-
बहुप्रतीक्षित नोबेल शांतता पुरस्कार अखेर जाहीर झाला. सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या विरोधक असलेल्या, ‘आपल्या देशात अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप करावा’ अशी मागणी करणार्या आणि जगभरात सर्वाधिक खनिज तेलाचे साठे असलेल्या त्या देशातील ते साठे भांडवलदारांच्या ओटीत टाकण्यास उत्सुक असणार्या, व्हेनेझुएलाच्या मारिया मच्याडो यांच्या पदरात हा पुरस्कार पडला. मच्याडो यांचा राजकीय दृष्टीकोन शांततावादी मुळीच नाही. नोबेल शांतता कमिटीने बहुधा ‘समाजवाद नि समाजवादी विरोधक = शांततावादी’ ही सोपी व्याख्या स्वीकारली असावी. विध्वंसाचे हत्यार असलेल्या डायनामाईटच्या विक्रीतून अमाप पैसा केलेल्या नोबेलने हा पुरस्कार ठेवलेला असल्याने अंतर्विरोध हा त्याचा स्थायीभाव असा पुन्हा-पुन्हा दिसतो.
पण मच्याडोंना हा पुरस्कार मिळाला यापेक्षा, ‘मी आठ युद्ध थांबवली, मला नोबेल शांतता पुरस्कार द्या’ असं निर्लज्जपणे म्हणत देशोदेशी हिंडणार्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पना अखेर नोबेल कमिटीने ठेंगा दाखवला याची चर्चा अधिक झाली. ट्रम्प यांचा स्वभाव पाहाता यांच्या यशापाठीमागे आपणच असल्याचा दावा अजूनही करु शकतात. मारिया यांनी आपला हा पुरस्कार ट्रम्प यांना अर्पण केलाही आहे.
राजकीय पत घसरली, की राष्ट्रभक्ती नावाचे हुकमी हत्यार शमीच्या झाडावरुन काढून बरेच एककल्ली नेते त्याचा वापर करताना दिसतात. (या विषयावर ‘बेगिन बालाकोट, बुश आणि अंधारातील अधेली’ हा लेख इथेच वाचता येईल.) मागच्या निवडणुकीत बायडेन यांच्याकडून पराभूत झाल्याने पिसाटलेल्या ट्रम्प यांनीही तोच मार्ग अनुसरावा हे ओघाने आलेच. सनातनी मानसिकतेच्या त्यांच्या रिपब्लिकन मतदारांना हा प्रकार मिरवायलाही छान उपयोगी पडणार होता.
मग ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ऊर्फ MAGA या घोषवाक्याखाली ट्रम्प यांचा प्रचार सुरु झाला. बहुतेक राष्ट्रांत, राष्ट्रांतर्गत राज्यांत, ‘भूमिपुत्रांची कड घेणे’ हा ही एक सोपा उपाय. कारण तो मूलत:च शत्रूलक्ष्यी असतो. ट्रम्प यांनीही ‘मी फुकट्या स्थलांतरितांना हाकलून अमेरिकेची समृद्धी फक्त अमेरिकन्ससाठीच ठेवेन’ अशी गर्जना केली. युरपिय वंशाच्या नि पुरुषी वर्चस्ववादी मागास दृष्टीकोनाच्या त्यांच्या समर्थकांना यातून आता गगन ठेंगणे भासू लागले.
थोडं आडवाटेला जाऊन एक उदाहरण देतो.
दोन-तीन आठवड्यांपूर्वी ट्रम्प यांच्या ‘स्थलांतरित विरोधी धडक कारवाई पथका’ने (ICE) जॉर्जिया राज्यामध्ये Hyundai ही द. कोरियन कंपनी उभारत असलेल्या एका सर्व्हिस सेंटरवर छापा घालून तीनशे कोरियन नागरिकांना अटक केली नि हातकड्या घालून मिरवले. दुसर्या दिवशी स्थानिक रिपब्लिकन लोकप्रतिनिधीने ‘बघा, अमेरिकन लोकांसाठी तीनशे नोकर्या मोकळ्या झाल्या’ अशी बढाई मारली. पण असे बढाईखोर बहुधा अडाणी असतात हे पुन्हा प्रत्ययाला आले. ते सर्व्हिस सेंटर उभारणीचे काम कंपनीच्या अमेरिकन ग्राहकांना स्थानिक साहाय्य केंद्र निर्माण करणारे होते. ते पुरे झाल्यानंतर तिथे सुमारे नऊ हजार अमेरिकन व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार होता.
हे ध्यानात आल्यावर प्रशासनाने या कामगारांना मुक्त करुन ‘त्यांची इच्छा असल्यास’, त्यांना त्या ठिकाणी काम करण्यास ‘मुभा आहे’ असे सांगितले. पण ‘झाला तेवढा तमाशा पुरे झाला’ म्हणून त्यांच्यातील एकाचा अपवाद वगळता सर्वांनी मायदेशी परत जाणे पसंत केले. इतकेच नव्हे तर Hyudai कंपनीनेही आपले हात वर केले नि हा प्रोजेक्ट गुंडाळून अमेरिकन्ससाठीही साहाय्य सेवा ही कोरियातूनच चालू राहील असे जाहीर केले. म्हणजे रोजगार गेले नि स्थानिक सेवाही. पण चमकोगिरी करणार्या नेत्यांचे काम झाले होते नि आपली चूक मान्य करण्याची पद्धत भारतीय राजकारण्यांत नाही तशीच अमेरिकनही. त्यामुळे ICE नामक गेस्टापोंचा नंगा नाच चालूच राहिला आहे.
या नि अशा अनेक उदाहरणांच्या नि तर्काच्या आधारे ‘बाहेरचे हटाव, अपनेही लाओ’ इतकं सरधोपट गणित असत नाही हे सिद्ध होत आले आहे. परदेशी व्यक्ती अमेरिकन व्यक्तींचे रोजगार हिरावून घेतात असेच नसते. अनेकदा ते ज्या संस्था, कंपन्या उभ्या करतात, त्यातून रोजगारच नव्हे तर स्थानिकांसाठी नव्या संधी वा सेवाही उपलब्ध होतात. काही वेळा संशोधनाची, कौशल्याची नवी दारे उघडली जातात. काही अमेरिकन तज्ज्ञ ही भूमिका विश्लेषणासह वारंवार मांडत आले आहेत.
पण माणसांच्या अडाणी टोळ्यांवर ज्यांना राज्य करायचे आहे असे नेते हे समजून घेण्याच्या फंदात पडत नाहीत. त्या टोळ्यांना जे हवे ते बिनदिक्कत देऊन टाकत ते आपली खुर्ची सुरक्षित करत असतात. ‘त्यात त्या टोळ्यांचे नुकसानच आहे’ हे ठाऊक असले, तरी त्या माथेफिरु टोळ्यांना ते समजावून देण्याची समाजसेवा करण्यापेक्षा त्यांना स्वार्थ साधणे अधिक सोपे असते. ट्रम्पनीही हाच मार्ग अनुसरला आहे.
तिसरे हत्यार म्हणजे अमेरिकेच्या बाहेरील शत्रूंना धडा शिकवणे. ‘सारे जग फुकट्यांनी भरले आहे नि ते अमेरिकेला लुटते आहे’ हा भ्रम अमेरिकन जनतेच्या माथी त्यांनी मारायला सुरुवात केली. आपले काहीतरी कुणीतरी हिरावून घेते आहे नि आपल्याला ते ठाऊकच नाही, हे ऐकून फारसा खोल विचार न करणार्या कुणाचेही माथे भडकणार हे ओघाने आलेच. मग आता या समस्येवर उपाय काय... तर ट्रम्प आहेत ना त्यासाठी. त्यांना निवडून द्या म्हणजे झालं.
बाहेरच्या शत्रूचा बागुलबुवा दाखवून आपला गट राखता येतो. महाभारतामध्ये दुर्योधन म्हणतो, ‘पांडवांशी संघर्ष आहे म्हणून मी शंभर कौरवांची एकजूट राखून त्यांच्यावर वर्चस्व गाजवू शकतो. ते नसते तर यातील प्रत्येक जण कुरु साम्राज्याचा वाटा मागण्यासाठी माझ्या उरावर बसला असता.’ दोन शत्रूंमधला संघर्ष असला की बाजू निवडणे प्रत्येकाला बंधनकारक होऊन जाते. तिसरी, चौथी, पाचवी भूमिका घेण्याचे पर्याय संपुष्टात येतात.
त्याच धर्तीवर ट्रम्प नि ट्रम्पसारख्या इतर ‘देशाला श्रेष्ठ बनवेन, महान बनवेन’ म्हणणार्या नेत्यांचे धोरण हे नेहमी शत्रूलक्ष्यीच असते. ‘कुणीतरी वा कुठला तरी गट देशाचे, समाजाचे खच्चीकरण करतो आहे. मी त्याचे निर्दालन करुन तो अडथळा दूर करेन’ असे अवघड प्रश्नाचे सोपे, आकर्षक नि लोकांना चटकन पटणारे उत्तर शोधून ते आपल्या अल्पबुद्धी समर्थकांच्या माथी मारतात. त्यानंतर त्या गटाला वा गटांना अधूनमधून धोपटत आपले स्थान बळकट करत नेतात.
त्यातच ट्रम्प यांच्या सुदैवाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर डेमोक्रेटिक पक्षाला उमेदवार बदलणे भाग पडले आणि नवा उमेदवार ही बिगर-युरपिय वंशाची, ‘पुरेशी ख्रिश्चन’ नसलेली, त्यातही स्त्री असल्याने त्यांचा सत्तेचा मार्ग अधिक सुकर झाला. मागील निवडणुकीमध्ये झालेल्या बायडेन यांच्या विजयाने व्हाईट हाऊस सोडावे लागल्याने पिसाटलेल्या ट्रम्प यांचा चार वर्षांनी पुन्हा तिथे प्रवेश झाला. न मिळालेल्या गोष्टीपेक्षा गमावलेल्या गोष्टीची वेदना अधिक तीव्र असते याचा अनुभव ट्रम्प यांनी घेतला होता. सत्तेवर येताच त्यांनी आपल्या त्या तीन शत्रूलक्ष्यी धोरणांचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली.
- (क्रमश:) -
पुढील भाग » ट्रम्प आणि इस्रायल
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५
ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - १ : अमेरिकेमध्ये ट्रम्प
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा