शनिवार, २ मार्च, २०१९

छोटा शेल्डन आणि छद्मराष्ट्रवाद

यंग शेल्डन’चा सोळावा एपिसोड पाहिला. इंग्रजीत म्हणतात तसे couldn't have come at a more appropriate time .

एक नऊ-दहा वर्षांचा मुलगा. त्याच्या आवडीच्या ब्रेडची चव बदलली आणि याचे कारण म्हणजे स्थानिक बेकरी आता कार्पोरेट कंपनीने ताब्यात घेतली नि उत्पादनाचे यांत्रिकीकरण केले हे त्याला समजते. त्याविरोधात तो रिटेल स्टोअर समोर उभा राहून पिटिशनवर सह्या गोळा करत असतो. तिथे त्यानेच बोलावलेल्या चॅनेलची प्रतिनिधी त्याला ’तुला कार्पोरेट कंपनी नको, मग काय कम्युनिस्ट व्यवस्था आणायची आहे का?’ असा प्रश्न विचारते. त्या व्यवस्थेत आपला जुना ब्रेड परत मिळॆल एवढ्याच हेतूने तो ’हो’ म्हणतो. मग ती बया त्याची हेडलाईन बनवते. 

तो टेक्सस या दक्षिणी राज्यात राहात असतो. (अमेरिकी दक्षिणी राज्ये आणि टेक्सस यांचा इतिहास जिज्ञासूंनी काढून पाहावा.) अचानक सारे परिचित उलटतात. शाळेपासून शेजार्‍यांपर्यंत सारे शेल्डन कुटुंबाला टाळू लागतात. शेल्डनचे वडील प्रथम धावाधाव करुन तळघरात टाकून दिलेला अमेरिकन झेंडा काढून लावतात. त्याची आजी तर सार्‍या घरावरच लहान मोठे झेंडे लावते. टेप लावून देशभक्तीची गाणी म्हणत बसते. लोक शेल्डनच्या वडिलांच्या प्रिन्सिपलला फोन कर-करुन त्यांना नोकरीवरुन काढण्याची मागणी करु लागतात. या सार्‍या गदारोळामुळे घरचेही शेल्डनशी फटकून वागू लागतात.

या संपूर्ण प्रकारात त्या नऊ-दहा वर्षांच्या मुलाला कम्युनिजम म्हणजे नक्की काय नि त्यावर आधारित व्यवस्था म्हणजे काय हे समजत असेल का? असा प्रश्न एकाचाही मनात येत नाही. (फक्त शेल्डनचा मोठा भाऊ जॉर्जी याच्या मैत्रिणीचा अपवाद). चॅनेल-प्रतिनिधीनेच ते त्याच्याकडून वदवून घेतले आहे हे समजून घ्यायची बहुतेकांची इच्छा नाही. खोट्या राष्ट्रभक्तीचे आणि कम्युनिस्टद्वेषाचे जू त्या लहान मुलाच्या खांद्यावर देताना काडीची लाज एकालाही वाटत नाही.

तो हो म्हणाला म्हणजे तो कम्युनिस्ट आहे, आणि तो कम्युनिस्ट आहे म्हणजे त्याच्या घरातून त्याच्यावर तेच ’संस्कार’ झाले आहेत असा ग्रह बहुतेक परिचित करुन घेतात. दुसर्‍याला स्वत:पेक्षा कमी देशभक्त, वा देशद्रोही ठरवायला सार्‍याच देशातले लोक हपापलेले असतात असे दिसते.

उन्मादी समाजाचे फक्त जमावात रूपांतर होते असे मी म्हणतो ते यासाठीच.

सनसनाटीपणाची हाव असलेला मीडिया, देशभक्तीचा उन्माद आणि काल्पनिक शत्रूची भीती (paranoia) ही काही कुण्या एका देशाची मिरासदारी थोडीच आहे?
 
#PseudoPatriotism

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा