमांचा आहे. आता ते म्हणू शकतील की ही माहिती या हल्ल्याशी संबंधितांनीच आम्हाला ’ऑफ द रेकॉर्ड’ दिली आहे. पण मग डेविल्स अड्वोकेट बनून एखादा उलट दिशेने ’मी या बावळ्ट माध्यमांना तोंडघशी पाडण्यासाठी मुद्दाम खोटी माहिती पुरवली’ असे मलाही एखाद्या संबंधित अधिकार्‍याच्या कारकुनाने सांगितले आहे असा दावा करु शकतो. युअर वर्ड अगेन्स्ट माईन! काहीच सिद्ध होत नाही. तेव्हा केवळ अधिकृत पातळीवरील माहिती गृहित धरता येते आणि त्यात नुकसानीच कोणताही नेमका तपशील नाही!

कालपासून ’इम्रान यांनी याचना केली’, ’इम्रान/पाक यांचे लोटांगण’ अशा सनसनाटी पण स्वत:चा मूर्खपणाच जाहीर करणार्‍या बातम्या अनेक मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून दिसू लागल्या होत्या. यांना माध्यमांत कुणी बसवले असा प्रश्न पडलेला आहे मला.

एकतर वर्षानुवर्षे भारत आपण आक्रमक नव्हे, केवळ आपले संरक्षण करत आहोत असा दावा करत आलेला आहे. त्याचा फायदा म्हणून आंतरराष्ट्रीय जनमत भारताच्या बाजूने - कदाचित नाईलाजाने - राहते. अगदी परवाच्या हल्ल्यातही भारताने ’हा गैर-लष्करी हल्ला होता नि केवळ जैश-ए-महंमद ची ठाणी उध्वस्त करण्यापुरता होता (थोडक्यात पाकिस्तान विरोधात नव्हता)’ अशी भूमिका घेतली आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी ’अंडरप्ले’ करत हा काही दोन देशांमधल्या युद्धाचा मुद्दा नाही असेच संकेत दिले होते. त्यामुळेच त्यांनी कदाचित आपले अन्य कार्यक्रम न बदलता अटेंड केले. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदनच करायला हवे.

या उलट आपला मूर्ख मोदी-लाचार मीडीया मात्र ’मोदी कसे रात्रभर जागले’, ’त्यांनी स्वत: ऑर्डर दिली’ वगैरे हेडलाईन्स देत त्यांना पुन्हा पुन्हा ओढून आणत होते. त्यात आपल्या धन्याने दिलेले संकेत ध्यानात न घेता नेमके उलट करतो आहोत याचे भान त्यांना नव्हते. (येडियुरप्पासारखा सत्तालोलुप तर त्याहीपुढे गेला.)

नेमका याच गोष्टीचा फायदा इम्रान यांनी उचलला आहे असे माझे मत पडले. त्यांनी अशाही परिस्थितीत चर्चेचे केलेले आवाहन, अभिनंदन यांचा आपल्याला चांगली वर्तणूक मिळते आहे याचा जाहीर केलेला वीडिओ यातून आता आपण शांततेचे प्रयत्न करत आहोत नि भारतीय आक्रमक आहेत असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. थोडक्यात वर्षानुवर्षे ज्या भूमिका दोन देशांनी घेतल्या होत्या, त्याच्या नेमके उलट चित्र रंगवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याला आपल्या युद्धखोर रिपोर्टिंगने आणि इम्रान लाचार झाले वगैरे अडाणी मूल्यमापनाने आपली माध्यमे मदतच करत आहेत.

एकुणात हा स्ट्राईक भरपूर नुकसान करुन युद्धाला आमंत्रण देण्यापेक्षा, आपली कारवाई पाकिस्तान विरोधात नव्हे तर केवळ त्यांच्या हद्दीतील दहशतवादी संघटनांना धाक बसवण्यासाठी आहे हे दर्शवण्यासाठी होता. आम्ही मनात आणू तर तुम्हाला इथे बसून नष्ट करु शकतो हा त्यांना इशारा देतानाच, पाकिस्तानने त्यांना आवर घालावा अन्यथा आमच्यात इतकी क्षमता आहे की तुमच्या नाकावर टिच्चून तुमच्या एफ-१६ ना न जुमानता आम्ही हवे ते करु शकतो इतका सज्जड इशारा देण्यासाठी होता. केवळ इशारा देण्याइतकीच त्याची तीव्रता ठेवली होती. यातून हा पाकिस्तानविरोधात नाही हे ही ठसवले होते, इतकी काटेकोर भूमिका तयार करताना भाजप/संघ मंडळींची नेहमीची युद्धखोरी आड येऊ दिली नाही यासाठी मोदींचे आभारच मानले पाहिजेत. (त्याउलट ते निवडणुकीतील यशासाठी युद्ध करतील असा आचरट तर्क देणारेही दिसले. ही वैचारिक दिवाळखोरी काही केवळ भक्तांची मक्तेदारी नाही हे दिसले.)

पण या सार्‍यावर दोन निवस नंगा नाच करत भारतीय माध्यमांनी भारताची युद्धखोर, युद्धास सज्ज अशी भूमिका निर्माण करुण पूर्ण पाणी फिरवले. असल्या बेजबाबदार माध्यमांच्या नि #घरबसल्यायुध्दखोर भक्तांच्या आततायीपणामुळे स्ट्राईक्सच्या निर्णय आणि अंमलबजावणीशी संबंधित असलेल्यांच्या सारा शहाणपणा मातीत गेला आहे.

’युद्धखोर’ ही मोदींना कदाचित अपेक्षित नसलेली भूमिका माध्यमांनी त्यांच्यावर लादली. ते राजा बनू पाहात असताना माध्यमांनी त्यांना सेनापतीपद बहाल करुन टाकले आहे.

नेता देश घडवत नसतो, सामान्य माणसे घडवत असतात. आणि सामान्य माणसे जोवर खुजी आहेत, संकुचित मानसिकतेची आहेत तोवर नेता डोंबल काही साध्य करु शकत नसतो.

#ShameIndianMedia

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा